Categories
जात पंचायत

कर्ज फेडा, नाही तर बायकोला धाडा !

गोंधळी समाज पंचांचा अजब फतवा...
फेब्रुवारी – २०१६

पावणेतीन वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी नाशिकच्या जातपंचायत विरोधी परिषदेत समतेचे रोपटे लावले होते.त्याचा आता वृक्ष होत आहे.त्या अगोदर महाराष्ट्रात जातपंचायत हे नावसुद्धा कुणाच्या ध्यानीमनी नव्हते. आज राज्यातीलच नव्हे, तर परदेशी प्रसार माध्यमांनी याची दखल घेतली आहे. अमेरिकेचे मुख्य वृत्तपत्र लॉस एंजेलीस टाईम्सने ‘संपादकीय’ मध्ये वृत्तांकन केले.

भारतातील ‘पीटीआय’ प्रमाणेच फ्रान्स न्यूज एजन्सी समितीकडून माहिती घेऊन जगभर प्रसिद्ध करणार आहे. ‘एएनआय’ या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीनेही वृत्तांकन केले आहे. जातपंचायतने वाळीत टाकलेले लोक स्वतः पुढे येत तक्रार दाखल करत आहेत. त्यामुळे ही आता जनचळवळ होत आहे.महाराष्ट्र अंनिसने सुरुवातीलाच पुणे येथील श्रीगौड ब्राह्मण समाजातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍याचे वाळीत टाकण्याचे प्रकरण उघड झाल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.खरे तर जातपंचायतीचे वास्तव बहुतांश समाजात दिसून येते. परंतु भटके विमुक्त समाजात जातपंचायतीच्या न्यायनिवाडे व शिक्षेत भयानक क्रौर्य दिसून येत आहे. त्यामुळे अंनिस कडून अनेक जातींमधील प्रकरणे हाताळली गेली तरी क्रौर्य असलेल्या प्रकरणाला प्रसार माध्यमांनी जास्त प्रसारित केलं. लग्नानंतर कौमार्याची परीक्षा देण्याचा प्रकार अंनिसने समोर आणला. चारित्र्यशुद्धीची परीक्षा देण्यासाठी उकळत्या तेलातून हात न भाजता नाणे बाहेर काढणे, तोंडात तांदूळ चघळायला देऊन त्यांच्या ओलाव्यावरुन न्यायनिवाडे करणे, आंतरजातीय विवाह केल्याने मुलींचा जीव घेणे, इतर जातींच्या लोकांकडून जातपंचायतीत हस्तक्षेप करून घेतल्याने महिलांच्या योनीमार्गात मिरचीची पावडर कोंबणे, लहान मुलीचे वयस्कर माणसाशी लग्न लावणे असे कितीतरी प्रकार अंनिसमुळे समोर आले आहेत.

नुकतीच परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका माणसाला व्याजाच्या पैशाची परतफेड करतांना त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली. राज्याच्या पुरोगामित्वाचा बुरखा टराटरा फाडणारा हा प्रकार प्रसारमाध्यमांनी दोन दिवस लावून धरल्याने अंनिसला ही जातपंचायत बरखास्त करण्यात मदत झाली. तीस वर्षीय दीपक भोये हे सेलू येथे पत्नीसोबत रहात होते. पं,च समाजातील लोकांना दंडाची रक्कम चुकती करण्यासाठी व इतर कारणांसाठी पैसे व्याजाने देत असतात.हा व्याजदर महिन्याला तीस टक्क्यांपर्यंत असतो. हा व्याजदर वर्षाचा नव्हे तर महिन्याचा असतो. रेणके आयोगात सुद्धा असेच म्हटले आहे. शंभर रुपये दुसर्‍याला देतांना अगोदरच व्याजाचे तीस रुपये वजा करत सत्तर रुपये पंचाकडून हातावर टेकवले जातात. दीपकने काही पंचाकडून सर्व मिळून सत्तर हजार रुपये घेतले होते. दर महिन्याला पंच वसुलीसाठी आल्यावर त्यांना दारू मटनाचा पाहुणचार करावा लागतो. तो दिपकने नेहमीच केला. जुने कपडे विकण्याचा त्याचा व्यवसाय होता.

