Categories
व्यक्तिविशेष

अग्नी गिळून प्रकाश देणारे डॉ. एम. एम. कलबुर्गी

वार्षिकांक - २०१५

कवीला प्रतिभा तेवढी पुरेशी ठरते; पण संशोधकाला प्रतिभेच्या जोडीने पांडित्य, परिश्रम आणि जिज्ञासा या गोष्टींची आवश्यकता असते, असे म्हटले जाते.

डॉ.(मल्लप्पा मडिवालप्पा कलबुर्गी) एम. एम. कलबुर्गी यांच्याबद्दल लिहीत असताना वरील विधानाची तीव्रतेने आठवण होते. त्यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातल्या सिंदगी तालुक्यात असलेल्या गुब्बेवाड या गावी झाला. लहानपणापासूनच त्यांच्यावर आणि इतर पाच भावंडांवर शरण संस्कृतीचे संस्कार झाले.

डॉ. कलबुर्गी यांचे कुटुंब अविभक्त असल्यामुळे घरची सगळी कामे सगळ्यांनी मिळून करायची आणि आपला अभ्यास करायचा ही पद्धत अंगवळणी पडली. त्यांचे वडील जिथे राहत होते, ‘यरगल्ल’ गावात तेथे त्यांनी आपले सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

नंतर तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदगी या गावी आपला पुढचा विद्याभ्यास सुरू केला. भाड्याने एक खोली घेऊन राहत असलेल्या डॉ.कलबुर्गी यांना रोजच्या बसने त्यांच्या गावाहून बुत्ती यायची. 1956 मध्ये मॅट्रिक पास झाल्यानंतर विजापूरच्या विजय कॉलेजमध्ये त्यांनी कला विभागात प्रवेश घेतला. 1958 मध्ये इंटर आर्टस्मध्ये कन्नड विषयास 72% गुण मिळवून पास झाले. कर्नाटक विद्यापीठाच्या बी.ए.परीक्षेत कन्नड विषयात पहिला क्रमांक पटकाविला ते वर्ष होते 1960.

1960 मध्ये कर्नाटक विद्यापीठाच्या कन्नड विभागात एम.ए.ला प्रवेश घेतला आणि डॉ. आर. सी. हिरेमठ यांच्या तालमीत त्यांचे एम.ए.चे शिक्षण सुरू झाले. 1962 मध्ये त्यांचे एम.ए.चे शिक्षण संपले, तेव्हा त्यांना जय चामराज ओडेयर पारितोषिक मिळाले. कारण कन्नड विषयात ते विद्यापीठात प्रथम क्रमांकावर होते.

शिक्षकी पेशास सुरूवात

त्यांच्या संशोधन-कार्याची सुरुवात कशी झाली, त्या क्षेत्रात त्यांची आसक्ती कशी वाढत गेली हे पाहणेही आनंदाचे आहे. कर्नाटक विद्यापीठाने ‘समग्र वचन वाङ्मयसंशोधन, संस्करण आणि प्रकाशन’ करण्याची योजना हाती घेतली होती. त्या योजनेत त्यांनी सहाय्यक संशोधक म्हणून पाच महिने काम केले. याचा त्यांना फार मोठा फायदा झाला. हस्तप्रती संग्रह, हस्तप्रतींचे वाचन, त्यांचे स्पष्टीकरण इत्यादी कामांत ते तरबेज झाले.

1962 मध्येच उत्तर कर्नाटकातल्या नामवंत आणि आता शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणार्‍या कर्नाटक कॉलेजमध्ये ते कन्नडचे शिक्षक म्हणून रूजू झाले. शिक्षकी पेशा पार पाडतच त्यांनी आपले संशोधनकार्य पूर्ण केले. ‘कविराज मार्ग परिसरातील कन्नड साहित्य’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. 1968 मध्ये त्यांना कर्नाटक विद्यापीठाची पी.एच.डी.मिळाली. त्यांच्या पीएच.डी. च्या प्रबंधामुळे आरंभकालीन कन्नड साहित्याबद्दल नवीन माहिती उपलब्ध झाली असल्याचे मानले जाते.

