रोजचं रिपोर्टिंग केल्यानंतर दुपारच्या वेळी ऑफिसमध्ये टीव्ही पाहात बसलो होतो. साधारण दुपारी दोनची वेळ असेल. तेवढ्यात फोन वाजला आणि दुसरीकडून एक अनोळखी व्यक्ती बोलली की तुम्ही जी राधे मां टीव्हीवर दाखवत आहात ती दौलताबाद रोडवरच्या मिडोज हॉटेलवर आलीय. सुरवातीला वाटलं की कोणीतरी आपली थट्टा करतंय. कारण राधे मां आणि औरंगाबाद तसा काही संबध नाही, ना कधी राधे मां चे भक्त औरंगाबादेत असल्याचं निदर्शनात आलं. मात्र शहानिशा करायचं ठरवलं आणि मिडोज हॉटेलला पोहचलो. या कॉटेज हॉटेलमध्ये राधे मां ला शोधायचं कसं हा प्रश्न होता, त्यात हॉटेलमालकाला राधे मां विषयी कुणी काही विचारलं तर काहीही सांगायचं नाही अशी ताकीद देण्यात आल्याचंही तिथे पोहोचवल्यावर समजलं. अर्धा-एक तास गेल्यानंतर हॉटेलमधील कर्मचार्यांची शिफ्ट बदलली, मग नव्याने शिफ्ट सुरू झालेल्या एका कर्मचार्याला विचारलं तर त्याने राधे मां एस 3 कॉटेजमध्ये असल्याची माहिती पुरवली. काही वेळात औरंगाबाद पोलीसांची गाडी आली. . औरंगाबाद पोलिसांच्या गाडीमुळे राधे मां याच हॉटेलात मुक्कामाला असल्याची बातमी कन्फर्म झाली. लगेच राधे मां औरंगाबादेत असल्याचं मुंबई ऑफिसला कळवलं. सुरवातीला त्यांचाही विश्वास बसला नाही. वृत्तवाहिन्यांवर तासन् तास दिसणार्या राधे मां ला भेटण्याची आणि तिला पाहण्याची प्रचंड इच्छा झाली होती. पोलीसांनी आपल्या स्टाईलमध्ये हॉटेलात प्रवेश केला. पोलीसांनी राधे मां ज्या कॉटेजमध्ये थांबली होती त्या कॉटेजला घेराव घातला. आम्हाला वाटलं की राधे मां ला अटक होतेय. औरंगाबाद पोलीसांनी मुंबई पोलीसांना फोन केला, मात्र त्यांना अटक न करण्याचा सूचना मिळाल्याने औरंगाबाद पोलीस आल्या पावली परतले. काही वेळातच औरंगाबादेतला सगळा मीडिया मिडोज हॉटेलवर दाखल झाला. राधे मां च्या काही भक्तांनी आणि हॉटेलच्या कर्मचार्यांनी आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र आमची संख्या अधिक असल्यानं त्यांना यश काही आलं नाही. राधे मां चे सर्वेसर्वा असलेले संजीव गुप्ता आणि अन्य भक्त राधे मां ची कीर्ती सांगत होते. आम्हालाही ते ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही वारंवार राधे मां ला भेटण्याची विनंती त्यांना करत होतो. मात्र राधे मां ध्यानस्थ असल्याचं आम्हाला सांगण्यात येत होतं. तोवर त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया दिली होती. आता रात्रीचे अकरा वाजले होते. . . पत्रकार मिडोज हॉटेल परिसरात डेरा टाकून राधे मां ला कॅमेर्यात टिपण्याची संधी शोधत होते. . . . आम्हाला साडे अकरा वाजता माहिती मिळाली की राधे मां नांदेडला जाणार आहे. ही माहिती ऑफिसला कळवल्यानंतर राधे मां ला नांदेडपर्यंत फॉलो करण्याच्या सूचना मिळाल्या. .
हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी एकच गेट असल्यामुळे मीडियाला टाळणं राधे मां ला जवळपास शक्य नव्हतं. अखेर राधे मां रात्री बाराच्या सुमारास बाहेर आली. . . .
