Categories
कथा

देव दाभोलकर

वार्षिकांक - २०१५

निसर्गाचा समतोल म्हणजे काय असतं एकंदरीत; तर सगळ्या घटकांचे एकमेकांशी एक आदर्श प्रमाण असणं. म्हणजे सापांचे मुंगसांशी, पक्ष्यांचे किड्यांशी, हरणांचे वाघांशी, माणसांचे सगळ्यांशी इत्यादी. ते नीट टिकलं की, म्हणायचं पर्यावरण संतुलन. त्यात नित्यनेमाने ढवळाढवळ करून बिघाड करण्याचं काम माणूस नावाचा प्राणी करत असतो. म्हणजे असं की, लोकसंख्या शास्त्रात दर हजारी पुरुषांच्या मागे स्त्रियांचे आदर्श असं प्रमाण असतं. माणूस ते बिघडवितो. अगदी पाच दहा इकडे तिकडे झाले तरी खूप गोंधळ होतो. आता समाजा समाजात सगळं ठीक चाललंय. कुठलीही साथ नाही. सामूहिक आजारपणं नाहीत. आकाश नीरभ्र आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि भरपूर पाणी आहे. तरीही दर हजारी सर्दीचं, बद्धकोष्ठतेचं, अतिसाराचं, अ‍ॅलर्जीचं एक प्रमाण असतं. ही प्रमाणं पाहणी करून, प्रश्न विचारून मोजता येतात. जास्त खोलात जाऊन कष्ट घेतले तर होमो, लेस्बियन, हेट्रो यांचंही प्रमाण कळेल. तसंच दर हजारी विचारांच्या बाबतीत प्रमाण असतं काय म्हणजे दर हजारी चिकित्सक, चटकन विश्वास ठेवणारे, श्रद्धावान, नास्तिक, अश्रद्ध, अस्तिक यांची आकडेवारी काढता येईल का? कठीण आहे फार. एक माणूस आपल्या आवडीनुसार त्या त्या वळणांकडे जाईल. ते बघून आपल्याला त्याचा गट ठरवावा लागेल. पण नेहमीच तो एका वळणावर नसेल. प्रसंगाप्रमाणं तो वेगळाही वागेल. माझंच बघितलं तर मला थोडी सर्दी आणि बद्धकोष्ठता आहे. ही झाली आरोग्याची कॅटेगरी. पण मी सश्रद्ध, अश्रद्ध, अस्तिक, नास्तिक, चिकित्सक कोण आहे. इथं माझा मोठा लोचा झालाय. चेंदामेंदा झालाय डोक्याचा. तडफडून पार गाळात रूतलोय लहानपणापासून. बाहेर पडायचा मार्ग काढलाय शोधून. मी संजय नारायण दुधवडकर जातोय इथून.

चांगल्या मार्कांनी बारावी पास होऊन आता दुसर्‍या शहरात जातोय शिकायला. अ‍ॅडमिशन वगैरे झालंय. त्याची चिंता नाही, गंमत म्हणजे मी राहतो तो भाग मागास आहे, शाळा पाच मैलावर, कॉलेज दहा मैलावर, एस.टी.नाही, घरचे प्रचंड हाल, दारिद्य्र असं काही नाही. सगळं छान आहे. घरची परिस्थिती मस्त आहे. आसपास उत्तम शाळा, कॉलेज आहेत. पण तरीही मला इथून जायचंय. इकडच्या लोकांच्या मते मी माणूस नाही. अलौकिक शक्ती असलेला, भविष्य बदलू शकणारा कोणीतरी आहे. गोष्ट साधी आहे. जे इतरांच्यात नाही ते माझ्यात आहे असे लोक म्हणतात. एक तर माझ्या दोन्ही हातांना मिळून दहा बोटे आहेत. म्हणजे सहा अधिक चार. उजवा सहा, डावा चार आणि दुसरं म्हणजे माझ्या जिभेवर छानसा काळा डाग आहे. जो कोणालाही चटकन नजरेस पडतो. माझ्या लहानपणी दोन प्रसंग घडले असं सर्वजण म्हणतात. मला आठवतही नाही. जे काय घडलेलं ऐकलं ते सांगतो.

बालवाडी किंवा पहिलीतील गोष्ट असेल. काळजिभ्या किंवा सहा अधिक चार अशीच हाक मारून मला चिडवायचे. वर्गात टाईमपास नसेल तर मला चिडवायला सुरुवात करत. मी सांगतोय तो प्रसंग घडायच्या आधी आमच्या शेजारचे आजोबा गेले होते. त्यांच्या अंत्ययात्रेची तयारी मी नीट पाह्यली होती. दोन मोठे बांबू, छोटे पातळ बांबूचे तुकडे, भिजवलेलं सुंभ, खळवालं पांढरं कापड आणि त्यावर भपकून फेकलेला अबीर गुलाल. ते सगळं डोक्यात होतं. वर्गातल्या मुलांच्या चिडवण्याकडं तसं लक्ष नव्हतं. चिडवण्याचा परिणाम होत नाही म्हटल्यावर सर्वांनी मला टपल्या मारायला सुरवात केली. चिडून मी एकाची कॉलर धरली आणि शिवी दिल्यासारखे बोललो; तुझ्या बाबांना ने बांबूवर बांधून. दुसर्‍या दिवशी त्याचे वडील हार्ट अ‍ॅटॅकनं वारले. अजूनही सांगतोय मला खरंच यातलं काहीच आठवत नाही. पण असं म्हणतात की, मी स्वत: वर्गशिक्षिकेला जाऊन सांगितलं होतं की मी असं असं बोललो. घरी बाबांनी सॉलिड दम दिला होता. त्याच्या पुढच्या मे महिन्यात दुसरा प्रसंग घडला होता म्हणे. चाळीच्या गच्चीवर उन्हं दाखवायला चिंचेचे गोळे आणि वाळवणं असतं. खेळता खेळता चिंचेचे गोळे कुरतडायचे आणि रवंथ करायला कच्चा पापड तोंडात टाकायचा हे आमचे नेहमीचे असे. चोरून खाण्यातली सनसनाटी हीच खरी धमाल. एकदा म्हणे शेजारच्या काकींनी मला चिंच खाताना पकडलं. धपाटे मारत त्या मला आईकडे घेऊन चालल्या होत्या. तोंडतली चिंच पटापट संपवायची आणि त्यांच्या हाताची पकड सोडवून पळायचं अशी दोन कामं मी एकाच वेळी करत होतो. त्यांना आवरेनासा झाल्यावर मला दोन तीन धपाटे मारत म्हणाल्या, ‘मर मेल्या, मी पट्कन, स्वत:ला सोडवून घेत काकीला म्हटलं, ‘तूच’. दोन तीन दिवसांनी ती गेली.

मला एवढचं आठवतंय की, काकी गेल्यावर काही दिवसांनी माझ्याशी कोणी खेळेना. अगदी आत्तापर्यंत. न खेळण्याचे प्रसंगसुद्धा अंधुक आठवतायत. मी मुलांच्या मागे लागायचो. मला खेळायला घ्या म्हणून. कोणीच बोलायचं नाही माझ्याशी. मी आलो की घाबरून पळत, खेळ बंद करून घरात बसत. ती काकी वारल्यावर घरात कोणीच काही बोललं नाही. दादागिरी करणारा मोठा भाऊ एकदम गप्प झाला. बाबा रागवायचे तेव्हा आपले वाटायचे. तेही बंद झाले बोलायचे. दिवस चालू होते. आतून चिडचिड होत होती. असे सगळे का वागतायेत कळत नव्हतं. मी सहा अधिक चार म्हणून सगळे असे वागतात. मी स्वत:वर चिडून भयानक वागलो होतो. नक्की आठवत नाही, काचा पडल्यात. सगळं आसपासचं सामान खाली अस्ताव्यस्त पडलंय. वडील कोपर्‍यात मख्ख बसून आहेत. मी धाय मोकलून रडतोय. काहीतरी बोलतोय. हात रक्तबंबाळ, अस्वस्थ आई, मी डॉक्टरांकडे उभा. डॉक्टरांनी बोट कापणार नाही सांगितलं. असेच पुढचे दिवस डोक्यात राख घालण्याचे. मी सुसाट पळतोय. डोकं भणभणतंय. नाही. जा. बस तोंडात एवढंच येतंय. कुठंतरी आडोशाला गेलं तरी लोक बघतील असं वाटतं. चटकन तोंड मिटून हाताचे पंजे मागे लपवत चालणं. दमलोय. लांबपर्यंत चाललोय. भूक लागलीय. पायरीवर बसलोय. रात्र. डुलकी लागली. पुजारी उठवून जा सांगतो. मी हलत नाही. मला रिक्षात घालून घरी पोचवतो. आईनं पोटाशी धरलं. मी भोकाड पसरलं. घरातले बाकीचे सपाट चेहरे, पोटाशी धरणारी आई एकटी. हे शेवटचं नीट आठवतं. पुढचे दिवस आईच्या मागे, शाळा सुरू होते. सगळे टाळतात. डोकं भडकलेलं, घरी येऊन आईकडे बडबडायचं. वेळ जात नाही म्हणून अभ्यास करायचा. पुन्हा आईच्या मागे. कोणाकोणाकडे घेऊन जायची. ती माणसं माझ्याकडे बघायची. मला लांब बसायला सांगून आईशी बोलायची. अंधुकसं आठवतंय हे सगळं. ती देवळात घेऊन जायची. म्हणायची काही मागू नकोस याच्याकडे. तुला काय हवं ते तो नक्की देणार. आज नाहीतर उद्या नक्की देणार तो. विश्वास ठेव. मग मी कधी कधी त्याच्याकडे तक्रारी करायला जायचो. माझ्याशी गप्पा मारायला दोघंजण झाले. आई आणि कधीकधी देव. बाकी सगळं भगभगीत.

