Categories
चळवळ

आदिवासी पाड्यात अंनिसची युवा जनसंवाद यात्रा

सप्टेंबर - २०१६

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती धुळे व नंदूरबार जिल्हा संयुक्तपणे आयोजित ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ युवा जनसंवाद यात्रा

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला तीन वर्षेझाली, तरी त्यांच्या मारेकर्‍यांचा आणि त्यामागील सूत्रधारांचा तपास नाही. प्रत्येक महिन्याची 20 तारीख ही डॉक्टरांच्या खुनाची वेदना जागवत असते. ही वेदना, दु:ख उरात घेऊन आपण सर्व विवेकाच्या वाटेवर कधी कोलभलो नाहीत. उलट एकजुटीने संयमाची दोरी मजबूत ठेवत आणि निराशेचा पराभव कधी व्याख्याने, परिषदा, रिंगणनाट्य, निर्भय मॉर्निंग वॉक, तर कधी आंदोलने, निषेध सभा घेऊन कार्य अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला.

हे सर्व करत असताना युवकांना काहीतरी करावेसे वाटत असे आणि मग आम्हाला युवा जनसंवाद यात्रेची कल्पना सुचली. धुळ्याचा कार्यकर्ता किरण ईशी व मी ती यात्रा युवा कार्यकर्त्यांसोबत काढण्याचा निर्णय घेतला. परंतु या यात्रेची सुरुवात कशी करावी? याचे स्वरूप काय असावे? विषय काय असावा? हे काहीच सुचत नव्हते. म्हणून आम्ही अविनाशभाई व विनायक सावळे सर यांना याविषयी कल्पना दिली. त्यांनी लगेचच आम्हाला होकार देत आनंद व्यक्त केला आणि सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. भाई व सरांनी आमच्यावर दाखविलेल्या या विश्वासाने आम्हालाही आनंद झाला आणि आम्ही कामाला लागलो.

दोन्ही जिल्ह्यांतील काही युवा कार्यकर्त्यांशी याविषयी बोलणे झाले आणि लगेचच आम्ही नियोजनासाठी धुळ्यात एक बैठक घेतली. या बैठकीत यात्रेचे नाव, मार्ग, गावे, विषय, वाहन, माहितीपत्रक आणि त्यासाठी लागणारा खर्च, अशी सविस्तर चर्चा केली. 30 जुलै ते 8 ऑगस्ट अशा दहा दिवसांत दोन्ही जिल्ह्यांतील दहाही तालुक्यांतील प्रत्येकी तीन गावांत कार्यक्रम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि अगोदर या निश्चित केलेल्या गावांना प्राथमिक भेटी देण्याचे ठरविले.

ठरल्याप्रमाणे गावांना भेटी देत असताना आम्हाला आलेला अनुभव खूपच निराळा होता. डॉक्टर आणि समितीच्या कार्याप्रती खूपच आदर आणि सन्मान होता. अंनिसचे कार्य हे समाजाला उपयुक्त आणि पुढे नेणारे आहे, असे ते सांगत होते. दिलेल्या प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांनी आम्हाला कार्यक्रमाची परवानगी दिली. आमचे आनंदाने, आपुलकीने स्वागत केले. डॉक्टरांच्या हयातीत आम्हाला भेटता आले नाही, अशी खंत व्यक्त करत होते. ‘अंनिस’चा कार्यक्रम सर्वांना हवाहवासा वाटणारा होता. हे सर्व पाहून आम्हाला वाटले की, हे जणू आपली वाटच पाहत होते की काय? या प्राथमिक भेटीदरम्यान आलेला अनुभव हा डॉक्टर व अंनिसच्या कार्याची प्रचिती देणाराच होता.

नंतर ठरल्याप्रमाणे 30 जुलै रोजी धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापासून ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ युवा जनसंवाद यात्रेच्या उद्घाटनासाठी गोळा झालो. डॉक्टरांच्या अभिवादन गीताने सुरुवात करून घोषणा दिल्या. धुळ्याच्या महापौर कल्पनाताई महाले व राज्य कार्याध्यक्ष अविनाशभाई पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले आणि आमच्या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. अविनाशभाईंनी ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ या महाराष्ट्र अंनिसच्या राष्ट्रीय अभियानाची पार्श्वभूमी व आमच्या युवा जनसंवाद यात्रेची भूमिका सांगितली आणि सदिच्छा दिल्या.

आमचा पहिला कार्यक्रम धुळ्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुंबा या गावातल्या एम. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात होता. शाळेचा परिपाठ चालू असताना आम्ही तेथे प्रवेश केला. आमच्या कार्यक्रमाची सर्व तयारी झालेली होती. आम्हीही आमचे सर्व बॅनर्स लावले आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. समोर 500 ते 600 विद्यार्थी आणि शिक्षक आमचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आतुरतेने बसले होते. सभोवतालची परिस्थिती पाहून भीतीच निर्माण झाली होती. आधी सर्व नियोजित असताना देखील आम्हाला काहीच सुचेनासे झाले. काहींचे तर पाय थरथरायला लागले. कार्यक्रम रुपरेषेप्रमाणे तर सादर केला; परंतु असलेल्या वेळेचे आणि आमच्यात असलेल्या समन्वयाचे गणित जुळले नाही. बारा वाजता सुरू झालेला कार्यक्रम आम्ही अडीच वाजेपर्यंत ओढत नेला. अशा प्रकारे पहिला कार्यक्रम आम्ही काहीसा गोंधळलेल्या परिस्थितीतच पार पाडला. परंतु आम्हाला हे नक्की कळले की, आपण कुठे आणि कसे कमी पडलोय.