काहींचे व्याज मुद्दलीच्या तिपटीने फेडले परंतु मुद्दल तशीच शिल्लक रहात होती. पंचांनी वसुलीचा तगादा सुरु ठेवला. दोन लाखांचा हिशोब दाखवण्यात आला.एक दिवस घरावरचे पत्रे काढून घेण्यात आले. दीपकची पत्नी भर उन्हाळ्यात झाडाखाली बसत असे. सायंकाळी घरात पाणी ओतून मग राहत असे. वाळीत टाकल्याची खूण म्हणून त्यांच्या घराला चप्पल बांधण्यात आली. तरीही पैसे फेडता न आल्याने शेवटी बायकोला आमच्या ताब्यात दे, आम्ही पैसे फेडून घेतो, असे पंचांनी दीपकला म्हटले. दोघेही घाबरुन गेले.आत्महत्या करायला निघाले. रेल्वे येतांना दिसली. विचार बदलत रेल्वेत बसले व सासरी नाशिकला पोहोचले.नाशिकमध्ये काही दिवस घाबरत लपून बसले. तिकडे सेलूत पंचांनी दीपकची भांडीही वाटून घेतली.

काही दिवसांनी दीपक नाशिक मध्ये गटार स्वच्छतेचे काम करायला लागला तर पत्नीने जुने कपडे विकायला सुरुवात केली.दोघे नाशिक येथे राहत असल्याचे पंचांना माहीत झाले.त्यांना आसरा दिल्याने सुभाष उगले व परिवारास वाळीत टाकण्यात आले. तशा आशयाचे वाळपत्र पंचांनी पोस्टाने पाठवले.त्यामुळे त्यांच्या परिवारातील दोन मुलींचे जमलेले लग्न आपोआप मोडले गेले. मुलींशी दुसरे कुणीही लग्नाला तयार नसल्याने आयुष्यभर घरातच राहण्याची परिस्थिती झाली.दोन वर्षांपूर्वी त्यांनी अंनिसकडे धाव घेतली. मी व डॉ. टी.आर. गोराणे यांनी त्यांची भेट घेतली व मानसिक आधार दिला.पंचांना कायद्याचा धाक दाखवून पत्र पाठवले. त्यामुळे त्यांनी घाबरून मुलींच्या लग्नाला मान्यता दिली.अशाच प्रकारे मागील वर्षी पातुर येथील एका मुलाचे लग्न याच पंचांनी मोडले होते. मी हस्तक्षेप करून या मुलाचे लग्न लावले होते. पंचांची दीपककडे पैशाची मागणी सुरूच राहीली. आता दोन वर्षांनंतर मात्र पंचांनी व्याजाची रक्कम सात लाख रुपये सांगितली. गटाराची स्वच्छता करणारा माणूस एवढे पैसे कसे देणार? दीपकची सेलूला असणारी आजीही कुठेतरी राहायला गेली. ती मेल्यावरही तुम्हाला येऊ देणार नाही, असे पंचांनी सांगितले. एका व्यक्तीचे निधन झाल्याने त्याच्या प्रेतावर बहिष्कृतांनी फुलं चढविण्यास पंचानी नकार दिला.हा परिवार दोन वर्षे संपर्कात होता. मी वारंवार भेटत होतो. त्यांच्या जातीच्या नेत्यांना त्यांना समजावून सांगण्याची मी विनंती केली.समजुतीने पंच ऐकत नसल्याने पोलिसांत जाण्याचा माझा आग्रह होता. परंतु आमच्यात अजून कुणीच पोलिसांत गेलं नाही, मग आम्ही कसे जाणार, हा त्यांचा प्रश्न होता.पंच देवावर हात ठेवायला लावूनच मग पैसे देतात. त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड भीती असते. पोलिसांत गेल्यास दोन महिन्यांत तुला भानामती करून मारून टाकू, अशी पंचानी सुभाषला धमकी दिली.अनेक समाजात पंचांना देवाचा अवतार समजले जाते. त्यामुळे त्यांच्या मुखातील शब्द देवाचा असतो व अंतिम असतो, असा लोकांचा गैरसमज असतो. पंचाना विरोध केल्यास वाळीत टाकतात, मुला-मुलींचे लग्न होत नाही. कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होता येत नाही.मेल्यावरही प्रेताला खांदा देण्यासाठी कुणी पुढे येत नाही. लोकांमधील भीतीमुळेच जातपंचायती टिकून राहिल्या आहेत.