वर्गात कोणी बोलत नाही. शिक्षक, मुलं कोणी नाही. पण कोणी मला अस्पृश्य किंवा कुत्रा म्हणून वागवत नाहीत. कोणीही माझ्याशी बोलू शकतो. मी त्यांच्याशी बोलू नये म्हणून त्यांचा आटापिटा. मी बोललेलं खरं होतं म्हटल्यावर कोण येईल बोलायला? खरं तर लोकांनी माझ्याकडे रांग लावायला हवी होती. मी त्यांना हवे ते पटापटा बोलून खरेही करून टाकले असते. गोची अशी की, मी दोनदा खरं केलं आणि त्या मरण्याच्या घटना होत्या. मी बोलतो ते खरं होतं हा चरचरीत शिक्का बसलाय कपाळावर. लांबून अ‍ॅम्बुलन्स दिवा फिरवत येते तेव्हा रोग्याबद्दल कणव वाटते; त्याचबरोबर वेगाची भीती वाटून आपण बाजूला होतो. मी सुद्धा दिवा फिरवणारी अ‍ॅम्बुलन्स आहे. लांबूनच हात करून रस्ता बदलतात. अगदी आजही.

कोरडं ऊन मस्तकशूळ उठवतं म्हणतात. माझा मस्तकशूळ कायम चालू. बहिर्‍याला ऐकण्याच्या स्पेसमध्ये नीरव शांतता असे. माझं वेगळं आहे. मला सगळीकडून आवाज ऐकू येतात; पण माझ्यासाठी कुठलाच आवाज नसतो. डोक्यात सतत कलकलाट चालू आहे. रस्त्यावरचा मेलेला उंदीर खातानाचा कावळ्यांचा कर्कश्श कलकलाट आणि त्यांच्या पंखांचा आवाज. बरोबर डोक्यात बसलाय. डोक्यातल्या कलकलाटात शब्द नाहीत. तसे असंबंद्ध वेगवेगळे चिडलेले आवाज. त्यांचा रागीट स्वभाव कळायचा पण एकही शब्द समजायचा नाही. त्यांचा रंग आहे भडक लाल आणि काळा. पण कोणी विचारलं असतं ‘नक्की लालच ना?’ तर मी मोघम उत्तर दिलं असतं किंवा एखादा कावळा झाडावर पतंगांच्या मांज्याला अडकला की हजारो कावळे जमून कलकलाट करतात. अगदी तसाच आवाज डोक्यात चालू. झोपण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालू असतं.

लहानपणी सगळे सतत प्रेमानं वागायचे. काहीतरी चुकीचं वाटायचं. लाड करून घ्यायला आपण पोपट किंवा पामेरियन कुत्रा नव्हे. प्रत्येक भेटणारा गोड वागतो. घरातलेसुद्धा. पुरं फसवलं होतं मला. फसल्याची जाणीव झाल्यावर एकदम उघड्यावर आलो. आठव्या वर्षी कळलं. हे सगळे गोड नाहीत; मुखवटे आहेत. कोणी बसत नाही शेजारी माझ्या. मलाही सवय झाली होती. एक नवीन मुलगा आला शेजारी बसायला. काही दिवसांनी हळूच म्हणाला, ‘एक काम आहे, करशील?’

‘काय?’ मी विचारलं.

तो म्हणाला, ‘माझ्या वडिलांना सांग ना. मर म्हणून.’

मी गप्प बसलो. आईनं सांगितलं होतं. कोणाशी भांडण करायचं नाही. बोलायचं नाही. मी गप्प बघून तो मला हलवत बोलला. ‘सांग ना. सांगशील माझ्या वडिलांना.’

माझं डोकं फिरलं. मी काय केलं आठवत नाही. कदाचित मारलं असावं त्याला, तो रडत होता. प्रिन्सिपॉलच्या केबीनमध्ये म्हणाला, ‘याची काहीच चूक नाही. मीच पडलो.’

दुसर्‍या दिवशी चेहरा सुजला होता त्याचा. तरीही शेजारी बसत म्हणाला, ‘रागवणार नसशील तर एक सांगू?’ मी होकारार्थी मान हलवली. तो पुढं म्हणाला, ‘माझे वडील बरोबर नाहीत. दारू पिऊन आईला मारतात. एक दिवस पैसे नव्हते म्हणून न पिता घरी आले. मी त्यांना बोललो पुन्हा प्यायलात तर देवाला सांगेन तुम्हाला मर म्हणायला. ते घाबरलेत. तू नुस्ता चल. काही बोलू नको. चालेल तुला?’

‘हा देव कोण? त्याला सांग.’

तो दोन फूट दूर सरकून म्हणाला, ‘तुला माहीत नाही. तुला घाबरतात सगळे. देवा बोलतात तुला.’ मला अजून आठवतंय. मी त्याला शर्टाला धरून फरफटत शाळेच्या कोपर्‍यात नेला. तो घाबरून थरथरत होता. कोनाड्याच्या भिंतीवर दाबत त्याला विचारलं, ‘बोल सगळं.’ तो त्याच्या वडिलांचे सांगायला लागला. ‘ते नाही. माझ्याबद्दल.’ तो सॉरी म्हणून रडायला लागला. अजून चेहरा आठवतोय. भयानक भीती होती चेहर्‍यावर, मी संतापाने पेटलो होतो. म्हटले ‘बोल, नाहीतर…..’ सांगतो सगळं म्हणाला तो. आता इतका वेळ जे मी सांगितलं ना माझ्याबद्दल ते पहिलं त्यानंच मला सांगितलं.

आईला मी विचारलं. तिनं हो म्हटलं. सगळे साले घाबरट. वाईट वागले माझ्याशी. वेळ आली तर देवा, देवा म्हणून दगडांनी ठेचून मारतील. नवीन बोट येणार नाही. आहे ते तोडू. कोयता हाणला होता नेम धरून. चार बोटात धरून मारल्यावर नेम चुकला. घाव दुसरीकडं बसला. तेव्हा आईनं विचारलं होतं, इकडचं सहावं तिकडं पाचवं म्हणून लावता येईल का? डॉक्टरांनी नाही म्हटल्यावर आई रडली होती.

आसपास गोडूस मुखवट्याची माणसं. मोठा भाऊ आणि वडील लाड करतात. काही मागायचा अवकाश की मिळालं. आईला बोललो होतो. हे सगळे खोटं वागतायत. कळतं मला. ती म्हणायची होईल. सगळं नीट होईल सगळे टाळण्यासाठी प्रेमळ वागतात. भीती वाटते म्हणून प्रेमळ, जवळ नकोच तू. चांगला तू. बोलू नकोस. भीती वाटते तुझी. मी माझं तुझ्याशी गोडूस बोलून निघायचं. वर्गमित्र आणि मैत्रिणी कुठून येणार? सगळे रस्ता बदलायचे. शाळा, क्लास, नातेवाईक सगळे एकच. भयाण एकट्या वातावरणात अभ्यास जमला. टक्के चांगले मिळाले. पण भावंडं नाहीत. मित्र नाहीत. मैत्रिणी कुठून असणार? डोक्यात कलकलाट. स्वप्नात मुलींना जागाच नाही. लिंगखेळ जमत नसे. शत्रू मानायला लागतो त्याला. त्याच्यावर राग काढून दुखेपर्यंत दमवायचा छंद लागला.

कुठंतरी बसायचं जाऊन सावलीत कशाला. घेऊ की भाजून. आत एवढा त्रास की उन्हात बरं वाटायचं. बसून राह्यचं ते असंच बसायचं संध्याकाळपर्यंत. कधी जागा बदलून बघायचं. देवळाच्या ओसरीवर मस्त वाटायचं. थंडगार काळ्या खडबडीत दगडावर. कंटाळा आला की लोळता येईल.

