असाच एक निनावी फोन… खणखणतो.. पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या मोबाईलवर! मॅडम नुकत्याच लोणावळ्याचे जादूटोणा प्रकरण धसाला लावून माघारी पोचलेल्या … आणि त्यांच्या मोबाईलवर पलीकडील आवाज बोलत होता….‘अहो मॅडम, खडकीच्या ज्ञानेश्वर घाट स्मशानभूमीजवळच्या होळकर ब्रीज नजिकच्या झाडांना अंधश्रध्देतून मुक्त कराल काय ?’
मॅडम :- ‘काय आहे प्रकरण ? आणि आपण कोण बोलताय?’
आवाज:- “अहो आपण म .अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष असून अत्यंत दक्ष आणि तत्पर कार्यकर्त्या आहात हे समजल्यावरून तुम्हाला फोन करतोय. आमच्या येथे खडकीला ज्ञानेश्वर घाट स्मशानभूमी जवळच्या होळकर पुलाजवळ, एका कोपर्याला गर्द झाडांच्या आडोशाचा गैरफायदा घेऊन काही लोक राजरोसपणे तथाकथित करणी-कवटाल निस्तरण्याचे आणि सर्व प्रकारची दु:खे पळवून लावून सर्व सुखे तुमच्या दारी उभी करण्याचे दुकान मांडून बसली आहेत. आलेल्या ग्राहकांना हजारोंचा गंडा घालून, तिथल्या बाभळीच्या झाडांवर टाचण्या खोचलेल्या काळ्या बाहुल्या, दाभण, खिळे, बिबे, बाधितांचे फोटो व एका चिठ्ठीवर त्यांच्या त्रासांची व इच्छा – आकांक्षांची कैफियत लिहून चार-पाच पदरी घडी घालून ठोकली जात आहेत. कुणाला पोलिस कॉन्स्टेबलची नोकरी पाहिजे असते, तर कुणाला दीर्घ काळ मित्राचा सहवास हवा असतो, आजारातून मुक्ती पाहिजे असते. आणखी असे बरेच काही…..झाडांच्या बुंध्यावर शेजारी शेजारी या अशा कैफियतीसह काळ्या बाहुल्या इतक्या दाटीवाटीने ठोकल्या आहेत की मूळ खोडाची साल दिसत नाही. बघा, काही करता आले तर आणि करा मुक्त त्या मुक्या झाडांना अंधश्रध्दांच्या जाचा-काचातून.” आणि आला तसा फोन बंद…
20 तारखेच्या सकाळी साडेअकराच्या दरम्यान वि.रा.शिंदे पुलावरील डॉ. दाभोलकरांच्या खुनाला 44 महिने होऊनही मारेकारी मोकाट असल्याच्या निषेधाचा कार्यक्रम करून नंदिनी मॅडम झाड शोधायला निघाल्या. मनात ध्यास होता तो, त्या झाडांना अंधश्रद्ध माणसांच्या करणीतून मुक्त करण्याचा; तसेच माणसाच्या मनात असणार्या अंधश्रध्दा दूर करायचा. ब्रीज कुठे आहे? कसे जायचे? याचा शोध घेतल्यावर एकदाचे ते ठिकाण सापडले. तिथे म्हसोबाचे मंदिर होते.
आजूबाजूला असणार्या परिस्थितीचा अंदाज घेत मोबाईलचे व्हिडीओ रेकॉर्डिंग चालू करून नंदिनी मॅडम पुढे-पुढे जात होत्या. त्या झाडांची अवस्था पाहून त्यांचे मन कळवळत होते. झाडाला खिळे- दाभण यांच्या साह्याने काही फोटो व चिठ्ठ्या देखील ठोकल्या होत्या. उत्सुकतेपोटी त्या चिठ्ठीत काय लिहिले असेल हे पाहण्यासाठी त्यांनी 5/6 दाभण ओढून काढले व त्या चिठ्ठ्या पर्समध्ये ठेवून दिल्या. तिथे असणार्या एका माणसाला त्यांनी सहज विचारले, ‘इथे एक बाबा असतात ते कधी भेटतील?’ ‘तेव्हा तुमचे काय काम आहे ?’ अशी त्या माणसाने चौकशी केली. यावर नंदिनी मॅडम म्हणाल्या, ‘ते करणी विषयी बघतात ना? तर त्याने सांगितले, ‘मी पण करणी काढतो, तसेच कोणाला लावायची असेल तर लावतो देखील!’ तेव्हा नंदिनी जाधव यांनी नवर्याचे आणि त्यांचे पटत नाही म्हणून सांगितले. यावर तुम्ही संध्याकाळी 7:30 वाजता या. येताना 11 अंडी, भेळ, चारमिनार सिगारेट पाकीट, काडीपेटी घेवून या, मग खर्चाचे नंतर सांगतो, असे तो म्हणाला. त्याने आपला फोन नंबर दिला व येणार असाल, तर फोन करा, असे सांगून तो स्मशान भुमीकडे निघून गेले.
