Categories
मुलाखत

आपला लढा धर्मकल्पनांशी आहे! – नागनाथ कोत्तापल्ले

वार्षिकांक - २०१७

सुभाष थोरात, राजीव देशपांडे

मराठी साहित्यविश्वात, महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात; किंबहुना एकूणच महाराष्ट्रातील सामाजिक जीवनात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले या व्यक्तिमत्त्वाला एक विशिष्ट स्थान आहे. हे स्थान ते केवळ साहित्यिक आहेत, 86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, प्राध्यापक होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते म्हणून प्राप्त झालेले आहे, असे नव्हे तर इथले जे समाजवास्तव आहे, त्याचे जे बदलते संदर्भ आहेत आणि त्यातून व्यक्तीच्या आणि समाजाच्या जीवनात निर्माण होणारे प्रश्न, ताणतणाव आणि दु:ख आहे, त्याला एक ठाम पुरोगामी वैचारिक भूमिका आपल्या साहित्यातून, आपल्या शैक्षणिक कामांतून घेत भिडत आल्यामुळे प्राप्त झालेले आहे. अशा संवेदनशील मनाला समाजातील अंधश्रद्धा व त्यातून निर्माण होणार्‍या मानवी दु:खाची; विशेषत: तळागाळातील मानवी समूहांच्या दु:खाची, प्रश्नाची जाणीव असणे साहजिकच आहे. त्यामुळे अशा अंधश्रद्धांशी लढणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी त्यांचा निकटचा संबंध असणे, हेही साहजिकच आहे. हा निकटचा संबंध जेव्हाजेव्हा चळवळीने त्यांना हाक दिली, तेव्हातेव्हा त्या हाकेला प्रतिसाद देत त्यांनी दाखवूनही दिला आहे. मग ती जातपंचायत विरोधी परिषद असो, अंनिसने भरविलेले पहिले साहित्य संमेलन असो किंवा अंनिस वार्तापत्राच्या खंडांचा प्रकाशन समारंभ असो; अशा समारंभांना उपस्थित राहत अंनिसच्या चळवळीला पाठिंबा दिला आहे व मार्गदर्शनही केले आहे. अशा या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या, कुलगुरूपद भूषविलेल्या अंनिसच्या पाठीराख्याची ओळख अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाचकांना करून देत आहोत.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच आम्ही त्यांना बालपणासंबंधी, कौटुंबिक पार्श्वभूमी संबंधी विचारले.

