Categories
शिबिर

कार्यकर्त्यांच्या जडणघडणीसाठी तीन टप्प्यांतील ‘अंधश्रद्धा निर्मूलन शिबिरे’

मार्च - २०१६

समितीतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. 1 ते 3 दिवसांच्या या शिबिरांत वेगवेगळ्या वैचारिक आणि संघटनात्मक विषयांची मांडणी होते. उपस्थित शिबिरार्थी प्रभावित होतात. परंतु फारच थोडे प्रत्यक्ष चळवळीत सहभागी होतात असे आढळते. म्हणूनच शिबिरांचे स्वरूप हे प्रशिक्षणाच्या अंगाने व टप्प्याटप्प्याने पुढे जाणारे असावे, असा विचार पनवेल शाखेने केला. त्याप्रमाणे शिबिराचे टप्पे ठरवण्यात आले व प्रत्येक टप्प्याचे उद्दिष्ट ठरवून त्याप्रमाणे विषयांची आखणी करण्यात आली आहे. या शिबिरांना आम्ही ‘प्रशिक्षण शिबीर’ न म्हणता ‘अंधश्रद्धा निर्मूलन संवाद शिबीर’ असे नाव दिले आहे. कारण शिबिराची मांडणी ही संवादावर आधारलेली आहे. तसेच प्रत्येक फेजमध्ये एक महिन्याचे अंतर असल्याने त्यांचा स्वत:शीच संवाद चालू असतो. पुढील फेजला येताना ते अनुभवाची शिदोरी बरोबर घेऊन येत असतात.

प्रशिक्षण शिबिराच्या एकूण तीन फेजेस् ठरवण्यात आल्या आहेत. पहिल्या फेजमध्ये शिबिरार्थींना अंनिसची भूमिका, कार्यपद्धती समजावी व प्रत्येकाला आपला रोल ठरवता यावा व ‘महाराष्ट्र अंनिस’बरोबरचा पुढील प्रवास निश्चित करता यावा, हा हेतू आहे. या फेजमध्ये ‘अंनिस’ची चतु:सूत्री, ‘अंनिस’ची व्यापकता यांची मांडणी पहिल्या सत्रात येते. या मांडणीतून ‘अंनिस’च्या भूमिकेविषयीची स्पष्टता, कृतिशील कार्यपद्धती; तसेच समितीच्या उपक्रमांचीही ओळख होते. तसेच ‘अंनिस’ची रचना, शाखा व कार्यकर्ता यांची प्राथमिक माहिती दिली जाते. गटचर्चा फार महत्त्वाची असते. त्यामुळे एकाच वेळी अनेक मुद्द्यांचा अनेकजण एकत्र विचार करतात. त्याचा चांगला परिणामही दिसून येतो. शिबिरार्थींमध्ये ‘अंनिस’विषयी काही प्रचलित गैरसमज असतात. त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले जाते. तसेच या फेजमध्ये एखाद्या विषयाची मांडणी(जसे स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयातून समाजातील अनेक मुद्द्यांवर भाष्य होते. त्यातून चळवळीची गरजही स्पष्ट होते) किंवा काही चमत्कारांचे सादरीकरण घेतले जाते.

ज्या कार्यकर्त्यांना फेज एक नंतर चळवळीचे काम करावेसे वाटतेय, त्यांच्यासाठी फेज दोन असते. फेज दोनमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्यापक मांडणी, स्त्री-पुरुष समानता, मन-मानसिक आरोग्य आणि अंधश्रद्धा हे विषय घेतले जातात. तसेच काही घटना मांडून गटचर्चा घेतली जाते. वेळ असेल तर काही चमत्कारांचे सादरीकरण केले जाते. फेज दोनला हे विषय विचारपूर्वक ठरवले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार करण्याची पद्धती आहे, जी माणसाला प्रगल्भ करते. पण कार्यकर्ता म्हणून ही विचार प्रक्रिया समजून घेणे अधिक महत्त्वाचे असते. स्त्री-पुरुष विषमता आणि मानसिक अनारोग्य व अज्ञान हे बहुतांश अंधश्रद्धांचे मूळ आहे. म्हणूनच हे विषय व त्यामागील दृष्टिकोन; तसेच समितीची यामागील व्यापक भूमिका कार्यकर्त्यांना सुस्पष्ट समजायला हवी. म्हणून हे विषय सविस्तरपणे घेतले जातात व त्यावर चर्चाही होते. फेज एक व फेज दोन यांचा क्रम किती महत्त्वाचा आहे हे आम्हाला यावेळच्या शिबिरातून अनुभवता आले. गटचर्चेसाठी दिलेल्या विषयाच्या चर्चेची मांडणी करताना एका शिबिरार्थीने स्वत:चेच मुद्दे मांडले. त्याला इतर शिबिरार्थींनी विरोध केला. ‘अंनिस’ची अशी भूमिका नाही, हे भूमिकेशी विसंगत आहे’ हे त्यांनी ठामपणे मांडले. अंनिसची भूमिका आधी स्पष्ट झालेली असेल तर इतर विषय समजून घेताना अधिक सुस्पष्टता येते हे अनुभवता आलं.

दोन फेजनंतर प्रत्यक्ष कार्यकर्ता म्हणून जोडले जाणार्‍यांसाठी फेज तीन घेतली जाते. यात कार्यकर्तेम्हणून ते सक्रिय झालेले असतात. यामध्ये ‘अंनिस’च्या वेगवेगळ्या विषयांची मांडणी कशी केली जाते, हे मांडले जाते. विषयांची ओळख होते. विषयांविषयीचा स्वत:चा दृष्टिकोन तयार होतो. विषय मांडणीमागील भूमिका स्पष्ट होते. कार्यकर्ता म्हणून त्यांना कोणत्या विषयात आवड व गती आहे हे शोधून त्याप्रमाणे तयारी करता येते. या प्रक्रियेनंतर सक्रिय झालेल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व सरावासाठी ‘विषय मांडणी कार्यशाळा’ घेतली जाते.

पनवेल शाखा गेली तीन वर्षेअशाप्रकारची संवाद शिबिरे घेत आहे. पनवेलमध्ये काम करताना कार्यकर्त्यांनी संघटनेची भूमिका समजून घेऊन काम करणे ही गरज होती. कारण पनवेल संवेदनशील आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी कमी-अधिक संघर्ष असायचाच. या संघर्षाला खंबीरपणे तोंड देण्याची ताकद ही वैचारिक स्पष्टतेतून येते. ती स्पष्टता सूत्रबद्धपणे आणण्याचं काम ही संवाद शिबिरे करतात, असं प्रतिक्रियांमधून अनुभवायला मिळते.

-महेंद्र नाईक

लेखक संपर्क : 9594094785