Categories
संस्था परिचय

उत्तर प्रदेशातील सत्यशोधक चळवळ : अर्जक संघ

वार्षिकांक - २०१८

महाराष्ट्र अंनिसने आपल्या कामाची चतु:सूत्री ठरवली आहे. पहिले सूत्र आहे शोषण करणार्‍या आणि उघडउघड अन्याय करणार्‍या रुढींना विरोध करणे. दुसरे सूत्र वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे. तिसरे सूत्र धर्माची विधायक चिकित्सा करणे आणि चौथे सूत्र समविचारी संघटनांशी जोडून घेणे. या चौथ्या सूत्रानुसार दरवर्षी आपण वार्तापत्रातून देशातील एका समविचारी संघटनेची ओळख करून घेतो.

यावर्षी उत्तर प्रदेशातील अर्जक संघाचा नंबर लागला. गेल्या वर्षी अर्जक संघाच्या स्थापनेस 50 वर्षे पूर्ण झाली. त्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निमंत्रण होते. यानिमित्ताने ओळख झालेली होती.

या वर्षी माहिती घेण्यासाठी अर्जक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मीटिंगला भेट देण्याचे ठरले. 7 आणि 8 ऑक्टोबरला ही बैठक मेरठमध्ये होती. तिकडे जाण्यापूर्वी ‘यूट्यूब’वरून माहिती घेतली. अर्जक म्हणजे अर्जन करणाराकष्ट करणारा.

अर्जकचा अजेंडा

आपल्या संघटनेचे तीन अजेंडे सांगताना, अर्जक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. आर. सिंग म्हणाले की, पहिला अजेंडा- सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे, असा आहे. आमची घोषणा आहे – “राष्ट्रपतीका बेटा हो या चपरासीकी संतान – सबकी शिक्षा एक समान।”

दुसरा अजेंडा आहे – अर्जकाला म्हणजे कष्ट करून जगणार्‍याला सन्मान मिळावा, उचित मेहनताना मिळावा.

ते म्हणतात – दो बाते मोटी मोटी, सबको इज्जत सबको रोटी।”

तिसरा अजेंडा म्हणजे – ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध!

त्यांच्या मते, देशाच्या अवनतीचे मूळ कारण आहे ब्राह्मणी संस्कृती. ही संस्कृती नसानसांत भिनली आहे. ती दूर केली पाहिजे. या बाबतीत देशातील परिस्थिती काय आहे, हे मीटिंगला जाण्यापूर्वीच अनुभवायला मिळाले.

राजधानी एक्सप्रेसने आम्ही दिल्लीला पोचलो. मेरठला जाणार्‍या गाड्या आनंदविहार स्टँडवर लागतात. दिल्ली रेल्वे स्टेशनवर आम्ही उतरलो. प्रवाशांची ‘सेवा’ करायला मिळावी म्हणून रिक्षावाल्यांची झुंबड उडाली होती.

आम्ही तीन सीटच्या सीएनजी रिक्षामध्ये बसलो. आमची रिक्षा एका चौकात सिग्नलसाठी थांबली. समोर फलक होता ‘राजघाट’ म्हणजे महात्मा गांधींची समाधी. त्याच्या शेजारी रस्त्याच्या नावाचा फलक होता – “म. गांधी मार्ग” आम्ही ज्या रस्त्यावर उभा होतो, त्याने नाव होते “जवाहरलाल मार्ग.”

गांधी, नेहरू मार्ग

एवढ्यात आमच्या रिक्षाशेजारी एक सायकल रिक्षा येऊन उभी राहिली. त्यामध्ये तपकिरी युनिफॉर्म घातलेली पाच-सहा शालेय मुलं दाटीवाटीने बसून शाळेला चालली होती. सायकल रिक्षावाला घामाने निथळत आणि धापलत उभा होता.

रस्त्याच्या रिकाम्या भागात एक सात वर्षांचा मळक्या कपड्यातला मुलगा एक छोटी लोखंडी रिंग हातात घेऊन कोलांटी उड्या मारत होता. दोन-तीन उड्या मारून झाल्यावर त्याने उभ्या राहिलेल्या गाड्यांच्या जवळ जाऊन हात पसरला.

सर्वांना शिक्षण देण्याच्या उदात्त हेतूने गावोगावचे शिक्षक शालाबाह्य मुले शोधत फिरत असतात. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी या वर्षी सव्वीस टक्के बजेट शिक्षणावर खर्च करणार असल्याचे जाहीर केले आहे; पण या सर्वांना चुकवून तो छोटा मुलगा पोट भरण्यासाठी उन्हात उड्या मारत होता. समोरच्या रस्त्यावर त्याच्यापेक्षा वर्ष-दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या बहिणी, झिपर्‍या मागे बांधून तशाच उड्या मारत होत्या.

शेवटचा माणूस

देशात विज्ञानाने मोठी झेप घेतली आहे. परमकॉम्प्युटर तयार झाला; उपग्रह अंतराळात सोडण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले; पण पायाने चालवण्याच्या सायकल रिक्षासाठी कमी दरातले, छोटेसे इंजिन तयार करण्याचा विचारही शास्त्रज्ञांच्या मनाला शिवत नाही. जवाहरलालजींना छोटी मुले आवडत, तर महात्मा गांधी म्हणत – “राज्यकर्त्यांनी धोरण आखताना, देशातल्या सर्वांत शेवटच्या वंचित माणसाचा विचार करावा.”

देशाच्या राजधानीत बसून धोरण आखताना मंत्र्यांना दूर जावे लागू नये म्हणूनच गांधी मार्ग आणि जवाहर मार्गावरच ही सोय केली असावी, असा विचार मनात आला.

हमे कोई दिक्कत नहीं।

माहिती घेण्यासाठी आम्हाला वाराणशीलाही जायचे होते. दिल्लीतून ‘गरीब का रथ’ ही रेल्वे वाराणशीला जाते. लालूप्रसादनी ही रेल्वे सुरू केली. गरीब माणसालाही ए.सी.मध्ये बसून प्रवास करता यावा, ही अपेक्षा ठेवून तिचे तिकीट कमी ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी रेल्वेला तोटा होऊ नये म्हणून प्रत्येक कोचची रुंदी थोडी कमी करून कोचांची संख्या वाढवली आहे; सीट वाढवल्या आहेत.

नेहमी एका कंपार्टमेंटमध्ये आठ सीट्स असतात. इथे नऊ केल्या आहेत. ही वाढवलेली सीट झोक्यासारखी हलत असते. बाजूला खिडकी असल्याने ती भिंतीला जोडली जात नाही. या सीटवर झोप लागणे अवघडच!

आमच्या कंपार्टमेंटमध्ये एक बोलके गृहस्थ त्यांच्या बोलक्या आणि चुणचुणीत सुनेला घेऊन प्रवास करत होते. त्यांनी सर्वांच्या ओळखी करून घेतल्या. ते क्षत्रिय होते. समोरच्या झुला सीटवर एक शर्मा पती-पत्नी बसले होते. त्यांचे नाव ऐकताच सासरेबुवांनी ‘पंडितजी’, ‘पंडितजी’ सुरू केले. थोड्या वेळाने पंडितजींनी आपली अडचण सांगितली; सासरेबुवांनी आपली व सुनेची सीट त्यांना दिली, एवढेच नव्हे, तर सुनेने रेल्वेने पुरवलेल्या बेडशीट, चादर व रग यांच्या सहाय्याने दोन्ही पती-पत्नींना व्यवस्थित बेड करून दिले. हे सर्व सुरू असताना सासरेबुवा हात बांधून सारखे पुटपुटत होते – हमे कोई दिक्कत नहीं।”, “हमे कोई दिक्कत नहीं।”

मनात विचार आला – शर्माच्या ऐवजी एखादे ब्राह्मणेतर कुटुंब असते, तर – हमे कोई दिक्कत नहीं” म्हणत त्यांना सीट बदलून आणि बेड तयार करून मिळाला असता काय?”

वाराणशीत तर पुरोहितशरण मेंढरांचे लोंढेच गंगेत डुबकी मारत, मेल्यावरचे काल्पनिक जीवन सुसह्य व्हावे म्हणून दक्षिणांची खैरात करताना दिसतात.

मेरठ

द्ल्लिीहून आम्ही मेरठला पोचलो. मेरठला अर्जक संघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची मीटिंग होती. या मीटिंगला उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथून 15 कार्यकर्ते आले होते.

इतिहासाच्या पुस्तकात मेरठ दोन वेळा भेटते. 1857 च्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात इथल्याच उठावाने झाली. ब्रिटिशांनी तीनशे शिपायांना पकडून फाशी दिले, ज्यातील दोनशे मुस्लिम होते. या उठावापूर्वी आठ दिवस आधी मंगल पांडेंना दुसर्‍याच कारणाने फाशी दिली होती; पण शूद्र सैनिकांना मागे ठेवून मंगल पांडेंचे नाव पुढे केले गेले. हे इतिहासाचे ब्राह्मणीकरण असल्याचे अर्जक संघाच्या विद्यार्थी युवक फ्रंटचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष भारतींनी सांगितले. अशा इतिहासाच्या विकृतीकरणाचा पाढाच त्यांनी वाचला. “ब्रिटिशांशी लढणार्‍या झिलकरी बाईला वजा करून झाशीच्या राणीला हिरो बनवले गेले.”

मेरठ दुसर्‍यांदा भेटते ते 1929 च्या मिरत कटाच्या खटल्यात. कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड मिरजकर इत्यादी कम्युनिस्टांना तुरुंगात घालण्यासाठी ब्रिटिशांनी हा खोटा खटला उभा केला. ती परंपरा भारतीय राज्यकर्त्यांनी आजपर्यंत जपली आहे. दिल्लीत कन्हैयाकुमारला खोट्या आरोपाखाली पोलिसांनी तुरुंगात टाकले.

अर्जक संघाचे विचार समजून घेण्यासाठी त्यांच्या चार प्रमुख नेत्यांचा आपण परिचय घेऊ.

चौधरी महाराजसिंग भारतीजी

मनीष भारती यांचे आजोबा चौधरी महाराज सिंह भारती ‘अर्जक’चे एक महत्त्वाचे नेते होते. त्यांचा जन्मदिवस 1 नोव्हेंबर अर्जक संघातर्फे विज्ञानदिन म्हणून साजरा केला जातो. इकडे जमीनदारांना ‘चौधरी’ म्हणतात. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. त्याची माहिती वर्गातल्या मित्रांना सांगू लागले. त्यामुळे मित्र त्यांना भारतीय म्हणू लागले. त्याचे पुढे भारती झाले. त्यांनीही हे टोपणनाव अभिमानाने स्वीकारले.

