विविध नावांनी ओळखल्या जाणार्या फसव्या विज्ञानाचे स्वरुप चक्रावून टाकणारे आहे. कुणी याला छद्म विज्ञान म्हणतात, तर कुणी असत् विज्ञान; तर कुणी नकली विज्ञान तर कुणी भ्रामक विज्ञान. जगात अत्रतत्र सर्वत्र पसरलेल्या या ऑक्टोपसचे प्रताप केवळ भयचकित करणारे नाहीत तर अनेकांच्या मृत्यूला, दु:खाला, शोषणाला आणि नुकसानीला कारण ठरले आहेत.
फसव्या विज्ञानाचा पसारा जितका विविध ठिकाणी, तसे त्याचे प्रकारही विभिन्न स्वरुपाचे आहेत. ज्योतिषाचे विविध प्रकार, वास्तुशास्त्र, चुंबक चिकित्सा, रेकी, निसर्ग उपचार, अॅक्युपंक्चर, हर्बल औषधे… ही यादी कदाचित न संपणारी ठरेल. या खोट्या विज्ञानाचा धुमाकूळ ज्या क्षेत्रात नाही असं क्षेत्र सापडणार नाही. राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, अर्थकारण अशा सर्व क्षेत्रात भ्रामक विज्ञानाने आपले हातपाय खोलवर पसरले आहेत. आरोग्य क्षेत्रातील विज्ञान अनेकांच्या मृत्यूला कारण ठरलंय. राजकीय क्षेत्रात कोट्यवधी डॉलर्सचं नुकसान या भ्रामक विज्ञानानं झालंय. कित्येकांनी आपले मूल्यवान अवयव चुकीच्या वैज्ञानिक उपचारांनी गमावले आहेत. कित्येक जण आपली मन:शांती हरवून बसले आहेत तर कित्येकांना अकारण तुरुंगवास घडलाय.
अमेरिकेतील एका सर्वेक्षणाचा तपशील इंटरनेटवर उपलब्ध आहे. आत्तापावेतो तीन लाख अडुसष्ठ हजार नागरिक छद्मविज्ञानाचा उपचार घेतल्याने मृत्यू पावले आहेत; तर तीन लाख सहा हजार लोकांना दुखापती झाल्या आहेत. छद्मविज्ञानासाठी दोन अब्ज ऐंशी कोटी डॉलर्स (अमेरिकन नागरिकांचे) पाण्यात गेले.
याबाबत आपल्या देशात काय घडलं याचा सर्व्हे घ्यायला हवा.
पु. ल. देशपांडे यांच्या ‘असा मी असामी’ या नाटकाचा नायक आपल्या मुलाला सांगतो, ‘शंकर्या! कुंभार हो! जगात गाढवाला तोटा नाही!’ छद्मविज्ञानाची जाळी लटकावून बसलेल्या कुंभारांना फसणारी गाढवं गरीब, अशिक्षित फारच कमी संख्येने असतील. मात्र पैसेवाली, तथाकथित सुशिक्षित, शहाणी म्हणवणारी धनवान गाढवं आणि त्यांना हाकणारे तसलेच विद्वान चतुर, चलाख कुंभार यांच्यामधील बनवाबनवीचा मामला म्हणजे ‘फसवे विज्ञान’.
फसव्या विज्ञानाच्या स्तीमित करून सोडणार्या काही घटना समजून घेतल्या तर आपण अशा फसवणुकीपासून सावध होऊ.
कुटुंबाची आत्महत्या
पुणे येथील समर्थ वंदन सोसायटी (धायरी-नर्हे रोड) मध्ये राहाणारे अरुण पालकर. व्यवसायाने इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. ज्योतिषाचे वेड असलेल्या पालकरांना त्यांच्या कुंडलीत शनि-मंगळ युतीचे निदान झाले. यामुळेच संकटे वाढलीत म्हणून पालकरांनी आपली मुलं ओंकार आणि ओमप्रकाश; तसेच पत्नी अनिता यांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्यांचे जीवन संपविले. त्यांनी स्वत:ही या गोळ्या घेतल्या.
या आत्महत्येबाबत पालकरनी 6 पत्रे लिहून ठेवलीत. त्यापैकी आईला उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलंय,
‘शनि आणि मंगळ’ यांच्या युतीमुळे माझ्या आयुष्यात संकटे येण्यास सुरुवात झाली. याचा परिणाम माझ्या मुलांवर आणि व्यवसायावर होऊ लागला. मी आईजवळ माझ्या लग्नासाठी नकार दिला होता. पण तिने ऐकले नाही.’
