20 ऑगस्ट. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या शहिदत्वाचा तिसरा स्मृतिदिन. गेल्या तीन वर्षांत एकही दिवस असा गेला नाही की, डॉ. दाभोलकरांची आठवण झाली नाही. कार्यकारिणीची मीटिंग असो, संपादक मंडळाची किंवा शाखेची; तेथे त्यांचा विषय निघणे स्वाभाविकच होते. पण आपले दैनंदिन व्यक्तिगत जीवनही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने किती व्यापून टाकले होते याची जाणीवही त्यांच्या जाण्यानंतरच जास्त प्रकर्षाने जाणवली. डॉ. दाभोलकरांबरोबरची माझी पहिली भेट अजूनही आठवते. भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांना घेऊन लक्ष्मण माने आणि डॉक्टरांनी काढलेली राज्यव्यापी यात्रा मुंबईला काळ्या घोड्यापाशी अडवण्यात आली. त्यावेळेस सर्व मोर्चेवगैरे तेथेच अडवत असत. माझे ऑफिस तेथेच होते आणि मी चळवळीशी संबंधित असल्याने तेथे जात असे. तेथे आत्ता हयात नसलेले समाजवादी कायकर्ते माधव साठे यांनी माझी ओळख डॉ. दाभोलकरांबरोबर करून दिली. त्याआधी डॉ. यांच्याबद्दल बरीच माहिती होती. एक कबड्डीपटू, त्यांचे समाजवादी युवक सभा, छात्रभारती संदर्भातील काम, त्यांचा ‘ग्रंथाली’ने प्रसिद्ध केलेल्या ‘संकल्प’ या पुस्तकातील लेख, यातून त्यांची ओळख होतीच; पण प्रत्यक्षात ओळख तेव्हाच झाली. औपचारिक ओळख झाली. पण त्यावेळेस वाटले नव्हते, या व्यक्तीशी भावी आयुष्यात आपले इतके घनिष्ठ संबंध निर्माण होतील. पण पुढे ‘अंनिस’च्या लोणावळ्यातील ‘शांतीवना’तील शिबिरातून, त्यांच्या व्याख्यानमालांतून, लिखाणातून ते अंधश्रद्धा निर्मूलनाची करत असलेली मांडणी आपल्या वैचारिकतेशी मिळतीजुळती आहे आपण ज्या समग्र परिवर्तनवादी चळवळीचा विचार करतो, त्याचाच अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही एक भाग आहे, असे त्यांच्या मांडणीतून जाणवत गेले व साहजिकच डॉ. दाभोलकरांशी जोडला गेलो. तोपर्यंत चळवळीत प्रत्यक्ष जमिनीवर काम केलेच नव्हते. महाराष्ट्र अंनिसच्या सुरुवातीच्या जडणघडणीच्या काळात थेट डॉक्टरांबरोबर काम करण्याची, त्यांच्याबरोबर केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दलच नव्हे, तर इतर अनेक साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक विषयांबद्दल चर्चा करण्याची, त्यांच्याशी वाद घालण्याची, कार्यक्रम, परिषदा, मोहिमा, आंदोलने यांच्या आयोजनात त्यांच्याबरोबर सहभागी होण्याची संधी भरपूर मिळाली. वार्तापत्राच्या वार्षिकांकाच्या जाहिराती गोळा करण्यासाठी दरवर्षी मुंबईत जो फेरा होई तो खूपच आनंददायी असे. अनेकांच्या भेटीगाठी होत, त्यात डॉक्टर ‘अंनिस’च्या झालेल्या कार्यक्रमाबद्दल, आंदोलनाबद्दल (विशेषतः कायद्याच्या), पुढील योजनांबद्दल आमच्याशी आणि भेटणार्यांशी अखंडपणे ज्या उत्साहाने बोलत, ते ऐकणे हा एक आनंदच असे. पण जसजशी संध्याकाळ, रात्र होई तसतसा आमचा (अनिश पटवर्धन, नंदू तळाशीलकर) उत्साह कमी होत जाई; पण डॉक्टर मात्र त्याच सकाळच्या उत्साहात अखंडपणे माहिती देत असत. त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करताना त्यांचा साधेपणा, त्यांच्या कामाचा झपाटा, कामातील नियोजनबद्धता, व्यवहारातील खुलेपणा, कार्यकर्त्यांच्या क्षमता ओळखून त्याआधारे जबाबदारी टाकण्याची त्यांची हातोटी, कार्यकर्त्यांच्या वैचारिक विकासाची कळकळ, कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक अडीअडचणींबद्दलची संवेदनशीलता, लिखाणातील, व्याख्यानातील