Categories
जादुई वास्तव

इतक्या प्रकारचे प्राणी निर्माण कसे झाले?

जून – २०१७

(मागील अंकावरून पुढे…)

एका समूहाची ताटातूट झाल्यावर निर्माण होणार्‍या दोन्ही समूहातील भाषा आपापल्या ठिकाणी, स्वतंत्रपणे, हळूहळू, वेगवेगळ्या प्रकारे बदलत राहतात. तसंच दोन प्रजातींची ताटातूट झाली तरी दोन्ही ठिकाणी ‘डीएनए’तले बदल होतच राहतात. आपापल्या ठिकाणी, स्वतंत्रपणे, हळूहळू, वेगवेगळ्या प्रकारे बदल घडत राहतात. ही ताटातूट अनेक कारणांनी होऊ शकते. समुद्र हे अगदी सहज समजण्यासारखं उदाहरण आहे. दोन शेजारी बेटांवर एकाच जातीचे पक्षी असतील तरी ते आता क्वचितच भेटतील. त्यांच्यात मिलन आणखी क्वचित होईल. मग त्यांच्यातील जनुकीय बदल, आपापल्या ठिकाणी, स्वतंत्रपणे, हळूहळू, वेगवेगळ्या प्रकारे घडत राहतील. पुरेसा फरक पडला की मूळ जातीशी संकर अशक्य होईल. एक नवीच जाती निर्माण झाली असेल. नव्या जाती निर्माण होण्यात ही बेटं मोठी महत्त्वाची ठरतात. पण इथे ‘बेट’ म्हणजे पाण्यानी वेढलेली जमीन असा संकुचित अर्थ घेण्याची गरज नाही. एखाद्या ‘ओअ‍ॅसीस’ मध्ये तगलेल्या बेडकांसाठी ‘ओअ‍ॅसीस’ हे वाळूच्या समुद्रातलं ‘बेट’च आहे. ‘ओअ‍ॅसीस’ मध्ये बेडूक जमात फोफावू शकते; पण वाळवंट ओलांडून जाणं अशक्य. एखाद्या माशांच्या पोटजातीसाठी ‘तळं’ हे एक बेटच आहे. नवभाषांच्या निर्मितीसाठी आणि नवप्रजातींच्या निर्मितीसाठी ‘बेटं’ मोठी महत्त्वाची ठरतात, आवश्यक ठरतात, नव्हे अत्यावश्यक ठरतात. भाषा असो की प्राणी; ताटातूट महत्त्वाची. ताटातूट झाली की दोन्ही भाषा/प्राणी आपापल्या ठिकाणी, स्वतंत्रपणे, हळूहळू, वेगवेगळ्या प्रकारे बदलत राहतात. अशा बेटाबेटांवर शब्दसंकर थांबतो. स्थानिक बोलीभाषा तयार होतात. ही भाषानिर्मितीची प्रथमावस्था. अशा बेटाबेटांवर जनुकांची सरमिसळ थांबते, जनुक प्रवाह थांबतो. स्थानिक वाण निर्माण होतात. स्थानिक वाण म्हणजे जातिनिर्मितीची प्रथमावस्था. ‘त्या अमक्या गावचा तांदूळ अगदी चविष्ट,’ ‘अमक्या भागातले रायवळ सुद्धा हापूसइतके गोड,’ असे संवाद झडतात ते यामुळेच.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या जाती दरवेळी कायमच्या दूर झाल्या पाहिजेत, असं नाही. एखाद्यावेळी मूळ जातीशी संपर्कही येईल, संकरही होईल. पण क्वचित होणार्‍या या सरमिसळीने फार फरक पडत नाही.

