दिल्ली विद्यापीठातल्या रामजस कॉलेजमध्ये ‘प्रतिरोध की संस्कृती’ हा कार्यक्रम घ्यायला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांनी विद्यार्थी आणि पत्रकारांनाही मारझोड केली. कॉलेजातलं वातावरण दूषित केलं. त्यावर गुरमेहरने हातात एक पोस्टर घेतलेलं छायचित्र सोशल मीडियात टाकलं आणि बघता बघता ते व्हायरल झालं…! “मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. मी अभाविपला घाबरत नाही. मी काही एकटी नाही. भारतातला प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे…!” यावर मोठा गदारोळ सुरू झाला…! आणि दोनेक दिवसातच तिचं आणखी एक पोस्टर अशाच पद्धतीने पसरलं आणि प्रकरणाला खर्या अर्थाने सुरवात इथून झाली…! त्यावर लिहिलं होतं…‘माझ्या वडिलांना पाकने नव्हे तर युद्धाने मारलं…!’
आणि या स्टेटमेंटवर अक्षरशः गोंधळ उडवला गेला…! सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरमेहरवर हरेक अंगाने हल्ले करण्यात आले. एकंदरीत या घडामोडींवर सोशल मीडियात व्यक्त झालेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेणं आवश्यक ठरेल…!
——————————–
गुरमेहरची माघार ही ताण सहन न झाल्यामुळे आहे…त्याला हे मूर्ख लोक त्यांचा विजय समजत आहेत. तिने विचाराची लढाई कधीच जिंकली आहे. तिने हिंसेची लढाई सोडून दिली आहे… – प्रिया तिडके
——————————–
बाईला नामोहरम करण्याचा दुसरा मार्ग – तिच्या चारित्र्यावर हल्ला करा….! – वैभवी शिंदे
——————————–
गुरमेहर कौरच्या व्हिडीओवर ‘फयाज खान’ नावाच्या एका पाकिस्तानी विद्यार्थ्याने गुरमेहर कौरच्या आवाहनाला प्रतिसाद देणारा एक सुंदर व्हिडीओ अपलोड केला… ज्यामध्ये तो तिला छळणार्या तिच्या पोरकेपणाच्या दुःखात सहभागी होऊन तिला धीर देताना म्हणतोय की, गुरमेहर, मी तुला तुझ्या शहीद बापाचं प्रेम नाही देऊ शकत; पण आज तुझ्या या मन हेलावून टाकणार्या आवाहनामुळं तू ‘दुश्मन देश’ म्हणवल्या जाणार्या देशातून एक ‘भाऊ’ मिळवलायस…” हे गुरमेहरचं यश आहे…! -चेतन तांदळे
गुरमेहर शहीदकन्या आहे..तिची मुस्कटदाबी करून अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडण्यासाठी धमक्या, अत्याचार व बलात्काराच्या…! कोणत्याही स्त्रीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व विरोध ठेचण्यासाठी या सनातनी दुर्वर्तनींकडील एकमेव साधन..! बलात्कार…! साक्षात शहीद कन्याही यातून सुटणार नाही..!! – गिरीश पाटील
——————————–
मीडियाची, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणार्या विचारवंतांची भूमिका आहे की केवळ गुरमेहेर कौरला, तिला काय वाटतं ते तिला हव्या त्या शब्दात सांगायचा हक्क आहे; मग ती मते इतरांना देशविरोधी का वाटेनात; पण तिच्या विधानाला कुणी हरकत घेतली; मग ती कितीही सभ्य शब्दात का असेना, ती व्यक्ती लगेच असभ्य, शिवराळ ट्रोल ठरवली जाते. कारण ‘पुरोगामी विचारवंत’ माफियाने ठरवून दिलेल्या भूमिकेशी विसंगत अशी भूमिका या देशात कुणी घेऊच कसं शकतं? – सुशांत पटवर्धन
——————————–
विशेष म्हणजे सेहवाग सारख्या लोकप्रिय खेळाडूने या ट्रोल गँग मध्ये सामील होऊन नफरत वाढवणार्या विकृतांना पाठिंबा द्यावा….हे खूपच भयंकर आहे…..!देश कठीण काल में है…! – इम्रान शेख