लाल रंगाचा ड्रेस, हातात छोटा त्रिशूळ, अंगभर दागिने आणि बोटात अंगठ्या घातलेली राधे मां रडवेल्या चेहर्याने बाहेर आली. आम्ही अनेकदा विनंती करूनही राधे मां काही बोलली नाही. मीडियाचा गराडा पाहून राधे मां संजीव गुप्ता यांच्या बहिणीच्या कानात काहीतरी बोलली आणि थेट जमिनीवर कोसळली. कदाचित मिडीयाला बाजूला करण्यासाठीच तिने असं केलं असावं, हा आमचा अंदाज होता. . . संजीव गुप्ताने राधे मां ला उचलून थेट जग्वार या आलीशान गाडीत टाकलं. मग राधे मां ची जग्वार गाडी औरंगाबादच्या दिशेने सुसाट निघाली. साधारणपणे एखादा किलोमीटर अंतर कापल्यावर गाडी अचानक थांबली, मग आम्हीही लगेचच आमच्या गाडीच्या खाली उतरलो आणि राधे मां ला प्रश्न विचारायला सुरवात केली.
पहिल्यांदाच राधे मां आपल्यावर झालेल्या आरोपांबद्दल बोलली. . देवावर माझा विश्वास आहे आणि तो न्याय देईल. . . एवढं बोलून ती गाडीत बसली आणि निघून गेली. . . आम्ही तिचा पाठलाग काही सोडला नाही. . . औरंगाबादहून जालन्याच्या दिशेने राधे मां ची गाडी पुढे आणि आमची गाडी मागे. . मी माझा कॅमेरामन शमी आणि ड्रायव्हर बाळू, त्यांना ओव्हरटेक करून थोडं पुढे गेल्यावर. . . त्यांनीच आम्हाला नांदेडचा रस्ता विचारला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आम्ही त्यांना फॉलो करतोय. अंदाजे पाच दहा किलोमीटरचा प्रवास झाल्यावर राधे मां च्या गाडीचा ब्रेक पुन्हा लागला, राधे मां खाली उतरली आणि थेट मोठ मोठ्याने रडायलाच लागली. . आम्ही कॅमेरा काढेपर्यंत तिच्या गाडीत असलेल्या महिला भक्तांनी कॅ मेरामनला घेराव घातला आणि शूटिंग करण्यास मनाई केली. मग आम्ही स्वयंघोषित देवीचं हे रुप पाहून राधे मां चा निकटवर्ती असलेल्या गुप्ताला विनंती केली की हा रस्ता चांगला नाही, तुम्ही राधे मां ला गाडीत बसवा. . काही वेळात राधे मां गाडीत बसली. . . साधारणपणे तीन वाजता पुन्हा गाडी थांबली. . राधे मां गाडीच्या खाली उतरली. . तिच्या जग्वार गाडीचे चारही दरवाजे उघडले गेले आणि एका हिंदी गाण्यावर राधे मां ने ताल धरला. . काही वेळ राधे मां मनसोक्त नाचली. . तोवर जालन्यातून एक इनोव्हा तिच्या ताफ्यात दाखल झाली. . . तिला नांदेडचा रस्ता दाखवण्यासाठी. . . राधे मां चं हे रुप आम्ही पहिल्यांदाच पाहिलं होत. . टीव्हीवरही पाहिलं नव्हतं किंवा ऐकलं नव्हतं. . त्यामुळे देवीला ही आपल्या तालावर नाचवण्याची किमया हिंदी गाण्यात आहे, याचा साक्षात्कार आम्हाला त्यावेळी झाला. त्याही वेळी माझा कॅमेरामन महिला भक्ताच्या गराड्यात होता त्यामुळे राधे मां चं हे रुप आम्हाला कॅ मेर्यात टिपता आलं नाही. . . गाडी पुढे निघाली तो पर्यंत राधे मां सोबत आलेल्या अन्य भक्तांच्या गाड्या तिच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या. पहाटेचे चार वाजले असतील. . . पुन्हा राधे मां चा ताफा थांबला आणि पुन्हा हिंदी गाणं आणि राधे मां चा डान्स. . आता तिच्या भक्तांची संख्या वाढलेली. .
आम्हाला पुन्हा कॅमेरा नॉट अलाउड असं बजावण्यात आलं. काही भक्त आम्हाला मां चा महिमा सांगत होते आणि आम्ही राधे मां चं हे रुप पाहत होतो. .
मनात ही कसली देवी. . हे तर सगळं थोतांड, असं येत होतं. . तोवर राधे मां माझ्याजवळ आली. . . तिने तू कठोर आहेस. . तुझ्या सोबत असलेले सर्वजण माझे भक्त झालेत असं म्हणत आमच्या ड्रायव्हरला घेऊन नाचू लागली. . . थोड्यावेळाने राधे मां ने मला थेट दुप्पट पगाराच्या नोकरीची ऑफर दिली. . . त्यावर मी नोकर आहे, मला फक्त मुलाखत (बाईट) द्या अशी विनंती केली. . . तिच्या आलिशान जग्वार गाडीत असलेलं तिचा पर्सनल नंबर असलेलं कार्डही मला दिलं. वारंवार विनंती केल्यानंतर राधे मां ने मला उद्या (दुसर्या दिवशी) प्रतिक्रीया देण्याचं मान्य केलं. . .