शनि आणि मंगळ. आपापल्या कक्षात विशिष्ट गतीने प्रचंड अंतरावरून सूर्याभोवती फिरणारे दोन निर्जीव गोळे. ना त्यांना मेंदू, ना हृदय. इतक्या दूरवरून एका कुटुंबावर संकटे आणण्याचे त्यांना काय कारण? दोन बालकांचा आणि त्यांच्या आईचा जीव घेणारे हे ज्योतिष एक छद्मविज्ञान आहे.
ज्योतिष केवळ व्यक्तिगत पातळीवर जीवितहानी करते असे नाही, ते व्यापक प्रमाणात सामाजिक नुकसान करू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, आलंग (गुजरात) येथील घटना.
एका ज्योतिषाला वाहिलेल्या मासिकाच्या एप्रिल 1999 च्या अंकात बातमी छापली होती. मे मध्ये ग्रहांच्या युतीमुळे मोठे वादळ होणार आलंग (Alang) या सौराष्ट्रमधील (गुजरात) बंदरात या बातमीने मोठा हाहा:कार उडाला. जहाज सुटं करण्याचं काम जेथे होते त्या शिपयार्डमध्ये 60,000 कामगार काम सोडून गेले (8 मे 99). यामुळे जहाज सुटं करण्याचे काम थांबून अंदाजे 35 दशलक्ष डॉलर्सचा व्यवसाय बुडाला.
खगोल वैज्ञानिकांनी अशा प्रकारची युती भूतकाळात 14 वेळा झाली असल्याचे सांगितले. त्या त्या वेळी कोणतीही भीषण निसर्गघटना घडली नाही. असे प्रसिद्धीस देऊनही उपयोग झाला नाही. सार्वजनिक भीतीची लहर निर्माण करणारी अशी ही ग्रहांची युती.
या झाल्या भारतीय भूमीवरील घटना. पण ज्योतिषांच्या तावडीतून जगातील कोणतेच राष्ट्र सुटलेले नाही. इ.स.1523 साली युरोपमधील ज्योतिषांनी जगाचा अंत करणारा मोठा प्रलय होईल, असं भाकित केलं. या प्रलयाची सुरुवात लंडनमध्ये होईल, असा ज्योतिषाचा निष्कर्ष होता. या भविष्यवाणीने लंडनमध्ये खळबळ माजून, सुमारे 20,000 नागरिकांनी आपली घरे सोडली. एका ख्रिस्ती मठाधिपतीने प्रलयापासून वाचण्यासाठी मोठा किल्ला बांधून त्यात दोन महिन्याच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली. पण प्रलय घडलाच नाही.
संबंधित ज्योतिषाने त्याची आकडेमोड एक वर्षाने चुकली असे घोषित करून 1 फेबु्रवारी 1525 ही नवी तारीख जाहीर केली. या दिवशी पण लंडन कोरडे ठणठणीत राहिले.
ही जलप्रलयाची बातमी सबंध युरोपमध्ये वार्याप्रमाणे पसरली. निकोलस मेरी या भविष्यवेत्त्याने सर्व प्रमुख ग्रहांची युती मीन राशीत होईल आणि ती वेळ 7 फेबु्रवारी 1524 रोजी असेल असं जाहीर केलं.
जोहान्स स्टेफलर या आणखी एका ज्योतिषाने प्रलयाची तारीख 20 फेबु्रवारी असेल असं जाहीर केलं. या जोहान्सवर लोकांचा प्रचंड विश्वास होता. पत्रके वाटली गेली. काहींनी होड्या बांधल्या. व्हान होम या जर्मन उमरावाने तीन मजली बोट बांधली. फ्रेंच बादशहाने पण प्रचंड बोट बांधली. सगळ्या युरोपमध्ये हाहा:कार माजला. लोकांनी घरे सोडली आणि बंदरात नांगरलेल्या बोटीवर निवारा घ्यायला सुरुवात केली. भाकित केलेल्या तारखेला व्हानच्या होडीजवळ फक्त हलका पाऊस पडला. चिडलेल्या लोकांनी त्याच्या बोटीवर तुफान दगडफेक केली. त्यात व्हान ठार झाला. चेंगराचेंगरीत शेकडो लोक ठार झाले.