त्यांचे शिक्षण मॅट्रीकपर्यंत झाले; पण विज्ञान आणि शेतीवरील इतके ग्रंथ त्यांनी वाचले की, ते त्यातील तज्ज्ञ मानले जाऊ लागले. 1927 साली ते काँग्रेसचे सभासद बनून राजकारणात उतरले. 1952 साली काँग्रेस सोडून राम मनोहर लोहियांच्या बरोबर ‘सोशालिस्ट पार्टी’त सामील झाले. 1962 साली ते आमदार बनले. या काळात त्यांनी 60 देशांची वारी केली; पण आलेला 38 हजार रुपयांचा खर्च स्वत:च्या खिशातून केला.

नंतर ते खासदार बनले, तेव्हा देशाच्या राजकारणात इंदिरा गांधींचा उदय झाला होता. सत्ताधारी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय भांडवलदार विरुद्ध सरंजामदार, जमीनदार आणि मोठे भांडवलदार यांचे ऐक्य झाले. त्यास रशिया विरुद्ध अमेरिका या शीतयुद्धाची पार्श्वभूमी होती. समाजवादी आणि कम्युनिस्टांनी इंदिरा गांधींना पाठिंबा देऊन या फुटीवर शिक्कामोर्तब केले. चौधरी महाराज सिंग भारतीही त्यात समाजवादी म्हणून सामील होते. या काळात त्यांना मंत्रिपद, मुख्यमंत्रिपद अशाही ऑफर आल्या; पण मतदारांशी प्रतारणा करण्याचे त्यांनी नाकारले. अशा नि:स्पृह वृत्तीमुळे अर्जक संघाकडे जनसमुदाय आकृष्ट झाले. त्यांनी विज्ञानाचा पुरस्कार करताना सखोल अभ्यास करून लोकांना पडणार्‍या प्रश्नांवर वैज्ञानिक उत्तरे देणारी पुस्तके लिहिली. सृष्टी और प्रलय, ईश्वर की खोज, पाप और पुण्य, त्याशिवाय समाजवाद, ब्राह्मणवाद की शवपरीक्षा, नारी-उत्थान और पतन अशी सुमारे 15 पुस्तके लिहिली आहेत.

खासदार झाल्यावर चौधरी महाराजसिंग भारतींनी देशांचा शासकीय दौरा केला. त्यांनी शेतीचा अभ्यास केला, नागरिकांशी चर्चा केली आणि येताना विज्ञान शोधासंबंधी पुस्तकांचे ढीग घेऊन आले; पण हे सर्व स्वखर्चाने! शासकीय खर्च घेतला नाही.

चौधरी महाराजसिंग भारती खासदार असताना त्यांनी लोकसभेत एक क्रांतिकारी बिल मांडले. ‘प्रत्येक व्यक्तीने अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर स्वत: निर्णय घेऊन आपला धर्म निवडावा. जन्मावर आधारित धर्म लावू नये.’ पण हे बिल लोकसभेने पास केले नाही.

भारतीजींचा साधेपणा

आमदार-खासदारच काय, साधे नगरसेवक झाले, तरी त्यांची इस्टेट पटीत वाढते; पण चौधरी महाराजसिंगचे उलटे झाले. 2000 बिघे असलेली जमीन थोडी कायद्याने गेली, थोडी शाळेला दान दिली, मजुरांना राहायला दिली. नातवापर्यंत आली, तेव्हा 10 बिघे झाली. त्यात नातवांनी 75 गायींची अ‍ॅटोमायझेशन केलेली डेअरी उभारली आहे.

मनीष यांच्या मते सर्व साधनसंपत्तीने युक्त आणि प्रामाणिक कष्टकरी असूनही देश मागे पडतो, त्याचे एकमेव कारण आहे – ब्राह्मण्यवाद. ब्राह्मणवाद म्हणजे हिंदूधर्मातील एक सदोष तत्व विचार आहे. पुरोहितशाहीचा म्हणजे सामाजिक शोषणाचा तो आधार आहे. विज्ञानदृष्टी हा विचार नाकारते.

सर्व धर्मांत ब्राह्मण्यवाद

“ब्राह्मण्यवादाला मानवतावादाचा पर्याय दिला, तरच देश पुढे जाईल.” पण ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, शीख असे इतर धर्म त्याला पर्याय होऊ शकणार नाहीत का,” या शंकेवर ते म्हणतात – “ब्राह्मण्यवादी विषमतेची संस्कृती इतर धर्मांतही घुसलेली आहे. जातीभेद आणि वर्णवर्चस्वाला कंटाळून लोकांनी धर्मांतरे केली; पण त्या धर्मात जाऊनही त्यांनी उच्च-नीचता सोडली नाही. त्यामुळे इतर धर्म पर्याय होऊ शकत नाहीत.”

ब्राह्मण्यवादाला विरोध करणार्‍या इतर पुरोगामी संघटनांपेक्षा आपले वेगळेपण सांगताना मनीष भारती म्हणतात – “इतरांनी समस्येचे वर्णन केले; पण एकमेव अर्जक संघाने पर्याय दिले. जीवनाच्या – सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजनैतिक अशा चारही क्षेत्रांत ‘अर्जक’ने पर्याय दिले आहेत. त्यांची राजकीय फ्रंट शोषित समाजदल आहे.”

संस्थापक रामस्वरूप वर्माजी

अर्जक संघाची स्थापना 1968 साली रामस्वरूप वर्मा यांनी केली. रामस्वरूप वर्मांचा जन्म 1923 साली कुर्मी समाजातल्या कटियार उपजातीत झाला, एम.ए. एलएल.बी. झाल्यावर त्यांनी आय.ए.एस. परीक्षाही पास केली; पण प्रशासकीय नोकरी केली नाही. राममनोहर लोहियांच्या संपर्कात येऊन ते समाजवादी बनले. आमदार झाले. 1967 च्या चौधरीचरणसिंह यांच्या संविदा सरकारात अर्थमंत्री झाले. सरकारचे कामकाज हिंदीमध्ये चालवले गेले आणि वर्मांनी शिलकी अंदाजपत्रक सादर केले.

उच्च-नीचता, विषमता आणि धार्मिक पाखंड या पंजामध्ये सामान्य जन पिचत असलेले पाहून त्यांनी अर्जक संघाची स्थापना केली. ब्राह्मण्यवाद बाजूला सारून मानववादी समाजनिर्मिती हे त्यांनी ध्येय ठेवले. राजकीय फ्रंटवर संघर्ष करण्यासाठी त्यांनी समाजदल स्थापन केले. ते 1972 मध्ये बिहारमधील जगदेव बाबू कुशवाहा यांच्या नेतृत्वाखालील शोषित दलात विलीन झाले. नवीन शोषित समाजदलाची स्थापना करण्यात आली. वर्माजी भौतिकवादी होते. सृष्टी निर्माण करणारी किंवा चालवणारी कोणी बाह्य शक्ती नाही. सृष्टी स्वयंभू आहे, ही ‘अर्जक’ची तत्त्वे आहेत.

प्रत्येक पदार्थ गतिशील असून तो निसर्ग नियमांनी बद्ध आहे. मानवी विकासासाठी उत्पादन आवश्यक असून ते श्रमाद्वारेच होऊ शकते. म्हणून शारीरिक श्र्रम श्रेष्ठ आहेत.

ते म्हणत – ‘जानो तब मानो।’ समजून घ्या; मगच विश्वास ठेवा. तर्कशक्ती न वापरणे म्हणजे आत्महत्या होय.

आपले विचार त्यांनी वीसभर पुस्तके लिहून मांडले आहेत. क्रांती क्यो और कैसे?, मानवतावाद बनाय ब्राह्मणवाद, ब्राह्मण महिमा क्यों और कैसे?, मनुस्मृती ः राष्ट्र का कलंक, अद्भुत समस्या और समाधान, आत्मा का मिथ्यात्व, अर्जकसंघ, राजनीतिक विकल्प इ. वर्माजींना ‘अर्जक’चे कबीर म्हणतात.

अर्जक’के मार्क्स एंगल्स

रामस्वरूप वर्मा आणि चौधरी महाराजसिंह भारती अर्जक संघामध्ये या दोघांचे स्थान स्पष्ट करताना विनोद भारती त्यांची तुलना शास्त्रशुद्ध समाजवादाची मांडणी करणार्‍या मार्क्स व एंगल्स यांच्याशी करतात. दोघांचे काम परस्परांना पूरक होते आणि दोघांमध्ये निखळ मैत्री होती.

सुदामा प्रसाद ‘अकेला’ आपल्या काव्यात म्हणतात, “भारती और वर्माजी की एक जोडी अजब निराली थी। एक ज्ञान में आगर था, अगला विज्ञान का सागर था। दोनो आपसमेें मित्र रहे, मित्रता स्वार्थसे खाली थी।”

बिहारचे लेनिन ः बाबू जगदेव प्रसाद

शहीद जगदेव बाबू बिहारचे लेनिन म्हणून प्रसिद्ध आहेत. ते म्हणत – देशात 90 टक्के लोक शोषित आहेत, त्यांच्यावर 10 टक्क्यांचे राज्य चालणार नाही. “सौ में नब्बे शोषित है और धन धरती में नब्बे भाग हमार है, दसका शासन नब्बेपर नहीं चलेगा, नहीं चलेगा।”

“हमारी पहली पिढी गोली खाएगी, दुसरी जेल जाएगी तिसरी पिढी के लोग राज करेंगे और जीत अंततो: गतवा: हमारी होगी।”

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्या पिढीच्या जगदेवबाबूंना पोलिसांनी जाहीर सभेत भाषण करताना मानेमध्ये गोळी घातली, जखमी अवस्थेत फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेले, त्यांना पाणीही दिले नाही. प्रेत गायब करण्याचा प्रयत्न केला; पण जनक्षोभाच्या परिणामी, त्यांचे शव लोकांच्या स्वाधीन करावे लागले. ही 1974 सालची घटना आहे.

