Categories
कथा बालविभाग

ग्रेट गडबडगुंडीची गोष्ट

वार्षिकांक - २०१५

एक होती खारकुंडी. तिचं नाव गडबडगुंडी. मैत्रिणी मात्र तिला ‘गुंडी’ म्हणत. बोलक्या, बडबड्या, धडपड्या गुंडीला खूप मित्रमैत्रिणी होत्या. फुगडीबाय, गोंडसगुड्डी, घाबरगुंडी, सिकसिक कितीतरी खारी कापोलीच्या त्या रानात राहायच्या. प्राण्यांच्या शाळेत जायच्या. मधल्या सुट्टीत भुईमुगाच्या शेंगा सगळ्या खारींना वाटल्या जायच्या.

गडबडगुंडी फारच धीट होती. तिला भीती हा शब्दच जणू माहीत नव्हता. शहरातली मुलं कापोलीचं कोकणरान बघायला आली, तरी गुंडी तिच्या भाषेत बोलायची, ‘ये मुंबईवाल्या, माझा फोटो काढ की, एखादा! नुसतं काय बघतोस?’…. शाळेतल्या मोठ्या बाई, खारोटीताई मात्र तिला नेहमी ओरडायच्या. मोठ्या बाई म्हणायच्या, ‘खारीने खारीसारखं वागावं! त्यात तू काही ‘खारोबा’ नाहीस. खारकुंडी आहेस. किती उनाडक्या करतेस?’

परवा त्या तळ्याच्या काठी पाहिलं मी तुला. तळ्यातला ‘अ‍ॅनाकोंडा’ अजगर बाहेर आला आणि तुला पळवलं, तर काय करायचं तुझ्या आईने?….’ गुंडी त्यावर म्हणाली, ‘बाई, ‘अ‍ॅनाकोंडा’ आपल्या देशात सापडतच नाही. मग तो इथं कोकणात कसा येईल? कापोलीच्या रानात नागराज भुजंग म्हणजे किंग कोब्रासुद्धा मिळत नाही. नसलेल्या गोष्टींना कशाला घाबरायचं? पार अजगराच्या बातम्या तो ससुकला उगाच पसरवतो. अफवा आहेत त्या. मी नाही अशा गोष्टींवर विश्वास ठेवत. मागे एकदा या सशाला पहाटे अस्वल दिसलं म्हणे. नंतर हळूच सांगतो. ते स्वप्न असावं! असावं काय? स्वप्नच होतं ते. मनी वसे ते स्वप्नी दिसे! असला तो भित्रा ससा! बाई, मी जातपात मानतच नाही. सगळ्या खारकुंड्या भित्र्याच असल्या पाहिजेत, असं थोडंच आहे? शिवाय ‘खारोबा’ आणि ‘खारू’, नर आणि मादी असा तरी भेदभाव कशाला? माणसं असे भेदाभेद करतात. त्यांना समज कमी असेल….’

हे ऐकून खारोटीताई चिडल्या. म्हणाल्या, ‘मला तुझ्याशी बोलायचंच नाही. तुझा हा उद्धटपणा तुझ्याकडेच ठेव’…. खारीला कळेना, खरं बोललं, काही वेगळा विचार केला तर सगळ्यांना राग का येतो? मी ‘खार’ आहे म्हणून घाबरून डोलीतच बसून राहू का? जमायचं नाही! व्यायाम नको व्हायला? ऊन पावसाची सवय हवी. धावण्याच्या शर्यतीत शाळेत मीच जिंकले ना? तसंच कुणी अंगावर आलं तर असं कडकडून चावेन की, वाटच लावेन! आपलं रक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. प्रत्येकाचा तो हक्क आहे. दात आणि नखं आहेत ना? घाबरायचं कशाला?’

कापोलीच्या त्या जंगलात हल्ली नवी भीती पसरली! त्या परिसरात घुबड नव्हतं. एक पांढरं घुबड तिथे राहायला आलं. छोटे प्राणी, पक्षी त्याला टाळू लागले. त्यांना घुबडाची फार भीती वाटू लागली. ते दिसलं तरी खारकुंड्या लपून बसायच्या. ससे दूर धावत सुटायचे. घुबडाने आपल्याला हेरलं की, ते जादूटोणा करून आजारी पाडू शकतं, असा समज कावळ्याने पसरवला. पांढरं घुबड दिवसा ढोलीबाहेर पडत नसे. संध्याकाळनंतर ते फिरायचं. लहान पक्ष्यांनी, प्राण्यांनी त्याचा धसका घेतला. एकदा तर खारकुंड्यांच्या शाळेजवळ ते दिसलं म्हणून खारोटीताईंनी हळूच शाळाच सोडून खारीपोरींना घरी पाठवलं!