पहिली मिरची चावून खाल्ली तेव्हा आग लागली होती. लहान असताना खाल्ली. टळटळत्या उन्हात फिरत होतो. सुट्टीचे दिवस. मी सोडून सगळं जग रमलं होतं सुट्टीत. डोकं शांत होत नव्हतं. रस्त्यातला भाजीवाला घरी जेवायला निघाला होता. दुकान आवरणं चालू होतं. मी दोन मिरच्या मागितल्या त्याच्याकडे. कुठल्या वेळेला काय मागतोय, अशा नजरेनं बघत दिल्या मिरच्या काढून. मी हातात मिरच्या घट्ट पकडून बडबडत चाललो होतो. बडबडणं कायम होतंच पूर्वीपासून. चालण्याचा आणि बोलण्याचा वेग वाढत गेला आणि मिरच्या कधी तोंडात कोंबल्या कळलंच नाही. किंचाळलो. लगेच गप्प झालो. सणासण चावत गेलो. तापल्या तव्यावर ठरवून हात ठेवला. गरम पाण्यानं भरलेलं भांडं उचललं. कातडी जळणारच. जीभ जळणार बहुतेक. आग आग चालू आहे. तोंड जळतंय. जीभ जळून चिकटलीय टाळूला. ‘देवाचा माणूस काय, बोलशील कोणाशी. नको बोलू. लोकांचं जाऊ दे. घरच्यांशी पण बोलू नको. बंदच करू तोंड. जळू दे. जाऊ देत सगळे उडत. देवाचा म्हणून टाळता काय. बोला ना. घाबरता काय? म्हणून मधल्या सुट्टीत कोणी घेत नाही खेळायला. कोणतरी बारीक चिरक्या आवाजात ओरडतं ‘देवाचा माणूस’. दुसरा काढलेला नाजूक आवाज ‘ए देवा डोकं सणसणायला लागतं. तिसरा तसाच आवाज ऐकू येतो. चोचा मारण्यापूर्वीचा कावळ्यांचा कलकलाट. मी मान खाली घालून उभा. सणकीत मान वरती करून ओरडत सुटतो. शब्द नाहीत. नुस्ता आवाज. सगळ्यांना जाळून टाकायचंय मला. हातातून आग सोडता आली पाह्यजे. फक्त डोळ्यांनी पाह्यलं की भाजलं पाह्यजे समोरच्याला. सगळं मैदान स्तब्ध. मी ओरडतोय. पायानं आसपासची माती उडवतोय. हातवारे करतोय. मी ओरडून विचारतो, “बोला. कोणाचं नाव घेऊ. एक नाव आज घेणारचं. आता तुमच्यातला एकजण चालला. लवकर सांगा नाव.” मला श्वास लागलाय. बोलता येत नाहीएय. खूप धुरळा उडवलाय मी. वरतून ऊन. पळापळीचा आवाज ऐकू येतोय. किती वेळ गेला माहीत नाही. शाळेची घंटा होते. शिपाई मला प्रिन्सिपॉलकडे घेऊन जातात. तिकडं आई रडत बसलीय. मी पुन्हा चिडतो. डोळे बदलतात. तोंडात एकाच वेळी अनेक शब्द गोळा होतात. चेहरा बदलतो. मी काहीतरी कोसळतं बोलणार तेवढ्यात आई जवळ येते. पोटाशी धरून तोंडावर हात ठेवते. घरी जाताना माझी चिडचिड सुरू होते. “देवाचा माणूस म्हणतात तर टाळतात का? मी काय राक्षस आहे का? घाबरतात काय मला?” मी रडत होतो. चिडून हात थरथरत होते. कोणाला तरी मारायचंय. कोणी जवळ येत नाही. राग उतरवू कसा, भरून राह्यलाय. अंगात, डोक्यात, आई काहीतरी बोलेल वाटतं. पण काहीच बोलत नाही. देवळात नेऊन म्हणते, “नुस्ता नमस्कार कर, काही मागू नकोस. आपोआप मिळेल तुला हवे ते.” जिभेला फोड येतायत. आग डोक्यात आग. चालतोय टळटळीत उन्हातून. घरी कधी येऊन पडलोय, कळत नाही. आई उचलते. पाणी पितोय. हा. हा. तोंडातून आवाज. आई देव्हार्‍यासमोर बसून रडतेय. बाबांचा काहीच संबंध नाही. दादाचाही नाही. दोघंही नेहमीसारखे गोड वागतायत. बाबा कॅडबरी आणून देतात. पेपर वाचायला बसतात. ‘हे कर. हे नको करू.’ कोणी हक्कानं सांगत नाही. पोरक्या पोराच्या लाडासारखं वाटतं. कुशीत घेणारी आई. एकटी, प्रेम देणारी.

मी लोकांची इच्छा म्हणून मरू की काय. असं कसं चालेल, प्रयत्न केले लहान असताना. नाही जमलं. आता कळतोय मूर्खपणा. लोकांच्या इच्छांशी माझे काय देणे घेणे? माझ्यासाठी लोक कोण? सावल्या सगळ्या. नुस्त्या हलतात आसपास. खूपच गर्दी म्हणजे सावल्यांचा काळोख. अंगावर पडतात. निघून जातात. वजन काही नाही. बोलणं नाही, परिणाम काही नाही. गर्दीत राहून एकलकोंडा.

एवढं मोठं झालं तरी डोक्यात कलकलणं आहे. डोक्यात राख आहे, राग, चीड सर्व आहे. तरी जगायचंय. काळ्या तिळाची जीभ आणि सहा अधिक चार पेक्षा मी खूप नाही जास्त आहे, हे कळतंय. मला आवडलं ते करताना कलकलणं नसतं. तेव्हा मला माझा मी भेटतो. दिसतो, तो मला आवडतो. त्यासाठी जगायचंय.

आई एक जवळची. बाबा, दादा परग्रहावरचे. आई प्रेमाने वागते, कुशीत घेते. माझ्यासाठी रडते. बरं वाटतं. पण पुरेसं नसतं तेवढं. पाठीशी उभी राहत नाही. हे कळलं तेव्हा तिच्यापासून लांब झालो. एकदा देवळात वाक्य वाचलं, ‘भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे.’ मी आईला विचारलं ‘ते आहेत का माझ्या पाठीशी.’ ती ‘हो’ म्हणाली. मी विचारलं ‘तू आणि बाबा सगळे आहात ना.’ ती म्हणाली, ‘स्वामी आहेत की. माझं तापलेलं डोकं तिरपं चाललं.’ मी सडकून म्हटलं, “कोणीच कोणाच्या पाठीशी उभे राहात नसेल म्हणून शेवटी ते म्हणाले असतील मी आहे.” शेवटी आईबद्दलही काही वाटेनासं झालं. बाबा, दादा लांब होते. तेव्हा निर्णय घेतला. इकडून दूर जायचं शिकायला.

संजय नारायण दुधवाडकरला इथं एक खोली मिळालीय भाड्यानं. कॉलेज सुरू व्हायला दोन तीन दिवस बाकी आहेत. अ‍ॅडमिशनचं काम झालंय. खानावळीत जेवायचं. खोलीवर चहा करायचा. तो ठरवतो खूप भटकायचं आणि एका वहीत सुचेल ते उतरायचे. पहिल्या पानावर स्वत:चे नाव लिहून वरती श्री लिहितो. आयुष्यात पहिल्यांदाच मी संजय दुधवाडकर आहे. लोक मला इथं नावानंच हाक मारतात. पहिल्यांदाच. कदम नॉर्मल. ‘संजय तुला कोणाची आठवण येते का?’ संजय आठवून सांगतो, ‘सगळं मस्त आहे आणि डोकं शांत आहे.’ ‘संजय बघ. परत आठवून बघ एकदा. आई आठवतेय का.’ ‘हो. तशा येतात तिच्या आठवणी.’ पण संजयला तिला घरी जाऊन भेटायचे नाहीएय. रस्त्यात देऊळ दिसलं की, तिची आठवण येते. आई सांगायची ना. ‘तो ऐकेल तुझं.’ आज संजय देवळात जाऊन त्याला थँक्यू सांगून आला. असंच राहू दे आता. आईला सांगायचंय तू पण देवाला असंच सांग. कोणाचं तरी एकाचं ऐकेल तो. एवढं लिहून संजयनं वही बंद केली. दररोज फिरणं आणि असंच काहीसं लिहिणं. आयुष्यातला मोकळेपणाचा पहिला अनुभव आणि मनुष्य असण्याचाही. खूप आनंद भरून राह्यलाय. स्वतंत्र अख्ख्या खोलीत एकटा. सगळं पहिल्यांदा. मनासारखा लिंगखेळ केला. खूप मोकळं वाटलं.

मला अकरा बोटं होती लहानपणी. अ‍ॅक्सिडेंट झाला. त्यावेळी जीभ चावली होती. जिभेवर डाग आला आणि एक बोट तुटलं. ठीक आहे रचलेलं. संजयने हे उत्तर ठरवलं. पटेलसं होतं. नवीन मित्र, कॉलेजची लेक्चर्स आणि खोलीतील सुंदर एकटेपण. आनंद छान जमू आला होता. परिस्थिती इतकी बदलली की तो गोंधळून गेला. त्यानं वहीत लिहून ठेवलं होतं की, दुखरं बोचरं आठवत नाही म्हणजेच आनंद काय? तो घरच्या ओढीनं व्याकूळ व्हायचा प्रश्नच नव्हता. आनंदाच्या लाटांवर तो स्वार होता. पण असं आहे. सहसा हिंदी सिनेमा सारखं असतं किंवा सगळीकडं असंच असतं म्हणून हिंदी सिनेमा त्यांच्यासारखा बनतो. कसंही असू दे; मात्र त्याच्याच बाजूच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याच्याच शाळेतले दोघंजण शिकायला आले होते. ठिणगी लवकर पडणं अपरिहार्य आहे. तसं होतंच सहसा. कोणी कसं पाह्यलं. पाहणार्‍याला काय वाटलं. त्या बातमीचा प्रसार कसा झाला. हे सगळं वर्णन नेहमीच सीरियल सारखं रोचक आणि नाट्यमय आहे. पण त्यात जास्त दम नसतो. बातमी पसरली. नियमच आहे. वार्‍याची झुळूक, वाहतं पाणी आणि बातमी. कधीही अडथळा नाही.

संजयला हवेतला अस्वस्थपणा जाणवू लागला. जसं आपल्याबद्दल काही कुजबूज झाली की, वातावरण तुम्हाला सांगतं. त्याला तर याची फारच सवय असल्यानं तो सावध झाला. जुनं कलकलणं आठवायला लागलं. सगळीकडचा फरक जाणवू लागला होता. त्याला कळू लागलं. वातावरण आपल्या विरुद्ध होतंय. कोणी कधी भांडायला आलं नव्हतं. फक्त समोरची गर्दी वाढते. आपला आसपास एक एक करून गळून जातो. मग फक्त एकटा. सुरू होतो कलकलाट. पंखांची फडफड. समोर कोणीच सापडत नाही भांडायला. सगळे पाठ करून उभे राहतात. आता ग्रासणार अख्खं आपल्याला. हीच आनंदी वाटणारी खोली. रिकामी वाटतेय. हे ग्रासणं वाढत जाणार. खोली खाली करायला लागेल. खाणावळ बंद होईल. तो मालकांकडे गेला. म्हणाला, ‘काही बोलायचंय.’