जनचळवळींना उधाण आले होते. जयप्रकाश नारायण यांच्या पुढारीपणाखाली दुसर्‍या स्वातंत्र्याचा लढा सुरू होता. कम्युनिस्टांचे मोर्चेही त्यांच्याएवढेच निघत होते, त्यांचा इंदिरा गांधींना पाठिंबा होता. जागतिक राजकारणात इंदिरा गांधी रशियावादी, तर जे.पीं.च्या मागचे नेते अमेरिकावादी समजले जात होते. या तिन्ही फ्रंट ब्राह्मणी नेतृत्वाखाली असल्याने शोषित समाज दलाने वेगळा झेेंडा उभा केला.

बाबू जगदेवसिंह मारले गेले; पण अर्जक विचार पसरत गेला. त्यामुळेच बिहारमध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री होऊ शकला नाही. तिसर्‍या पिढीत झालेल्या जागृतीचा फायदा लालूप्रसाद, नितीशकुमार, मायावती इत्यादींना झाला. सत्तेसाठी आपसांत भांडताना त्यांनी ब्राह्मण्यवाद्यांशी युती केली, दोस्ती केली, नेतृत्व मान्य केले. त्यामुळे राज्य अर्जक करण्याऐवजी ब्राह्मण्यवादी करताना दिसताहेत.

पेरियार ललईसिंग यादव

ब्राह्मण्यवाद्यांना सर्वांत मोठा विरोध महाराष्ट्रात सत्यशोधकांनी व ब्राह्मणेतर चळवळीने केला, तसा दक्षिणेत रामस्वामी पेरियार यांनी जस्टीस पार्टी काढून केला. मंदिरासमोरून जायला दलितांना परवानगी नव्हती, त्याविरोधात पेरीयारनी केलेला वायकोम सत्याग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी केलेल्या प्रबोधनातून पुढे ‘द्रविड मुन्येत्र कळघम’ पक्ष उभा राहिला. तामिळनाडूत त्या पक्षाची शकलेच राज्य करतात. त्यांनी उल्लेखनीय कामे केली. मागासांसाठी 69 टक्के जागा राखीव फक्त त्याच राज्यात आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह जेवणाची योजना त्यांनी फार पूर्वी सुरू केली आणि तिचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांना सुट्टीच्या दिवशीही जेवण मिळते. शाळा सहा दिवस सुरू असली, तरी मुलांचे पोट सातही दिवशी काम करते, या वास्तवाचे त्यांना भान आहे. एक रुपया किलोने तांदूळ देणारेही तेच राज्य आहे.

पेरियार यांनी ‘ट्रु रामायण’ पुस्तक लिहून रामायणावर प्रकाश टाकला. रामायणात उत्तर भारतीय आर्यांना महत्त्व असून दक्षिणेतील द्रविडांना अपमानित करण्यात आल्याचे दाखले त्यांनी दिले. रामापेक्षा रावणच श्रेष्ठ असल्याचेही मत त्यांनी मांडले.

‘अर्जक’चे एक नेते ललईसिंग यादव बौद्ध बनले. त्यांनी धार्मिक गुलामगिरी विरोधात आवाज उठविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथावर तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने बंदी घातली होती, त्याविरोधात ललईसिंग यांनी आवाज उठविला. ते हायकोर्टात गेले. खटला जिंकून आंबेडकरांच्या ग्रंथावरील बंदी उठविली.

इतिहास चक्र

त्यांनी पेरियार यांची परवानगी घेऊन 1968 साली ‘ट्रु रामायणा’चे हिंदीत भाषांतर केले. ‘सच्ची रामायण’ प्रसिद्ध होताच उत्तर प्रदेशमध्ये खळबळ माजली. शासनाने त्यावर बंदी आणून पुस्तकाच्या प्रती जप्त केल्या. तीन वर्षे खटला चालला आणि ललईसिंग यांनी खर्चासह न्यायालयाची लढाई जिंकली. पुस्तक मुक्त झाले.

1974 साली पेरियार यांचे निधन झाले. त्यांच्या शोकसभेत भाषण ऐकून जमलेल्या लाखो जनतेसमोर ललईसिंगना उत्तरेतील पेरियार म्हणून गौरविण्यात आले. ललईसिंग यादव ‘पेरियार ललई’ बनले आणि ‘हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ’ या म्हणीचा प्रत्यय आला. पेरियार ललई यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात ‘मनुस्मृती’ आणि ‘रामचरितमानस’ जाळण्याचा सत्याग्रह झाला.

रामचरितमानस नवी मनुस्मृती

‘मनुस्मृती’मध्ये स्त्रिया आणि शूद्रांना अपमानकारक कायदे सांगितले आहेत. धन, ज्ञान आणि मानापासून त्यांना वंचित ठेवले आहे. म्हणून बाबासाहेबांनी ‘मनुस्मृती’चे दहन केले.

मनुस्मृतीसारखेच विचार तुलसीदास यांनी ‘रामचरितमानस’मध्ये मांडले आहेत. ते म्हणतात – “ढोल, गँवार, शूद्र, पशू, नारी, ये सब ताडन के अधिकारी।”

ढोल, पशू, स्त्रिया आणि शूद्र यांना मार खाण्याचे अधिकार आहेत. ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, हे ठसवणारेही अनेक प्रसंग ‘रामचरित मानस’मध्ये आहेत. ब्राह्मणाशी द्रोह करू नका, त्यांची पूजा, सेवा करा; शील आणि गुणहीन असला, तरी ब्राह्मणच पूजनीय आहे. गुणांनीयुक्त आणि ज्ञानाने निपुण असला, तरी शूद्र पूजनीय नाही.

सापत ताडत, परूष कहंता। बिप्रपूज्य असगावहि संता।

पूजी अ बिप्र, सील गुण हिना। सूद्र न गुन गन ग्यान प्रबीना॥”

अर्जक’चा ‘रामचरितमानस’ दहन कार्यक्रम

या सत्याग्रहात भाग घेतलेल्या शिवकुमार कटियार यांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकायला मिळाले. ते संस्थापक रामस्वरूप वर्मांचे भाचे. गाव कानपूर देहात जिल्ह्यातले सिकंदरा.

1968 साली ‘रामचरितमानस’चा प्रचार वाढला होता. अर्जकने त्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला. कानपूरच्या कलेक्टरना बंदी घालण्यासाठी पत्र दिले. त्यात म्हटले होते – “रामचरितमानस हे शूद्रांच्या विरोधी, त्यांच्यावर अन्याय करणारे आणि मूठभर ब्राह्मणांच्या फायद्याचे आहे, म्हणून त्यावर बंदी घालावी, नाहीतर ते आम्ही जाळू.”

शिवकुमारनी पत्रक प्रसिद्ध केले आणि पोलीस मागे लागताच भूमिगत झाले. त्यांच्या टीचभर पत्रकाला हिंदुत्ववाद्यांनी मोठमोठी पत्रके काढून उत्तरे दिली.

कार्यक्रमाचा दिवस उजाडला. रेल्वे भरभरून विरोधक आणि पोलिसांच्या तीस फलटणी बंदोबस्तासाठी आल्या. दहन कार्यक्रमापूर्वी तिथे त्याच विषयावर नाटकाचे नियोजन होते; पण पोलिसांनी सर्व साहित्य उचलून नेले.

एवढ्या बंदोबस्तातही ‘अर्जक’चे सात कार्यकर्ते नियोजित ठिकाणी पोचले. त्यांनी ‘रामचरितमानस’ आणि ‘मनुस्मृती’चे दहन केले. नंतर पोलीस म्हणत होते, ‘आम्ही काहीही जाळू दिले नाही;’ पण कार्यकर्त्यांनी अर्धवट जळलेली पाने लोकांना वाटली होती, त्याचे फोटो वृत्तपत्रांनी छापले आणि पोलीस उघडे पडले. ब्राह्मण्यवाद्यांनी आदल्या दिवशी कार्यक्रमाला कोर्टाकडून मनाई हुकूम मिळवला होता. पोलिसांनी जागीच सात कार्यकर्त्यांना आणि त्यांना मदत केली, पाणी दिले, आसरा दिला, अशा गुन्ह्याखाली पन्नास जणांना पकडले. केस उभी राहिली; पण जाळले कोणी? हे सिद्ध न झाल्याने दहा वर्षांनी कार्यकर्ते निर्दोष सुटले.

‘अर्जक’ कार्यकर्त्यांना पकडून तुरुंगात नेले, तेव्हा कैदीही ब्राह्मण्यवाद्यांच्या बाजूने ओरडत होते. “हिंदू छदम और ये कदम” “मारो, काटो.” पण त्यातही एक कैदी ‘अर्जक’च्या बाजूचा निघाला. त्याने वाचवले.

प्रचाराचे मार्ग

शिवकुमार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जनजागृतीसाठी नाटकांचा आश्रय घेतला. एकदा रावणदहनाच्या दिवशी ‘शंबूक’ नाटकाचा जाहीर प्रयोग होता. विरोधकांनी अडवले. पोलिसांनी तडजोडीचा प्रयत्न केला. रात्री बारानंतर नाटक करावे, असा प्रस्ताव ठेवला; पण कार्यकर्ते हटून बसले. शेवटी सायंकाळी पाच वाजता नाटक सुरू झाले. ते पाहायला गाड्या जुंपून आसपासच्या गावचे नागरिक आले होते. त्यामुळे रस्ते बंद झाले आणि लोकांशिवायच रावणदहन पार पाडावे लागले.

शिवकुमार माध्यमिक शिक्षक होते. शाळेने नोटीस दिली. “शिकवण्याऐवजी नाटकेच करत फिरा;” पण शाळेच्या वेळेनंतर आपण स्वतंत्र असल्याचा युक्तिवाद शिवकुमारनी केला. शेवटी त्यांना सस्पेंड करण्यात आले. पाच वर्षे न्यायालयीन लढाई लढल्यावर ते पुन्हा नोकरीत सामावले गेले.

नाटकावर हिंसक हल्ले

“नाटक करतात” या कारणाने त्यांना वीस वेळा अटकही झाली. ब्राह्मण्यवाद्यांनी अनेक वेळा हिंसक हल्ले केले. एकदा तर कलाकार आत असताना नाटकाचा पँडॉल जाळला. कलाकार कसेतरी बाहेर पडले; पण त्यांच्या अंगावरचे कपडेही जळले होते. पेंडाल जाळणारा नंतर धर्मांध पक्षाचा आमदार बनला.