वैचारिक नेमकेपणा, ज्यांना-ज्यांना आजचे जग जसे आहे त्यापेक्षा अधिक चांगले बनविण्याची इच्छा आहे, त्या सर्वांना मतभेदासहित सहभागी करून घेत बरोबर घेऊन जाण्याचे प्रामाणिक प्रयत्न, असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडत गेले. या त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलूंच्या आधारेच चळवळीतील अनेक जबाबदार्यांना ते सामोरे गेले. अनेक शिबिरे, भाषणे, परिषदा, आंदोलने, मोहिमा, उपक्रम, लिखाण, व्यक्तिगत नैतिक आचरण याद्वारे हजारो कार्यकर्त्यांच्या मनात एका बाजूला धर्म, जात, रूढी, परंपरा यांच्या कठोर चिकित्सेची भावना, त्या चिकित्सेबद्दल किंमत मोजण्याची, त्यागाची मानसिकता निर्माण केली आणि दुसर्या बाजूला जे लोक हे सर्व पाळतात, त्यामुळे अन्यायग्रस्त आहेत त्या लोकांबद्दल, त्यांच्या दु:खांबद्दल अपार करुणेची भावना निर्माण करत त्यांनी ‘अंनिस’ची संघटना उभारली. रूढार्थाने ही ‘केडरबेस्ड’ संघटना नसूनही डॉक्टरांच्या निघृण खुनांनतर कोसळली नाही; उलट सनातन्यांचे मनसुबे उधळत खंबीरपणे उभी राहिली, ती केवळ डॉक्टरांनी कार्यकर्त्यांच्या मनात पेरलेल्या या भावनांच्या आधारे.
धर्म, जात, रूढी, परंपरा यांची प्रचंड गुंतागुंत असलेला, अज्ञानाने, दारिद्र्याने पिचलेला, प्रचंड विषमतेने ग्रासलेला असा हा समाज. अशा समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम म्हणजे अतिशय अवघड गोष्ट. बुद्ध, महावीर, सारी संतपरंपरा अशासारख्यांना पुरून उरलेले हे काम. तशात कोणत्याही सत्तेसाठी नसलेली, कणभरही लाभाची शक्यता नसलेली निव्वळ प्रबोधनावर आधारलेली संघटना उभारायची ही त्याहूनही अवघड गोष्ट. पण अशा परिस्थितीत त्यांनी संघटना उभारली आणि चळवळीची तात्त्विक मांडणीही केली. सहसा चळवळीची तात्त्विक मांडणी करणारा कुशल संघटक असतोच, असे नाही आणि कुशल संघटक तात्त्विक मांडणी करतोच असे नाही. मात्र डॉक्टर त्याला अपवाद होते. वेगाने बदलणार्या सामाजिक परिस्थितीत मूळ वैचारिक चौकट कायम ठेवीत वेगवेगळे कार्यक्रम, आंदोलने, उपक्रम देत संघटनेला, तत्त्वज्ञानाला एखाद्या ‘पंथा’चे स्वरूप येऊ न देता डॉक्टरांनी त्या तत्त्वज्ञानाला विकसित करीत, वाहते ठेवले. हेच सनातन्यांना आव्हान ठरले व त्यांनी डॉक्टरांचा खून केला. आज आपल्या सर्वांपुढे डॉ. दाभोलकरांनी दिलेल्या तात्त्विक वारशाचा विकास बदलत्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीत मूलभूत वैचारिक चौकट कायम ठेवीत विविध आंदोलने, कार्यक्रम, उपक्रम उभारण्याचे आव्हान आहे. महाराष्ट्र अंनिस हे आव्हान नक्कीच स्वीकारेल, यात काहीच शंका नाही.
आज जगभरातच हिंसाचाराने थैमान घातले आहे. युरोप-अमेरिकेतील हिंसाचाराच्या घटना, फ्रान्समध्ये गर्दीत ट्रक घुसवून केलेला दहशतवादी हल्ला, बांगलादेशात दहशतवाद्यांनी ठार मारलेले ओलीस, काश्मीरमध्ये भडकलेला हिंसाचाराचा भडका, गुजरातमध्ये मेलेल्या गायीचे कातडे सोलणार्या दलितांना झालेली अमानुष मारहाण, अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची केलेली निर्घृण हत्या, नवी मुंबईतील नेरूळमध्ये 16 वर्षांच्या कोवळ्या दलित मुलाचा प्रेमप्रकरणापायी केलेल्या अमानुष मारहाणीत झालेला मृत्यू या नुकत्याच घडलेल्या काही हिंसक घटना अंगावर अक्षरशः शहारे आणणार्या जशा आहेत, तशाच पुरोगामी, डाव्या आणि विवेकी संघटनांसमोर सद्य:स्थितीत किती मोठे आव्हान उभे आहे, हे दर्शविणार्याही आहेत.