पंच कुणीतरी वेगळे असल्याची जबरदस्त भीती भोरे व उगले कुटुंबियांच्या मनात होती. ही भीती मी या परिवाराच्या मनातून काढली.ते लढण्यासाठी तयार झाले. प्रसार माध्यमांनी दोन दिवस प्रकरण लावून धरले. मंत्रालयापर्यंत प्रकरण पोहोचले. मग मात्र पंच घाबरले. डॉ. दाभोलकर नेहमी असे म्हणायचे की आपला लढा पंचांशी नसून त्यांच्या शोषक प्रवृत्तीशी आहे. त्यांच्याशी सुसंवाद साधत चांगुलपणाला साद घालून परिवर्तन करता येते. त्या प्रमाणे तक्रार दाखल करण्यापूर्वी संधी देण्यासाठी मी त्यांच्याशी सुसंवाद साधला. बहिष्कृत परिवारास पुन्हा जातीत सामावून घेण्यास तयार होते. परंतु जातीत पुन्हा घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला ? हा अधिकार नाकारण्यासाठी संपूर्ण जातपंचायत बरखास्त झाली नाही तर आम्ही तक्रार दाखल करू असे सांगितले. ही भूमिका प्रसार माध्यमांनी लावून धरल्याने पंचाची पंचाईत झाली. दुसर्‍या दिवशी सर्व पंचांनी सेलू येथे चर्चा करत जातपंचायत बरखास्तीचा निर्णय कळविला. आम्ही प्रसार माध्यमांसमोर बोलण्याचा आग्रह धरला.त्यांनी तो मान्य केला. तरुण वयात जुन्या चालीरीतींना बळी पडल्यामुळेच आमच्या हातून वाईट कृत्य घडले. जातपंचायतमध्ये घेतलेले निर्णय हा आमचा मूर्खपणाच होता. आम्ही जातपंचायत बंद करत आहोत. सर्व एकत्र राहू, असे पंच श्याम उगले प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. यानंतर काही दिवसांनी सुभाष उगले यांच्या आजीचे वृध्दपकाळामुळे निधन झाले. विशेष म्हणजे मराठवाड्यातून हे पंच नाशिकला अंत्यविधी साठी आले. परिवर्तन म्हणतात ते यालाच !

ही जातपंचायत गोंधळी नव्हे तर जोशी आहे, असा राज्यभरातून माझ्यावर दबाव आणला गेला. पुरावे देऊनही समाज ऐकायला तयार नव्हता.प्रश्न असा आहे की आपण माणूस आहे की नाही ? महिलेवर अन्याय झाला की नाही , याचा विचार असायला हवा. त्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. परंतु आपण आपण जातीच्या कुंपणात अडकलो आहोत. तुम्ही आमच्या जातीचे आहात का ? तुम्ही आमच्या जातीची बदनामी करता, येथपासून ते धमक्या ऐकण्याची सवय मला झालीये. पीडितांच्या वेदना समजून घेतल्या तर कुणीही जातपंचायतचे समर्थन करणार नाही. पण जातीच्या अहंकारात अडकलेल्यांना त्या कशा समजणार? पावणेतीन वर्षांपासून मी बहिष्कृताचं जिणं जगतोय. शेवटी, लोखंडाची चव लगाम घातलेल्या घोड्यालाच माहीत असते. पण एक दिवस हे लगाम गळून पडतील, याची निश्चितच खात्री आहे.

खरं तर वर्ण व्यवस्थेचा आपण निषेधच करतो. परंतु कुणी याची मांडणी करत असेल तर चार वर्णांचा उल्लेख केला जातो.पण येथे पाचवा वर्ण आहे, तो म्हणजे भटक्या विमुक्त समाजाचा! या चार वर्णांनी मिळून बहिष्कृत केलेला हा समाज! स्वतःचे घर -दार नसलेला हा समाज गावकुसाबाहेर हागणदारीत पाल टाकून राहणारा.एका गावाहून दुसर्‍या गावी पोटासाठी भटकणारा. स्वातंत्र्याची फळे अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. निम्म्या लोकांकडे अजूनही स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून पुरावे नाहीत, अशा वेळी बँक कर्ज कशी देणार ? नेमका याचाच फायदा पंचांनी घेतला. दंड व इतर कारणांसाठी पैसे देत तीस-चाळीस टक्के मासिक व्याजदर चालू ठेवला.येथील व्यवस्था जशी कारणीभूत आहे तसेच पंचांनीही समाजाला कात्रीत ठेवले आहे.