शिवकुमार यांचा विवाह 1977 साली अर्जक पद्धतीने झाला. सप्तपदी न झाल्याने गाववाले ‘विवाह ग्राह्य नाही,’ म्हणू लागले. त्यांच्या मते ‘नवरी अजूनही कँुंवारीच आहे.’ त्यांचे कुटुंबीय आता पूर्णपणे ‘अर्जक’ विचारात सामील झाले आहेत.

संस्कृती व सत्ता

राममनोहर लोहिया म्हणत, “ज्याची संस्कृती, त्याची सत्ता आणि ज्याची सत्ता त्याचा विकास.”

संस्कृतीची चार अंगे आहेत – विचार, आचार, संस्कार और त्यौहार!

विचार-अर्जक वर्णवर्चस्वाला, जातिभेदाला, ब्राह्मण्यवादाला विरोध करतात. मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकी विचाराचा प्रचार करतात. फुले, शाहू, आंबेडकर, गौतम बुद्ध, कबीर, अर्जक नेते वर्मा आणि भारती यांचे विचार मांडतात.

आचार-विचारांप्रमाणे आपले आचरण असावे. ब्राह्मणी सण-समारंभ टाळणे, समतेने वागणे, असे त्यांचे आचरण असते.

संस्कार-ब्राह्मण्यवादी सोळा संस्कारांचा आग्रह धरतात. नामकरण, कान टोचणे, जावळ काढणे, मुंज, विवाह, निधन इत्यादी. प्रत्येक संस्कारासाठी पुरोहिताकडून मुहूर्त काढणे, पूजा घालणे, शांती करणे इत्यादी बाबी केल्या जातात. प्रत्येक वेळी धार्मिक टॅक्स दिला जातो.

अर्जक संस्कार दोनच

अर्जक हे सर्व संस्कार नाकारतात; फक्त दोन संस्कार आवश्यक आहेत- एक विवाह आणि दुसरा मृत्यू.

दोन्ही संस्कार, देव, आदिशक्ती मुहूर्त, जेवणावळी इत्यादी टाळून केले जातात. त्याशिवाय चौदा सण आहेत.

त्यौहार – ब्राह्मण्यवाद्यांचे सण चमत्कारिक कथांनी भरलेले आहेत. काही विषमतेचे समर्थन करणारे आहेत. त्यातून सामान्यांच्यावर विषमतेचे, वर्णवर्चस्वाचे, जातिभेदाचे संस्कार होतात. इतर धर्मांतले सणही चमत्कारांनी भरलेले आहेत; शिवाय हे सण एका धर्माचेच लोक साजरे करतात. त्यातून राष्ट्रीय ऐक्य कसे येणार?

‘अर्जक’ने सर्वांना सामावून घेणारे 14 सण निवडले आहेत. धार्मिक सण बंद करून राष्ट्रीय सण साजरे केले, तर देश पुढे जाईल, ऐक्य वाढेल, असे त्यांचे मत आहे. सणांना पर्याय देणे हा प्रयत्न यापूर्वी कोणीही केला नाही. गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकरांनीही विचार, आचार, संस्कारावरच भर दिला; अर्जकचे हे वेगळेपण असल्याचे विचार ते मांडतात.

अर्जक सिद्धांत

‘अर्जक’ने आपले सिद्धांत पुस्तकरुपाने प्रसिद्ध केले आहेत. या पुस्तकाच्या पृष्ठभागावर ब्राह्मण्यवादी वृक्षाचे चित्र आहे. वृक्षाची मुळे पुनर्जन्म, खोडभाग्यवाद, तर त्याला जाती पातीची पाने असून वर्णव्यवस्थेच्या फांद्यांवर शोषणाची फळे लागली आहेत. हा ब्राह्मण्यवादी वृक्ष अर्जक समतेच्या कुर्‍हाडीने तोडत आहे.

मलपृष्ठावर समतेचा वृक्ष बहरला असून त्यांची मुळे म्हणजे पदार्थवाद, जनतंत्राच्या फांद्या, समाजवादाची पाने, तर सुख समृद्धीची फळे लागली आहेत. त्यासाठी अर्जक तर्कवादाचे पाणी घालतो आहे. अशा तर्‍हेने मानवतावाद विकसित होईल, हे सांगताना शेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘शिका-संघटित व्हा व समतेसाठी संघर्ष करा’ हे अशोक चक्र फिरविताना दाखवले आहे.

समतेचे महत्त्व

प्रस्तावनेत संस्थापक रामस्वरूप वर्मा सुरुवातीलाच प्रश्न उपस्थित करतात – ‘मानवी समृद्धी समतेमुळे अधिक होईल की विषमतेने?’ उत्तरात ते म्हणतात – इतिहास असे सांगतो की, माणसामाणसांत जिथे समतेचे प्रमाण अधिक आहे, तो समाज प्रतिष्ठित होतो, तिथे समृद्धी अधिक असते. समता याचा अर्थ बोलणे-चालणे, उठणे-बसणे व खाण्या-पिण्यात समानता हवी आणि आपल्याला जी गोष्ट खटकते, ती इतरांशी वागताना करायची नाही. या मार्गाने शोषणविरहित समाज तयार होतो.

बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश समृद्ध बनले; पण त्यांच्यात विकृती येताच, त्यांच्या पतनाला सुरुवात झाली. या काळात ख्रिश्चन धर्माचा उदय झाला. प्रेम आणि समानतेमुळे रोमन समृद्ध बनले. ख्रिश्चनांमध्ये विकृती तयार झाली, तेव्हा इस्लामचा उदय झाला. स्पेनपासून कंबोडियापर्यंत त्यांचे साम्राज्य तयार झाले.

ब्रिटनने दास्यप्रथा संपवून आघाडी घेतली. ग्रीकमधल्या स्पार्टानगरात दास्यप्रथा होती. तीन हजार नागरिक, तर तीस हजार गुलाम होते. हा समानतेच्या सिद्धांताचा मोठा अपमान होता; परिणामी रोमनांकडून ग्रीकांचे पतन झाले. यावरून माणसामाणसांत समता निर्माण झाली की, समृद्धी येते आणि समतेमध्ये विकृती निर्माण झाली की, त्यांचे पतन होते, असे म्हणता येईल. देश मागास आणि दरिद्री राहण्याचा संबंध माणसामाणसांतील असमानतेशी आहे.

ब्राह्मण्यवाद आणि गुलामी

ब्राह्मण्यवाद आणि गुलामी यांचा अतूट संबंध आहे. ब्राह्मण्यवादी म्हणतात, आम्ही दुसर्‍या देशावर हल्ला केला नाही. कारण आम्ही सहनशील आहोत.

हे असत्य आहे. पुनर्जन्म आणि भाग्यवादावर उभा असलेल्या ब्राह्मण्यवादाने माणुसकीला काळीमा फासणारी विषमता तयार केली आहे. इतकी घाणेरडी विषमता जगात कोणत्याच भागात नाही. विषमतेच्या परिणामी ब्राह्मण्यवादात इतरांवर हल्ला करण्याची क्षमता नाही; त्यांच्यात दम नाही.

प्रेमाने जग जिंकण्याचीही क्षमता ब्राह्मण्यवादात नाही. त्यांच्यामध्ये प्रेमाऐवजी केवळ द्वेष भरला आहे. इथेच जन्मलेल्या अशोकाने प्रेमाने बौद्ध धर्म जगात नेला. हे सत्य झाकून ब्राह्मण्यवाद्यांना सहिष्णू म्हणणे हा इतिहासाचा विपर्यास आहे.

ब्राह्मण्यवादी संकोचशील आहेत. पुनर्जन्म आणि भाग्यवादावर आधारित ब्राह्मण्यवाद्यांचे गुलाम लोक आहेत. कोणताही विवेकशील प्राणी एक क्षणभरही गुलाम राहणार नाही.

गुलाम आणि गुलाम करणारा, दोघेही विवेकहीन असतात. त्यांना मानव म्हणणेही चूक आहे. अर्जक संघ म्हणतो – ‘समतेशिवाय समाज नाही.’

अर्जक वाढेल तेवढा ब्राह्मण्यवाद नष्ट होत जाईल आणि एके दिवशी करोडो भारतीय स्वातंत्र्यामध्ये फुलतील.

अर्जक’चे सिद्धांत व उद्दिष्टे

1) सर्व उत्पादन मानवी श्रमातून होते, म्हणून श्रमांना प्रतिष्ठा दिली पाहिजे.

2) मानसिक श्रमाला शारीरिक श्रमाची जोड असल्याशिवाय उत्पादन होत नाही.

3) उच्चवर्णियांनी स्वत:ला श्रमातून मुक्त करून भीक मागणेच श्रेष्ठ मानले. सर्वांत खालच्या थरावर असणार्‍या भिकारी वृत्तीला स्वाभिमान समजणे, ही नीचतम पातळी आहे.

4) भीक मागणारे समाजाचे नेते बनले आणि श्रम करणारे अस्पृश्य! ही शोकांतिका आहे. सफाई कामगार नसेल, तर दोन दिवसांत समाज रोगग्रस्त होईल. उच्चवर्णीय नसेल, तरी समाजाचे काहीच बिघडणार नाही.

5) जगात काम हीच पूजा आहे, तर भारतात ‘पूजा’ हेच काम आहे. त्यामुळे शेती पिकवणारा शेतकरी उपाशी आणि कामचोर उच्चवर्णियांच्या घरी धान्याच्या राशी असतात.

6) वरील विसंगती दूर केल्याशिवाय भारताचा भाग्योदय होणे नाही.

7) अनर्जकांनी- म्हणजे कष्ट न करता आयते खाणार्‍यांनी-जातिप्रथेला जन्म दिला. पुनर्जन्म आणि भाग्यवादाच्या भ्रामक सिद्धांतांचे जातिप्रथेला बळ दिले आहे आणि 87 टक्के जनतेचे शोषण केले.

8) कठीण काम करणार्‍या अर्जकांना प्रोत्साहन देण्याऐवजी दुर्भावनेचे दर्शन होते.

9) अर्जक सामाजिक विषमता संपवू इच्छितात व ऐक्य वाढवू इच्छितात.

10) सामाजिक बहिष्कार, असमानता आणि आर्थिक शोषणाला प्रोत्साहन देणार्‍या प्रथांना अर्जक विरोध करेल.