आपल्या महाराष्ट्रातील एका तथाकथित महाराजाने 1999 साली जगात महायुद्ध होईल आणि ज्यांच्या गळ्यात या महाराजाचा बिल्ला असेल तेच लोक वाचतील, अशी भविष्यवाणी केली होती. हेही भविष्य सपशेल खोटे ठरून महाराज उताणा पडला. त्याला खरं तर शिक्षा व्हायला हवी होती. पण उलट लोकांनी त्याला संतपदावर बसविले. याला काय म्हणायचं ते तुम्हीच ठरवा.
जन्मल्यानंतर ज्योतिषी माणसाच्या पाठीमागे जसं हात धुऊन लागतात तसंच जन्मापूर्वी सुद्धा भ्रूणहत्येला ज्योतिष कारण ठरले आहे. 13 मे 1991 च्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकन दैनिकात एक बातमी प्रसिद्ध झाली होती. लिन सन हा चीनमधील बीजिंगचा फॉरीन सर्व्हिस रिपोर्टर याने दिलेली ही बातमी आहे. चीनमध्ये ज्योतिषशास्त्रात ज्या राशी दिल्यात, त्यात वेगवेगळ्या प्राण्याची नावे दिली आहेत. आपल्याकडे जशी संक्रात प्रत्येकवर्षी वेगवेगळी रूपे घेऊन येते, तसेच चीनमध्ये प्रत्येक वर्ष विशिष्ट राशीच्या प्रभावाखाली असते, अशी चिन्याची समजूत असते.
Year of the Sheep म्हणजे Sheep राशीचे वर्ष. या वर्षात जन्माला येणारी मुलं दुर्दैवाची शिकार बनतात, अशी चिन्यांची गैरसमजूत आहे. लिनासनने केलेल्या पाहणीत चीनमधील लिआनजीन या शहरात मुलांचा जन्मदर 1991 या वर्षात पंचवीस टक्क्यांनी घसरला, तर गर्भपाताचा दर साठ टक्क्यांनी वाढला. याचं कारण म्हणजे 1991 हे वर्ष शीप(मेंढराचे) वर्ष होतं. गर्भातच खुडल्या गेलेल्या या कळ्यांचे कारण होतं, चिन्याचा ज्योतिषशास्त्र या फसव्या विज्ञानावरील अंधविश्वास.
माणूस अज्ञान किती सहजपणे स्वीकारतो, याचं आश्चर्य वाटतं. विज्ञानानं जग जवळ येत आहे. परिणामी विविध देशांमध्ये वस्तूंची जशी आयात निर्यात वाढली, तशी ज्ञानाची पण देवघेव वाढू लागली. पण ज्ञानाबरोबर अज्ञानाचाही बाजार वाढलेला दिसतो. फेंगशुई नावाचे भ्रामक वास्तुशास्त्र आणि अॅक्युपंक्चर नामक छद्मविज्ञान आपण चिन्याकडून घेतलंय.
ज्योतिषाच्या खालोखाल फेंगशुई आणि वास्तुशास्त्र यांचा धुमाकूळ भारतातील शहरी तथाकथित शहाण्या मंडळींमध्ये वाढत चालला आहे. इतर देशही याला अपवाद नाहीत.
लो क्यूंग हा मलेशियातील गृहस्थ. तो आणि त्याचा शेजारी दोघांचाही फेंगशुईवर विश्वास. पण त्यांच्यात सख्य नव्हते. लो याने त्याचा शेजारी वाईट शक्ती आपल्याकडे पाठवितोय, असा संशय घेऊन, त्या शक्तीला परतविण्यासाठी आपल्या घरावर आरसा लावला. शेजार्यानेही मग आपल्या घरावर आरसा लावला. मग दोघात वाद झाला. दोघेही रस्त्यावर उतरले. शेजार्याने लो याला भोकसले. त्यात तो मृत्यू पावला. ही घटना आहे 21 नोव्हेंबर 2004 ची.