पांढरं घुबड रात्री अंधारात शिकार करायचं; पण मांसाहारी पक्षी शिकार करणारच! ते सरडा पकडणार नाही तर काय पेरू खाऊन विठू विठू करणार?’

गडबडगुंडी मात्र नेहमीप्रमाणे निराळा विचारत करत होती. तिला पांढर्‍या घुबडाबद्दल सहानुभूती वाटू लागली. दया-माया ही फक्त आपल्याच जातबंधूंबद्दल वाटावी, असं काही नसतं. सगळं मोठं जग आपलंच आहे! गडबडगुंडीने ठरवलं, पांढर्‍या घुबडाशी ओळख करून घ्यायची. बघू तर, खरं काय होतं ते! सातच्या आत घरात आलंच पाहिजे असा गुंडीच्या घरी नियम होता; पण चकोर पक्ष्याशी तिची मैत्री होती. चकोरबरोबर असला की, गुंडीला संध्याकाळी जरा जास्त वेळ रेंगाळण्याची परवानगी मिळत असे. चकोर फार सज्जन, हुशार होता. त्याची रात्री भरणारी शाळा वेगळी होती. त्या रात्रशाळेत चकोराचा पहिला नंबर आला होता बरं का! कष्ट करून तो शिकायचा.

खारीने त्याला विचारलं, ‘घुबड शाप देतं ते अशुभ आहे याला काय अर्थ आहे रे!’ त्याची शिकार ते घुबड करतं. त्यात शिव्याशाप देण्याचा, आपलं काही वाईट होण्याचा, काय संबंध येतो?’ चकोर म्हणाला, ‘अगं, हे गैरसमज आहेत. कुणीतरी, काहीतरी भंकस गोष्टी उठवतं आणि त्या भंपकपणावर हे प्राणी विश्वास ठेवतात. तुला आठवतं का बघ. टिटवीबाग ओरडत गेली की, संकट येतं, पाणी आटतं अशी थापाथापी बरेच दिवस सुरू होती. या प्राण्यांनी सभा घेऊन टिटवीला हे रान सोडायला लावलं. पाऊस पडलाच नाही आणि वाफ होतच राहिली, तर पाणी आटणारच. टिटवीच्या ओरडण्याचा काय संबंध? ‘है ना?’….. आता गडबडगुंडीला जास्तच बळ आलं. शहाणा चकोर तिच्या बाजूने होता.

गडबडगुंडी म्हणाली, ‘चकोरभाऊ, आपण जरा त्या घुबडाला भेटूया! बघू तर खरं काय होतं ते. फार तर काय होईल? ते आपल्याला घालवून देईल… पण मला तरी वाटतं ते नीट बोलेल. त्याचं तरी कोण आहे? एकटं आहे ते बिचारं. हे बाताडे प्राणी त्याच्याबद्दल उगाच वावड्या उठवतात, कंड्या पिकवतात. अगदी घुबड झालं, तरी त्यालाही मित्र हवेच असणार. वाळीत टाकल्यावर ते तरी काय करणार?….’ चकोराला आपल्या मैत्रिणीचं कौतुक वाटलं. एखादी आजीबाय खार बोलावी तसं ती समंजसपणे बोलत होती.

घुबडाच्या घराकडे जाता जाता चकोर तिला म्हणाला, ‘पोपट थापा मारत होता की, दिवसा घुबड एक दगडगोटा उगाळत बसतं. ज्याचं नाव ते घेतं तो त्या दगडाप्रमाणे झिजत जातो, जिवंत राहत नाही. दगड उगाळून आजारी पाडणारं घुबड सगळ्यांनी हल्ला करून संपवलं पाहिजे, असं पोपटाचं म्हणणं होतं. कावळे तर घुबडाला घेरायला, मारायला टपलेलेच होते.

