Categories
अघोरी प्रथा

कावडयात्रा : तोंड दाबून (स्वतःचे), बुक्क्यांचा मार (इतरांचा)!

सप्टेंबर - २०१८

पावसाळा सुरू झाला की, माणसांना निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाचे वेध लागतात. आल्हाददायक श्रावणात कुटुंबासोबत निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन करण्याची कल्पना किती आनंददायी आहे! उत्तर भारतातील हिंदी भाषिकांचा श्रावण (सावन) मराठी श्रावणाच्या 15 दिवस अगोदर सुरू होतो. पण या ‘सावना’त कुटुंबासोबत पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याची कल्पनाही कुणी सुजाण मनुष्य करू शकत नाही. कारण? याच कालावधीत उत्तर भारतातील सुमारे 2 करोड लोक (प्रामुख्याने पुरुष) वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून त्यांच्या धर्मपर्यटनाला निघतात, ज्यास कावडयात्रा म्हटले जाते.

श्रावण महिन्यात शंकराच्या भक्तीला फार महत्त्व आहे (याचे logical कारण मला ठाऊक नाही. जाणकारांनी पुराणातील एखादी कथा धुंडाळून श्रावणातील शिवभक्तीने सर्वाधिक पुण्यप्राप्ती कशी होते, ते स्पष्ट करावे. असो.) तर या श्रावण महिन्यात हरिद्वार, गंगोत्री येथील गंगेचे पाणी ‘कावड’द्वारे (श्रावण बाळाच्या कावडीसारखी) आणून आपापल्या गावातील शिवमंदिरात शिवलिंगाभिषेक करण्याचे काम काही साधूबैरागी लोक पूर्वापार करीत होते. त्यांना ‘कावडिया’ म्हटले जायचे. 1980 पर्यंत कावडयात्रा हा प्रकार सर्वसामान्य माणसांमध्ये फारसा प्रचलित नव्हता. श्रावणात पर्यटन आणि पुण्यप्राप्ती या दुहेरी हेतूने काही उत्साही (आणि निरुद्योगी) संसारी पुरुष ही कावडयात्रा करू लागले. अयोध्येत रामजन्मभूमी वादानंतर कावडयात्रा सर्वसामान्य लोकांमध्ये अधिक लोकप्रिय झाली (अथवा केली गेली). संघ परिवाराने आणि इतर धार्मिक संघटनांनी कावडियांसाठी रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी शिबिरे उभारली, ज्यात त्यांच्या भोजन आणि विश्रामाची मोफत व्यवस्था केली जाऊ लागली. हळूहळू कावडयात्रेची लोकप्रियता वाढू लागली आणि आता दरवर्षी उत्तर भारतातील अनेक गावांमधून 2 करोडपेक्षा अधिक लोक कावडयात्रेसाठी जातात.