माझा जन्म 1948 च्या 23 मार्चला मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे झाला. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. मुदखेड तालुक्यातील बाराहळ्ळी नावाच्या खेडेगावात ते होते. माझे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. त्या गावात एक गढी होती. त्या गढीच्या भिंतीत एका गरोदर बाईचा बळी दिल्याचे बोलले जात असे. तसेच मुदखेडला आमच्या गावी आम्ही ज्या गल्लीत राहायचो, त्या गल्लीचे त्यावेळचे नाव ‘अत्तार’ गल्ली असे होते. आता धर्माभिमान्यांनी त्या गल्लीचे नाव तेथे महादेव मंदिर असल्याने ‘महादेव’ गल्ली असे केले आहे. त्या गल्लीत तीन-चार बायका रात्रीच्या भुंकायच्या, त्या कित्येकदा रात्रभर अगदी लयीत भुंकायच्या. त्यावेळेस मराठवाड्यातील अनेक गावांत स्त्रिया अशा सामुदायिक भुंकण्याचे, ज्याला भानामती म्हणतात, तसे प्रकार अलिकडे -अलिकडेपर्यंत मोठ्या प्रमाणात घडत असत. आता असे प्रकार कमी झाल्यासारखे वाटते. आम्ही मुले लहान असल्याने साहजिकच भीती वाटायची. त्या बायकांत माझी एक आत्याही होती. वडिलांना तिची काळजी वाटायची. त्यामुळे त्यांनी एक मांत्रिकही आणला होता. त्याने चित्रविचित्र, वेगवेगळ्या आकृत्या काढत काही जादूटोण्याचे प्रकारही केले होते. ते सारे उपाय निरुपयोगी ठरले. त्याचप्रमाणे त्यावेळेस हगवणीने वगैरे माणसे मरायची, साथी यायच्या; मग गावाबाहेर गाडे दिसायला लागायचे, देवीचे गाडे म्हटले जायचे त्याला. शाळेच्या मैदानावर असताना एका बाईच्या अंगात आलेले मी पाहिले. तिचे घुमणे पाहत, तिची बडबड ऐकत मी उभा होतो. तेवढ्यात शाळेची घंटा वाजली, आपण जसे बोलता-बोलता शिंक आल्यावर म्हणतो, ‘बघ मी म्हणतो ते खरंच आहे ना?’ तसं ती अंगात आलेली बाई म्हणाली, ‘बघ घंटा वाजली, मी सांगते ते बरोबरच आहे.’ माझ्या मनात आले, अरे देवी अंगात आलेल्या बाईला आपले सांगणे खरं असल्याचे सांगायला घंटेची साक्ष कशाला पाहिजे आणि हिच्या अंगात देवी येऊनही शाळेची घंटा वाजल्याचे सुद्धा हिला कसे समजले? असे प्रश्न माझ्या मनात येऊ लागले. म्हणजे आजूबाजूला असे वातावरण होते, तरी माझ्या मनाला त्या वयातही असे प्रश्न पडत होते. याला एक कारण होते, माझ्या घरी धार्मिक, कर्मकांडी असे फारसे कशाला अजिबातच वातावरण नव्हते. सोवळे-ओवळे असण्याचा तर काहीच प्रश्न नव्हता. माझी आई निरक्षर होती तरी तिला कधीच मी मंदिरात जाताना, देवदेव करताना, वडिलांना कधी पूजा-अर्चा करताना पाहिलेले नव्हते. सण साजरे करताना काहीतरी गोडधोड करणे एवढेच. त्या सणांना चिकटलेली कोणतीही कर्मकांडे नसत. पारंपरिक देवीचे टाक होते; पण त्यांचीही पूजा कधीतरीच होत असे. एकुणात काय, तर मी एका धार्मिक, कर्मकांडी नसलेल्या कुटुंबात वाढत होतो.

या सगळ्या सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमीवर तुमची पुढची वाटचाल

तेच सांगतो. मॅट्रीक झाल्यावर मी देगलूर कॉलेजात शिकायला गेलो. त्या कॉलेजचे प्राचार्य हेमचंद्र धर्माधिकारी हे एक आगळे व्यक्तिमत्त्व होते. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक जरी होते तरी इतिहास, राज्यशास्त्र या विषयातही त्यांना खूप रस होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रचंड मेहनत घेत. वेगवेगळ्या कल्पना राबवत. विद्यार्थी वसतिगृहासाठी ते बाजारातून धान्य मोफत गोळा करत. एक आठवण सांगतो, त्या वेळेस देगलूर कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी रेल्वे पाहिली नव्हती. तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्यांना नांदेडला नेले व रेल्वे दाखवली. आता सहसा असे कोणी करत नाही. त्या काळी विद्यार्थी कमी असल्याने प्राध्यापकांचे वैयक्तिक लक्ष असे. मी राज्यशास्त्र शिकण्यासाठी जवळजवळ वर्षभर त्यांच्या घरी जात असे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा फार मोठा प्रभाव माझ्यावर पडला. धर्माधिकारी सरांच्या प्रभावामुळे आम्हाला नीट विचार करण्याची सवय निर्माण झाली. पुढे ‘विचार शलाका’ नावाचे तत्त्वज्ञानावरचे मासिक चालविणारे प्रा. नागोराव कुंभार, पुणे विद्यापीठातील प्रा. नेवलीकर यांच्यासारखे त्यांचे अनेक विद्यार्थी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नावारूपाला आले. त्याच सुमारास बाबा आमट्यांच्या ‘आनंदवना’त श्रमसंस्कार शिबिरे चालू झाली होती. धर्माधिकारी सरांनी आम्हा काही विद्यार्थ्यांना तेथे पाठवले. सोमनाथचे पहिले किंवा दुसरे श्रमसंस्कार शिबीर असेल ते. जवळजवळ पंधरा दिवस आम्ही तेथे होतो. त्यावेळेस कुमार सप्तर्षी आल्याचे मला आठवते. पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर यांना मी तेथे प्रथम पहिले. त्या श्रमसंस्कार शिबिराचा माझ्यात बदल घडविण्यात चांगलाच वाटा आहे. तेथील वातावरण, ऐकलेली भाषणे यांचा खूपच प्रभाव माझ्यावर पडला.