एके दिवशी ‘अंनिवा’च्या कार्यालयात एक गृहस्थ मला भेटायला आले. त्यांच्या मुलाचा सांगली औद्योगिक क्षेत्रात कारखाना होता. तो नीट चालेना. उपाय म्हणून संबंधित गृहस्थाच्या मुलाने बेळगाववरून एका वास्तुशास्त्र्याला पाचारण केले. त्याने सांगितले तुमच्या सांगलीतील निवासामध्ये वाईट शक्तीचा संचार आहे. हे घर ताबडतोब खाली करा. संबंधित गृहस्थ आमचे मासिकातील वास्तुशास्त्राच्या फोलपणावरील लेख वाचून मला सल्ला विचारायला आले होते. वाईट शक्ती ही आपली मनातील भीती आहे. कारखाना न चालण्याचे खरे ते कारण शोधा, सापडेल असा सल्ला मी दिला. दुसर्या दिवशी फोनवरून मी चौकशी केली तर या गृहस्थाचा सल्ला धुडकावून मुलाने आपले सांगलीतील निवास विकण्याची पावले उचलली होती.
न्यूमरॉलॉजी म्हणजे अंकज्योतिष. म्यानमार म्हणजे ब्रम्हदेशची अर्थव्यवस्था कोसळण्यास अंकज्योतिष कारण ठरले होते. त्याचा हा किस्सा-
जनरल ने विन हा म्यानमारचा लष्करी हुकूमशहा असतानाची ही घटना आहे. एका अंकज्योतिषाने ने विन याला 9 नंबर भाग्यवान असल्याचे सांगितले. त्याच्या भोवताली 9 या अंकाचे आणि त्यावरून असलेल्या संख्यांचे बळ असेल तर तो 90 वर्षे जगेल असे भविष्य या अंकज्योतिषाने केले. जनरल ने विनने 9 च्या पटीत असणार्या चलनी नोटा प्रचारात आणल्या. परिणामी अर्थव्यवस्थेत मोठा गोंधळ उडून विनच्या विरोधात बंडाळी माजली. वर्षभरात त्याला सत्ताच्यूत करण्यात आले. भाकितांच्या वेडापायी भुलावण करणारी अशी विविध फसवी विज्ञाने व्यक्ती आणि समाज यांच्या नुकसानीला कशी कारण ठरतात, याच्या काही ठळक घटना आपण तपासल्या. पण अतिशय हानिकारक फसव्या विज्ञानाचे प्रकार म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घाला घालणारी फसवी विज्ञाने.
अभिनेत्री हंटर आणि अभिनेता टायलो यांचा मायकेल टायलो हा मुलगा. याला अधूनमधून मेंदूविकाराचे झटके येत. आधुनिक उपचार सोडून त्याच्यावर अॅक्युपंक्चरचे उपचार केले गेले. पण फरक पडला नाही. एके दिवशी पोहत असताना त्याला मेंदूचा झटका आला आणि त्यात तो बुडून मेला. त्याच्या आईने वियोग सहन न झाल्याने आत्महत्या केली.
इस्ट ससेक्स(इंग्लंड) मधील 41 वर्षे वयाची सरा पार्किन्सन ही अभिनेत्री. तिला स्तनाचा कर्क रोग झाला. केमोथेरपीला नकार देऊन तिने अॅक्युपंक्चर, आध्यात्मिक साधना आणि होमिओपॅथी यांचे उपचार घेतले. ते कुचकामी ठरल्याने तिचा मृत्यू झाला.
डेव्हिड हा अमेरिकन नागरिक. त्याला ल्युकोमिया (रक्ताचा कॅन्सर) आजार झाला. तो इतरांबरोबर डॉ.दीपक चोप्रा यांचेकडून ल्युकेमियावर उपचार घेत होता. त्याचा ल्युकेमिया पूर्ण बरा झाला असं उपचार करणार्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले. पण त्यानंतर चारच महिन्यात त्याचा मृत्यू झाला या संदर्भात 1995 मध्ये कोर्टात खटला दाखल केला गेला.
वेगवेगळ्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींवर (सेलीब्रिटी) यशस्वी उपचार करणारा म्हणून लंडनमधील एक निसर्ग उपचारतज्ज्ञ प्रसिद्ध होता. राज भतीजा या 69 वर्षे वयाच्या लंडनस्थित सेलिब्रिटीने या डॉक्टरकडून उपचार घेतले. आहारातील पथ्य आणि मसाज उपचार केले गेले. पण काहीही गुण आला नाही. शेवटी त्याचे दोन्ही पाय कापून काढावे लागले. राज भतीजा या डॉक्टरवर खटला दाखल केला.