1966 ते 1998 पर्यंत डॉ.कलबुर्गी यांनी कर्नाटक विद्यापीठाच्या कन्नड विभागात वेगवेगळ्या पदांवर काम केले. 1980 मध्ये बसवेश्वर पीठाचे प्राध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली; पण अशैक्षणिक कारणांमुळे त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला.

1998 च्या मार्च महिन्यात त्यांनी हंपी विश्वविद्यालयाचे दुसरे कुलगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारली. तिथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला कन्नड साहित्यसेवेसाठी संपूर्णपणे वाहून घेतले. अनेक योजना हाती घेतल्या, होतकरू प्राध्यापकांना त्यांनी शैक्षणिक मार्गदर्शन केले, शिस्तीचे धडे दिले अनेक तरुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात पुढे आणले.

विद्वान, बोधक, लेखक, शिष्यप्रिय, भाषेचा अभिमानी ही सगळी लक्षणे- जी खर्‍या अर्थाने प्राध्यापक या पदावर असलेल्या व्यक्तीला आवश्यक असतात- त्यांच्या ठिकाणी होती.

‘विद्या व्यसनं व्यसनं अथवा हरिपादसेवनं व्यसनम’ या सुभाषिताप्रमाणे त्यांनी स्वत:ला विद्यार्जनाचे आणि विद्यादानाचे अखंड व्यसन लावून घेतले होते. कन्नड विभागातल्या त्यांच्या कक्षात त्यांच्या टेबलावर हस्तप्रती, शासनप्रती, शासनकोश यांचे भाग रचून ठेवलेले असायचे. या ग्रंथांच्या भोवतालात ते स्वत:ला बुडवून घेत आणि जगाला विसरत, असे त्यांचे मित्र सांगतात. त्यांच्या अशा अखंड परिश्रमवृत्तीमुळेच एक प्रगाढ पांडित्यपूर्ण व्यक्ती असा लौकिक त्यांनी मिळविला.

डॉ. कलबुर्गी यांनी हजारों विद्यार्थ्यांना घडविले. शरणांचे कायकतत्त्व त्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरून दाखविले. सत्यता, शुद्धता, निष्ठा या तीन गुणांच्या समवेतच त्यांनी आपली प्राध्यापकी पार पाडली. वेळेचे नियोजन करण्याच्या बाबतीत त्यांचा कुणीच हात धरत नसे. वक्तशीरपणा त्यांच्या रक्तातच भिनलेला होता, असे म्हटले तरी चालेल. अत्यंत कठीण असलेले विषय शिकवायला त्यांना खूप आवडे. हळेगन्नड काव्य (प्राचीन कन्नड काव्य) आणि शास्त्र ग्रंथांचे अध्यापन करण्यात त्यांचा हातखंडा होता. प्राचीन कन्नड काव्य कळायला खूप अवघड. पण, ते अशा एका तालबद्ध आणि लयबद्ध शैलीत ते वाचून दाखवीत की, त्यांच्या त्या वाचनानेच श्रोत्यांना त्या काव्याचा अर्थ कळू लागे. शिकवताना ते विषयांतर कधीच करत नसत, असे त्यांचे विद्यार्थी सांगतात.

डॉ. कलबुर्गी ज्या वर्षी कर्नाटक कॉलेजमध्ये रूजू झाले, त्याचवर्षी डॉ.स.स.माळवाड हे तिथे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. ‘शब्दमणीदर्पण’ हा कन्नडमधला शिकवण्यासाठी अत्यंत अवघड ग्रंथ. पण प्राचार्य मालवाड यांनी ‘हा ग्रंथ कोण शिकवणार’ असे विचारताच कलबुर्गी यांनी स्वत: शिकवण्याची तयारी दाखवली. तो ग्रंथ शिकवता शिकवता त्यांनी त्या (ग्रंथातील) संपादनातील दोष दाखवणारी लेखमाला लिहिली. ती संशोधनात्मक स्वरूपाची असून ‘दर्पणावलोकन’ या मालिकेतून ती प्रकाशित झाली. कर्नाटकातल्या अनेक विद्वानांनी त्याची स्तुती केली.