कॉलेजच्या काळात तुमचे वाचन वगैरे काय असायचे?

देगलूरसारख्या ठिकाणी धर्माधिकारी सरांनी कॉलेजचे ग्रंथालय अतिशय अद्ययावत, समृद्ध केले होते. अनेक तत्त्वज्ञांची मुख्यत: अस्तित्ववादावरची पुस्तके ते आम्हास वाचायला देत. पण माझा ओढा प्रथमपासूनच वाङ्मयाकडे जास्त असल्याने फार मन लावून काही त्या पुस्तकांचे माझे वाचन झाले नाही. मुख्यत: हिंदी, मराठीचे वाचन; पण मी इंग्रजीही त्यावेळी बर्‍यापैकी वाचत असे; पण वाङ्मयीन वाचनावरच सारा भर असे. माझे वडील खेड्यात प्राथमिक शिक्षक होते, त्यावेळच्या प्रथेप्रमाणे ते पोस्टाचे कामही बघत. त्यामुळे आमच्या घरात चुकीच्या पत्त्यावर पाठवलेली अनेक मासिके वगैरे येत. ती मी आवडीने वाचत असे. तसेच ‘चांदोबा’ वगैरे लहान मुलांची मासिकेही वाचत असे. मुदखेडला आल्यावर तर माझे वाचन खूपच वाढले. तेथील हुतात्मा माधव वाचनालयात माझी रोजची फेरी असे. माझ्या वडिलांना मी कॉमर्सला जावे असेच वाटत होते. कारण पुढे बँकेतील नोकरी मिळणे सोपे जाईल म्हणून; पण मला प्राध्यापक व्हावे वगैरे वाटत असल्याने व मला वाङ्मयात गोडी असल्यानेच मी जाणीवपूर्वक महाविद्यालयात कला शाखा निवडली होती. 1971 ला मी एम. ए. झालो, मराठवाड्यात तिसरा आणि मराठी विषयात पहिला आलो होतो आणि बीडला केशरबाई क्षीरसागर यांच्या संस्थेत प्राध्यापक म्हणून रुजू झालो.

बीडला सुरू झालेल्या प्राध्यापकाच्या भूमिकेपासून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठापर्यंतच्या प्रवासाचा आलेख तुम्ही कसा रेखाटाल?

1970 ते 80 च्या दशकात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कॉलेजेस उघडली जात होती, ही प्रक्रिया साधारण 1965 पासूनच सुरू झाली होती. त्यावेळेस बीडला एकदम दोन कॉलेजेस निघाली. त्यापैकी एक केशरबाई क्षीरसागर यांचे होते. त्या वेळेस त्या पंचायत समितीच्या सभासद होत्या. त्यांचे फारसे शिक्षणही झाले नव्हते; पण आपल्या कॉलेजात चांगले शिक्षक यावेत म्हणून त्या विद्यापीठातील हुशार विद्यार्थ्यांची स्वत: माहिती घेत. त्यांना कोणीतरी मराठीसाठी माझे नाव सुचविले, माझा त्यावेळेस निकालही लागला नव्हता; पण त्या आधीच त्यांनी मला नेमणुकीचे पत्रही देऊन टाकले. तेथे मी वर्षभरच होतो. तेथून मी बीडच्याच व्यंकटस्वामी महाविद्यालयात आलो. तेथे माझे लग्न जमले. माझ्या पत्नीही त्याच कॉलेजात इतिहासाच्या प्राध्यापक होत्या. आमचा आंतरजातीय विवाह. प्रथम दोन्हीकडच्यांचा विरोध होताच; पण पुढे तो मावळला. दोन्ही कुटुंबांचे संबंध इतके चांगले जमले की, त्यामुळे आम्हाला कधीच वाटले नाही की, आमचा विवाह आंतरजातीय झालेला आहे. हा आमचा विवाह औरंगाबादला आर्य समाजीय पद्धतीने झाला.