‘माहीताय’,

‘काय?’

‘आत ये. बस. तुझ्या बाबांनी खोली घेताना सगळं सांगितलं होतं. तू खुशाल राहा इथे.’

‘म्हणजे तुम्हाला वाटतं मी नॉर्मल आहे म्हणून.’

‘मला काय वाटतं याचा तू विचार करू नकोस. तू तुला हवं तसं जग.’

संजय रडत म्हणाला, ‘लोकं वाईट पद्धतीनं वागतात माझ्याशी. मी एकटा पडलोय.’

‘त्याला मी काहीच करू शकत नाही. तू इथं खुशाल राहा. मला काही प्रॉब्लेम नाही.’

संजय डोळे पुसत ‘थँक्स’ म्हणून बाहेर पडला आणि ठरवलं, यावेळी शांत राह्यचं. काही करून तोंड देऊ सगळ्याला. थोडं फार खोटं बोलू; पण इथं टिकून राहू. ही संधी गेली तर परत घरी जावं लागेल. संजय स्वत:ला समजावत दिवस मोजत होता. एक एक मित्र कमी होत गेले. “चल निघतो रे. घाई आहे जरा.” तेच जुनं वाक्य. आपल्या डोक्यात वाकून फेरफार करता येत नाही. आत हात घालून कलकलणं बाजूला सारून शांतता पुढं आणायची. अशी सोय हवी. लोकांशी कसं वागायचं, याचं जर तर करून थकायला झालंय. त्या क्षणाला जे वाटेल ते होईल. हे त्यानं वहीत लिहिलं होतं. कॉलेजात तो एकटाच शिरला. पाठून हाक आली, “देवा ए देवा” तसाच खोटा किनरा खास चिडविण्याचा आवाज. संजय गर्रकन् मागे फिरला. डोक्यात कळ उठली. पुढं काय झालं कळलं नाही. खूप आरडाओरडा झाला. तो भानावर आला तेव्हा तो रस्त्यावर आडवा होता. अंग खूप दुखत होतं. धूळ मातीनं कपडे माखले होते. अंगावर माराच्या खुण्या होत्या. तसाच तो उठून बसला. त्याच्या आसपास मुलं कोंडाळं करून होती. परत कोणतरी मागून बारीक आवाजात बोललं. देवा तसाच उठून तो आवाजाच्या दिशेना धावला. घेरला गेला परत मार पडायला सुरुवात झाली. संजय ठरवून जमिनीवर निपचित जमिनीवर पडून राह्यला. सगळं शांत झाल्यावर तो उठला. वर्गात गेला. वर्ग चालू होता. अंगावरची माती धूळ झटकत मागच्या बाकावर बसला.

डोकं कलकलायची चिन्हं दिसत होती. सगळं अंगावर येत होतं. मनातून स्वत:चा आकार छोटा झाला होता. घरी परत जायचं नाही. कुठंतरी दूर जाऊ शिकायला. तोंड बंद ठेवू, हात जोडून घेऊ. जाऊ नागालँड, केरळला. नवीन भाषा, हवा, पाणी, पाऊस सगळं नवीन जग करू. आता वर्गात कोण काय शिकवतंय, आपला काय संबंध? आपण जायचंय. नागालँड, केरळला, काढून टाका इथून मला. तोपर्यंत तिकडच्या कॉलेजची नावं शोधतो.

वर्ग संपलाय. मुलं बाहेर पडत असताना प्रोफेसर संजयला बोलावून सांगतात की, प्रिन्सिपॉलनी बोलावलंय. केबीनपर्यंत जाताना तो ठरवून टाकतो. जास्त चर्चा नको. मी जातो इथून. आत गेल्यावर सर बसायला सांगून मंद स्मित करत म्हणतात, “हाणामारी जोरात झाली वाटतं?” संजयचं अंग आक्रसतं. भुवया एकमेकाजवळ खेचल्या जातात. तो सरांकडे रागानं बघायला लागतो. आजपर्यंत कोणी कधी विचारलं नव्हतं म्हणून उत्तर काय द्यायचं माहीत नव्हतं. संजयनं मानेनंच हो म्हटलं. सरांनी त्याला पाणी देत विचारलं, “देवा कोण?” संजयच्या डोक्यात शॉट उडाला. कपाळाची शीर थडथडली. संजय धाडकन उभं राहून वेगानं बोलत सुटणार तेवढ्यात सर उठून संजयला खुर्चीत दाबून बसवत जरबेनं म्हणतात, “पहिलं पाणी पी, सांगतोय ते ऐक आधी.” संजय रागात पाणी प्यायला घेतो. सर सांगू लागतात, “गेले चार दिवस ही मुलं माझ्याकडे येतायत. तुला कॉलेजमधून काढून टाका सांगायला. तू आधी शांतपणे पाणी पी. मी का विचारलं तर सांगायला तयार नव्हती. त्यांना भीती वाटत होती, एक जण सरळ म्हणाला, सर तो आपल्या लोकात नको. देवळात पाठवा देवाला. तो काय बोलला आणि घडलं तर, काही नको.”

सरांना तोडत संजय म्हणाला, ‘सर मला खरंच काढा. मी केरळ, नागालँडला जायचा विचार करतोय. आसपास हजार पाचशे किलोमीटरमध्ये कोणी ओळखीचे नको. खूप झेललं सर. आयुष्यात काहीतरी करायचं म्हटलं तर किमान जगायला तर हवंच.’ त्याला सरांनी थांबची खूण करत सर म्हणाले, ‘आज मला तुझ्याबद्दल कळलं. दोन्ही पंजे टेबलावर ठेव.’ संजयनं सहा अधिक चारचे पंजे टेबलावर ठेवले. ‘जीभ दाखव.’ संजयने जीभ दाखविली. काळा डाग स्पष्ट दिसला. सर म्हणाले, ‘ठीक आहे. चहा सांगतो. थांब जरा.’

‘काही नको तुमचा चहा. मला इथून काढून टाका. वाटलं तर हौस म्हणून मारून घ्या सर्वांनी. पण जाऊ दे मला. पाह्यलंत ना तुम्ही सगळं. जाऊ आता.’

‘नको बस.’

संजयने चमकून पाह्यलं.

‘आता बोल. सर तुम्ही उद्या सकाळी मरणार. बघू या मरतो का मी? बोल.’

संजय ढसाढसा रडायला लागला. बोलत सुटला. आई, वडील, शाळा, एकटेपण, डोकं कलकलणं, मिरच्या खाणं जसे आठवेल तसे बोलत होता. काळ पुढे मागे होत होता. माणसं, नावं सरांना माहीत नव्हती. तो सांगत सुटला. किती वेळ गेला कळलं नाही. दमला म्हणून पाणी प्यायला. थांबला तेव्हा सर म्हणाले, ‘तू थांब बोलायचं. कळलं थोडक्यात. आपण पळून नाही जायचं. केरळला जाऊन उत्तर नाही मिळणार. इथंच उभं राह्यचं आणि आपण आपले प्रश्न सोडवायचे. ते कसं ते बघू आपण. दोन गोष्टी कर. एक म्हणजे याच्यापुढं कुठंही हाणामारी करू नकोस आणि दुसरं म्हणजे आज हे पुस्तक वाचायला सुरुवात कर. अभ्यासाचं नंतर वाचलंस तरीही चालेल. पुस्तक कसं वाटलं ते मला येऊन सांग. कधीही ये.’

संजयनं उत्सुकतेने पुस्तकाचं कव्हर ओझरतं पाह्यलं. डॉ. दाभोलकर म्हणून लेखक होते. संजय बाहेर पडला. पहिल्यांदा कोणतरी आपल्याशी माणूस म्हणून बोललं. दया, कीव काही नाही. चांगलं आणि कमी बोलले. सर चांगले दिसतायत. बघू तर वाचून. स्वत:शीच म्हणाला.

संजय थेट रूमवर आला आणि पुस्तक वाचायला घेतले. रात्री जेवायला उतरला. दोनदा चहा करून घेतला. रात्र संपून सकाळ झाली. भराभर वाचन चालू होतं. नऊ साडेनऊला संपले. सोपं आणि समजावणारं पुस्तक झपाटला, होणारा परिणाम, आनंद सांगणार कसा? लखलखीतपणे जगण्याचा मार्ग सापडला. साक्षात्कारच तो. आतापर्यंतचं जगणं पालापाचोळ्यासारखं उधळून गेलं. प्रत्येक गोष्टीला कारण असतं. जगण्याचा आधार विज्ञान असायला हवा. प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेतली पाह्यजे. साक्षात्कार आहे हा. थकवा, मरगळ गेली. कलकलाट दूर झाला. सगळं स्वच्छ आणि नीरभ्र झाले. सूड, द्वेष निघून गेले. पेशंट मी नाही. मला घाबरणारे आहेत. थँक्यू डॉ. दाभोलकर.

