Categories
कव्हर स्टोरी

विज्ञानाचा पाया : नवसंशयवाद

राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त विशेष लेख
फेब्रुवारी – २०१६

पायरो नावाचा ग्रीक तत्त्वज्ञ होऊन गेला. त्याच्या विचारसरणीनुसार आपण या मार्गाने जाणे किंवा कृती करणे शहाणपणाचे की, दुसर्‍या मार्गाने जाणे शहाणपणाचे, याचा योग्य निर्णय आपणाला कधीच करता येत नाही. एके दिवशी त्याला आपला तत्त्वज्ञ गुरू एका डबक्यात गटांगळ्या खाताना दिसला. तो बाहेर येण्याची धडपड करीत होता. डबक्यातून बाहेर काढावे की नको? पायरो विचार करू लागला. पण याबाबत त्याचा काहीच निर्णय होईना. शेवटी या म्हातार्‍याला बाहेर काढण्यानं काही भलं होईल, याला आधार नाही, असा निष्कर्ष काढून तो तसाच पुढं गेला.

पायरोचा हा संशयवाद म्हणजे प्राचीन तत्त्वज्ञानातील क्लासिकल स्केप्टिसिझम-अभिजात संशयवाद. या तत्त्वज्ञानानुसार सत्य शोधणे किंवा ज्ञान मिळविणे अशक्य आणि निरर्थक होय. यालाच ‘सिनिसिझम’ असे नाव आहे. क्लासिकल संशयवाद हा नकारात्मक आहे.

याच्या दुसर्‍या टोकाचा विचार म्हणजे श्रद्धावाद. शंकाच घ्यायची नाही, प्रश्न विचारायचा नाही. गुरू किंवा धर्मग्रंथ यांचा श्रद्धेने स्वीकार करावयाचा. या मार्गाने सुद्धा सत्याचा शोध घेणे अशक्य होते. श्रद्धेत तर्कापेक्षा भीतीयुक्त भोळाभाव प्रभावी असतो.

सीरियातील एका शहरात अलिकडेच घडलेली ही घटना. अली साकर हा आयसिस या अतिरेकी संघटनेचा कट्टर अनुयायी. लेना अनल कासेम ही त्याची आई. आईने अलीकडे आग्रह धरला- तू आयसिस सोड. आयसिसचे काम खर्‍या धर्माला आणि मानवतेला सोडून आहे. आपण हे शहर सोडून जाऊ या. अली आपला म्होरक्या गुरू याला भेटला. या गुरूने आज्ञा केली आईला ठार कर. अलीने आईलाच समोर नेऊन, समक्ष गोळ्या घातल्या. हा श्रद्धा मार्ग. इथं शंका नाही. चिकित्सा तर नाहीच नाही.

नवसंशयवाद हा श्रद्धा आणि सिनिसिझम नाकारतो. नवसंशयवाद म्हणजे प्रामाणिक शंकेतून शोध घेण्यासाठी बुद्धीचा वापर. नवसंशयवाद हा विधायक आणि सकारात्मक विचार आहे. चौकसपणा हा त्याचा गाभा आहे.

नवसंशयवाद सर्व प्रकारच्या श्रद्धा आणि विश्वास ही अबाधित सत्यवचने आहेत, असं मानीत नाही. ती केवळ गृहिते आहेत आणि शोधक बुद्धीने, प्रामाणिक शंका व्यक्त करत तपासली पाहिजेत, असा आग्रह धरतो. पुरावा, तर्कशुद्ध विधाने आणि प्रायोगिक निष्कर्ष यांच्या आधारे सर्व प्रकारची गृहिते तपासायला हवीत, यावर ठाम असतो. ज्ञानाबद्दलचे सर्व दावे तपासासाठी खुले ठेवले पाहिजेत तरच खरी ज्ञानप्राप्ती होण्याची शक्यता वाढेल, असा विचार नवसंशयवादातून व्यक्त होतो.

गॅलिलिओने बायबलप्रणित पृथ्वीकेंद्रित सिद्धांताला नकार दिला. ख्रिस्ती धर्मपीठाचा हा सिद्धांत म्हणजे अतीव श्रद्धा होती. श्रद्धेची चिकित्सा करू पाहणारा आणि तिच्याबद्दल शंका व्यक्त करणारा गॅलिलिओ हा खरा नवसंशयवादी होता. त्यानं म्हटलंय- ज्यानं हे जग आणि माणसांनाही निर्माण केलं तो ईश्वर, आपण आपल्या बुद्धिसामर्थ्यानं हे जग समजून घेण्यापासून आपणास रोखेल, असं मला वाटत नाही.