शिक्षणाचा अभाव, पराकोटीच्या अंधश्रद्धा दूर करून मुलभूत सुविधा त्यांच्या पर्यंत पोहोच करणे गरजेचे आहे. कासेकापडी समाजातील अज्ञानाचे असेच एक प्रकरण समोर आले. एक दिवस का होईना महिलेला सती जाण्यासारखा हा प्रकार आहे. येवला येथील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कोमल वरदे यांच्या सोबत अंनिस या अमानुष प्रकाराविरोधात लढत आहेत. या समाजात पुरुषाचे निधन झाल्यावर त्याच्या पत्नीला प्रेतासमोर बसवून अंगावरील दागिने काढले जातात.

डोक्याला तूप लावले जाते.आंघोळ घातली जाते. तिच्या डोक्यावरचे पाणी प्रेतावर सोडले जाते. दशक्रिया विधी झाल्यावर तिला अंधार्‍या खोलीत बंद केले जाते. दुसर्‍या दिवशी तिला मंदिरात नेल्यानंतरच सुटका होते.तो पर्यंत तिने आपले अशुभ (?) तोंड कुणाला दाखवायचे नाही, असे पंचांचे म्हणणे असते. इतर अनेक समाजात दशक्रियाच्या दिवशी पंचासमवेत सर्वांना दारू-मटणाची पद्धत आजही कायम आहे. कोमल यांच्या वडिलांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या आईने ही पारंपरिक बंधने तोडून टाकावीत असा आग्रह धरला. मात्र पंचांनी ही परंपरा चालू ठेवण्यासाठी दबाव आणला. मुलगी किंवा जातपंचायत यापैकी एकाला निवडावे, असे जातपंचायतीने आईला सांगितले. आईने भीतीने जातपंचायतची निवड केली. पंचांनी कोमल हिला बहिष्कृत करण्याची धमकी दिली. यावर निर्णय घेण्यासाठी महाजातपंचायत बसवावी लागेल, असे सांगण्यात आले. आंध्र प्रदेशातील व इतर शंभर लोकांचा पुण्यातील तीन दिवसांचा होणारा खर्च लाखांत होता. त्यातही न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने कोमलने लढण्याचे ठरवले. त्यांनी अंनिसचा शोध घेतला. मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ही प्रथा चालू ठेवण्यात पंचांची भूमिका समजून घेण्याची मला प्रतीक्षा होती. पंचाचे स्पष्टीकरण अजबच होते. पती मृत झाल्याने तिला आराम मिळावा म्हणून एकांतात ठेवले जाते व तिचे डोके शांत राहावे, यासाठी तूप चोळले जात असल्याचे सांगितले. ती परंपरा असल्याचे म्हटले. आता आपल्या समोर प्रश्न असा आहे की परंपरा पाळल्या नाहीत यामुळे जात बहिष्कृत करण्याचा अधिकार पंचांना कुणी दिला? प्रसार माध्यमांनी हे प्रकरण लावून धरले. उपजिल्हाधिकार्‍यांसह सत्ताधारी पक्षातील व्यक्तींनी सोबत असल्याचे मला फोन केले. पंचाच्या या ताठर भूमिकेविरोधात येवला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पुण्यात नगरसेवक असलेल्या पंचासहीत नऊ लोकांना अटक झाली.ही अमानुष प्रथा मोडण्यासाठी प्रयत्न करणार्‍या कोमल कठोर झाल्याने अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

वरील दोन्ही घटनांमध्ये शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जातपंचायत विरोधी कायदा बनवण्याचे महत्त्व सांगितले. सामाजिक न्याय मंत्री व गृहराज्यमंत्री यांनीही सदर कायदा लवकरच अस्तित्वात येईल, असे माध्यमांशी बोलताना म्हटले. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह शिष्टमंडळ फेब्रुवारीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.महाराष्ट्र अंनिस मुळे झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानंतर आता प्रतिक्षा आहे ती जातपंचायत विरोधी कायद्याची…

लेखक संपर्क : 9822630378

कृष्णा चांदगुडे यांना महाराष्ट्र फौंडेशनचा पुरस्कार

महाराष्ट्र फौंडेशन ( अमेरिका) यांचे या वर्षीचे साहित्य व सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसच्या जातपंचायत मूठमाती अभियानाचे संयोजक कृष्णा चांदगुडे यांना सामाजिक प्रश्न या विषयातील कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. साधना ट्रस्ट तर्फे संयोजन केलेला हा कार्यक्रम नऊ जानेवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न झाला. पन्नास हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ दाभोलकर यांच्या निर्घृण खुनानंतर दुःख उरात लपवून लढणार्‍या अंनिसच्या सर्व कार्यकर्त्यांचा हा पुरस्कार आहे, असे चांदगुडे या प्रसंगी म्हणाले.