Categories
परिषद

अमेरिकेतील अंनिसच्या अधिवेशनात !

वार्षिकांक - २०१८

अमेरिकेतील अंनिसला अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं न म्हणता ‘कमिटी फॉर स्केप्टिकल इन्क्वायरी’ असं म्हणतात; पण एकूण बाज तोच. परामानसिक आणि छद्मवैज्ञानिक दाव्यांचा यथायोग्य शास्त्रीय मागोवा घेणे हे या संस्थेचे काम. त्यासाठी अनेक तज्ज्ञ इथे काम करतात. असं काम करणार्‍या लोकांचं जाळंच या संस्थेने तयार केलं आहे. असे दावे तत्परतेने खोडून काढावे लागतात. अशी तयारीची टीम इथे आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समविचारी संघटनांशी समन्वयाचं कामही संस्थेमार्फत चालतं. या सार्‍यात ‘स्केप्टिकल इन्क्वायरी’ हे द्वैमासिक महत्त्वाची भूमिका बजावतं.

सिपोला नामेकरून एका इटालियन गणितज्ज्ञाचा, ‘द बेसिक लॉज ऑफ ह्युमन स्टुपिडिटी,’ असा गाजलेला निबंध आहे. यात मूर्खांची पाच लक्षणे सांगितली आहेत आणि पहिलेच लक्षण असे की, वाटते त्यापेक्षा मूर्खांची संख्या नेहमीच जास्त भरते. दुसरे असे की, मूर्खपणाचे वाटप वंश, वर्ण, लिंग, देश-कालपरिस्थिती निरपेक्ष असते. विद्वत्ता ही कुण्या एका जातीची मक्तेदारी नाही, हे वाक्य आपल्याला कोणीतरी तावातावाने सुनावलेलं असतं. ते आपल्याला पटलेलंही असतं; पण मूर्खपणा ही कोणाची मक्तेदारी नाही, ही भावना थोरच. खूप-खूप सुखावणारी.

हे सुख मला प्राप्त झालं ते अमेरिकेत. तिथल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्षिक अधिवेशनातील भाषणे ऐकून. अर्थात, तिथे अशा समितीला अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं न म्हणता ‘कमिटी फॉर स्केप्टिकल इन्क्वायरी’ असं म्हणतात; पण एकूण बाज तोच. परामानसिक आणि छद्मवैज्ञानिक दाव्यांचा यथायोग्य शास्त्रीय मागोवा घेणे हे या संस्थेचे काम. त्यासाठी अनेक तज्ज्ञ इथे काम करतात. असं काम करणार्‍या लोकांचं जाळंच या संस्थेने तयार केलं आहे. असे दावे तत्परतेने खोडून काढावे लागतात. अशी तयारीची टीम इथे आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समविचारी संघटनांशी समन्वयाचं कामही संस्थेमार्फत चालतं. या सार्‍यात ‘स्केप्टिकल इन्क्वायरी’ हे द्वैमासिक महत्त्वाची भूमिका बजावतं.

या असल्या जगावेगळ्या, भलत्या-सलत्या अधिवेशनाला मी जातोय, याची कुणकूण लागताच मित्रमंडळी चपापली. म्हणाली, ‘कमाल आहे. तिथेही ‘हे’ आहे? म्हणजे अंधश्रद्धा वगैरे? आम्हाला वाटत होतं की आम्हीच तेवढे यडबंबू!!’ तेव्हा गुड न्यूज ही की, असं काही नाही. जगात इतर आणि इतरत्रही यडबंबू आहेत. भूतप्रेत, मृतात्मे, प्लँचेट, परग्रहवासी, ज्योतिष याबरोबरच छद्मआरोग्यविज्ञान ही एक मोठी डोकेदुखी आहे तिथे. मुलांना लसीकरण करणे म्हणजे त्यांना ‘ऑटिसम’च्या खाईत लोटणे होय, अशी मानणारी मंडळी तिथे आहेत. योनीमार्गात अंडाकृती दगड बाळगलात तर तुमचे ऋतुप्राप्तीपासून ते ऋतुनिवृत्तीपर्यंतचे सगळे आजार दूर होतील, असं सांगणारे आहेत. बिगफूट किंवा यती असा कोणी प्रचंड मोठा, मानवसदृश प्राणी बर्फाळ प्रदेशात वास करून आहे, असं मानणारे आहेत. ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वरचा हल्ला हा मुळात हल्ला नव्हताच, तो एक मोठा बनाव आहे, असं सांगणारे आहेत… शिवाय हे सगळं अतिप्रगत अशा अमेरिकेत आहे. तेव्हा याचा प्रचार, प्रसार आणि मांडणीही अगदी गुळगुळीत, चकचकीत, तुम्ही सहज फशी पडाल, अशी आहे. याला विज्ञानाचा मुलामा आहे, संशोधनाची झिलई आहे. त्यामुळे याचा प्रतिवाद आणखी अवघड आहे. या परिषदेतील व्याख्यानातून यासंबंधीचे अनुभव लोकांनी मांडले.

