हे ‘क्रांतिकारकांच्या मेरूमणी’
तुला क्रांतिकारी ‘लाल सलाम’
भगतसिंग! नुसते नाव उच्चारले तरी अंगावर रोमांच उभे राहतात. आजपर्यंत ‘कसे जगावे?’ या प्रश्नाचं उत्तर अनेकांनी दिलं आहे. त्याचप्रकारे ‘कसे मरावे?’ या प्रश्नाचं उत्तरही दिलं गेलं. पण हे सरदार, ‘जगावे कसे आणि मरावे कसे?’ या दोन्हीचं उत्तर अपवाद वगळता तुझ्याशिवाय इतक्या ताकदीने कुणी दिलं नाही. माणसाला जगण्यासाठी ‘ध्येय’ लागते आणि मरताना जे काही जगलो त्याबद्दलही निश्चयता असावी लागते. देशप्रेमाने ओथंबलेला समूह तुमच्याही अवतीभोवती होता. एकाचवेळी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आंदोलन तर दुसरीकडे सशस्त्र क्रांती उभारून देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या अल्पस्वरूप ताकदीने झुंजणारे देशभक्त. सरदार, तुम्ही खर्या अर्थाने यामध्ये ‘सुवर्णमध्य’ साधलात. कोणत्याही एका अंगाने देश स्वतंत्र होणार नाही आणि स्वातंत्र्यानंतर एका निश्चित विचारसरणीविना स्वराज्याचे ‘सुराज्य’ होणार नाही याची अचूक जाण देशपातळीवर हाताच्या बोटावर मोजावे इतक्याच भारतीयांना होती. भगतसिंग, आपण त्यामध्ये अग्रणी आहात.
सरदार किशनसिंग व विद्यावती यांचे पोटी 28 सप्टेंबर 1907 रोजी हे ‘क्रांतीपुत्रा’, आपला जन्म झाला. घराण्यात देशभक्तीचे वारे ओतप्रेत भरलेले. लहानथोरांच्या वीरआठवणी व घराण्याचा वारसा आपण आपसुकच मिळवलात. 19 व्या वर्षी बलिदान केलेले ‘कर्तारसिंग सराभा’ यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून क्रांतीवाटेवर पाय ठेवलात. या देशाची धुरा इथल्या तरूणांनीच आपल्या खांद्यावर घ्यायला हवी या विश्वासावर तरूणांची एकजुट करण्यास प्रारंभ झाला. असेच जिवाभावाचे सवंगडी नंतरच्या क्रांतीकाळात सरदारांभोवती गोळा झालीत कारण आपला उच्च ध्येयवाद, प्रेमळ स्वभाव आणि करारी बाणा आणि महत्वाचे म्हणजे अभ्यासाची बैठक.
प्रत्येकाच्या जीवनात अशी एक घटना असते जी व्यक्तीला आमूलाग्र बदलते. ‘जालियनवाला बाग हत्याकांड’ ही घटना सरदार तुम्हाला स्वातंत्र्यसंग्रामाच्या लढ्यात ओढून घेऊन आली. ‘जालियनवाला हत्याकांडाकडे’ पाहून तरूण होणारे निष्पाप मन क्रांतीच्या ज्वालेकडे ओढले गेले. ‘ती’ अमानुष संध्याकाळ व प्रत्यक्ष तेथे जाऊन निष्पापांच्या रक्ताने माखलेली जमीन नव्या भगतसिंगाच्या उदयाला कारणीभूत ठरली. तिथली ‘माती’ उचलताना त्या कोवळ्या मनावर किती तरंग उमटले असतील याची कल्पनाच केलेली बरी. “असंख्य भारतीयांच्या बलिदानाने पवित्र झालेली ही माती, या मातीला प्रणाम कर” दोन्ही भाऊ व बहिणीला उद्देशून काढलेले हे उद्गार आपल्या जडणघडणीची दिशा दाखवते. हुतात्मा दिनाला हुतात्म्यांच्या समाधीवर फुल वाहून नुसते चालणार नाही तर या हुतात्म्यांच्या वाटेवर पाऊल टाकता आले पाहिजे असाच विचार कदाचित तुमच्या डोक्यात अवतरला असेल.
