Categories
चिकित्सा

जपानमधील सनातन पंथ – ओम शिन री क्यो

वार्षिकांक - २०१५

(या सत्यकथेतील संस्था, घटना वा विचार यांचे भारतातील तशा गोष्टींशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजू नये.)

ओम शिन री क्योने हल्ला केलेले एक स्थानक. ‘ओम’ शब्द उच्चारताच आपल्याला कसे पवित्र, दिव्य, उदात्त, वाटते; कारण आपल्या सर्व धार्मिक वा आध्यात्मिक ग्रंथ, पोथ्या, स्तोत्रे, प्रार्थना, यांची सुरुवात ‘ओम’ या एकाक्षरी मंत्राने होते. पण आज मी हकिगत सांगणार आहे ती आहे जपानमधील एका कयामतवादी पंथाची; ज्यामध्ये मांगल्य, पावित्र्य, शांती असल्या कोठल्याही उदात्त भावनेचा लवलेशही नाही. यातील ‘ओम’ या शब्दावर भाळून आपल्यापैकी काही भाबडी मंडळी पाहा कसे जपानी सुद्धा आमच्या सनातनी मंत्रांना स्वीकारू लागले’ असे सांगत या पंथाच्या प्रेमात पडली होती. अर्थात, पुढे या संस्थेच्या मानवी हत्या घडवून आणणार्‍या कारवाया उघडकीला आल्यावर यांची बोलतीच बंद झाली. पण खरे तर ‘ओम’ हा शब्द या पंथाच्या संस्थापकाने हिंदू धर्माच्या अभ्यासातूनच उचलला होता. जरा या संस्थेचा बायोडेटा पाहूया.

1984 साली शोको असहारा या जपानी नागरिकाने या पंथाची सुरुवात केली. टोकियोच्या शिबुया विभागात त्याच्या वन बीएचके बिर्‍हाडात योग वर्ग या स्वरुपात ही सुरुवात झाली आणि या वर्गाचे नाव होते ‘ओम शिन सेन नो काई’; म्हणजे ‘देव व साधू यांचे ओम मंडळ’. या वर्गाचा झपाट्याने विस्तार होऊ लागला, इतका की 1989 मध्ये त्याचे एका धार्मिक संस्थेत अधिकृतपणे रुपांतर झाले. विशेष म्हणजे जपानच्या उत्तमोत्तम विद्यापीठातून बाहेर पडलेले पदवीधर इथे सभासद होते, त्यामुळेच त्याला ‘उच्चभ्रूंचा धर्म’ म्हटले जाई.

सुरुवातीपासून हा पंथ विवादास्पद मानला जात होता. तरी सुरुवातीला गुन्हेगारी स्वरुपाची कृत्ये हे लोक करत नसत. या काळात असहारा हा बायबलमध्ये सांगितलेल्या भाकितांनी झपाटला गेला होता, पण या संस्थेतर्फे प्रकशित होणार्‍या साहित्यासाठी त्याने माध्यम निवडले ते व्यंगचित्र मालिका आणि ऍनिमेटेड कार्टून्सचे. यात अंतरिक्ष मोहिमा, महाशक्तीशाली शस्त्रास्त्रे, जागतिक कट कारस्थाने आणि अंतिम सत्याचा शोध असे विषय हाताळलेले असत. संस्थेतर्फे अनेक मासिकेही प्रसिद्ध होत. वज्रायण सच्चा’ आणि ‘एंजॉय हॅपीनेस’, ही त्यातली दोन. याद्वारे मिशनरी पद्धतीने प्रचार केला जात असे.

आयझॅक असिमॉव्ह या प्रसिद्ध विज्ञान काल्पनिक लेखकाच्या ‘फौंडेशन ट्रायलॉजी’ या कादंबरीत, एक आध्यात्मिक मार्गावर प्रगती केलेला शास्त्रज्ञांचा गट – त्याला जंगली राज्यकर्त्यांचे पासून वाचण्याकरिता भूमिगत व्हावे लागणे – आणि पुन्हा प्रगट होऊन सुसंस्कृत समाज स्थापन करणे,’ या कथानकावर ओम चालक लट्टू झाले होते; आणि ते त्यांचे रोल मॉडेल होते. जुनाट धार्मिक कल्पना न मानणार्‍या सुशिक्षित आणि बुद्धिमान जपानी लोकांना आकर्षित करण्यासाठी ओम चालक ख्रिश्चन आणि बौद्ध धर्म कल्पनांचा वापर करत असत. वैयक्तिक आयुष्यात, असहारा आणि त्याचे जवळचे अनुयायी, साधेपणाने राहत असत. अपवाद फक्त एका भक्ताने दिलेली सशस्त्र मर्सिडिस गाडी.