4 ऑक्टोबर 1995 रोजी कॅरेबियन द्वीपसमूहामधील अन्गुइल्ला बेटांवर तिथल्या मच्छीमारांच्या डोळ्यादेखत काही ओंडके आणि झावळ्या लाटांबरोबर किनार्‍याला लागले. या तराफ्यावर स्वार झालेले 15-20 हिरवे इगुआना जातीचे सरडेही आले. अन्गुइल्लावर हिरवे इगुआना कधीही नव्हते. सुमारे 250 किलोमीटर अंतरावरील ग्वादेलूप बेटांवरून हे पाहुणे आले असावेत. आधीच्या महिन्याभरात, लुईस आणि मेरीलीन या दोन जबरदस्त चक्रीवादळांनी कॅरेबियन बेटांना झोडपून काढलं होतं. किनार्‍यावरचे अनेक ताड आणि माड वादळामुळे पाण्यात पडले होते. त्यातल्याच कुठल्याशा झाडावरचे हे रहिवासी, मोठ्या खडतर प्रवासानंतर अखेर किनार्‍याला लागले होते. आपल्या जगावेगळ्या वाहनातून ते पायउतार झाले. अन्गुइल्ला हेच मग त्याचं नवं घर बनलं. इथेच ते जुगले, फळले, प्रसवले आणि फोफावले; इथेच ते भावी पिढ्यांना त्यांचे डीएनए बहाल करते झाले.

अन्गुइल्लातल्या मच्छीमारांच्या डोळ्यादेखत हे घडलं, म्हणून हे आपल्याला कळलं. पण मुळात ग्वादेलूप बेटांवरही यांचे पूर्वज, शेकडो वर्षांपूर्वी, असेच कुठल्या ओंडक्याबरोबर आले असतील. ग्वादेलूपचीच कथा गॅलापेगॉस बेटांनाही लागू आहे. तिथेही इगुआना आहेत. तेही असेच वादळवार्‍याबरोबर कुठल्याशा झावळीवर, ओंडक्यावर असे स्वार होऊन आले असतील. या सार्‍या ऊहापोहात गॅलापेगॉसचं स्मरण हवंच हवं. का?

कारण डार्विनच्या पदस्पर्शाने पुनित झालेली हीच ती जगप्रसिद्ध बेटं. ‘बीगल’ जहाजावरून एका मोहिमेबरोबर, 1835 साली डार्विन इथे आला होता. इथलं जैववैविध्य पाहून त्याच्या मनात उत्क्रांतीची कल्पना रूजली. दक्षिण अमेरिकेपासून तब्बल 1000 किलोमीटर दूर असलेला ज्वालामुखीजन्य बेटांचा, हा विषुववृत्तीय द्वीपकल्प. ही बेटं तयार झाली काही कोटी वर्षांपूर्वी. पृथ्वीचं 4.5 अब्ज वर्ष वय विचारात घेता, अगदी तरुण आहेत ही बेटं. समुद्रतळाशी उसळलेल्या ज्वालामुखीच्या लाव्हाचे, पाण्यावर डोकावणारे डोंगर म्हणजे ही बेटं. थेट समुद्रात उगवल्यामुळे आणि ज्वालामुखीजन्य असल्यामुळे मूलतः इथे काही सजीवसृष्टी नव्हतीच. म्हणजेच इथे असलेले सर्व सजीव; झाडे, वेली, पशू, पाखरे… हे इथे पोहत तरी पोेचले किंवा उडत तरी, किंवा तरंगत तरी. समुद्रातल्या प्रवाहांत प्रवाहपतित होऊन, वादळ वार्‍यासंगे भिरभिरत किंवा लाटांच्या पाठीवर तरंगत्या ओंडक्यांवर स्वार होऊन कसेबसे कर्मधर्मसंयोगाने पोचले ते. कर्मधर्मसंयोगाने जे एकदा इथे पोेचले ते इथलेच झाले. ही सगळी बेटं फार जवळजवळही नाहीत. त्यामुळे या बेटावरून त्या बेटावर येणं-जाणं अगदी क्वचित, शतकात एखाददुसर्‍या वेळी घडत असणार. दरम्यान, या जाती एकमेकांसापेक्ष बदलत-बदलत एकमेकाला परक्या-परक्या ठरत जाणार.