नंदिनी मॅडमनी मिलिंद देशमुख यांना फोन केला व तेथे घडत असलेल्या प्रकाराविषयी माहिती सांगितली. पिंपरी चिंचवड कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला येण्याविषयी सांगितले. तिथे घडत असलेल्या प्रकाराविषयी पोलिसांना माहिती देऊन, रीतसर अर्ज करून, पोलिसांच्या मदतीने कारवाई करायचे ठरविले. त्या स्वत: खडकी पोलीस स्टेशनकडे निघाल्या.
मिलिंद देशमुख यांना नंदिनी जाधव हे ठिकाण शोधून काढतील याची खात्री होतीच व मॅडमच्या फोनची ते वाटच पाहत होते. ते लगेच पुढच्या कामाला लागले.
इकडे नंदिनी मॅडम यांनी अशा प्रकरणात नेहमी मदत करणार्या व पूर्वी खडकीत असलेल्या पी.आय. मिलिंद गायकवाड यांचा सल्ला घेतला. खडकी पोलिस स्टेशनला येऊन त्यांनी पी.आय.लक्ष्मण बोराटे यांना तेथेे घडत असलेल्या प्रकाराविषयी माहिती दिली. तसेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनला दक्षता अधिकारी नेमण्यात आला आहे, तिथे घडत असलेल्या अघोरी प्रकाराला आळा घालण्याचे सर्व अधिकार दक्षता अधिकार्याला आहे, तेव्हा आपण हे प्रकार थांबविण्यास आम्हांस मदत करावी, असे सांगून पोलीस स्टेशनला अंनिस तर्फे अर्ज दिला. बोराटे साहेबांनी लगेच टीम तयार करून कार्यकर्त्यांबरोबर पाठविण्याची तयारी दर्शविली. कायदा ठामपणे पाठीशी उभा होताच. पोलिसव्हॅनसह चार पोलिस हवलदारांचे पथक त्यांनी अवघ्या काही मिनिटातच तयार केले.
त्यापूर्वी मिलिंद देशमुख यांनी डॉ.दाभोलकरांबरोबर मांढरदेवीच्या यात्रेत झाडांना टोचलेल्या जवळपास तीन पोती काळ्या बाहुल्या काढून सातार्यात त्याची होळी केली होती. त्या वेळचा अनुभव असलेले श्रीराम नलावडे व काळभोर या सहकार्यांसोबत अंनिसची पिंपरी-चिंचवड टीम खडकी पोलिस स्टेशनला हजर झाली. अंनिसचे कार्यकर्ते व पोलिसांचे पथक घटनास्थळी जाऊन पोेचले. त्यावेळी सहा सव्वासहा वाजून गेले होते. अंधार होण्याआधी झाडांच्या खोडात घुसलेले खिळे-दाभणांचे बाण उपसायचे होते व सापडलाच तर देवऋषी बाबालाही पाणी चाखवायचे होते. पण तो तिकडे फिरकलाच नाही. त्याला बहुधा चाहूल लागली असावी.
एवढ्यात सकाळ दैनिकाचे पत्रकार स्वप्निल जोगी व फोटोग्राफर श्री. प्रमोद शेलार यांचेही घटनास्थळावर आगमन झाले. पोलीस हवालदार जगताप, सकट व शिरके, पोलीस जमादार पठाण झाडाभोवती कडे करून उभे होतेच. मरीआई चौकीचे पी.एस.आय. शिवाजी भोसले येऊन दाखल झाले. मिलिंद देशमुख आपल्या चमूसह चार झाडांना वेदनामुक्त करण्यास भिडले. यात सुभाष सोळंकी, श्रीराम नलावडे, देविदास इंगळे व भगवान काळभोर ही पिंपरी- चिंचवड शाखेची कार्यकर्ते मंडळी सामील झाली होती. व्हाट्सअॅप ग्रुपवर मिलिंद देशमुखांनी कॅम्पेनमध्ये सामील होण्यासाठी टाकलेल्या आवाहनात्मक पोस्टला प्रतिसाद देऊन पुणे शाखेचे दीपक अंभोरे व प्रतीक कालेकर हे थोड्या वेळातच येऊन सामील झाले.
सुमारे तास-दीड तासाच्या झटापटीत साधारणत: दोन मोठ्या गोण्या भरून काळ्या बाहुल्यांचा ढीग लागला. मंडळी येतानाच तयारीने आली होती. येताना बरोबर आंबूर, पक्कड, कटावण्या इ. साहित्य आणले होते. रूतून बसलेले अनेक खिळे मात्र निघू शकले नाहीत. सूर्यास्तानंतर सर्व बाहुल्यांना सामुदायिकरीत्या ‘ओम फट् स्वाहा’ करण्यात आले. पोलिसांनी लवकरच या जागी असे प्रकार करू नये अशा सूचना लावण्याचे व असे प्रकार करणार्याविरूध्द कारवाई करू, असे आश्वासन दिले.
– शब्दांकन : देविदास इंगळे (प्रधान सचिव, अंनिस पिंपरी चिंचवड)