सोन्याला कस लावल्याशिवाय अस्सल सोने की पितळ हे कसं तपासणार? इथं कस लावण्याचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरतो. तद्वत यथार्थ ज्ञानप्राप्तीसाठी आणि सत्यशोधनासाठी प्रामाणिक बुद्धीचा वापर करणारा नवसंशयवाद आपण खुल्या मनानं स्वीकारायला हवा.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपल्या मराठी भाषेत संशय हा चांगला गुण मानला जात नाही. संशयी व्यक्ती तिरस्काराचा विषय मानली जाते. पण ज्या अर्थाने हा शब्दप्रयोग होतो, तो आपल्या विवेचनात अभिप्रेत नाही. अकारण संशय नव्हे, तर प्रामाणिक आवश्यक संशय घेणे हे इष्टच आहे, असं नवसंशयवादाचं स्वरूप आहे.

नवसंशयवादाचे उत्तम उदाहरण म्हणजे विज्ञान. नवसंशयवादी आणि वैज्ञानिक दोघांनाही खुल्या मनाने विचार करावा लागतो. संशयवादी समतोल वृत्तीने निर्णय घेत कृती करतात. एखाद्या प्रश्नाबाबत दोन किंवा अधिक मते किंवा गृहिते समोर आली तर त्यांची कठोर तपासणी केली जाते. त्याचबरोबर नव्या गृहितांबद्दल मोकळ्या मनाने विचार करावा लागतो. तुम्हामध्ये थोडीशी सुद्धा संशयाची पाल चुकचुकत नसेल, तर खर्‍या उपयोगी संकल्पना आणि निरुपयोगी संकल्पना यांच्यातील फरक तुम्हाला समजणार कसा? सर्वच गृहिते आणि संकल्पना समान मौल्यवान आहेत असं समजलं तर तुम्ही फसत आहात. कारण मग स्वीकारार्ह काहीच नसेल.

मनाचा मोकळेपणा हा जरी सद्गुण असला तरी मोकळेपणा इतका नसावा की, त्यामुळे आपली विचारशक्तीच हरवून जाईल आणि काय स्वीकारावे, काय नाकारावे, काय विश्वासार्ह, तर काय टाकाऊ याची निवड आपल्याला करताच येणार नाही. म्हणून नवसंशयवादाचा अवलंब जीवनात हरघडी, हरप्रसंगी करणे केव्हाही हितकारक.

पण आपण नवसंशयवादी विचारवंतांना आणि वैज्ञानिकांना दूषणे देतो. ही मंडळी प्रत्येक गोष्टीत दोषच काढतात असा आरोप त्यांच्यावर केला जातो. बहुतेक मंडळी संशयवादापासून दूर राहतात आणि श्रद्धेला मिठी मारतात. याचे कारण आपल्याला जीवनातील अनिश्चितता आणि गोंधळलेली अवस्था नको असते. पण जीवनातील अनिश्चिततेचा स्वीकार करणे केव्हाही हितावह आहे. सत्याकडे जाण्याचा तोच योग्य मार्ग आहे. एखादी गोष्ट सत्य ठरावी, असं वाटणं म्हणजे ती गोष्ट सत्य असणे नव्हे. एखादा विश्वास मला हवासा वाटतो म्हणून तो स्वीकारणे हे चूक ठरेल. ‘गर्भसंस्कार’ नावाचं फसवं विज्ञान सध्या तेजीत आहे. प्रत्येक आईला गर्भसंस्कार क्रियेमुळे आपले बाळ सुलक्षणी, बुद्धिमान आणि नीतिमान होईल हे खरं वाटतं; पण असं वाटणं म्हणजे बाळ तसं निपजेल हे सत्य नव्हे, याची चिकित्सा वैद्यक व्यवसायातील नामवंतांनी केली आहे. गर्भसंस्कारावरील पुस्तके आणि सी.डी. याद्वारे आयांचा या गोष्टीवर विश्वास बसतो. पण असा विश्वास अज्ञानमूलक ठरतो, हे नीट समजून घ्यायला हवं. यासाठी गर्भसंस्कार योग्य आहे. या गृहितकाबरोबर, गर्भसंस्काराचा फायदा होत नाही, हे गृहीतही विचारात घेणे शहाणपणाचे ठरेल. स्वप्न आणि वास्तव याबाबत संशयवादीच असायला हवे.