पंढरपूरच्या वारीसारखेच कावडयात्रेचे स्वरूप असले, तरी त्यात अनेक फरक आहेत. वारीत वारकर्‍यांचा प्रचंड जनसमुदाय एकत्र प्रवास करतो आणि एकाच दिवशी – आषाढी एकादशीला- पंढरपुरात जमा होतो. कावडयात्रेचे तसे नाही. श्रावणातील पहिल्या दिवसापासून श्रावणातील महाशिवरात्रीपर्यंतच्या कालावधीत कुठल्याही दिवशी कावडिये हरिद्वारला जातात. जाताना पायी प्रवासाची अट नसते. खासगी गाडी, बस, रेल्वे अशा मिळेल त्या आरक्षित/अनारक्षित वाहनाने 5-5, 10-10 च्या लहान गटात अनेक गावांमधील माणसे कावडयात्रेत जातात. एका गटाचा दुसर्‍या गटाशी काहीही संबंध नसतो. प्रत्येक गट आपापल्या मर्जीनुसार प्रवास करतो. कुणी आपल्या घरातूनच कावड सजवून आणतात, तर कुणी हरिद्वारला जाऊन कावड विकत घेतात. कावड सजविण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या. कुणी श्रावण बाळाप्रमाणे काठी खांद्यावर घेतात. तिच्यावर भरपूर सजावट असते आणि दोन्ही बाजूला कळशी किंवा मटके असते. कुणी मोहरमच्या ताबूतांप्रमाणे मोठमोठे ताबूत सजवून त्यात कावड आणतात. परतीचा हा प्रवास त्यांनी अनवाणी पायी करावा, अशी पूर्वअट असते. (अनवाणी असण्याची अट बरेच कावडिये पाळत नाहीत, हा भाग निराळा). कावडयात्रेत स्त्रियांचाही सहभाग असतो, असे मी ऐकलेय, पण राजस्थानात आजवर मी जे शेकडो, हजारो कावडिये बघितलेत, त्यात एकही स्त्री मला आजवर आढळली नाही. अर्थात, कावडियांची प्रवासशैली इतकी उग्र आहे की स्त्रियांच्या सहभागास तेथे फारसा वाव नाही. या कावडियांमध्ये ‘डाक कावडिया’ हा एक प्रकार आहे. डाक म्हणजे टपाल (पत्र). टपाल जशा वेगात जाते, तशा वेगात जाऊन कावड आणायची अशी यामागील संकल्पना. एका गावातील 20 – 30 लोक 1-2 मोठ्या गाड्या करून कावड आणायला जातात. पाणी भरलेली कावड आणताना ती धावतच आणायची, मध्ये कुठेच थांबायचे नाही, असा या ‘डाक’ कावडचा नियम. एक मनुष्य 1 किलोमीटर धावल्यानंतर दुसरा त्याच्या हातातून कावड घेऊन धावतो आणि पहिला गाडीत आराम करतो. त्यानंतर तिसरा, चौथा अशी माणसे क्रमाक्रमाने धावतात. 4×100 मीटर शर्यतीत जसा स्पर्धकांच्या धावण्यात खंड पडत नाही, तसाच या 30×10,000 मीटर धावणार्‍या कावडियांमध्ये खंड पडत नाही. त्यामुळे या तरुणांची साहसाची आवड भागते, असे क्षणभर मानले तरी एक मनुष्य पळत असताना गाडीत बसलेल्या इतरांचे वर्तन सभ्यतेच्या मर्यादेत असते, असे म्हणता येणार नाही. गाडीत कानठळ्या बसतील अशा आवाजात बॉलिवूड गाण्यांच्या चालीवर मॉडर्न भक्तिगीते सुरू असतात. त्यावर शिवभक्तांचे ‘तांडव’ सुरू असते. आम्ही जणू जग जिंकायला निघालोय अशा आविर्भावात गाडीतील कावडिये रस्त्यावरील माणसांना (विशेषतः मुलींना/तरुणींना) बघून ‘बम बम भोले’च्या गर्जना करतात.

न पळता पायी कावड आणणार्‍या कावडियांची प्रवासशैलीही तितकीच उग्र असते. आपण धर्मकार्यासाठी प्रवास करीत असल्याने इतर तुच्छ संसारी लोकांनी आपल्याला प्राधान्याने वाट मोकळी करून द्यायला हवी (ambulance ला वाट मोकळी करतात तशी), असेच त्यांना वाटत असावे. वाहतुकीचे नियम न पाळता चालणार्‍या या कावडियांमुळे अनेकजागी ट्रॅफिक जॅम होते. मी ज्या नीमराना शहरात राहते, त्या भागात नीमराना-गुडगाव किंवा गुडगाव-दिल्ली असा प्रवास दररोज करणारे अनेक चाकरमाने लोक आहेत. कावडियांमुळे होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीत ते दररोज तीन-चार तास अडकून पडायचे; पण सांगणार कुणाला आणि कशाला? आपल्या सभोवताली धर्माच्या नावावर जे काही विचित्र वर्तन सुरू आहे, ते सर्व महान, पवित्र आणि आदरणीय आहे, अशा मनोभूमिकेतून माणसे सर्व गैरसोय स्वतःच स्वतःचे तोंड दाबून मुकाट्याने सहन करतात. चुकून एखाद्या गाडीचा धक्का लागून कुणा कावडियाला दुखापत झाली, तर प्रतिशोधग्रस्त कावडिये फक्त त्या गाडीचीच तोडफोड करीत नाहीत, तर आजूबाजूच्या सर्व वाहनांची देखील करतात. यातील अनेक कावडिये नशेत असतात. ‘भोले की फौज, करेगी मौज’ म्हणणार्‍या भक्तांना भांग, मदिरा वर्ज्य नसतेच. सध्या हरिद्वारमध्ये कावडियांना भाले, त्रिशूळ आणायला मनाई केली आहे, पण त्यामुळे त्यांचा उद्दामपणा कमी झालाय, असे नाही. चार-पाच दिवसांपूर्वीच कावडियांनी अलाहाबादला अनेक वाहनांची तोडफोड केली. पोलीस चौकीत नेल्यावर त्यांनी तेथेही तोडफोड केली. मागील वर्षी गुडगावजवळच्या महामार्गावर त्यांनी अनेक वाहनांची तोडफोड केली होती. दरवर्षी हे प्रकार होतात आणि दरवर्षी माणसे स्वतःच स्वतःचे तोंड दाबून कावडियांचा बुक्क्यांचा मार सहन करतात.