माझ्यासाठी मुख्य आकर्षण होतं, डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांना प्रत्यक्ष भेटणे. (https:// shantanuabhyankar. blogspot.com/2016/10/blog-postš22.html या लिंकवर निरीश्वरवादाचा आधुनिक उद्गाता रिचर्ड डॉकिन्स हा माझा परिचयपर लेख उपलब्ध आहे) गेल्या-गेल्याच ते भेटले. ‘सेल्फिश जीन’, ‘द गॉड डिल्यूजन’, ‘ब्लाइंड वॉचमेकर’ ही त्यांची काही गाजलेली पुस्तके. त्यांच्या ‘द मॅजिक ऑफ रिअ‍ॅलिटी’चं भाषांतर मी केलंय, हे सांगताच त्यांनी सखोल माहिती घेतली. भाषांतराबाबत सूचना केल्या. इंग्लिशेतर भाषांत असलेल्या शब्ददारिद्य्रावर चर्चा झाली. विशेषतः शास्त्रीय पारिभाषिक शब्दांची चणचण ही समस्या अन्य भाषांतील अनेक भाषांतरकारांनी त्यांच्यापर्यंत पोचवली होती.

एक शैलीदार लेखक, मर्मज्ञ रसिक, शास्त्रज्ञ, लोकशिक्षक, अभिमानी नास्तिक आणि टोकदार विनोदबुद्धी असणार्‍या डॉकिन्सशी गप्पा मस्त रंगल्या. त्यांचा सारा भर लोकशिक्षणावर होता. विज्ञान सामान्य जनांपर्यंत पोचवणे, प्रत्येक सामाजिक, राजकीय घटनेत काही भूमिका घेणे, त्यांना आवश्यक वाटते; आवश्यकच नाही, तर विज्ञानवादी विचार करणार्‍या प्रत्येकाचे ते कर्तव्य आहे, असं ते मानतात. ट्रम्पना खुलेआम विरोध, ब्रेक्झिटला विरोध, गे चळवळीला साथ अशी अनेक मते ते हिरिरीने मांडतात. ‘भारतात उत्क्रांतीच्या शिक्षणाला, गर्भपाताला, गर्भनिरोधक साधनांना विरोध होत नाही का?’ हा त्यांचा प्रश्न. जवळपास नाही आणि असलाच, तर असा विरोध अत्यंत क्षीण आहे, हे माझे उत्तर ऐकताच ते सुखावतात. आमच्या पंतप्रधानांपासून ते अनेक पुढार्‍यांची अशास्त्रीय विधाने कुचेष्टेचा विषय ठरली, हे मी त्यांना आवर्जून सांगतो. ‘नास्तिक विचारालाही हिंदू धर्मात स्थान आहे का?’ हा त्यांचा पुढचा प्रश्न. ‘हो’ आहे. भारतात खंडन-मंडनाची प्राचीन परंपरा आहे, मात्र सध्या आम्ही फक्त त्याचा अभिमान बाळगतो; आचरणात आणतोच असं नाही’, असं सांगताच ते म्हणाले, ‘आमच्याकडेही तीच गत आहे!’ सौदींनी धर्मद्रोही म्हणून शिक्षा ठोठावलेला लेखक रैफ बडावी आणि इतरही देशोदेशीच्या तथाकथित धर्मद्रोह्यांबद्दल ते बोलू लागतात. भारतात राजसत्तेनं कोणाला धर्मद्रोही घोषित केलं नसलं, तरी चार विचारवंतांचे खून आणि त्यातून माजवली गेलेली अप्रत्यक्ष दहशत ही तर आणखी भयावह असल्याचे मत ते मांडतात. बोलण्याच्या ओघात भारताला भेट देण्याची त्यांची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. एका ऋजु, विद्वान व्यक्तिमत्त्वाचा सहवास पुढे दोन दिवस घडत राहिला.

