जंगल संपत्ती व खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या आफ्रिकी देशांना वसाहतवादी देशांनी मनसोक्त लुटले. त्या देशातील जनतेला धर्म, टोळ्या अंधश्रद्धा यांच्या विळख्यात जखडून मागास ठेवले व गेली अनेक दशके सतत आपआपसात झुंजत ठेवले. या गृहयुद्धाचे सर्वात भीषण परिणाम आफ्रिकेतील लहान मुलांवर झाले. ही लाखोच्या संख्येतील मुले अक्षरशः देशोधडीला लागली. त्यांच्या भीषण दुःखाची कहाणी सांगत आहेत डॉ. प्रगती पाटील.
- सुदानची धडपडणारी मुले
इतिहास

सत्ताधिशांच्या निर्दयी युद्धात सर्वाधिक होरपळली जातात ती लहान मुले. अनेक दशकांपासून आफ्रिकेत सुरू असलेल्या गृहयुद्धात अक्षरशः लाखो मुलांचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्यावर आधारित the good lie’ हा चित्रपट जेव्हा बघितला, तेव्हाची उद्विग्नता शब्दातीत होती. तनमनास बधीर करणारी उद्विग्नता…त्यानंतर इंटरनेटवर ‘आफ्रिकेतील गृहयुध्द’ या विषयावर सर्च केले असता जे दुःखद सत्य समोर आले, ते अविश्वसनीय होते. लाखो मुलांनी इतक्या लहान वयात इतके सोसल्याचे उदाहरण जगाच्या पाठीवर दुसरे कुठलेच नसेल. सुदानच्या या धडपडणार्या मुलांबद्दल मला आता लिहायचेय…
सुरुवात कुठून करावी, तेच कळत नाहीये इतक्या वेदना मनात आहेत. इतिहासापासूनच करूया. आफ्रिका खंडात सुदान हा एक चिमुकला, मागासलेला देश. येथील बहुसंख्य लोक हे आदिवासी, निसर्गाच्या सान्निध्यात जगणारे animist निसर्गपूजक लोक. ब्रिटीश येण्यापूर्वी एक देश म्हणून सुदानच्या कुठल्याही सीमारेषा अस्तित्वात नव्हत्या. सुदानच्या उत्तरेकडील भागात इस्लाम धर्माचा प्रसार झाला. दक्षिणेकडील भागात ख्रिस्ती मिशनरी आले. जगात सर्वत्र मिशनरी लोकांचा सेवाभाव हा कधीही निरपेक्ष नव्हता. ते जेथे गेले, तेथे त्यांनी लोकोपयोगी कामांसोबत धर्मप्रसारही केला. त्यामुळे दक्षिण सुदानची बहुसंख्य जनता ख्रिश्चन बनली. अर्थात, त्यामुळे त्यांचे जीवनमान युरोपियन लोकांप्रमाणे सुधारले असे नव्हे. फक्त मूठभर लोक इंग्लिश शिकून सुशिक्षित झाले. बहुसंख्य लोक नाममात्र शिक्षण, आरोग्यसेवा असलेल्या जंगलात हातात बायबल घेऊन गरिबीचे जीवन जगत राहिले. ही परिस्थिती फक्त सुदानची नव्हे, तर आफ्रिकेतील अनेक देशांची आहे.
1956 साली बिटिशांनी सुदानला स्वातंत्र्य दिले आणि संघर्षाची सुरुवात झाली. ’धर्म’ आणि ’अर्थ’ ही जगातील बहुसंख्य युद्धांच्या मुळाशी असणारी कारणे सुदानच्या गृहयुद्धाच्या मुळाशी होती. स्वातंत्र्य देताना मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांचे वेगवेगळे देश बनविण्यापेक्षा त्यांना एकसंध करून ब्रिटिशांनी काय साधले ते अनाकलनीय आहे. धार्मिकदृष्ट्या अलग, एकात्मतेची भावना कधीही मनात नसणारे दोन वेगळे जनसमूह एक देश म्हणून एकत्र राहूच शकत नव्हते. स्वातंत्र्य मिळताच संघर्ष सुरू झाला. मध्यवर्ती सरकारमध्ये उत्तरेकडील मुस्लिमांचे वर्चस्व होते. त्यांनी देशात ‘शरीयत’चे कायदे लागू केले. दक्षिणेतील मूठभर सुशिक्षित लोकांना ते अमान्य होते. सुदानच्या वाळवंटात खनिज तेलाची संपत्ती आहे. त्यातील 75 टक्के तेलसाठे दक्षिणेत होते. उत्तरेकडील लोक त्यावरही वर्चस्व स्थापित करण्याचे प्रयत्न करत होते. दक्षिणेकडील लोकांनी विरोध केला अन पहिले गृहयुद्ध सुरू झाले. 1955-56 मध्ये सुरू झालेले पहिले गृहयुध्द 1972 पर्यंत चालले. सुदान (उत्तर) सरकारला रशियाने मदत केली आणि दक्षिणेतील बंडखोरांना शेजारच्या युगांडा, इथियोपिया या देशांनी मदत केली. चीन, अमेरिका, जर्मनी यांनी सुदानला शस्त्रास्त्रे पुरविली. ती शस्त्रे करत असलेल्या संहाराशी त्यांचे काहीच घेणेदेणे नव्हते. 17 वर्षांच्या कालावधीत झालेल्या या गृहयुद्धात एक लाख सैनिक आणि चार लाख नागरिक मारले गेले. लाखो लोक बेघर झाले. काही काळ तात्पुरती शस्त्रसंधी झाली; पण आपल्यावर अन्याय होतोय, ही भावना दक्षिणेकडील लोकांच्या मनात कायम होती. परिणामी 1983 मध्ये दुसर्या गृहयुद्धास सुरुवात झाली जे 2005 पर्यंत सुरू होते…
22 वर्षांच्या या युद्धात जवळपास वीस लाख लोक ठार झाले. दक्षिण सुदानमधील लोकांच्या उपजीविकेची मुख्य साधने होती शेती अन् पशुपालन. युद्धात उत्तरेकडील सरकारी सैनिकांनी वारंवार दक्षिणेतील खेड्यांमध्ये धाडी घालून शेतातील पिके उद्ध्वस्त केली, जनावरे पळविली आणि जवळपास दोन लाख माणसांना (बायका मुलांसकट) गुलाम म्हणून नेले. तरीही यातून काही मुले वाचली. गावाजवळील जंगलात गुरे चारायला न्यायची जबाबदारी लहान मुलांवर होती. सैनिकांनी गावावर हल्ला केला असताना जी लहान मुले गावाबाहेर गुरे चारावयास गेली होती, ती वाचली. गावातील जाणत्या माणसांनी मुलांना अगोदरच सांगितले होते – ‘जर कधी गावात सैनिक आले आणि आम्ही मारले गेलो, तर तुम्ही केनिया किंवा इथियोपियातील निर्वासित छावणीत जा.’ सर्वस्व गमावलेल्या या अनाथ मुलांना हजारो मैल दूर असलेल्या निर्वासित छावणीत कुणा मोठ्या, जाणत्या माणसाच्या मदतीशिवाय, दळणवळणाच्या कुठल्याही साधनाशिवाय पायीच जायचे होते. अनेक लहानमोठ्या गावातील जवळपास 50 हजार मुलांनी लहानमोठ्या गटात हा जीवघेणा प्रवास केला. हा प्रवास त्यांनी कसा केला, कोणकोणत्या भयंकर संकटांना तोंड दिले, कितीजणांनी या अग्निदिव्यात प्राण गमावले, किती वाचले याची माहिती पुढील लेखात…
2. बालसैनिक आणि कठीण प्रवास

22 वर्षे चाललेल्या सुदानच्या दुसर्या गृहयुद्धात 20 लाख लोक ठार झाले आणि तितकेच बेघर झाले. दोन लाख गुलाम झाले. बेघर झालेले लोक परिवारासोबत निर्वासित छावणीकडे निघाले. पण ज्यांना साथसोबत करायला कुणीही जाणता माणूस नाही, अशी अनेक गावांमधील जवळपास 50 हजार मुले लहानमोठे गट करून केनिया किंवा इथियोपियाच्या दिशेने निघाली.
या धडपडणार्या मुलांमध्ये फक्त अनाथ मुलेच नव्हती. काही मुले अशीही होती, जी दोन्ही बाजूंच्या (सरकार आणि बंडखोर SPLA-sudan people’s liberation army) सैनिकांकडून ’बालसैनिक’ म्हणून युद्धात वापरली गेली होती. 18 वर्षांखालील सैनिकास ‘बालसैनिक’ असे म्हणतात. सुदानच्या गृहयुद्धात आठ-दहा वर्षांच्या मुलांनाही ‘बालसैनिक’ म्हणून दोन्ही बाजूंकडून वापरण्यात आले. (जवळपास सर्वच आफ्रिकी देशांतील गृहयुद्धात बालसैनिक वापरण्यात आले. blood diamond `m sierra leone च्या गृहयुद्धावर आधारित प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटात बालसैनिकांचे brainwashing कसे करतात, ते दाखविले आहे.) सुदानच्या गृहयुद्धात 17 हजार बालसैनिक होते. ज्या दोन लाख लोकांना गुलाम म्हणून पळवून आणले होते त्यातील बालकांना सरकारने जबरदस्तीने सैन्यात भरती केले. काही सरकारनिष्ठ भोळ्याभाबड्या पालकांनी स्वतःच मुलांना सरकारला सोपविले होते. युद्धात आपले काही बरेवाईट झाले, तर निदान सरकार आपल्या मुलांना अन्न, शिक्षण आणि आरोग्यसेवा पुरवेल या वेड्या आशेने. सरकारनेही शाळा चालविण्याच्या नावाखाली शाळेच्याच इमारतीत बालसैनिकांना प्रशिक्षण दिले. संयुक्त राष्ट्रसंघाचे (UN) प्रतिनिधी जेव्हा सुदानमध्ये पोचले, तेव्हा ही लष्करी प्रशिक्षण केंद्रे म्हणजे मुलांच्या शाळा आहेत असे त्यांना भासविण्यात आले. (युद्धात विजय मिळविण्यासाठी लोक क्रूरता आणि दांभिकतेच्या सर्व सीमा पार करतात, याचे हे उत्तम उदाहरण!) या प्रशिक्षण केंद्रात मुलांच्या डोक्यात धार्मिक विद्वेष ठासून भरून त्यांचे brainwashing करण्यात आले. त्यांच्या चिमुकल्या हातात AK-47 देण्यात आल्या. काही मुलांना प्रत्यक्ष युद्धात सैनिक म्हणून वापरले, तर काहींना हेरगिरी करण्यासाठी. भूसुरुंग शोधण्यासाठी काहींचा वापर झाला. (भूसुरुंगप्रवण क्षेत्रात लहान मुलांना पुढे करायचे. त्या बालसैनिकाचा पाय भूसुरुंगावर पडल्यास तो मरेल अथवा जखमी होईल; परंतु मागचा वयस्क, अधिक संहारकक्षमता असलेला सैनिक वाचेल, अशी यामागील भूमिका.) आत्मघाती हल्ल्यातही बालसैनिकांचा वापर झाला. (आत्मघाती हल्ल्यात हल्ला करणाराही मरतो. खर्या वयस्क सैनिकांना गमाविण्यापेक्षा बालसैनिकांना गमाविणे उपयुक्त, ही यामागील भूमिका, जेणेकरून मोठ्या युद्धात वयस्क सैनिक उपलब्ध राहतील). प्रत्यक्ष युद्धात जे बालसैनिक लढले, त्यापैकी अनेक गंभीर जखमी झाले, मारले गेले, अनेकांनी आपल्या छोट्या सहकार्यांना मरताना बघितले अन् त्या वेदना सहन करीत ते जगत राहिले. यापैकी काही बालके त्या छळवादापासून पळून जाण्यात यशस्वी ठरली आणि निर्वासितांच्या छावणीकडे निघाली. सुदानच्या धडपडणार्या मुलांमध्ये या बालसैनिकांचाही समावेश होता…
हजारो मैलांचा प्रवास करण्यासाठी काही गटांना चार-सहा महिने, तर काहींना दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागला. प्रत्येक गटाचा एक गटप्रमुख (group leader) असे. हा गटप्रमुख त्यांच्यात वयाने सर्वांत मोठा असा 14 – 15 वर्षांचा मुलगा असे. काही गटातील मुले इतकी लहान असत की त्यांचा गटप्रमुख 10 – 12 वर्षांचा मुलगा असे. (ती चिमुकली पावले इतके अंतर कसे चालले असतील!) इतक्या प्रदीर्घ प्रवासासाठी पाठीवर, डोक्यावर घेतलेल्या दोन-चार कापडांव्यतिरिक्त त्या मुलांजवळ काहीच नसे. जंगलात शिकार करून ते अन्न मिळवीत असत. प्रवासादरम्यान मनुष्यवस्ती असलेले एखादे खेडेगाव दिसायचे. तेथील लोकांना विनंती केल्यावर या मुलांना तात्पुरता निवारा, अन्न आणि औषधोपचार मिळायचे; पण त्यातही धोका असायचा. गावातील कुणी आगळीक केली तर सरकार अथवा बंडखोर SPLA कडून मुलांचे अपहरण होण्याचा धोका होता. (धडपडणार्या मुलांपैकी जवळपास 1200 मुलांचे अशाप्रकारे अपहरण करून त्यांना बालसैनिक बनविले होते.) पुरेशा अन्नपाण्याअभावी प्रवास करताना अनेक मुलांना कुपोषणाने ग्रासले. उष्माघात, मलेरिया, न्यूमोनियासारख्या आजाराने अनेक मुले मरण पावली. मुले एकमेकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करीत. वयाने मोठे असलेली मुले लहान मुलांना पाठीवर घेऊन प्रवास चालू ठेवीत. जी मुले मरण पावत त्यांच्या प्रेतांना जंगलात सोडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. जंगलात सिंह, तरस यासारख्या हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात, सर्पदंशामुळे अनेक मुले दगावली. अशा प्रकारे या धडपडणार्या मुलांपैकी निम्मी मुले केनियातील निर्वासित छावणीत पोचण्याअगोदरच मृत्युमुखी पडली. फक्त 20 ते 22 हजार मुले छावणीत पोचू शकली. जाणकारांच्या मते, युद्धाचे जितके दुष्परिणाम या धडपडणार्या मुलांनी भोगले, तितके आजवर कुणीही भोगले नाहीत…
3. निर्वासित छावणीतील दिशाहीन जीवन

आपल्यापैकी अनेकांनी केविन कार्टर या फोटोग्राफरने काढलेले छायाचित्र बघितले असेल – एक कुपोषित सुदानी बालक मरणोन्मुख अवस्थेत आहे आणि एक गिधाड त्याच्या मरणाची प्रतीक्षा करतेय. असे ते मन उद्विग्न करणारे छायाचित्र केविनने 1993 मध्ये दक्षिण सुदानच्या युद्धग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागात काढले होते. त्या छायाचित्रात जसे कुपोषित बालक दिसतेय, त्याच अवस्थेत हजारो धडपडणारी बालके इथियोपिया आणि केनियातील निर्वासित छावणीत आली होती. इथियोपियातही युद्ध सुरू झाल्यावर त्यांना फक्त केनियातील छावणीचा आसरा उरला. या 20 – 22 हजार मुलांना ‘Lost boys of Sudan’ असे म्हटले जाते – सुदानची भरकटलेली/ हरवलेली मुले! खरोखर ती मुले बालपण हरवलेली होती, आपले घरदार, परिवार हरवलेली होती. तरीही जगण्यासाठी जो अभूतपूर्व संघर्ष त्यांनी केला, त्यामुळे मला त्यांना ‘सुदानची धडपडणारी मुले’ असे म्हणावेसे वाटते. ‘God grew tired of us’ या documentary मध्ये निर्वासित छावणीतील धडपडणार्या मुलांचे तेव्हाचे video footage दाखविले आहे. त्या गिधाडाजवळील मुलांसारखीच कुपोषित अशी अनेक मुले…एक सात-आठ वर्षांचा कुपोषित मुलगा त्याच्या मांडीवरील तीन-चार वर्षांच्या कुपोषित मुलाला अन्न भरवितोय, त्यांच्या अंगावरील जखमांजवळ माशा भिणभिणत आहेत, असे ते हृदय पिळवटून टाकणारे दृश्य… हे निर्वासित छावणीतील वास्तव होते.