आर्यसमाजी पद्धतीने करण्यात काही विशिष्ट कारण……

आर्य समाजी लोक आंतरजातीय लग्ने लावतात, त्यांच्याकडे जात वगैरे काही नसते, असे आम्हाला कोणीतरी सुचविले, मग यज्ञ वगैरे करत आमचे लग्न झाले; मग बीडमधील पुढील दोन वर्षे व्यवस्थित गेल्यानंतर 1974 पासून तेथील व्यवस्थापन आणि प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्यामुळे मोर्चे, आंदोलने सुरू झाली. अस्थिरता निर्माण झाली. पगार मिळेना. पोलीस स्टेशनला चकरा मारणे, अटक झालेल्यांना सोडवणे वगैरे चालू झाले. याच सुमारास महाराष्ट्रातील इतर अनेक ठिकाणच्या कॉलेजात असा संघर्ष सुरू झाल्याचे दिसते. शिक्षण क्षेत्रात अपप्रवृत्तींचा शिरकाव होण्यास येथूनच सुरुवात झाली. या अपप्रवृत्ती केवळ व्यवस्थापनातच होत्या असे नव्हे, तर शिक्षकही अशा प्रवृत्तींचे बळी होत होते. तीन वर्षे अशाच अस्थिर वातावरणात गेली आणि मग मला औरंगाबादला विद्याापीठात नोकरी मिळाली. शिकण्यासाठी मी विद्यापीठात होतोच; आता शिकविण्यासाठी रुजू झालो. माझ्या पत्नी मात्र बीडलाच राहिल्या. जवळजवळ 18 वर्षे मी औरंगाबाद – बीड जाऊन-येऊन केले. त्यावेळच्या औरंगाबाद विद्यापीठात अनेक चांगले प्राध्यापक होते. तेथे प्रसिद्ध विचारवंत मोईन शाकीर, रशियन भाषेचे भटनागर, प्रा. डॉ. ज. रा. शिंदे आणि मी असा आमचा चार जणांचा एक चांगला ग्रुप तयार झाला. त्यातील ज. रा. शिंदे हे आता नाहीत. धर्माधिकारी सरांनंतर माझ्या साहित्यिक, सामाजिक जाणिवांना वेगळीच; विशेषत: डावी दिशा देण्यात या तिघांच्या सहवासाचा वाटा फार मोठा आहे. त्यातही माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीचे संबंध निर्माण झाले मोईन शाकीर यांच्याशी. या आधीही धर्म या गोष्टींशी माझा फारसा संबंध नव्हताच; पण शाकीरांशी संबंध आल्यावर या सगळ्या बाबतीतील विचारात नेमकेपणा आला.

त्या काळातील औरंगाबाद येथील त्या सगळ्या वातावरणाचा परिणाम तुमच्या लिखाणावर कसा झाला?