“माझे जीवन मी उच्च आदर्शासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे मला संसारीक सुख व ऐषोआरामाचे आकर्षण नाही” आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रातील आपले हे उद्गार. जयदेव गुप्त यांना यासंबंधीचे दिलेले स्पष्टीकरण पाहून आजही भगतसिंग, तुमच्या विषयीचा आदर दुणावते. “घरात एक रडणारी विधवा आहे व एक काका परागंदा आहेत. घरात आणखी एक रडणारी विधवा नको. एका तरूण मुलीचे आयुष्य मी खराब करणार नाही. ” किती उदात्त भावना व स्त्रीविषयक ‘माणूसपणाचा’ दृष्टिकोन खरोखर अंत:करण हेलावतो. गुलाम भारतात लग्न झाले तर मृत्यू हीच आपली वधू असेल हे वाक्य अक्षरश: खरे ठरले सरदार, तुमच्याबाबत.
सायमन कमिशनला मोर्चाच्या माध्यमातून लाला लजपतराय यांनी विरोध केला. याची परिणिती ब्रिटीशांनी केलेल्या लाठीमारात लालाजींचा मृत्यू झाला. या मृत्यूचा बदला म्हणून स्कॉटऐवजी सँडर्स हा अधिकारी तुमच्याकडून मारला गेला. “मानवी जीवनाचे महत्व आम्ही जाणतो पण अपवादात्मक परिस्थितीत हिंसा अपरिहार्य असते. विनाकारण रक्तपात नको पण हिंसा करावीच लागली तर ती आपल्या उच्च नैतिक आदर्शाच्या प्राप्तीसाठी केली जावी. तिच्यामागे नैतिक अधिष्ठान असावे ही आपली भूमिका बरोबरच होती. आपण कृतीने ती दाखवून दिलीत.
‘पब्लिक सेफ्टी बिल व ट्रेड डिस्प्युटस् बिल’ भारतीयांच्या माथ्यावर मारण्याचे ब्रिटीशांचे प्रयत्न हाणून पाडले तुम्ही. ही दोन्ही बिले म्हणजे भारतीयांचे मुलभूत हक्क हिरावून घेण्यासाठी होते. विधीमंडळात बॉम्ब फेकून ब्रिटीशांचे हे साम्राज्यवादी रूप तुम्ही जगाला दाखवून दिलेत. ‘बहिर्यांना ऐकवण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज असते’ हे फ्रेंच क्रांतीकारक व्हॅलिएंटने उच्चारलेले वाक्य तुम्ही पुन्हा ऐकवलेत. भारतीयांच्या मुलभूत हक्कांसाठी आजन्म कारावासाची शिक्षाही मान्य केलीत. अगदी तुरूंगात राहणार्या कैद्यांचेही काही अधिकार असतात पण या अधिकाराची अंमलबजावणी होत नाही. हे लक्षात येताच तुम्ही उपोषणाचा निर्णय घोषित केला. जवळजवळ 81 दिवसांचे हे उपोषण सशस्त्र क्रांतिकारकांचे ‘सत्याग्रही’ रूप जगाला दाखवत होते. लोकमत आपल्या बाजूने आले. ब्रिटीशांनी मागण्या मान्य केल्या पण यासाठी यतींद्रनाथ दास यांना बलिदान द्यावे लागले. “भगतसिंग हे देशाचे भूषण आहेत. त्यांचा दर्जा सर्वात उंच आहे” हे यतींद्रनाथांचे उद्गार तुमच्याविषयीचे जनमानस दाखवून देते. या लोकप्रियतेमळेच साँडर्स खटल्यात ब्रिटीशांनो तुम्हाला बेड्या घालण्याचा आदेश रद्द करावा लागला.