संशयवादी या नात्याने तुम्ही ‘हे मला नीट माहीत नाही’ असं म्हणण्यात कमीपणा मानू नये. हेच वास्तव असते. बर्‍याच बाबतीत लोकांना अज्ञानच असते. काही गोष्टींचे स्वरुपच अज्ञानाला पोषक असते आणि काही गोष्टी सध्याच्या ज्ञानाच्या प्रकाशात कळत नाहीत. आपल्या पृथ्वीबाहेर विश्वात इतरत्र जीवसृष्टी असणे शक्य आहे आणि नाही पण. याबद्दल आपण अज्ञानीच आहोत. याबाबतचा सबळ पुरावा आपल्याजवळ नाही म्हणून ‘मला माहीत नाही’ हेच या प्रश्नाचे सध्याचे उत्तर. पण परग्रहनिवासीचा शोध घेणारा एक मोठा प्रोजेक्ट ‘नासा’ने हाती घेतला आहे. या प्रोजेक्टद्वारे विशिष्ट संदेशाच्या रेडिओलहरी विश्वात सोडल्या जातात. याद्वारे जर काही खास पुरावा मिळाला तर आपली भूमिका बदलायला हवी.

संशयवादी म्हणून जीवनातील अनिश्चितता आपण स्वीकारायला हवी. पण ज्यात धोका दडलेला आहे, अशा मूर्खपणाच्या अज्ञानमूलक संकल्पना आपण त्याज्य मानायला हव्यात. त्यापेक्षा अनिश्चितता परवडली. अज्ञानमूलक फसव्या विज्ञानाने काय नुकसान होते, याबाबत मागील जानेवारीच्या अंकात दिलेल्या घटना आपणास हेच सुचवीत नाहीत का?

खाली अधोरेखित टेबलवरून संशयवादाची रूपरेखा छानपैकी मांडली आहे.

पटकन विश्वास ठेवणे ही आपली सहजप्रवृत्ती आहे. त्यानुसार आपण आपल्या निर्णयाची सुरुवात उजव्या बाजूच्या पहिल्या पायरीपासून करतो. पुरावा मिळो अगर न मिळो सांगोवांगी किंवा अंतर्मनातील गरज म्हणून आपण अधिक विश्वास वाढवतो आणि शेवटी तो पक्का करतो. पण हे चूक आहे. आपण आपल्या निर्णयाची सुरुवात प्रामाणिकपणे मध्यभागी(हे मला माहीत नाही) येथून करायला हवी. पुढे पुरावे येत जातील. पुरावा जर विरुद्ध आला तर आपण डावीकडे जायला हवे. अनुकूल आला तर उजवीकडे जाता येईल. पुरावा जसजसा अधिकाधिक विरुद्ध गेला तर आपण आपला विश्वास सोडून द्यायला हवा. पण तो अधिकाधिक अनुकूल गेला तर आपला विश्वास दृढ करत जावा. खर्‍या- खोट्याच्या तपासात अशी मोकळी भूमिका घ्यायला हवी.

एकेकाळी लोक पृथ्वी सपाट आहे असे समजत होते. ती सपाट दिसतेच. समुद्राचा पृष्ठभागही सपाट दिसतो. पण संशयवादाने शंका निर्माण केली. पृथ्वी व समुद्र सपाट असतील तर दूरवर जाणार्‍या जहाजाचा तळ प्रथम दिसेनासा होतो आणि शेवटी वरचा भाग दिसेनासा होतो. हे पृथ्वी गोल असण्यामुळेच होत असावे. मग नवे पुरावे मिळू लागले. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची चंद्रावर पडणारी सावली गोल दिसते. पृथ्वी गोल असण्याला हा दुजोरा मिळाला. चांद्रवीरांनी जेव्हा पृथ्वी चंद्रावरून प्रत्यक्ष पाहिली तेव्हा ती त्यांना गोल दिसली. म्हणून पृथ्वी गोल आहे हे गृहीत अधिकाधिक विश्वसनीय ठरले आणि सपाट पृथ्वीचे गृहीत नाकारले गेले. न्यायालयीन पद्धतीप्रमाणेच आपण सर्व क्षेत्रात काय स्वीकारायचं, याचा निर्णय घेणे अधिक योग्य आहे. आपण फक्त असामान्य समजुती, दावे किंवा विश्वास याबद्दल संशयवादी असावे, एवढेच नाही. तर वरकरणी स्वीकारार्ह वाटणार्‍या; पण वास्तवात चुकीच्या असणार्‍या अनेक समजुती आपण बाळगतो. म्हणून अशा समजुतीबाबत आपण सजग अथवा संशयी असणे हेच योग्य.

आपल्या समजुती पक्क्या करण्यासाठी खालील चार पायर्‍यांची पद्धत यी सिक (Schick) आणि लेवीस व्हॉन (Vaughn) यांनी सुचविली आहे.

(1) एखादी गोष्ट, घटना अथवा विचार इ.बद्दल तुम्ही करीत असलेला दावा किंवा युक्तिवाद नीट शब्दात मांडा.