औरंगाबादच्या या 18-20 वर्षांच्या वास्तव्याचे बरेच परिणाम माझ्या लिखाणावर झाले. बीडमधील त्या सगळ्या उलथापालथीच्या काळात माझे लिखाण चालूच होते; पण तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला की, त्याचा परिणाम एकूणच तुमच्या लिखाणावर होतो; विशेषत: कविता लिहिणे अवघड जाते. माझे कवितालेखन थांबले. आता अगदी अलिकडे मी पुन्हा कवितालेखन करू लागलो आहे. बीडमधील माझे लिखाण एकप्रकारे ज्याला ‘सिनिकल’ म्हणता येईल, असे होते. ते लिखाण आता वास्तववादी बनू लागले. पण माझे लिखाण संथगतीने का होईना चालूच राहिले; पण इरेला पडून लिहिणे असे माझे कधीच नव्हते. आपल्याला जे वाटते ते हळूहळू लिहीत जावे, असेच मला वाटते. मी एम.ए. ला असताना आम्हाला विद्यापीठाची 60 रुपयांची शिष्यवृत्ती मिळत असे; पण त्यात काहीच भागत नसे. त्यामुळे वा. ल. कुलकर्णी सरांनी मला मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात अर्धवेळची नोकरी दिली. म्हणजे त्यावेळेपासून मराठवाडा साहित्य परिषदेशी माझे अगदी जवळिकीचे वैयक्तिक संबंध निर्माण झाले. त्या काळात तेथे सुधीर रसाळ, वसंत आबाजी डहाके, भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर यांचे सतत येणे-जाणे असे. तेव्हा या लोकांशी तेथे माझा संबंध आला. त्याचाही परिणाम माझ्या पुढील साहित्यिक वाटचालीवर झाला. साहित्य परिषदेचे ‘प्रतिष्ठान’ नावाचे नियतकालिक निघत असे, आजही ते निघते. त्यात माझ्या कथा, कविता येत असत. पुढे मी त्या मासिकाचा संपादकही होतो. त्या निमित्ताने माझा मराठवाड्यातील नवोदित लेखक, कवींशी चांगलाच संपर्क आला. 1977-78 मध्ये आम्ही तरुण मंडळींनी ‘मराठवाडा साहित्य परिषदे’वर तिच्या स्थापनेपासून असलेली अनंत भालेरावांची सत्ता उलथवून टाकली. त्यावेळेस महाराष्ट्रभरच्या साहित्यवर्तुळात चांगलीच खळबळ माजली होती. हे सर्व चालू असताना माझे लिखाणही त्या काळात चालूच होते. चार-पाच कथासंग्रह प्रकाशित झाले, ‘द्वंद्व’ हा कवितासंग्रहही याच काळात आला. माझ्या तीन कादंबर्‍याही याच काळात प्रकाशित झाल्या.

तुमचे शिकवणे, तुमचे लिखाण, या साहित्यिक चळवळी, नव्या तरुण साहित्यिकांशी येत असलेला संबंध, विचारवंत, लेखक, कवी यांच्याबरोबरचा सहवास, प्रस्थापितांशी होत असलेला संघर्ष यातून तुमची एक लेखक म्हणून भूमिका तयार होत होती, साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बनत होता, तो काय होता?

लेखकाचा दृष्टिकोन तो काय लिहितो, यातूनच व्यक्त होत असतो. कोणती दृष्टी घेऊन जीवनाचे अन्वेषण करतो, त्यातून तो व्यक्त होतो. मला वाटते, लेखक नुसते पाहतो आणि तटस्थपणे लिहून काढतो, असे असत नाही किंवा असे असणे उपयोगाचे नाही. लेखक म्हणजे काही कॅमेरा नाही. लेखक जीवनाच्या प्रक्रियेत सहभागी असतो आणि त्याची एक जीवनदृष्टी बनते व त्याच्या लिखाणातून ती प्रतिबिंबित होत असते. मला वाटते, चांगले लेखक हे एक बाजू घेऊनच लिहीत असतात आणि तसे असावे असेच मला वाटते. याचा अर्थ दुसरी बाजू समजून घेऊ नये, असे नाही. प्रत्येक लेखकाचे जीवनाबद्दलचे एक संकल्पनाचित्र असते आणि प्रत्यक्षात एक वास्तव असते. या संकल्पनाचित्रात आणि वास्तवात ताण निर्माण झाला की, तो ताण सोडविण्याचा तो कसा प्रयत्न करतो, कोणती मूल्यव्यवस्था तो मानतो, कोणत्या बाजूने उभा राहतो, या चौकटीतून याकडे बघायला हवे. मला स्वत:ला असे वाटते, हे ताण सोडविताना जो समाजातील शोषित, पीडित, दलित आहे, अन्यायग्रस्त आहे, त्याच्याबाजूने त्याची सहानुभूती असायला हवी आणि तशी सहानभूती माझ्या लिखाणातून व्यक्त होते, असे मला वाटते.

या तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला भावलेले अथवा तुमच्यावर प्रभाव टाकणारे जागतिक अथवा भारतातील विविध भाषांतील कवी, कथालेखक, कादंबरीकार असे कोण आहेत?

तसा अमूक एका लेखकाचा प्रभाव माझ्यावर आहे असे मी म्हणणार नाही; किंबहुना असा प्रभाव नाहीच; पण माझ्या जडणघडणीत, माझ्या वाटचालीत ज्यांचा वाटा आहे, असे मुख्यत: मुन्शी प्रेमचंद, मन्नू भंडारी, कमलेश्वर असे अनेक हिंदी लेखक आहेत. मराठीत अशा तोडीचे लेखक फारसे नाहीत. त्यामुळे मला आवडलेल्या उद्धव शेळके यांची ‘धग’, मनोहर तेल्हार यांची ‘माणूस’, गोदावरी परूळेकरांचे ‘जेव्हा माणूस जागा होतो’, वि. वा. हडपांच्या कादंबर्‍या, मर्ढेकर, मुक्तिबोध, अरुण कोलटकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ यांच्या कविता अशांच्या कलाकृतीचा उल्लेख मी करेन.

या पार्श्वभूमीवर तुमच्या लिखाणाकडे तुम्ही कसे पाहता?