‘ओम मुक्ती प्रकल्प’ या नावाने नवभक्तांची भरती केली जात असे; त्यात आजारावर इलाज, आरोग्य सुधारणे, आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी बुद्धिमत्ता वाढवणे, सकारात्मक विचार आणि फावला वेळ सत्कारणी लावणे, या करिता शिकवण दिली जाई. यासाठी आपण मूळ पाली भाषेतील सूत्रांचा अचूक अनुवाद वापरतो असा यांचा दावा असे. ‘मोक्षाची त्रिपुटी’ अशी याची भलावण केली जाई. साहजिकच ‘ओम’ हा अल्पावधीतच जपानमधील अतिवेगाने वाढणारा पंथ बनला. या पंथात धार्मिक शिकवण देण्यासाठी अतिशय कठोर पद्धती वापरल्या जात. कधी साधकांना उलटे टांगले जाई तर कधी त्यांना विजेचे झटके दिले जात. हे सर्व योगाचा भाग आहे, असे सांगितले जाई.

पंथ लवकरच वादाच्या भोवर्‍यात सापडला. आरोप होते – साधकांना फसवणे, इच्छेविरुद्ध डांबून ठेवणे, जबरदस्तीने देणग्या उकळणे, इ. 1989च्या फेब्रुवारी महिन्यात पंथ सोडून जाऊ पाहणार्‍या एका शिष्याचा खून करण्यात आला.

ऑक्टोबर 1989 मध्ये, अशा पंथाच्या विरुद्ध काम करणार्‍या सकामोतो या वकिलाने या गटाविरुद्ध खटला दाखल करण्याची तयारी केली. त्याच्याशी वाटाघाटी करण्याचा पंथाचा प्रयत्न निष्फळ ठरला. या वकिलाने दिलेली एक सनसनाटी मुलाखत एका टीव्ही वाहिनीने मुद्रित केली; पण या वाहिनीवाल्यांनी सर्व व्यावसायिक नीतिनियम गुंडाळून ठेवून ही मुलाखत गुपचूपपणे या पंथवाल्यांनाच दाखवली. त्यांनी प्रचंड दबाव आणून (की पैसा चारून?) हे प्रक्षेपण रद्द करायला लावले. या प्रकाराविरुद्ध वकील महाशयांनी काही आवाज उठवायचे आतच ते त्यांच्या योकोहामा येथील घरातून पत्नी आणि मुलासकट गायब झाले. पोलिसांना या रहस्याचा छडा लावता आला नाही. अन्य वकील मंडळींनी उघडपणे पंथाविरुद्ध संशय व्यक्त केला; पण व्यर्थ. अखेर 1995 मधे असे निष्पन्न झाले की या पंथाच्या अनुयायांनी या तिघांचाही खून करून त्यांची प्रेते कुठेतरी फेकून दिली होती. खंडणी गोळा करणे या प्रकारातही ‘ओम’चे लोक माहीर होते. त्यांनी चालवलेल्या रुग्णालयात रुग्ण प्रवेशित केला जाई आणि मग त्याचेकडून भरमसाट बिल वसूल केले जाई.

1990 मध्ये असहारा आणि त्याच्या 24 सहकार्‍यांनी प्रतिनिधिगृहाच्या निवडणुका लढवून सामान्य जनांचा आपल्याला पाठिंबा आहे, हे सिद्ध करायचा प्रयत्न केला. आपल्या पक्षाला त्यांनी ‘शिन रि क्यो’ ( अंतिम सत्य) हे नाव दिले. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. तरीही त्यांनी टी व्ही कार्यक्रमाद्वारे आपला पुन्हा प्रचार करण्यास सुरुवात केली; पण आता त्यांच्या कारवाया जास्त जास्त समाजविघातक होऊ लागल्या होत्या. 1992 साली त्यांनी ‘आदर्श राज्यपद्धतीची मूलतत्त्वे’ या नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध केले आणि जपान राष्ट्राच्या घटना आणि नागरी संस्था यांचेविरुद्ध पुकारलेला ‘हा आमचा लढा आहे’, असे जाहीर केले. या ग्रंथाचा कर्ता हायाकावा रशियाला वारंवार भेटी देऊ लागला आणि तेथून त्याने ए के 74 रायफली आणि एक सैनिकी हेलिकॉप्टर प्राप्त केले. त्याने अणुबॉम्ब बनवण्यासाठीचे सुटे भाग मिळवण्याचाही प्रयत्न केला होता, असेही मानले जाते.