गुंडी आणि चकोर घुबडाच्या घरापाशी आले. घुबड झोपलं होतं. रात्रीच्या जागरणाने ते थकलं असावं. गुंडीने घुबडाची झोपमोड केली नाही. ती चकोराबरोबर थांबून राहिली. संध्याकाळी सात वाजता घुबडाला आपोआप जाग आली. घुबडाने या दोघांकडे रागाने पाहिलं. ‘कोण तुम्ही? इथं कशाला आलात? हिंमत कशी झाली तुमची?’ घुबडाने विचारलं. प्राण्यांनी घुबडाला विनाकारण जो त्रास दिला; त्याचा हा राग होता. गडबडगुंडी नम्रपणे म्हणाली, ‘घुबडकाका, रागावू नका. आम्ही फक्त तुमच्याशी ओळख व्हावी म्हणून आलोय….’

हे ऐकल्यावर घुबडाला नवल वाटलं. ते घुबडकाका म्हणाले, ‘मी अशुभ आहे. मी संकट आणतो हे तुम्हाला माहीत नाही वाटतं?’

‘खोटं आहे ते. दगड उगाळून कसं आजारी पाडता येईल? प्रत्येक गोष्टीला कारण असतं. रोजजंतूंमुळे आजार होतो. शापाचा काय संबंध?’ चकोर बोलून गेला. हे ऐकून घुबडाच्या चेहर्‍यावर आनंद दिसू लागला. ते म्हणालं, ‘तुम्ही शिकता. त्यामुळे तुम्हाला समजतं. असेच शिकून मोठे व्हा. जंगलातले गैरसमज दूर करा. तुझं नाव काय गं खारी?’

‘मी गडबडगुंडी. थोडक्यात ‘गुंडी.’

‘हा माझा दोस्त चकोर. काका, आम्ही अधूनमधून तुमच्याकडे येऊ का? चालेल ना?’

घुबड म्हणालं, ‘का नाही, चालणार? पण तुमच्या घरी चालेल का?’

चकोर त्यावर बोलला, ‘आम्ही घरच्यांना नीट समजावून सांगू की, घुबडकाकांपासून काहीच धोका नाही. ‘शुभाशुभ’ काही नसतं. प्राणी म्हणजे प्राणी. जो तो पोटासाठी धडपडतो. हा शुभ, तो अशुभ याला काही आधार नाही. ती रानाचे मणी कोकमकोंबड्याचं तोंड बघून मग उडायला जायची का? तर म्हणे कोकमकोंबडा शुभ! तरी घारीने चिमणीची शिकार केलीच. मग कुठे गेलं शुभाशुभ?’

चकोराची व गुंडीची बुद्धी पाहून घुबडाला खूप बरं वाटलं. इतकं समाधान त्याला कधीही मिळालं नव्हतं. कुरूप दिसणार्‍या घुबडाला नेहमी मिळाली ती हेटाळणी, तिरस्कार! रूप काही आपल्या हातात असतं का? कावळा कुठे सुंदर होता? मग घुबडावरच का अन्याय? हे प्रश्न प्राण्यांना पडत नव्हते. कारण ते विचार करत नव्हते. ‘विचार तर कराल,’ असं त्यांना कुणी शिकवलं नव्हतं.

हळूहळू ‘गुंडी’ एकटी घुबडकाकांकडे जाऊ लागली. ती म्हणाली, ‘काका तुम्ही हळूहळू दिवसाही बाहेर फिरायला लागा.’ रोज रात्रभर जागरण चांगलं नाही. माणसाची मुलंसुद्धा सणांच्या वेळी जागरण करतात आणि दुसर्‍या दिवशी शाळा, अभ्यास बुडवतात.’

घुबड म्हणालं, ‘अगं, अशी माझी काळजी कुणीच कधी घेतली नाही. मी वाईट, मी चेटूक करणारा, मी जादूटोणावाला असं एकदा ठरवल्यावर माझं हवं-नको कोण बघणार? बरं, दुसर्‍या जातीची ‘घुगी’ माझ्याशी लग्न करायला तयार नाही. पांढरं घुबड मी एकच आहे!’

मुलांनो, जे एकेकटे सजीव आहेत, त्यांचीही काळजी घ्यायला हवी. गुंडीने तेच केलं. ती नेहमी घुबडकाकांना भेटायला, गप्पा करायला येऊ लागली.