11) स्त्रियांना कमी लेखणार्‍या प्रवृत्तींना हद्दपार करून त्यांना समानतेवर आणले पाहिजे.

12) सामाजिक समता, आर्थिक विकास आणि सांस्कृतिक उन्नतीचे काम अर्जक करेल.

13) जातिप्रथेने अर्जकांमध्ये विभाजन तर केलेच; पण शोषणही केले.

14) अर्जक श्रम करतात; पण पूर्ण नियंत्रण अनर्जक करतात.

15) उद्योग-व्यवसायावरही अनर्जकांची मक्तेदारी आहे, ती मोडून काढली पाहिजे.

16) प्रत्येक अर्जकाने किमान एक तास शारीरिक व एक तास बौद्धिक श्रम केले पाहिजेत.

अर्जक संघामध्ये प्रवेश

अर्जक संघाचा सभासद होऊ इच्छिणार्‍यास प्रतिज्ञापत्र द्यावे लागते – “मी शारीरिक श्रम करणार्‍या जातीत जन्मलो आहे. मी इतर अर्जकांबरोबर समतेचा व्यवहार करीन, मी रोज शारीरिक श्रम करीन…” इत्यादी.

अर्जक म्हणजे मजुरी किंवा श्रम करणारे लोक. ब्राह्मण दान, दक्षिणा; म्हणजे भीक मागून खातात, मजुरी करत नाहीत. म्हणून त्यांना व्यक्तीस अर्जक संघात प्रवेश दिला जात नाही. अर्जक संघाचा सदस्य ब्राह्मणी संस्कृती नष्ट करून समतेवर आधारित मानववादाची प्रतिष्ठापना करून जात-वर्णविरहित संस्कृतीची स्थापना करू इच्छितो. अर्जक सामाजिक विषमता आणि आर्थिक शोषणाला कारणीभूत असणार्‍या श्रद्धा आणि प्रथा नाकारतो; पुनर्जन्माची कल्पना असत्य असल्याने विवाह आणि मृत्युसमयी ब्राह्मणाला बोलावत नाही.

अर्जक जानव्याला उच्च वर्णाचे नव्हे, तर गुलामीचे प्रतीक मानतो. आदर दर्शविण्यासाठी ब्राह्मण व इतरांच्या पायाला स्पर्श करण्यास विरोध करतो.

अर्जक संघाची रचना

पाच रुपये प्रवेश शुल्क भरून अर्जक जातीतील कोणीही व्यक्ती ‘अर्जक’ची सभासद होऊ शकते. गावपातळीवर शाखा चालविण्यासाठी दहा सदस्यांची समिती निवडली जाते. गावोगावचे प्रतिनिधी जिल्हा कमिटीची स्थापना करतात. त्यामध्ये 20 च्या आसपास सभासद; शिवाय वेगळी आर्थिक कमिटी आणि सांस्कृतिक कमिटी असते. याच पद्धतीने प्रदेश कमिटी आणि राष्ट्रीय कमिटी निवडली जाते.

शाखा आणि जिल्हा कमिट्यांची अधिवेशने दरवर्षी, तर प्रदेश व राष्ट्रीय कमिटीचे अधिवेशन व निवड दोन वर्षांनी होते.

अधिवेशन

अधिवेशनामध्ये दोन वर्षे केलेल्या कामाचा लेखा-जोखा मांडला जातो. त्यावर सदस्य आपली मते मांडतात व शेवटी मंजुरी घेतली जाते. अधिवेशनामध्ये नवीन कार्यकारिणीची निवड होते आणि पुढील कामाला दिशादर्शक ठराव मांडले जातात.

ठराव

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या सुरुवातीच्या अधिवेशनात धार्मिक बाबतीत कडक शब्दांत ठराव मांडलेले आढळून येतात.

जानवे-गुलामी

पहिल्याच ठरावात त्यांनी शुभाशुभ, उंचाई-नीचाई, पुनर्जन्म, भाग्यवाद, छुआ-छुत यावर टीका करून पुनर्जन्माच्या सिद्धांताचा अस्वीकार केला. सामाजिक विषमता आणि आर्थिक शोेषणाला पुनर्जन्माचा सिद्धांत कारण ठरला आहे.

कथा, भागवतपाठ, तीर्थजप इत्यादी बाबी समाप्त करण्याचे ठरले. पाय शिवून नमस्कार करणे, हे असभ्यतेचे व विषमतेचे प्रतीक व जानवे घालणे हे कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्याप्रमाणे गुलामीचे प्रतीक असल्याचे जाहीर करण्यात आले.

गाय पवित्र?

दुसर्‍या ठरावात गायीच्या पावित्र्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. मैला खाणारी गाय पवित्र आणि मैला उचलाणारा सफाई कामगार अपवित्र; मैला खाणारे कुत्रे कॉटवर बसलेले चालते; पण सफाई कामगाराने खालीच बसले पाहिजे, ही विडंबना आहे. अर्जक याच्याविरोधी आहेत.

मागासांचे नाव विकृत करून हाक मारण्याची पद्धतीलाही ‘अर्जक’ने विरोध केला. उठणे-बसणे बरोबरीने करा आणि ‘जय अर्जक’ असे अभिवादन करण्याचा ठराव करण्यात आला.

धर्मग्रहण विधेयक

तिसर्‍या ठरावात त्यांनी धर्माची व्याख्या केली आहे. मानव समाज कायम राहील आणि तरक्की करेल, त्यालाच धर्म म्हणावे; संहाराचे समर्थन करणारा, विषमतेला बढावा देणारा धर्म होऊ शकत नाही. तर्क आणि तथ्याच्या कसोटीवर उतरेल तेच स्वीकारावे व प्रत्येक व्यक्तीला धर्मनिवडीचे स्वातंत्र्य द्यावे. वयाच्या 18 व्या वर्षांपर्यंत व्यक्तीला कोणत्याच धर्माचे मानू नये. 18 वर्षांनी त्यानी अभ्यास करून धर्म निवडावा किंवा निधर्मी राहावे. हे धर्मग्रहण विधेयक केंद्र सरकारने लोकसभेत मंजूर करावे यासाठी खासदार चौधरी महाराज सिंग भारती प्रयत्नशील राहिले. या मार्गाने माणसे विवेकशील बनतील.

अर्जकचा शिक्षण विचार

चौथ्या ठरावात शिक्षणावर भाष्य केले आहे. आठवीपर्यंतचे शिक्षण सर्वांना मोफत व सक्तीचे करावे. शिक्षणातील ब्राह्मण्यवादी पाठ्यक्रम वगळून संविधानाशी संबंधित पाठ्यक्रम वाढवावा. ब्राम्हण्यवादानुसार पूर्वजन्मातील कर्मफळामुळे हा जन्म मिळतो. कोणत्याच दोघांचे कर्म समान नसल्याने सर्व व्यक्ती भिन्न, असमान बनतात. उच्च-नीचता निर्माण होते. यामुळे ब्राह्मण्यवाद संपवल्याशिवाय संविधानातील तत्त्वांची स्थापना होऊ शकत नाही.

शाळांमधून समतेचे शिक्षण द्यावे आणि समानतेचा व्यवहार करावा. शिक्षण सर्वांना समान असावे. देशभर एकच शिक्षण पद्धती असावी. पाचव्या ठरावाने वरील उद्देश साध्य करण्यासाठी आंदोलनाचे मार्ग स्वीकारण्याचे अर्जकांना आवाहन करण्यात आले.

अर्जक’ विवाह पद्धती

सहाव्या ठरावामध्ये अर्जक विवाह पद्धती मांडण्यात आली. विवाह एक आवश्यक संस्कार आहे; पण गरीब-श्रीमंतांच्या विवाहात जमीन-अस्मानाचा फरक असतो. ब्राह्मण्यवादी विवाह संस्कार, शोषण करणारा आणि भरमसाठ खर्चिक आहे म्हणून अर्जक संघाने सुटसुटीत विवाहसंस्कार जाहीर केला.

या पद्धतीप्रमाणे- वधूपक्ष वरपक्षाला निमंत्रण पाठवून विवाहाची तारीख, वेळ, स्थळ कळवेल. बारातीचे स्वागत गावाबाहेर करून वधूपक्षाच्या वर्‍हाडास जानवस घरात पोचवले जाईल. ठरलेल्या वेळी विवाह मंचावर वधू-वर येतील. तिथे दोघेही प्रतिज्ञा घेतील आणि एकमेकाला पुष्पहार अर्पण करतील. भोजन करून बारात बिदा केली जाईल. धन किंवा भेटवस्तू, हुंडा या बाबी टाळल्या जातील. सर्व अर्जकांनी ही पद्धत वापरावी.

लेखी प्रतिज्ञापत्रात सुरुवातीला नाव, पत्ता वगैरे तांत्रिक बाबीनंतर – आपण जोडीदार म्हणून स्वीकारत असून, समतेने वागू, सामाजिक समतेसाठी प्रयत्न करू इत्यादी बाबी आहेत.

अंत्यविधी

सातवा ठराव अंत्यविधीसंबंधी आहे. ब्राह्मणी पद्धतीने मंत्राग्नी देणे, दसपिंड, बारावे-तेरावे इत्यादी खर्चिक व धार्मिक बाबी यामध्ये पूर्ण टाळल्या आहेत. विवेकबुद्धीने विचार करता मृत्यूनंतर प्रेताची विल्हेवाट एखाद्या पद्धतीने लावणे आवश्यक आहे. ती मर्जीनुसार लावावी. त्यानंतर पाच दिवस झाल्यावर शोकसभा आयोजित करावी म्हणजे मित्र-नातेवाईक आपल्या भावना शोकमग्न परिवारापर्यंत पोचवतील.

कोणत्याही प्रकारे मित्र नातेवाईकांचा बोजा परिवारावर पडता कामा नये. ही बाब ध्यानात घ्यावी.

सणसमारंभ

आठव्या ठरावामध्ये अर्जकने ब्राह्मण्यवादी सणसमारंभ त्याज्य ठरवले. हे त्यौहार पुनर्जन्म आणि भाग्यवादाला बढावा देतात, जाती-पाती, छुत-अछुत आणि विषमतेचे समर्थन करतात. हे सोडल्याशिवाय समाज निर्माण होऊ शकत नाही.

समाज म्हणजे सम + आज!