पूर, भूकंप, जातीय दंगली यामुळे निर्वासित होणार्या लोकांसाठी ज्या छावण्या उभारल्या जातात, त्यात निर्वासितांना काही आठवडे किंवा काही महिने राहावे लागते. सुदानमध्ये मात्र 22 वर्षे गृहयुद्ध सुरू होते. त्यानंतर आजतागायत अनेक अंतर्गत कुरबुरी सुरूच आहेत. निर्वासित छावणीत आश्रय घेतलेल्या धडपडणार्या मुलांना वर्षानुवर्षे तेथेच राहणे भाग पडले. तेथील प्रतिकूल परिस्थितीतच ती लहानाची मोठी झाली. अनेक धडपडणारी मुले (आता तरुण, प्रौढ) त्याच निर्वासित छावणीत दिशाहीन जीवन जगत आहेत…निर्वासित छावणी म्हणजे जणू खुले कारागृह (open jail). ना मनुष्य मायदेशी परत जाऊ शकतो, ना अन्य कुठल्या स्वतंत्र देशात (नागरिकत्व नसल्याने). केनियातील ‘दादाब’ आणि ‘काकुमा’ येथे निर्वासितांच्या छावण्या आहेत. दादाब येथील छावणी ही जगातील सगळ्यात मोठी निर्वासित छावणी. जवळपास तीन लाख 30 हजार (3,29,811) निर्वासित असलेली ही छावणी जणू निर्वासितांचे एक गावच आहे. येथे प्रामुख्याने सोमालियातील दुष्काळ आणि गृहयुद्धात होरपळलेले लोक राहतात. काकुमा निर्वासित छावणीत 1 लाख 80 हजार लोक राहतात. सुदानची धडपडणारी मुले याच काकुमा छावणीत राहतात. निर्वासितांच्या छावणीत गरज आणि पुरवठा यांचा बर्याचदा मेळ बसत नाही. येथे धुळीची वादळे मोठ्या प्रमाणावर होतात. मलेरिया, कॉलरा यांची साथ पसरून अनेक निर्वासित मृत्युमुखी पडतात. छावणीवर बंडखोरांचे हल्ले होण्याचा संभव असतो. त्यामुळे सायंकाळ होताच संयुक्त राष्ट्रसंघाचे (UN) सर्व प्रतिनिधी सुरक्षा कुंपण असलेल्या त्यांच्या वसतिगृहात परततात. बाहेर हजारोंच्या संख्येने असलेल्या निर्वासितांना मात्र कुठलेच संरक्षण नसते. त्यामुळे महिलांवर अत्याचार, चोरी, मारामारी वगैरे प्रकार निर्वासितांमध्ये सर्रास सुरू असतात. जे निर्वासित परिवारासह छावणीत येतात त्यांना महिन्यातून दोन वेळा World Food Programme मार्फत शिधा (ration) देण्यात येते. त्यांचे अन्न त्यांनीच शिजवून खावे, ही यामागील भूमिका. मुलांच्या शिक्षणासाठी शाळाही चालविण्यात येतात. त्यांना इंग्लिश, गणित आणि विज्ञानाचे प्राथमिक शिक्षण देण्यात येते. ती चिमुकली बालके भग्न इमारतीत मोडक्यातोडक्या बाकांवर आणि जमिनीवर ज्ञानग्रहण करण्यासाठी बसतात. प्राथमिक शिक्षण मिळाले, तरी पुढील शिक्षणाचे काय?
धडपडणार्या मुलांच्या गटात मुलींचाही समावेश होता. मुलांपेक्षा मुलींची परिस्थिती अधिक भयंकर आहे. जगातील अनेक देशांप्रमाणे सुदानमध्येही मुलींना दुय्यम दर्जा देण्यात येतो. वडिलांची मालमत्ता मुलास मिळत असल्याने सगळ्या लोकांना मुलगाच हवा असतो. येथे बहुपत्नीत्वही आहे. एका पत्नीस मुलगा होत नसेल तर सर्रास दुसरे लग्न केले जाते. जेव्हा सुदानमधील खेड्यांवर सैनिकांचे हल्ले झाले, तेव्हा त्यांनी बायकामुलींवर बलात्कार केले, अनेकींना गुलाम म्हणून नेले. जेव्हा धडपडणारी मुले आणि मुली निर्वासित छावणीत पोचल्या तेव्हा मुलामुलींना वेगळे ठेवण्यात आले. अनाथ मुले एकटेच छावणीत राहू शकत होते; पण मुलींना तशी परवानगी नव्हती. त्यांनी कुटुंबातच राहावे, यासाठी जी निर्वासित कुटुंबे छावणीत होती, त्यांच्यासोबत या मुलींना ठेवण्यात आले. स्वतः दुःखी असलेल्यांना दुसर्याच्या दुःखाची जाणीव असतेच, असे नव्हे. त्यामुळे या निर्वासित कुटुंबियांनी या धडपडणार्या मुलींना कुटुंबात एक सदस्य म्हणून सामावून घेण्याऐवजी मोलकरणीचीच वागणूक दिली. काही परिवारातील पुरुष या मुलींचे लैंगिक शोषण करीत. पाणवठ्यावर पाणी आणायला जाताना अथवा महिन्यातून दोन वेळा शिधा आणायला जाताना इतर निर्वासित या मुलींचे लैंगिक शोषण करीत. काही मुलींना अवैधरित्या बाहेर विकण्यात आले (human trafficking). घरकाम आटोपल्यानंतरच मुली शाळेत जाऊ शकत होत्या. काहींना तर तितकीही सवलत नव्हती. शिक्षणाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंदच होते…
4. पुनर्वसन आणि अडचणी

केनियातील काकुमा निर्वासित छावणीत सुदानच्या धडपडणार्या मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यात येत होते; पण उच्च शिक्षणाची काही सोय नव्हती. युद्धामुळे ते मायदेशी परतू शकत नव्हते आणि केनिया देशाचे नागरिकत्व त्यांना नसल्याने ते निर्वासित छावणी सोडून बाहेरील विद्यापीठात शिक्षण घेऊ शकत नव्हते. काही तरुण छावणीतील शाळेत शिकविणे, तेथील छोट्या हॉस्पिटलमध्ये मदतनिसाचे काम करणे, अन्नधान्य वाटपात मदत करणे अशी कामे करत होते. पण बहुसंख्य बेरोजगार तरुण दिशाहीन जीवन जगत होते. त्यामुळे पूर्णतः अनाथ असणार्या काहींचे पुनर्वसन अमेरिकेत करण्याचे ठरविले. अमेरिकेतील 38 शहरांत 3800 धडपडणार्या मुलामुलींचे पुनर्वसन करण्याचे ठरविले.
मुलांपेक्षा मुलींचे पुनर्वसन करणे, हे अधिक कठीण काम होते. कायद्यानुसार केवळ अनाथांचे पुनर्वसन करण्यात येणार होते. मुले छावणीत एकटेच राहत असली तरी मुलींना निर्वासित कुटुंबांमध्ये ठेवले होते. जरी ती कुटुंबे मुलींना मोलकरणीसारखी वागणूक देत असली तरी मुली त्या कुटुंबाच्या सदस्य मानल्या जात होत्या. त्यामुळे कागदोपत्री त्या ’अनाथ’ नव्हत्या, या कारणास्तव त्यांचे अमेरिकेत पुनर्वसन होऊ शकत नव्हते. तरीही ज्यांचे पुनर्वसन होणार होते, अशा काही मुलांनी आपल्या बहिणी, चुलत बहिणींच्या पुनर्वसनाचे प्रयत्न केले. अमेरिकेत गेल्यावर ही मुले तीन-चारच्या गटात एका घरात राहू शकत होती, पण मुलींना तशी परवानगी नव्हती. अमेरिकन कुटुंबाने त्यांना स्वीकारण्याची तयारी दर्शविली तर त्या कुटुंबात राहू शकत होत्या (foster family). त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात दोन हजार मुलांचे आणि फक्त 89 मुलींचे पुनर्वसन करण्यात आले. अक्षरशः शंभरातून एकाच मुलीचे पुनर्वसन झाले. 99 टक्के मुली हलाखीचे जीवन जगत राहिल्या…
या मुलामुलींचे पुनर्वसन करताना सुरुवातीला तीन महिने सरकार त्यांना नोकरी (हॉटेलात वेटर, दुकानात सेल्समन, मॉलमध्ये मदतनीस इत्यादी नोकर्या) मिळविण्यास मदत करेल, असे ठरविण्यात आले. नोकरी मिळाल्यानंतर त्यांचा खर्च त्यांनी स्वतःच करावा, त्यांच्या विमानप्रवासावर जो खर्च झालाय, तोही त्यांनी सरकारला परत करावा, अशी अपेक्षा ठेवण्यात आली. ज्या होतकरू मुलांना पुढे शिक्षण घ्यायचेय, त्यांनी नोकरी करत शिक्षण घ्यावे, स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः करावा, असे ठरविण्यात आले. सुदानमध्ये असताना खेडेगावात आणि निर्वासित छावणीत अपुर्या सोयी-सुविधांमध्ये राहणार्या या धडपडणार्या मुलामुलींसाठी अमेरिकन समाजजीवनात समरस होणे सोपे नव्हते. त्यांनी आयुष्यात कधीही वीज (electricity) वापरली नव्हती, कधी पलंगावर झोपले नव्हते, दात घासण्यासाठी कधी टूथब्रशही वापरला नव्हता. अमेरिकन समाजाचे कायदेकानून त्यांना नीट माहीत नव्हते. त्यामुळे मनात न्यूनगंडाची भावना येणे साहजिकच होते. काही ठिकाणी त्यांना वर्णभेदाचा (racism) सामना करावा लागला. हे निर्वासित म्हणजे अमेरिकेवर लादलेले ओझे आहे, अशा प्रकारची भावना काही नागरिकांच्या मनात होती. त्यांच्या तिरस्काराचा सामनाही त्यांना करावा लागला. god grew tired of us या documentary मध्ये अमेरिकन समाजातील काही लोकांना या निर्वासितांची भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. ही धडपडणारी मुले कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी (दुकाने, बगिचे) एकत्रच जायची. परक्या देशात त्यांना ग्रुपमध्ये सुरक्षित वाटणे साहजिकच होते. पण त्यामुळे खाजगी दुकानदारांना भीती वाटायची की ते आपला माल लुटून नेतील, आपल्याला इजा पोचवितील वगैरे. त्यामुळे त्यांना असे एकत्र फिरू नका, असे सांगण्यात आले. परंतु परक्या देशात असे एकटे जीवन जगताना त्यांच्या मनात निराशाही दाटून यायची. निर्वासित छावणीत मागे राहिलेल्या आपल्या मित्रांची आठवण यायची. the good lie या चित्रपटात या अस्वस्थतेचे चांगले वर्णन केलेय.
Ambigious loss नावाचा एक विरह प्रकार आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला तर माणूस उशिरा का होईना, पण सत्याचा स्वीकार करून सामान्य जीवन जगायला लागतो. पण Ambigious loss मध्ये हा स्वीकार घडत नाही. नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धात एखादा प्रियजन बेपत्ता झाला असेल, तर तो कधीतरी परत येईल अशी वेडी आशा माणसे बाळगत राहतात, प्रियजनाच्या विरहात झुरत राहतात आणि तो परत येत नाहीये, हे बघून निराश होत राहतात. सुदानच्या धडपडणार्या मुलांचे आईवडील, आप्तस्वकीय युद्धात बेपत्ता झाले होते. ते मरण पावले की गुलाम (slave) म्हणून शत्रूने नेले, त्याबाबत त्यांना काहीच ठाऊक नव्हते. अनेक वर्षांनंतर एखाद्या मुलाला त्याचे आप्तस्वकीय सापडायचेदेखील. इतरांच्या मनात आशानिराशेचे खेळ सुरू राहायचे…
Post traumatic stress disorder नावाचा एक मानसिक आजार आहे. अत्यंत भयंकर आपत्तीला तोंड दिल्यानंतर येणारे नैराश्य इतके भयंकर असते की मनुष्याची मजल आत्महत्येपर्यंत जाऊ शकते. यात survival guilt नावाचा एक प्रकार आहे, जे आपत्तीमधून बचावलेत, त्यांच्या मनातील अपराधभाव. ‘माझे प्रियजन मेले, मीच बचावलो, मी त्यांना वाचवू शकलो नाही, मग मला जगण्याचा काय अधिकार’ अशी अपराधभावना व्यक्तीच्या मनात दाटून येते, ज्याची अखेर आत्मघातात होऊ शकते…
एकटीच राहणारी, मानसिकदृष्ट्या हळवी झालेली ही मुले आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी झटत होती. अमेरिकेत कितीही अडचणी आल्या तरी निर्वासित जीवनापेक्षा हे जीवन निश्चितच चांगले आहे याची जाणीव त्यांना होती. उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करण्यास ज्या खूप कमी सुदानी लोकांना संधी मिळाली, त्यात आपण आहोत, याची त्यांना जाणीव होती. यातील काही मुलांनी खरोखर संधीचे सोने केले.