ओम संस्थेच्या या उघडउघड मानवताविरोधी कारवायांना साहजिकच विवेकवादी जपानी संस्था, साहित्यिक, वृत्तपत्रे आणि सामान्य जनतेनेही विरोध दर्शवला. त्याला प्रतिक्रिया म्हणून या लोकांची नावे काळ्या यादीत टाकून त्यांना संपवण्याच्या योजना आखण्यात आल्या. ‘कोबायाशी हा व्यंगचित्रकार, डेव्ह स्पेक्टर हा टीव्ही समीक्षक यांनी ओम पंथाची खिल्ली उडवली’ या आरोपाखाली त्यांचीही नावे आपल्या ‘कर्माने मरणार्‍यांच्या’ यादीत टाकण्यात आली. 93 साली कोबायाशी याच्या हत्येचा प्रयत्नही झाला.

विवेकवादी नागरिकांची ओम शिन री क्यो विरुद्ध निदर्शने

93 सालच्या अखेरीस या पंथाने ‘सरीन’ या मज्जाघातक वायूची निर्मिती करण्यास सुरुवात केली. 1000 स्वयंचलित रायफली बनवण्याचाही त्यांचा प्रयत्न होता; पण ते केवळ एकच बनवू शकले. सरीन वायूच्या चाचण्या बंजावोर्न स्टेशन या पश्चिम ऑस्ट्रेलियातील या संस्थेच्या मालकीच्या एका दुर्गम चराऊ रानात घेण्यात आल्या, त्यात 29 मेंढ्या मरण पावल्या. त्यानंतरच्या वर्षात हा वायू आणि व्ही एक्स हा वायू अनेक हत्येमध्ये आणि हत्या प्रयत्नात वापरण्यात आला. ओम साधक सुचीया याने 150 ग्रॅम व्ही एक्स द्रव्य बनवले, त्याद्वारे 3 जणांचेवर हल्ला करण्यात आला. त्यातील 2 वाचले पण एक 28 वर्षांचा युवक मरण पावला. (व्ही एक्स द्रव्याचा परिणाम झालेली व व्यवस्थित नोंदी ठेवली गेलेली ही जगातील एकमेव केस समजली जाते.) खून झालेला इसम ओम पंथाविरुद्ध हेरगिरी करत असल्याचा असहारा याला संशय होता. ओसाका शहरातील रस्त्यावर सकाळी 7 वाजता हा हल्ला करण्यात आला. पण हल्ला झालेल्या इसमाने हल्लेखोरांचा 90 मीटर पाठलाग केला, मग मात्र तो कोसळला. सुरुवातीला हे विष साधे कीटकनाशक असावे असे डॉक्टरांना वाटले; पण नंतर त्यातील भयंकर रसायने उघडकीला आली. हल्ला झालेला इसम शुद्धीवर न येताच 10 दिवसांनी मरण पावला. मात्र सरीन वायूप्रमाणे या वायूचा उपयोग मोठ्या प्रमाणावर हत्या घडवून आणण्यासाठी पुढे केला गेला नाही.

या संस्थेच्या विरुद्ध काही मालमत्तेचे दावे न्यायालयात दाखल होते, त्याचे निकाल आपल्या विरुद्ध लागतील, असे वाटल्यामुळे ओम पंथियांनी या दाव्यांचे काम पाहणार्‍या न्यायाधिशांच्या घराबाहेर सरीन वायू सोडला. या हल्ल्यात आठ लोक मरण पावले आणि पाचशे बाधित झाले. मात्र पोलिसांनी एका स्थानिक निरपराध माणसावर तपासणीचा रोख ठेवल्यामुळे ही ओम पंथाची कारवाई होती, हे पोलिसांच्या त्यावेळी लक्षात आले नाही.