(2) या दाव्यापुष्ट्यर्थ दिलेला पुरावा नीट तपासा.

(3) पर्यायी गृहितके किंवा युक्तिवाद विचारात घ्या.

(4) अशा सर्व गृहितकांची विश्वसनीयता पारखून घ्या.

दाव्याची मांडणी

एका विशिष्ट दिवशी एखादी व्यक्ती निधन पावली तर ती आणखी दोघांना आपल्याबरोबर घेऊन जाते, अशी समजूत आहे. पण ज्या दोघांचा मृत्यू होणार असतो तो किती काळात – एका दिवसात, एका आठवड्यात, एका महिन्यात की एका वर्षात की 10 वर्षात, याबद्दल काहीच सांगितले जात नाही. या दाव्याचा कालावधी सांगितला नसेल तर केव्हातरी आणखी दोन नातेवाईक मरणारच. त्यातही पुन्हा कोणते नातेवाईक? आपले की बायकोच्या माहेरचे की भावाच्या सासरवाडीचे? एकूण नातेवाईकाचा विचार केला तर कुठले तरी दोन नातेवाईक केव्हा तरी मरणारच. म्हणून ही समजूत अंधश्रद्धा आहे. याबाबतचं विधान असं हवं- ज्याचे निधन झाले, त्याच्याच कुटुंबातील एक तरुण बाई आणि एक मूल एका आठवड्यात मरेल, तरच हे विधान तपासता येईल व निरीक्षणांनी ही समजूत सत्य ठरेल किंवा खोटी ठरेल.

पुराव्याची निवड आणि तपासणी

काही वर्षांपूर्वी गायीनं वासरू खाल्लं अशी बातमी सगळीकडे पसरली. ही घटना आईला अशुभ आहे म्हणून लेकींनी आईला भेटून साडी नेसवावी, अशी समजूत सर्वत्र पसरली. ऐकीव माहिती आणि अतिरंजित तकलादू पुरावा याचे हे उत्तम उदाहरण ठरेल. गायीनं वासरू खाल्लं याला पुरावा काय? शाकाहारी गाय आपल्याच वासराला कशी खाईल? कोणत्या ठिकाणी हे घडलं? कोणी पाहिलं? काहीच पुरावे नाहीत. ऐकीव गोष्टी हा विश्वसनीय पुरावा नव्हे. आपल्या स्मृतीसुद्धा आपल्याला चुकीची माहिती देतात. म्हणून आपली समजूत खरी ठरण्यासाठी वस्तुनिष्ठ पुरावा हवा आणि तो तपासण्यायोग्य हवा. जेवढा पुरावा तेवढा विश्वास. पुराव्याची गुणवत्ता महत्त्वाची.

पर्यायी गृहितकांचा विचार

एखाद्या घटनेचे योग्य कारण समजण्यासाठी सर्व शक्यतांचा विचार करणं महत्त्वाचं आहे. खून का झाला आणि तो कोणी केला, याबाबत न्यायप्रक्रियेत सर्व शक्यतांचा विचार केला जातो. पण व्यावहारिक जीवनात अशा कारणांची विविधता शोधण्याचा आपला स्वभाव नसतो. तसे शिक्षण आपणास मिळालेले नसते. म्हणून आपण एकाच कारणाला चिकटून बसतो; पण ते खरे कारण नसू शकतं. व्यवहारात याची अनेक उदाहरणे मिळतात. म्हणून आपण सजगपणे इतर गृहिते आणि त्यांना पुष्टी देणारे पुरावे यांचा शोध घेऊन त्यांचे मूल्यमापन करावयास हवे. यातूनच आपण सत्यापर्यंत पोहोचू शकतो.

गृहितकांच्या विश्वासार्हतेची पारख

एखाद्या घटनेमागे वेगवेगळी कारणे वा स्पष्टीकरणे असू शकतात, हे समजून घेतल्यावर त्या प्रत्येक स्पष्टीकरणाचे योग्य मूल्यमापन करून त्याची विश्वसनीयता तपासायला हवी. एक गृहीतक दुसर्‍यापेक्षा अधिक विश्वासार्ह आहे की नाही, हे ठरविण्यासाठी तीन प्रश्न विचारात घेणे आवश्यक आहे.

(1) संबंधित गृहीतक तपासण्यायोग्य आहे का?

(2) ते गृहीतक संबंधित घटनेचे सोपे स्पष्टीकरण आहे का?

(3) पूर्वसिद्ध ज्ञानाशी वा सत्याशी ते विसंगत आहे का?