गॅलापागॉस बेटांवर इगुआना पहिल्यांदा नेमके कधी आले ते ज्ञात नाही. 1995 साली अन्गुइल्लावर आले, तसेच ते एखाद्या ओंडक्यावर स्वार होऊन आले असतील. आज सेंट क्रिस्टोबाल हे मुख्य भूमीच्या (दक्षिण अमेरिकेच्या) सगळ्यात जवळचं बेट. कोट्यवधी वर्षांपूर्वी मुख्य भूमीजवळ आणखीही बेटं होती. ती आता समुद्रार्पण झाली आहेत. कदाचित या सध्या बुडालेल्या बेटांवर हे इगुआना आधी आले असतील, मग पायरीपायरीने पुढे.

कसे का असेनात, जे आले ते जगले, तगले, जुगले, फळले, प्रसवले, वाढले; कारण नव्या वातावरणाशी त्यांनी जुळवून घेतलं. 1995 साली अन्गुइल्ला बेटांवर जशी यांच्या भाईबंधांना संधी मिळाली, तसंच इथे अनेक शतकांपूर्वी घडलं होतं. मुख्य भूमीवरील विषुववृत्तीय जंगलातून आलेले हे सरडे, आता ओसाड अशा ज्वालामुखीजन्य बेटांवर स्थिरावले. पिढ्यान्पिढ्या ज्या सरड्यातील (जनुकीय) बदल नव्या परिस्थितीला अनुकूल होते तेच सरडे टिकले, बाकीचे मेले. जे टिकले त्यांनाच मुलंबाळं झाली, त्यांचेच गुण घेऊन पुढे पिढ्या निपजल्या. यामुळे मुख्य भूमीवरील सरड्यांपेक्षा हे वेगळे झाले.

या द्वीपसमूहातील सारी बेटं मुख्य भूमीपासून तुटलेली; पण एकमेकांजवळ आहेत. हे इगुआना जसे मुख्य भूमीपासून इथे पोचले, तसे आसपासच्या बेटांवर पोचले असतील. मुख्य भूमीपासून ये-जा, अगदी क्वचित. सहस्रकात एखाद्यावेळी. बेटाबेटांमध्ये ये-जाही अधूनमधून, शतकभरात एखाद्या वेळी. या दरम्यान स्थानिक इगुआना हे बदलत राहतात. शतकाशतकांतून एखाद्या वेळी येणार्‍या पाहुण्या इगुआनापेक्षा स्थानिक इगुआना थोडे वेगळे असणार. बेटाबेटांवर अशा पद्धतीने जनुकीय आयात-निर्यात होत राहणार. सुरवातीला संकर आणि संतती शक्य होणार. पण हळूहळू गुणसूत्रातील बदल हे इतके टोकाचे असतील की, संकर आणि संतती शक्य होणार नाही. परिणामी आजअखेर गॅलापागॉसवर अशी स्थिती आहे की भूचर इगुआनाच्या तीन जाती आहेत. या खास इथे आणि फक्त इथेच आढळणार्‍या. त्यांच्यात अर्थात संकर होत नाही. कोनोलोफस पॅलीदस ही जाती फक्त ‘सांता फे’या बेटावर आहे. कोनोलोफस सबक्रिस्टा ही मुख्यत्वे फर्डिनंडा, सांताक्रूझ आणि इसाबेला या तीन बेटांवर आहे. आता या तीन बेटांवरील कोनोलोफस सबक्रिस्टातही दृश्य फरक दिसायला लागलेले आहेत. लवकरच आंतर-संकर शक्य होणार नाही आणि या तीन स्वतंत्र जाती ठरतील, अशी चिन्हे आहेत. इसाबेला हे तसं मोठं बेट. यावर पाच ज्वालामुखी आहेत. यातल्या सर्वात उत्तरेच्या ज्वालामुखीभोवती कोनोलोफस मार्थी ही प्रजात आढळते; अन्यत्र कुठेही नाही.