5. यशस्वी मुले (Black pearl)

The good lie हा चित्रपट जेव्हा मी बघितला, तेव्हा त्यातील धडपडणार्या मुलांचा अभिनय करणार्या अभिनेत्यांचा अभिनय मला खूप नैसर्गिक वाटला. त्या मुलांचे दुःख, अस्वस्थता, परदेशातील नवखेपणा, वागण्याबोलण्यातील भोळेपणा इत्यादी आपल्या अभिनयातून समर्पकरित्या दर्शविणार्या कलाकारांच्या अभिनयाला दाद मिळणे साहजिकच होते, पण चित्रपट संपताना कळले की त्यातील सर्वजण व्यावसायिक अभिनेते नव्हते. धडपडणार्या मुलांची भूमिका करणारे कलाकार हे खरोखर सुदानची धडपडणारी मुले होती. ती दुःखे त्यांनी स्वतः भोगली होती आणि म्हणूनच त्यांच्या अभिनयात इतका जिवंतपणा होता!
या चित्रपटात काम करणारा Emmanuel Jal (इमेन्युएल जाल) हा भूतपूर्व बालसैनिक. तो सात वर्षांचा असताना त्याचे वडील बंडखोर SPLA मध्ये सामील झाले आणि आई सरकारी सैनिकांकडून मारली गेली. तो धडपडणार्या मुलांसोबत निर्वासित छावणीकडे जात असताना बंडखोर SPLA ने त्याचे अपहरण करून त्याला बालसैनिक (child soldier) बनविले. प्रशिक्षणाच्या नावाखाली त्याच्यावर अनेक अत्याचार केले. चार वर्षे तो युद्धग्रस्त प्रदेशात लढत होता. 11 वर्षांचा असताना तो तीनशे बालसैनिकांसोबत पलायन करण्यात यशस्वी ठरला. तीनशेपैकी फक्त वीस मुले शेवटपर्यंत वाचली. पुढे एका दयाळू समाजसेविकेने (social worker) एम्मा मेकक्यून (Emma McCune) ने त्याला दत्तक घेऊन केनियातील नैरोबी येथे नेले. त्याला आईचे प्रेम दिले. पण सहा महिन्यांतच एम्माचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. पुन्हा अनाथ झालेल्या इमेन्युएलला नैरोबीतील झोपडपट्टीत राहणे भाग पडले. पुढे एका चर्चने त्याला आश्रय दिला. पूर्वायुष्यातील वाईट अनुभवांमुळे त्याच्यात आत्मविश्वास कमी होता. चर्चमध्ये सेवा करताना त्याचे हात थरथरायचे. चर्चचा पाद्री कुत्सितपणे म्हणायचा, ‘तू पापी आहेस. हातात बंदूक धरली होतीस.आता तुझ्या हातून ईश्वरसेवा कशी घडणार?’ इतकी निर्भत्सना सहन करूनही तो जगत राहिला. त्याला चर्चमधील संगीतसभा (musical concerts) आवडत. पुढे शाळेत त्याचा परिचय hip-hop संगीताशी झाला. 2004 मध्ये केनियात त्याचा पहिला musical album प्रदर्शित झाला, जो लोकांना खूप आवडला. आजवर त्याचे 6 अल्बम प्रदर्शित झालेत. त्याच्या संगीतास खास आफ्रिकन ‘टच’ आहे, ज्यामुळे तो फक्त आफ्रिकेतच नव्हे तर युरोप, अमेरिकेतही प्रसिद्ध आहे. ‘Gua frica’ ही संघटना स्थापन करून तो समाजसेवा करतो. शाळा बांधणे, निर्वासित छावणीतील मुलांना scholarship देणे, नैरोबीतील झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी पैसा पुरविणे अशी कामे त्याची संस्था करते. ज्या बिटीश समाजसेविकेने एम्मा मेकक्यूनने त्याला दत्तक घेतले होते, तिच्या नावाने दक्षिण सुदानमधील लीर (leer) गावात त्याने शाळा बांधली आहे. एकेकाळी बालसैनिक असलेला इमेन्युएल जाल म्हणतो की आता संगीत हेच त्याचे शस्त्र आहे!
आवेर माबील (Awer mabil) या फुटबॉलपटूची कहाणी अशीच प्रेरक आहे. 1995 मध्ये माबीलचा जन्म काकुमा निर्वासित छावणीत झाला. तो दोन वर्षांचा असताना त्याच्या आईच्या पदरात तीन मुले टाकून त्याचे वडील वारले. पाच वर्षांचा माबील छावणीतील वेड्यावाकड्या मैदानावर धूळ, काटेकुटे यांची पर्वा न करता तासन्तास फुटबॉल खेळायचा. तो दहा वर्षांचा असताना त्याचे ऑस्ट्रेलियात परिवारासोबत पुनर्वसन करण्यात आले. तेथे त्याच्या गुणवत्तेस वाव मिळाला. अवघ्या 17 वर्षांचा असताना त्याने Adelaide United या संघाकडून आंतरराष्ट्रीय फूटबॉलमध्ये पदार्पण केले. फूटबॉलच्या युवा (under 20) विश्वचषकात त्याने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. आज तो एका नामांकित क्लबकडून फुटबॉल खेळतो. 2015 मध्ये त्याने ‘barefoot to boots’ या संघटनेची स्थापना केली. त्यामार्फत तो काकुमा निर्वासित छावणीतील मुलांना फुटबॉल, बूट आणि कपडे पुरवितो. निर्वासित छावणीतील अस्वच्छतेमुळे महिलांची फार कुचंबणा होते. त्यांच्यासाठी दोन लाख Sanitary Napkin त्याच्या संघटनेने पुरविले. दर सहा महिन्यात हे सर्व साहित्य पुरविण्याचा त्याचा मानस आहे. फक्त काकुमाच नव्हे, तर जगभरातील निर्वासितांसाठी त्याच्या मनात मदतीची भावना आहे. जॉर्डनमध्ये आश्रय घेतलेल्या सीरियाच्या निर्वासितांसाठी त्याच्या संघटनेने हजारो sleeping bags पुरविल्या. 20 वर्षांच्या या तरुण फुटबॉलपटूची सामाजिक बांधिलकी खरोखर प्रेरणादायक आहे.
The good lie चित्रपटात अभिनय केलेला जेर ड्यूनी (Ger Duany) हासुद्धा भूतपूर्व बालसैनिक आणि धडपडणारा मुलगा होता. आज तो हॉलिवूडमध्ये अभिनेता आणि मॉडेल आहे. क्यूथ वील (Kuoth Wiel) ही The good lie मधील अभिनेत्री सुदानच्या धडपडणार्या मुलींपैकी एक आहे.
जॉन दाऊ (John Dau) या धडपडणार्या मुलाने अमेरिकेत तीन पार्ट टाईम नोकर्या करून, आठवड्याला 60 तास काम करूनही Syracus University मधून public policy त पदवी मिळविली. American Care for Sudan Foundation स्थापन करून त्याने दक्षिण सुदानमध्ये हॉस्पिटल बांधण्यासाठी 1 लाख 70 हजार डॉलर्सपेक्षा अधिक निधी जमविला.
साल्वा दत (Salva Dut) हा आणखी एक धडपडणारा मुलगा. सुदानमध्ये पाणीप्रश्न गंभीर आहे. मैलोन्मैल पायपीट करूनही दूषित पाणी मिळते. 2003 मध्ये Water for South Sudan ही NGO स्थापन करून साल्वा दतने हजारो डॉलर्सचा निधी जमविला. दक्षिण सुदानमधील अनेक गावांमध्ये विहिरी खोदून तेथील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी तो कटिबद्ध आहे.
आज अमेरिकेत अनेक धडपडणारी मुले इंजिनिअर, प्राध्यापक अशा चांगल्या पदांवर काम करतात अन् निर्वासित छावणीतील आपल्या देशबांधवांना मदतही करतात. अमेरिकेतील सर्व धडपडणारी मुलेमुली दरवर्षी 1 जानेवारीला reunion करतात. त्याच दिवशी ते केक कापून आपला वाढदिवसही साजरा करतात. कारण त्यांना आपला खरा जन्मदिवस ठाऊकच नाहीये…
6. अशांत स्वातंत्र्य अन् दिशाहीन जीवन

22 वर्षांच्या गृहयुद्धानंतर सुदानमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली. 5 जुलै 2011 रोजी सार्वमताद्वारे ‘दक्षिण सुदान’ हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला. 98.83 टक्के दक्षिण सुदानी लोकांनी स्वतंत्र देशासाठी कौल दिला, ज्यात निर्वासितांचाही समावेश होता. इतक्या रक्तपातानंतर मिळालेल्या स्वतंत्र दक्षिण सुदानमध्ये शांतता नांदावी, निर्वासितांना परत बोलविले जावे, उद्योगधंद्याची घडी नीट बसावी, अशी अपेक्षा असणे सहाजिकच होते पण तसे काही घडले नाही. दक्षिण सुदानच्या 10 पैकी 9 राज्यांमध्ये गृहयुद्ध सुरूच राहिले. सात लहानमोठ्या सशस्त्र संघटना सरकारविरुद्ध लढत राहिल्या. यावेळी त्यांचा शत्रू उत्तरेतील मुस्लिम नव्हते, ते आपापसातच लढत होते. धर्मवाद संपला तरी टोळीवाद/जमातवाद शिल्लक होताच. (धर्म आणि जातीच्या नावावर किती दिवस या जगातील माणसे रक्तपात करीत राहतील, कुणास ठाऊक!)
दक्षिण सुदानमध्ये bari, dinka, nuer, murle, luo, zande अशा विविध लहानमोठ्या जमाती आहेत. मध्यवर्ती सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करते, जमातींमध्ये भेदभाव करते, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करते, या कारणास्तव संघर्ष सुरूच राहिला. Nuer White Army (nuer जमातीतील लोक त्यांच्या काळ्या शरीरावर पांढरी माती लावतात म्हणून त्यांच्या सैन्याला White Army म्हणतात) फक्त सरकारच नव्हे, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेविरुद्धही युद्ध पुकारले. या संघर्षात 3 लाख लोक ठार झाले. लाखो लोकांना निर्वासित व्हावे लागले. केनियातील काकुमा निर्वासित छावणीत आधीच 1 लाख 80 हजार निर्वासित राहत होते. नवीन देशाच्या निर्मितीनंतर छावणीतील निर्वासितांना मायदेशी परतण्याची आशा होती. ती आशा मावळलीच; पण अजून नवीन 80 हजार निर्वासित दक्षिण सुदानमधून काकुमामध्ये आले. कत्तली, बलात्कार, बालसैनिकांची भरती सर्व काही या कालावधीत घडले.
संयुक्त राष्ट्रसंघाने UNMISS (united nation mission in south sudan) हा नवीन विभाग 2011 मध्ये सुरू केला, ज्यात विविध देशांचे 11 हजार 350 लष्करी आणि 1,173 पोलीस कर्मचारी आहेत. या शांतीसेनेत भारताचे 2,237 सैनिक आहेत. सुदानमध्ये शांतता प्रस्थापित करणे, सरकारला राष्ट्रउभारणीत मदत करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला जपणे हे UNMISS चे उद्दिष्ट आहे. 9 एप्रिल 2013 मध्ये भारताचे 32 शांतीसैनिक convoy (लष्करी आणि नागरी वाहतुकीचा मोठा ताफा) चे रक्षण करीत असताना 200 बंडखोरांनी हल्ला केला. 5 भारतीय सैनिक आणि 7 UN कर्मचारी यांना वीरमरण आले. UNच्या प्रवक्त्यानुसार भारतीय सैनिकांनी कडवा प्रतिकार केल्याने बंडखोरांना माघार घेणे भाग पडले आणि अनेक नागरिकांचे प्राण वाचले. दक्षिण सुदानच्या शांतीसाठी भारतीय सैनिकांनीही प्राणांचे बलिदान दिलेय…
ऑगस्ट 2015 मध्ये दक्षिण सुदानमध्ये पुन्हा शस्त्रसंधी झाली. त्या लहानशा देशातील 10 राज्यांचे विभाजन करून 24 राज्ये बनविण्याची घोषणा झाली. त्या-त्या जमातीच्या बहुसंख्येनुसार नवीन राज्य बनविले की शांतता नांदेल, विकास शीघ्र होईल या आशेने. (असले प्रकार भारतातही घडत असतात. तेलंगणा हे नवीन राज्य झाल्यावर वेगळा विदर्भ, सौराष्ट्र, कच्छ, भोजपूर, बोडोलँड वगैरे मागण्या जोरात सुरु होतात. यात विकास फक्त राजकारणी लोकांचा होतो.) नवीन राज्ये मिळाल्यानंतर दक्षिण सुदानमध्ये शांतता नांदावी, अशी आशा करूया. कारण आता निर्वासितांना जास्त दिवस निर्वासित छावणीत राहता येणार नाहीये. केनिया सरकारने त्यांच्या देशातील दोन्ही मोठ्या निर्वासित छावण्या- ‘दादाब’ आणि ‘काकुमा’ बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
केनियात नव्याने हातपाय पसरू पाहणार्या ‘अल शाबाब’ या आतंकवादी संघटनेची भीती केनिया सरकारला वाटत आहे. निर्वासित छावणीतील गरीब, बेरोजगार, दिशाहीन तरुण या आतंकवादी संघटनेच्या अपप्रचारास बळी पडून तिच्यात सामील होतील, अशी भीती केनिया सरकारला वाटतेय. त्यांनी नवीन निर्वासितांना छावणीत प्रवेश देणे बंद केलेय आणि हळूहळू छावणीतील निर्वासित कमी करीत ‘मे 2017’ पर्यंत छावणी पूर्णतः बंद करण्याचे ठरविलेय.
निर्वासित छावण्या कधीतरी बंद व्हायलाच हव्यात. लोकांनी आयुष्यभर निर्वासित छावणीत जगणे, हे त्यांच्या स्वतःच्याच हिताचे नाही. पण आज छावणीत त्यांना अन्न आणि सुरक्षा मिळतेय. त्यांच्या अशांत देशात नेमक्या याच दोन गोष्टी त्यांना मिळत नाहीत. पुनःपुन्हा गृहयुद्धाचे चटके देणार्या दक्षिण सुदानमध्ये भविष्यात शांतता नांदेल की नाही, हे आज सांगता येणे कठीण आहे. या अस्थिर परिस्थितीत निर्वासितांना पुन्हा मायदेशी परतावे लागेल. 22 हजार धडपडणार्या मुलांपैकी फक्त चार हजार मुलांचे पुनर्वसन झाले. 18 हजार मुले आणि इतर हजारो निर्वासितांचे भविष्य अंधारात आहे. लहानपणी ज्या धैर्याने त्यांनी जगण्यासाठी जीवघेणा प्रवास केला होता, तसा त्यांना परत एकदा करावा लागेल. या प्रवासानंतर त्यांना स्वदेशात स्थैर्य लाभावे, पुन्हा निर्वासित म्हणून वणवण करावी लागू नये, इतकीच इच्छा आहे. बालपणी ‘अनिकेत’ झालेल्या त्या धडपडणार्या मुलांना आयुष्यात कधीतरी हक्काचा निवारा मिळावा, हीच सदिच्छा!