मी तीन कादंबर्‍या लिहिल्या. त्यापैकी गांधारीचे डोळे, मध्यरात्र या दोन कादंबर्‍यांबद्दल मी सांगतो. मध्यरात्र ही कादंबरी बदलते खेडे आणि 1951 नंतर चालू झालेले निवडणुकीचे राजकारण; विशेषत: ग्रामीण भागातील या संदर्भातील चित्रण करते; मग या राजकारणापायी दलितांच्या वस्त्या जाळणे, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे या घटना घडत होत्या. गेवराई तालुक्यातील कोळेगाव येथील भिल्ल वस्तीवर हल्ला झाला आणि ती जाळून टाकण्यात आली, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. हा सामाजिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय हा गावाचा सामूहिक असतो. बाहेरच्या माणसाला त्याची जाणीव होणे फारच अवघड असते. बाहेरून सर्व आलबेल वाटते. बहिष्कार टाकलेल्यांना जीवन असह्य होऊन जाते. हे सर्व मी प्रत्यक्ष त्या गावात जाऊन अनुभवले. त्या अनुभवावर मी ‘मध्यरात्र’मध्ये सरंजामदारी परंपरा आणि गावातील सर्वसामान्य लोक यांचा एक संघर्ष चितारला आणि मग हा संघर्ष जातीय रूप कसा धारण करतो, हे दाखवले. सामाजिक बहिष्काराला केंद्रस्थानी ठेवून 1985 मध्ये लिहिलेली ही कादंबरी सामाजिक बहिष्कारावरील कदाचित मराठीतील एकमेव असावी. दुसरे मला हे जाणवले की, स्वातंत्र्यानंतर आपण एक आदर्श व्यवस्था म्हणून लोकशाहीचा स्वीकार केला; पण ही लोकशाही पळविली, हितसंबंधियांनी आणि पैसेवाल्यांनी. तिला अक्षरश: बाजारू रूप दिले. परिणामत: आपल्या समाजात जातीने आधीच मर्यादित केलेल्या संवेदनशीलतेला संपत्ती, चैनबाजी यांनी आणखीच अध:पतीत केले. बंधुता, समानता, स्वातंत्र, मानवता केवळ नावापुरती उरली. भारतीय समाजमन स्वयंकेंद्रित, बधीर बनले. या पार्श्वभूमीवर माझ्या ‘गांधारीचे डोळे’ या कादंबरीचा नायक हिजडा आहे आणि पौरुषविहीन होत चाललेल्या समाजाचे प्रतीक आहे. तो निवडणुकीला उभा राहतो आणि त्याच्यामागे त्याला मोठे करणारे हे सारे व्यापारी, धंदेवाले पैशाच्या थैल्या घेऊन कसे उभे राहतात, याचे चित्रण यात मी केले आहे. या दोन कादंबर्‍या माझी सामाजिक जाणिवा व्यक्त करणार्‍या आहेत, असे मला वाटते. मी फार लिहिणारा लेखक नाही. गेली चाळीस वर्षे मी कथा लिहीत आहे; पण जास्तीत जास्त 100 कथा लिहिल्या आहेत. या कथांत आपल्या भोवतीचे कठोर वास्तव, सरंजामी परंपरा आणि आधुनिक मूल्ये यातील संघर्ष, सनातन मानवी वृत्ती-प्रवृत्ती आणि लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष उच्च मूल्ये यांच्यातील संघर्ष अशी अनेक सूत्रे त्यातून तुम्हाला सापडतील. माझी ‘वारसा’ ही कथा ग्रामीण भागातील गंगा-जमुना संस्कृतीसंदर्भात आहे. या कथेतील मुसलमान मुल्ला वारकरी आहे. त्याचे वारकरी असणे, हे काही काल्पनिक नाही, ती आजही वस्तुस्थिती आहे; पण आताच्या वातावरणात हा वारकरी वारसा जपताना त्याला कसा संघर्ष करावा लागतो व तो संघर्ष करून तो या गंगा-जमुना संस्कृतीला कसे अबाधित ठेवतो, याचे चित्रण केले आहे. ‘राजधानी’ ही कथा ग्रामीण भागातील गटारे, उकिरडा, हागणदारी या अस्वच्छतेचे वर्णन करता-करता लोकांच्या मनातील जातीय, सरंजामदारी प्रवृत्तीचे दर्शनही घडविते. लोकांच्या मनात आजही या अस्वच्छतेबरोबर ती डोक्यातील अस्वच्छता अबाधित आहे. तसेच ‘सावित्रीचा निर्णय’ या कथेत गुंगीचे औषध देऊन सती जाण्याला भाग पाडले जाते; पण चितेवर ती गुंगीतून जागी होते आणि चितेवरून निसटते. हे चितेवरून पळून जाणे हा सावित्रीचा निर्णय. यात तिला गुंगी आणणारे औषध आहे धर्माचे, रूढी, परंपरांचे. ती गुंगी उतरल्यावर तिला भान येते. ‘वाळवी’ ही कथाही अशाच आशयाची. एकदा ग्रंथालयाला वाळवी लागली की ती थांबत नाही; तसेच बुद्धीला वाळवी लागली की थांबवणे अवघड. आताही माझा नवा कथासंग्रह लोकवाङ्मय काढत आहे, त्यातही मी आजच्या प्रश्नांना स्पर्श करणार्‍या कथा लिहिल्या आहेत. माझे लिखाण वेगवेगळ्या पातळीवर एकाच वेळी चालू असते. ललित लिखाणाबरोबर समीक्षात्मक, वैचारिक लिखाण चालूच असते. ‘ज्योतिपर्व’ नावाचे ज्योतिबांच्या वरील पुस्तकही मी लिहिले आहे.

आजच्या अंधश्रद्धांच्या स्वरुपाविषयी तुम्हाला काय वाटते?

