सर्व साथी सहकारी मित्रांनो, तसेच हितचिंतक आणि जागृत वाचकहो, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या दिवाळी विशेषांकासाठी महाराष्ट्र अं.नि.स.चा कार्याध्यक्ष म्हणून काय लिहावे, याचा विचार करीत असताना लक्षात असं आलं की, शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतर अनपेक्षितपणे ज्या जबाबदार्या अंगावर येऊन आदळल्या, त्याला सामोरे जाताना अक्षरश: मागील दोन–अडीच वर्षे सर्वजण दमछाक होईस्तोवर कामामागे धावत आहोत, आता कोठे त्यातून उसंत होऊन स्थिरस्थावर होत आहोत. त्यामुळे स्वाभाविकच समितीच्या रोजच्या कामाव्यतिरिक्त थोडे व्यापक परिघाबाबत, एकूणच देशातील सहा स्थितीबाबत कार्याध्यक्ष म्हणून मला काय वाटते हे तुमच्याशी बोलायला पाहिजे, असे प्रकर्षाने जाणवत होते. आपल्याला देखील ते समजून घ्यावयाची उत्सुकता आणि अपेक्षा असल्याचे समजत होते; म्हणूनच या सर्व बाबतीत मनमोकळेपणाने लिहिले आहे. त्यावर आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे स्वागतच आहे.
सध्या देशातील असहिष्णुतेचा मुद्दा राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रात चर्चेच्या केंद्रभागी आहे. खरं तर आर्थिक क्षेत्रावर देखील त्याचा दूरगामी प्रभाव राहणार आहे. कारण देशोदेशीच्या ज्या परकीय गुंतवणूकदारांना देशाचे पंतप्रधान भारतात गुंतवणुकीसाठी आवाहन करीत आहेत, त्यांना भारतातील वातावरण सुरक्षित वाटावे, अशी परिस्थिती खचितच नाही. देशातील विचारवंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलावंत पुरस्कार वापसीतून निषेध नोंदवीत आहेत. त्याबाबत समर्थन आणि टीका या दोन्ही बाजूंनी धुरळा उडत आहे. टीका करणार्यांकडून दोन प्रकारचे युक्तिवाद केले जातात; एक म्हणजे – यापूर्वी अशा स्वरुपाच्या अनेक घटना घडल्या. जसे- इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेले शिखांचे हत्याकांड, नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया, मुंबई बॉम्बस्फोट, शेतकरी आत्महत्या वगैरे. त्यावेळी त्यांनी पुरस्कार का परत केले नाहीत? दुसरा म्हणजे – काही किरकोळ घटना (त्यांच्या दृष्टीने) म्हणजे काही देशात अगदीच अराजक माजल्यासारखी असहिष्णू परिस्थिती नाही. त्याचा एवढा बाऊ करणे हे षड् यंत्र आहे. या दोन्ही युक्तिवादांचे सामायिक उत्तर हेच आहे की, भारतातील जनमानस हे मध्यममार्गी असून त्यांना शांततामय सहजीवनच प्रिय आहे. त्यामुळे एका बाजूला राष्ट्रभक्तीची स्वयंघोषित घाऊक मक्तेदारी आणि दुसर्या बाजूला देश दुभंगणार्या घटना/कृतींना खुला वा मूक पाठिंबा यातील दुटप्पीपणा सामान्य जनतेला पक्का समजतो. बिहारच्या निकालाने हे सिद्ध करून लोकशाही बळकट केली आहे.
देशातील या स्वरुपाच्या हिंसक घटना म्हणजे काही सर्वव्यापी असहिष्णुता नाही; तर मर्यादितांचा उन्माद आणि सत्तेचा कैफ आहे. या उन्मादाला मोडून काढण्याची संविधानिक जबाबदारी ज्या घटकांची आहे, त्यातील काही शासन प्रतिनिधी खासदार, मंत्री आणि राज्यपालदेखील बेजबाबदारपणे यात भर घालत आहेत आणि सर्वोच्च स्थानी असलेले नेतृत्त्व याबाबत चकार शब्द बोलत नाही, याचीच खरी चिंता आणि भीती संवेदनशील माणसांना वाटते. त्यातूनच पुरस्कार वापसीचे सत्र सुरू आहे. म्हणून पुरस्कार वापसी ही असहिष्णू-हिंसक घटनेच्या निषेधापेक्षा याबाबत काहीही भूमिका न घेणार्या घटनादत्त जबाबदारी असलेलया नेतृत्त्वाच्या निषेधासाठी आहे असे मला वाटते. ही सर्व चर्चा येथे उपस्थित करण्याचा हेतू असा की, या घटनाक्रमाचा प्रारंभबिंदूच महाराष्ट्र अं.नि.स.चा नेता ‘पृथ्वी मोलाचा माणूस’ शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाची घटना हा आहे.