संजयला काय करू, काय नको झालं होतं. त्यानं न राहवून पुस्तकात अंडरलाईन करायला सुरुवात केली. त्यानं समाधान होत नव्हतं. मग वहीत उतरवायला सुरुवात केली. वेग कमी पडतोय असं वाटायला सुरवात केली. मेंदूला ताण देऊन वाचायला लागत होते. वाचता वाचता विचारही करायला लागत होता. निश्चित पद्धत आहे ती समूजन घ्यायला हवी. डोक्याला चांगला व्यायाम होतोय. मजा येतेय. एक एक पुटं नष्ट होतायत. पदर दूर होत जाऊन गाभा हाताशी लागतोय. नवीन विचार, नवीन पद्धती पटापट आपलं करायची घाई झालीय. जगाकडे बघण्याचा नवीन चष्मा हाताशी आलाय.

सरांच्या केबीनवर टकटक करून संजय थेट आत गेला आणि म्हणाला, ‘सॉरी सर नंतर येतो.’ सर हसत म्हणाले, ‘आत आलास ना. काम संपवून जा. बोला, काय म्हणतंय डॉ. दाभोलकरांचे पुस्तक?’ संजयने बॅगेतून पुस्तक काढत मलपृष्ठावरील डॉक्टर दाभोलकरांच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला आणि म्हणाला, ‘सर तुमचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. मला माणसात आणलंत. असा लेखक गाठून दिलात. आज खरं खरं कळलं सारं.’ बोलताना संजयनं पुन्हा फोटोला नमस्कार केला.

‘अजून हवीत वाचायला?’

‘सर सगळी द्या. लगेच देईन वाचून.’

सरांनी खणातून डॉक्टर दाभोलकरांच्या पुस्तकांचा गठ्ठा काढला, ‘घे हवी ती. पण एक अट आहे. तू काय वाचलं, तुझ्यावर काय परिणाम झाला आणि तुझ्यात काय बदल झाला हे नीट सांगायचं किंवा लिहून द्यायचं.’

‘सर, असं काही करायची सवय नाही पण एक सांगतो; आता कोणी देवा हाक मारली तर राग नाही येणार. हसायला येईल.’ सरांनी टेबलावरचे एक पत्रक त्याच्या हातात देत म्हटले, ‘हे घे, जमलं तर ये.’ डॉक्टर दाभोलकरांच्या कार्यक्रमाचे पत्रक होते. संजय म्हणाला, ‘येतो नक्की.’

पुढचे काही दिवस कसे उलटले हे संजयला कळले नाही. तो नुस्तं वाचत राह्यला. वाचताना वाटणारी अस्वस्थता. नवीन विचार जाणून घ्यायची तडफड. काहीतरी करावसं वाटणं. कोणाला तरी सांगायला हवं वाटणं. आसपास तर कोणी नाही. लवकर लवकर हे सगळं आपलं व्हावं म्हणून घाई. मग न राहवून अंडरलाईन. न राहवून उतरवणं. शेवटी फेर्‍या मारत मोठ्यानं वाचणं. सुरुवातीचे काही दिवस हा क्रम राहिला. पहिली दोन पुस्तकं वाचणं जड गेलं. भाषा, शैली, विचार ओळखीचे झाल्यावर लय मिळाली. साक्षात्काराचा अनुभव परत परत मिळत होता. विश्वरहस्याचा मार्ग लख्ख दिसू लागला. दिशा स्पष्ट होत गेली. शेवटी त्यानं वाचन थांबवलं. लिहायला सुरुवात केली.

माणूस कितीही शिकलेला असला तरी अंधश्रद्ध असू शकतो हे पहिल्यांदाच कळले. म्हणजे शिकलेला तो शहाणा हा गैरसमज. आमच्या घरी सगळी माणसं सुशिक्षित की. काय झालं माझं? माझा त्रास कोणालाच कळला नाही. भोगवटा म्हणून सोडून दिलं. आईबाबांचं प्रेम नव्हतं का? तसं कसं म्हणणार? असणारच. पण तेवढं पुरत नाही अशावेळी. तेच त्यांना कळलं नाही. बाबा दररोज पेपर वाचायचे. डॉक्टर दाभोलकरांचे लेख वाचले असतील का त्यांनी? सर्वांनी ठरवलंय शिक्षण नोकरीपुरतं. जागांचे भाव, शेअर मार्केट म्हणजे विचार करणे, असंच असेल काय, सरांना विचारायला पाह्यजे. मला पहिल्यांदा काहीतरी सुचलेय. जे वाचलं त्याबद्दल लिहितोय. म्हणजे मी नॉर्मल आहे. इतक्या दिवसांत कोणीतरी देवा म्हणून हाक पण मारली असेल. माहीत नाही. केवढी नावं आहेत डॉक्टर दाभोलकरांच्या पुस्तकात. कोणाचीच ओळख झाली नाही कधी. त्यातले खूपसे लोक शाळेच्या धड्यात होते. केवढं मोकळं वाटतंय. आनंद आईला कळेल. माझी चिडचिड झेललीयं तिनं. तिची दाभोलकरांशी भेट झाली असती तर माझं बरं झालं असतं. आता हाताला दहा बोटं असू देत, नाही तर बारा. कशाचं काहीच वाटत नाही.

आपण पूर्वी कसे होतो. ते आता लिहिणं कठीण आहे. पूर्ण पुनर्जन्म. होतो एकटा, बेवारस, वेडा, सरकलेला, सैरभैर किंवा असाच कोणीतरी. बंधनच नव्हतं कुठलं. नातं आईशी. बाबा दादा सावली. सगळ्यांनी घाबरून देवा नाव ठेवलं आणि पुरती गोची करून टाकली. माझं देवाशी भांडण नव्हतं कधी. आईच्या नादानं देवळाची सवय लागली. पण देवा नाव ऐकल्यापासून तो नकोसा वाटू लागला. आता दाभोलकरांच्या कृपेने हे सगळं डोक्यातून निघून गेलं. लोकांच्या बोलण्यामुळे मलाही वाटायला लागलं होतं आपल्याकडे शक्ती आहे. भस्मसात करू लोकांना. खूप चिडलो तरी काही नाही केलं. शक्तीचा वाईट वापर करणं पाप वाटायचं तेव्हा. काय गंमत आहे! सगळा कलकलाट, भरकटणं आठवतं. सततच्या त्रासात शिक्षण होत राहिलं. बाकी सगळं विस्कटलं. आता शांत वाटतंय. आईला सांगावसं वाटतंय. दाभोलकरांची कृपा. जाऊन येऊ देवळात.

सरांनी लिहिलेलं वाचलं. वही बंद करत म्हणाले, ‘देवळात गेला होतास का?’

‘हो सर, खूप छान वाटलं.’

‘आज कार्यक्रमाला ये तुला बरं वाटेल. नवीन मित्र मिळतील. डॉ.दाभोलकर येणार आहेतच.’

संजय उत्साहानं म्हणाला, ‘नक्की येतो.’

कार्यक्रम म्हणजे काय असतं ते सुद्धा तिथं गेल्यावर कळलं. गर्दी होती का कोणी विचारलं असतं तर कमी, अधिक, मध्यम गर्दी मला माहीत नाही. काहीच माहीत नाही. एकदम कोरी पाटी. एका हॉलमध्ये कार्यक्रम होता. खुर्च्या भरल्या होत्या. खूप तरुण मुलं होती. आमच्या कॉलेजची सुद्धा होती. डॉ. दाभोलकरना मी ओळखलं. आमचे सर पण होते. एक काहीतरी कायदा करायचाय त्यासाठी डॉ.दाभोलकर आले होते. सरांनी दाभोलकर कुठल्या विषयावर बोलणार त्याबद्दल सांगितले. मी मागे बसलो होतो. आमच्या कॉलेजमधला एक जण येऊन भेटला. म्हणाला, ‘कार्यक्रम संपल्यावर थांब. सरांनी सांगितलंय.’ डॉ.दाभोलकर फार नेमके बोलतात. परिवर्तनासाठी कायदा का गरजेचा? त्याचा वापर कसा करता येईल? त्यातून समाजात कसा बदल घडेल? डॉक्टर प्रथम मुद्दे मांडत आणि ते समजावताना त्याचे भाग पाडत. भाग पडलेले उपमुद्दे नीट समजावत. सोपे मुद्देसूद आणि स्पष्ट बोलले. सभेत प्रश्नोत्तरे झाली. काहीजण डॉ.दाभोलकरांना विरोध करत होते तरीही ते चिडले नाहीत. त्यांनी विरोध करणार्‍यांना तळमळीने समजावले. कार्यक्रम संपला. मी जरा घाबरतच सरांकडे गेलो. त्यांनी डॉ.दाभोलकरांची ओळख करून दिली. मी न राहवून त्यांच्या पाया पडलो. ते चटकन मागे सरले. माझी चौकशी केली. मी विचारलं, ‘मी आपल्याला पत्र लिहिलं तर चालेल?’

मनमोकळं हसत डॉ.दाभोलकर म्हणाले, ‘अवश्य पत्ता मिळेल तुझ्या सरांकडे.’

मी म्हटलं ‘आहे माझ्याकडे. पुस्तकातून लिहून घेतलाय.’ सगळे हसले. डॉ.दाभोलकरांनी हसतच पाठीवर थाप मारली. एवढा मोठा माणूस अगदी बरोबरीनं वागत होता. सर्वांबरोबर मलाही चहा प्यायला घेऊन गेले. त्यांचं कामाचं बोलणं चाललं होतं. मी गप्प होतो. तेवढ्यात सर म्हणाले, ‘अरे राहुल, याला पण घ्या तुमच्याबरोबर कामात. डॉक्टरांची सगळी पुस्तकं वाचून काढलीत यानं.’

