Categories
कव्हर स्टोरी व्यसन

अमली पदार्थांचा वापर व तस्करी : विकासाला खीळ

जानेवारी - २०१९

कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, ते म्हणजे अश्लील वाणी, चित्र, वाङ्मय आणि मादक द्रव्ये (Drugs) या बाबी जगातल्या सर्वांत मोठ्या आर्थिक उलाढालीची क्षेत्रे मानली जात आहेत. मन, शरीर, बुद्धी यांचा सरळसोट नायनाट करणारी वस्तू म्हणजे मादक पदार्थ.

मादक पदार्थ आणि त्यांचं व्यसन

मशेरी, तपकिरीपासून सिगारेट, गुटख्यापर्यंत सर्व तंबाखूजन्य पदार्थ, सर्व प्रकारची मद्ये, अफू, गांजापासून ते एम.डी. सारख्या सिंथेटिक द्रव्यापर्यंत सार्‍यांचा समावेश मादक द्रव्यांच्या यादीत केला गेला आहे. यातल्या कोणत्याही पदार्थांचे सेवन / वापर केल्यावर त्यातील नशा आणणारा घटक रक्ताद्वारे काही सेकंदांत मेंदूत जातो. मेंदूतील ठराविक पेशीचा मादक पदार्थाला विशिष्ट प्रतिसाद म्हणजेच काहींच्या दृष्टीने सुखावह, तरतरी आणणारा, उत्तेजित करणारा अनुभव. यालाच ‘सुखभ्रम’ म्हणतात. हा प्रतिसाद कसा असावा, हे प्रामुख्याने ठरविले जाते ते त्या-त्या व्यक्तीच्या गुणसुत्रांद्वारे. हा प्रतिसाद देणार्‍या मेंदूतल्या पेशींना Receptors असे म्हटले जाते. Receptors ची संख्या साधारणत: दरवेळी शंभरच्या पटीत वाढत जाते. त्यामुळे त्या पदार्थाची सेवनाची मागणी वाढत जाते. हळूहळू या Receptors ची संख्या एवढी वाढत जाते की, ते आपला एक दरारा मेंदूत निर्माण करू लागतात. म्हणजेच मादक पदार्थांचे सेवन एवढं वाढतं की ते धोकादायक स्थिती धारण करते. त्यालाच ‘सब्स्टन्स अ‍ॅब्युज’ म्हणतात. आता मादक पदार्थ वापरणार्‍या व्यक्तीच्या मनाबरोबर शरीरावरही आपली पकड घट्ट बसवितात. मादक पदार्थसेवनामुळे मेंदूकडे जाणार्‍या संदेशांचा उचित अर्थ मेंदू लावू शकत नाही. त्यामुळे भीती, चिंता, दु:ख, क्रोध, आनंद, कामवासना अशी कोणतीही भावना बळावू शकते. पंचेंद्रियांना जाणवणार्‍या संवेदनांचा चुकीचा अर्थ लावला जातो; म्हणजेच या धुंदीमध्ये सुखभ्रम होऊ लागतो. आधीसारखीच नशा यावी म्हणून शरीराला मादक पदार्थांचे प्रमाण वाढवणे आवश्यक ठरते. म्हणजेच त्याची त्या पदार्थांबाबतची सहजवृत्ती (Tolerance) वाढत जाते. मग ते ठराविक प्रमाणात मिळाले नाही तर शरीर बंड करते. म्हणजेच बेचैनी, अस्वस्थता, डोकेदुखी, थरथर इ. प्रकार सुरू होतात. यालाच वियोग लक्षणे (withdrawal symptons) असे म्हणतात. अशा प्रकारे मादक पदार्थांचा सुरू झालेला प्रवास ‘मैत्री’, ‘प्रेम’, ‘आसक्ती’ यामार्गे ‘सक्ती’ या गंतव्यस्थानापर्यंत केव्हा येतो हे कळतही नाही.

भारतात तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनात अडकत असल्याचे चित्र आहे. भारत अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय वाहतुकीच्या मार्गावर येत असल्याने मोठा फटका बसत आहे. विशेषत: पंजाब, मणिपूर व मिझोराम या राज्यांना त्याचा मोठा तडाखा बसला आहे. पंजाबची स्थिती अतिशय वाईट झालेली असल्याचे ‘उडता पंजाब’ या चित्रपटातूनही दिसून आले आहे. पंजाबमध्ये 70 ते 75 टक्के युवावर्ग व्यसनाधीन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पंजाबपाठोपाठ उत्तरांचल, हरियाणा, त्रिपुरा, मेघालय या राज्यांतही व्यसनाधिनतेने थैमान घातले आहे.