काही वेळात राधे मां ला एक गाय दिसली आणि गोमाता पाहिल्यावर राधे मां ची नौटंकी पुन्हा सुरू झाली. त्यानंतर मी या स्वयंघोषित देवीचं, राधे मां चं जे काही रूप
पाहिलं त्यावर कदाचित तुमचा विश्वासही बसणार नाही. . . देवी जीभ बाहेर काढून मला चिडवायला लागली. . लहान मुले करतात अगदी तसंच राधे मां मला वेडावून दाखवत होती. तिथे जमलेल्या अन्य भक्तांनाही मला अशाच वाकुल्या दाखवून चिडवायला सांगण्यात आलं. भक्तांसाठी तर तो देवाचाच आदेश. . त्यांनी लगेच कसलाही विचार न करता जिभ बाहेर काढवून चिडवायला सुरूवात केली. मला काहीच कळेनासं झालं. . पण सर्व सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. . . भक्तांच्या मते देवीने जीभ बाहेर काढून वेडावून दाखवणं हे देवीचं बालरूप होतं. . त्यांच्या मते हे बालरूप पाहण्याची संधी खूप मोजक्या लोकांनाच मिळते. . . तुझ्यावर (म्हणजे माझ्यावर) देवीची कृपादृष्टी आहे एवढी देवी कोणाला प्रसन्न होत नाही असंही भक्तगण सांगत होते. . . मी या स्वयंघोषित देवी राधे मां ला वारंवार विनंती करत होतो मला कॅमेर्यासमोर प्रतिक्रीया द्या. . . अनेक प्रयत्न केले मात्र देवी काही बोलेना. . अखेर ती गाडीत बसली आणि देवीचा महिमा सांगण्यासाठी तिचा सर्वात जवळचा भक्त आणि मॅनेजर टल्लीबाबा माझ्या गाडीत बसला. . . भक्त टल्लीबाबा राधे मां चा महिमा सांगत होता. . त्यावेळी त्यालाही मी हीच विनंती करत होतो की मला मुलाखत (बाईट) देण्यास तुमच्या देवीला सांगा. . . आता सकाळचे सहा वाजले होते. रात्रभर वेगवेगळ्या थांब्यावर प्रयत्न करूनही आम्हाला टल्लीबाबा किंवा राधे मां यापैकी कुणीच आम्हाला प्रतिक्रिया दिली नाही. टल्लीबाबा हा राधे मां चा मॅनेजर आहे. तो देवीच्या राहण्याची व्यवस्था करतो. . . . त्यामुळे तो आमच्या गाडीत बसलेला असताना, राधे मां नांदेडला कोठे राहणार यांची माहिती मिळाली. . . मग आम्हीही त्याच हॉटेलमध्ये रुम बुक केली. . राधे मां चा रात्रभर औरंगाबादहून नांदेडपर्यंत पाठलाग करताना, आम्ही झोपलेलो नव्हतो. . . रात्रीच्या जागरणानंतर सकाळीही झोपण्याची सोय नव्हती. . . सकाळी इतर मीडिया प्रतिनिधीही याच हॉटेलात दाखल झाले.
सकाळी राधे मां ज्यावेळी नांदेडला उतरली तेव्हा तिचं वेगळं रूप दिसलं. . आता तिच्या डोळ्यावर गॉगल होता. ती गुरुद्वारामध्ये दाखल झाली तोवर टल्लीबाबाने सगळी
तयारी करून ठेवली होती. नांदेडमधील मीडिया तिच्या स्वागताला होतीच. . राधे मां तिच्या गाडीच्या खाली उतरली तसे कॅमेरे ऑन झाले. . . कोणीतरी मोठी व्यक्ती आलीय हे आता लोकांना सांगण्याची गरज नव्हती. ही अतिमहत्वाची व्यक्ती कोण याची चर्चा सुरू होत नाही तोवर राधे मां ने गुरुद्वाराच्या पायर्यावर डोकं टेकवलं होतं. राधे मां आणि तिच्या भक्तांनी गुरुद्वारात दर्शनासाठी प्रवेश केला. . ती तब्बल अर्धा तास गुरुद्वारात होती. मग राधे मां ने घोषणाही दिल्या. . . भक्तांनी मागे तिची री ओढली. . . काही लोक तिचा विरोधही करत होते. . एका व्यक्तीने तिला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र राधे मां ने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. काही कळायच्या आत ती आलीशान जग्वार गाडीत बसली आणि थेट सिटी प्राइड हॉटेल गाठलं. . .