‘बेटं’ याचा उत्क्रांतीशास्त्रातला अर्थ जरा निराळा आहे, हे आपण आधी बघितलं. वाळवंटातील ऑअ‍ॅसीस हेही एक ‘बेट’ आहे आणि दुर्गम तळं हेही एक ‘बेट’ आहे. गॅलापागॉसच्या बहुतेक बेटांवर एकेकच ज्वालामुखी आहे. पण इसाबेला बेटावर ज्वालामुखीची पाच शिखरं आहेत. उद्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढली, तर एका इसाबेला बेटाची पाच बेट होतील. पण आत्ताही प्रत्येक ज्वालामुखी- भोवतीचा प्रदेश हा उत्क्रांतीच्या दृष्टीने एक-एक बेटच आहे. या पाच ज्वालामुखींच्या उंचच उंच टेंगळांभोवती घनदाट झाडी आहे आणि त्या पलिकडे समुद्रापर्यंत ओसाड वाळवंट. या झाडीत राहणार्‍या इगुआना आणि कासवांना वाळवंट ओलांडून दुसर्‍या झाडोर्‍यात पोचणंच दुष्कर. इसाबेला या एकाच बेटावर ही पाच स्वतंत्र बेटं वसलेली आहेत जणू. त्यामुळे इथले इगुआना खास ‘इथले’ आहेत. इथली महाकाय कासवंही खास ‘इथली’च आहेत. ज्वालामुखीच्या डोंगरउतारावरील वनस्पती हे त्याचं खाद्य. इथेच त्यांचा रहिवास. हाच त्यांचा अधिवास. एका ज्वालामुखीच्या उतारावरून (बेटावरून) दुसर्‍या ज्वालामुखीच्या उतारावर (बेटावर) जाणं यांना शक्य नाही. कारण वाटेत जीवघेणं वाळवंट पसरलेलं आहे.

भौगोलिक (किंवा अन्यही) कारणांनी एकांतवास पदरी आला की उत्क्रांतीच्या दृष्टीने त्या-त्या जातीला नवीन फांदी फुटू लागते. एकदा का मूळ जातीबरोबर संकर अशक्य झाला की नवी जाती उद्भवली, असं मानलं जातं. यानंतर ही भौगोलिक दरी नष्ट झाली, दोन्ही गट पुन्हा एकत्र जरी आले, तरी काही फरक पडत नाही. त्यांचे ‘डीएनए’ आता मिसळू शकत नाहीत. एकमेकांपासून कोणतीही देवाणघेवाण आता शक्य होत नाही. या दोन्ही जाती, स्वतंत्र जाती म्हणून आपापल्या परीने उत्क्रांत होत राहतात. प्राणिमात्रांचे समूह असे विभागले गेल्यामुळेच नव्या-नव्या जाती निपजल्या आहेत. गोगलगाईचे आणि गाईचे किंवा एकूणच पृष्ठवंशीय प्राण्यांचे (Vertebrates, यात आपणही आलो) पूर्वज एकच होते, असं मी म्हणतो ते यामुळेच.

कोणे एकेकाळी गॅलापागॉसवरच्या इगुआना जमातीला एक वैशिष्ट्यपूर्ण फांदी फुटली. अभ्यासातून असं दिसतं की इथल्या भूचर इगुआनाच्या काही पूर्वजांनी भूवनस्पतीऐवजी किनार्‍यावर राहून पाणवनस्पती खायला सुरुवात केली. हे हळूहळू पोहायला शिकले आणि आज समुद्रकिनारी अधिवास असणारी समुद्र-इगुआना ही स्वतंत्र जाती आपल्याला तिथे दिसते. पुन्हा एकदा ही खास इथलीच जाती. गॅलापागॉस वगळता अन्यत्र कुठेही हे समुद्र इगुआना आढळत नाहीत.