राहुल, शशी, शांताराम माझे मित्र झाले. त्यांच्याबरोबर वेळ छान जायचा. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम ते पुढाकाराने करत असत. मी मदतीला जात असे. सुरुवातीला डॉ.दाभोलकरांना काही प्रश्न लिहून पाठवले. त्यांचे थोडक्यात उत्तर आले, विषय नीट समजून घ्यायचा असेल तर कोणती पुस्तके वाचावीत याची यादी लिहिली होती आणि सरांशी बोलायला सांगितले.

आमच्या सरांना अनेक विषयात गती होती. कुठलाही प्रश्न त्यांच्या समोर आला की, ते प्रश्नाच्या आसपासची खूप माहिती देत. प्रश्नाच्या पैलूंना सरांकडे तोटा नसे. त्यातून नवीन प्रश्न उभे राहत आणि त्यांची नवीन माहिती. असा क्रम चाले. सरांचा असा संवाद ऐकणे हा वेगळाच आनंद असे. पण ठाम उत्तराच्या अपेक्षेने गेलात तर अपेक्षाभंग हमखास. सरांच्या मते, तू विचार करून शोध.

राहुल आणि शांताराम बरोबर आसपासच्या दोनतीन गावात कार्यक्रम करायला गेलो होतो. कार्यक्रम त्यांनीच केला. मी आपला मदतीला होतो. मजा आली, कार्यक्रम छान झाला. गावातल्या लोकांनी परत यायचं आमंत्रण दिलं. राहुल, शशी, शांतारामसारखा मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात नियमित नव्हतो. खरं सांगायचं तर माझी हौस म्हणून मी जायचो. तरीही त्यांनी मला कधीही टाळलं नाही. उलट ते माझे खूप जवळचे मित्र आहेत. सुरूवातीला त्यांनी गमतीत मला देवा म्हटलं. आता तर त्यांच्या तोंडी बसलंय. ही सगळी गँग, मला देवाच म्हणते. मला पण त्याची सवय झालीय. माझी खोली म्हणजे आमचं जमायचं ठिकाण आहे. इतके छान मित्र आहेत सगळे. वातावरण मस्त जमलंय. मी त्यांच्यासारखा नाही हे त्यांनाही माहिताय. तरीही मला ते त्यांचा मित्र मानतात. अगदी प्रेमळपणाचा हक्क असतो.

डॉ.दाभोलकरांबरोबर पत्रव्यवहार चालू आहे. नवीन वाचलं की, त्यांना कळवतो. डॉक्टरांचे विश्लेषक पत्र आले की हुरूप वाटतो. त्यांची शैली काटेकोर नियम मांडल्यासारखी. सहसा पोस्टकार्ड. पण समाधान होतं. ‘नवीन काय वाचलंस आणि आता लिहायला सुरुवात कर’ ही दोन वाक्ये कायम असतात. त्यांचे पत्र माझ्यासाठी त्यांचे अस्तित्व आहे. ते कायम माझ्या पाठीशी आहेत याची जाणीव म्हणजे त्यांचे पत्र.

एकदा अचानक सरांनी बोलावलं. बसायला सांगून विचारलं, ‘तू नवीन लिहितोयस असं कळलं? काय लिहितोयस? आहे का आत्ता तुझ्याकडे?’ पुढं हसत म्हणाले, ‘कोणी सांगितलं विचारू नकोस.’

‘नाही सर. काही नाही लिहिलं अजून.’

‘का?’

मी सहज गोंधळून बोललो ‘काय झालं काय एकदम असं विचारायला?’

सर हसत म्हणाले, ‘कालच डॉ. दाभोलकर भेटले होते. तुझी चौकशी करत होते. म्हणाले, मुलगा पत्र छान लिहितो. चांगले लेख लिहू शकेल.’

‘असा काही प्रयत्न केला नाही अजून.’

‘कर चालू. तू आता राहुल, शशीबरोबर गेला होतास ना. त्याचा रिपोर्ट लिही.’

‘म्हणजे नक्की काय करू?’

‘कोणता कार्यक्रम केला? कुठं केला? किती लोक होते? लोकांचा रिस्पॉन्स कसा होता. प्रश्नोत्तरं झाली का आणि या सगळ्यांवर तुझे निरीक्षण. असं लिहून दे. बिनधास्त लिही आधी. मग बघू काय करायचं ते.’

मी लिहून दिला. सरांनी सूचना सांगितल्या. नेहमीप्रमाणे तू कसं लिही सांगितलं नाही. मराठीतले चांगले रिपोर्ट कोणते आणि का? इंग्रजीतली परंपरा काय आहे? नावं लिहून घ्यायला लावली. लायब्ररीतून पुस्तकं मिळवून वाचायला सांगितले. मी लिहिलेले रिपोर्ट बाजूला राह्यला. पण नवीन पुस्तकं, नवीन विषय सापडले. जे वाचतो ते डॉक्टरांना कळवायची सवय लागली होतीच. त्यांनीही काही नावं सुचविली. नवीन वाचन सुरू झालं. आठवड्यातून दोन, तीन दिवस राहुल, शशी, शांताराम कोणीतरी असे राहायला. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होत. ते त्यांचे कामाचे, डॉक्टरांच्या सोबतचे अनुभव सांगत. जागरणं होत; पण थकवा नसे. वाचनात व्हरायटी आली आणि अभ्यास छोटा वाटायला लागला. वेळ मस्त जात होता. वाचलेल्या पुस्तकांवर लिही म्हणून सर सांगत होते.

घरून आईचा फोन येई. नवीन संजय तिला माहीत नव्हता. एकदा ठरवून आईला पत्र लिहिलं. भलंमोठं झालं. लक्षात आलं की, आपल्याला डॉक्टरांसारखं नेमकं लिहिता यायला हवं. मग पत्राचे तीन चार खर्डे काढले. हे कशाला? नको. वर्णन नको. करत करत शेवटी एवढंच लिहिलं पोस्टकार्डावर- मी इथं खूप सुखात आणि मजेत आहे. तुझा जुना संजय आता नाही. ही सगळी जादू म्हण वाटल्यास पण डॉ.दाभोलकरांसारखा देवमाणूस भेटला म्हणून हे घडलं. त्यांची पुस्तके आणि व्यक्तिमत्त्वाने मी पूर्ण बदललो. डॉ. दाभोलकरांची पुस्तके सरांनी दिली नसती तर कदाचित मी माझ्या किंवा दुसर्‍याच्या जीवाचे बरे वाईट केले असते. पण आता चिंता नको. मला खूप मित्र आहेत. अभ्यास छान चाललाय. गंमत म्हणजे माझे मित्र मला देवा हाक मारतात आणि मी चिडतही नाही. सवय झालीय.- तुझा संजय.

आई आणि दादा भेटायला आले. तेव्हा खोलीवर शांताराम आणि शशीसुद्धा होते. आईला पाह्यल्यावर मी तिच्या कुशीतच शिरलो. तिनं खूप कुरवाळलं. मला अगदी रडू भरून आलं. ती म्हणत होती, ‘बोलले होते ना तुला. काही मागू नकोस. आपोआप मिळतं देवाकडे.’ शशी आणि शांतारामनं एकमेकांकडं पाह्यलं. मला कळलं आई एकटी सरांना भेटायला गेली. काय बोलणं झालं कळलं नाही. आल्यावर एवढंच म्हणाली, तू आता इथंच शिक पुढचं सगळं. घरी नाही यायचं.’ संध्याकाळी जाण्यापूर्वी सगळ्या मित्रांना बोलावून घेतलं. प्रत्येकाची ओळख करून घेतली. माझी काळजी घ्यायला सांगून म्हणाली, ‘एकदा जाईन सातारला. त्या तुझ्या डॉक्टरना भेटायला. कसं विसरेन, तुला माणूस केलं त्यांनी. जाईन. भेटेन कधीतरी.’ गंमत म्हणजे दादा आताही काहीच बोलला नाही. आठवलंच नाही. जाता जाता आई म्हणाली, ‘आता आनंदी आहेस, देवळात जात नसशील.’ सगळे हसले. पुढं म्हणाली, ‘माझी आठवण आली की देवळात जाऊन ये. मला पोचेल तुझा निरोप.’