अध्यापन करत असतानाच आपण केलेल्या संशोधनातील निष्कर्ष विद्यार्थ्यांपुढे मांडत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्येही संशोधन कार्याबद्दल कुतूहल जागे झाले. शिस्तही बाणली. त्याचा परिणाम म्हणून डॉ .कलबुर्गी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कार्याला लावले. व्याकरण, छंदशास्त्र, ग्रंथसंपादनशास्त्र अशा विषयांबाबतीत नेहमी नवनवे विचार त्यांच्याकडून मांडले जाऊ लागले.

आपल्या सुदीर्घ अध्ययनाने आणि अध्यापनाने त्यांना सत्याचे जे दर्शन झाले, ते त्यांनी अव्यहतपणे आपल्या लेखनातून, पुस्तकांतून मांडून दाखविले. त्यांच्या लेखनाची सुरुवात प्राचीन काव्यविषयक ग्रंथापासून झाली. (शासनविषयक) – शिलालेखविषयक ग्रंथांचे त्यांनी लेखन केले. लोकसाहित्य(नामविज्ञान)-पदार्थविज्ञान याविषयींचे त्यांचे ग्रंथ म्हणजे कन्नड साहित्यविश्वाचा मोठा ठेवा मानला जातो.

त्यांचे विद्यार्थी आपापल्या कामाला लागले असले तरी धारवाडला आल्यावर त्यांना भेटल्याशिवाय जात नसत. भेटायला आलेल्या विद्यार्थ्यांना,(आता काय काम करत आहात?) ‘आता कोणत्या विषयावर संशोधन चाललंय? उगाचच आयुष्य व्यर्थ घालवू नका. काहीतरी भरीव कार्य करा,’ असे सांगत. तो विद्यार्थी रिकामाच असला तर त्याला कोणत्या तरी संशोधनकार्यासाठी प्रेरणा देत असत.

संशोधनातील मार्गदर्शक

संशोधन हे कलबुर्गी यांचे अत्यंत आवडीचे क्षेत्र. आपण जसे संशोधन केले, तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांकडूनही संशोधन करवून घेतले. पदवीसाठी पीएच. डी. करायची असेल तर आपल्याकडे येण्याची आवश्यकता नाही, असे ते विद्यार्थ्यांना स्पष्टपणे सांगत. संशोधनासाठी परिश्रम आणि प्रामाणिकपणा यांची गरज असल्याचे, ते आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत.

संस्थांची सेवा

डॉ.कलबुर्गी हे अविभक्त कुटुंबपद्धतीत वाढले. त्यामुळे त्यांना सहजीवनाचे, आपल्या परिसराविषयी राबण्याचे महत्व पटले असावे. याच कारणांमुळे त्यांनी अस्तित्वात असलेल्या पण निष्क्रियतेकडे झुकलेल्या अनेक संस्था पुनरूज्जीवित केल्या. नव्या संस्थांची उभारणी केली.

कर्नाटक विद्यापीठातील कन्नड अध्ययनपीठ हीच त्यांची कर्मभूमी. डॉ. कलबुर्गी तिथे कार्यरत असताना त्यांच्याबरोबर कन्नडमधील प्रगाढपंडित म्हणावेत असे, डॉ.आर.सी.हिरेमठ, डॉ. एस. एम. वृषभेंद्रस्वामी, डॉ. एम. एस. सुंकापूर अशी मंडळी कार्यरत होती. या मंडळींनी त्यांना शिकविलेही आहे.