फेब्रुवारी 95 मध्ये या पंथाच्या अनुयायांनी कारीया या एका 69 वर्षांच्या माणसाचे टोकियोच्या रस्त्यातून अपहरण केले. त्याचा अपराध काय होता, तर ओम आश्रमात असणारी त्याची बहीण तेथून पळून गेली होती. तिचा ठावठिकाणा सांग; अन्यथा…’ असे धमकीचे फोन त्याला अनेक दिवस येत होते. अपहरण केल्यावर त्याला दूर फुजी पर्वताच्या परिसरात नेऊन त्याचा खात्मा करण्यात आला, त्याला एका मायक्रोवेव्ह भट्टीत जाळण्यात आले आणि त्याचे अवशेष कावागुची तलावात फेकून देण्यात आले. मी बेपत्ता झालो तर ओम शिन रि क्योने माझे अपहरण केले आहे असे समजावे’, असे या माणसाने लिहून ठेवले होते.

परिणामतः ओम पंथाच्या सर्व केंद्रांवर एकाचवेळी छापा घालण्याचे पोलिसांनी ठरवले. ही बातमी (पोलीस खात्यातही ओम पंथाची माणसे पेरलेली असल्यामुळे) असहारापर्यंत पोचली. त्याने पोलिसांना धडा शिकवणे आणि त्यांचे लक्ष अन्यत्र वळवणे या दुहेरी उद्देशाने रचला, भयानक असा टोकियो भूमिगत रेल्वे हल्ला.

20 मार्च 1995 या दिवशी ओम साधकांनी टोकियो शहरातील भूमिगत रेल्वेमध्ये एकाच वेळी पाच गाड्यात विषारी वायू हल्ला चढवला. यात 13 प्रवासी मरण पावले, 54 गंभीर आजारी झाले आणि 980 बाधित झाले. असे सांगतात की बाधितांची संख्या हजारो असावी. कारण अनेक जण घाबरून पुढे यायलाच तयार नव्हते. या हल्ल्यांचा उलटाच परिणाम झाला आणि पोलिसांनी तात्काळ संपूर्ण देशातील ओम केंद्रावर धाडी घातल्या.

पुढच्याच आठवड्यात ओम पंथियांचे संपूर्ण खरे स्वरूप उघडकीला आले. फुजी पर्वताच्या पायथ्याशी असणार्‍या त्यांच्या कमिकुइशिकि या गावातील मुख्यालयात, रासायनिक स्फोटके, एक रशियन हेलिकॉप्टर, काही जंतूबॉम्ब अशी सामग्री सापडली. यात 40 लाख लोकांना यमसदनाला पाठवणे शक्य होईल इतका सरीन वायू तयार करण्याची रसायने होती. एलएसडी, मेफेंटामाईन, सारखी कैफाची द्रव्ये, ट्रुथ सिरम, इ. बनवण्यासाठी प्रयोगशाळा होत्या. एका तिजोरीत लक्षावधी डॉलर रोख आणि मुबलक सोने होते, अनेक कोठड्या होत्या. त्यापैकी काहीत बंदिवान कैदीही होते. तरीही सापडलेली रसायने म्हणजे केवळ बागेकरिता खते होती, अशी पत्रके ‘ओम’ तर्फे काढण्यात येत होतीच.

पुढच्या दीड महिन्यात 150 ‘ओम’ साधकांना विविध आरोपाखाली अटक करण्यात आली आणि त्यांच्या टोकियो येथील कार्यालयावर कडक पहारा ठेवण्यात आला. 30 मार्च 1995 रोजी मुख्य पोलीस अधिकारी कुनिमात्सू यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. हा हल्ला ‘ओम’नेच केला असा संशय होता, नाकामुरा या साधकाचे नावसुद्धा एका जबाबदार वृत्तपत्राने प्रसिद्ध केले; पण कोणालाही अटक झाली नाही.

23 एप्रिल 95 रोजी, शंभर वार्ताहर आणि त्यांच्या कॅमेर्‍यांच्या साक्षीने, ओम केंद्रात विज्ञान मंत्रिपदावर असणार्‍या मुराई यांची ‘ओम’च्याच टोकियो मुख्यालयाच्या बाहेर भोसकून हत्या करण्यात आली. हत्या करणारा एक कोरियन साधक होता. त्याला शिक्षा झाली; पण हत्येचे कारण समजले नाही.

5 मेच्या संध्याकाळी, टोकियोच्या शिन्जुकू रस्त्यावरील एका स्वच्छतागृहात एक जळती कागदी पिशवी आढळली, त्यात एक हायड्रोसायनाईड या विषारी वायूने भरलेली कुपी होती. ती आग वेळीच विझवली गेली; अन्यथा सर्व वायुवितरण जाळ्यात हा गॅस पसरून 10 हजार प्रवासी खतम झाले असते. मग अशाच सायनाईडच्या न स्फोट झालेल्या कुप्या अनेक भुयारी स्टेशनवर सापडल्या. अनेक साधकांना अटक झाली, मात्र ‘ओम’ प्रमुख असहारा अद्याप सापडला नव्हता.