7. युगांडामधील गृहयुद्ध

अंधश्रद्धेचा कळस, ‘अंगात येणारी बाई’
आफ्रिकेत सुदानजवळच युगांडा हा देश आहे, सुदानप्रमाणेच गृहयुद्धाने होरपळलेला. दक्षिण सुदानचा संघर्ष उत्तरेतील मुस्लिम लोकांशी होता. युगांडात टोळीवाद प्रबळ आहे. ख्रिश्चन धर्मातील आदर्श असा स्वर्ग पृथ्वीवर आणण्याची स्वप्नं पाहणार्या धर्मांध लोकांनी आहे तो युगांडा नरकापेक्षा भयंकर बनविला. युगांडात विविध आदिवासी टोळ्या आहेत. ख्रिश्चन मिशनरी लोकांच्या धर्मप्रसाराने बहुसंख्य नागरिक ख्रिश्चन बनले. ख्रिश्चन नावे, हातात बायबल; चालीरीती मात्र आदिवासींच्या. 9 ऑक्टोबर 1962 रोजी युगांडाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. 1971 साली इदी अमीन याच्या नेतृत्वाखाली लष्कराने उठाव करून सत्ता ताब्यात घेतली, त्यावेळी युगांडात भारतीय वंशाचे अनेक लोक होते. 1890 मध्ये ब्रिटिशांनी युगांडात रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी जवळपास 32 हजार मजूर भारतीय उपखंडातून नेले होते. काम संपल्यानंतर बहुसंख्य लोक मायदेशी परतले, परंतु सहा-सात हजार भारतीय युगांडातच राहिले. तेथे वस्त्रोद्योग आणि इतर उद्योगात त्यांनी जम बसविला. तेथील समाजाचा ते एक सन्माननीय भाग झाले. लष्करी हुकूमशहा इदी अमीन सत्तेवर आल्यावर त्याने सर्वप्रथम भारतीयांना युगांडामधून हाकलले. युगांडाचे शुद्धीकरण करण्याचे जे किळसवाणे प्रयत्न पुढील कालावधीत झाले, त्यातील हा पहिला प्रयत्न होता. भारतीय लोकांनी युगांडा सोडला; पण त्याचे दुष्परिणाम युगांडामधील उद्योगधंद्यांना भोगावे लागले. भारतीयांच्या जाण्याने युगांडाचे औद्योगिक स्तरावर बरेच नुकसान झाले. इदी अमीनने आठ वर्षे युगांडावर शासन केले. त्या कालावधीत त्याने विरोधकांचे निर्दयपणे दमन केले. त्याच्या शासनकाळात सैन्याने केलेल्या अत्याचारात जवळपास 3 लाख नागरिक ठार झाले. 1978 साली इदी अमीन विरोधकांनी शेजारच्या टांझानिया देशाच्या मदतीने अमीन सरकारविरुद्ध युद्ध पुकारले. 11 एप्रिल 1979 ला त्यांचा विजय झाला आणि इदी अमीन देशातून परागंदा झाला. 1980 साली मिल्टन ओबेटे सत्तेवर आला. त्याचे सरकार भ्रष्ट आहे, या आरोपाखाली पुन्हा गृहयुद्ध सुरू झाले. 6 फेब्रुवारी 1981 पासून 25 जानेवारी 1986 पर्यंत हे गृहयुद्ध सुरू होते. ‘बुश युद्ध’ या नावाने परिचित असणार्या या गृहयुद्धात तीन ते पाच लाख नागरिक ठार झाले. युद्धाच्या शेवटी ओबेटे सरकारचा पराभव झाला आणि योवेरी मुसेवेनी सत्तेवर आला जो आजतागायत युगांडाचा राष्ट्रपती आहे. या मुसेवेनीच्या शासनकाळात युगांडाने सर्वांत मोठे गृहयुद्ध सोसले ज्याचा अधिकृत अंत अजूनही झालेला नाहीये. याची सुरुवात केली एका स्त्रीने; ‘एलिस आयुमा’ नावाच्या एका सामान्य स्त्रीने!
इतर आफ्रिकन देशांप्रमाणे युगांडात स्त्रियांची स्थिती वाईट आहे. मूल होत नसलेल्या स्त्रीचा त्याग करून पती दुसरे लग्न करतो. 1956 साली जन्मलेल्या एलिसला मूल होत नसल्याने पतीने तिला सोडले. तिने दुसरे लग्न केले; पण मूल होत नसल्याने दुसर्या पतीनेही तिला सोडले. माहेरी राहणारी एलिस मासे आणि धान्य विकून उदरनिर्वाह करायची. माहेरी राहणार्या, नवर्याने टाकलेल्या स्त्रीला तेथील समाजात मानसन्मान मिळत नव्हता. अंतर्मनातील ताणांमुळे एलिस वेड्यासारखे वागू लागली, माझ्या अंगात प्रेतात्मा येतोय, असे ती सांगू लागली. तिच्या वडिलांनी तिला अकरा वेगवेगळ्या witches (चेटकिणी/भगतिनी) कडे उपचारासाठी नेले, पण कुठलाच उपाय लागू पडला नाही. नंतर अचानक ती जंगलात नाहीशी झाली. चाळीस दिवस तिचा कुठेच ठावठिकाणा नव्हता. चाळीस दिवसांनंतर जंगलातून परतलेल्या तिने लोकांना धीरगंभीर आवाजात सांगितले की तिच्या शरीरात प्रेतात्मा- Lakwena चा प्रवेश झाला आहे. (Lakwena याचा अर्थ messenger – संदेशवाहक). पहिल्या महायुद्धात ठार झालेल्या एका इटालियन सैनिकाचा आत्मा तिच्या शरीरात प्रवेश करून तिला दिव्य संदेश देतोय, असे ती म्हणाली. तिने स्वतःचे एक मंदिर बनविले ज्यात ती रोज बसू लागली. Lakwena ने मला पवित्र दगड आणि पवित्र पाणी दिलेय, ज्याच्या सहाय्याने मी लोकांचे आजार बरे करू शकते आणि त्यांचे पाप नष्ट करू शकते, असा दावा तिने केला. सुरुवातीला लोकांचा विश्वास बसला नाही. एका सामान्य स्त्रीमध्ये इतकी शक्ती कशी येऊ शकते, असे त्यांना वाटायचे. त्यावर एलिस मोठ्या आवाजात म्हणायची – मी स्त्री आहे, कनिष्ठ आहे, पापी आहे म्हणूनच माझ्या उद्धारासाठी आत्मा माझ्या शरीरात आलाय. आता माझ्याद्वारे त्याला सर्व समाजाचा उद्धार करायचाय. लोकांचा विश्वास बसला. ते एलिसचा नव्हे, तर तिच्या शरीरातील प्रेतात्म्याचा आदर करू लागले, त्याला घाबरू लागले. एलिसचे अनुयायी वाढू लागले. पुरेशी प्रसिद्धी मिळाल्यावर 6 ऑगस्ट 1986 रोजी तिने जाहीर केले की, यापुढे ती रोग बरे करण्याचे काम करणार नाही. आता तिला डॉक्टरचे कर्तव्य सोडून आर्मी कमांडरचे (!) निभवायचे होते. युगांडात बुश युद्ध संपून मुसेवेनीचे सरकार सत्तेवर आले होते. या युद्धात एलिसच्या ‘अचोली’ वंशाच्या लोकांचा पराभव झाला होता. मुसेवेनी सरकारने विरोधी पक्षांवर अनेक बंधने घातली होती. या अन्यायाचा प्रतिकार करून युगांडात अचोली लोकांचे स्वर्गवत राज्य आपणास स्थापन करायचे आहे, असे ती म्हणू लागली. ‘बुश युद्धा’त पराजित झालेले सैनिक तिला येऊन मिळाले. तिचे स्वतःचे अनुयायी होतेच. बघता बघता 15 हजार लोक तिच्या नेतृत्वाखाली गोळा झाले. या मोहिमेला तिने Holy Spirit Movement (HSM) असे नाव दिले. बोलताना ती बायबलमधील दाखले द्यायची आणि काळी जादू (voodoo) करायची. अशाप्रकारे ख्रिश्चन आणि आदिवासी अंधश्रद्धांचा मिलाफ तिने साधला. तिच्या सैनिकांना अंगाला लावण्यासाठी ती एक विशिष्ट तेल आणि पाणी देत असे. जर तुम्ही पवित्र असणार तर हे तेल लावल्यानंतर शत्रूच्या गोळ्या तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत, असे ती सांगायची. तुम्ही पवित्र असणार तर तुम्ही फेकलेले दगडही शत्रुवर बॉम्बप्रमाणे बरसतील, असे ती म्हणायची. धार्मिक गीते (hymns) गात HSM चे सैनिक विरोधकांवर तुटून पडायचे. त्यांचा विचित्र, भीतिदायक आवेश बघून विरोधक घाबरून पळायचे. अचोली बहुसंख्य भागातील सुरुवातीच्या दोन-तीन लढाया HSM ने जिंकल्या. एलिसची हिंमत वाढली. युगांडाची राजधानी ‘कंपाला’ जिंकून ’ईश्वराचे राज्य’ स्थापन करण्याचे स्वप्न ती बघू लागली. कंपालाच्या आसपास कमी लोक तिला ओळखत होते. त्यामुळे तेथे HSM ची फारशी दहशत नव्हती. सुरुवातीच्या दोन-तीन लढायांमध्ये HSM चा पराभव झाल्यावर तिचेच अनुयायी तिच्यावर उलटले. ‘आमच्यावर काळी जादू करून आम्हाला पराभूत करणारी चेटकीण,’ असे ते तिला म्हणू लागले. नोव्हेंबर 87 मध्ये कंपालाजवळच्या जंगलात HSM चा अखेरचा मोठा पराभव मुसेवेनीच्या सैन्याने केला. एलिस जंगलात पळाली. सायकल चालवून ती केनियातील ‘दादाब’ निर्वासित छावणीत पोचली. Lakwena आत्मा तिला सोडून गेला, असे तिने जाहीर केले. जवळपास 20 वर्षे – 2007 पर्यंत ती दादाबमध्ये होती. 2004 मध्ये तिच्यावर मुलांच्या तस्करीचे (child trafficking) चे आरोप लागले. 2006 मध्ये तिला AIDS वर औषध सापडल्याचा दावा तिने केला. 17 जानेवारी 2007 ला अज्ञात आजाराने तिचा मृत्यू झाला. लोकांच्या मते तिचा अज्ञात आजार एड्स होता!
8. अंधश्रद्धेचा कळस : ‘क्रूरकर्मा कोनी’

1987 मध्ये एलिस आयुमा पराभूत होऊन परागंदा झाली आणि तिचाच भाऊ (cousin) जोसेफ कोनी याने तिची जागा घेतली. पुढील 20 वर्षे त्याने युगांडात महाभयंकर विध्वंस घडवून आणला. कोनीचा जन्म 1961 सालचा. त्याचे वडील ख्रिश्चन धर्मोपदेशक होते. 1986 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी त्याने शाळा सोडली. त्यानंतर घर सोडून चार आठवडे तो जंगलात भटकत होता. त्यानंतर पांढरे कपडे घालून तो बाहेर आला. घरच्या लोकांनी ‘इतके दिवस कुठे होतास’ असे विचारले असता तो म्हणाला की मी देवासोबत होतो. एलिस आयुमा कोनीची cousin असल्याचा उल्लेख आहे. cousin म्हणजे नक्की कोण – चुलत/आते/मामे/मावस बहीण याचा निश्चित उल्लेख नाही. जंगलातून परतल्यावर थोड्याच दिवसांत कोनी एलिसच्या वडिलांजवळ गेला. मार्च 1986 मध्ये त्याने धर्मोपदेश सुरू केला. कोनीची लुडबूड एलिसला आवडली नाही. तिला प्रतिस्पर्धी नको होता. तिने कोनीला सल्ला दिला की, त्याने आपली धार्मिक शक्ती फक्त लोकांना बरे करण्यापुरती मर्यादित ठेवावी, त्या शक्तीचा वापर करून युद्ध लढण्याची काही आवश्यकता नाही. तिचा सल्ला कोनीला अपमानास्पद वाटला. लवकरच HSM चा मोठा पराभव झाला. एलिसच्या वडिलांनी तिची जागा घेण्याचा प्रयत्न केला, पण मुसेवेनी सरकारने त्यांना अटक केली. कोनीने या संधीचा फायदा घेतला. HSM चा पराभव झाल्यानंतर दिशाहीन झालेल्या सैनिकांना त्याने एकत्र केले. दूरवरच्या प्रदेशातून एलिसकडे आजार बरे करण्यासाठी आलेल्या आणि ती न भेटल्याने निराश झालेल्या लोकांना त्याने पटवून दिले की त्याच्यातही दैवी शक्ती आहे. या सर्व लोकांना एकत्रित करून त्याने Lord’s Resistance Army (LRA – ईश्वराची संघर्षसेना) स्थापन केली. एलिसच्या शरीरातील Lakwena आत्मा आता माझ्या शरीरात निवास करतोय, असे त्याने लोकांना सांगायला सुरुवात केली. एकूण 13 वेगवेगळ्या देशातील आत्मे (ज्यात Chinese phantom चाही समावेश होता) आपल्या शरीरात वास करीत असल्याचा तो दावा करीत असे. गूढ शक्तींचा दावा करणारा कोनी स्वतःला कट्टर ख्रिश्चन समजत असे. 10 commandments नुसार स्वर्गीय, ईश्वरी राज्य युगांडाच्या धरतीवर स्थापन करायचे आहे, असे तो म्हणायचा. कोनीची ख्रिश्चन cross वर श्रद्धा होती. सैनिकांच्या छातीवर एका विशिष्ट तेलाने cross काढल्यास बंदुकीच्या गोळ्या त्यांना भेदू शकणार नाहीत, असे तो सांगायचा. तो बहुपत्नीत्वाचा समर्थक होता. त्याला अनेक बायका आणि जवळपास 42 अपत्ये होती. पृथ्वीवरून पाप नष्ट होण्यासाठी काही लोकांना मरणे आवश्यक आहे, असे तो मानायचा. त्यासाठी तो बायबलमधील Noah’s flood आणि Sodom and Gomorroh चे दाखले द्यायचा. Noah’s flood (बायबलनुसार महापुरात पृथ्वीवरील सर्व जीव नष्ट झाले. फक्त नोहाने त्याच्या नावेत जेवढे मनुष्य आणि पशुपक्षी घेतले, तेवढेच वाचले. त्याप्रमाणेच युगांडातील गृहयुद्धात फक्त पुण्यवान माणसे वाचतील आणि सर्व पापी नष्ट होतील, असे कोनी मानायचा). Sodom and Gomorroh (बायबलनुसार सोडोम आणि गोमोरोह या दोन शहरांमध्ये पाप अधिक वाढले म्हणून ईश्वराने ती शहरे जाळून नष्ट करण्याचा आदेश दिला. त्यानुसार आपल्यालाही पाप आणि पापी यांना मारण्याचा नैतिक अधिकार आहे, असे समजून कोनीने माणसे मारली आणि घरेदारे जाळली.)