आपण सुरुवातीलाच माझ्या लहानपणीच्या वातावरणातील अंधश्रद्धांबद्दल बोललो आहोत. त्या अंधश्रद्धांचे स्वरूप अज्ञान, असुविधा यावर आधारित होते; पण आज अंधश्रद्धांचे तेच स्वरूप राहिलेले नाही. सर्वच नाहीत; पण बर्‍याच अंशी लोकांपर्यंत शिक्षण पोचले आहे, विज्ञान पोचले आहे, विज्ञानाने निर्माण केलेल्या सुविधा पोचल्या आहेत. त्यामुळे विज्ञानावर म्हणता येणार नाही; पण त्या सुविधांच्या उपयुक्ततेवर विश्वास बसत आहे. पूर्वी साथीचे रोग आल्यावर लक्ष्मीचा गाडा वेशीबाहेर सोडला जायचा, रोग गावाबाहेर गेले, अशी समजूत असायची. ही गोष्ट मधल्या काळात दिसून येत नव्हती; पण अलिकडे हायवेवरून जाताना गावाबाहेर असे गाडे दिसून येत आहेत. मी अशा गाडे सोडणार्‍या तरुणांना विचारले, तेव्हा त्यांच्याकडून कळले त्या भागातले जे आमदार आहेत ते असे गाडे सोडण्यासाठी सांगतात, पैसे पुरवतात. गणपती, नवरात्र, होळी, गोविंदा वगैरेसारखे मोठमोठे सण समारंभ साजरे करण्यासाठी या तरुणांचा उपयोग करून घेतात. बेकार तरुणांचा फौजफाटा यासाठी या लोकांना आयताच मिळतो. जागतिकीकरणाच्या धोरणांतून उद्भवलेल्या अस्थिर, अनिश्चित परिस्थितीतून याला सुरुवात झाली, आता तर गेल्या पाच-सहा वर्षांत याला राजाश्रयही मिळाला आहे. राजकारणी-धनदांडगे आणि धर्मांध यांचे हितसंबंध अंधश्रद्धा जोपासण्यात गुंतले असल्याने त्यांच्या युतीने या बुवा-बाबांना प्रतिष्ठा, संपत्ती, सत्ता प्राप्त करून दिली आहे. या बुवा-बाबांची कॉर्पोरेट साम्राज्ये उभी राहात आहेत. यात धार्मिकता, आध्यात्मिकता काहीच नाही किंवा हा धर्मच नाही तर धर्माच्या नावावर चाललेली लूट आहे, आणि या लुटीला डॉ. दाभोलकरांनी केलेल्या विरोधामुळेच या राजकारणी-धनदांडगे-धर्मांध यांच्या युतीनेच त्यांचा खून केला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीबद्दल तुम्ही काय सांगाल?

आज चळवळीपुढे मुख्य मुद्दा आहे, लोकांना कसं समजावयाचं? कारण भारतीय माणूस जरा जास्तच परंपरावादी आहे. एखादे मंदिर बांधण्यापेक्षा शाळा बांधली पाहिजे, ही भावनाच नसते. एकीकडे आपण मंगळावर जातो, आपण महासत्ता होणार, अशी स्वप्नं रंगवायची आणि दुसरीकडे जातपंचायती महत्त्वाच्या आहेत, असे म्हणायचे. यात काही अंतर्विरोध आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्यात स्पर्धा, बेकारी, अस्थिरता, जातीयता हे मुद्दे आहेतच. त्यामुळे लोकांना साहजिकच धर्माचा आधार वाटत आहे; परिणामी देव, धर्म याबद्दल लोक खूपच संवेदनशील होत आहेत. त्याचा गैरफायदा हे सर्व दलाल घेत आहेत. या दलालांत आजचे शासनही आहे. त्यांना ना घटना मान्य आहे, ना आधुनिक मूल्ये, ना लोकशाही मान्य आहे. त्यांना फक्त परंपरा मान्य आहेत. कारण त्यात त्यांचे फायदे आहेत. आज मंदिरांचे उत्पन्न पाहा, ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन हा लढा दीर्घ पल्ल्याचा आहे. कारण अंतिमत: आपला लढा धर्मकल्पनांशी आहे म्हणून धर्म कर्मकांडाशी नाही, तर नैतिक, न्याय्य मूल्यांशी निगडित आहे हे सांगत राहिले पाहिजे. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर चळवळ थंडावली नाही; उलट जादूटोणाविरोधी आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा मंजूर करण्यास चळवळीने सरकारला भाग पाडले, ही खुन्यांना मिळालेली चपराकच होती. डॉ. दाभोलकरांनी सुरू केलेले सर्व उपक्रम, त्यात आणखी भर घालत कार्यकर्ते जोमाने पार पडताना मी बघत आहेच. मी जरी प्रत्यक्ष संघटनेत नसलो, तरी पाठीराखा म्हणून अंनिसच्या मागे ठामपणे उभा आहे.