हे त्यौहार सोडून मानवतावादी 14 त्यौहार ‘अर्जक’ने सुचवले ते पुढीलप्रमाणे –

1) भारतीय प्रजासत्ताक दिन – 26 जानेवारी

2) धान्य पिकल्याच्या आनंदात उल्हास दिवस-1 मार्च

3) डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस चेतना दिवस – 14 एप्रिल

4) गौतम बुद्धांचा जन्मदिवस मानवता दिवस – 15 मे.

5) अर्जक संघाचा स्थापन दिवस समता दिवस – 1 जून.

6) भारतीय स्वातंत्र्य दिन – 15 ऑगस्ट.

7) रामस्वरुप वर्मांचा जन्मदिवस क्रांतिदिवस – 22 ऑगस्ट.

8) बिहारचे लेनीन जगदेव प्रसाद यांचा शहीद दिन – 5 सप्टेंबर.

9) फसल व व्यापार लाभ दिवस – 1 ऑक्टोबर.

10) सरदार पटेलांचा जन्मदिवस एकता दिवस – 30 ऑक्टोबर

11)चौ.महाराज भारतींचा जन्मदिवस विज्ञान दिन -1 नोव्हेंबर

12) वीर बिरसा मुंडाचा जन्मदिवस जागृती दिन– 15 नोव्हेंबर

13) . जोतिबा फुलेंची पुण्यतिथी शक्ती दिवस – 28 नोव्हेंबर

14) पेरियार पुण्यतिथी विवेकदिन – 25 डिसेंबर.

स्थानिक परिस्थितीचा विचार करून वरील दिवस साजरे केले जावेत आणि समता व मानवतावादाचा प्रसार करावा, असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.

धार्मिक सणांना हद्दपार करणे आणि राष्ट्रीय सणांना वजन प्राप्त करून देणे, हा मोठा विचार अर्जक संघाने मांडलेला आहे. जास्तीत जास्त महामानवांना सामावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. विविध समाजघटकांना आपलेसे करताना थोडी कसरत करावी लागणारच!

अर्जक म्हणजे अर्जन करणारा – कष्टकरी, श्रमिक! जगातील श्रमिक जो दिवस मानतात – तो एक मे कामगार दिन- त्याला मात्र ‘अर्जक’च्या त्यौहार यादीमध्ये स्थान नाही. महान नारीही त्यांना त्यौहारासाठी सापडलेली नाही.

महामना शब्दाचा वापर

सर्व मोठ्या माणसांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी अर्जक ‘महामना’ शब्द वापरतात. महामना म्हणजे मोठा माणूस. त्यांना महात्मा- म्हणजे मोठा आत्मा शब्द मान्य नाही.

आत्मा-परमात्मा नाकारल्यामुळे महात्मा शब्दाला अर्थ उरत नाही. भारतीजींनी आपल्या मृत्यूनंतर स्वर्गीय किंवा स्वर्गवासी शब्दांचा वापर आपल्यासाठी करू नये, असे सांगून ठेवले. स्वर्ग-नरक नाकारल्यामुळे त्यांचे म्हणणे योग्य आहे.

पुण्यतिथीला ते ‘यश:कायी दिवस’ म्हणतात. सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरील ‘अर्जक’च्या विचारांची ओळख वरील पुस्तकातून होते.

पण अर्जकने राजकीय पर्यायही दिला आहे. चौधरी महाराजसिंग भारतींनी लिहिलेल्या ‘समाजवाद : दर्शन और आचरण’ या पुस्तकातून त्यांचे राजकीय विचार समजतात.

समाजवाद

अर्जकने समाजवादाचा पुरस्कार केला आहे. लोहियांनी समाजवादी पक्षाने पुरस्कार केलेला समाजवाद त्यांना हवा आहे.

द्वंद्वात्मक भौतिकवाद

निसर्गात पदार्थ आहेत, तेच शक्तीचे रूप घेतात. शक्ती हेही एक पदार्थाचेच रूप आहे. सूक्ष्म कणांच्या आपसातील क्रिया-प्रतिक्रियांतून नव्या रुपाचा पदार्थ तयार होतो. निसर्गात पदार्थाशिवाय दुसरे काहीही नाही, हा वैज्ञानिक समाजवादाचा पहिला नियम आहे.

जे लोक स्वत:ला समाजवादी म्हणवतात, ते जर एखाद्या अदृश्य शक्तींवर विश्वास ठेवत असतील, दुर्गा, देवता यांची पूजाअर्चा करत असतील, तर ते कधीही समाजवादी होऊ शकत नाहीत. बौद्धदर्शनाप्रमाणे समाजवादही भौतिक दर्शन आहे. या दर्शनात आत्मा, परमात्मा, भूत, प्रेत, देवी-देवता यांचे काहीही अस्तित्व नाही. प्रत्येक घटनेमागे कारण असते. विज्ञानाचे ते शोधता येते. पदार्थामधील द्वंद्वांचा वापर करून वैज्ञानिक कार्य करतात. हव्या त्या वस्तू तयार करतात. ‘अर्जक’ने वेदाला अज्ञानाचे भांडार मानले आहे.

पापपुण्याचा जन्म

धर्मामध्ये पाप-पुण्याला फार महत्त्व आहे. काहीजणांनी त्याचा धसकाच घेतलेला असतो. बोलता बोलता एखादे वाक्य देवाच्या विरोधात गेले, असे वाटून लगेच गालाला बोटे लावून देवाची क्षमा मागणारे लोक दिसतात.

भारतीजींनी या विषयावर पुस्तक लिहून शंका निरसन केले आहे. ते म्हणतात – विज्ञान युगापूर्वी अनुभव एवढा एकच मार्ग सत्य शोधण्यासाठी उपलब्ध होता. त्याची सत्यता अनुभव गोळा करणारी इंद्रिये आणि अर्थ लावणारे मस्तक यांच्या क्षमतेवर अवलंबून होती. विज्ञानाच्या विकासाबरोबर आता आपण सत्याजवळ पोचू शकतो आहोत. पाप-पुण्याचा विचार कधी निर्माण झाला, याचा शोध घेताना त्यांनी मानवी इतिहास समोर ठेवला.

क्रांतिकारी विधेयक

रामस्वरूप वर्मा यांनी 1992 साली महिलांच्या कल्याणासाठी एक विधेयक उत्तर प्रदेश विधानसभेत मांडले. “विधुर पुरुषाने विधवेशी विवाह करावा, त्याने कुमारीशी विवाह करणे दंडनीय अपराध मानावा.”

या विधेयकाच्या समर्थनार्थ स्त्रियांवरील अन्यायांची विविध उदाहरणे दिली. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना अपमानकारक नियम सांगितले आहेत.

ब्राह्मण्यवादी ग्रंथामध्ये स्त्रियांची बदनामी केली आहे. स्त्रियांना पुरुषांपेक्षा कामवासना जास्त असते, त्या कोणतेही नाते पाहत नाहीत इत्यादी आरोप केले जातात; पण प्रत्यक्षात सर्व बलात्काराच्या घटना पुरुषांकडूनच झालेल्या दिसतात; पण हे ऐतिहासिक विधेयक भारतीय संस्कृतीचे पुजारी समजले जाणार्‍या भाजपा सरकारने बहुमताने फेटाळले.

हे विधेयक पास झाले असते, तर हिंदू विधवांचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असती. विधवा पुनर्विवाहाला वरच्या समजल्या जाणार्‍या वर्णातच मोठा विरोध आहे. विधुराला कुमारीशी विवाह करण्यास बंदी घातली, तर तो आपोआपच विधवा विवाहाकडे वळेल. कुमारीशी विवाह केल्याने त्या वयोगटातील एक विवाहयोग्य कन्या कमी होते. त्यामुळे वर त्या खालील वयोगटाकडे वळतात. याच पद्धतीने पूर्वी ‘बाला-जरठ विवाह’ होत असत. या विधेयकाने वरच्या वर्णातील हिंदू बालिकांचेही हित झाले असते.

सरकारने ब्राह्मण्यवादी ग्रंथ जप्त करावेत

संविधानाची शपथ घेऊन राज्य आणि केंद्र शासन सत्तेवर बसते. संविधानाने सर्वांना समानतेचा हक्क दिला आहे. जातीवरून विषमता, स्त्री-पुरुष विषमता नष्ट करून सर्वांना शिक्षण देण्याचे वचन दिले आहे. ब्राह्मण्यवादी ग्रंथांमध्ये बोलण्या-चालण्याची, खाण्यापिण्याची विषमता, स्त्री-पुरुष विषमता, यांचे समर्थन आहे. शिक्षणाचा अधिकार शूद्रांना दिलेला नाही. असे ‘मनुस्मृती’सारख्या स्मृती आणि गीतेसारखे ग्रंथ शासनाने जप्त केले पाहिजेत, अशी मागणी रामस्वरूप वर्मांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी ब्राह्मणी ग्रंथातील उतारेच्या उतारे उद्धृत केले आहेत. ब्राह्मण्यवादी ग्रंथ ‘अर्जकां’च्या शोषणाचे हत्यार आहेत.

अर्जक’ गीते

जनजागृतीसाठी अर्जक संघाने गाण्यांचाही वापर केला आहे. ‘अर्जक मशाल’ पुस्तकात गंगाराम लोधी ऊर्फ ‘धीरज’ यांची गीते संकलित केली आहेत. त्यामध्ये धर्माचा व्यापार, झगडे, अंधश्रद्धा, धर्मग्रंथातील कपट इत्यादींचे वर्णन केले आहे.

उठो अर्जकों आँखे खोलो, नया जमाना आया है।

हुआ देश आजाद, अन्धविश्वास अभी तक छाया है।

या काव्यात पुढे कवी म्हणतो –

पत्थर के भगवान यहाँपर, दूध मलई खाते है।

निर्धन और लाचार बेचारे, भूँखे हो रह जाते है।

बिन मेहनत के ठगले खाते, वे उँचे कहलाते है।

जो मानव की सेवा करते, उनको नीच बताते है।

यूट्यूबवरही गीते पाहायला मिळतात

आगी लागो तेहर पोथी पथरा में

हमनी के कई लव निखार बाबाजी।

वेद हटाव, पुराण हटाव,

यही का बनाया तुने हथियार रे

आज आया हूँ तुझको सुनाने,

देवदेवता की ये कहानी”

एकावेळी चौदा, पंधरा वादक स्टेजवर कार्यक्रम सादर करतात. श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत असतात, असे दृश्य दिसते. पेरियार ललईसिंग यादवांनी अंगुलीमाला नाटक, शंबुक वध, सन्तमाया बलिदान, एकलव्य, नागयज्ञ नाटक अशी नाटके लिहून स्टेजवर आणली आहेत.