कृतिशीलता हीच ताकद
डॉक्टरांच्या हत्येनंतर संघटना थांबली नाही, मोडली नाही, दुभंगली नाही; याउलट तेवढ्याच ताकदीने उभी राहिली आहे. याचे गमक आपण सनदशीर मार्गाने निषेध करण्याच्या सोबतच पूर्वीइतकेच; किंबहुना जास्त कृतिशील आहोत, यात आहे. म्हणून पुरस्कार वापसी करणार्या साहित्यिक-कलावंतांनी तेवढ्यावरच न थांबता आपली लेखणी, आपली कला, आपलं नाट्य, आपला सांस्कृतिक आविष्कार या उन्मादाविरुद्ध प्रखर केला पाहिजे, तेजस्वी केला पाहिजे. “आम्ही दगड मारणार नाही, संताप व्यक्त करण्यासाठी नाटक करू” असे म्हणून रिंगणनाट्य निर्माण करणारे या कल्पनेचे जनक अतुल पेठे या कसदार नाट्यकर्मी, नाट्य दिग्दर्शकाने वाढत्या हिंसांच्या विरुद्ध दि.15/9/2015 रोजी केलेले (यू ट्यूबवर Protest By Atul Pethe) हे अवघ्या 12 मिनिटांचे मूक नाट्य अहिंसेवरील दृढनिश्चयी आणि अविचल वृत्तीने हिंसेला सामोरे जातानाचे अंगावर काटा आणणारे प्रभावी नाट्य आहे.
अशा सर्व प्रतिकूल वातावरणात आपण ‘महाराष्ट्र अंनिस’च्या पंचविशीचा टप्पा पार केला. त्यानिमित्त एक दिमाखदार अधिवेशन आणि भारतीय विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद आपण पुण्यात घेतली. या अधिवेशनामुळे आम्हा संघटनेतील कार्यकर्त्यांचे परस्परांतील; त्याचबरोबर व्यापक परिवर्तनाच्या लढ्यातील समविचारी साथी, संस्था, संघटनांसोबतचे स्नेहबंध अधिक घट्ट होऊन नैतिक नातेसंबंध प्रस्थापित होण्यास मदत झाली.
राष्ट्रीय परिषदेमुळे महाराष्ट्राच्या भूमीत पाय घट्ट रोवून देखील संघटनेचे काम देशव्यापी करण्याची शक्यता अधोरेखित झाली. या परिषदेच्या निमित्ताने भारतीय कसावर आधारीत विवेकवाद या नव्या विषयाच्या चर्चेला सुरुवात करण्यात आली आहे. जगभरातील विवेकवाद्यांच्या ‘देव आणि धर्म नाकारूनच अंधश्रद्धा निर्मूलन शक्य आहे’ या भूमिकेपेक्षा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वेगळी भूमिका असून ती संविधानाशी अधिक सुसंगत आहे. त्याचबरोबर भारतीय संत व समाजसुधारकांचा कृतिशील वारसा सांगणारी ही भूमिका भारतीय समाजमनाला एकदमच धक्का न देता मानवी साद घालणारी आहे.
1) देव आणि धर्माच्या सहाय्याने नीतिने वागू इच्छिणार्यांबद्दल आदर; मात्र सदसद्विवेकाने नैतिक वर्तनासाठी आग्रही.
2) विवेकशक्ती संघटित करून शांततामय, सनदशीर; पण प्रखरपणे समाजजीवनात हस्तक्षेप करण्यास इच्छुक आणि आजचे जग आहे, यापेक्षा अधिक चांगले घडविण्यासाठीची कटिबद्धता.
3) विवेकी व्यक्ती घडविणे आणि विवेकी समाजव्यवस्थेकडे वाटचाल करणे हेच प्रमुख ध्येय.