निसर्गोपचाराचे प्रयोग मानसिक आजारावर पण केले जातात. परिणामी अनेकजणांचे मानसिक स्वास्थ्य अधिकच बिघडू शकते. एका निसर्गोपचार डॉक्टरने जेन रो या ऑस्ट्रेलियन बाईवर तिचा चिंता रोग (Anxaiety) बरा व्हावा म्हणून उपचार केले. तिचा आजार हटला नाहीच पण उलट तिचा अशक्तपणा वाढला तिला उलट्या होऊ लागल्या आणि कावीळ झाली. नंतर आधुनिक उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तेव्हा उशीर झाला होता. तिचे लिव्हर बदलले गेले. तरी पण ती वाचू शकली नाही. अखेरीस जुलै 2002 मध्ये तिचा मृत्यू झाला.
पेशंटचे मानसिक सामर्थ्य वाढविण्याच्या प्रयोगाबरोबरच डॉक्टरच्या तथाकथित मानसिक सामर्थ्याने शस्त्रक्रिया करण्याचे ढोंग करणारेसुद्धा आढळून आलेत. फिलिपाईन्समधून मन:शक्तीने शस्त्रक्रिया करणारा (सायकिक सर्जन) कॅनडात आला होता. तो तेथे हॉटेलमध्ये उतरला आणि शस्त्राविना शस्त्रक्रिया करण्याची बुवाबाजी करू लागला. त्याने एकूण 600 पेशंटस् तपासले. प्रत्येकाकडून 135 डॉलर्स उकळले. त्याचे ढोंग उघडकीस आल्यावर कॅनडा पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. (15 जून 2015).
मन:सामर्थ्याच्या क्षेत्रात भावातीत ध्यान नावाचे फसवे विज्ञान अमेरिकेत जोरात पसरलंय. याचा प्रचारक आहे महर्षी महेश योगी. भावातीत ध्यानाच्या प्रयोगातून व्यक्तीला हवेत तरंगता येते, असा दावा भावातीत ध्यानवाले करत असतात. कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस शहरनिवासी हेनिंग हा प्रसिद्ध जादूगार. या महाभागाने भावातीत ध्यानाच्या वेडापायी आपली 11 वर्षे फुकट घालविली. त्याला कोणत्याही तंत्रकौशल्याशिवाय केवळ भावातीत ध्यानाच्या सामर्थ्याने हवेत तरंगायचे होते. हवेत तरंगण्याच्या प्रयोगासाठी जादूगार अनेक युक्त्या वापरतात. त्या सर्व युक्त्यांमध्ये भौतिक कौशल्य वापरले जाते. हेनिंगला हे टाळून केवळ मन:सामर्थ्याचा अचाट प्रयोग करायचा होता. हेनिंगची 11 वर्षांची धडपड यशस्वी झाली नाहीच. उलट तो यकृताच्या कॅन्सरने निधन पावला. कहर म्हणजे भावातीत ध्यानवाल्यांनी तो कर्करोग मुक्त झाल्याचे जाहीर केले होते.
मानसिक क्षेत्रात पूर्वस्मृती जाग्या करणे नावाचा छद्मविज्ञानाचा धोकादायक प्रकार रूढ आहे. अमेरिकेत मार्टीन कुटुंबीय पूर्वप्राथमिक शाळा चालवित होते. या कुटुंबातील सदस्य या शाळेच्या प्रशासनाचे व अध्यापनाचे काम करीत होते. त्यांच्यावर शाळेतील मुलांच्या लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला. याबाबतचे खटले 1983 ते 1987 या चार वर्षात कोर्टात दाखल झाले. 1987 ते 1990 या काळात या खटल्यांचा तपास आणि उलटतपासणी कोर्टात चालली. 1990 मध्ये या खटल्यांचा निकाल लागला. त्यात मार्टीन कुटुंबिय निर्दोष सुटले. या खटल्यात फसव्या विज्ञानाचा प्रभाव काय असतो, हे समजले. शाळेतील मुलांच्या पूर्वस्मृती संमोहन तंत्राने जागे करण्याच्या या प्रकाराला ’फॉल्स मेमरी सिंड्रोम’ असं नाव आहे. अशा स्मृती जागे करण्याला वैज्ञानिक काटेकोर निकषांचा आधार नाही. तरीसुद्धा मार्टीन कुटुंबिय जवळजवळ 8 वर्षे या भयानक खटल्यात अडकले होते.