गृहितकांची तपासणी योग्यता

एखाद्या गृहितकांचा खरेखोटेपणा तपासता येणे शक्य असेल तरच ते विचारात घेता येईल किंवा स्वीकारार्ह होऊ शकेल. अनेक गृहितके तपासताच येणे शक्य नसते. असामान्य गृहितकांबद्दल ही अडचण येते. जे तपासण्यायोग्य नसेल तर ते खोटे असते, असं न म्हणता ते वैज्ञानिकदृष्ट्या निरुपयोगी किंवा टाकाऊ आहे, असं समजावं? गृहीतक तपासता येत नसेल तर त्याचा खरेखोटेपणा याचा निवाडा आपणाला करता येणार नाही. गृहीत हे खोटे ठराविता येण्यासारखे असावे (Falsifiable) म्हणजेच आपण ते चूक आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकलो पाहिजे. गृहीतक खोटे ठरविण्याचा मार्गच उपलब्ध नसेल तर त्याचा खरेखोटेपणा कसा सिद्ध करता येईल?

सातारा शहराच्या उत्तरेस 110 किलोमीटरवर पुणे शहर आहे, हे गृहीतक तपासता येते. उत्तरेस 110 किलोमीटर प्रवास केल्यावर पुणे लागते, हे तपासता येते. म्हणून हे गृहीत खरं आहे. पिकलेला आंबा कडू असतो, हे विधान खोटे ठरविता येते. कारण असा आंबा गोड असतो हे तपासता येते. कार्ल सेगन या प्रख्यात खगोल वैज्ञानिकाच्या म्हणण्यानुसार, ‘जे दावे तपासता येत नाहीत, एखादे विधान प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध होत असेल तर अशी गृहितके ही तकलादू किंवा निरुपयोगी ठरतात जरी ती कितीही स्फूर्तिदायी असली तरी किंवा आपल्याला आश्चर्यचकित करून उत्सुकता वाढविणारी असली तरी.

गृहीतक सोपे आहे काय?

एखाद्या घटनेसाठी एकापेक्षा अधिक गृहिते मांडली गेली असतील तर त्यातील कोणते गृहीत स्वीकारायचे? याचं उत्तर आहे जे गृहीत सोपं आणि अधिक संयुक्तिक (ठशरीेपरलश्रश) असेल तेच स्वीकारावे. खिळ्याच्या पाटावर झोपण्याचा प्रयोग एक साधू महाराज करतोय. त्याचे भक्तगण साधूला दैवी शक्ती प्राप्त झाल्याने त्याला खिळे टोचत नाहीत, असा दावा करतात. मोठ्या संख्येने खिळे असलेल्या पाटावर आपण आडवे झोपलो तर शरीराचे वजन सर्व खिळ्यावर विभागले जाते. त्यामुळे प्रत्येक खिळ्याचे उलट दिशेने प्रतिक्रिया बल कमी होते. त्यामुळे खिळे टोचत नाहीत, हे झाले दुसरे गृहीत.

यातील कोणते गृहीतक स्वीकारायचे? गूढ शक्ती गृहीतक अधिक किचकट नाही का? ही शक्ती शोधता येते का? तिचे स्वरूप काय? सगळंच गूढ. पण भौतिक विज्ञानातील दाबाचे तत्त्व सहज समजण्यासारखं आणि अधिक सोपं वाटतं.

बाकी सर्व गोष्टी समान असतील तर एखाद्या घटनेबाबत आपण सोपे स्पष्टीकरण स्वीकारणे केव्हाही योग्य ठरेल. असे सोपे स्पष्टीकरण तर्काला न पटणारे युक्तिवाद टाळते. गृहीतक जितके सोपे, तितके ते कमी खोटे. कारण त्याचा तपास घेणे सोपे होते.

दोन किंवा अधिक गृहितकामधील सोपे, तर्कशुद्ध आणि मनाला पटणारे गृहीतक निवडण्याच्या किंवा शोधण्याच्या तत्त्वाला ओकमचा रेझर(Occam`s Razor) असं नाव आहे. चौदाव्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञ विल्यम ऑफ ओकम याने हा नियम प्रथम मांडला. सर्वसाधारणपणे या नियमानुसार आपला विश्वास सिद्ध किंवा धारण करताना हा ओकमचा रेझर उपयोगात आणावा. त्याच्या उपयोगाने अनावश्यक, आधारहीन गृहितके नाकारावीत. सत्य शोधनात याला महत्त्व आहे.