4) प्रधान कार्यक्षेत्र अंधश्रद्धा निर्मूलन हे खरेच; पण या क्षेत्राकडे मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद सुरू करण्याचा विवेकी प्रारंभबिंदू म्हणनू बघण्याचा दृष्टिकोन.
या बाबी अधिक स्पष्टपणे पोहोचविता आल्या.
अपप्रचार, आक्षेप, अपेक्षा आणि आशावाद –
समितीच्या रौप्यपूर्ती निमित्ताने पंचवीस वर्षांच्या वाटचालीचे जे मूल्यमापन झाले त्यातून पुढील कामाची दिशा ठरविण्यास निश्चितच मदत होणार आहे. या मूल्यमापनाचा तीन पातळ्यांवर विचार करता येईल. 1) विरोधकांनी केलेली विखारी टीका. 2) समविचारी मित्रांचे आक्षेप वा अपेक्षा. 3) संघटनांतर्गत झालेले क्षमता व मर्यादांचे मूल्यमापन.
यातील समितीच्या चारित्रहननाच्या उद्देशाने धर्मांध सनातनी प्रवृत्तींकडून जो निखालस खोटा आणि विखारी अपप्रचार केला जात आहे त्याची दखल घेऊन त्यावर भाष्य करण्याची देखील गरज नाही. अशा प्रकारच्या अशिष्ट टीकेला उत्तर देण्याच्या भानगडीत आपण यापूर्वी देखील कधी पडलो नाही, पडणार नाही. त्यात व्यर्थ वेळ न दवडता आणि शक्ती व्यय न करता आपले काम अधिक नेटाने, कार्यक्षमतेने आणि सकारात्मकतेने करीत राहणे हीच आपली कार्यपद्धती राहिली आहे. आपल्या अनेक उपक्रमांबाबत सुरवातीला अशा धर्मांध प्रवृत्तींनी कडवा विरोध केला. तेच उपक्रम आज जनचळवळ झाले आहेत. निर्माल्य आणि विसर्जित मूर्ती दान, नदी पेयजलांच्या स्रोतांऐवजी हौदात मूर्ती विसर्जन, होळीची पोळी दान करा आणि फटाकेमुक्त दिवाळी ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. यावर्षी तर पुण्यातील मानाच्या आणि प्रमुख गणेश मंडळांनी मूर्ती हौदात विसर्जन करून या उपक्रमांचे समाजहितकारकता आणि महत्त्व यावर शिक्कामोर्तबच केले आहे.
पूर्वी संघटनेचे नेतृत्व ब्राम्हणी आहे असा एक सूर अधूनमधून काही सन्मित्र आळवायचे. पण डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या घटनेने या साथींनाही जबरदस्त धक्का बसला. समाजातील धर्मांध प्रवृत्तींविरुद्ध अतिशय आक्रमक, तीव्र शब्दात आणि प्रसंगी आक्रस्ताळेपणे बोलणारे कितीतरी बहुजनमित्र असतांना अतिशय सहिष्णू वर्तन, संयमी आणि सतत संवादाची भूमिका असणार्या डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या विवेकजागराचीच भीती सर्व धर्मांधांना जास्त वाटत होती. हेच या निर्घृण हत्येने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपल्या टीकेबाबत आज या मित्रांमध्ये अपराधाची भावना आहे.