हे अधिवेशन भरलं होतं लास व्हेगसमध्ये. गेली काही वर्षे हे वार्षिक अधिवेशन इथे भरवले जाते. मोठमोठी अधिवेशने भरवण्यासाठी इथे पंचतारांकित सुविधा उपलब्ध आहेत. तेव्हा अशी अनेक अधिवेशने तिथे होत असतात. सुमारे दोन हजार मंडळी याला हजर होती. पूर्ण वेळ. स्वतःच्या पैशाने. हार-तुरे, आगत-स्वागत, दीपप्रज्वलन यापासून मुक्त अशी ही परिषद. स्टेजवर, मध्यावर, एकच पोडीयम, ना टेबल, ना खुर्ची, ना तांब्या-भांडे! वक्ते येत होते आपापली मांडणी दिलखुलासपणे करत होते आणि पायउतार होत होते. औपचारिक ओळख वगैरे कटाप. तुमची मांडणी हीच तुमची ओळख. जी काही जुजबी ओळख करून दिली जात होती; तीही गमतीशीर होती. ‘सर्व वक्त्यांना काही अत्यंत गंभीर आणि मनतळाचा शोध घेणारे प्रश्न आम्ही आधीच विचारले आहेत, त्यांची उत्तरे हीच त्यांची ओळख’, असं आधीच बजावण्यात आलं; पण विचारलेले प्रश्न अत्यंत फुटकळ होते आणि त्यांची उत्तरेही तितकीच मजेदार होती. त्यामुळे प्रत्येक वक्त्यांची ओळख म्हणजे झकास खेळ होता. ‘बीचवर ताणून द्यायला आवडेल की, शेकोटीशी हादडायला?’ ‘तुमची सर्वांत अवघड गोची कधी झाली होती?’ ‘ब्रश आधी ओला करता का पेस्ट लावल्यावर?’ ‘मृत्यूची तारीख कळली तर आवडेल का मरण्याची तर्‍हा?’ अशा थिल्लर प्रश्नांना तशीच थिल्लर उत्तरे येत होती, वातावरण सैलावत होतं. बाकी भाषणानंतर चर्चा, आभार, अभिनंदन वगैरे बाहेर, चहा-कॉफीच्या घुटक्याबरोबर; पण तिथली कॉफी महान कडू होती आणि चहा पाणचट; पण ते असो.

सुरुवात झाली ती कार्यशाळांनी. जो निकेल यांच्या शंकास्पद दाव्यांचा शोध कसा घ्यावा, या विषयीच्या कार्यशाळेला मी हजर राहिलो. भुताचे फोटो ही कॅमेर्‍याची करामत असते, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. बर्‍याच फोटोत आपोआप अवतरणारे ‘स्वर्गाचे दार’ हा पोलेरॉईड प्रकारच्या कॅमेर्‍यामुळेचा प्रकाशभास असतो, हेही सांगितले. इंग्लंडमधील एका महिलेचा मृतदेह तिच्या घरातच अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडला होता. तिचे अर्धेअधिक शरीर जळले असले तरी आसपासच्या वस्तूंनी पेट घेतला नव्हता. सबब शरीरांतर्गत उष्णतेमुळे तिचा मृत्यू झाल्याचा अचाट दावा करण्यात येत होता. (Spontaneous human combustion) पण अपघातस्थळाच्या फोटोवरून निकेल यांनी सारे काही उलगडून दाखवले. कुठल्या-कुठल्या तळ्या-सरोवरात लांबच लांब ड्रॅगनसारखे प्राणी असल्याचे दावेही वेळोवेळी केले जातात. इंग्लंडमधील लोक नेस हे याचे प्रसिद्ध उदाहरण. अशा कोणत्याही प्राण्याच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा शून्य; पण भयविस्मय आणि भाकडकथा पसरवण्यासाठी हे खूप सोयीचे. अनेक प्राणी हे पोहताना एका मागोमाग पोहतात, त्यामुळे पाहणार्‍याला एकच एक मोठा प्राणी पोहतोय, असं वाटू शकतं. ऑटर, बीव्हर आणि काही हरणे अशी पोहतात. तरंगणारे ओंडके, बदकं अशा मुळेही असं भासू शकतं. थोडक्यात, काय, सर्व शक्यतांची पडताळणी महत्त्वाची.