इथल्या किंवा जगातल्या कुठल्याही भू-इगुआनापेक्षा हे सर्वस्वी भिन्न आहेत. समुद्रात निभावून न्यायला यांच्यात अनेकानेक गुणवैशिष्ट्ये निर्माण झाली आहेत. इगुआना वंशाच्या आज भू-इगुआना आणि समुद्र-इगुआना अशा दोन फांद्या आपल्याला दिसतात. या फांद्या जिथून फुटल्या, ती इगुआनाची मूळ प्रजाती मात्र आज नामशेष झाली आहे किंवा या नव्या प्रजातींच्या (कोनोलोफस) रूपानेच शेष आहे. समुद्र इगुआनातही बेटागणिक बारीक-बारीक फरक दिसतात. वेगवेगळी स्थानिक वाणं दिसतात. पण अजून तरी स्वतंत्र जाती म्हणावेत असे ते नाहीत. पण त्या दिशेने प्रवास चालू आहे. काही काळाने ही वाणं इतकी बदलतील की परस्परांशी संकर असंभव ठरेल. मग ती नवीन जाती म्हणून मिरवू लागतील.

जी कथा इगुआनाची, तीच तिथल्या महाकाय कासवांची, पालींची, उड्डाण विसरलेल्या कोर्मोरांटची, मॉकिंगबर्डची, फींच पक्ष्यांची आणि कित्येक वनस्पतींची देखील. हीच कथा जगभराची. गॅलापागॉस ही बेटं आणि त्यावरील जीवशास्त्रीय बेटं; ज्वालामुखी, जंगलं, वाळवंटं हे निव्वळ समजायला सोपं, उमजायला उचित, असं एक उदाहरण मात्र. जीवशास्त्रीय ‘बेटं’; यात उंचच उंच गिरीशिखरे आहेत, तळी आहेत, ओअ‍ॅसीस आहेत, ही नव्या-नव्या प्रजातींना जन्म देतात. नदी म्हणजेही एखाद्या प्रदेशावरची ओढलेली लक्ष्मणरेखाच. ज्यांना ही ओलांडणं अशक्य असे प्राणिमात्र दोन्ही तटांवर, वेगवेगळ्या दिशेने बदलत राहतील, उत्क्रांत होत राहतील. कालांतराने नव्या बोलीतून नव्या भाषेचा जन्म व्हावा, तसा नव्या जातीचा जन्म झाला असेल. कधी एखादा गिरीराज लक्ष्मणरेषेच्या रुपांनी उभा ठाकेल तर कधी प्रचंड अंतर, अ-पार अंतर, हीच लक्ष्मणरेखा ठरेल. स्पेनपासून चीनपर्यंतच्या सलग भूपट्ट्यात एकमेकांशी संग करणारे, संकर साधणारे उंदीर आहेत. पण तरीही स्पेनचा उंदीर, चीनच्या उंदराला भेटणं शक्य नाही. स्पॅनिश उंदीर आणि चिनी उंदीर मग वेगवेगळ्या दिशांनी उत्क्रांत होणे शक्य आहे.

गॅलापागॉसवरच्या भूचर इगुआनाच्या तीन जाती निव्वळ काही हजार वर्षांपूर्वी विलग जाती म्हणून अस्तित्वात आल्या. शे-पाचशे कोटी वर्षांच्या कालखंडात, एकाच मूळ जीवाचे वंशज, अविश्वसनीयरित्या भिन्न-भिन्न निपजतात, इतके की झुरळ आणि मगर हे प्राणी मूलतः एकाच पूर्वजाचे वंशज आहेत, यावर आपला विश्वास बसत नाही. कोणे एके काळी, आजच्या झुरळांच्या आज्याच्या, आज्याच्या, आज्याचा…आजा (आणि आजी); आणि आजच्या मगरींच्या आजीच्या, आजीच्या, आजीची, आजी… (आणि आजा); हे एकाच जातीचे होते! हा कोणता काळ होता? काही अब्ज वर्षांपूर्वीचा हा काळ. त्या काळी अशी कोणती लक्ष्मणरेखा होती, हे आज सांगणं अशक्य आहे. बहुधा समुद्राचंच काम हे. त्या कधीकाळी कोणी राहतच नव्हतं जमिनीवर मुळी. सर्व जीव निव्वळ पाण्यात. कदाचित हे आदि-पूर्वज एखाद्या प्रवाळाच्या बेटात लहानाचे मोठे झाले असतील. समुद्राच्या प्रवाहाबरोबर अन्य एखाद्या प्रवाळ बेटावर पोचले असतील आणि मग तिथलेच होऊन जगले असतील, जुगले असतील, फळले असतील, प्रसवले असतील, वाढले असतील आणि फोफावले असतील. मधला प्रचंड मोकळा समुद्र त्यांना अ-पार ठरला असेल.