अर्जक संघ वाराणशी

आम्ही अर्जक संघाची अधिक माहिती घेण्यासाठी वाराणशी गाठली.

वाराणशी भागात 1968 साली नंदलाल कश्यपजी, रामकृष्ण शास्त्रीजी, डॉ. जमुनाप्रसाद, डॉ. बेचन प्रसाद अशा कार्यकर्त्यांनी ‘अर्जक’ची स्थापना केली. आसपासच्या गावी जाऊन प्रबोधनपर गीते, नाटके, व्याख्याने मीटिंग्ज अशा मार्गांनी ते प्रचार-प्रसार करतात. सध्या त्यांचे अडीच-तीन हजार सभासद आहेत. त्यांच्या जिल्हा कार्यकारिणीच्या मीटिंगला हजर राहता आले. वाराणशीच्या जिल्हा मीटिंगला त्या दिवशी दहा सदस्य हजर होते. त्यांनी अर्जक विचार आसपासच्या जिल्ह्यातही वाढत असल्याची उदाहरणे दिली. विज्ञान दिनाचे नियोजन करणे हा मुख्य विषय चर्चिला गेला.

वाराणशी शेजारच्या रामरायपूर गावी हरिश्चंद्र वर्मा राहतात. त्यांनी अर्जकचे वाचनालय सुरू केले आहे. अर्जकने निवडलेल्या 14 राष्ट्रीय सणाला इथे गाव गोळा होते. इथे ‘अर्जक’ने काढलेल्या कॅलेंडरवर गौतम बुद्ध आणि अर्जक नेत्यांचे फोटो पाहायला मिळाले. देशात घडणार्‍या घटनांबाबत ते सतर्क असतात.

‘अर्जक’ संघाचे उत्तर प्रदेश राज्याध्यक्ष रामजी वर्मांनी आम्हास सांगितले की, “वाराणशीत काही अर्जक विवाह झाले आहेत. देव व ब्राह्मणाशिवाय झालेल्या या विवाहितांचे संसार आजपर्यंत उत्तम सुरू असून एकाचाही घटस्फोट झालेला नाही.”

काशीत मरूनही डोंबाच्या हातचा अग्नी न घेता काडेपेटी वापरून अग्नी देण्याचा पराक्रम यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी केला आहे. अग्निसंस्कारानंतर धार्मिक विधी न करता केवळ शोकसभा घेणार्‍यांचे प्रमाणही वाढले असे जिल्हाध्यक्षांचे मत आहे. यावर्षी 16 शोकसभा झाल्या. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना गोळी मारली, त्यादिवशी वाराणशीतल्या ‘अर्जक’ कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेऊन ‘शोकदिन’ पाळला होता.

धार्मिक सणांचा राजकारणासाठी वापर हरिश्चंद्र वर्मा

सणांचे महत्त्व जाणून जनमत तयार करणे ब्राह्मण्यवादी करतच असतात. महाराष्ट्रात शिवजयंती व गणेशोत्सवाचा वापर करून धर्मांधता व मुस्लिम द्वेष वाढवण्याचा यशस्वी प्रयोग झाला, त्यातून राजकीय पीकही आले. उत्तर प्रदेशात ‘कावडिया’ पद्धत या वीस वर्षांत प्रचंड वाढवण्यात आली. आज 95 टक्के बीसी, ओबीसी त्यात भागीदारी करतात. “दुर्गापूजासे पिछडी जातके मनको कंट्रोल किया” असे मत मांडून हरिश्चंद्र वर्माजींनी “ब्राह्मण-खत्रीयोंके बसती में दुर्गापूजा का मेला नहीं भरता” असाही शेरा मारला.

अर्जक विचारांमुळे वाराणशीमध्ये महिलांनी प्रेताची ताटी उचलली, धार्मिक संस्कार टाळून शोकसभा घेतल्या, नेत्रदान केले, ‘रामनाम सत्य है’च्या ऐवजी ‘जन्म-मृत्यू सत्य है’ ऐसे नारे लगाये- अशी फुटकळ उदाहरणे दिसत आहेत.

उत्तर प्रदेश अर्जक संघाचे कार्यकर्ता आनंद बोधी यांच्या मते “अहिल्याबाई होळकर पुरोगामी विचारांच्या होत्या. त्यांनी गंगा नदीवर धर्मशाळा व घाट बांधला. तो लोकांच्या सोयीसाठी; ब्राह्मणांचे पोट भरण्यासाठी नव्हे.”

मानवतावादी छात्रयुवा संघाचे अध्यक्ष मनोजकुमार ‘अर्जक’मध्ये त्यांच्या मामांच्यामुळे आले. मामा – डी. सी. राम नोकरी संपल्यावर सायंकाळी गावोगाव जात आणि व्याख्याने देत. ‘अर्जक’ संघाचा प्रचार करत. मनोजकुमार यांच्या मते – धर्म बदलूनही जातीभेद मिटत नाही. कबीर, महात्मा फुले यांनी धर्म बदलले नाहीत. म्हणून अर्जक संघही धर्म न बदलता संस्कृती बदलण्याचे काम करतो.

सोशल मीडिया

अर्जकच्या मानववादी छात्रसंघटनेचे अलफभाई पटेल सोशल मीडियाचे काम पाहतात. ते यू.पी.च्या सोनभद्र जिल्ह्याचे. मेकॅनिकल इंजिनिअरची नोकरी सोडून ते पूर्ण वेळ कार्यकर्ते बनले आहेत. त्यांनी केलेल्या वेबसाईटवर कार्यकारिणी, ध्येये, उद्दिष्टे, कार्य यांची माहिती असून, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, यू-ट्यूब, ट्वीटर या मार्गानेही प्रचार सुरू आहे. पुस्तके ‘ऑनलाईन’ खरेदीचीही सोय केली आहे. अर्जक संघाची www.arjaksangh.org ही वेबसाईट खूपच लोकप्रिय आहे.

नियतकालिक

वाराणशीहून अशोककुमार वर्मा आणि चन्द्रबली पटेल ‘अर्जक चेतना’ नियतकालिक चालवतात. 2016 सालच्या नियतकालिकात सुरुवातीला भारतीय संविधानाची प्रस्तावना दिली असून प्रत्येक कार्यक्रमात तिचे सामूहिक पठण करावे, अशी सूचना दिली आहे.

संपादकियात त्यांनी समाजाची विभागणी अर्जक आणि अनर्जक किंवा कमेरा आणि लुटेरा अशी करून घटनेतील 14 ते 30 कलमातील समता, स्वतंत्रता, शोषणास विरोध, धार्मिक अधिकार आणि शिक्षण यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. वाराणशी जिल्हाध्यक्षांच्या लेखामध्ये 2016 साली 200 अर्जक विवाह, तर मृत्यूनंतरच्या 22 शोकसभा झाल्याची नोंद आहे. पुढे शेती सुधारणा, संघटनेचे संस्थापक, अर्जक त्यौहार, विषमता नष्ट करण्याचे मार्ग, अंधश्रद्धा आणि विज्ञान, मानसिक आजार, पुनर्जन्म का सच, शिक्षा, नारी अशा विषयांवरील लेख आहेत.

विचारांची दिशा

अंकातील काही घोषणाही त्यांच्या विचारांची दिशा दर्शवतात –

समता बिना समाज नहींबिन समाज जनराज नहीं।”

जिसमें समताकी चाहत नहींवह बढिया इन्सान नहीं।”

दो बाते मोटी मोटी सबको इज्जत, सबको रोटी।”

जिसका पैर सही होता वो डंडा का सहारा नहीं लेता,

जिसका दिमाग सही होतावो पंडा का सहारा नहीं लेता।”

पाखंडीको दान, मान, मतदान देना बंद करो।”

संशय को तर्कसे तोडिये, ज्ञान को विज्ञान से जोडिये।”

अर्जक संघाचे यश

अर्जक संघाचे यश सांगताना युवाफ्रंटचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजकुमार म्हणाले की, “अर्जक संघाने ब्राह्मण्यवादाच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे. दहा राज्यांमध्ये अनुयायी-कार्यकर्ते उभे केले आहेत. तन, मन आणि धनाने प्रचार करण्याचा संस्कार त्यांना दिला आहे. संघटना उभी करण्यातही आम्हांस यश मिळाले आहे. विचार-आचार – संस्कार आणि त्यौहार असे चार मार्गाने आमची वाटचाल सुरू आहे.”

ते पुढे म्हणाले की, “उत्तरप्रदेशातील लोक पाप-पुण्य, आत्मा-परमात्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक या कल्पनांत गुरफटून पुरोहितालाच देव मानतात; खाण्या-पिण्यात, उठण्या-बसण्यात विषमतेने वागतात, गुलाम म्हणूनच आयुष्य काढतात, त्यातून मुक्ती मिळवणे, हेच खरे स्वातंत्र्य आहे.”

अर्जक संघाचे उत्तर प्रदेशचे राज्याध्यक्ष रामजी वर्मा म्हणाले की, “अर्जक विचार घेऊन राजकारणात पुढे आलेले अनेक नेते आज दिसतात. काही पक्षांनीही हा विचार पाया म्हणून स्वीकारला. मंडल आयोगाची पार्श्वभूमी तयार होण्यातही अर्जक संघाचा वाटा होता. सर्वांना सामावून घेता येईल, असा सणांचा पर्याय अर्जक संघाने दिला. शूद्रांना ताठ मानेने उभा राहता येईल, असे तत्त्वज्ञान दिले, आत्मविश्वास दिला.

पन्नास वर्षांत अनेक लहान-मोठ्या संघटना वाढल्या आणि लयाला गेल्या; पण अर्जक संघाचे काम अव्याहत सुरू आहे. अर्जक संघाने आत्मा-परमात्मा, ईश्वर, पुनर्जन्म, पाप-पुण्य नाकारून जाहीरपणे नास्तिकवादाचा पुरस्कार केला; धार्मिक आणि पौराणिक ग्रंथांचे पुनर्मूल्यांकन सुरू केले.”