1990 साली दारूची पहिल्यांदा चव घेणार्‍यांचं सरासरी वय 19 वर्षे होतं ते आता 10 वर्षांवर आलं आहे. ही धोक्याची घंटा आहे असं म्हटलं पाहिजे. नवी मुंबईतील इंदिरानगर झोपडपट्टीतील चौथी-पाचवीच्या मुलांच्या खिशात बंटी, रित्तीक या सुपारीची पाकिटं आढळली आहेत. ही सुपारी म्हणजे व्यसनांचे प्रवेशद्वार मानले पाहिजे. सुपारीनंतर तंबाखू, दारू, अमली पदार्थ असा प्रवास सुरू होतो. अशा वस्त्यात हिंडल्यावर आढळून येते की व्यसनांपासून दूर असलेली व्यक्ती सापडणं कठीण आहे. वस्तीपातळी असो, मध्यमवर्ग असो किंवा उच्चभ्रू- परिस्थिती थोड्याफार फरकाने तशीच आहे. कॅनडात मॉन्ट्रियल विद्यापीठातील संशोधक सांगतात की, 15 ते 17 या वयादरम्यान धूम्रपान सुरू केलेल्या मुलांमध्ये ड्रग्सकडे वळण्याचे प्रमाण 44 टक्के आहे. 15 पेक्षा कमी वयात धूम्रपान सुरू करणार्‍यांमध्ये हे प्रमाण 68 टक्के असल्याचे त्यांच्या अहवालात म्हटले आहे. आपल्या देशात यापेक्षा गंभीर परिस्थिती असल्याचे नाकारता येणार नाही. केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आपल्या देशात दहा लाख लोक मृत्यूला कवटाळतात; म्हणजेच दररोज 2777 लोक मृत्युमुखी पडत आहेत. अमली पदार्थांच्या सेवनामुळे दररोज 7 ते 10 माणसे आत्महत्या करून जीवन संपवत आहेत. दारूमुळे लिव्हर खराब होते, एवढेच माहीत आहे. परंतु दारू पिणार्‍यांत स्ट्रोक, हार्टअटॅक, पॅरॅलेसिस, आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे; पण त्याचा संबंध दारू पिण्याशी लावला जात नाही. दारूमुळे 42 टक्के अपघात व 41 टक्के गुन्हेगारी होत असते, याकडेही लक्ष वेधले पाहिजे. भारतीय समाजगटावर नेत्यांचा खूप प्रभाव असतो. पण एकही नेता व्यसनांबद्दल आपली भूमिका मांडताना दिसत नाही. रशिया, युरोपियन युनियन यांनी गेल्या काही दशकांत टप्प्याटप्प्याने दारू उत्पादन घटवत घटवत 35 ते 75 टक्क्यांपर्यंत कमी-कमी करत आणले आहे. फ्रान्स, इटलीसारख्या देशांनाही यात यश आले आहे. त्यामुळे जागतिक दारूनिर्मिती करणार्‍या कंपन्यांनी आपला मोर्चा भारतासारख्या विकसनशील देशाकडे वळविल्याचे दिसून येते. राजकारण व प्रसारमाध्यमांचा वापर करून मद्यसंस्कृती रूजविण्यात या कंपन्या यशस्वी होत आहेत. चिल्लर पार्ट्या, रेव्ह पार्ट्या हे कशाचे निदर्शक आहे? किशोरवयीन मुले, तरुण, महिला यांना लक्ष्य करून मद्य व मादक पदार्थांचा सुळसुळाट झालेला दिसतो. अमली पदार्थांच्या बाबतीत छऊझड कायदा आहे. परंतु आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ व्यापाराची साखळी या कायद्यापलिकडच्या सर्व बाबी करण्यात सरावली आहे. कारण आपल्या देशाच्या प्रशासन व्यवस्थेचे अनेक कच्चे दुवे. कमी श्रमात कमालीचं श्रीमंत होण्याचा एकमेव मार्ग म्हणून अमली पदार्थांच्या व्यापाराकडे पाहिले जाते, ते खरे आहे.

अमली पदार्थांचे सेवन अगदी छोट्या मुलांपासून वयोवृद्धांनाही भुरळ घालते. त्यातून काही क्षणांसाठी का होईना, हवेत तरंगण्याचा अनुभव एकदा घेतला की तो पुन्हा-पुन्हा घ्यावासा वाटतो. पण पुन्हा-पुन्हा मादक पदार्थांचे सेवन केल्यावर त्याची नशा येणे आणि ती जास्त काळ टिकणे कमी व्हायला लागते. मग अधिक मादक द्रव्याची विवंचना सुरू होते. नैतिक बंधने झुगारून माणूस काहीही करायला तयार होतो. गुन्ह्याचा विधिनिषेध राहत नाही. क्षुल्लक पैशांसाठी चोरीमारी आणि खुनापर्यंत मजल जाते. नशेच्या नादात आत्महत्या होतात.

अमली पदार्थांचे उत्पादन थांबविणे हा जालीम उपाय सर्व देशांनी करणे गरजेचे आहे. पण तो व्यापार हाच गुन्हेगारी जगताचे पोषण करतो. त्यासाठी राजकीय पातळीवर उलाढाली होतात. अमली पदार्थ उत्पादन करून आपण माणसांच्या भावी पिढ्या बरबाद करत आहोत याचा विधिनिषेध राहत नाही.

या समस्येला प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी शासनाची राजकीय इच्छाशक्ती, समाज, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते, पोलीस यंत्रणा या सार्‍यांची मोट बांधून ठोस पावले वेळीच उचलणे गरजेचे आहे; अन्यथा पंजाबसारखी सबंध देशाची स्थिती झाल्यास फारसे नवल वाटणार नाही.