——————————–
या देशात कोणी आपलं मत मांडू शकत नाही का?? त्या शहीद सैनिकाच्या मुलीने आपलं मत माडलं तर ती देशद्रोही झाली? तुम्ही कोण रे देशभक्तीची सर्टिफिकेट वाटणारे?? कायदा कानून आहे की नाही या देशात. करा त्या मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल, जा न्यायालयात….. कायदा काय ते ठरवेल…! – ऋत्विक देसाई
——————————–
म्हणजे याचं ऐकलं तर देशभक्त आणि नाही ऐकलं तर देशद्रोही ? एका स्वतंत्र भारताच्या महिलेबाबत तुमच्या असलेल्या वृत्तीचा धिक्कार आहे !! आता फक्त नि:पक्षवादी चौकशी व्हावी हीच अपेक्षा !! Ban_ABVP – दिशा पाटोळे
गुरमेहर कौरला ट्रोल करणारे वीरेंदर सेहवाग, बबिता फोगट आणि योगेश्वर दत्त हे सगळे अर्धवट डोक्याचे खेळाडू आणि रणदीप हुड्डा हा अभिनेता हरियाणातले आहेत. हे तेच हरियाणा जे खाप पंचायत आणि ऑनर किलिंगसाठी कुप्रसिद्ध आहे. प्रचंड अशा फ्यूडल वातावरणातून आलेल्या या बिनडोक लोकांकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार म्हणा! Stand With Democracy, Students Against ABVP – शिवम यादव
तसं पाहायला गेलं तर दाऊदचा बाप पण प्रामाणिक पोलीस होता…पण तो देशद्रोही निघालाच…! अर्थात ती मुलगी पण देशद्रोही आहे असं नाही. पण शहीद जवानाची मुलगी आहे, याचा अर्थ तिची प्रत्येक गोष्ट देशवासीयांनी मान्य करावी असं पण नाही…! कारण पाकिस्तान किती हरामखोर आहे हे जगाला माहितीये. त्यात ती पाकिस्तानींची बाजू घेत असेल तर सामान्य भारतीय नाही खपवून घेणार…! – राजेश निकम
——————————–
देशात प्रसिद्धी मिळावी यासाठी ती असं वक्तव्य करत असेल नाहीतर तिलाच राजकारणात उतरायची इच्छा असेल आणि आप, काँग्रेस सारखे पक्ष आहेतच तिला उमेदवारी द्यायला…! नाही म्हटलं तरी आज पूर्ण देश तिच्यावर चर्चा करतोय…तिच्या शहीद वडिलांची एवढी चर्चा नाही झाली तेवढी चर्चा तिची सध्या होत आहे…देश फुकट महत्त्व देत आहे तिला…! – मीनाक्षी पाटील
——————————–
जरूरी नहीं की शहीद की बेटी देशद्रोही नहीं हो सकती, दाऊद का बाप भी पुलिसवाला था…! – सुभाष मिश्रा
——————————–
मला व्यक्तिशः तिच्यावर जी प्रचंड कमरेखाली टीका झाली आणि तिला ज्या धमक्या मिळाल्या तेव्हापासूनच अस्वस्थता आली आहे. ती तिचे बरे- वाईट, चूक- बरोबर मत घटनेच्या चौकटीत राहून मांडत आहे आणि हे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत हे धोक्याचे आहे. स्त्रिया हे तर या लोकांसाठी इझी टार्गेट आहे…! – विभावरी जाधव
——————————–
ती युनिव्हर्सिटीत कशासाठी गेलीये, तेवढंच करावं असं सांगणारे महाभाग आहेत आपल्याकडे. तिनं काय करावं, काय करू नये, हे कंट्रोल करण्याची इच्छाच कशासाठी होते लोकांची काय माहीत. तो सर्वस्वी तिचा प्रश्न नाही का? अजून काय झालं म्हणजे लोकांना पटणारे की असहिष्णु होत चाललोय आपण? – सृजन कागणे
——————————–
हे अत्यंत दु:खद आहे की लोक गुरमेहरचा संदेश न समजताच केवळ पाकिस्तान या नावाने गदारोळ करत आहेत…! – विक्रांत कांबळे
——————————–
देशप्रेमी नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तर ते फक्त या डाव्या, कम्युनिस्ट चळवळीतल्या लोकांनाच आहे, असा चुकीचा समज मीडिया, कथित पुरोगामी, कथित विचारवंतांनी करून घेतलेला दिसतो आहे.