चळवळीच्या 25 वर्षांच्या वाटचालीतील एक फार मोठे यश म्हणजे उघडपणे चमत्काराचा दावा करणारे बुवा-बाबा आज फारसे दिसत नाहीत. अशा गावोगावच्या असंख्य लहान-मोठ्या बुवा, बाबा, महाराज, भगत, फकीर, देवर्षींची बुवाबाजी आपण जवळपास थांबवू शकलो आहोत. मात्र तुम्ही मोठ्या आध्यात्मिक बुवा-बाबांना हात घालत नाही असा एक आक्षेप येतो. मुळात समितीच्या कामाची सुरुवातच उघडपणे शोषण करणारे, चमत्कार करणारे, अमानुष, जीवघेण्या अंधश्रद्ध कृती करणार्या बुवाबाजीला विरोध करण्याच्या कामातून झाली. गावोगावी असलेल्या अशा बुवाबाबांकडे जाणारा समाज हा मुळात शोषित, वंचित, बहुजन, मागास व अशिक्षित होता. याउलट आध्यात्मिक बुवाबाजीकडे आकर्षिला जाणारा समाज हा काही अंशी तुलनेने सधन, उच्चभ्रू, उच्चशिक्षित आणि चंगळवादातून झटपट श्रीमंतीचा शॉर्टकट शोधणारा वर्ग आहे. त्यामुळे वंचित आणि पिछड्या, बहुजन आर्थिक मागास समूहाचे शोषण थांबविणे याला कामाच्या प्राधान्यक्रमात अग्रस्थान दिले जाणे स्वाभाविक आहे. तसेच या छोट्या, लहान आणि गावपातळीवरील बुवाबाबांचा भांडाफोड हे स्थानिक शाखेचे कार्यकर्ते त्यांच्या पातळीवर स्थानिक सहकार्यातून सहज करीत होते. पण अतिशय प्रस्थापित, राजकीय पाठबळ, सत्ता, धनशक्ती असलेल्या आणि फसव्या विज्ञानाची भाषा बोलणार्या आध्यात्मिक बुवाबाजी विरोधात लढण्यासाठी अधिक जास्त शक्तिसंचयाची आणि रणनीतीची गरज आहे. तरी देखील अशा मोठ्या आध्यात्मिक पंथ, संप्रदाय आणि बुवा-बाबांविरोधात समितीने थेट भूमिका घेऊन त्याविरुद्ध आवाज उठविला आहे. आणि लेखन देखील केले आहे. आता तर पुढील टप्प्यावरील कामाच्या संदर्भात आध्यात्मिक बुवाबाजी विरोधी लढा हा आपण दशकाचा कार्यक्रम ठरविला आहे. आधुनिक आध्यात्मिक बुवाबाजी आणि छद्म विज्ञानाविरोधी लढताना त्यांच्या सैद्धांतिक मांडणीतील फोलपणा, अशा बुवा-बाबांच्या उक्ती आणि कृतितील विरोधाभास, खुलेपणे धर्माच्या आवरणाआड चाललेले शोषणावर आधारित अर्थकारण आणि करचुकवेपणा, कायद्याला न जुमानण्याची प्रवृत्ती, अध्यात्माच्या बुरख्याआड घडणारी नैतिक अध:पतनाची आणि गुन्हेगारी कृत्ये आणि मानवी कल्याणाशी विसंगत, प्रयत्नवादाऐवजी वाढणारी शरणागत मानसिकता याविरुद्ध प्रबोधन, संवाद, संघर्ष या पातळीवर आपण काम करू इच्छितो. अशा मोठ्या शक्तिशाली बुवा-बाबांशी लढताना समविचारी मित्र संघटना-संस्था, प्रशासन आणि मुख्यत: प्रसार माध्यमांची मदत आणि सहभाग घेऊनच अधिक सघन, सशक्त आणि समर्थपणे लढायची तयारी करावी लागेल.
समकालीन वास्तवात चळवळींना नवीन तत्त्वज्ञानाची गरज आहे. नाही तर विचारांची एक पोथी बनते आणि ते वर्तमानातील आव्हानांकडे एकतर दुर्लक्ष करते किंवा त्याचे आकलन होत नाही. डॉ.दाभोलकर हे एका बाजूला चळवळीला विचार देणारे विचारवंत-तत्त्ववेत्ते होते, त्याचवेळी दुसर्या बाजूला ते कुशल संघटक होते. त्यांच्या हत्येने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहेे. ही पोकळी कशी भरून काढावयाची, अशी एक चिंता आपल्या हितचिंतक आणि संवेदनशील मित्रांकडून आपल्याबद्दलच्या प्रामाणिक आत्मियतेतून व्यक्त केली जाते. ही गोष्ट खरी आहे की, डॉक्टरांच्या खुनाची एक फार मोठी किंमत आपल्या संघटनेला आणि सर्वच परिवर्तनाच्या चळवळींना मोजावी लागली आहे. डॉक्टरांइतके प्रगल्भ, बहुआयामी आणि कृतिशील नेतृत्व निर्माण होणे हे विरळाच; पण याबाबतही डॉक्टरांच्या द्रष्टेपणाची साक्ष पटते. डॉ.दाभोलकरांनी तीन वर्षांपूर्वीच नेतृत्वाचे हस्तांतर केले होते आणि त्या आधीची तीन वर्षे त्याची पूर्वतयारी म्हणून दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांच्या नेतृत्व विकसनाची प्रक्रिया संघटनेत सुरू झाली होती. कोणीही एकटी व्यक्ती डॉक्टरांची जागा घेऊ शकणार नाही. मात्र सामुहिक नेतृत्वातून ही उणीव, ही कमतरता भरून निघू शकेल, या विश्वासाने आज संघटनेचे काम डॉक्टरांच्या हत्त्येनंतर देखील जवळपास अडीच वर्षे तेवढ्याच समर्थपणे सुरू आहे. त्यातून सामूहिक नेतृत्वाची भूमिका सिद्ध होत आहे.