सिद्ध ज्ञानाशी विसंगती

निसर्गसृष्टीचे नियम विज्ञान देते. विज्ञानात सिद्ध झालेले नियम आणि सिद्धांत हे सर्वमान्य असतात. पदार्थाचा नाश करता येत नाही किंवा पदार्थ शून्यातून निर्माण करता येत नाही. एक पदार्थ जेव्हा नाश पावतो, तेव्हा रासायनिक संयोगाद्वारे त्याचे दुसर्‍या पदार्थात रूपांतर होते. विश्वातील वस्तुमान नित्य आहे. हा नियम कधीच खोटा ठरलेला नाही. या नियमाला विसंगत घटनेचा कोणी दावा करत असेल तर तो फोल समजावा. शून्यातून सोन्याची साखळी काढणारा महाराज विज्ञानाच्या पदार्थाच्या नित्यत्वाच्या नियमाशी विसंगत दावा करतो. अर्थातच, असा दावा नाकारणेच योग्य ठरेल.

विज्ञानाच्या नियमाशी विसंगत अनेक प्रकारचे दावे अंधश्रद्धेच्या आणि फसव्या विज्ञानाच्या क्षेत्रात केले जातात. त्यांचा फोलपणा सिद्ध करण्यासाठी विज्ञानाचे सिद्ध नियम सर्वांनी नीट समजून घ्यायला हवेत.

पदार्थाच्या अविनाशित्वाप्रमाणेच ऊर्जेचे अविनाशित्व हा सिद्ध निसर्गनियम आहे. शून्यातून शक्तीची निर्मिती करता येत नाही. बल्बमध्ये प्रकाशऊर्जा आपोआप निर्माण होत नाही. त्यातील टंगटस्टनच्या तारेतून विद्युतप्रवाह जावा लागतो. करणी, भानामतीच्या प्रकारात घरावर आपोआप दगड पडल्याचा दावा केला जातो. घरातील कपड्यांना आपोआप आग लागते. हे दावे फोल ठरतात. आग माणसाचा हात लावतो. हात दगड भिरकावतो. बलाशिवाय दगड हलणार नाही आणि काडी पेटवून कपड्यावर टाकल्याशिवाय कपडे पेटणार नाहीत.

काही मंडळी नजरेने वस्तू वर उचलतात. आपल्यात असलेल्या दैवी सामर्थ्यामुळे हे घडते, असा त्यांचा दावा असतो? सिद्ध विज्ञान असं सांगते की टेबलावरचा दगड आपोआप हवेत उंच जाणार नाही. कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम मग खोटा ठरेल. गुरुत्वाकर्षण पदार्थाला जमिनीकडे खेचते; उलट दिशेने नाही.

अंधश्रद्धा आणि छद्मविज्ञान क्षेत्रात असाधारण दावे करणार्‍या मंडळींचे असले दावे सिद्ध वैज्ञानिक नियमापुढे फोल ठरतात. यासाठी विज्ञानाचे नियम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची विज्ञानप्रसाराची चळवळ समर्थपणे राबवायला हवी.

केस स्टडीहस्तोपचार आणि रेकी

आरोग्य क्षेत्रात हस्तोपचार आणि रेकीचा प्रसार जगात सर्वत्र आढळतो. भारतही याला अपवाद नाही. हस्तोपचार आणि रेकी यांची चिकित्सा संशयवादाच्या विचारसरणीचा उपयोग करून कशी करता येते ते पाहूया.

या दोन्ही भ्रामक विज्ञानात फारसा फरक नाही. दोन्हीतही वैश्विक चैतन्य ही मूळ कल्पना आहे. याचा उगम विज्ञानापूर्वकालातील एका संकल्पनेत आहे. ती म्हणजे प्रत्येक जीवात, अजैविक पदार्थापेक्षा अधिक काही असते. ते म्हणजे एक प्रकारची ऊर्जा किंवा आत्मचैतन्य किंवा जैवतत्त्व. यालाच व्हायटल एनर्जी (Vital Energy) असं नाव आहे.

ही जैवऊर्जा संपूर्ण विश्वात भरून राहिली आहे, जी प्रत्येक जिवंत शरीरातही वास करते. ही ऊर्जा आपल्या शरीराबाहेरही अस्तित्वात असते. ही बाहेरची ऊर्जा आणि शरीरातील ऊर्जा यांच्या संबंधात बिघाड झाला की, आपण आजारी होतो, असे हस्तोपचारतज्ज्ञ आणि रेकी मास्टर्स समजतात. फरक इतकाच की, हस्तोपचारतज्ज्ञ आपला तळवा, रोग्याच्या शरीरालगत अगदी जवळून काही इंचावरून फिरवतात. रेकीवाले हेच करतात; पण कधी कधी ते आपला तळवा(एक किंवा दोन्हीही) रोग्याच्या शरीरावरून फिरवतात. पण दोन्ही तंत्रात व्हायटल ऊर्जेचे योग्य नियंत्रण करून आजार बरा करता येतो, असं या मंडळींचं गृहीतक आहे.