धार्मिकतेचा आधार घेऊन क्रूर कृत्ये करणार्या कोनीची धार्मिकताही दांभिक होती. तो सोयीनुसार धार्मिकता वापरत होता. गैरसोय होईल तेथे धर्म विसरत होता. 1992 मध्ये कोनीने उत्तर सुदानच्या मुस्लिम सरकारशी हातमिळवणी केली. दक्षिण सुदानच्या बंडखोरांना युगांडा सरकारचे समर्थन होते. त्यामुळे सरकारविरोधक कोनीने उत्तर सुदानशी हातमिळवणी केली. त्याची ही चाल राजकीयदृष्ट्या सुसंगत असली तरी त्याची दांभिक धार्मिकता दर्शवित होती. सुदानचे उत्तरेकडील सरकार मुस्लिम आणि दक्षिणेतील ख्रिश्चन. ख्रिश्चन राष्ट्र स्थापन करण्याचे स्वप्न पाहणारा कोनी प्रत्यक्षात मुस्लिम राष्ट्राशी हातमिळवणी करून स्वतःच्याच तत्त्वांशी फारकत घेत होता. स्वार्थी लोक धर्मही सोयीनेच वापरतात! उत्तर सुदानच्या मुस्लिम सरकारशी हातमिळवणी केल्यानंतर कोनीच्या LRA सैन्याला उत्तर सुदानने मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि लष्करी प्रशिक्षण दिले. LRA सैन्याचे सामर्थ्य वाढले. त्यांची निर्दयी कृत्येही वाढली.
कोनीची दांभिकता येथेच संपत नाही. आपल्या अचोली वंशाच्या लोकांवर मुसेवेनी सरकारने निर्घृण अत्याचार केले आहेत, त्यांचा सूड घेऊन अचोली लोकांचे ईश्वरी राज्य स्थापन करणे, हे आपले कर्तव्य आहे, असे कोनी लोकांना सांगायचा. अचोली राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारा कोनी प्रत्यक्षात मात्र अचोली लोकांशीही निर्दयतेने वागत होता. अचोली लोकांची इच्छा असो वा नसो, त्यांना जबरदस्तीने LRA मध्ये भरती करून घेत होता. त्याने जवळपास 66 हजार बालसैनिकांना जबरदस्तीने LRA मध्ये भरती केले. कोनीच्या मान्यतेनुसार मुलगा सात वर्षांचा झाला की तो बालसैनिक बनण्यास पात्र ठरतो. अशा बालसैनिकांना तो विशेष प्राधान्य देत होता. त्याच्या जबरदस्तीस अचोली नागरिक कंटाळले. त्यांनी सरकारकडे मदत मागितली. सरकारने त्यांना तीरकामठे (bows & arrows) पुरवून स्वतःचे रक्षण स्वतः करण्यास सांगितले. LRA च्या आधुनिक शस्त्रास्त्रांपुढे तीरकामठे टिकाव धरू शकत नव्हते. ही ‘तीरकामठा चळवळ’ अयशस्वी ठरली; पण त्यामुळे कोनी भयंकर चिडला. ज्या अचोलींच्या राष्ट्रवादाचा तो पुरस्कर्ता होता, तेच अचोली त्याला विरोध करत होते, हे त्याला सहन झाले नाही. ‘जे अचोली माझ्यासोबत येणार नाहीत, त्यांना मी ठार करेन’ अशी घोषणा त्याने केली आणि अचोलींवर हल्ले सुरू केले. त्याच्या दहशतीमुळे 1987 ते 2009 दरम्यान जवळपास 20 लाख अचोली नागरिकांना स्वतःच्याच देशात निर्वासित व्हावे लागले…
9. लहान मुलांचा रोजचाच जीवघेणा प्रवास…

जोसेफ कोनी या धर्मवेड्या विकृत माणसामुळे युगांडाला 20 वर्षे गृहयुद्ध सोसावे लागले. स्वतः ला धार्मिक म्हणवून घेणारा कोनी प्रचंड क्रूर आणि दांभिक होता. ख्रिश्चन राष्ट्र स्थापनेची स्वप्नं बघणार्या कोनीने स्वार्थासाठी सुदानच्या मुस्लिम सरकारशी हातमिळवणी केली. ज्या अचोली नागरिकांच्या राष्ट्रवादाचा तो पुरस्कार करत होता, त्यांनाच (विशेषतः बालसैनिकांना) तो जबरदस्तीने सैन्यात भरती करत होता. अचोली लोक आपल्याविरुद्ध जात आहेत, हे बघून कोनीच्या LRA (Lord’s Resistance Army – ईश्वराची संघर्षसेना) ने त्यांच्याविरुद्ध शस्त्र उगारले. कोनीचे सैनिक गनिमी काव्याने लढायचे. रात्री-अपरात्री ते एखाद्या गावावर छापा मारायचे. तेथील अचोली लोक सरकारचे समर्थक अथवा गुप्तहेर आहेत, असा संशय त्यांना आला की ते निर्दयतेने त्यांची कत्तल करायचे अथवा त्यांचे कान, नाक, ओठ, हाताची बोटे कापून त्यांना विद्रुप करायचे. बालसैनिकांवर कोनीचे विशेष प्रेम (!) होते. मुलांना जबरदस्तीने सैन्यात भरती करताना जर आईवडिलांनी विरोध केला, तर मुलांनाच आईवडिलांना ठार करण्याचा आदेश दिला जायचा. त्यांनी विरोध केला तर दुसर्या बालसैनिकांकडून त्यांना ठार मारले जायचे. अशा या विकृत नराधमांनी किती मुलांचे बालपण नासविले! कोनीचे सैनिक बायका-मुलींवर बलात्कार करून त्यांचे अपहरण करायचे. त्यांना मोलकरीण अथवा गुलाम (sex slave) म्हणून वापरायचे.
कोनीच्या या दहशतीमुळे युगांडा सरकारने 1996 मध्ये अचोली लोकांसाठी IDP (Internally Displaced Person) camps सुरू केले. स्वतःच्याच देशात निर्वासित म्हणून राहण्यासाठी असलेले कॅम्प. 48 तासांत अचोली नागरिकांनी त्या कॅम्पमध्ये यावे, असे सरकारने सांगितले आणि 20 लाख लोक आपल्याच देशात निर्वासित झाले. वेगवेगळ्या ठिकाणी असलेले हे कॅम्प अत्यंत अस्वच्छ होते. त्यात क्षमतेपेक्षा अधिक लोकांना कोंबले होते. 20 लाख लोक विस्थापित झाल्याने एकेका कॅम्पमध्ये किमान 50-60 हजार लोक असायचे. त्यांच्यासाठी उभारलेल्या मातीच्या झोपड्यांमध्ये ते दाटीवाटीने राहत होते. एकेका झोपडीत 10-10 लोक. 50 हजार लोकांसाठी फक्त एकच पाण्याची विहीर. अशा तुटपुंज्या साधनसंपत्तीसह ते जगत होते. तेथील हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना मृत्यूचे कॅम्प (death camps) असे म्हटले जायचे. त्या camps मध्ये एक लाखांपेक्षा अधिक लोक मरण पावले.
खेदाची गोष्ट अशी की, त्या IDP Camps मध्येही नागरिकांना संरक्षण मिळाले नाही. रात्री-अपरात्री कोनीचे सैनिक लहानमोठ्या गटात कॅम्पवर गनिमी काव्याने हल्ले करून नागरिकांचे बळी घेणे, अपहरण करणे ही सारी कृत्ये करतच राहिले. लोकांना कॅम्पमध्येही सुरक्षा मिळाली नाही, तेव्हा ते हतबल झाले. मनुष्याला स्वतःपेक्षा अधिक चिंता अपत्यांची असते. कोनीने आपल्या मुलांचे अपहरण करून त्यांना बालसैनिक बनवू नये, यासाठी एक विचित्र प्रवास सुरू झाला…
दुपार टळून सूर्यास्ताची वेळ होताच कॅम्पमधील आणि आसपासच्या गावातील तीन ते 17 वर्षे वयोगटातील जवळपास 44 हजार मुले शहरांकडे, प्रामुख्याने गुलू (gulu) शहराकडे निघायची. त्यांच्या वेगवेगळ्या गावांपासून या शहराचे अंतर 7 ते 20 किलोमीटरपर्यंत असे. गवतातून, जंगलातून लपतछपत ही मुले गुलू शहरात पोचत. त्यांच्यासोबत एखादी घोंगडी (blanket) असे. गुलू शहरात तीन मोठी हॉस्पिटल्स होती. एका हॉस्पिटलच्या आवारात पाच हजार मुले झोपू शकत होती. नऊ वाजल्यानंतर हॉस्पिटलचे मोठे गेट बंद व्हायचे. आतील मुलांना सशस्त्र सरकारी सैनिक संरक्षण द्यायचे. हॉस्पिटल व्यतिरिक्त चर्च, बस स्टॅण्ड, शाळा, स्वयंसेवी संस्था संचालित धर्मशाळा येथेही मुले आश्रय घ्यायची. त्यांना संरक्षण पुरविले जायचे. कोनीचे सैनिक लहान-मोठ्या गटात गनिमी काव्याने हल्ला करीत असल्याने त्यांचा उपद्रव खेड्यात व्हायचा. शहरात मुले सरकारी सैनिकांच्या पहार्यात सुरक्षित राहायची. दुसर्या दिवशी सकाळ झाल्यावर मुले आपापल्या गावी रवाना व्हायची. पुन्हा सूर्यास्ताची वेळ होताच शहरात झोपायला जायची. 2003 पासून सुरू झालेली प्रवासी मुलांची ही धावपळ अनेक वर्षे सुरू होती. कधीकधी पाऊस पडल्यावर मुले हॉस्पिटलच्या कडेला आसरा शोधायची. फक्त 1 हजार मुलांना आसरा मिळू शकायचा. बाकीची 4 हजार मुले पावसात भिजत पडायची… या मुलांना पळसहीं night commuters (रात्रीचे प्रवासी) असे म्हटले जायचे. (youtube da night commuters in Uganda या नावाने सर्च केले की या मुलांचे video बघायला मिळतात). सुदानमधील धडपडणारी मुले अनाथ झाल्याने त्यांना हजारो मैलांचा प्रवास करून निर्वासित छावणीत जावे लागले. युगांडामधील मुलांना त्यांचे स्वतःचे आईवडील काळजावर दगड ठेवून कित्येक मैलांचा प्रवास रोज करायला लावत होते. प्रवास करताना मुले वाट चुकत असतील, हिंस्त्र श्वापदांचे भक्ष्य होत असतील, सर्पदंश, विंचूदंशाने जखमी होत असतील, क्वचित LRA कडून अपहृत होत असतील… रोज रात्री मुलांना असा जीवघेणा प्रवास करायला पाठविताना पालकांच्या मनाची काय स्थिती होत असेल? युद्ध माणसाला हतबल करते, हेच खरे…
10. युगांडामधील गृहयुद्ध – ‘मुलींवरील क्रूर अत्याचार आणि आईचा लढा’

युगांडामधील गृहयुद्धात जोसेफ कोनी आणि त्याच्या LRA (Lord’s Resistance Army – ईश्वराची संघर्षसेना) ने लहान, किशोरवयीन मुलींवर जे अत्याचार केले, ते वाचून अंगावर काटा येतो. 9 ऑक्टोबर हा युगांडाचा स्वातंत्र्यदिन. 1996 मध्ये 9 ऑक्टोबरला युगांडामधील अबोक गावातील सेंट मेरी शाळेत स्वातंत्र्यदिनाचे काही कार्यक्रम आयोजित केले होते, ज्यात सरकारी अधिकारी उपस्थित राहणार होते. रात्रीचे आठ वाजले तरी कुणी आले नाही, तेव्हा तेथील मिशनरी शिक्षिकांनी मुलींना वसतिगृहात न नेता शाळेतच झोपण्यास सांगितले. कोनीचे LRA सैनिक नेहमी रात्रीच हल्ला करीत, त्यामुळे रात्री शाळेबाहेर पडणे त्यांना धोक्याचे वाटले. पण कसे कोण जाणे LRA ला याची खबर लागली. त्यांनी रात्रीच शाळेवर हल्ला करून 13 ते 16 वयोगटातील 139 मुलींचे अपहरण केले. शाळेत शिक्षिका असणार्या मिशनरी सिस्टर्स एका पुरुष शिक्षकास सोबत घेऊन LRA सैनिकांच्या मागोमाग गेल्या. त्यांनी गयावया केल्यावर LRA ने 30 मुली (बहुधा सुंदर मुली) वेगळ्या करून बाकीच्या 109 मुलींना सोडण्याची तयारी दर्शविली. सर्वच मुलींना सोडा अशी विनंती सिस्टर्सनी केल्यावर LRA चे कमांडर भडकले. एकाही मुलीला सोडणार नाही अशी त्यांनी धमकी दिल्यावर नाईलाजाने सिस्टर्स त्या 30 मुलींना LRA च्या ताब्यात सोडून आणि बाकीच्या 109 मुलींना सोबत घेऊन परतल्या. त्या परत निघत असताना त्यांना पाठीमागून 30 मुलींच्या आर्त विनवण्या ऐकू येत होत्या. ‘सिस्टर मी आजारी आहे’, ‘सिस्टर मी आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे’, ‘सिस्टर मला दम्याचा आजार आहे’, ‘सिस्टर हे आमच्यावर बलात्कार करतील’ अशा वेगवेगळ्या शब्दात त्या 30 असहाय्य मुली विनंती करीत होत्या आणि LRA चे सैनिक त्यांना लाथाबुक्के मारुन तुडवत होते… पुढे या सर्व मुली विविध LRA कमांडरांकडे ‘पत्नी’ म्हणून देण्यात आल्या. त्यांनी या मुलींवर बलात्कार करून अनन्वित अत्याचार केले. 2006 पर्यंत या 30 मुलींपैकी फक्त दोन मुली सापडल्या. त्यांनी त्यांच्या बंदीजीवनाची दुःखद हकिकत सांगितली- सिस्टर्सनी मुलींना सोडल्यावर पाच मुली बंदीवासात मरण पावल्या. एका मुलीने – जेनिफरने – पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. LRA ने तिला शोधून काढले, फरफटत अंगणात आणले आणि इतर सर्व मुलींच्या हातात काठ्या देऊन तिला मरेपर्यंत मारण्यास सांगितले. सुरुवातीला मुली हळूहळू मारीत होत्या; पण LRA ने ग्रुपला विळखा घातला आणि ज्या मुली जेनिफरला हळू मारीत त्यांना LRA सैनिक मारू लागले. त्यामुळे नाईलाजाने सर्वच मुली जोरात मारू लागल्या. अखेरतः मारामुळे जेनिफरचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे ज्या-ज्या मुली रडत होत्या त्या सर्वांना LRA ने काठीने मारले. त्यांना फक्त पळालेल्या मुलींना धडा शिकवायचा नव्हता, तर मुलींमधील प्रेमाची, सहकार्याची भावनाही मारून टाकायची होती. अशा क्रूर घटना अनेक होत्या.
