Categories
नाट्य-चित्र परिक्षण

गांधींभोवतीच्या गैरसमजांचं धुकं वितळवणारं नाटक – गांधींचं करायचं काय?

फेब्रुवारी - २०१९

गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात आणि देशभर अनेक प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. गांधीविचार जनमानसापर्यंत पोचविण्याचे चांगले प्रयत्न त्यातून होत आहेत. अशा अनेक प्रयत्नांपैकी जनमानसाची पकड घेणारा; तसेच हलक्या-फुलक्या व छोट्या-छोट्या संवादातून गांधीजींभोवती हिंदुत्ववादी संघटनांनी जे गैरसमजाचं जाळं विणलं आहे, ते जाळं यशस्वीपणे तोडणारा नाट्यप्रयोग ‘गांधींचं करायचं काय?’ हा खूपच प्रभावी आणि यशस्वी ठरत असलेला प्रयोग म्हणावा लागेल. इचलकरंजी येथील राष्ट्र सेवादलाचे स्मिता पाटील कलापथक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी मिळून हे पन्नास मिनिटांचे मुक्तनाट्य बसवले आहे, ज्याचे आजवर अडतीस प्रयोग महाराष्ट्राच्या विविध भागात प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहेत.

पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये द्यावेत म्हणून गांधीजींनी उपोषण केले, भारताच्या फाळणीला गांधीजींनी विरोध केला नाही, भगतसिंगांची फाशी गांधीजी थांबवू शकले असते; पण त्यांनी प्रयत्नच केले नाहीत, दलितांच्या राखीव जागांना गांधींनी विरोध का केला? अशा अनेक मुद्द्यांवर इतिहासाची मोडतोड करून खोटारडेपणाने तरुणाईच्या मनात गांधीजींबद्दल विष पेरण्याचे काम काही संघटना सतत करत आहेत. याचा विवेकी आणि संतुलित पध्दतीने हे नाटक प्रतिवाद करते.

कलाकृती म्हणूनही या मुक्तनाट्याचा दर्जा खूपच चांगला आहे. छोट्या-छोट्या आणि अर्थपूर्ण संवादातून हे नाटक कुठेही न रेंगाळता प्रवाही पध्दतीने पुढे सरकत राहते. विषयाच्या मांडणीला वेगवेगळ्या प्रसंगनाट्यांची साथ आहे. गांधीविचारांना जाणून असलेला एक तरुण आणि हितसंबंधी संघटनांनी गांधीजींबद्दल केलेल्या विषारी अपप्रचाराने भ्रमित झालेला दुसरा तरुण या दोघांच्या वाद, प्रतिवाद आणि संवादातून महात्मा गांधीजींच्या कामाचा आणि विचारांचा पट हे मुक्तनाट्य हळुवारपणे उलगडत नेते. यात काम करणारे बहुतांश कलाकार हे विद्यार्थी किंवा कामगार आहेत; किंबहुना काहीतरी काम करत-करत शिकणारे आहेत. त्यापैकी कुणीही व्यावसायिक कलाकार नाही. नाटकाचे लेखक संजय रेंदाळकर हे राष्ट्र सेवादलाचे अनुभवी कार्यकर्ते आहेत, वैचारिक अभ्यासाशी नाळ जुळलेले कार्यकर्ते आहेत, दिग्दर्शक प्रतीक जाधव यांना काही दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये कामाचा अनुभव आहे; तसेच त्यांच्या एका शॉर्टफिल्मचे न्यूयॉर्कमध्ये स्क्रीनिंग झालेले आहे. प्रतीक जाधव यांनी कामगार कलाकारांकडून खूपच प्रभावी पध्दतीने हे नाटक बसवून घेतलेले दिसते. कलाकारांचा स्टेजवरील वावर आणि हालचाली आत्मविश्वासपूर्ण आहेत आणि त्यांचा आपापसातला मेलजोल उत्कृष्ट आहे. संवादफेकीची भट्टी चांगलीच जमलेली आहे. गांधीजींच्या संदर्भातील वैचारिक इतिहास; तोही तारखांसहित नाटकात मांडलेला असूनही नाटक पाहणार्‍याच्या मनाची पकड सोडत नाही, हे छोट्या-छोट्या संवादांचे आणि त्याला मिळालेल्या अभिनयाचे यश आहे. एकुणात, हे नाटक पन्नास मिनिटे प्रेक्षकांच्या भावविश्वाची पकड घेत त्यांना स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील भारलेल्या वातावरणाची सफर घडवून आणते. या सफरीत गांधीजींबद्दलच्या गैरसमजांनी आणि द्वेषाने भारलेला तरुण हळूहळू बदलत जातो. सततच्या संवादामुळे त्याचं होत चाललेलं मतपरिवर्तन हे समाजबदलाची प्रक्रिया आणि त्यातील संवादशास्त्राच महत्त्व समोर आणतं.

कुठलीही महागडी ड्रेपरी किंवा नेपथ्य यांचा आधार हे नाटक घेत नाही. कमीत कमी साधनांच्या आधारे प्रभाव निर्माण करण्यात कलाकार यशस्वी होतात. ‘साधेपणा हा महात्मा गांधीजींच्या जीवनाचा मूलाधार होता आणि या नाटकाने आपल्या सादरीकरणात तो साधेपणा फार प्रभावीपणे जपला आहे,’ ही तुषार गांधी यांची प्रतिक्रिया त्या अर्थाने फार बोलकी आहे.