पुढील कार्यक्रम आम्ही अगदी काटेकोरपणे नियोजन करून घेऊ लागलो. सर्वांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनापासून गाणे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक, उद्घाटन, जादूटोणाविरोधी कायदा, चमत्कार प्रात्यक्षिकांचे सादरीकरण, त्याचे स्पष्टीकरण आणि शेवटी अहिंसेचा सामूहिक संकल्प घेणे, असा कार्यक्रम सादर करू लागलो. चुकता-चुकता आम्हाला यातून खूप काही शिकता आले. आमच्या प्रत्येक सादरीकरणात सुधारणा होत गेली. शिक्षक, विद्यार्थी, गावकरी यांच्याशी संवाद करण्याचे कसब आम्हाला अनुभवातून मिळत गेले.

खुडाणे या साक्री तालुक्यातील गावात सावता माळी मंदिरात हरिनाम सप्ताहाची सुरुवात होणार होती. म्हणून येथे कार्यक्रम घ्यावा की नाही, या संभ्रमात पडलो. परंतु या गावातील प्रमोद महाजन व्यक्तीने गावकर्‍यांना आवाहन करून कार्यक्रमास येण्याची विनंती केली आणि पाहता-पाहता 150 ते 200 ग्रामस्थ जमा झाले. कार्यक्रम अतिशय चांगला झाला.

कोठली या गावातील एक लहानसा हॉटेल चालक रमेश पाडवी यांनी, मी पुण्यात असताना डॉक्टरांना भेटलो असल्याचे सांगितले आणि त्यांचे कार्य समाजासाठी खूपच गरजेचे होते, असे तो सांगत होता. आम्ही चहा आणि बिस्किटचे पैसे द्यायला लागलो, तेव्हा त्याने ते घेतले नाहीत आणि ‘अंनिस’मध्ये काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.

अक्कलकुवा येथील माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाने कार्यक्रम घेण्यासंबंधी काहीशी नाराजी व्यक्त केली होती. त्याचे असे म्हणणे होते की, ‘अंनिस’चे कार्य हे एका विशिष्ट धर्माच्या विरोधातच का चालते? परंतु त्याने जेव्हा कार्यक्रम पाहिला, तेव्हा शेवटी तोच आम्हाला म्हणाला की, कार्यक्रम छान झाला. विरोधी विचाराच्या व्यक्तीलाही व्यवस्थित समजावले की, त्याचा विरोध काहीसा नक्कीच कमी होतो, याचा अनुभव आला.

पुढील तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या बहुसंख्य आदिवासी असलेल्या भागातही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या भागात असलेली डाकीण प्रथा, अंगात येण्याचे प्रकार, भगत-मांत्रिकांची बुवाबाजीची प्रकरणे विद्यार्थी आम्हाला सांगत असत. विविध प्रश्न विचारत असत. आपले अनुभव सांगत होते.

पुढे शहादा, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातही अतिशयच चांगला अनुभव आम्हाला आला. विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधता आला. सुलतान येथील आदिवासी आश्रमशाळेत आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्त व त्यांच्या सहकार्‍यांनी ‘अंनिस’च्या उपक्रमाचे कौतुक केले. शिंदखेडा येथील वसतिगृहात पोलीस निरीक्षक भोज व उपनिरीक्षक राजपूत यांनी कार्यक्रमास पूर्ण वेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अंधश्रद्धांपासून व हिंसेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि शेवटी ‘अंनिस’च्या नि:स्वार्थी कामाचे कौतुकही केले.

शेवटी 8 ऑगस्ट रोजी नंदुरबार येथे दोन कार्यक्रम घेण्यात आले. समारोपाचा कार्यक्रम नंदुरबार शहरातील पी. के. पाटील माध्यमिक विद्यालयात घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्य कार्याध्यक्ष अविनाशभाई राज्यसरचिटणीस विनायक सावळे, गोपाळ नेवे, चंद्रवीर सावळे आणि शहादा, नंदुरबारचे कार्यकर्तेउपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आम्ही कार्यक्रम सादर केला. भाईंनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. शहादा शाखेच्या वतीने आम्हाला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आम्हाला मिळालेला हा सन्मान आणि कौतुकाची थाप आमच्यासाठी खूपच आनंददायी आणि प्रेरणादायी होती.

कारण युवा जनसंवाद यात्रेमुळे आम्हा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. स्वत: कार्यक्रम करू शकतो एवढा विश्वास आमच्यात आला आहे. आम्हा कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांना सहकार्य, मदत करण्याची वृत्ती वाढीस लागली. एकमेकांना आपल्यामध्ये क्षमतांची जाणीव झाली. अजून भरपूर वाचन करण्याची गरज आहे, हेही आम्हाला प्रखरपणे जाणवलं.

समाजात आपल्याला इतकी प्रचंड मागणी आणि सन्मान आहे, हे आम्ही प्रथमच अनुभवलं आणि खरंच आपल्या कामाला खूप वाव आहे, वाढायला प्रचंड संधी आहे. आता आपलीच ताकद किती आणि कशी वाढवायची, हेच खरे आव्हान आहे.