वर्मा पुढे म्हणाले की, “वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय संविधान जनतेपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशात वर्ग संघर्षापूर्वी वर्णसंघर्ष आवश्यक आहे, याची जाणीव वाढवली.

धार्मिक अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विज्ञानाचा वापर करून अध्यात्म वेगळे ठेवण्याची युक्ती हाणून पाडली. आत्मा-परमात्मा-कल्पना विज्ञान नियमांनी तपासली. अशा अनेक उपलब्धी अर्जक संघाकडून सांगता येतील.”

समारोप

अर्जक संघाचा प्रसार अजून वेगाने व्हावा, यासाठी काही बाबी नम्रपणे सुचवाव्याशा वाटतात.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनेक कर्मकांडे तपासून घेण्याचे आवाहन अर्जक संघाने केले आहे. आपली मते वारंवार तपासावीत, चूक आढळल्यास बदलावीत, हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा महत्त्वाचा गाभा आहे. अर्जक संघानेही आपले तत्त्वज्ञान-दर्शन-वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तपासावे.

पुरोहितवादाला विरोध

पुरोहितवादाला विरोध हा अर्जक संघाचा गाभा आहे. पुरोहितवाद म्हणजे काय? – जन्माने जात मिळते, जातीचे गुणधर्म ठरलेले आहेत, त्यानुसार त्यांनी व्यवसाय करावा, हे ब्राह्मण्यवाद सांगतो. ब्राह्मण्यवाद जन्माने माणूस श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवतो. याला विरोध करता-करता अर्जक संघाने तेच केलेले दिसते.

ब्राह्मण जातीत जन्मलेला प्रत्येकजण अनर्जक आहे, ऐतखाऊ, अप्रामाणिक आहे आणि ब्राह्मणेतर प्रत्येकजण अर्जक आहे, प्रामाणिक आहे किंवा दुरुस्त होण्याची शक्यता आहे, ही बाब वैज्ञानिक द़ृष्टिकोनात बसत नाही. महात्मा फुलेंनी आपला विचार एका अखंडात मांडला आहे-

“ख्रिस्त, महंमद, मांग, ब्राह्मणाशी, धरावे पोटाशी बंधूपरी।”

महात्मा फुलेंना अनेक ब्राह्मण मित्रांनी मदत केली आहे. मुलींची पहिली शाळा भिडेंच्या वाड्यात काढली, ते भिडे ब्राह्मण होते; शाळा काढलेल्या शिक्षण संस्थेत महात्मा फुलेंच्या शिवाय इतर सर्व ब्राह्मण होते. हीच बाब राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकरांच्या बाबतीत सांगता येते. शाहू महाराजांचे अनेक मित्र, सहकारी, ब्राह्मण होते, हे मंत्र पुराणोक्त आहेत, हे सांगणारे राजाराम शास्त्री भागवत ब्राह्मण होते. सरसकट ब्राह्मणांना नावे ठेवणे, ही बाब संघटनेच्या कार्यालाही बाधा आणते; शिवाय अवैज्ञानिक आहे.

मार्क्सवाद

समतेसाठी वर्णसंघर्ष आणि वर्गसंघर्ष करावा लागणार आहे. वर्गसंघर्षाचे शास्त्रशुद्ध तत्त्वज्ञान मार्क्सने सांगितले. त्यांचा काही भाग अर्जकसंघही मान्य करतो आहे; पण मार्क्स, मार्क्सवाद व कम्युनिस्ट यांच्याबाबतचे अर्जक संघाचे आकलन, त्या काळच्या समाजवाद्यांच्या मतावर अवलंबून राहिले आहे.

रशियावर टीका करताना, त्यांनी महागाई, बेरोजगारीवर मिळवलेले नियंत्रण, हिटलरला चारलेली धूळ इत्यादी बाबींचा विचार केलेला नाही.

महागाई, बेरोजगारी, दारिद्य्र, उपासमार, विषमता अशा आर्थिक आजारांवर आजतरी मार्क्सवादाशिवाय वेगळे औषध नाही, हे रशियामध्ये वाढलेल्या आणि पडलेल्या साम्यवादाने सिद्ध केले आहे. अर्जक संघाने आपले मार्क्सवादासंबंधी आकलन तपासून पाहावे.

ओशोचे समर्थन खटकले

जून 2018 मध्ये अर्जक संघाच्या सुवर्णजयंती निमित्त ‘अर्जक यात्रा’ ही ‘स्मरणिका’ प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये पान 16 वर ‘ओशो’ना प्रश्न विचारला आहे – राजकीय लुच्चांपासून देशाला सुटका कधी मिळेल? ते म्हणतात – ‘हे सांगणे कठीण आहे. प्रश्न आहे – तुमचे अज्ञान कधी मिटेल? तुम्ही अज्ञानी आहात, तोपर्यंत कोणी ना कोणी तुमचे शोषण करणारच. पंडित, पुरोहित, मौला, राजनेता. तेव्हा प्रश्न विचारा – मी कधी जागृत होईन आणि खोट्याला खोटे म्हणून ओळखीन.’

सुवर्णजयंती स्मरणिकेतच दीपक आनंद बोधी यांनी आपल्या लेखात म्हटले आहे – “ओशो (आचार्य रजनीश) और रामस्वरूप वर्मा ही ऐसे क्रांतिकारी विचारक रहे है, जिनके क्रांतिकारी विचार विश्व और देशको देना चाहते थे, जिससे मानवीय समाज का निर्माण हो सके। अंधविश्वास पाखंडसे मुक्त, युद्धसे मुक्त, राष्ट्रविहिन विश्व का निर्माण हो सके।”

‘वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज अर्जक संघासाठी मोठी आहे. ‘चकाकते ते सर्व सोने नसते’ हे लक्षात घ्यावे. ओशोंच्या कार्याला वैज्ञानिक दृष्टिकोन लावावा.

नास्तिकवाद

एखादी व्यक्ती निधर्मी किंवा नास्तिक राहू शकते; पण समाज नाही, असे डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे. धर्म आणि ईश्वर ही वर्गीय समाजाची देण आहे. जोपर्यंत वर्गीय समाज आहे, तोपर्यंत ईश्वर आणि धर्म नाहीसे होऊ शकणार नाहीत.

मार्क्स म्हणतो, धर्म हे हृदयहीन जगाचे हृदय आहे. दबलेल्यांचा, दीनदुबळ्यांचा आवाज आहे. तो निरुत्साही परिस्थितीतला उत्साह असतो. धर्माच्या रुपाने व्यक्त होणारे दु:ख हे एकाच वेळी खर्‍या दु:खाचे प्रकट रूप असते आणि त्याचवेळी खर्‍या दु:खाचा निषेध असतो.

“धर्म ही अफू आहे, तो सुखाचा आभास देतो.”

मार्क्सच्या काळात गिरणीत नवरा-बायको दोघांनी कामे केल्याशिवाय मजुरांचे पोट भरत नव्हते. अशावेळी कामावर जाणार्‍या मजूर स्त्रिया आपल्या बाळाला अफू चारून झोपवत. अफू वाईट आहे, हे सांगून त्यांच्यात बदल होणे शक्य नव्हते.

कारण मग भूकबळी व्हावे लागले असते. ‘अफू चारू नये’ असे वाटत असेल, तर एकाच्या पगारात भागेल, अशी व्यवस्था निर्माण करणे, हाच मार्ग होता. आभास नाहीसा करायला खरे सुख दिले पाहिजे. देव आणि धर्माची परिस्थिती आजही अशीच आहे.

भांडवलदारी अरिष्टांमुळे श्रमिकांवरील हल्ले वाढत आहेत. नोकरकपात, नवे रोजगार नाहीत, अस्थिरता, महाग होणारी औषधे अशा जीवघेण्या परिस्थितीत काल्पनिक देव आधार देत आहेत.

कर्ज काढून वडापचा म्हणजे बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करणार्‍या तरुणांपुढे कर्जाचे हप्ते, इंधनाच्या वाढत्या किमती, टॅक्स, पोलिसांचे हप्ते, याबरोबर स्पर्धेत टिकायचे, तर वेगावर स्वार होण्याशिवाय पर्याय नाही, अपघातांची टांगती तलवार अशा अवस्थेत – ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ या धीराची आवश्यकता असते.

नियमित पगार घेणार्‍या शिक्षक-प्राध्यापकाला या धीराची गरज नाही, म्हणून त्याच्या गाडीमागे असे वाक्य दिसत नाही. नास्तिकवादाच्या या मर्यादांचाही विचार व्हावा.

शत्रूमित्र विवेक

डॉ. दाभोलकर म्हणत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी उपहासाची नव्हे, तर करुणेची गरज असते.

विरोधकांशी दोन हात करताना शत्रू-मित्र विवेक ठेवणे आवश्यक असते. प्रतिगाम्यांची सरशी होत असताना, तर हे जास्तच आवश्यक आहे. “टीका करताना शत्रूला नामोहरम करायचे आहे आणि मित्रामध्ये सुधारणा घडवायची आहे, त्याला शत्रूच्या गोटात ढकलायचे नाही, याचे भान ठेवले पाहिजे,” असे कॉ. गोविंद पानसरे म्हणत. त्यासाठी आपले कोण आणि विरोधक कोण? रेषेच्या अलिकडचे आणि रेषेच्या पलिकडचे अशी विभागणी केली पाहिजे.

‘फिरा’च्या बॅनरखाली देशभरच्या समविचारी संघटना एकत्र आणण्याचा अर्जक संघाचा प्रयत्न चांगला आहे, त्याला गती मिळावी.

अर्जक म्हणजे कष्टकरी, श्रमिक, उत्पादक; त्यांच्या सणामध्ये जागतिक कामगार दिन ‘एक मे’चा समावेश नाही, ही बाब प्रकर्षाने जाणवते. ‘अर्जका’त एकी कशी होणार?

जातीमध्ये वर्गनिर्मिती

आता प्रत्येक जातीमध्ये शोषक आणि शोषित वर्ग तयार झाले आहेत. ही शोषक मंडळी जातीपेक्षा वर्गाशी प्रामाणिक राहतात. ब्राह्मण्यवाद्यांशी हातमिळवणी करतात. या नव्या परिस्थितीचाही विचार होणे गरजेचे आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैचारिक द्वंद्व अर्जक संघाला आपल्या ध्येयापर्यंत पोचायला मदत करेल; जय अर्जक!

लेखक संपर्क : 9764147483