या कावडियांच्या विश्रामासाठी अनेक शिबिरे उभारली जातात, काही रस्त्याच्या कडेला तर काही भर रस्त्यात. विश्रामासाठी उभारलेल्या या शिबिरात प्रचंड मोठ्या आवाजात मॉडर्न भक्तिगीते सुरू असतात. इतक्या प्रचंड आवाजात कावडिये विश्रांती कशी घेतात तेच उमजत नाही. ध्वनिप्रदूषणाने आजूबाजूच्या लोकांना आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे रस्त्यावरील प्रवाशांना त्रास होतो, एवढे मात्र खरे.

अखेरतः गंगेचे पाणी घेऊन कावडिये गावी परततात, तेव्हा त्यांचे आप्तस्वकीय, शेजारीपाजारी त्यांच्या स्वागतास तयार असतात. शिवलिंगाभिषेक झाल्यावर कावडियांचा परिवार पाहुण्यांना, आसपासच्या रहिवाशांना प्रसाद (भोजन किंवा अल्पोपहार) देतात. बाहेरच्या राज्यात नोकरीधंद्यासाठी राहणारी मराठी माणसे जशी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घरी परततात, तशी राजस्थानातील माणसे श्रावणात स्वतःच्या घरी येतात. कावड आणणार्‍या मित्रांचे कौतुक करून त्यांच्यासोबत जल्लोष करतात. जे लोक कावड आणायला जातात, त्यांना आप्तस्वकियांनी 5 प्रकारचे कपडे (अंतर्वस्त्रे, पॅण्ट, शर्ट, रुमाल वगैरे) घ्यावेत, अशीही परंपरा आहे. त्यामुळे गरीब माणसालाही कमीतकमी 5 कावडियांसाठी 5 कपडे घ्यावे लागतात. श्रावणात पुण्यप्राप्ती किती होते, ते ठाऊक नाही; पण गरिबाच्या खिशाला कात्री मात्र लागते.

सर्वाधिक वाईट गोष्ट म्हणजे 2 करोड कावडियांच्या गर्दीमुळे हरिद्वारमधील मुलांच्या शाळा श्रावणातील महाशिवरात्रीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या. आपण एक अशा प्रतिगामी समाजात राहतोय, जेथे धार्मिक उन्मादामुळे भावी पिढीच्या शिक्षणाशी तडजोड केली जाते. मध्ययुगात जगणारी अरब राष्ट्रे हज यात्रेसाठी अशी तडजोड करत असतीलही. त्यांच्या बुरसटलेल्या आचारविचारांची विषफळे ते इस्लामी आतंकवाद, खडखड च्या रुपाने चाखत आहेतच. पण ज्याचे संविधान धर्मनिरपेक्ष आहे, अशा माझ्या भारत देशातही हे सर्व घडावे? मनात एक गडद विषण्णता दाटून येते… शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते – ‘आपण सर्वजण एका प्रदूषित समाजात जगतोय. येथे फक्त हवा, पाणी आणि अन्नच प्रदूषित नाहीये, तर एकंदरीत सर्व सामाजिक वातावरणच प्रदूषित आहे’.

मागील वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कावडिये खूप मोठ्या आवाजात म्युझिक लावतात, गोंधळ करतात, या आक्षेपास उत्तर देताना म्हटले होते , ही कावड यात्रा आहे; शवयात्रा नव्हे, त्यामुळे मोठया धामधुमीत यात्रा संपन्न होणारच. कावड यात्रेवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली होती. कावड यात्रेला असा ‘राजाश्रय’ मिळाल्याने कावडियांच्या उत्साहाला यावर्षी जास्तच उधाण आलेय. बाजारात ठिकठिकाणी कावडियांसाठी भगव्या रंगाचे स्पेशल टी शर्टस् उपलब्ध असतात. दरवर्षी टी शर्टसवर शंकर अथवा तिरंग्याचे चित्र असायचे. यावर्षीच्या टी शर्टसवर शंकर, तिरंग्याच्या जोडीला योगी आदित्यनाथ यांचेही भलेमोठे फोटो छापले होते.