सुरुवातीलाच काही तर्कदोष त्यांनी दाखवून दिले. एखाद्या अज्ञात गोष्टीचा अर्थ लावताना हे तर्क आपल्याला बाधक ठरतात. सर्व मांजरे सस्तन आहेत, फिफी ही मांजर आहे. सबब, फिफी सस्तन आहे; ही तर्कशुद्ध मांडणी झाली; पण विधानांचा क्रम बदलला, तर घोटाळे झालेच म्हणून समजा. सर्व मांजरे सस्तन आहेत, फिफीही सस्तन आहे. सबब, फिफी मांजर आहे! इथे घोटाळा आहे. फिफी ही कुत्री किंवा हरिणी इ. असू शकेल. ‘अ’ ही घटना ‘ब’ नंतर झाली म्हणून ती ‘ब’ मुळेच झाली, असं म्हणता येत नाही. हाही एक महत्त्वाचा तर्कदोष. याला ‘पोस्ट हॉक इर्गोप्रोप्टर हॉक’, असं म्हणतात. पण एवढं अवघड कशाला, कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ, या म्हणीत हेच तर सुचवलं आहे! अज्ञानदोष असाही एक दोष आहे. ज्याअर्थी भूतबंगल्यातले आवाज का येतात ते आपल्याला कळलेले नाही, त्याअर्थी ते तर हडळीचे पैंजणच!! शिवाय मूळ मुद्द्याला बगल देऊन वैयक्तिक हल्ला करणे असाही प्रकार आहे. www.skepticsguide.com या संकेतस्थळावर टॉप ट्वेन्टी तर्कदोषांची यादीच आहे.

याचवेळी विलियम लंडन यांनी संख्याशास्त्रावर एक कार्यशाळा घेतली. अमुक आजारावर तमुक औषध लागू आहे, हे सिद्ध करण्यासाठी संख्याशास्त्र कसे वापरले जाते, याचा परिचय त्यांनी करून दिला. संख्याशास्त्रीय माहितीत छापलंय काय, यापेक्षा छुपवलंय काय हेही कसं महत्त्वाचं ठरतं, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं.

अ‍ॅडम कोनोव्हर हा प्रसिद्ध विनोदवीर. दैनंदिन जीवनातल्या यडछापपणावर टवाळी करत तुटून पडणारा. ‘अ‍ॅडम रुइन्स एव्हरीथिंग’ (अ‍ॅडमपुढे नाद नाय!) हा त्याचा टीव्ही शो अत्यंत गाजलेला. सायंकाळच्या सत्रात याने आपल्या खास शैलीत चक्क विज्ञान आणि वैज्ञानिकतेच्याच झकास फिरक्या घेतल्या. या कार्यक्रमाचं नावच मुळी ‘अ‍ॅडम रुइन्स स्केप्टीसिझम’ असं होतं.

एकूणच, वैज्ञानिक विचारांचीही वैज्ञानिक चिकित्सा वेळोवेळी केली गेली. विज्ञान आणि छद्मविज्ञान यातील सीमारेषा पुसट आहेच. ही ठरवायची कशी, याबद्दल ऊहापोह झाला. विज्ञानाची तत्त्वे इतिहास, तत्त्वज्ञान अशा मानव्य विषयांना तंतोतंत लागू होतात का? वैज्ञानिक विचारांचा अतिरेक ‘विज्ञानाचा इझम’ (Scientism) असा काही वैचारिक चकवा आहे का? विज्ञानाचे नेत्रदीपक यश हेच विज्ञान विचाराला माजोर्डेपणाकडे नेत नाही ना? अशा प्रश्नांची सखोल चर्चा झाली. काळाच्या ओघात ज्योतिषशास्त्राची जागा ज्योतिर्विद्येने घेतली, मंत्रोपचाराची जागा वैद्यकीने व्यापली, अल्केमीच्या जागी केमिस्ट्री आली; तसेच आजच्या गूढविद्यांची जागा उद्या विज्ञान घेईलच घेईल. आजच नीतिशास्त्राला नीति-मानसशास्त्र अधिक समजावून घेत आहे. ज्ञानशास्त्राला (Epistemology) जाणीवशास्त्र (Cognitive Science) कह्यात घेत आहे. तर पराभौतिकीला ब्रह्मांडविज्ञान (Cosmology).