जगभरात घडलेल्या या सर्व घटनांमागची वेगवेगळी कारणे वरवर धर्म, जात, वंश, वर्णाशी संबंधित दिसत असली, तरी त्याची मुळे आहेत केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातच बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, गरिबी, प्रचंड विषमता निर्माण करणार्या नवउदारवादी आर्थिक धोरणात. या धोरणामुळे अस्थिर बनलेला गरिबीत, बेरोजगारीत जगणारा, प्रतिष्ठा, अस्मिता हरवलेला तरुण या अशा भ्रामक कल्पनांपायी आपली सारी विवेकी मूल्ये गुंडाळून ठेवून अत्यंत नीचपणाच्या, क्रूरपणाच्या पातळीला जाऊन पोचतो. मग धर्मांध बनून शेजार्याच्या घराला आग लावण्यास मागेपुढे पाहत नाही, गोमांसाचे निमित्त करून ठेचून मारायला, झाडाला लटकावण्यास कमी करत नाही, जात्यंध बनून कोवळ्या मुला-मुलींची आयुष्ये उद्ध्वस्त करण्याइतका बेफाम बनतो. वर उल्लेखलेली सर्व उदाहरणे हे सिद्ध करणारीच आहेत. या पार्श्वभूमीवर, शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तिसर्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंनिसने ‘हिंसा के खिलाफ मानवता के ओर’ हे राष्ट्रीय प्रबोधन अभियानाचे 20 जुलै ते 20 ऑगस्टपर्यंत जे आयोजन केले आहे, त्याचे महत्त्व किती आहे, हे लक्षात येईल. त्याची सुरुवात 20 जुलैला दिल्लीला जंतरमंतर वरील धरण्याने झाली.(याचे तपशील याच अंकात इतरत्र दिले आहेत). त्यानिमित्ताने डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांच्या खुनाच्या तपासाचा मुद्दा देशपातळीवर चर्चिला जात आहे. डॉ. दाभोलकरांच्या खून प्रकरणी आठ जूनला वीरेंद्र तावडेला अटक झाली. त्या अटकेचे ढोल बरेच बडवले गेले. पण त्यापुढे काहीच नाही. कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांच्या खुनाचीही हीच स्थिती आहे. या तिन्ही खुनात संशयाची सुई सनातन संस्थेवर असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यावरून सरकारविरोधी आणि सनातन्यांविरोधातील न्यायालयीन आणि रस्त्यावरील संघर्ष आपल्याला दीर्घ काळापर्यंत करावा लागणार आहे, हे मात्र निश्चित. याच संघर्षात मागे न हटण्याचा निश्चय डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण करूया. लढेंगे ! जितेंगे !
–राजीव देशपांडे, सहसंपादक
सत्यशोधकी आंतरजातीय विवाह
अंनिस कोल्हापूरच्या वतीने चिकोडी तालुक्यातील मिथुन महावीर मधाळे व आडी येथील पूनम हरिभाऊ कुलकर्णी यांचा सत्यशोधकी पद्धतीने विवाह झाला. या विवाहाला संमती देणार्या पालकांचा दलित क्रांती सेनेचे संस्थापक-अध्यक्ष अशोककुमार असोदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनिल चव्हाण यांनी ‘सत्यशोधकी विवाह’ पद्धतीची वैशिष्ट्ये सांगून वधू-वरांना प्रतिज्ञा दिली आणि कोल्हापूर आणि लातूर येथील ‘विवाह सहाय्यता केंद्रा’ची माहिती सांगितली.
शहाजी भोसले यांचे अभिनंदन!
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते शहाजी भोसले, औरंगाबाद यांना मुंबई येथील यु.आर.एल. फौंडेशनचा शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणार्थ ‘सामाजिक गौरव पुरस्कार’ रूपये 50 हजारचा मिळाला. जलतज्ञ राजेंद्रसिंहजी यांनी या पुरस्काराचे वितरण केले. तसेच सोलापूर येथील डॉ. फडकुले प्रतिष्ठानचा सामाजसेवा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार रूपये 25 हजार व स्मृतीचिन्ह असा होता. दोन्ही पुरस्काराबद्दल शहाजी भोसले यांचे अभिनंदन!