अत्यंत संवेदनशील वैचारिक विषयांना हे नाटक तितक्याच जबाबदारीने आणि संतुलित पध्दतीने हाताळते. पण सर्व काही छान-छान असं म्हणत विषयाला झाकण्याचे कामही नाटक करत नाही. नाटक जरी गांधीजींच्याबद्दल असले तरी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग, खान अब्दुल गफारखान, सुभाषबाबू यांचंही राष्ट्रजीवनातलं महत्त्व अधोरेखित करत पुढे सरकतं. एखाद्या महामानवाच्या जीवनावरील हे पहिलं नाटक असेल, जे अन्य महामानवांना छोटं दाखवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही, तर त्यांच्यापैकी प्रत्येकजण देशासाठी, भारतासाठी काहीतरी चांगलं घडवण्यासाठी जीवाचं रान करत होता, हे वास्तव समोर आणतं. अर्थात, नाटकाने हाताळलेले सर्वच विषय इतके व्यापक आणि गुंतागुंतीचे आहेत की, पन्नास मिनिटांचं नाटक तपशिलात जाऊन ते तुमच्यासमोर आणेल, हे शक्य नाही. तरीही नाटक या माध्यमाच्या मर्यादा आणि पन्नास मिनिटांच्या मर्यादा सांभाळतही काही ठिकाणी एक-दोन जास्तीची वाक्ये घालून विषयाची अधिक स्पष्टता आणण्याला वाव आहे आणि पुढील काळात ते होईल, असा विश्वास आहे.

गांधीहत्या आणि त्याची कारणे हा नाटकाचा गाभा आहे. धर्मांध कट्टर हिंदुत्ववादी शक्तींनी एका महामानवाला, शांतिदूताला, धैर्यशील योद्ध्याला द्वेषबुध्दीने आणि भ्याडपणाने संपवलं आणि आपल्या आपल्या त्या नृशंस कृत्याला रास्त ठरविण्यासाठी खोटा इतिहास रचत तरुणाईला भ्रमित करण्याचं काम सतत केलं. त्याबद्दलचा वास्तव इतिहास हे नाटक समोर आणतंच, त्याबरोबरच गांधीजींचं अस्पृश्योध्दाराचं काम हेच कसं हिंदुत्ववाद्यांच्या डोळ्यात सलत होतं, हे स्पष्टपणे मांडतं. गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणवून घेत असले, तरी त्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणातून उदारमतवादावर आधारित, मानवतेवर आधारित, सामाजिक न्यायावर आधारित हिंदुत्वाची एक नवी परिभाषा रूढ करण्याचे यशस्वी प्रयत्न चालवले होते. ज्यांना हिंदुत्व म्हणजे मूठभरांचे विशेषाधिकार पुढेही चालू ठेवण्याचं साधन म्हणून वापरायचं होतं, हिंदुत्वाच्या आडून विषमतेचा आणि शोषणाचा इतिहास तसाच अबाधित ठेवायचा होता. त्यांना महात्मा गांधीजी हे मोठाच अडथळा ठरत होते. गांधीजींच्या वाढत्या प्रभावामुळे समाजावरील आपली आर्थिक, राजकीय मगरमिठी धोक्यात येईल, असे ज्यांना वाटत होते, त्या धोकेबाज शक्तींनी गांधींना धोक्याने संपवले, हे वास्तव स्पष्टपणे आणि नेमकेपणाने समोर आणण्यात हे नाटक यशस्वी होते.

स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यलढ्याच्या काळात वेगवेगळ्या समूहांच्या न्याय्य हितसंबंधाबद्दल भूमिका घेणार्‍या, संघर्ष करणार्‍या राष्ट्रीय नेत्यांचा विचार आणि कार्याबद्दल भरपूर काही लिहून झालं आहे आणि ते सर्वांच्या वाचनासाठी उपलब्ध आहे. प्रत्येकाने ते वाचून आपली समज वाढवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. स्वातंत्र्यलढ्याबद्दलचं एखादं व्याख्यान जसं त्या सर्व विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त समजावून सांगतं, तेच काम हे नाटक व्याख्यानापेक्षा अधिक प्रभावीपणे करतं. गांधी, आंबेडकर, भगतसिंग अशा सर्वांनीच भारतात लोकशाही नसतानाच्या काळात, मतदानाचा अधिकार सर्वांना नसतानाच्या काळात सर्व भारतीयांचं आणि भारताचं भलं होण्याच्या दृष्टिकोनातून जे राष्ट्रकार्य केलं, त्याचं मोल जाणून घेत आज भारतात लोकशाही विकसित होत असतानाच्या काळात, सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाच्या अधिकाराद्वारे जनहिताला बांधील नसलेलं अन्यायी, भ्रष्ट आणि सुस्त सरकार बदलण्याचा अधिकार मिळालेला असतानाच्या काळात त्या सर्वांनी जे मांडलं त्यातील योग्य ते घेत, त्याची परस्पराशी सांगड घालत आणि आजच्या काळाशी त्याची नाळ जोडत पुढं सरकलं पाहिजे. भारताला समृध्दी आणि सामाजिक न्यायाच्या रस्त्यावर पुढे-पुढे घेऊन जाण्यासाठी आपलं जास्तीत जास्त योगदान दिलं पाहिजे.

सुभाष वारे

मार्गदर्शक, सुराज्य सेना