राधे मां रात्री दहा वाजता पुन्हा औरंगाबादच्या दिशेने निघाली. आता आमच्यासोबत मीडियातील इतर सहकारीही होते. त्यांनीही पाठलाग सुरू केला. राधे मांच्या भक्तांच्या गाड्या आणि प्रसारमाध्यमांच्या गाड्या यामध्ये अनेकदा रेसही लागायची. . . अखेर राधे मां पुन्हा थांबली. आधीच्या रात्रीचं राधे मां चं रुप माझ्यासोबतच्या काही रिपोर्टर्सनी पाहिलं होतंच. . राधे मां मला आता हिरो म्हणायला लागली होती. . सगळ्या रिपोर्टर्सच्या घोळक्यातून शोधून मला चिडवायची आणि गालगुचे घ्यायची. . . राधे मां ने मग भक्ताला कुत्रा बनण्याचे आदेश दिले, तसे सगळे भक्त भुंकू लागले, नंतर राधे मां ने लहान मुले जसं हाताच्या बोटानं गोळ्या घालतात तशा गोळ्या झाडल्या. . . तर भक्तही गोळ्या लागल्याचा अभिनय करत मेल्याचं नाटक करू लागले. . . हे सगळंच किमान मला तरी अविश्वसनीय होतं, पण डोळ्यांवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. . . हे सर्व माझ्या डोळ्यांसमोर होत होतं. राधे मां पुढे म्हणाली. . . माझी जीभ काळी आहे, (असं सांगून राधे मां ने तोंड आ करून जीभही दाखवली) मी बोलते ते खरं होतं. . इंडिया टीव्हीच्या एका महिला पत्रकाराने माझी वाईट बातमी केली तिचं काय झालं ते पाहा. . अशा धमक्याही देवी आता मीडियाला देऊ लागली. . .
मग काही वेळाने राधे मां चा हिंदी गाण्यावरचा नाच सगळ्या मीडियाने पाहिला. . . अनेक पत्रकार तिला बाईट देण्यासाठी विनंती करत होते, मात्र राधे मां ने गप्प राहणं पसंत केलं. . . . असाच प्रवास करत आम्ही दुसरी रात्रही जागून काढली. . त्यानंतर राधे मां ने मला हॉटेल रामामध्ये बाईट देण्याचं मान्य केलं. . . माझे प्रश्न काय असतील, याचीही यादीही आधी मागितल्याप्रमाणे देण्यात आली होती. त्यांचा विश्वासू असलेल्या संजीव गुप्ता यांच्या बहिणीने बोलावलं. . . मी आणि माझा कॅमेरामन शमी राधे मां च्या रुमच्या बाहेर उभा राहिलो. त्यांनी मला एकट्यालाच आत बोलावलं. मी थोडा घाबरलो आणि शमीला सांगितलं की जर मी एका मिनिटात बाहेर आलो नाही तर थेट आत ये. . . मी त्यांच्या रूममध्ये पोहोचल्यावर राधे मां ने पुन्हा मला चिडवायला, वाकुल्या दाखवायला सुरूवात केली. मला तुला चिडवायला आवडतं असंही राधे मां ने मला सांगितलं. काही वेळात ती बाहेर पडली आणि मी कॅमेरा सुरू केला. . पण राधे मां काही बोलतच नव्हत्या. . . माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या फक्त मान हलवूनच देऊ लागल्या. . . शेवटी त्या विमानात बसल्या. . . विमानातही आम्ही तिच्या सोबतच आलो. आम्ही विमानातही राधे मां ला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या प्रयत्नाला यश आलं नाही. अखेर मुंबईत उतरताच राधे मां बोलू लागल्या. . . या सगळ्या प्रवासात राधे मां चं हे रुप पाहिल्यावर मला अनेक प्रश्न पडले. . . काय अशी जादू आहे की अनेक उच्चशिक्षित लोकही राधे मां चे भक्त होतात. हिंदी सिनेमांच्या गाण्यावर नाचणारी बाई देवी कशी काय असू शकते. . . राधे मां ला धड मिनिटभर सलग बोलता येत नाही. राधे मां नावाच्या देवीला दोन दिवस कव्हर करताना एकच लक्षात आलं की झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिये. . .
कृष्णा केंडे
लेखक संपर्क : 9371450101