खरं तर थोडे परखडपणे विवेचन केले, तर आजच्या वास्तवात महाराष्ट्रात पुरोगामी विचारवंतांची अजिबात कमतरता नाही. प्रागतिक-परिवर्तनाच्या चळवळींमध्ये आजपर्यंत भरपूर तात्त्विक मांडण्या झाल्या आहेत. वैचारिक खल कायमच चालत आलेत. पण केवळ वांझोट्या तात्त्विक चर्चांपेक्षा आपापसातील अभिनिवेश बाजूला ठेवून संघटितपणे कृतिशील होणे हीच खरी काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर ‘अंनिस’ची चळवळ सतत प्रवाही आणि उपक्रमशील आहे, ही निश्चितच जमेची बाजू आहे. अंनिस सतत सर्जनशीलपणे फील्डवर कार्यरत आहे. त्यामुळेच डॉक्टरांच्यानंतर देखील सर्व समविचारी मित्र, संस्था, संघटना, माध्यमे आणि समाजाकडून तेवढीच मान्यता, तेवढेच सहकार्य आणि तेवढाच सन्मान आजही मिळतो, जेवढा डॉक्टर हयात असताना मिळत होता. ही बाब अतिशय कृतज्ञतापूर्वक नमूद करू इच्छितो. अर्थातच, ज्या दिवशी आपण ग्राऊंडपासून लांब जाऊ त्याच क्षणी हा आदर, ही मान्यता आटून जाईल, हे गंभीरपणे लक्षात घ्यावयास हवे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अंधश्रद्धा निर्मूलन एके अंधश्रद्धा निर्मूलन, असे न करता व्यापक व्यवस्था म्हणून परिवर्तनाच्या क्षेत्रात थेट कृतिशील सहभाग घेतला पाहिजे, अशी अपेक्षा अनेकदा व्यक्त केली जाते. याबाबत ‘एखादी संघटना एका क्षेत्रात काम करते, ती पुरोगामी असेल; पण उर्वरीत क्षेत्रांमधून प्रतिक्रांती संघटित होते आणि पुरोगाम्यांचा पराभव होतो. त्यासाठी एकाच वेळी बहुआयामी, बहुपदरी भूमिका घेणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन केले जाते आणि त्यासाठी ‘अंनिस’ने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, बौद्धिक व नैतिक अशा सर्व क्षेत्रांतील आपली भूमिका स्वीकारली तरच तिचे चळवळीत रुपांतर होईल,’ अशी मांडणी केली जाते.