आधीच्या प्रकरणात म्हटल्याप्रमाणे माणूस आणि चिंम्पान्झीचे आजोबा सहा कोटी वर्षांपूर्वीचे. ही तशी ताजी घटना, तेव्हा इथे दोन गटांना दुभंगणारी दरी कोणती याचा अंदाज आहे आपल्याला. या आजोबांची टोळी फुटली ती बहुधा आफ्रिकेच्या ‘रिफ्ट व्हॅली’मुळे. या प्रचंड दरीच्या पूर्वेकडील टोळ्यांत मानव उत्क्रांत झाला आणि पश्चिमेकडे चिंम्पान्झी. हे चिंम्पान्झीही पुढे दोन पातीत विभागले गेले, एका पातीतून उत्क्रांत झाले आजचे चिंम्पान्झी’ आणि दुसर्‍या पातीचे झाले ‘पिग्मी चिम्पान्झी’ (‘बोनोबो’ म्हणतात यांना). या विभाजनात कोंगो नदीने लक्ष्मणरेषेचं काम केलं.

सगळ्याच्या सगळ्या सस्तन प्राण्यांचा आदिपूर्वज 185 कोटी वर्षांपूर्वी या भूतली वावरत होता. या आदिपूर्वजाचे आजचे वंशज म्हणजे 231 प्रकारचे मांसभक्षक (Carnivores. कुत्री, मांजर, मुंगुस, अस्वल.), 2000 प्रकारचे उंदीर (Rodents. कृदंत), 88 तर्‍हेचे देवमासे, डॉल्फिन वगैरे, 196 विविध तृणभक्षक (गायी, हरण, डुक्कर, शेळ्या), अश्वकुलातील 16 प्राणी (घोडे, झेब्रे, गेंडे), 87 विविध ससे, 977 वटवाघळे, 68 प्रकारचे कांगारू, 18 प्रकारचे एप, यात अर्थात माणूसही आला… आणि हे सारे घडता-घडता वाटेत नष्ट झालेल्या अक्षरशः असंख्य जाती; यातही काही मनुष्यमात्रांच्या जाती आहेत!

निवड आणि जगणे

या प्रकरणाच्या सांगतेला हीच कथा जरा वेगळ्या तर्‍हेने सांगतो. जनुकप्रवाहाचा मी उल्लेख केलाच आहे. ‘जनुकीय काला’ अशीही एक संकल्पना आहे. गोकुळाष्टमीला चार घरून गोळा करून दही, लाह्या, लोणचं, शेंगदाणे असं काय-काय घालून गोपाळकाला केला जातो. सगळे पदार्थ ढवळून पदार्थांचं चांगलं मिश्रण केलं जातं. ‘जनुकीय (गोपाळ)काला’ हा असाच काहीसा असतो.

पुनरुत्पादनाच्या वेळी आई आणि बाबांच्या जनुकांचीच सरमिसळ होते आणि दोघांची निम्मी-निम्मी जनुके पुढच्या पिढीत जातात. तुमच्या आईबाबांच्यात, तुमच्या आजी-आजोबांची निम्मी-निम्मी जनुके एकत्र आली होती. म्हणजे तुमच्या आईवडिलांच्यात या चार व्यक्तींच्या जनुकांची सरमिसळ झाली होती. हाच न्याय आपल्याला शेकडो, हजारो, लाखो, कोटी वर्षे जुन्या पूर्वजांनाही लावता येईल. या लंब्या वाटचालीत इतक्या वेळा या जनुकांची सरमिसळ होते की, जणू एखाद्या सदैव ढवळल्या जाणार्‍या काल्यातून काही जनुके घेतली जात आहेत. हाच तो जनुक काला.