या उपचार पद्धतीवर विश्वास ठेवणे योग्य आहे की चुकीचे? यासाठी काही गृहितके शोधून ती तपासावी लागतील.

गृहीतक 1 – व्यक्तीच्या भोवती त्याच्या शरीरातील व्हायटल ऊर्जेशी जोडलेले बाह्यऊर्जा क्षेत्र शोधता येते आणि त्यात हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तीचा आजार बरा करता येतो.

या गृहितकांची चाचणी घेणे हा पुढचा प्रश्न. या उपचार पद्धतीचे समर्थक आपल्या उपचाराने बरे झालेल्या हजारो लोकांचा उल्लेख करतात. हाच मोठा पुरावा नाही का? पण ही ऐकीव माहिती असते आणि व्यक्तिगत अनुभव फसवे असतात; खरी कसोटी म्हणजे नियंत्रित काटेकोर चाचणी किंवा प्रयोग.

हस्तोपचार/रेकीचा मूळ पाया म्हणजे रोग्याच्या भोवतालचे ऊर्जा क्षेत्र आणि त्यात हस्तक्षेप करता येतो, हे गृहीतक तपासता येते. एका नऊ वर्षांच्या अमेरिकन शाळकरी मुलीने, हे गृहीतक तपासून त्याचा फोलपणा संपूर्ण अमेरिकेला टी.व्ही.वर दाखविला. या मुलीचे नाव एमिली रोझा. ती या प्रयोगावेळी चौथीत शिकत होती.

हस्तोपचार/रेकी करणारी तज्ज्ञ व्यक्ती एका बाजूस तर एमिली टेबलाच्या विरुद्ध बाजूस बसे. टेबलावर मोठा पडदा लावला गेला, ज्यामुळे उपचारक आणि एमिली एकमेकास दिसू नयेत. या पडद्याला अंदाजे 1 फूट अंतरावर दोन भोके पाडली होती. त्यामधून उपचारक आपले हात पलिकडे नेऊन तळवे टेबलावर वरच्या दिशेने राहावेत असे ठेवीत. एमिली आपल्या हाताचे तळवे खालच्या दिशेने धरून उपचारकाच्या तळव्यापासून दोन ते तीन अंतरावरून फिरवीत राही. अपेक्षा अशी की, त्यांच्या कोणत्या हाताच्या तळव्यावर एमिलीचा हात फिरतोय ते सांगायचे. एमिलीच्या हाताजवळचे तिचे ऊर्जा क्षेत्र उपचारकाला जाणवायलाच हवे. त्यांना ते ओळखता यायला हवे. या प्रयोगाला परिसरातील 21 उपचारकांनी प्रतिसाद दिला. आपण एमिलीचे ऊर्जाक्षेत्र 100 टक्के खात्रीपूर्वक ओळखू शकतो, असा दावा त्यांनी केला. प्रत्येक उपचारकाने 10 ट्रायल्स द्यायच्या व संख्याशास्त्राचा आधार घेऊन निष्कर्ष नोंदवायचे. शक्यता सिद्धांत (प्रोबेबिलिटी) वापरला तर उपचारकांना 50 टक्के यश मिळणारच. उपचारक दोन हाताचे दोन तळवे. यापैकी एकाचे नाव उपचारक सांगणारच. नाणे फेकले तर छापा किंवा काटा म्हणजे 100 ट्रायलमध्ये छापा 50 टक्क्यांवर येतो, या तत्त्वानुसार 50 टक्के यश मिळणारच. पण हे उपचारक जिंकल्याचा हा निष्कर्ष चूक आहे. उपचारक जर बरोबर असतील तर संख्याशास्त्राप्रमाणे त्यांना मिळणारे यश 50 टक्क्यांपेक्षा जास्त असायला हवं. प्रत्यक्षात मात्र उपचारकांना मिळालेले यश 44 टक्के होते. म्हणजे ते या चाचणीत नापास झाले. म्हणून गृहीतक नं.1 शंकास्पद असल्याचे सिद्ध झाले.

पण मग अनेक आजारी लोक आम्हाला अशा उपचाराने गुण आला, असं का सांगत होते? त्यासाठी विचारपूर्वक इतर शक्यताही शोधायला हव्यात. यासाठी दोन गृहितके समोर येतात.

गृहीतक 2 – प्लॅसिबो परिणामामुळे लोकांना बरं वाटते.

गृहीतक 3 – लोकांच्या आजारात वेळोवेळी चढउतार होतो

ज्यावेळी आजारात आराम पडलेला असतो, त्याचवेळी उपचार झाला तर या उपचारामुळे आपण बरे झालो, असा चुकीचा निष्कर्ष लोक काढतात.