आधुनिक अॅलोपॅथीक औषध प्रणालीबद्दल अपप्रचार करणारे छद्मविज्ञानवादी आम्ही पूर्वजांच्या शहाणपणाचा समाजाला कसा उपयोग करुन देतो, अशी दर्पोक्ती काढतात. आधुनिक औषधाचे दुष्परिणाम होतात, हाही एक त्यांचा प्रचाराचा हुकमी एक्का. काही आजार पूर्ण बरे होत नाहीत. ते नियंत्रित करता येतात. पण आमच्या औषधांनी पेशंट पूर्ण रोगमुक्त होतो, अशी बतावणी ही मंडळी करतात. आयुर्वेदाचा आणि हर्बल औषधाचा उपयोग हे खरं तर छद्मविज्ञानच आहे. या छद्मविज्ञानाची दुष्परिणामाची काही ठळक उदाहरणे पाहू या.
पेट्रा हॉल या 54 वर्षे वयाच्या मिशिगन (अमेरिका) मधील बाई. तिला ल्यूकेमिया झाला होता. एका वनौषधी वैद्याने पेट्रावर हर्बल टी चा उपचार केला. ज्या दिवशी हा उपचार झाला त्याच दिवशी दुपारी तिचे सर्व अवयव निकामी होत गेले. अकरा दिवसांनी ती मरण पावली. या वैद्यावर खटला होऊन त्याला दंड आणि 5 वर्षे व्यवसाय करण्याला बंदी अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
स्टव्ह बेकर हा फ्लोरिडा येथील प्रसिद्ध खेळाडू. याला वजन कमी करायचं होतं. त्याने चिनी हर्बल औषध एफिड्रा (Ephidra) चा वापर केला. उन्हात व्यायाम करताना त्याचे सर्व अवयव लुळे पडले आणि तो कोसळून गतप्राण झाला. अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने एफिड्रावर कायमची बंदी घातली.
64 वर्षे वयाच्या स्कॉटलंडमधील नॉर्मन फेरी या गृहस्थाला संधिवात होता. त्याने ग्लुको समाईन (Gluco Samine) या हर्बल औषधाचा वेदनाशामक म्हणून वापर केला. केवळ दोनच महिन्यांनी त्याला अॅलर्जीची प्रतिक्रिया येऊन मृत्यू आला.
होलिस्टीक मेडिसीन नामक एक छद्मविज्ञान आहे. मार्टीन ल्यूथर किंग या प्रसिद्ध समाजसुधारकाची पत्नी कोरीटा किंग होलिस्टीक मेडिसीनला बळी पडली. मानवी हक्क चळवळीतील मार्टीनबरोबर लढणारी ही कार्यकर्ती होती. तिला ओव्हरीचा कर्करोग झाला होता. मेक्सिकोमधील होलिस्टीक मेडिसीन केंद्रात तिच्यावर उपचार केला गेला. यातून गुंतागुंत होऊन तिचा मृत्यू झाला.
pseudoscience what is harm? या वेबसाईटवर होमिओपॅथी या छद्मविज्ञानाला बळी पडलेल्या 437 लोकांचा उल्लेख आहे. महेंद्र गुंडेवार हा भारतीय गृहस्थ त्यापैकी एक. गुंडेवार हा स्वत: होमिओपॅथी डॉक्टर. त्याने एक टॉनिक बाजारात आणले. याचा उपयोग अशक्तपणा घालविण्यासाठी केला गेला. या औषधाच्या वापराने स्वत: डॉक्टर आणि इतर काही जण मरण पावले, तर काहींना आंधळेपण आले.
छद्मविज्ञानाचे सर्वात भयानक रूप म्हणजे एका विशिष्ट जनसमुदायाचा सर्वनाश. हिटलरने ज्यूंची केलेली वंशहत्या हा फसव्या विज्ञानाचा परिणाम आहे. ‘न्युजेनिक्स आणि सोशल डार्विनीझम’ या फसव्या वैज्ञानिक कल्पनांच्या प्रभावाखाली हिटलरने अतिशय पद्धतशीरपणे 60 लाख ज्यूंची हत्या घडवून आणली. 1933 ला सुरू झालेले हे हत्यासत्र 1945 ला हिटलर पराभूत झाल्यावर थांबले. 1945 पर्यंत प्रत्येक तीन ज्यूमागे दोघांची हत्या घडविली गेली.