त्या गुरमेहर कौरच्या शहीद पित्याच्या आत्म्याला काय वाटले असेल, जेव्हा मुलीने त्याच्या हौतात्म्याला एका साध्या युद्धातील हौतात्म्य म्हटले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांशी लढताना ज्या पित्याने सर्वोच्च बलिदान दिले त्याच्या बलिदानाला असे खालच्या स्तरावर आणणे ही कुटिलता फक्त आणि फक्त कम्युनिस्टच करू शकतात, यात शंका नाही. #Stand With ABVP – सतीश पाटील
——————————–
त्या मुलीने अभाविपवर बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप केलाय… हसावे की रडावे कळत नाही… एकतर अभाविप असे हीन कृत्य कधीही करणार नाही, याची खात्री आहे… आणि राहता राहिली गोष्ट त्या जे. एन. यू. फेम देशद्रोही प्रवृत्तींची, तर त्यांना रस्तोरस्ती देशप्रेमी लोकांच्या सनदशीर विरोधाला सामोरे जावे लागणारच आहे… काश्मीर काही यांच्या बापाचे नाही, आणि देशाचे सार्वभौमत्व त्यांना खुपत असले तरी जनता ते विकायला काढू देणार नाही… – अक्षय माळवे
——————————–
वरील सर्व उलट-सुलट प्रातिनिधिक प्रतिक्रिया या सर्व प्रकरणाचे बर्यापैकी दर्शन घडवतात…! मात्र तरीही काही झाकोळल्या गेलेल्या बाबी उजेडात आणणं गरजेचं आहे…! मुळात तिचं युद्धाबाबतचं स्टेटमेंट हे आताचं नाही…! गुरमेहर कौर ही गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन देशात सलोखा निर्माण व्हावा म्हणून ‘पीस’ या संघटनेसाठी काम करते…! दहा महिन्यांपूर्वी गुरमेहरने एका व्हिडीओच्या माध्यमातून स्वतःची व्यथा मांडली होती…! व्हिडीओमध्ये ती काही बोलत नाही…शांत चेहर्याने एकामागोमाग एक पाट्या हातात घेऊन व्यक्त होत जाते…! जेव्हा तिने ‘अभाविप’विरोधी जाहीर भूमिका घेतली तेव्हा तो जुना व्हिडीओ पुन्हा उकरून काढून त्यातील मागचा-पुढचा संदर्भ गाळून माझ्या वडिलांना पाकने नव्हे तर युद्धाने मारलं…! केवळ या एका विधानाला फोकस करून मुद्दाम सत्यापलाप करून बुद्धिभेदी, एकांगी चर्चा सोशल मीडियात घडवली गेली…! संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यास तिची भावना पटकन समजेल…! ती म्हणते…! “हाय…! माझं नाव गुरमेहर कौर…! मी जलंधर, भारत येथे राहते…! हे माझे वडील कॅप्टन मनदीप सिंह…! ते 1999 च्या कारगिल युद्धात मारले गेले…! ते वारले तेव्हा मी दोन वर्षांची होते. माझ्याकडे त्यांच्या फार कमी आठवणी आहेत…! वडील नसल्यानं कसं वाटतं, याच्या माझ्याकडे जास्त आठवणी आहेत…! मला हेही आठवतं की पाकिस्तान आणि पाकिस्तान्यांचा त्यांनी माझ्या वडिलांना मारल्यामुळे मी किती द्वेष करायचे…! मी मुसलमानांचाही द्वेष करायचे. कारण सर्व मुसलमान पाकिस्तानी असतात असं मला वाटायचं…! मी सहा वर्षांची असताना एका बुरखा घातलेल्या महिलेला चाकू मारण्याचा प्रयत्न केला होता…!