अखेर, 16 मे रोजी असहारा हा त्यांच्या मुख्यालयात एका भिंतीत लपून बसलेला सापडला. त्याच दिवशी टोकियोचे राज्यपाल, ओशिमा यांच्या नावावर एक पार्सल आले, ते फोडताना आतील बॉम्बचा स्फोट होऊन त्याच्या सेक्रेटरीच्या हाताची बोटे तुटली.

‘ओम’ प्रमुख असहारावर 23 आरोप ठेवण्यात आले. त्याला व त्याच्या निकटच्या सहकार्‍यांना फाशीची शिक्षा झाली. अपिलातही त्यांच्या शिक्षा कायम ठेवल्या गेल्या.

अटक होताच असहाराने आपल्या ‘ओम’ प्रमुख पदाचा त्याग केला. त्यानंतर तो कोणाशीही, त्याच्या कुटुंबियांशी, फार काय, त्याच्या वकिलाशीही एक शब्दसुद्धा बोलला नाही.

‘जानेवारी ’94 मध्ये ओम आश्रमाच्या कुंपणातून पळून जाणार्‍या एका साधकाला पकडण्यात आले आणि त्याची दुसर्‍या एका साधकाने गळा दाबून हत्या केली. ‘तू त्याचा गळा दाबून त्याला ठार कर नाही तर तुला ठार केले जाईल’ असा आपल्याला धाक घातल्याचे त्याने सांगितले. आपण ही हत्या करण्याचा आदेश दिला होता, असे असहाराने जून 95 मध्ये मान्य केले.

22 जून 95 या दिवशी फुजिओ कुत्सुमी या ओम साधकाने निप्पोन एअरवेजचे एक विमान टोकियो विमानतळावरून उड्डाण करताच अपहृत केले आणि होक्कैडो विमानतळावर ते उतरवण्यास भाग पडून असहारा याच्या सुटकेची मागणी केली. पोलिसांनी विमानाला वेढा घातला आणि 16 तासांच्या थरारनाट्यानंतर फुजीओला अटक करून प्रवासी मुक्त करण्यात आले.

10 ऑक्टोबर 95 – ओम संस्थेची धार्मिक वैधानिक संस्था’ ही नोंदणी रद्द करण्यात आली.

1996 – संस्थेची दिवाळखोरी जाहीर झाली. मात्र जपानमध्ये राज्यघटनेनुसार, धार्मिक स्वातंत्र्य असल्यामुळे, या गटाचे काम चालूच राहिले. त्यांच्या संगणक व्यवसायातून मिळणारे पैसे आणि काही देणग्या हे यांचे उत्पन्नाचे स्रोत आहेत, आणि त्यांच्यावर करडी शासकीय नजर आहे. या गटावर दहशतवादी कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार संपूर्ण बंदी घालण्याची मागणी मात्र मान्य झाली नाही. आजही या संस्थेचे दोन हजाराहून जास्त सभासद आहेत.

असहाराची अटक आणि खटला यानंतर या गटात खूप उलथापालथी झाल्या. काही काळ असहाराच्या दोन किशोरवयीन मुलांना गुरुपद देण्यात आले. तसेच या गटाचे ‘अलेफ’ असे नवे नाव ठेवण्यात आले. तत्त्वविचारातही बदल करण्यात आला. वज्रयान हे वादग्रस्त बौद्ध तत्त्वज्ञान व बायबलमधील काही भाग वगळण्यात आले. सरीन हल्ल्यात बळी गेलेल्यांची गटाने माफी मागितली आणि त्यांचेकरिता भरपाई निधी उभारला. आक्रमक आणि हिंसक संदेश देणारी प्रकाशने बंद केली गेली.

1999 मध्ये, फुमिरो जोतू या ज्या ‘ओम’च्या ज्येष्ठ सभासदाविरुद्ध गंभीर आरोप नव्हते, त्याला गटाचा अधिकृत नेता नेमण्यात आले.

मात्र, आता सर्व स्थिरस्थावर झाले असे वाटते, तोच जपान लोकसभेचे एक सभासद कोकी इशी यांनी लोकसभेत ओम संस्थानाविरुद्ध समिती स्थापन केली होती. त्यांचा 2002 साली खून करण्यात आला.