“जगात जन्मास आलेला प्रत्येक जण मरतो पण माणसाने असे मरावे की ज्याची जग नेहमीच आठवण ठेवील” हे आईचे उद्गार हजार टक्के आपण खरे करून दाखवलेत. ब्रिटीशांनी दिलेली फाशीची शिक्षा हसतमुखाने स्वीकारून भारतीय तरूणांसमोर क्रांतीचा आदर्श घालून दिलात. वडिलांनी फाशी रद्द व्हावी म्हणून ब्रिटीशांकडे अर्ज केला तेव्हा “तत्वापेक्षा भगतसिंगाचे प्राण वाचवणे जास्त महत्वाचे नाही” असे लिहून कळवलेत. आपले हे पत्र वर्तमानपत्रात छापण्यात आले. एवढंच नव्हे तर महात्मा गांधींनी आपली फाशी रद्द व्हावी म्हणून प्रयत्न चालवले आहेत हे पाहून तुरूंगातील आपले सहकारी चुहरसिंग यांचेजवळ नाराजी व्यक्त केलीत. मृत्युला कवटाळण्यासाठी किती आतुरले होता तुम्ही. ‘मृत्युंजय’ हा शब्द तुमच्यासाठीच निर्माण झाला असावा “आम्ही कोणतीही क्षमायाचना करू इच्छित नाही. आम्हाला सैनिकांच्या हाताने गोळ्या घालून ठार मारावे” असे धडधडीत पत्र व्हॉईसरॉयला पाठवलेत. ब्रिटीशांना इतके खुले आव्हान क्वचितच कुणी दिले असेल. इतका बाणेदारपणा, अंगीकृत कार्यावर निष्ठा, देशप्रेम, तत्वांवर अव्याहत विश्वास हे भगतसिंग तुमच्याच ठायी पाहिला आम्ही. शेवटची इच्छा व्यक्त करताना “या देशात पुन्हा जन्म घ्यावा व मातृभुमीची सेवा करावी” हे उद्गार आपल्या असिम देशप्रेमाची साक्ष आहे.
आपले सामाजिक व राजकीय विचार हिंदी, उर्दू व इंग्रजीतून आपण लिहिलेत. आपण लिहिलेली चार पुस्तके भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, समाजवादाचा आदर्श, आत्मचरित्र व मृत्यूच्या दरवाज्यात यामध्ये आपले विचार समोर आले.
तुरूंगात असतानाच लिहिलेला ‘मी नास्तिक आहे’ हा लेख अत्यंत गाजला. विज्ञान व विवेक यांचा प्रवेश झाल्यावरच मानवी जीवनाच्या प्रगतीस सुरूवात झाली हे आपले मत सर्वांनी समजून वाटचाल करण्यासारखे आहे. या भूमिकेद्वारे आपण प्रतिपादन केलेले अत्यंत महत्वाचे सत्य समस्त भारतीयांनी समजून घ्यायला हवे. आपण बोलला होतात “समाजातील बलवंत लोकांना स्वत:चे अस्तित्व राखण्यासाठी आणि पुरोहितांना लोकांना लुटण्यासाठी धर्म व ईश्वर हवे आहेत. ” किती वास्तव व मार्मिक सत्य आपण बोललात.
मानवी जीवनावर आपण मनापासून प्रेम केलं. प्रेमाविषयी बोलताना “प्रेम ही मानवी जीवनातील सहज प्रेरणा आहे. प्रेम माणसाच्या चारित्र्यास उन्नत करते. प्रेमाचे वर्तुळ सतत वाढवत नेऊन ती भावना सार्वत्रिक बनवली पाहिजे. ” हे आपले उद्गार खरोखरच मननीय आहेत.
जातीय दंगे व जमातवाद हा भारताचा मोठा शत्रू आहे. आपण यावर सुचविलेले उपाय आजही देशास लागू आहेत. तुम्ही बोलला होतात की, “आपल्या समोरचे आर्थिक प्रश्न जास्त महत्वाचे आहेत हे लोकांना समजून घ्यायला हवे. धर्म, जात, वंश, राष्ट्र व वर्ण यांचा भेद न करता एकत्र या. कामगारांनी वर्गभावना जागृत करावी व जातीय दंगलीत भाग घेऊ नये. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. राजकारणासाठी त्याचा वापर करू नये. भारतात जमातवादी भावना नष्ट करायला हवी. ” आज ही या विचारांनी भारतीय जनमानस वावरले तर निश्चितच जातीय दंगे थांबतील.