या 30 मुलींमध्ये शार्लट नावाची एक 14 वर्षीय मुलगी होती. तिची आई एंजेलिना अत्यम (Angelina Atyam) ही एक सुईण (midwife) होती. मुलीच्या अपहरणाची बातमी ऐकून सुरुवातीला ती खचली होती, पण नंतर तिने इतर अपहृत मुलांच्या पालकांसोबत CPA (Concerned Parents Association) या संस्थेची स्थापना केली. युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या अनेक गावांना तिने भेटी दिल्या. LRA च्या तावडीतून महतप्रयासाने पळून आलेले अनेक लोक कुपोषित, आजारी, एड्ससारख्या भयंकर रोगांनी ग्रासलेले आणि मानसिकदृष्ट्या खचलेले असत. अशा लोकांसाठी तिने जागोजागी आधारगृह (Care Centers) स्थापन केले. आठ महिन्यानंतर तिला LRA चा निरोप आला, ‘हे समाजसेवेचे काम थांबविलेस तर तुझ्या मुलीला आम्ही सोडून देऊ.’ एंजेलिना म्हणाली, ‘फक्त माझ्या मुलीला नव्हे, सर्व 30 मुलींना सोडा. माझ्या कामामुळे अनेक पालकांच्या मनात जो आशेचा दीपक तेवतोय, त्याला मी माझ्या अपत्यप्रेमापोटी कसा विझवून टाकू? तिने काम सुरूच ठेवले. 1998 मध्ये तिला UN चा Human Rights पुरस्कार मिळाला. 2004 मध्ये युगांडा सरकारने ङठच्या छावणीवर हल्ला केला, तेव्हा तिची मुलगी शार्लट LRA च्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरली. 22 वर्षांची शार्लट दोन मुलांची आई झाली होती. तिच्या पाच वर्षे आणि दोन वर्षे वयाच्या कुपोषित मुलांची एंजेलिनाने काळजी घेतली. शार्लट तिचे उरलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा शाळेत जाऊ लागली आणि एंजेलिना आजी उझचे काम सांभाळून नातवांची काळजी घेऊ लागली. एंजेलिनाची कहाणी खरोखर प्रेरक आहे. पण तिची ईश्वरभक्ती, बायबलवरील नितांत श्रद्धा यांना अनुसरुन सर्व अत्याचारी LRA सैनिकांना पीडित लोकांनी माफ करावे, असे ती म्हणते. बायबलमध्ये लिहिलेय- forgive our sins, as we forgive those who sins against us. या वचनावर तिचा विश्वास आहे. तिच्या कार्याविषयी पूर्ण आदर बाळगून सांगावेसे वाटते की, अशा नृशंस गुन्हेंगारांना माफ करणे तर्कनिष्ठ (logical) नाही. अशा अमानुष कृत्यांसाठी त्यांना कठोरतम शिक्षा व्हायलाच हवी. एंजेलिनाने मानवतावादी कार्य केले; परंतु धार्मिक उन्माद हेच अमानुष कृत्यांचे मूळ आहे, हे तिला उमजले नाही, असे सखेद म्हणावेसे वाटते.
कोनीसोबत युगांडा सरकारने अनेकदा वाटाघाटी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. कोनीने वाटाघाटीचे नाटक करीत हिंसाचार सुरूच ठेवला. 2006 मध्ये कोनीविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जाहीर केल्यावर कोनी युगांडामधून पळाला. आता तो दक्षिण सुदान, काँगो किंवा सेंट्रल आफ्रिकेत लपून बसलाय. त्याच्या कुरापाती सुरूच आहेत. दक्षिण सुदानला स्वातंत्र्य मिळाल्यावर विविध जमातींमध्ये जे युद्ध सुरू झाले, त्यात कोनीच्या LRA चा समावेश होता. अमेरिकेने कोनीला Global Terrorist जागतिक दहशतवादी जाहीर केले असून त्याला पकडण्यास जो कुणी मदत करेल, त्यास 50 लाख डॉलर्सचे बक्षिस 2013 पासून ठेवलेय. 2012 मध्ये आफ्रिकन युनियनने पाच हजार सैनिक कोनीला पकडण्यासाठी पाठविले, पण जंगलात लपण्याचा चांगलाच सराव असलेला कोनी अद्याप कुणाच्याच तावडीत सापडलेला नाहीये. तो लवकर सापडो आणि चार देशांत उत्पात घडविणार्या त्याच्या LRA चा नायनाट होवो, हीच इच्छा…
11. रवांडामधील भयंकर नरसंहार
आफ्रिका खंडात रवांडा हा अगदी छोटासा देश. जगाच्या नकाशावर सापडायलाही कठीण. या छोट्या देशातील गृहयुद्धात जगातील सगळ्यात मोठा नरसंहार झाला. अवघ्या शंभर दिवसांच्या कालावधीत दहा लाख माणसे (एका दिवसात सरासरी दहा हजार माणसे) ठार झाली. हा संघर्ष होता दोन जमातींमधील.

रवांडामधील लोक प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचे आहेत. इंग्लिश आणि फ्रेंच या त्यांच्या राष्ट्रीय भाषा आहेत. हुतू आणि तुत्सी या दोन प्रमुख जमाती रवांडामध्ये आहेत. दोन्ही जमातीतील लोक ख्रिश्चन. त्यामुळे त्यांच्यातील बेबनाव धर्मामुळे नव्हता; पण टोळीवाद होताच. हुतू आणि तुत्सी लोकांची चेहरेपट्टी सारखीच. बाह्यरूपावरून कोण हुतू आणि कोण तुत्सी हे ओळखणे अशक्यच. हुतू लोकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन शेती आणि तुत्सी लोकांच्या उपजीविकेचे साधन पशुपालन. 1962 मध्ये बेल्जियमकडून रवांडाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दोन्ही जमातींमध्ये लहानमोठा संघर्ष सुरू होता. त्याला व्यापक रूप मिळाले ते 1990 पासून सुरू झालेल्या गृहयुद्धात. दोन्ही जमातींमधील लोक एकमेकांचा पराकोटीचा द्वेष करीत होते. 1990 मध्ये एका हुतूवादी वार्तापत्राने खास हुतूंसाठी अशी दहा मुद्दे असलेली नियमावली तयार केली होती. ती पुढीलप्रमाणे-
1) प्रत्येक तुत्सी स्त्री ही फक्त तिच्या जमातीशी एकनिष्ठ असते. त्यामुळे हुतू माणसाने तुत्सी स्त्रीशी मैत्री, लग्न करु नये. तुत्सी स्त्रीला सेक्रेटरीची नोकरी देऊ नये.
2) सर्व हुतू स्त्रिया पत्नी, आई, ऑफिस कर्मचारी म्हणून तुत्सी स्त्रियांपेक्षा अधिक प्रामाणिक असतात.
3) हुतू स्त्रियांनो जर तुमचा नवरा बहकला असेल (तुत्सी स्त्रीकडे आकर्षित झाला असेल) तर त्याला सन्मार्ग दाखवा.
4) तुत्सी लोक व्यवसायात अप्रामाणिक असतात. त्यामुळे तुत्सी लोकांशी व्यवसायात भागीदारी करू नये.
5) सर्व राजनैतिक, प्रशासकीय, आर्थिक, लष्करी क्षेत्रांतील महत्त्वाच्या पदांवर हुतू लोकांचीच नेमणूक व्हावी.
6) शैक्षणिक क्षेत्रात हुतूंना प्राधान्य द्यावे.
7) लष्करात प्रामुख्याने हुतू सैनिकांचा समावेश करावा.
8)तुत्सी लोकांवर अजिबात दयामाया दाखवू नये.
9)हुतू लोकांनी आपापसात बंधुभाव निर्माण करून एकत्र यावे.
10) हुतू राष्ट्रवादाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार करावा.
अशाप्रकारे हे दहा मुद्दे स्वजमातीबद्दल दुराभिमान आणि परजमातीबद्दल द्वेष दर्शवित होते. अर्थात, तुत्सीही काही कमी नव्हते. अतिरेकी विचारांच्या तुत्सी लोकांनी RPF (Rwanda Patriotic Front) नावाची संघटना स्थापन करून हुतूविरोधी कारवाया सुरू केल्या. 1990 पासून सुरू झालेल्या गृहयुद्धात काही भूभागावर हुतू, तर काहींवर तुत्सी विजय मिळवत होते. निर्णायक विजय-पराजय कुणाचाच होत नव्हता. 6 एप्रिल 1994 रोजी तुत्सी RPF ने जमिनीतून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राने (surface to air missile ने) चक्क रवांडाच्या हुतू राष्ट्रपतींचे विमान कोसळविले. विमानात रवांडाच्या शेजारच्या बुरुंडी (burundi) देशाचे राष्ट्रपतीही होते. तेही हुतू जमातीचेच होते. एका दगडात दोन पक्षी मारावेत, त्याप्रमाणे तुत्सी लोकांनी दोन देशांचे हुतू राष्ट्रपती एकत्रच ठार केले आणि त्यानंतर काही तासांमध्ये सूड घेण्यासाठी हुतू लोकांनी तुत्सी लोकांची कत्तल सुरू केली. (नंतर तुत्सी RPF ने असा दावा केला की हुतू लोकांनी स्वतःच त्यांच्या राष्ट्रपतींचे विमान कोसळविले आणि आरोप तुत्सी लोकांवर ठेवला. तुत्सी लोकांची सामूहिक कत्तल करण्यासाठी हुतूंना काहीतरी मोठे कारण हवे होते म्हणून त्यांनी हे कृत्य केले. खरा आरोपी कोण, ते अद्याप अज्ञात आहे.)
हुतू राष्ट्रपतींच्या मृत्यूनंतर तुत्सीविरोधी युद्ध जवळपास 100 दिवस सुरू होते, ज्यात दहा लाख लोक ठार झाले. यातील 70 टक्के लोक तुत्सी होते. रवांडाच्या एकूण population (लोकसंख्या) पैकी 20 टक्के लोक फक्त या शंभर दिवसांत ठार झाले. हुतू लष्कराने आपल्या जमातीतील लोकांच्या हातात जबरदस्तीने शस्त्रे दिली. छोट्या गावात सर्व लोक एकमेकांस ओळखतात. तुत्सी आणि हुतू वर्षानुवर्षे एकमेकांशेजारी राहत होते. शस्त्रे हाती घेतलेल्या हुतू लोकांनी आपल्याच शेजारच्या माणसाला ठार केले. जो जो ‘मवाळ हुतू’ (moderate hutu) अशी कत्तल करायला नकार देई, त्याचाही खून करण्यात आला. ‘एक तर तुत्सी लोकांना मारा किंवा स्वतः मरा’ या सक्तीने अनेक हुतू लोक खुनी बनले. शहरात प्रत्येकास ID card दाखवायला सक्ती केली. तुत्सी माणूस असल्यास तात्काळ गोळी घातली जाई. बायकांवर अत्याचार करायला बलात्कार नावाचे शस्त्र होतेच. पण रवांडामध्ये या शस्त्राचाही अत्यंत अमानुषरित्या वापर झाला. शहरातील हॉस्पिटल्समध्ये एड्सचे जे पेशंट होते, त्यांना मुक्त करून rape squad (बलात्कार पथके) तयार करण्यात आली. त्या एड्स पेशंटनी महिलांवर बलात्कार करून त्यांना आणि त्यांच्या पुढील अपत्यांना एड्सचा महारोग देऊन वेदनादायी मरण द्यावे, ही त्यामागील योजना. असल्या निर्घृण योजना आखायला किती पाताळयंत्री मेंदू लागतो! या एड्स पेशंटनी अनेक तुत्सी स्त्रियांवर बलात्कार केलेच, त्याशिवाय मवाळ हुतूंच्या बायका, मुली, तुत्सी पुरुषांशी लग्न केलेल्या हुतू बायकांवरही बलात्कार केले. या युद्धात लहान मुलांनीही खूप भोगले. सुदानमधील धडपडणारी मुले आणि युगांडामधील रात्रीचे प्रवासी यांच्यापेक्षा रवांडामधील मुलांचा संघर्ष हा वेगळा, परंतु तितकाच वेदनादायक होता.
12. रवांडामधील कोवळे कुटुंबप्रमुख

6 एप्रिल 1994 पासून जुलैच्या मध्यापर्यंत चाललेल्या रवांडाच्या नरसंहारात 10 लाख लोक ठार झाले. नरसंहारात हुतू लोकांनी तुत्सी जमात पृथ्वीवरून नामशेष करण्याचे ठरविले होते. पण तुत्सी RPF ने बाहेरच्या देशांतून कुमक मिळवून अखेरतः हुतूंवर विजय मिळविला. त्यानंतर जवळपास 20 लाख हुतू लोक आजूबाजूच्या देशांमध्ये; मुख्यतः काँगोमधील निर्वासित कॅम्प्समध्ये आश्रयास गेले. तेथील अस्वच्छता, रोगराई, दाटीवाटीने राहणे, मलेरिया, कॉलेरा सारख्या आजाराने अनेक हुतू लोक मेले. पण तुत्सी RPF ने परदेशातही त्यांची पाठ सोडली नाही. काँगोचा हुकूमशहा मोबुतु (Mobutu) ने रवांडा गृहयुद्धात हुतूंना पाठिंबा दिला होता. काँगो सरकारच्या मदतीने हुतू पुन्हा एकत्रित होतील आणि पुन्हा नरसंहार (सशपेलळवश) सारखे नृशंस कृत्य करतील, या भीतीने RPF ने परदेशातही हुतूंचा पाठलाग केला. शेजारील युगांडा देशाच्या मदतीने रवांडाने काँगोतील मोबुतु सरकारविरुद्ध युद्ध पुकारले. काँगोत जी दोन गृहयुद्धे झाली त्यामागे जी अनेक कारणे होती त्यात ‘हुतू-तुत्सी’ संघर्ष हे प्रमुख कारण होते. या युद्धात काँगोतील तेव्हाच्या सरकारचा पराभव झाला. हुतूंनी पुन्हा हिंसाचार केला नाही. लाखो हुतू लोक आजही निर्वासित कॅम्प्समध्ये हलाखीचे जीवन जगत आहेत.
रवांडाच्या गृहयुद्धात अनेकदा मानवाधिकारांचे उल्लंघन झाले. तुत्सी लोकांची कत्तल होत असताना एका गावातील चर्चमध्ये 1500 ते 2000 तुत्सी लोक लपून बसले होते. त्या चर्चचा पाद्री सेरोम्बा (Seromba) हा हुतू जमातीचा होता. त्याने हुतू लोकांना चर्चमध्ये तुत्सी लपल्याची माहिती दिली. बुलडोझरने चर्चचे द्वार पाडण्यास मदत केली. चर्चमधील सर्व तुत्सी लोकांची बायकामुलांसकट कत्तल केली. एवढे करून तो युध्द संपल्यावर इटलीला पळून गेला आणि फ्लोरेन्समधील चर्चमध्ये पाद्री म्हणून साळसूदपणे काम करु लागला. त्याच्यावर 10 वर्षांनंतर 2004 मध्ये खटला भरण्यात आला. त्यात त्याला नरसंहारात सहभाग घेतल्याबद्दल दोषी ठरवून 15 वर्षांची शिक्षा देण्यात आली. सध्या तो तुरुंगात आहे, पण त्याचे अपराध पाहता त्याला फार कमी शिक्षा मिळाली, असेच म्हणावे लागेल.