ती माझ्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार आहे, असं कुठल्याशा विचित्र कारणानं मला वाटलं होतं…! माझ्या आईनं मला आवरलं आणि समजावलं की माझ्या वडिलांना पाकिस्ताननं नव्हे, युद्धानं मारलं…! हे कळायला मला जरा वेळ लागला, पण आज मी माझा द्वेष सोडून द्यायला शिकले आहे…! हे सोपं नव्हतं, पण कठीणही नाही…! मी हे करू शकते, तर तुम्हीदेखील करू शकता…!
आज मी देखील माझ्या वडिलांसारखीच एक सैनिक आहे…! मी भारत-पाकिस्तानमधल्या शांतीसाठी लढते…! कारण आमच्यात युद्ध झालं नसतं, तर माझे वडील आजही इथेच असते…! मी हा व्हिडीओ बनवते आहे कारण माझी अशी मागणी आहे की, दोन्ही देशांच्या सरकारांनी ढोंगबाजी बंद करावी…! आणि समस्या सोडवावी…! जर दोन महायुद्धांनंतर फ्रान्स आणि जर्मनी एकत्र येऊ शकतात…! जर जपान आणि अमेरिका आपला भूतकाळ मागे टाकून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतात…! तर आपणही का नाही? बहुसंख्य सामान्य भारतीयांना आणि पाकिस्तान्यांना शांती हवी आहे, युद्ध नव्हे…! मी दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह लावते आहे…! तिसर्या दर्जाच्या नेतृत्वाखाली आपण पहिल्या दर्जाचा देश बनण्याचं स्वप्न पाहू शकत नाही…! कृपाकरून कंबर कसा, एकमेकांशी बोला आणि काम तडीला न्या…! राष्ट्रपुरस्कृत दहशतवाद आता पुरे…! राष्ट्रपुरस्कृत हेरगिरी आता पुरे…! राष्ट्रपुरस्कृत द्वेष आता पुरे…! सीमेच्या दोन्ही बाजूंना भरपूर लोक मेलेत…! आता पुरे म्हणजे पुरे…! जिथं आपल्या वडिलांना गमावलेल्या गुरमेहर कौर नाहीत अशा जगात मला राहायचंय…! मी एकटी नाही, माझ्यासारख्या खूप आहेत…!”
ती इतक्या परिपूर्णतेने व्यक्त झालीय की यावर फारसं स्पष्टीकरण करण्याची गरजच उरत नाही…! मात्र तिचं युद्धविरोधी विधान पाकिस्तानप्रेमी ठरवलं गेलं आणि एकांगी प्रचार आणि धमक्या, अश्लील प्रतिक्रिया देऊन तिच्या उदात्त विचारांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला गेला…!
सुसंस्कृत माणसाने ज्या स्तरावर संस्कृती पुढे नेलेली असते, त्या संस्कृतीचा…युद्ध आणि विध्वंसक विचाराने नाश होतो…अशा विध्वंसक, विखारी विचाराने मानवी संस्कृतीने हजारो वर्षे झटून सिद्ध केलेली मूल्ये काही दिवसातच मातीमोल होतात…! ‘परस्परांच्याविषयी परस्परांच्या मनात विश्वास जागा करण्यासाठी प्रयत्न करा…’ असे पोटतिडिकीने आवाहन करणारी गुरमेहर या समाजाला ‘नकोशी’ झालीय…ही निश्चितच धोक्याची घंटा आहे…!
गुरमेहरला हतबल होऊन आपल्या गावी निघून जावं लागणं हे भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं अपयश आहे…हे विसरून चालणार नाही…! ‘गुरमेहर, आम्ही तुझ्यासोबत आहोत’ असा विश्वास वेळोवेळी सोशल मीडियातून व्यक्त करणं गरजेचं आहे…
लेखक संपर्क : 9673081941