अस्पृश्यता निवारणासाठी व्यक्त झालेले विचार असेच महत्वाचे आहेत. भारतीय समाजातील अस्पृश्यतेची प्रथा निंदनीय आहे. उच्चवर्णीयांची याबाबतची भूमिका ढोंगीपणाची आहे. आपण आपल्या बांधवांना पशुपेक्षा नीच मानतो याची भयंकर चीड आपणाला होती. म्हणूनच ‘निद्राग्रस्त, सिंहानो उठा’ अशी आरोळी आपण दिली. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी त्यांना काही जादा अधिकार दिले पाहिजेत हे आपले मत आरक्षण विरोधकांनी लक्षात ठेवावे.
विद्यार्थ्यांना दिलेला तुमचा संदेश असाच वास्तववादी आहे. ‘विद्यार्थ्यांनी अभ्यास चालूच ठेवावा. अभ्यास करताना राजकारणाचे ज्ञान प्राप्त करावे. देशात होणार्या निरनिराळ्या सामाजिक चळवळीत त्यांनी भाग घ्यावा. आवश्यकता असेल तेव्हा प्रत्यक्ष मैदानातही लढाईसाठी उतरावे. ’ किती महत्वाचे विचार मांडलेत तुम्ही. तुमच्यासारखा लोकशिक्षक भारतीय विद्यार्थ्यांना मिळाला असता तर या विद्यार्थ्यांचे मन, मेंदू व मनगट खंबीर बनले असते. लोकांना राजकारणाचा तिटकारा उत्पन्न व्हावा म्हणून कार्यरत असणार्या लॉबीला भगतसिंग तुम्हीच खरे उत्तर आहात.
हे क्रांतिपुत्र भगतसिंगा, वय अवघे 24 वर्षे. पण किती काळाच्या पुढचा विचार केलास तू. नुसता विचार नाही तर समाजवादी विचार प्रत्यक्षात यावा व भारत समृद्ध राष्ट्र बनावे म्हणून जीवनाच्या अंतापर्यंत कृतीशील आवाज उठवलात. समकालीन क्रांतिकारकांना समाजवादाची बैठक दिलीच पण पुढच्या पिढ्यांनाही ‘समाजवाद हा वारसा जपून ठेवलात. ’ “काही दिवसांनंतर भगतसिंगाचे जीवन हा इतिहास बनेल. भगतसिंग नावाची दिव्यकथा काळाच्या अनंत अंतराळात कायम उपस्थित राहील. ” असे सार्थ उद्गार चंद्रशेखर आझादांनी म्हणूनच काढले होते.
देशातील सर्व युवकांना प्रेरणास्थान म्हणून आपण शिरोधार्य आहात. या युवकांना आपणापासून बरेच शिकता येईल. दुर्दैवाने आणि हितसंबंधियांनी युवकांमध्ये जाणीवपूर्वक ‘पिस्तुल’ हातात धरलेला भगतसिंग दाखवला. ज्या भगतसिंगांनी आयुष्यात एखाद-दुसरेवेळी पिस्तुल वापरले त्याची ही प्रतिमा त्याच्या इतर प्रतिमांना न्याय देत नाही हे देखील हे बेशरम विसरले. स्वत:च्या स्वार्थासाठी. वाचनाचे आपले वेड युवकापर्यंत पोचवत नाहीत. आयुष्यभर संगतीत, सत्याच्या शोधात, भगतसिंग आपण जीवन वाहिलेत. आपल्या पायजम्यात सतत पुस्तक असायचे. मृत्युला समोर जातानाही ‘लेनिन चरित्र’ आपण वाचलेत. आपला वाचनाचा हा गुण युवकांनी घ्यावा. 