धारवाडच्या विद्यावर्धक संघाने सार्वजनिक विद्यापीठाचे दायित्व स्वीकारावे, अशी त्यांची इच्छा होती. या संस्थेचे कार्यवाह म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. वेगवेगळ्या व्याख्यानमालांचे आयोजन करणे, शासकीय अनुदान मिळवून देणे, पुस्तक प्रकाशनासाठी सर्व ते सहाय्य करणे अशी अवघड आणि किचकट कामे त्यांनी अत्यंत शिस्तबद्धतेने आणि परिश्रमाने पार पाडली.

डॉ. कलबुर्गी यांच्या पुढाकाराने गदग येतील श्रीतोंहदार्य मठात ‘वीरशैव अध्ययन संस्था’ अस्तित्वात आली. वीरशैवांचे अप्रकाशित साहित्य, प्राचीन साहित्य, आधुनिक साहित्य या सार्‍यांचे प्रकाशन या संस्थेद्वारे करण्यात येऊ लागले.

मठांनी, आपल्याच मतांचा प्रचार करणारी केंद्रे बनू नये, तर त्यांनी सांस्कृतिक संस्थांच्या रूपाने आपला विकास घडवावा; हे त्यांचे धोरण होते. याच धोरणाचा एक भाग म्हणून बेळगावच्या श्री. नागनुरू रूद्राक्षी मठाच्या आश्रयाने ‘वीरशैव अध्ययन अकादमी’ अस्तित्वात आली.

शिमोगा येथील बेक्किन कल्मठात ‘मलेनाडू वीरशैव अध्ययन संस्था’ अस्तित्वात आली. या संस्थेमार्फत समग्र स्वरवचन साहित्य प्रकाशनाची योजना हाती घेण्यात आली. यातही डॉ. कलबुर्गी यांचा खूप मोठा सहभाग आहे.

ते जेव्हा हंपी विद्यापीठाचे कुलगुरू झाले, तेव्हा त्यांनी तिथे विश्वकन्नड विभाग, द्रविड संस्कृती विभाग, महिला अध्ययन विभाग सुरू केले.

संशोधक म्हणून मोठे कार्य

डॉ. कलबुर्गी यांनी केलेल्या संशोधनकार्याचा आढावा त्यांच्या शिष्यवर्गाने सहा मोठ्या खंडांमधून घेतला आहे. एवढ्यावरून त्यांच्या संशोधनकार्याची कल्पना यायला हरकत नाही.

संशोधन करताना मूलगामी साधनांचा शोध घेणे आवश्यक असते. डॉ. कलबुर्गी यांनी शिलालेख, नोंदणीलेख, भाषा, आचार-विचार, रीतीरिवाज यांच्याशी संबंधित साधनांचा संग्रह केला. त्यांचे प्रकाशन केले. या प्रकारे अध्ययन करताना त्यांनी कित्येक खेड्यांना भेटी दिल्या. तिथे नोंदणीलेखांची चौकशी केली, शिलालेख शोधून काढले. ग्रामस्थांची मने वळवून ते शिलालेख त्यांनी संग्रहालयात आणून ठेवले. हस्तलिखितेही आणून ठेवली. विद्यापीठ अनुदान मंडळाच्या सहाय्याने त्यांनी ‘कर्नाटकाच्या कैफियती’ नावाचा ग्रंथ प्रकाशित केला. मद्रासमध्ये असलेल्या 134 कैफियतींच्या हस्तलिखितांचा अभ्यास करून त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले.

डॉ. कलबुर्गी यांनी अभ्यासकांना, संशोधकांना उपयुक्त होतील, अशा काही स्रोतग्रंथांचे लेखन करून त्यांचे प्रकाशनही करविले.

धारवाड जिल्ह्यातील शिलालेखसूची

विजापूर तालुक्यातील शिलालेखसूची

कोल्हापूर लक्ष्मीसेन भट्टारक जैन बस्तीची हस्तलिखिते.