जिम अल्कॉक या मानसतज्ज्ञांनी विश्वास आणि प्रोपोगंडा/प्रचार यांची मानसशास्त्रीय बाजू उलगडून दाखवली. एखादी गोष्ट असत्य असल्याचं नंतर जरी सिद्ध झालं तरी आपलं मन मूळ समजुतीला सहजासहजी तिलांजली देत नाही. मिळणारी प्रत्येक माहिती आपण पारखून घेऊ शकत नाही, तेव्हा विश्वास हा घटक असतोच. म्हणून माहितीचा स्रोत किती खात्रीचा हे तपासणे आवश्यक असते. मात्र सध्याच्या माहितीयुगात हे स्रोतच इतके प्रचंड वाढले आहेत की हेही अशक्य व्हावं. पण याच परिस्थितीचा गैरफायदा उठवून स्रोतांच्या विश्वासार्हतेला तडा जाईल, असं मुद्दाम केलं जातंय. अशातूनच प्रोपोगंडा जन्माला येतो.

टिमोथी कोलफिल्ड यांनी सिनेस्टार, खेळाडू इत्यादींची मते सामान्यांना चटकन मान्य होतात, मग यांना जाहिरातीसाठी घेऊन अत्यंत अशास्त्रीय, अनावश्यक आणि बाजारू चीजा, चुटकीसरशी सारं काही छापाची जीवनशैली आपल्या माथी मारली जाते, याचे विश्लेषण केले. Yvette D’Entremont अशा अशक्य उच्चाराच्या नाववाल्या बाईंनी फेक न्यूज कशी जाणावी, हे सांगितलं. कार्ल झिमर हे त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाबद्दल (शी हॅज हर मदर्स लाफ) बोलले. अनुवंशशास्त्र हे वेळोवेळी वांशिक आणि वर्णवर्चस्व सिद्ध करायला कसं वापरलं गेलं, याचा रोचक आढावा त्यांनी मांडला. जनुकांइतकीच आसपासची परिस्थिती आपल्याला घडवत असते, हे त्यांनी उदाहरणासहित मांडले.

डॉ. जेन गुंटर या एक स्त्रीरोगतज्ज्ञ बाई. ग्वेनेथ पालट्रो या प्रसिद्ध नटीने स्वतःची औषध कंपनी काढली. अगदी औषध कंपनी असं नाही म्हणता येणार; पण स्वतःची ‘लाईफ स्टाईल प्रॉडक्ट’ विकणारी कंपनी काढली आणि विकायला ठेवली योनीमार्गात बाळगण्याची जेडची (एक प्रकारचा दगड) अंडी!!! ही म्हणे प्राचीन चीनी उपचार पद्धती. तिथल्या राण्या आणि अंगवस्त्रे ही योनीत बाळगत असत, त्यामुळे त्या सुडौल राहत! त्यांचे हार्मोन सुधारत!! सेक्स लाइफ सुधारे!!! शक्ती वाढे!!!!…कारण योनी हा म्हणे स्त्रीच्या चातुर्याचा, शक्तीचा, बुद्धीचा स्रोत आहे…!!!!! पालट्रो बाईंनी असे अनेक गुणधर्म या अंड्यांना चिकटवले होते. ही अंडी हातोहात खपू लागली. डॉ. जेननं या विरुद्ध ब्लॉग लिहिला. हे तथाकथित चीनी औषध खुद्द चीनमध्ये ही ‘औषधा’ला सुद्धा सापडत नाही, हे दाखवून दिलं. हे जेडाश्म घालून फिरल्याने म्हणे योनीच्या स्नायूंना व्यायाम होतो. डॉ. जेनचा युक्तिवाद असा की व्यायाम होतो हे बरोबर; पण दंडात बेटकुळी निघावी म्हणून तुम्ही दिवसभर हातात डम्बेल घेऊन फिरता काय? असले सच्छिद्र दगड योनीमार्गात बाळगल्याने उलट इन्फेक्शनची शक्यता वाढते, हे त्यांनी सांगितलं आणि कंपनीचा खोटेपणा उघडा पाडला.