जुलै 2002 मध्ये तर कळसच झाला. रशियन गुप्तहेर खात्याचा माजी कर्मचारी आणि ‘ओम’चा साधक दिमित्री शिगाचेव्ह याला रशियन पोलीस खात्याने पकडले. त्याच्याकडे शस्त्रास्त्रांचा साठा सापडला. ही शस्त्रे जपानमधील शहरावर हल्ले चढवून असहाराची सुटका करण्यासाठी वापरली जाणार होती. लगेचच दिमित्री हा आपला सभासद नाही, असे ‘अलेफ’ने जाहीर केले.

ऑगस्ट 2003 मध्ये, बहुधा ओम सभासद असणार्‍या एका महिलेने, चीन मार्गे कोरियाला जाऊन तेथे आश्रय घेतला.

पुढील 15 वर्षे, 3 फरारी ओम पंथियांचा शोध चालू होता. यापैकी हिरता हा 2011 मधे शरण आला, 2012 मधे नोको किकुचीला पकडण्यात आले आणि त्यानेच दिलेल्या माहितीवरून ताकाहाशी या शेवटच्या फरारी गुन्हेगाराला 17 वर्षांनंतर पकडण्यात आले. ‘अलेफ’ नावाचा गट अजूनही कार्यरत आहे, आणि स्थानिक नागरिक त्यांना अजूनही जमेल तसा विरोध करतात. पुढे या ‘अलेफ’ गटात फूट पडली, तरीही पोलिसांचे या गटावरील पहारास्वरूप लक्ष चालूच आहे.

सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण होऊन असहाराला 15 सप्टेंबर 2006 रोजी फाशी देण्यात आले. या हत्याकांडात एकूण 189 जणांवर खटला भरण्यात आला. त्यापैकी 13 साधकांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. 5 जणांना जन्मठेप, 80 जणांना तुरुंगवास, 87 जणांना प्रलंबित शिक्षा, तर दोघांना दंड ठोठावण्यात आला. फक्त एक जण निर्दोष सुटला.

या पंथाचे तत्त्वज्ञान

हे अनेक धर्मतत्त्वांचे, असहाराने त्याच्या मतानुसार केलेले, संमिश्र तत्त्वज्ञान आहे. त्यात भारतीय बौद्धविचार, तिबेटी बौद्धविचार आणि हिंदू धर्मशास्त्र यांचे कसेही मिश्रण बनवलेले आहे. शिव ही मुख्य पूज्य देवता असून बायबल मधील रीव्हिलेशन या अध्यायातील काही कल्पनांचा यात अंतर्भाव आहे. अर्मागॅडॉन ही जगाच्या अंतिम विनाशाची कल्पना इथलीच. योग आणि नोस्त्रदामस हेही (कदाचित लोकप्रिय असल्यामुळे) यात समाविष्ट आहेत. आपण मूळ बुद्धविचार’ पुन:स्थापित करत आहोत, असे असहाराचे म्हणणे होते. या सर्व तत्त्वावर आधारित एक ग्रंथ त्याने 1992 मध्ये लिहिला, त्यात त्याने आपण ‘ख्रिस्त’ आहोत असे जाहीर केले होते. आपण जगाची पापे आपल्यावर घेऊ शकतो, आणि शिष्यांमध्ये आध्यात्मिक शक्तिपात करून त्यांची पापे नाहीशी करू शकतो असा त्याचा दावा असे; पण हा पंथ बौद्ध विचाराचा आहे, या दाव्याला तज्ज्ञ मंडळी फारशी किंमत देत नसत, तरीही अनेक जण हा पंथ जपानी बुद्ध धर्माची एक शाखा असे समजत असत आणि त्याची लोकप्रियता वाढण्याचे हे एक कारण असू शकते. असहाराने जगाच्या अंताचे भाकीत केले होते, त्यात अमेरिकेने चिथावणी दिल्यामुळे तिसरे महायुद्ध होईल, त्यातून अणुसंघर्षाचा प्रलयकाळ ओढवेल. संपूर्ण मानव वंश नष्ट होईल. अर्थात वेळेवरच ओम शिन री क्यो पंथात सामील होणारे त्यातून वाचतील! असे तो सांगत असे. म्हणजेच, लोकांना खरा धर्म शिकवणे आणि त्यांचे जगबुडीपासून रक्षण करणे अशी दुहेरी जबाबदारी या पंथावर होती. हा प्रलय 1997 साली होणार असल्याचे असहाराने भाकीत केले होते. अमेरिकेला तो ‘जनावर’ म्हणत असे आणि हे जनावर अंतिमत: जपानवर हल्ला करणार अशी त्याची खात्री होती. त्याला सर्वत्र कट कारस्थाने शिजत असल्याची शंका येत असे आणि याकरिता तो ज्यू लोक, फ्री मेसन पंथाचे लोक, डच नागरिक, ब्रिटिश राज घराणे आणि ओमचे प्रतिस्पर्धी जपानी धर्म या सर्वांना जबाबदार धरत असे. बौद्ध धर्माचा आदर करत असूनही आपण हिंसक कारवाया कशा करतो, याचा खुलासा तो करत असे की, बौद्ध धर्मातीलच काही उपपंथ असे मानतात की, पापी जगाचा नाश करूनच नवे गुणवान जग स्थापन करणे शक्य होऊ शकेल. असहाराच्या पंथाला विरोध करणारे लोक पापीच असतात, त्यांच्या नावावर आणखी कुकर्म जमा होण्यापेक्षा त्यांना ठार करून आणखी पाप करण्यापासून त्यांना मुक्ती देणेच श्रेयस्कर होय’. असे त्याचे सांगणे पटल्यामुळेच त्याचे शिष्य एखाद्याचा प्राण घेण्यासारखे निर्दय कृत्य बिनधास्त पार पडत असत.