इंग्लंडमधील हस्तलिखितांचा संग्रह

हे त्यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य; याशिवाय कर्नाटक विद्यापीठाच्या कन्नड विभागाचे प्रमुख असताना त्यांनी सविस्तर विवेचनासह असलेल्या सूचींचा,(दहा खंडांमधून) संग्रह प्रकाशित केला आहे.

संपादनकार्य

संशोधनाच्या जोडीने डॉ. कलबुर्गी यांनी संपादन क्षेत्रातही भरीव कार्य केले आहे. त्यांनी स्वतंत्रपणे केलेल्या संपादनकार्याची माहिती अशी आहे.

मल्लिनाथपुराण संग्रह

बसवस्तोत्राची वचने

बसवण्यांची वचने भाग 1, 2

बसवण्यांची षट्स्थल वचनांचे महाखंड

कोंडगुळी कोशिराजाच्या कृती

आदस्याच्या लहान कृती

सिरमन नायकाचे सांकत्य

निंबसामंत चरित

सिरूमन चरित

गोल्लसिरूमन चरित

कर्नाटकाच्या कैफियती

या स्वतंत्र संपादनांव्यतिरिक्त त्यांनी संयुक्तरित्या संपादित केलेल्या ग्रंथांचीही यादी मोठी आहे.

संशोधन आणि संपादनकार्याच्या जोडीनेच त्यांचे स्वतंत्र लेखनही सुरू होते. पण त्यांच्यातील संशोधकाने त्यांच्यातील सर्जनशील लेखकाला वाढू दिले नाही, असे वाटते. ‘केट्टित्तु कल्याण’ हे त्यांनी लिहिलेले नाटक.

‘नीरू नीरडिसित्तु’ हा त्यांचा काव्यसंग्रह.

‘प्रवादी बसवेश्वर’ नावाचे लेखन बाहुल्यांच्या खेळासाठी त्यांनी लिहून दिले आहे.

1995 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘केंट्टित्तु कल्याण’ या नाटकात बसवण्णा हे केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या काळात बसवण्णा यांना मूढ परंपरा आणि चुकीच्या कल्पना यांच्याबरोबर कसा संघर्ष करावा लागला, याबद्दलचे चित्रण आहे. अग्रहारांमधील ब्राह्मण, शैवांच्या मठात असलेले आचार्य आणि ब्राह्मण अधिकारी या तीन ‘शाह्या’च होत्या. या तीन शाह्यांनी समाजाला आपल्या मुठीत ठेवण्याचा कसा प्रयत्न चालविला होता, या संबंधीचे चित्रण या नाटकात केलेेले दिसते. विधवा विवाह, आंतरजातीय विवाह यासारख्या त्या काळात अत्यंत क्रांतिकारक वाटणार्‍या घटनांना बसवण्णा यांनी प्रोत्साहन दिले. वेश्यांना त्यांच्या व्यवसायापासून परावृत्त करून त्यांना सन्मार्गाला लावले. अशा प्रकारच्या सामाजिक कार्यात बसवण्णा यांचा सहभाग होता. त्या सगळ्या घटनांचे चित्रण या नाटकातून केलेले दिसते. बिज्जळ राजाच्या खुनानंतर शरणांच्या हत्यांचे सत्र सुरू होते. इथपर्यंतचा भाग नाटकात येतो. “स्थावराला नाश आहे, जंगमाला नाश नाही,” या वचनाने हे नाटक संपते. बाराव्या शतकात झालेल्या धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक क्रांतीची कल्पना प्रेक्षकांना करून देण्याचे सामर्थ्य या नाटकात आहे. ‘नीरू निरडिसित्तु’ या त्यांच्या काव्यसंग्रहात डॉ. कलबुर्गी यांना त्यांच्या जीवनात आलेल्या कटू अनुभवांना, समस्या आलेल्या असताना त्यांना धीराने तोंड दिलेल्या अनुभवांना त्यांनी वाट करून दिलेली आहे. या कवितांमध्ये राग, दु:ख, निराशा, जुगुप्सा या सगळ्या भावनांचे चित्रण आलेले दिसते. दोष दाखवून देणार्‍या यातल्या काही कवितांमधून डॉ. कलबुर्गी एखाद्या क्रांतिकारकासारखे पेटून उठलेले दिसतात. काही कवितांमधून तत्कालीन परिस्थितीवर विडंबनात्मक भाष्य केल्याचेही जाणवते. त्यांना ज्यांनी त्रास दिला, त्यांच्याशी ज्यांनी द्रोह केला, त्या लोकांना उद्देशून ते म्हणतात, “तुमच्यापासून झालेला अग्नी गिळून मी तुम्हाला प्रकाश देतो. तुम्ही मात्र विस्तव होऊन जळता आणि राख होऊन उडून जाता.”