डॉ. पॉल ऑफिट हे अमेरिकेतील एक मान्यवर बालरोग तज्ज्ञ, लसीकरणाचे तज्ज्ञ. गोवराची लस देऊ नये हा प्रचार तिथे इतका टोकाला पोेचला आहे की, आता पुन्हा गोवराच्या साथी तिथे मुलांचे बळी घेत आहेत. तिथल्या लसीकरणविरोधी लोकांशी दोन हात करताना कसे नाकी नऊ येतात, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. आता लसीकरणाच्या बाजूने एक मोठी जनशिक्षण मोहीम तिथे चालू आहे. या मोहिमेतले आपले अनुभव त्यांनी कथन केले. वृत्तपत्रे संतुलित माहिती देण्याच्या भानगडीत चुकीची माहितीही हिरिरीने देतात. एकच बाजू बरोबर असताना दुसर्‍या बाजूलाही तितकेच महत्त्व देणे म्हणजे संतुलित वार्तांकन नव्हे; पण हे त्यांना कोण सांगणार? हा खरं तर वृत्तपत्र संहितेचा भंग आहे. टीव्हीवरच्या चर्चांमध्येही साधक चर्चेपेक्षा बाधक चर्चेत टीव्हीवाल्यांना रस असतो. ‘टीआरपी’ त्यावर ठरतो. अशा चर्चेत एक पीडित व्यक्ती, वाक्यावाक्याला डोळे पुसणार्‍या बायकांचा हुकमी ऑडीयन्स आणि कोणी एक व्हिलन लागतो. मग तो व्हिलन कधी लसीकरण करा, असं सांगणारा ‘भला’ डॉक्टरही असू शकतो. तेव्हा ‘सावधपणे माध्यमें तुच्छ केले’ असं धोरण हवं, असं त्यांनी आग्रहाने सांगितलं. माध्यमांना सामोरे जाताना स्वतःची कशी गोची झाली, विविध अँकर लोकांनी आपला कसा ‘मामा’ बनवला आणि यातूनच आपण तेल लावलेले, कसलेले, माध्यमपटू कसे झालो, हे त्यांनी बहारदारपणे सांगितलं. विज्ञानाच्या बाजूनं बुलंदपणे उभं राहून भांडलेच पाहिजे. प्रत्येक आक्षेपाला तिथल्या तिथे सडेतोड उत्तर दिलेच पाहिजे. शास्त्रज्ञांची ही विशेष जबाबदारी आहे.

डॉ. ऑफिट याचं भाषण चक्क जेवणाच्या वेळी होतं. जेवताना सुद्धा मेले शांतपणे जेऊ देत नव्हते. अर्धा तास झाला की कोपर्‍यातल्या स्टेजवरून चक्क व्याख्यान सुरू व्हायचं. अन्नकणाबरोबर ज्ञानकण वेचायला सुरवात. शनिवारी दुपारी व्हीआयपींची पंगत वेगळी होती. रिचर्ड डॉकिंस, स्टीफन फ्राय आणि जेम्स रँडी यांच्या पंगतीला बसायचं असेल तर वेगळे पैसे भरायचे होते. ते मला परवडण्यासारखे नव्हते तेव्हा मी त्या वाटेला गेलो नाही. सुरुवातीच्या चर्चेतील माझ्या बुद्धिवैभवाने दीपून डॉकिन्ससाहेब आपणहून मला त्यांच्या पंगतीला चकटफू बोलावतील, असं वाटलं होतं; पण तसं काही झालं नाही!

बर्था व्हाज्क्वेज या अमेरिकेतील जीवशास्त्र शिकवणार्‍या शालेय शिक्षकांसाठी उत्क्रांतीविषयक कार्यशाळा घेतात. उत्क्रांतीची संकल्पना कशी शिकवावी, हे या बाई शिकवतात. तिथे उत्क्रांतीला विरोध ही एक धार्मिक चळवळ आहे. अशांना राजकीय वरदहस्त आहे. तेव्हा यांचे काम किती अवघड आहे आणि त्या मानाने या बाबतीत तरी भारतात आपण किती सुखी आहोत बघा. सत्यपालसिंहांचे एकच विधान त्यांना किती अडचणीचे ठरले!