वाचल्यावर पत्र लिहायचं असा नियमच झाला होता. त्यापेक्षा मनातलं साचलेलं लिहावसं वाटायचं. पण कसं लिहिणार असं एवढ्या मोठ्या माणसाला? त्या दिवशी वाटलं आपण खूप बोलावं डॉक्टरांशी. वाचन वगैरे नाही तर अगदी साधंसुधं, गप्पा, आठवणी आणि असंच काहीतरी बोलावं. जे आजपर्यंत घडलं नाही ते घडतंय आयुष्यात. आनंदी. मस्त जगणं चालू आहे ते सगळं आपल्यामुळे. या सगळ्याचे कारण तुम्ही. माझ्या सारख्यांवर तुम्ही काय परिणाम केलात ते आपल्या सारख्या मोठ्या माणसाला कळतं का कधी. की तुम्ही फक्त पेरत जाता. माझ्यासारखे खूप असतील. खोलीत येरझारा घातल्या. फिरून आलो. येताना डोक्यात आलं हे असं लिहिणं बरोबर दिसत नाही. पण काहीतरी बोलायचंय त्यांच्याशी. मनमोकळं. दरवाजा उघडून दिवा लावला. खोलीत उजेड पसरला. तसाच उभं राहून मी खोली न्याहाळू लागलो. टेबलावरची अस्तव्यस्त पुस्तकं, लिहिलेले कागद, राहुल, शशीचं खोलीतलं अस्तित्व. त्यांच्या संघटनेचं सामान. शांतारामने भिंतीवर लावलेली चित्रं. काल त्यानं म्हटलेली जात्यावरची गाणी. प्लास्टिकच्या डब्यावर शशीने धरलेला ताल. मस्त अंगावर आलं सगळं. लिहिलं आठवड्याभराचं खोलीचं वर्णन. दिलं पाठवून डॉक्टरांना. आता वाटायला लागलं चूक केली. उगाच त्रास देतोय त्यांना. काय पत्र येईल त्यांचे. सांगू शकत नाही काहीच. जर ते वेगळं बोलले तर मला किती त्रास होईल. मी माफीसाठी लगेच कार्ड लिहिलं. आपल्याला उगाच त्रास दिला. कृपया राग मानू नये. आपली छोटीशी नाराजी देखील माझ्यासाठी महासंकट असेल. कृपया समजून घेऊन अपराध माफ करा. मी मर्यादेच्या बाहेर जाणार नाही. मात्र आपण रागावू नये. उद्या सकाळी कॉलेजला जाताना टाकू. सकाळच्या पहिल्या डाकेनं जाईल. सकाळी कॉलेजला जायच्या घाईत पत्र न्यायला विसरलो म्हणून दुपारी परत रूमवर आलो तर डॉक्टरांचं कार्ड आलं होतं. ‘लेख छान आहे. तातडीने सरांना दाखव.’ मी उडालो. माझा मूडच बदलला. पहिलं लिहिलेलं कार्ड फाडून टाकलं. कॉलेजला पोचतो तोवर सरांचा निरोप आलाच. सरांनी लेख ठेवून घेतला. वाचून कळवितो म्हणाले. मी उत्सुकतेने विचारले, ‘काय करणार त्याचं?’

‘बघू होईल काहीतरी.’

दोन दिवसांनी सरांनी बोलावून घेतलं. सांगितलं. “लेख चांगला जमलाय. तुझी परवानगी हवीय छापायला. म्हणजे लगेच पाठवू. पण एक अट आहे. आता दर आठवड्याला लिहायला लागेल.”

संजयच्या वर्गातलं सकाळचं पहिलं लेक्चर. नुकतीच आंघोळ, नाश्ता उरकून आलेली धुपकट मुलंमुली वर्गात शांतपणे लेक्चर ऐकत होती. इतरही वर्ग शांतपणे चालू होते. उरलेले शिक्षक रूममध्ये पेपर वाचत होते. शिपाई मंडळी स्टुलांवर विसावली होती. कॉलेजसमोरचे ग्राऊंडही शांत होते. राहुल धावत कॉलेजमध्ये शिरला. थेट टीचर्स रूममध्ये घुसला. सरांना शोधले. वर्गावर धावत सुटला. चौथ्या मजल्यावर येईपर्यंत त्याला धाप लागली होती. सरांचा आवाज येत होता. त्या वर्गात तो घुसला. सरांनी चकित होऊन त्याच्याकडे पाह्यलं आणि वर्गाकडे एक मिनिट असं खुणेनं सांगत ते राहुलकडे वळले. सरांच्या जवळ जात दमलेल्या आवाजात राहुल म्हणाला, “सर वाईट बातमी. डॉ. दाभोलकरांचा खून झालाय पुण्यात. सर ते गेले.” आणि डोकं दाबून वर्गातल्या जमिनीवर बसला. त्याचा आवाज शेवटपर्यंत पोचला होता. काहीतरी भयंकर घडलंय एवढं कळलं. वर्ग शांत झाला. राहुलला अनावर होत होतं. त्यानं तिथंच बसून पायात तोंड खुपसलं. राहुलला ओळखणारी दोन तीन मुलं पुढं आली. त्यांनी त्याला उचलून बाकावर न्यायला सुरुवात केली. तेवढ्यात सर म्हणाले, ‘थांब. नक्की काय झालं? कोणी सांगितलं?’

राहुल मित्रांना धरून उभा राह्यला आणि रडत खुनाचा प्रसंग सांगून म्हणाला, ‘पुण्यावरून फोन आला होता?’

‘नाव काय?’

राहुलनं कार्यकर्त्याचं नाव सांगितलं. तो बाकावर बसला. वर्गातले शंभर मुलंमुली सुन्न होते. सर काही क्षण स्तब्ध उभे राहिले आणि पटकन् वळून टेबलाजवळ जाऊन बोलू लागले. ‘महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि ‘अंनिस’चे नेते डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा आत्ता सकाळी पुण्यात खून करण्यात आल्याची बातमी आहे. महात्मा फुले, आगरकर, आंबेडकर, गाडगेबाबा, सानेगुरुजी यांच्या परंपरेतील विवेकनिष्ठ समाजसुधारक डॉ.दाभोलकरांचे नाव कायम राहील. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सर्वदूर पसरविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्रातील शोषित आणि श्रमिकांच्या हक्कांच्या अनेक लढायांमध्ये डॉ.दाभोलकर कायम आघाडीवर होते. आपल्या विचारासाठी अथक परिश्रम करणारी माणसे फार मोजकी असतात. डॉ. दाभोलकर त्यापैकी एक होते. ते कोणत्याही व्यक्तीचे शत्रू नव्हते. त्यांची लढाई अनिष्ट प्रथा आणि विचारांच्या विरोधात होती. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा यासाठी डॉक्टरांनी गेले एक तप कठोर परिश्रम केले. विरोधकांशीही सातत्याने चिकाटी आणि निष्ठेने संवाद साधण्याचे कौशल्य त्यांच्यात होते. विवेकाची वाट न सोडता सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची वृत्ती होती. कोणालातरी त्यांचा खून करावासा वाटणे यासारखे दुसरे अध:पतन नाही.’ यानंतर सर गप्प झाले. सरांना हुंदका अनावर होत होता. विद्यार्थ्यांनी माना खाली घातल्या. सर कातर आवाजात म्हणाले, ‘व्यक्तिगत पातळीवर माझी खूप हानी झाली आहे. माझ्या घरातील माणूस गेले आहे. डॉ.दाभोलकर आणि मी अनेक वर्षांपासून मित्र होतो.’ काही क्षणांनंतर सर म्हणाले ‘डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध आणि त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी आपण दोन मिनिटे शांत उभे राहावे, ही विनंती.’ अख्खा वर्ग खाडकन् उभा राह्यला. दोन मिनिटांनी काहीतरी धाडकन् पडल्याचा आवाज झाला. संजय वर्गात चक्कर येऊन पडला. सर राहुलला बरोबर घेऊन वेगाने कॉलेजच्या बाहेर पडले.

डॉ.दाभोलकरांच्या संबंधित सर्व मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमली. तसे निरोप गेले होते. खुनाच्या निषेधार्थ मूक धरणे धरण्याचा कार्यक्रम ठरला. वातावरण भावूक बनले होते. प्रत्येकजण एकमेकांच्या सोबतीनं धक्का पचवायचा प्रयत्न करत होते. राहुल, शांताराम, शशी सगळे मान खाली घालून बसले होते. राहुलने तर सकाळपासून काहीच खाल्लेही नव्हते. धक्का जबरदस्त होता. सर हळूच मागे आले आणि मुलांना खाऊन यायला सांगितले. मुले उठली नाहीत. शेवटी सर त्यांना घेऊन जवळच्या हॉटेलात गेले. मुलांनी सरांच्या आग्रहाखातर चहा बिस्किटं घेतली. चहा घेताना मुलांना बांध फुटला. सरांनी सर्वांना आपल्या कवेत घेतलं. त्यांनाही अश्रू आवरत नव्हते. स्वत:ला सावरत ते राहुलला म्हणाले, “संजय कुठं दिसत नाहीएय.”

संजय शुद्धीवर आला तो स्टुडंट कॉमन रूममध्ये. पाणी खाऊन ओलाचिंब झाला होता. आसपास सगळी वर्गातली मुलं होती. त्याला चिडवणारे देखील होते. बिचारे गप्प चेहर्‍यानं उभे होते. संजय अंग झटकत उभा राह्यला. डोळे लाल झाले होते. अंगाला बारीक कंप सुटला होता. हालचालीत लय नव्हती. तो कसाबसा उभा राह्यला आणि खांद्याला बॅग लावून सुसाट बाहेर पडला.

असा कसा खून होईल त्यांचा? राहुलला कोणीतरी चुकीची बातमी दिली असेल, किंवा कोणीतरी दुसरे दाभोलकर नावाचे डॉक्टर मारले गेले असतील. आपल्या डॉ. दाभोलकरांचा खून होणे शक्य नाही. असा कसा खून होईल.

संजय वेगात चालत होता. डोक्यात शॉट उडाला की, तो वेगात चाले. आसपास सकाळी कांदेपोहे विकणार्‍या गाड्यांवर लोक खात होते. गरमगरम चहाचे ठेले जोरात चालू होते. संजय चहा पिणार्‍या माणसांकडे जाऊन हताशपणे म्हणाला, “कळलं का, डॉ. दाभोलकरांचा खून झालाय.” माणसं त्याच्याकडे विचित्रपणे पाहू लागली. त्यातला फक्त एकजण म्हणाला, “वाईट झाले.” आणि तो परत चहा पिऊ लागला. संजय परत वेगाने चालू लागला.