द्वेषाने द्वेषाला जिंकता येत नाही. प्रेमानेच त्याला जिंकावे असेच आपली प्राचीन परंपरा सांगते. यावर त्यांचा विश्वास होता. तरीही काही प्रसंगी शड्डू ठोकून ते शत्रूंना सामोरे जाताना दिसतात. ‘मी मरत नाही’ या त्यांच्या कवितेत ते म्हणतात, “तुमचा द्वेष पिऊनही सशक्त झालेला मी मरत नाही. माझ्या प्रीतीचे अमृत पिऊन दुबळे असलेले तुम्ही जगणार नाही.”

डॉ. कलबुर्गी यांच्या समग्र कार्याचा थोडक्यात परिचय करून द्यायचा तर खालीलप्रमाणे सांगता येईल.

त्यांची साहित्यिक सेवा लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

जानपद आणि यक्षगान अकादमीचा पुरस्कार

सहावेळा राज्य साहित्य अकादमीचा पुरस्कार

राज्योत्सव पुरस्कार

पंप पुरस्कार

वर्धमान पुरस्कार

विश्वमानव पुरस्कार

केंद्र साहित्य अकादमीचा पुरस्कार

संशोधनात्मक कृती – कविराज परिसराचे कन्नड साहित्य

मार्ग – चार खंड

संशोधनपर ग्रंथ :- कन्नड हस्तलिखितांचे शास्त्र

कन्नड ग्रंथ संपादनाचे शास्त्र

कन्नड नामविज्ञान

धारवाड जिल्ह्यातील शिलालेखांची सूची

महाराष्ट्रातील कन्नड शिलालेख

शिलालेखातील शिवशरण

शब्दमणी दर्पण संग्रह

कन्नड कैफियती

केळदि संस्थानचे समग्र अध्ययन

स्वादीचे राजघराणे

सारंगश्री

शिलालेखशास्त्र

प्राचीन ग्रंथांचे संपादन :- शिवयोगी प्रदिपिका

कोंडुगुळी कोशिराजाच्या कृती

बसवण्णाची (टीकीन) वचने.

सिरूमनायकाचे सांगत्य.

या साहित्यिक सेवेशिवाय त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या, त्यांना शासनाकडून अनुदान मिळवून दिले. शिस्त लावून दिले. त्यापैकी अलिकडच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे उदाहरण म्हणजे धारवाडच्या साधनकेरी येथील ‘राष्ट्रकवी द.रा.बेंद्रे यांचे राष्ट्रीय स्मारक.’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले आहे.

2010 च्या आसपास त्यांनी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. शरणांच्या 2500 निवडक वचनांचे बावीस भाषांमध्ये अनुवाद करणे हा तो प्रकल्प होता. त्यापैकी आठ भाषांमध्ये अनुवाद करविण्याचे काम अत्यंत तरुणाच्या उत्साहाने हाती घेतले होते. पुढे त्याचे काय झाले, समजले नाही.

-डॉ. ए. आर. यार्दी, धारवाड