या संदर्भात माझे मत असे आहे की, महाराष्ट्र अं.नि.स.ने आपल्या कामातील चतु:सुत्रीतच व्यापक समाजपरिवर्तनाच्या कामाशी सहकार्याची भूमिका हे सूत्र स्वीकारले आहे. संघटनेची मागील 25 वर्षांची वाटचाल देखील त्याच स्वरुपाची राहिली आहे. खरेतर अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम म्हणजेच समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, तर्काच्या आधारावर प्रत्येक घटनेची चिकित्सा करणे आणि विवेकी वर्तनाचा आग्रह धरणे, हे कार्य खरं तर बदलण्याच्या प्रक्रियेतील गाभ्याचा भाग आहे. त्यामुळे अंनिस जी व्यापक परिवर्तनाच्या सर्वस्तरीय लढ्यात प्रत्यक्ष सहभागी नसेल तरी अशा सर्व लढ्यांसाठी लोकांच्या मनाची मशागत करण्याचे आणि त्यासाठी जमीन सुपीक करण्याचे मूलभूत काम समिती करते. या क्षेत्रात प्रतिक्रांती होण्याची कोणतीही शक्यता नाही. अशा परिवर्तनाच्या विविध क्षेत्रात काम करणार्या काही साथी, सहकार्यांना आपण करीत असलेले कामच व्यापक व्यवस्था परिवर्तनाचे काम आहे असे वाटते. मग काही मित्रांना वर्गलढ्याचे काम हेच खरे काम आहे असे वाटते, काहींना जातिअंताची लढाईच प्रमुख आहे असे वाटते, काहींना जागतिकीकरणाविरोधातील लढाई; तर काहींना आरोग्य-शिक्षण क्षेत्रातील काम महत्त्वाचे वाटते. त्यांच्या-त्यांच्या जागी या मित्रांची भूमिका रास्तच असते; मात्र व्यापक व्यवस्था परिवर्तन हे या सर्व कामांचा एकत्रित आणि एकजिनसी भाग आहे. त्यासाठी लोकमानस अधिकाधिक विवेकी करणे हे देखील तेवढेच तळाशी आणि पायथ्याशी करावयाचे काम आहे, ही भूमिका या सर्व साथी-सहकारी मित्रांनी नम्रपणे समजून घेतली पाहिजे. कारण डॉक्टरांच्या निधनानंतर ज्या ताकदीने समिती उभी आहे, त्याचे अप्रुप आणि कौतुक सर्वच समविचारी सहकारी मित्रांना आहे. त्यामुळे त्यांच्या संघटनेला प्रत्येक उपक्रमांतून आणि प्रबोधन-संघर्षाच्या कार्यक्रमातून आपली उपस्थिती अपेक्षित असते. शक्यतेनुसार त्याला आपल्या परीने प्रत्येक वेळी न्याय पण दिला जातो. मात्र काही वेळा आपल्याला गृहीत धरून उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यावेळी अतिशय दमछाक होते. त्यामुळे काही ठिकाणी पर्यायी सहकार्यांची उपस्थिती, काही कार्यक्रमांना पाठिंबा असे करावे लागते; पण तरी देखील अशा पद्धतीने अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून काम करताना दोघांनाही पुरेसे समाधान मिळू शकत नाही. त्यामुळे एकूण व्यापक परिवर्तनाच्या लढ्यातील बिरादरी मान्य करून देखील समितीचे स्वत:चे निर्धारित/नियोजित उपक्रम बाजूला ठेवून सर्वच ठिकाणी कृतिशील सहभागाची मर्यादा या समविचारी साथी-सहकार्यांनी समजून घेतली पाहिजे, असे वाटते.
शेवटी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे आज संघटना स्वरुपाचे आहे. हे लोकांच्या मनामनात असलेलं काम जनाजनात गेले, तर आपली संघटना जन्चळवळीचे रूप धारण करेल.
डॉक्टरांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक क्षेत्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार चर्चेच्या केंद्रभागी आला, त्यावरून अशा वाढ आणि विस्ताराच्या प्रचंड शक्यता वाढल्या आहेत देशभरातून आपला विचार लोकांना समजून घ्यावयाचा आहे. त्यासाठी समविचारी संस्था-संघटना आपल्याकडे आशेचा किरण म्हणून बघतात. आपल्या मर्यादांवर मात करून, लोकशाही पद्धतीने अधिक विकेंद्रित काम करत आणि सर्व समाजघटकांमध्ये जाऊन नवीन सहकारी मिळवत हे काम पुढे न्यावे लागेल. अगदी आसामपासून केरळपर्यंत आणि दिल्लीपासून गावपाड्यापर्यंत लोक आपल्याला समजून घेऊ इच्छितात. आपल्याशी जोडून घेऊ इच्छितात. आपल्या कामाबद्दल आदर आणि सहानुभूती बाळगून आहेत अशा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हे हजार हातांनी करावयाचे काम आहे. त्यासाठी नवीन मित्र मिळवत, नवीन क्षमता वाढवत आणि स्वाध्याय पक्का करत हातात हात घेऊन पुढे जाण्यासाठी कटिबद्ध होऊ या!
विवेकाचा आवाज बुलंद करू या!
– अविनाश पाटील
संपर्क : 9422790610