अ‍ॅबी हाफर या बाईंचे भाषणही अप्रतिम झाले. स्त्री आणि पुरुष असा द्विलिंगी भाव आपल्या मनात दाटून असतो. तीच जगाची रीत असा आपला समज असतो. ‘अधले-मधले’ हे कुचेष्टेचे धनी, तेवढीच त्याची लायकी, असंही वाटत असतं. पण मुळात जीवशास्त्राचा नीट विचार केला, तर दोनच लिंग असतात, हे असत्य आहे. ती दोन भिन्न जीवांमध्ये असतात, हेही असत्य आहे. काही काळ नर आणि मग नारी रूप घेणारे प्राणी आहेत, याउलटही आहेत, एवढेच काय दोनच्या जागी सप्तलिंगी प्राणीही या भूतलावर आहेत; असे एकच्या एक शॉक त्या देत होत्या आणि लिंगभाव हा जणू मोठा पिसारा आहे, हे आवर्जून सांगत होत्या. मानवात या पिसार्‍यात एका टोकाला नर आणि दुसर्‍या टोकाला मादी आहे; पण अधे-मध्येही बरेच काही आहे. माणसं उंच असतात आणि बुटकीही असतात म्हणून अधले-मधले आपण बाद ठरवत नाही, तद्वतच लिंगभावातही मधली स्थिती आपण स्वीकारायला हवी; तीही तितकीच नैसर्गिक आहे, असा एकूण आशय. पुढारलेल्या अमेरिकेतही समलिंगी विद्वेष आहेच. ‘होमोफोबिया’ असा शब्दही आहे. बाईंचे भाषण या सार्‍याला उद्देशून होतं. आपल्याकडे 377 कलम नुकतंच रद्द झालं, झालं म्हणजे न्यायालयाने केलं. पण यातून समाजात समलिंगीविषयीचा रोष, भीती, फाजील कुतूहल आणि भेदभाव संपुष्टात आलेला नाही. कायद्याने यांना निव्वळ सरकारपासून संरक्षण दिलं आहे! कायदा ही एक पायरी फक्त. आता पोलिसी ससेमिरा संपेल; पण समाजापासूनचा जाच काही कायद्याने संपणार नाही. तो मनं घासून-पुसून लख्ख होतील तेव्हाच संपेल.

पण या सर्वांत उन्नत करणारा अनुभव होता तो स्टीफन पिंकर यांना ऐकण्याचा. मानवी समाजाची उत्तरोत्तर प्रगती होत असून, विज्ञान, विवेक, मानवता, स्वातंत्र्य, समता ही प्रबोधन युगातून आकारास आलेली मूल्ये आज कळीची ठरली आहेत. आयुष्य, आरोग्य, श्रीमंती, सुरक्षितता, शांतता, ज्ञान आणि जगण्यातील आनंद हे पश्चिमेतच नाही, तर जगभर वर्धिष्णू होत आहेत. संपत्तीचे वाटप आजही विषम आहे आणि अजूनही कितीतरी काळ तसंच राहील; पण आजचे संपत्तीचे वाटप हे पूर्वीपेक्षा अधिक समन्यायी आहे. याचे एक कारण म्हणजे लोकसंख्या भूमितीय श्रेणीत वाढते, तर संपत्ती गणितीय श्रेणीत, हा माल्थसचा प्रसिद्ध सिद्धांत आज गैरलागू आहे! आज लोकसंख्या गणितीय श्रेणीने तर संपत्ती भूमितीय श्रेणीत वाढताना दिसते. युद्ध, रोगराई, उपासमार हे त्रि-‘काळ’ आता आटोक्यात आले आहेत. मानवजातीची ‘शहाणीव’ वाढते आहे… असा भलताच वाटावा इतका आशावादी सूर यांनी लावला. पण या सुराला संवादी अशी आकडेवारीही सादर केली. पुराव्यावाचून एकही विधान केलं नाही. परिस्थिती उमेदीची, उत्साहाचीच नाही तर उत्सवाची आहे, असं त्यांनी सांगितलं. हे काही कोणा जगन्नियंत्याच्या इच्छेने घडत नसून विज्ञान, विवेक आणि मानवतावादाची फलश्रुती आहे. ‘एनलाईटनमेंट नाऊ’ हे त्याचं पुस्तक जिज्ञासूंनी जरूर वाचावं. तुम्हाला आवडलं तर तुमचं आणि बिल गेट्सचं एकमत झालंय म्हणायचं, कारण बिल गेट्सलाही हे निखालस आवडलेलं पुस्तक आहे.