काही दिवसांनंतर परीक्षा होऊन खारकुंड्यांच्या शाळेचा निकाल जाहीर झाला. गडबडगुंडी इतकी मस्तीखोर असूनही तिचा अख्ख्या शाळेत पहिला क्रमांक आला! शाळेत तिचा सत्कार होता. बहुतेक छोटे प्राणी आले होते. सत्काराला उत्तर देताना गुंडीने ‘संधी’ साधली. फार सुरेख भाषण केलं. ती म्हणाली, ‘आदरणीय गुरुजन आणि उपस्थित श्रोतेहो, शिक्षण किंवा ज्ञान म्हणजे काय? तर खर्‍या गोष्टी जाणून घेणं. कारणं शोधणं. अज्ञान, गैरसमजुती टाकून देणं. त्यासाठी शाळेत जायचं असतं. आमच्या खारोटीताई आम्हाला छानच शिकवतात, पण शाळेबाहेर मोठं जग आहे. तिथं आपल्या आपण अनेक गोष्टी शिकायच्या असतात. काही ‘नर’ झाडं फळं देत नाहीत, तरी मी त्यांच्याशी चांगलंच वागते.’ फळ देतो तोच चांगला मानणं हा स्वार्थ आहे. ज्यांच्यापासून फायदा नाही, त्यांनाही आपण प्रेमाने वागवलं पाहिजे. भीती मनात असेल तर आपण सत्य शोधून काढू शकत नाही. घाबरून आपण दूर पळतो किंवा लपतो. तुम्ही सगळे पांढर्‍या घुबडाला घाबरता; पण मी आणि माझा दोस्त चकोर नेहमी काकांकडे जातो, हे मी आत्ता जाहीर करतेय! काही वाईट झालं का आमचं? आम्ही दोघेही खाऊनपिऊन मजेत आहोत; शिवाय, शाळेत पहिला नंबर काढतो. माझी सगळ्या ‘मोठ्या मंडळीना पाय जोडून विनंती आहे की, घुबडकाकांना आपल्यात घ्या.’ काही वाईट करणार नाहीत ते. टिटवीमावशीला तुम्ही इथून ‘अशुभ-अशुभ’ करत पळवून लावलंत, तेव्हा आम्ही जरा लहान होतो. आता घुबडकाकांना उगाच त्रास देताय. माझं तुम्ही ऐकाल अशी मी आशा बाळगते. माझा सत्कार केलात याबद्दल आनंद व्यक्त करून आभार मानते!’

गुंडीचं भाषण इतकं मस्त झालं की, प्राण्या-पक्ष्यांसाठी ‘पोटॅटो रेडिओ’ चॅनल चालवणार्‍या साळूमामीने ते मुद्दाम रेडिओवरून सार्‍या रानाला ऐकवलं. घुबडानंही ते ऐकलं. त्याचे डोळे आनंदाने भरून आले! कुणीतरी आपलं आहे, कुणीतरी अज्ञानाच्या विरोधात बोलतंय, याचा आनंद खूप मोठा असतो मित्रांनो!

प्राणीही विचार करू लागले. पक्षी चर्चा करू लागले. आपली चूक त्यांना कळून चुकली. चातक पक्षी आजारी पडला होता तो गढूळ, खराब पाणी प्यायल्यामुळे; घुबडाच्या जादूटोण्यामुळे नाही. घुबड कशाला चातकावर ‘करणी’ करणार? एक तर तो परदेशी पक्षी. घुबड कशासाठी त्याला आजारी पाडणार? उलट त्याचा आवाज पावसाळ्याच्या सुरुवातीला घुबडालाही आनंद देत असे.

गुंडीच्या प्रयत्नांमुळे घुबडाला प्राण्यांनी सभेसाठी बोलावलं. कावळा गैरहजर राहिला; पण त्या दुष्टाला कुणी महत्त्वच दिलं नाही. कदाचित, तो घुबडाच्या पांढर्‍या रंगाचा राग करत असेल. घुबड धोकादायक नाही, हे चकोरानेही ठासून सांगितलं. वटवाघळसुद्धा मग पुढे येऊन घुबडाच्या बाजूने बोललं. घुबडांबद्दलची भीती संपली. त्याच्या घरी येणं-जाणं सुरू झालं. बहिष्कार संपला. हुशार गुंडी जिंकली! ग्रेट ना?

लेखक माधव गवाणकर

संपर्क – मोबा.9145924053