या युद्धादरम्यान काही मोजक्या लोकांकडून माणुसकीचेही दर्शन घडले. पॉल रुसेसाबागीना (Paul Rusesabagina) या रवांडामधील एका मोठ्या होटेलच्या मॅनेजरने त्याच्या हॉटेलात 1268 हुतू आणि तुत्सी लोकांना आश्रय दिला. तो स्वतः हुतू आणि त्याची पत्नी तुत्सी होती. साम, दाम, दंड, भेद सर्व मार्गांचा अवलंब करीत त्याने स्वतःचा परिवार आणि आश्रयाला आलेल्या लोकांचे रक्षण केले. त्यावर आधारित ‘हॉटेल रवांडा’ हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता ज्यास ऑस्करचे नामांकन मिळाले होते.
रवांडाच्या नरसंहारात जवळपास तीन लाख मुले अनाथ झाली होती किंवा पालक एड्ससारख्या रोगांनी पीडित असल्याने अनाथ होण्याच्या मार्गावर होती. युद्धात पूर्ण जमातीला संपविण्याचा प्रयत्न झाल्याने अशा मुलांना नातेवाईकांचाही आधार नव्हता. अशा परिस्थितीत ही मुलेच एकमेकांचा आधार बनली. एका कुटुंबात चार-पाच मुले असतील, तर त्यातील सगळ्यात मोठा मुलगा किंवा मुलगी कुटुंबप्रमुख बनून आपल्या भावंडांची काळजी घेऊ लागली. या कोवळ्या कुटुंबप्रमुखांचे वय साधारणतः 14 – 15 वर्ष असे. काही कुटुंबप्रमुख केवळ दहा-बारा वर्षांचेही होते! असे कोवळे कुटुंबप्रमुख असलेली जवळपास 60 हजार कुटुंबे रवांडात होती, ज्यात तीन लाख मुले (एका कुटुंबात सरासरी पाच मुले) राहात होते. त्यांची संख्या रवांडाच्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के होती. या कुटुंबांना Child Headed Household (CHH) असे म्हटले जाते. CHH कुटुंबांच्या अनेक अडचणी होत्या. काही कुटुंबप्रमुख मुलींवर युद्धात बलात्कार झाला होता. त्यातून निर्माण झालेल्या बालकांचाही सांभाळ त्यांना करावा लागत होता. लहान वयात मातृत्व आणि लहान भावंडांची जबाबदारी पेलवताना त्यांचे जीवन कोमेजून गेले होते. पुन्हा या मुलींचे लैंगिक शोषण होण्याचा धोकाही होताच. आपल्या लहान भावंडाची आणि अपत्यांची उपासमार टळावी, या हेतूने काही कुटुंबप्रमुख मुली नाईलाजाने वेश्याव्यवसाय करीत होत्या.
लहान वयात कुटुंबाची जबाबदारी पडल्याने या कुटुंबप्रमुखांचे (मुलगे आणि मुली दोघांचे) शिक्षण थांबले होते. चरितार्थासाठी मिळेल ती छोटी-मोठी कामे कुटुंबतील मोठी मुले, क्वचित सर्व मुले करीत होती. त्यातील काहींना एड्सची लागणही झाली होती, तर काही अत्यंत कुपोषित होती. त्यापैकी फक्त 50 टक्के मुलांपर्यंत उपचार पोचू शकले. बाकी 50 टक्के मुले औषधाविना दुखणे अंगावर काढत होते. एड्सचे रुग्ण, बलात्कार झालेल्या मुली यांना आजूबाजूच्या समाजाकडूनही वाळीत टाकले जात होते. काही स्वार्थी लोकांनी या मुलांच्या पुनर्वसनासाठी एनजीओकडून पैसा मिळविला आणि स्वतःच हडप केला. ही लहान मुले एकमेकांना जपत होती. त्यांच्यातील भावनिक बंध मजबूत होते, पण आजूबाजूच्या समाजाकडून मिळालेल्या वाईट वागणुकीमुळे त्यांचे समाजाविषयी प्रतिकूल मत बनले होते. माणसांच्या चांगुलपणावरील त्यांचा विश्वास उडाला होता. गावातील मध्यस्थ पैसे खातात, हे लक्षात आल्यावर काही एनजीओंनी थेट मुलांशी संपर्क साधून त्यांना काय हवे, नको ते विचारून त्यांच्या अन्नवस्त्र आणि शाळेतील शिक्षणाची सोय केली. काहींनी त्यांना शेती, हस्तकला इत्यादी व्यावसायिक शिक्षण देण्याचाही प्रयत्न केला. काही मुलांचे जीवन सावरले; पण युद्धातील अमानुषता आणि समाजाची उदासीनता यामुळे दुखावलेल्या त्यांच्या मनावर उपचार झाले नाहीत. त्यांचे psychological counseling करण्याचा फारसा प्रयत्न कुणी केला नाही. तरीही हे कोवळे कुटुंबप्रमुख आपल्या सर्व शारीरिक, मानसिक जखमांसह आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ बनले! अकाली अंगावर पडलेली जबाबदारी त्यांनी निभावली!
13. काँगोतील गृहयुध्द – ‘संहारक’ (खनिज) संपत्ती
‘एक हुकूमशहा कसा घडला’
आफ्रिकेतील अनेक देश खनिजसंपत्तीने समृध्द आहेत. पण या खनिजसंपत्तीने तेथील सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करण्याऐवजी दुःखदच केलेय. याचे कारण म्हणजे बड्या सत्ताधिशांकडून नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा दुरुपयोग. महासत्तांच्या महत्त्वांकांक्षेत हुकूमशहा कसे निर्माण होतात आणि सामान्य जनतेचे प्रदीर्घकाळ शोषण कसे करतात याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे काँगो! काँगोचा हुकूमशहा मोबुतु सेसे सेको याने तब्बल 32 वर्ष तेथील जनतेवर अत्याचार केले. ’एक हुकूमशहा कसा घडला’ याची ही कहाणी-
मोबुतु सेसे सेको (Mobutu Sese Seko) याचे खरे नाव जोसेफ मोबुतु. 14 ऑक्टोबर 1930 रोजी मोबुतुचा जन्म झाला, तेव्हा काँगोवर बेल्जियमचे शासन होते. जुनाट रूढीपरंपरांचा जाचक विळखा आणि परतंत्र राष्ट्राचे जेत्यांकडून होणारे शोषण काँगोची जनता सहन करीत होती. तेथील परंपरेनुसार गावातील प्रमुख, सामर्थ्यवान पुरुष अनेक बायका ठेवू शकत होता. मोबुतुची आई किशोरवयात असताना एका गावप्रमुखाची नजर तिच्यावर पडली आणि त्याच्या जनानखान्यात तिची रवानगी करण्याचे बेत शिजू लागले. जनानखान्यातील पशुतुल्य जीवन टाळण्यासाठी ती गावातून पळून शहरात आली आणि एका हॉटेलात मोलकरीण म्हणून काम करू लागली. नंतर तिची भेट एका बेल्जियन न्यायाधिशाकडे स्वयंपाकी (आचारी) म्हणून काम करणार्या पुरुषाशी झाली. दोघांनी लग्न केले आणि काही वर्षांनी मोबुतुचा जन्म झाला. मोबुतु आठ वर्षांचा असताना त्याचे वडील मरण पावले. ज्या बेल्जियन न्यायाधिशाकडे त्याचे वडील स्वयंपाकी म्हणून काम करीत होते, त्याच्या पत्नीला मोबुतुचा चुणचुणीतपणा आवडला. त्याच्यातील हुशारी हेरून तिने त्याला फ्रेंच भाषेचे शिक्षण दिले. पुढे शाळेतही मोबुतु अभ्यासात आणि खेळात हुशार; परंतु व्रात्य, खोडसाळ विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध झाला. वयाच्या 19 व्या वर्षी तो शाळेतून पळाला आणि एका जहाजावर बसून पर्यटनासाठी निघाला. तेथे त्याला एक मुलगी भेटली. तिच्यासोबत अनेक आठवडे राहिल्यावर अखेरतः शाळेला त्याचा ठावठिकाणा लागला. तेथील कायद्याप्रमाणे शाळेने त्याला सात वर्षे लष्करात सक्तीची नोकरी करण्याची शिक्षा दिली. लष्करातील शिस्तबद्ध जीवन मोबुतुला मानवले. एक जवान म्हणून ड्यूटी करताना त्याला जेव्हा-जेव्हा मोकळा वेळ मिळे तेव्हा तो पुस्तके वाचत असे. लष्करात अनेक बंधने असल्याने तो गुप्तपणे टोपणनावाने वृत्तपत्रात लेख लिहीत असे. सात वर्षांची सक्तीची लष्करी नोकरी झाल्यावर तो एक पत्रकार म्हणून काम करू लागला. या कालावधीत त्याचा अनेक विचारवंतांशी परिचय झाला आणि काँगोच्या बेल्जियमविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात तो सहभागी झाला. पॅट्रीक लुमुम्बा (Patrice Lumumba) या काँगोच्या अग्रणी स्वातंत्र्यसैनिकाचा तो सहाय्यक झाला. (काही लोकांच्या मते, बेल्जियन अधिकार्यांनीच मोबुतुची लुमुम्बावर नजर ठेवण्यासाठी/ हेरगिरी करण्यासाठी नेमणूक केली होती.) कारण काहीही असो; पण काँगोच्या इतिहासावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी ती दोन माणसे त्याक्षणी एकत्र आली. लुमुम्बासोबत मोबुतुने अनेक चळवळी, विचारवंतांच्या परिषदांमध्ये भाग घेतला. सर्व उपस्थित लोकांना त्याच्या तरतरीत बुद्धीचे दर्शन घडत होते. 30 जून 1960 रोजी काँगोला बेल्जियमपासून स्वातंत्र्य मिळाले. लुमुम्बा पंतप्रधान झाला. त्याने आपला खास सहकारी – मोबुतुची लष्कराचा प्रमुख म्हणून नेमणूक केली. ज्या लष्करात मोबुतुने एकेकाळी शिक्षा म्हणून सैनिकाची नोकरी केली होती, त्या लष्काराचा तो प्रमुख झाला, तेही वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी!
नवस्वातंत्र्य मिळालेल्या काँगोसमोर अनेक नवीन समस्या होत्या. काँगोतील कतंगा (katanga) हा प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्तीने सर्वाधिक समृद्ध होता. त्यामुळे स्थानिक राजकारणी लोकांना तेथील खनिजसंपत्तीचे सारे फायदे स्वतःलाच हवे होते. त्यांना कतंगा हा प्रदेश स्वतंत्र देश म्हणून हवा होता. (भारतातील काश्मीरसारखेच हे उदाहरण). काँगोत युरेनियम हे खनिज सापडते, जे अण्वस्त्रनिर्मितीसाठी आवश्यक आहे. दुसर्या महायुद्धात अमेरिकेने अण्वस्त्रनिर्मितीसाठी जे काही युरेनियम वापरले, ते काँगोमधूनच निर्यात झाले होते. साहजिकच अमेरिका आणि रशिया दोघांचीही त्या समृध्द युरेनियम साठ्यावर नजर होती. तो कालवधी अमेरिका- रशिया दरम्यानच्या शीतयुद्धाचा (cold war) असल्याने दोन्ही देशांत प्रचंड तणाव होता. काँगोस स्वातंत्र्य मिळाल्यावर जे गोरे बेल्जियन लोक देश सोडून जात होते, त्यांची कत्तल काळे सैनिक करू लागले. दंगली सुरू झाल्या. स्वातंत्र्य हवे असलेल्या कतंगा प्रदेशात बंडखोरी सुरूच होती. पंतप्रधान लुमुम्बाने UN ची मदत मागितली. UN चे सैन्य कांगोच्या भूमीवर उतरले; मात्र त्यांनी हा तुमचा अंतस्थ मामला आहे, असे बोलत कतंगा बंडखोरांवर शस्त्र उगारायला नकार दिला. हतबल पंतप्रधान लुमुम्बाने अखेरतः रशियाची मदत मागितली. काँगोचा अमेरिकाधार्जिणा राष्ट्रपती ‘कासा-वुबु’ यास हे अजिबात रुचले नाही. पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघांनी एकमेकांना अटक करण्याचा आदेश लष्करप्रमुखास- मोबुतुला – दिला. मोबुतुचा कल अमेरिकेकडे होता. उखअ शी संधान साधून त्याने ज्याच्या जीवावर तो लष्करप्रमुख झाला होता, त्या आपल्या एकेकाळच्या ज्येष्ठ सहकारी लुमुम्बाला अटक केली, तुरुंगात टाकले, अनेक महिने छळ केला आणि एक दिवस गोळ्या घालून ठार केले!
त्यानंतर 1963 पर्यंत त्याने UN ची मदत घेऊन कतंगा प्रदेशातील बंडखोरी संपुष्टात आणली. या कालावधीत 1लाख लोक ठार झाले. तेथील लोकांना खूष करण्यासाठी राष्ट्रपती कासा-वुबुने कतंगा बंडखोर नेत्याला – Moise Tshombe यास काँगोचा पंतप्रधान बनविले, पण त्या दोघांचेही एकमेकांशी पटले नाही. आता लष्करप्रमुख मोबुतुची महत्त्वाकांक्षा वाढली होती. अमेरिकेच्या मदतीने आपण काहीही करु शकतो, कुणालाही पराभूत करू शकतो, हे त्याला उमजले होते. त्याने पुन्हा एकदा लष्करी उठाव करुन Tshombe ला तुरुंगात टाकले, नंतर ठार मारले. अवघ्या 35 व्या वर्षी मोबुतु काँगोचा हुकूमशहा बनला! रशियाचे काँगोवर आणि तेथील खनिजसाठ्यावर वर्चस्व निर्माण होऊ नये म्हणून अमेरिकेने मोबुतु नावाचा विषवृक्ष वाढविला. अमेरिकेच्या कृपाछत्राखाली माजलेल्या मोबुतुने 32 वर्ष किती भयंकर अत्याचार केले.