या परिषदेतील आणखी एक स्टार उपस्थिती म्हणजे जेम्स रँडी. हे या क्षेत्रातील पितामह. आता खोल गेलेले निळे, भेदक डोळे, कृश शरीरयष्टी, पांढरी भरदार दाढी आणि हातात मानवी कवटीच्या आकाराची मूठ असलेली काठी अशी खाशी वेशभूषा. जादूचे प्रयोग करता-करता हा माणूस अतींद्रिय आणि परामानसिक शक्तींच्या दाव्यांचा शोध घेऊ लागला. अशा दाव्यांचे फोलपण सिद्ध करणारे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. अनेक खटले लढवले. हार-प्रहार दोन्ही झेलले. आज नव्वदीच्या घरात असलेला हा भला गृहस्थ चाकाच्या खुर्चीत बसून पूर्ण वेळ हजर होता. आतड्याच्या कॅन्सरवर सध्या उपचार सुरू आहेत, केमो झालेली आहे, नुकताच पक्षाघाताचा सौम्य झटका येऊन गेला आहे; पण उत्साह दुर्दम्य आहे. त्यांच्या सोबत काम करणार्‍यांनी त्यांच्या सहवासातील आठवणी जागवल्या. पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन आणि अधिक जोमानं सहभागी होईन, असं सांगत खुद्द रँडींनी सर्वांचे आभार मानले.

माझं भाषण होतं शेवटच्या दिवशी, शेवटच्या सत्रात. एकूण तीसपैकी अंतिमतः सहाजणांची या सत्रासाठी निवड झाली होती. यात ब्राझीलमध्ये खुलेआम विकल्या जाणार्‍या सर्व-कॅन्सर निर्दालक औषधाबद्दल नतालिया पास्टरनाक यांचा एक पेपर होता. एखाद्या गोष्टीला पेटंट मिळणे म्हणजे त्याला शास्त्रीय वैधता प्राप्त झाली, असं नव्हे, असं दाखवून देणारा आणि पेटंट कायद्याचा वेध घेणारा रिक मॅक्लीड यांचा पेपर होता. स्टीफन हप यांनी पौगंडावस्थेतील समस्यांचा वेध घेतला. वाचन आणि संवाद हाच या वयातील मुलांपर्यंत पोचायचा सेतू आहे, असं त्यांनी बजावलं. रॉब पाल्मर यांनी ‘विकिपीडिया’वरील थातूरमातुर गोष्टींशी सामना कसा करावा हे मांडलं, तर डेन्मार्कच्या एका जोडगळीने मुळात मुलखावेगळ्या गोष्टींवर शहाणीसवरती माणसं विश्वासच का ठेवतात, याचा शोध मांडला.

अंनिसच्या जादूटोणाविरोधी कायद्यासाठीच्या लढ्याची माहिती देण्याची संधी मला मिळाली. अंनिसची पार्श्वभूमी, कायद्याची गरज, त्यासाठीचा प्रदीर्घ लढा, डॉ. दाभोलकरांची हत्या आणि त्यानंतरच आलेला कायदा अशी मांडणी मी केली. डॉक्टरांच्या हत्येचा उल्लेख सगळ्यांनाच सुन्न करून गेला. कायदा झाल्यानंतरचे त्याचे यश आणि अंनिसची पुढील वाटचाल याबद्दलही बोललो. पुढील वर्षी होणार्‍या त्रैदशवार्षिक संमेलनासाठी सगळ्या उपस्थितांना मी निमंत्रण दिले आणि माझे भाषण संपवले. भाषणानंतर अनेकांनी या विषयात उत्सुकता दाखवली. अशा कायद्याची अमेरिकेलाही गरज आहे असं म्हणताच टाळ्यांचा गजर झालाच होता. कायद्याच्या बारा कलमांपैकी बरीचशी कलमे अमेरिकेतही तंतोतंत लागू करावीत अशीच आहेत, असं अनेकांचं म्हणणं होतं.

चार दिवसाची ही परिषद. या क्षेत्रातील दिग्गज मंडळींशी थेट संवाद साधण्याची, एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अंनिसतर्फे बोलायची संधी मिळाली हे आनंदाचे आहे. अविनाश पाटील, डॉ. हमीद दाभोलकर, सुदेश घोडेराव, प. रा. आर्डे सर, राहुल थोरात आणि प्रशांत पोतदार यांनी केलेली मदत सार्थकी लागली.

लेखक संपर्क – 9822010349