डॉक्टर दाभोलकर गेलेत. त्यांना मागून गोळी घातली. सर्व महाराष्ट्राला कळलंय, काही वाटतच नाही का कोणाला? दुकानं, बस, गाड्या, रिक्षा चालू आहेत. लोकं नेहमीची कामं करतायत. काहीच वाटत नाहीएय. कोणाला दु:ख होत नाहीएय. असं मारूच कसं शकतात त्यांना? ते काय साधे होते काय? उगाचच कोणी उठावं आणि मारावं असे. ते दाभोलकर होते. काय होणार आता, कोणाकडे बघू मी? काहीही होऊ दे पण डॉक्टरांचा आधार होता मला. डोकं भणभणतंय. पुन्हा दुखायला का लागलं, आपण बदलतोय. डॉक्टरांचे लिखाण, त्यांनी सुचविलेली पुस्तके वाचून बदलायला झालं. खरं आहे पण ते नसणं. शक्य नाही. मी काय करू? कोणाकडे बघू आता? भयानक अवस्थेतून बाहेर खेचून काढलं. मला माणूस केलं. किती नीट चाललं होतं माझं! त्यांनी काय केलं माझ्यासाठी विचाराल तर पुस्तक लिहिली, भाषणं केली. माझ्यासाठीच होतं ते. भेटलोे एकदाच हो. देवमाणूस होते हो. थोर माणूस.

मी खरं सांगतो. वडिलांपेक्षा मोठे होते माझ्यासाठी. त्यांची पुस्तकं आणि भाषणांनी प्रकाश दिला. आपण नॉर्मल माणूस आहोत. हे कळणे म्हणजे साक्षात्कार होता. त्यांनी दिला तो. नंतर अनेकांनी चिडवलं; पण काहीच वाटलं नाही. उलट आपण चिडवणार्‍यांशी बोलतो. विसरलो होतो डोकेदुखी आणि चिवचिव. काय आयुष्य बदललंय; पण आता काय? एवढ्या लवकर गेले अचानक. तारा निखळून पडला. माझा प्रकाश गेला. गेले कसले; मारलं कोणीतरी, नाही मरू शकत. डोक्यात विचार यायचं थांबलंय. इथंच थांबलंय सगळं. फक्त गरम कढईत लाह्या फुटतायत. आपण टळटळीत उन्हात उभं राहून गरम कढईतल्या लाह्या बघतोय. डोक्यात सणसण आवाज येतायत. त्यांच्यामुळं कळलं अशी अवस्था का होते? तेच गेले. गेले म्हणजे गेले. संपले ते. खलास झाले. डोक्यातले आवाज वाढतायत. घड्याळाचा मोठा टोल आदळतोय इकडून तिकडे जाड पितळी झाकणावर. आवाज मस्तकात घुमलाय.

नातेवाईक कुणीच नाहीत आपल्याला. त्यांनाच सगळं मानलं होतं. आईबाप सवयीचे आणि पैसे पाठवण्यापुरते. बाकी सबकुछ दाभोलकर होते डोक्यात. कुठलाही प्रश्न विचारावा विनासंकोच. नीट नेमकं उत्तर यायचं. भूक लागलीय. घशाला कोरड पडलीय. मित्र मला ‘दाभोलकर इफेक्ट’ म्हणून चिडवायचे. आवडायचं मनातून. गेले. मारले. आता काय?

परत कोणी देवा म्हणून चिडवलं तर किती दिवस तोंड देणार, एक दिवस डोकं दुखायला लागेल. आईबाबा म्हणतीलच. सांगत होतो आधीपासून. घरी परत जावं लागेल.

संजयचा वेग कायम होता. भूक लागली होती त्याला. वरतून उन्हाची आग होती. पिसाटल्यासारखा चालतच होता तो.

कोणाला सांगायला जातोय? किती वेळ चालतोय? आता कशाला जाऊ देवळात? जिथं दाभोलकरांना ठार मारता येतं तर देवाचा काय उपयोग? कुठं चाललोय आपण? सगळं सांगायचंय कोणाला तरी. मोकळं होऊन जाऊ. दमेपर्यंत बोलू. तेच तेच बोलू. पण बोलू. ओकून टाकू लहानपणापासूनचं. इच्छा होती डॉक्टरांना सांगायची. तसं पत्रंही टाकलं होतं ये म्हणाले होते. तारीख ठरायच्या आधी गेले. का कोणास ठाऊक सरांशी नाही येत असं बोलता. दाभोलकर इज दाभोलकर. आधार वाटायचा. मारायला कोणाचं काय केलं होतं. किंमत नाही इथं माणसांची. पाय दुखतायत. बसू या. नको. दमवू आज त्यांना. फोड आले तरी चालतील. रक्त येऊ दे. थांबायचं नाही. भूकपण नको भागवू या. कोणाला काहीच वाटत नाही. तुमच्यासाठी काम करणार्‍याला खुलेआम मारलं. दोन मिनिटं शांत उभे राहाल का? उन्हात कोकाकोला पितायत. कशाचं काहीच सोयरसुतक नाही. डोकं तापतंय. डायरेक्ट डोक्यात ऊन शिरतंय. समोरचं नीट दिसत नाहीएय. कोणाला खरंच काहीच वाटत नाही. डॉ. दाभोलकरांना मारल्याचं माझं दु:ख वेडं ठरणार. अस्पष्ट दिसतंय समोर, काहीतरी हलल्यासारखं वाटतंय. त्रास करवून घेऊ. तापू दे डोकं. फुटू देत पाय. पोतराजाच्या फटक्यांचा आवाज येतोय. बिन वेदनेचा आवाज. आवाज नको. फटके हवेत सडसडून. वेदना भोगू दे.

रात्री सरांकडे राहुल गेला. सरांच्या चेहर्‍यावर अस्वस्थता दिसत होती. ते फेर्‍या घालत होते. सारखे फोन चालू होते. राहुल संकोचून म्हणाला, ‘सर, संजयला शोधला. कुठंच सापडत नाही.’

‘बापरे… पाह्यलं सगळीकडे?’

राहुलनं होकारार्थी मान हलवून सगळ्या ठिकाणांची नावं सांगितली. सरांनी काही वेळ विचार केला आणि कारची चावी राहुलला देत म्हणाले, ‘चालू कर. मी आलोच कपडे बदलून.’

पुढचे दोन अडीच तास गावातल्या गल्ल्यांतून गाडी फिरवत दोघंही संजयला शोधत होते. हायवेवरच्या शेवटच्या धाब्यापाशी गाडी थांबविली. दोघंही गप्प होते. सगळं शोधून संपलं होतं. कुठंही कोणी अपघातात मेलं नव्हतं. आत्महत्या नव्हती. हॉस्पिटलं बघून झाली होती. सगळे फोन करून झाले होते. संजय अचानक लुप्त झाला होता. दोघंही डोक्यात याद्या तपासत होते. काहीच बोलत नव्हते एकमेकांशी. राहुलनं ढाब्याकडं पाह्यलं. धावत तिकडं गेला आणि सरांना हाक मारून बोलावलं. शेवटच्या बाजेवर एक झोपलेली आकृती होती. संजय होता तो. बॅग पोटाशी घेऊन मुटकुळं करून झोपला होता तो. समोर एक पाण्याचा ग्लास आणि चहा होता. राहुलनं त्याला उठवायचा प्रयत्न केला. तापानं फणफणला होता तो. बरळणं चालू होतं. सर आले. दोघांनी संजयला उचलून गाडीच्या मागच्या सीटवर झोपवलं आणि गाडी सुरू केली. राहुलनं सरांकडे पाह्यलं. त्याला कळलं ते काहीतरी बोलणार आता. त्यानं वाट बघायचं ठरवलं. काही वेळ तसाच गेला. सर अस्वस्थ दिसत नव्हते; पण त्यांची जुळवाजुळव चाललेली राहुलला कळत होती. काही क्षणातच सर म्हणाले, “याचं डॉ.दाभोलकरांशी नातं वेगळं होतं.”

“म्हणजे?”

‘दाभोलकर माझे मित्र, सहकारी, तुझे नेते. वैचारिक मार्गदर्शक. असं काहीतरी डिफाईन करता येईल. त्याचं तसं नाही. तो तुझ्यासारखा काम करणारा नाही. संघटनेत रमणारा नाही. तरी त्याचं एक नातं होतं. डॉ. दाभोलकर त्याला नेत्यापेक्षा मोठे होते. आई वडिलांपेक्षा जास्त होते.’

‘मला कधी बोलला नाही.’

‘मला समजे ते, त्याच्या बोलण्यातूनही जाणवे. मी विरोध नाही केला त्याच्या वाटण्याचा. दाभोलकरांचे पुस्तक वाचून तो आनंदाने देवळात गेला होता. मला खूप वेगळं वाटलं त्याचं वागणं; पण त्यात त्याची एक सुसंगती होती. त्याच्यासाठी ते बरोबर होतं.’

राहुलनं मागे वळून पाह्यलं. संजयचे पाय धुळीनं माखले होते. तळव्यातून रक्ताच्या बारीक रेषा दिसत होत्या. अंगावर खूप धूळ होती. तोंडावर रडण्याचे ओघळ सुकले होते. दोन्ही हात पायात घालून झोपल्याने त्याची सहा अधिक चार दिसत नव्हती. राहुलला सरांचा आवाज ऐकू आला. ‘आता त्याला नवीन दाभोलकर मिळणार नाहीत. अशा माणसांना तसे मिळतही नसतात. तिथंच धोका असतो. आपल्यातच सांभाळायला लागणार आहे त्याला. डॉ. दाभोलकरांची अनेक कामं अर्धवट राह्यलीत. आपल्या वाट्याला आलेलं हे अजून एक काम समजायचं आणि सांभाळायचं.’

-सतीश तांबे

(‘खेळ’ या अनियकालिकातून साभार)