युजेनिक्स या छद्मविज्ञानाचा पद्धतशीर प्रभाव हिटलरने जर्मन समाजावर पाडला. ज्यू वंश ज्या जीन्सपासून उत्क्रांत झालाय ते समूळ नष्ट केले पाहिजेत. जर्मन आर्य लोक हेच सर्वश्रेष्ठ (Master Race) आहेत आणि इतर सर्व नष्ट करण्याच्या लायकीचे आहेत. यातून ज्यू आणि इतरांची जी नृट्रांस हत्या झाली, त्याचा आधार होता जातीची श्रेष्ठता हे छद्मविज्ञान.
माणसांच्या विज्ञानाबाबतच्या गैरसमजुतीतून प्राणी सृष्टीवरही आक्रमण होत आहे. आफ्रिका आणि आशिया खंडातील गेंडा हा प्राणी एका छद्मविज्ञानाची शिकार बनला आहे. गेंड्याच्या शिंगाची पावडर ताप उतरवते आणि डोकेदुखी थांबवते; तसेच तिच्यामुळे लैंगिक सामर्थ्य वाढते असं हे फसवे विज्ञान गेंड्याच्या मुळावर उठलंय. या अज्ञानामुळे गेली कित्येक वर्षे गेंड्याची हत्या होते आणि आता तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
अस्वल हा प्राणी शाकाहारी आणि मांसाहारी पण आहे. अस्वल सहसा आजारी पडत नाही याचे कारण त्याचे जठर रोगांचा प्रतिकार करणारे आहे, अशी फसवी समजूत आहे. यातूनच माणसांच्या पोटाच्या विकारावर अस्वलाचे जठराचे मांस प्रभावी आहे, या अज्ञानापायी अस्वलाची जगभर मोठ्या प्रमाणात हत्या होत आहे. जगाच्या विविध भागातून कोरियामध्ये अस्वलाच्या जठराचे मांस आयात केले जाते.
तैवान बेटावरील लोकांची अशी समजूत आहे की, हिरव्या पाठीच्या विशिष्ट कासवाचे मांस कॅन्सर बरा करते. परिणामी चीनमधून अशी कासवे तैवानला रवाना होऊ लागली. ही कासवाची जात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सील माशाचा लैंगिक अवयव माणसाचे लैंगिक सामर्थ्य वाढवतो या फसव्या विज्ञानाच्या प्रभावातून सीलची शिकार बेसुमारपणे वाढली आहे.
महाराष्ट्रात मांडूळ जातीचा साप आढळतो. त्याचे शेपूट निमुळते नसते तर तोंडाच्या बाजूप्रमाणेच जाड असते. त्यामुळे मांडुळाला दोन तोंडे असतात, असं चुकीचं विज्ञान लोकांमध्ये पसरलं आहे. हा साप मातीत अंग खुपसून खोलवर पडून राहातो. यातून मांडूळ गुप्तधन शोधून देतो अशा अफवा प्रसारीत झाल्या. अशी मांडुळे पकडून दोन ते पाच लाख रूपयांना विकणार्या टोळ्या पोलिसांनी पकडल्या आहेत.
आतापर्यंतच्या अज्ञानमूलक विज्ञानाने काय काय घडू शकतं, हे वाचून तुमचं डोकं एव्हाना गरगरायला लागलं असेल. सोळाव्या-सतराव्या शतकात विज्ञानाचा गॅलिलिओ आणि न्यूटन यांनी पाया घातला. त्यांनी विज्ञानाची पद्धती विकसित केली. त्यातून पुढे विज्ञान क्रांती अवतरली. निसर्गाचे खरं स्वरूप आपणाला आकलन होऊ लागलं. भौतिक जगाचे नियम समजल्याने जग समृद्ध बनलं. विज्ञानाचे हे सामर्थ्य लक्षात घेऊन जगात सर्वत्र विज्ञानाचे शिक्षण देणारी विद्यापीठे आकारला आली. पण विज्ञान प्रभावी ठरतंय हे चाणाक्षांनी हेरलं आणि आपल्या फसवणुकीच्या तंत्रात त्यांनी विज्ञानाचा अविवेकी वापर सुरू केला, हे कसं घडलं ते क्रमवार दरमहा या सदरातून समजून घेऊ या.
-प्रा. प. रा. आर्डे