कितीही हिंस्र, अमानुष अथवा रानटी गोष्ट असू दे, माणूस ती आनंदाने आणि अभिमानाने पार पाडतो; – आपण हे आपल्या धर्माकरता करत आहोत अशी त्याला खात्री वाटत असेल तर! हे बर्ट्रांड रिसेल यांचे सुभाषित तुम्हाला आता नक्कीच पटेल.

सरीन हत्याकांड

20 मार्च 1995. टोकियोतील भुयारी रेल्वेवर अफाट गर्दी असण्याची सकाळची वेळ. ठरलेल्या वेळी 5 निरनिराळ्या दिशेने जाणार्‍या गाड्यात ओम शिन री क्यो पंथाचे 5 साधक चढतात. त्यांचे हातात असतात. दुधाच्या पिशव्यासारखे सरीन या विषारी द्रवाने भरलेले प्लास्टिक पुडे. संशय येऊ नये म्हणून वर्तमानपत्रात गुंडाळलेले. हातात छत्र्या. मात्र छत्र्यांची टोके घासून अणकुचीदार बनवलेली. ठराविक स्टेशन येण्यापूर्वी हे साधक हातातील पुडकी खाली टाकतात. छत्रीच्या टोकाने त्याला अनेक ठिकाणी भोके पाडतात आणि गाडी थांबताच खाली उतरतात. स्टेशन बाहेर त्यांना पळून जाण्यासाठी मोटारी घेऊन त्यांचे साथीदार तयार असतात.

झपाट्याने वायुरूप घेणार्‍या त्या पुडक्यातील द्रव्य 13 जणांचे प्राण घेते, तर अनेकांना गंभीर बाधित करते. उतारूंना, रेल्वे कर्मचार्‍यांना आणि पोलिसांना काय झाले आहे, हे कळतच नाही. डॉक्टर मंडळीही चक्रावून जातात. साहजिक आहे, स्फोट नाहीत, जखमा नाहीत, आग नाही, धूर नाही आणि माणसे झटके येत, तोंडाला फेस येत पटापट मरून पडताहेत, अशा वेळी कितीही हुशार डॉक्टर असला तरी काय निदान करणार? नंतर त्यांनी सरीन वायूची शंका घेताच पोलिसांचा आधी विश्वासच बसेना. कारण ज्या ओम शिन री क्योचा संशय होता. त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा वायू तयार करण्याची सामुग्री असणेच शक्य नाही, अशी त्यांना खात्री होती. ओम पंथियांच्या हुशारीमुळे ते बावळट ठरले आणि पुढे अनेक वर्षे माध्यमांच्या आणि लोकांच्या शिव्या खात राहिले.

सरीन वायू

सरीन या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे शांत, नीरव. पण सरीन या वायूचे स्वरूप मात्र अगदी विरुद्ध आहे. सरीन हे काही या वायूचे खरे नाव नव्हे. त्याचा इतिहास मोठा रंजक आहे.