‘जाती’ म्हणजे आपापसात संकर आणि संतती शक्य असलेले प्राणी, ही व्याख्या लक्षात आहे ना? आता या व्याख्येचं महत्त्व लक्षात येईल तुमच्या. एखाद्या जातीतील एखादी नरमादीची जोडी ही त्या जातीच्या जनुकीय काल्यातील काही अंशमात्र बाळगून आहे. हाच ठेवा ती पुढच्या पिढीला देते, अन्य अंश इतरांत आहे. त्या-त्या जातीच्या अशा सर्व प्राण्यांच्यात मिळून जो जनुकीय ठेवा आहे, त्यालाच म्हणायचं जनुकीय काला. त्या जातीतील प्रत्येक प्राण्यात यातलाच काही अंश आढळणार. आंतर-जातीय संकर शक्यच नाही. तेव्हा अन्य कोणत्याही जातीच्या जनुकीय काल्यातील अंश यांना मिळणार नाही आणि यांच्यातलाही वाटा दुज्या जातीला मिळणार नाही.

प्रत्येक जातीचा असा एक खास जनुकीय काला आहे. इतरांना या काल्यात वाटा नाही. एकाच जातीचे दोन जीव या काल्यातील काही अंश बाळगून आहेत. एकाच प्रदेशातील दोन जीव दोन वेगळ्या जातीचे असतील, तर त्यांची रोज जरी भेट होत असली तरी त्यांच्या जनुकीय काल्याची सरमिसळ अशक्य आहे. थोडक्यात, जनुकीय काल्यात ज्यांना भागीदारी शक्य आहे, अशाच जीवांना एका जातीचं समजलं जातं. जर एखादी जाती दोन गटात विभागली गेली, तर आता हे दोन काले बदलत-बदलत एकमेकांपेक्षा वेगवेगळे बनत जातील. काही काळाने इतके वेगळे होतील की, भेटले जरी, तरी संतती शक्य होणार नाही. त्यांच्या जनुकीय काल्यांची आता सरमिसळ होणे नाही. कालांतराने हे दोन काले आणि त्यातून फाटाफूट होऊन निर्माण झालेले इतर सर्व वंशज काले इतके वेगळे वेगळे होतील त्यातून इतक्या भिन्न भिन्न प्रकारचे जीव निपजतील, की या सार्‍यांचं गोत्र एकच होतं, यावर आपला विश्वास बसणार नाही. पण जीवशास्त्र सांगतं की अगदी माणूस आणि झुरळही अंतिमतः सगोत्र आहेत.

उत्क्रांती म्हणजे जनुकीय काल्यातील बदल. या काल्यातील काही जनुकांची संख्या वाढेल, काहींची कमी होईल. नेहमी आढळणारी जनुकं कमी-कमी होत कदाचित दिसेनाशी होतील. दुर्मिळ जनुके सार्वत्रिक होतील. परिणामी या प्रजातींचं रंग, रूप, आकार, उकार, बोलणं, चालणं, वागणं बदलत राहील. जनुकीय काल्यातील या संख्यात्मक आणि गुणात्मक बदलांमुळे उत्क्रांती होते.

पण हा जनुकीय काला बदलतो तरी का? खरं तर बदलला नाही तर ते आश्चर्य ठरेल. अनादि काळाच्या अनंत ओघात हा कालाही बदलत राहतो. भाषेत जसे बदल होतात, तसंच हे. ‘संपुष्ट’, कळकणे’ हे शब्द आता कालबाह्य झाले आहेत आणि ‘शूटर’, ‘गूळ काढणे’, ‘भावना पोचल्या’ हे नवे वाक्प्रचार आता प्रचलित आहेत.