14. काँगोतील गृहयुध्द – ‘एक विक्षिप्त हुकूमशहा’
अमेरिकेचा वरदहस्त लाभलेला मोबुतु सेसे सेको वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी काँगोचा हुकूमशहा बनला. मोबुतु हा Cult of Personality ने – स्वयंप्रशंसेने ग्रस्त होता. सर्व प्रसारमाध्यमांचा वापर करीत जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवर स्तुतिसुमने उधळते आणि जनमानसात स्वतःची एक उदात्त, आदर्श आणि पूजनीय प्रतिमा निर्माण करते, तेव्हा ती व्यक्ती Cult of Personality ने ग्रस्त असते. सत्ता काबीज केलेल्या मोबुतुने मोठ्या जनसमुदायासमोर जे पहिले भाषण केले, त्यात त्याने जाहीर केले की, पुढील पाच वर्षे काँगोत कुठलाही राजकीय पक्ष (विरोधी पक्ष) अस्तित्वात असणार नाही. या लष्करी हुकूमशहाने सर्व राजकीय पक्ष बरखास्त केल्यानंतर 1967 मध्ये स्वतःचा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन केला – Popular Movement of Revolution (PMR). पुढे जवळपास 23 वर्षे 1990 पर्यंत हाच एकमेव अधिकृत राजकीय पक्ष काँगोत अस्तित्वात होता आणि त्याचा सर्वोसर्वा होता मोबुतु! जसे जन्मतः एखाद्या देशाचे नागरिकत्व लाभते, तसे काँगोतील सर्व नागरिक जन्मतः याच एका राजकीय पक्षाचे सदस्य आपोआप बनत असत, बनविले जात असत. (त्यांच्यापुढे दुसरा पर्याय तरी कुठे होता!) काँगोतील संविधानानुसार दर सात वर्षांनी राष्ट्रपतिपदासाठी निवडणुका होत. राष्ट्रपतिपदासाठी वर्षानुवर्षे फक्त एकच (एकमेव) उमेदवार निवडणूक लढवत होता आणि बिनविरोध निवडून येत होता- मोबुतु. (दुसर्या कुणाला निवडणूक लढविण्याचा अधिकारच नव्हता.) निवडणुकीसाठी मतदान करणार्या मतदारांपुढे दोनच पर्याय ठेवले जायचे- हिरव्या रंगावर शिक्का मारला म्हणजे मोबुतुला मत आणि लाल रंगावर शिक्का मारला म्हणजे मोबुतुला विरोध. काही दिवसांनंतर सरकारी पातळीवरून निकाल जाहीर व्हायचा- मोबुतुला 1,01,39,699 मते मिळाली आणि त्याच्या विरोधात 157 मते पडली. (हे आकडे किती खरे आणि किती खोटे, ते सुज्ञास सांगायची गरज नाही.) अर्थात मोबुतुला अजिबात विरोध झाला नाही असे नव्हे, पण त्याने सर्व विरोधकांना निर्दयतेने संपविले. 1966 मध्ये त्याच्या मंत्रिमंडळातील चार लोकांना त्याने सरकारविरोधी बंडाच्या आरोपाखाली अटक केली, त्यांच्यावर खटला चालविला आणि 50 हजारच्या जनसमुदायासमोर चार कॅबिनेट मंत्री फासावर लटकाविले! स्वतःच्या संरक्षणासाठी मोबुतुने अनेक लष्करी संघटना स्थापन केल्या. मोबुतुचे संरक्षण करणे हे या विविध संघटनांचा एकमेव उद्दिष्ट होतो. सुरुवातीला मोबुतुने आपल्या विरोधकांना निर्दयतेने संपविले. नंतर त्याच्या लक्षात आले की फक्त माणसे मारणे हे काही फारसे शहाणपणाचे कृत्य नाही. मग त्याने नवीन उद्योग आरंभला – माणसांना विकत घ्यायचा (लाच द्यायचा). सुरुवातीला तो आपल्या विरोधकांना ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण करायचा आणि नंतर भरपूर लाच देऊन त्यांना कायमचे मिंधे करून घ्यायचा. अशा प्रकारे 1970 पर्यंत त्याने सर्व विरोधकांना एकतर ठार मारले अथवा (लाच देऊन) कणाहीन बनविले! त्याच्या या लाच देण्याघेण्याच्या वृत्तीमुळे मोबुतु हा त्याच्या कालावधीतील सर्वाधिक भ्रष्ट आफ्रिकन नेता होता. काँगोतील परदेशी उद्योजक, गुंतवणूकदार यांना त्याने देशाबाहेर हाकलले आणि ते उद्योग स्वतःच्या नातेवाईकांना, मर्जीतल्या माणसांना चालवायला दिले. साहजिकच उद्योगधंद्यांचे दिवाळे निघाले. आपल्या देशातील समृद्ध खनिजसंपत्ती परदेशात विकून त्याने, त्याच्या नातेवाईकांनी आणि मर्जीतील माणसांनी अमाप पैसा कमविला आणि स्विस बँकेतील आपापल्या खात्यांमध्ये जमा केला. सर्व स्तरांवरील भ्रष्टाचारी वृत्तीमुळे देशावरील कर्ज वाढले, चलनफुगवटा निर्माण झाला आणि देशाच्या चलनाचे झपाट्याने अवमूल्यन झाले. काँगोतील सामान्य सरकारी कर्मचारी अनेक महिने विनावेतन काम करत होते, देशात मूलभूत सुविधांची कमतरता होती आणि जनता उपासमारीने मरत होती…
मोबुतुला आफ्रिकन रुढीपरंपरांचा अभिमान होता आणि पाश्चात्य संस्कृतीचा तिटकारा होता. (अमेरिकेच्या जीवावर मोठा झालेला माणूस पाश्चात्य संस्कृतीचा तिटकारा करत होता, हा किती मोठा विरोधाभास!) 1971 मध्ये त्याने काँगो देशाचे नाव बदलून ‘झैरे’ हे आफ्रिकन नाव ठेवले. अनेक शहरांची नावे बदलण्याची मोहीम त्याने हाती घेतली. त्याने पुरुषांना युरोपियन पोशाख, नेकटाय वापरायला मनाई केली आणि ‘abacost’ हा पारंपरिक आफ्रिकन पोशाख घालण्याची सक्ती केली. काँगोतील लोक ख्रिश्चन असल्याने त्यांची नावे यूरोपियन पद्धतीची होती. मोबुतुने लोकांना आपापली नावे बदलून आफ्रिकन नावे ठेवण्यास सांगितले. त्याने देशातील ख्रिश्चन पाद्री लोकांना धमकी दिली की, जर एखादे युरोपियन नाव असलेल्या बालकास बाप्तिस्मा दिला तर त्यांना कमीत कमी 5 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल. मोबुतुचे स्वतःचे जन्मनाव जोसेफ मोबुतु असे होते. ‘जोसेफ’ हे युरोपियन नाव बदलून त्याने स्वतःला ‘मोबुतु सेसे सेको’ (अजेय सामर्थ्यशाली योद्धा) हे आफ्रिकन नाव धारण केले.
15. ‘विक्षिप्त आणि विकृत हुकूमशहा’चा अंत

मोबुतु सेसे सेकोने काँगोचे नाव बदलून झैरे हे आफ्रिकन नाव ठेवले. मोबुतु हा (Cult of Personality) स्वयंप्रशंसा/स्वयंउदात्तीकरण ने ग्रस्त होता. झैरेत (काँगोत) टीव्हीवर दररोज संध्याकाळच्या बातम्यांअगोदर मोबुतुला दाखविले जात असे. एखादा देव जसा स्वर्गातून खाली अवतरतो, तसे मोबुतुला ढगांमधून खाली उतरताना दाखविले जात असे. राष्ट्रपिता, मसिहा, लोकरक्षक, सर्वोत्तम योद्धा अशा प्रकारच्या अनेक उपाधी देऊन त्याचा गौरव केला जात असे. सर्व सार्वजनिक जागांवर त्याची प्रतिमा असलेले मोठमोठे फलक लावले जात. सरकारी कर्मचारी त्याचे चित्र/फोटो असलेले शर्ट घालत. एक वेळ अशी आली की, त्याने सर्व प्रसारमाध्यमांना त्याचे स्वतःचे नाव सोडून इतर कुणाचेही नाव प्रसिद्ध करण्यास मनाई केली. (स्वतः व्यतिरिक्त इतर कुणाचेही नाव दखल घेण्याइतके मोठे नाही, हा त्यामागील उद्देश). प्रसारमाध्यमांनी लोकांना फक्त त्यांच्या कामाच्या हुद्द्यांवरुन (रँकवरून) संबोधावे असे त्याने जाहीर केले.
आपल्या रांगड्या स्वभावास अनुसरून त्याने 30 ऑक्टोबर 1974 मध्ये मोहम्मद अली आणि जॉर्ज फोरमन या दोन मुष्टीयोद्ध्यांची (बॉक्सर्सची) प्रसिद्ध अशी rumble in the jungle लढत आयोजित केली. त्यासाठी त्याने प्रत्येक बॉक्सरला 50 लाख डॉलर्स दिले. (ही 1974 मध्ये फार मोठी रक्कम होती). खेळाडूंना त्याकाळी इतके पैसे फक्त मोबुतुच देऊ शकत होता. त्याच्या देशाची एक सकारात्मक प्रतिमा जगापुढे ठेवण्याचा हा त्याचा (त्याच्या रांगड्या स्वभावानुसार) प्रयत्न होता. मात्र जेव्हा हे बॉक्सर विमानातून झैरेच्या भूमीवर उतरले, तेव्हा त्यांच्या स्वागतास आलेल्या महिला नर्तिका खेळाडूंच्या नावाचा जयजयकार करण्याऐवजी ’मोबुतु सेसे सेको’ या नावाचाच जयजयकार करीत होत्या!
मोबुतुच्या व्यक्तिमत्त्वातील अत्यंत किळसवाणा भाग म्हणजे त्याने अनेक कुमारी मुलींचा कौमार्यभंग केला. Droit de cuissage नावाची किळसवाणी पद्धत मध्ययुगीन युरोपात अस्तित्वात होती. या पद्धतीनुसार युरोपातील सरंजामदारांना तेथील कुमारिकांचा कौमार्यभंग करण्याचा अधिकार प्राप्त होता. काही नवविवाहित स्त्रियांना आपल्या लग्नानंतरची पहिली रात्र या सरंजामदारांजवळ व्यतीत करावी लागत असे आणि त्यानंतरच आपल्या पतीसोबत संसार करता येत असे. मध्ययुगीन युरोपातील जवळपास नामशेष झालेली ही किळसवाणी पद्धत मोबुतुने आफ्रिकेत चालू केली. झैरेत तो जेथे-जेथे जायचा, तेथील गावप्रमुख आपल्या गावातील कुमारिकांना मोबुतुला अर्पण करायचा. ‘आपल्या मुलीचा राष्ट्रपिता, मसिहा मोबुतुने कौमार्यभंग केला’ ही बाब मुलीच्या पालकांना, परिवाराला प्रतिष्ठेची वाटत असे. (विकृत अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन माणसे आपली माणुसकी, अपत्यप्रेम कसे विसरतात, याचे हे दुःखद उदाहरण). किती निरागस मुलींची वैवाहिक जीवनाबद्दलची सुंदर स्वप्ने त्या विकृत माणसाने उद्ध्वस्त केली! (काही वर्षांपूर्वी मोबुतुची आई एका गावप्रमुखाच्या जनानखान्यात जाण्याचे टाळण्यासाठी घरातून पळून शहरात आली होती. काही वर्षांनंतर तिचा स्वतःचा मुलगा अनेक मुलींना त्याच्या विकृतीचे लक्ष्य/भक्ष्य बनवीत होता. एका आईसाठी किती ही शोकांतिका!)
1990 संपेपर्यंत अमेरिका- रशियादरम्यानचे शीतयुद्ध संपुष्टात आले होते. त्यामुळे जागतिक राजकारणाचे संदर्भदेखील बदलले होते. झैरेची जवळपास एक पिढी मोबुतुच्या दहशतीखाली जगली होती. पण नवीन पिढी अशी हतबल नव्हती. मोबुतु आणि त्याच्या सहकारी लोकांनी अनेक वर्षे झैरेचे शोषण केल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे देशांतर्गत अस्वस्थता, विरोध वाढत होता. मोबुतु स्वतः वृद्धत्व आणि आजारपणाने ग्रस्त होता. अखेरतः त्याने देशात इतर पक्षांना मान्यता दिली; पण लष्करावरील स्वतःची पकड मजबूत ठेवली.

रवांडामधील हुतू-तुत्सी संघर्षात मोबुतुने हुतू जमातीस पाठिंबा दिला होता. रवांडातील गृहयुद्धात तुत्सी लोकांनी हुतूंचा पराभव केल्यानंतर हुतू शरणार्थी झैरेच्या आश्रयास आले होते. त्यांनी पुन्हा मोबुतुच्या पाठिंब्याने नरसंहार करू नये म्हणून तुत्सी लोक झैरेत जाऊन हुतू शरणार्थी लोकांवर हल्ला करू लागले. यादरम्यान मोबुतु प्रॉस्टेट ग्रंथीच्या कॅन्सरने ग्रस्त होता. तो बहुतांश वेळ युरोपात उपचारासाठी राहत असे. त्याचा राजकीय वारसदार समजला जाणारा त्याचा ज्येष्ठ पुत्र 1994 मध्ये एड्सने मृत्यू पावला होता. 1996 मध्ये मोबुतुने तुत्सी लोकांना देशाबाहेर हाकलण्याची मोहीम हाती घेतली; पण त्याच्याच देशातील बंडखोर नेत्यांनी तुत्सी सैन्याशी हातमिळवणी केली होती. युगांडा, रवांडा आणि बुरुंडी या तीन देशांच्या मदतीने लॉरेंत कबीला या झैरेतील बंडखोर नेत्याने मोबुतु सरकारविरुद्ध युद्ध पुकारले- हेच झैरेचे पहिले गृहयुद्ध. मोबुतुची प्रकृती कॅन्सरने खालावत होती. तो युरोपात उपचारास्तव असल्याचा फायदा घेत कबिलाच्या सैन्याने 1997 पर्यंत झैरेचा बहुतांश भाग ताब्यात घेतला. 16 मे 1997 रोजी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्या मध्यस्थीत दक्षिण आफ्रिकन नौदलाच्या जहाजावर मोबुतु आणि कबीला यांच्यात शांतीवार्ता आयोजित करण्यात आली. या वाटाघाटी फिसकटल्या. आजारी आणि पराभूत मोबुतुने पलायन केले. कबिला आणि त्याच्या मित्रराष्ट्रांनी आपला विजय जाहीर केला. कबिलाने देशाचे झैरे हे नाव बदलून पुन्हा काँगो हे नाव ठेवले. मोबुतु मोरक्को देशाच्या आश्रयास होता. मे महिन्यात त्याचा पराभव झाल्यानंतर चार महिन्यांच्या आत – 7 सप्टेंबर 1977 रोजी प्रॉस्टेट कॅन्सरने मोबुतुचा मोरोक्कोत मृत्यू झाला. अशा प्रकारे एका हुकूमशहाचा अखेरतः अंत झाला…
–डॉ. प्रगती पाटील
अलवर, राजस्थान
संपर्क : 09960511396