हा वायू 1938 साली जर्मनीमध्ये ऑगनो-फॉस्फरस प्रकारची कीटकनाशके तयार करताना अपघाताने सापडला. परमेश्वराप्रमाणे हा निर्गुण, निराकार असतो. म्हणजे त्याला रंग नसतो, वास नसतो आणि चवही नसते. मात्र त्याचा टाचणीच्या डोक्याएवढा थेंब एका माणसाला ठार करायला पुरेसा असतो. एवढे महान कार्य हा चिमुकला जीव करतो तरी कसा? तर आपल्या नसा ज्या रसायनाचे सहाय्याने आपले संदेश पेशींना पोचवत असतात, ते रसायनच (ऍसिटिल कोलीन) तो निर्बल करून टाकतो. त्यामुळे स्नायू काम करेनासे होतात, श्वास बंद पडतो, आणि माणूस मरतो.

याचे पाळण्यातले नाव आहे, (बघा एका दमात उच्चारता येते का?) आयसो प्रोपिल मेथील फ्ल्युओरो फाँस्फेट! म्हणून सोपे नाव दिले सरीन. सरीन का? तर याचा शोध लावणार्‍या शास्त्रज्ञांचे नावातील अक्षरे घेऊन ते तयार केलेले. आता बडी राष्ट्रे कितीही मानवतेच्या वगेरे गप्पा मारत असली तरी असे सर्व गुण संपन्न विषारी द्रव्य आपलेकडे असावे असे त्यांना वाटणारच ना? त्यामुळे हा शोध लावणार्‍या अम्ब्रोज या जर्मन शास्त्रज्ञाला न्युरेन्बर्ग खटल्यात आठ वर्षांची शिक्षा देण्यात आली होती, तरी चार वर्षातच त्याची मुक्तता करण्यात आली आणि त्याला गुपचूप अमेरिकेला रवाना करण्यात आले. त्याच्या मदतीने तिथे हे द्रव्य प्रचंड प्रमाणात बनवण्यात आले. रशिया आणि ब्रिटननेही ते बनवले. ब्रिटनचा एक शास्त्रज्ञ तर याचे प्रयोग करत असताना मरण पावला.

शोको असहारा

या माणसाचा (याला माणूस म्हणणेही योग्य नव्हे; पण सोयीकरिता म्हणूया) जन्म 1955 मध्ये जपानमधील एका लहान गावात अगदी गरीब कुटुंबात झाला. चटया बनवण्याचा व्यवसाय आणि 7 भावंडे यामुळे असणार्‍या अभावग्रस्त परिस्थितीचा परिणाम त्याच्या मानसिक घडणीवर झाला असणार, हे नक्की. त्यातून त्याला लहानपणीच काचबिंदू हा विकार झाला. त्यात त्याचा एक डोळा पूर्ण बाद झाला आणि एक डोळ्यात अगदी अल्प दृष्टी शिल्लक राहिली. त्यामुळे त्याला अंधशाळेत शिक्षण घ्यावे लागले. तो शालांत परीक्षा उत्तीर्ण झाला तरी त्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकला नाही. मग त्याने चिनी वैद्यकाचा अभ्यास सुरू केला आणि काष्ठौषधी व्यापार चालू केला, आणि रोग्यांवर उपचार करण्यासही सुरुवात केली. 81 साली त्याला विनापरवाना वैद्यक व्यवसाय केल्याबद्दल शिक्षा झाली. त्यानंतर त्याने चिनी ज्योतिष आणि ताओ यांचा अभ्यास केला आणि आपला पंथ स्थापन केला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. 1090 साली त्याचे सर्वात जास्त म्हणजे दहा हजार अनुयायी होते. सरकार उलथवून जपानच्या सम्राट पदावर विराजमान होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. काय हा वेडेपणा असे तुम्ही म्हणाल, पण त्याच्या वकिलांनाही तसेच वाटले. टोकियो भुयारी रेल्वे हल्ल्यानंतर त्याचेवर भरलेल्या खटल्याचे वेळी आमचा अशील मनोरुग्ण आहे, असा बचाव त्याच्या वकिलांनी केला. शिवाय हल्लेखोर ओम साधक असले तरी हे कृत्य त्यांनी स्वत:हून केले आहे, त्यात संस्थाप्रमुखांचा संबंध नाही’, असा बचावही (नेहमीप्रमाणे) करण्यात आला.

-डॉ. शरद अभ्यंकर, वाई

लेखक संपर्क : 9422400643