रोग्याला माहीत न होता, औषधी गोळ्या न देता केवळ साखरेच्या गोळ्या डॉक्टरांनी दिल्या तरी रोग्याला बरं वाटू शकते. याला ‘प्लॅसिबो परिणाम’ म्हणतात. औषधांचा शोध ही अलिकडच्या शंभर वर्षांतील गोष्ट आहे. त्यापूर्वी औषधंच नव्हती. रोगी केवळ ‘प्लॅसिबो’मुळे बरे होत. संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की, एकूण रोग्यापैकी 35 टक्के रोगी केवळ साखरेच्या गोळ्या औषध म्हणून घेऊन बरे होतात. शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना कमी होण्यासाठी सुद्धा 35 टक्के लोकांना ‘प्लॅसिबो’ उपयोगी ठरतो. याच प्रकारे हस्तोपचार अथवा रेकी आपणास बरं करणार या विचाराच्या प्रभावाने लोकांना बरं वाटायला लागू शकतं. त्यांचे बरं वाटणे या उपचाराच्या तंत्राशी अजिबात संबंधित नसते. बरं वाटणं म्हणजे बरं होणं नव्हे.

रोग्यांच्या काही आजारात काळानुसार चढउतार होत राहतो. काही वेळा त्यांना बरं वाटतं तर काही वेळा आजार वाढतो. परिणामी हस्तोपचारासारखा उपचार घेतला तर त्यामुळे आपणाला बरं वाटलं, अशी रोग्याची समजूत होते. तथापि, बरेच आजार औषधाविना आपल्या नैसर्गिक क्षमतेमुळे बरे होतात. संशोधन असं सांगते की, आपले 85 टक्के आजार बाह्यउपचाराविना स्वनियंत्रित प्रतिकारामुळे बरे होतात. संधिवात, कॅन्सरसारखे जुनाट आजारही कधी तीव्र होतात तर कधी सौम्य. परिणामी उपचारानंतर रोग्याला बरं वाटलं तर ते औषधामुळं नव्हे, तर नैसर्गिक क्षमतेमुळे घडते.

आता वर दिलेल्या तीन गृहितकांचे मूल्यमापन करता येईल. ही सर्व गृहितके तपासता येतात. हस्तोपचार आणि रेकीच्या समर्थनाचा पुरावा केवळ ऐकीव आहेच; पण तो नियंत्रित चाचणीत शंकास्पद ठरतो. पण वैद्यकीय संशोधनातून ‘प्लॅसिबो’ आणि आजारातील चढउतार यांना समर्थन मिळतंय.

सोपेपणाची कसोटी लावली तर गृहीत 1 पेक्षा गृहीत 2 आणि 3 अधिक सोपी वाटतात. गृहीत एकमध्ये गूढ असं ऊर्जाक्षेत्र, ज्याचा पुरावा नाही ते मानावं लागतं. ते प्रयोगाद्वारे सिद्ध होत नाही. म्हणून हस्तोपचार अथवा रेकीचे ऊर्जाउपचार नाकारून प्लॅसिबो आणि आजारातील चढउतार ही गृहिते स्वीकारावी लागतात.

एका खर्‍या अध्यात्माबरोबर शंभर खोटी अध्यात्मे दुकान थाटून बसतात. तुकाराम एखादाच; पण मंबाजी अनेक. तद्वत एका खर्‍या विज्ञानाबरोबर अनेक भ्रामक विज्ञाने बाजारात आणली जातात. होमिओपॅथी, अ‍ॅक्युपंक्चर, ल्युनसी, चुंबकीय उपचार, ज्योतिष अंकशास्त्र, हस्तरेषाशास्त्र, गर्भसंस्कार इत्यादी इत्यादी. होमिओपॅथी उपयोगी ठरत असेल तर महाराष्ट्र सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपथीचा कोर्स का बंधनकारक केला? बी.ए.एम.एस.पदवी घेतलेले आयुर्वेदिक डॉक्टर्स सर्रास आधुनिक औषधे रोग्यांना देतात. काही बुवा, महाराज आयुर्वेदिक औषधांनी कॅन्सर बरा करण्याचा दावा करतात. हे म्हणजे रोग्याच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे. आपल्या हाती प्रबोधन करणं एवढंच राहतं. ते जितकं वाढविता येईल तितकं अनेक जीव वाचविण्याचे कार्य आपल्याकडून घडेल.

नवसंशयवादाच्या विचारातून विकसित झालेले विज्ञान आणि त्याची पद्धती याचा सर्वत्र प्रसार व्हायला हवा. विज्ञानाची विचारपद्धती समजून घेतली तर भ्रामक विज्ञानाचे धोके परतवून लावणे आणि मानवी आरोग्याचे संवर्धन करणे शक्य आहे.