24 वर्षांच्या अल्पायुष्यात कोणतेही व्यसन आपण केले नाही. व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करणार्या विवेकवाद्यांचे तुम्ही ‘खरे हिरो’. मंदिरातील दगडी मुर्तीत देव शोधू पाहणार्या युवक-युवतींनी “मी नास्तिक का आहे” हे विचार वाचायला हवेत. तेव्हा कुठे मंदिरासमोरील रांगा कमी होतील. जीवनाची लढाई निम्म्यातच हारलेल्या, दुबळ्या व भेकड मनाच्या युवावर्गाला आपले देव व धर्मविषयीचे विचार खर्या अर्थाने ‘माणूस’ बनण्यासाठी उपयोगी आहेत. सतत तुमच्या फाशीच्या निमित्ताने गांधीजींवर बेधूट आरोप केले जातात. गांधीजींनी फाशी रद्द व्हावी म्हणून व्हाईसरॉयला पाठवलेली निवेदने व आपल्या मृत्यूनंतर ‘नवजीवन’मध्ये दिलेली प्रतिक्रिया आता तुम्हालाच सांगावी लागेल. “हिंदू-मुस्लिम ऐक्य हे माझे स्वप्न आहे” असं तुम्ही म्हणाला होता. तुम्हाला ‘आयडॉल’ मानणार्या प्रत्येकाने हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी कार्यरत रहायला हवे. भगतसिंग आपण नेहमीच विज्ञानाचा पुरस्कार केला. विज्ञान व विवेकच मानवी जीवनाच्या प्रगतीला उपयोगी आहेत हे आपले म्हणणे ‘उद्याचा भारत’ आम्हाला विज्ञान व विवेकाच्या मुल्यावर उभा करायला हवा याची सतत आठवण करतो.
भगतसिंगा, तुमची किती रूपे आठवू?
भारतमातेला गुलामगिरीतून मुक्त करून स्वातंत्र्याची मशाल श्रमिक व कष्टकर्यांच्या हाती सुरक्षित रहावी म्हणून समाजवादी भारताचे स्वप्न पाहणारे सरदार भगतसिंग. ‘इन्किलाब जिंदाबाद’ (क्रांती चिरायू होवो) असा आवाज उमटवून देशातील युवकांना स्वातंत्र्यचळवळीला प्रेरीत करणारा ‘आदर्श पुरूष’ म्हणजे भगतसिंग. स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात आपल्या प्राणांची आहुती हसतमुखाने देऊन मृत्यूवर विजय मिळवणारा ‘विवेक पुरूष’ म्हणजे भगतसिंग. मन, मेंदू व मनगट बळकट करून देव व दैववाद झुगारणारा ‘विवेकपुरूष’ म्हणजे भगतसिंग. एका हातात क्रांतीची मशाल दुसर्या हातात क्रांतीचे पुस्तक घेऊन समाजवादाची मांडणी करणारा ‘क्रांतीपुत्र’ म्हणजे भगतसिंग. “स्वातंत्र्य कुणासाठी?” याची स्पष्ट कल्पना मांडून त्यासाठी कार्यरत राहणारा ‘पहिला क्रांतीकारक’ म्हणजे सरदार भगतसिंग. आपली स्वप्नं म्हणून हिंदू-मुस्लीम ऐक्याची मनीषा बाळगणारा ‘खरा धर्मनिरपेक्ष’ म्हणजे भगतसिंग. “जो विकासाच्या बाजूने आहे त्या प्रत्येकाने सनातन श्रद्धेला आव्हान दिले पाहिजे. ” असा विचार मांडून आचार कारणारा ‘खरा अंधश्रद्धा निर्मूलक’ म्हणजे भगतसिंग.
सरदार, आता थांबतो. फक्त इतकीच ग्वाही देतो की, ज्या विचारानुसार भारतीय युवकांनी चालावे असे तुम्ही सांगितलेच त्या विचारानुसार आयुष्यभर कार्यरत राहू. ‘समाजवादी’ भारताचे आपले स्वप्न पूर्ण करणेसाठी विवेकी व लोकशाही संमत मार्गाने प्रयत्नशील राहू. तुमच्या कार्याकडे पाहून एवढेच सांगतो, ‘ए, भगतसिंग तू जिंदा है, हर एक लहू के कतरें मे. . . . . ”
–तुमच्या विचारांचा व आचारांचा सच्चा अनुयायी
उमेश मुरलीधर सूर्यवंशी (मोबा. 9922784065)