जनुकीय काले प्रवाही असतात. कालप्रवाहात ताटातूट झाली तर जनुकीय काले एक-दुसर्‍याला परके होतात, भाषेसारखेच अगम्य होतात, हे आपण पाहिलं. भाषेसारखेच जनुकीय कालेही प्रवाही असतात. पण कोणते बदल टिकणार आणि कोणते नाही, हे ठरतं ‘नैसर्गिक निवडीच्या’ तत्त्वानुसार. हीच चार्ल्स डार्विनची सर्वांत महत्त्वाची संकल्पना. नैसर्गिक निवडीशिवायही काल्यात बदल होत राहतील; पण हे दिशाहीन असतील. पण या नैसर्गिक निवडीमुळे जे जगू शकतात, तगू शकतात, असेच जीव वाचतात. अशाच सर्व जीवांचा जनुकीय काला पुढच्या पिढीत संक्रमित होण्यासाठी उपलब्ध असतो. जनुकीय काला हा असा, जगण्यास सहाय्यभूत ठरणार्‍या जनुकांचा काला असतो. असे जनुक, की जे त्या जीवाला जगवतील, निदान पुनरुत्पादनाची संधी प्राप्त होईपर्यंत जगवतील, असेच जनुक या काल्यात असतात. या जनुकात असे संदेश असतात की त्यांचं पालन केल्याने शरीर नावाची एक गुंतागुंतीची रचना उभी राहते. कोणत्याही सजीवाचं शरीर हे जगण्याला आणि जुगण्याला बांधील असतं. या शरीरयंत्रणेद्वारेच जनुक पुढच्या पिढीत जाणार असतात. जनुकीय काल्यात टिकून राहणार असतात.

जगायला आणि जुगायला, फळायला आणि प्रसवायला हे जनुकं कशी बरं साथ देतात? याचं उत्तर जातीगणिक बदलतं. या जनुकांच्या संदेशानुसार पक्ष्यांत किंवा वटवाघळांत पंख निर्माण होतात. त्याशिवाय यांचं जगणं अशक्यच. सिंहाचं चापल्य, अणकुचीदार दात आणि नखं, हरणाची विद्युतगती, तिखट कान, तीक्ष्ण नजर ही सारी या जनुकांची कमाल. या गुणधर्मांमुळे सिंहाच्या शरीरात सिंहाची जनुकं टिकून आहेत आणि हरणाच्या शरीरात हरणाची. नाकतोडा गवतात लपून जातो. या गुणधर्मामुळे त्याच्यातील जनुकांना पिढ्यान्पिढ्या पुढे-पुढे जाण्याची संधी मिळते.

बारकावे जातीगणिक बदलतील; पण तत्त्व तेच आहे. येनकेन प्रकारेण; जगणे, जुगणे, फळणे आणि प्रसवणे. आपली जनुके पुढच्या पिढीत जावीत, पिढ्यान्पिढ्या वाहत राहावीत, जनुकीय काल्यात टिकून राहावीत हे लक्ष्य. हा देह जरी पंचतत्त्वात विलीन झाला तरी, मरावे परी जनुकरूपी उरावे, याचसाठी आहे सारा अट्टाहास. शरीर मर्त्य आहे; जनुके अमर आहेत! प्रत्येक सजीव, म्हणजे एक जनुकांनी निर्माण केलेलं, जनुकांचा ठेवा पुढे संक्रमित करणारं एक यंत्र आहे. अगदी तुम्हीसुद्धा. बघा तरी आरशात, तुम्हाला दिसेल एक मानव-यंत्र.

(रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘द मॅजिक ऑफ रिअ‍ॅलिटी’ या पुस्तकातील ‘व्हाय आर देअर सो मेनी डिफरंट काईंड्स ऑफ अ‍ॅनिमल्स?’ या प्रकरणाचा भावानुवाद.)

अनुवादक डॉ शंतनु अभ्यंकर मो. 98220 10349

Copyright c 2011 by Richard Dawkins Ltd.

All right reserved.