Categories
संपादकीय

जातप्रथा हरली : घटना जिंकली

मे - २०१६

14 एप्रिल 2016. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती सर्वत्र धूमधडाक्यात साजरी होत असतानाच एक सुवार्ता कानी थडकली. महाराष्ट्र सरकारने जातपंचायतीच्या अन्यायाविरोधातील कायदा एकमताने विधानसभेत पारित केला. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी; तसेच सर्वपक्षीय आमदार, सभापती यांचे महाराष्ट्र अंनिसतर्फे मन:पूर्वक अभिनंदन!

14 एप्रिलला हा कायदा पारित करण्यामागे एक चांगला संदेश दडला आहे. जातिअंत हे बाबासाहेबांचं एक मोठं स्वप्न होतं. उभ्या आयुष्यात जातिअंतासाठी त्यांनी अपार कष्ट उपसले. बाबासाहेबांना जातिअंतासाठी ‘आंतरजातीय विवाह’ हा समर्थ उपाय वाटत होता. तरुण विवेकवादी मंडळी अशा विवाहासाठी तयार होताना दिसत होती. पण जातपंचायत नामक संघटन अशा विवाहांना विरोध करू लागले. लाखो रुपयांचा दंड आणि प्रसंगी अशा तरुण-तरुणींची हत्या होऊ लागली. नाशिकमधील कुंभारे नामक तरुणीने आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या पित्यानेच तिला ठार केले. या घटनेची गंभीर दखल महाराष्ट्र अंनिसने घेतली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अशा प्रथाविरोधात नाशिकमधूनच संघर्ष उभा केला. नाशिकचे धडाडीचे कार्यकर्तेकृष्णा चांदगुडे, माधव बावगे, मुक्ता दाभोलकर यांनी अन्यायग्रस्त तरुण-तरुणींचा आवाज बुलंद करण्यास सुरुवात केली. वाळीत प्रकरणे बाहेर पडू लागली. अशा प्रकरणात कारवाई करण्यासाठीच्या कायद्याच्या मर्यादा लक्षात आल्या. कृष्णा चांदगुडे, अविनाश पाटील, अ‍ॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी जातपंचायतविरोधी कायद्याचा ड्राफ्ट तयार करून महाराष्ट्र सरकारला सादर केला. इतर विवेकवादी कायदेतज्ज्ञ कायदा व्हावा म्हणून रेटा लावू लागले आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासने न देता थेट कायदाच पारित करून टाकला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे या देशातले पहिले राज्य ठरले. या कायद्यामुळे आता जातपंचायतीच्या अन्यायाखाली हतबल होणार्‍या कुटुंबांना संरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र अंनिसचा दुसरा लढा यशस्वी झाला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

जातिप्रथेच्या जुलमाला बाबासाहेबांनी साकार केलेल्या राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचे पाठबळ मिळाले. म्हणून हा कायदा होऊ शकला. घटना जिंकली; जातीची अन्यायी व्यवस्था हरली. ही फार मोठी ऐतिहासिक कामगिरी म्हणून अंनिसच्या इतिहासात नोंदली जाईल.

धर्म हरला : कायदा जिंकला

घटनेच्या सामर्थ्याचा आणखी एक विजय म्हणजे स्त्रियांच्या मंदिर प्रवेशाचा लढा. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी डॉ. आंबेडकरांनी जे भाषण केले, त्यात ते म्हणाले होते – महाडच्या चवदार तळ्याचे पाणी दलितांना हजारो वर्षेप्यायला मिळाले नाही म्हणून दलित काही मेले नाहीत; तसेच यापुढेही ते पाणी आम्हाला मिळणार नसेल, तर आम्ही मरणार नाही. पण प्रश्न तो नाही; तर निसर्गाच्या देण्यावर सर्वांचा समान हक्क आहे. या हक्कासाठी आम्ही लढत आहोत.

ज्या देवाने स्त्री-पुरुष दोघांनाही निर्माण केले, असे धर्ममार्तंड मानतात, त्यापैकी एका गटाला त्याच देवाच्या मंदिरात प्रवेश का नाकारला जावा? स्त्रीच्या मासिक धर्मामुळे सर्व मानव स्त्री-पुरुषांची निर्मिती होते; मग तिचा देवाला विटाळ का व्हावा? पण धर्माच्या ठेकेदारांनी स्त्रियांना मंदिर प्रवेशापासून रोखले. हा अन्याय दूर व्हावा आणि घटनेने दिलेली स्त्री-पुरुष समता निर्माण व्हावी म्हणून शनि-शिंगणापूर देवस्थानात स्त्रियांच्या प्रवेशाच्या लढ्याला 15-16 वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी हाक दिली. त्यावेळी महाराष्ट्र अंनिसने सत्याग्रहही केला; पण धर्म हलला नाही. भूमाता ब्रिगेड आणि इतर स्त्री-संघटनांनी केलेल्या संघर्षालाही धर्माच्या ठेकेदारांनी वाटाण्याच्या अक्षता दिल्या. पण अखेर सामाजिक कार्यकर्ती विद्याताई बाळ यांना 1956 चा ‘मंदिर प्रवेश हक्काचा कायदा’ हाती लागला. या कायद्याने चमत्कार केला. धर्म मागे सरला आणि महिलांच्या देवदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.

कृतिशील विधायक उपक्रम अभिनंदनीय!

अंधश्रद्धा निर्मूलन समिती, करमाळ्याचे जिल्हा सचिव व्ही.आर.गायकवाड यांनी आपले आई-वडील आणि भाऊ यांच्या मृत्यूनंतरच्या धार्मिक कर्मकांडांना फाटा देऊन विधायक कृतिशीलता दाखवली. वडिलांच्या निधनावेळी त्यांची रक्षा आणि अस्थी शेतामध्ये विसर्जित केल्या व तेथे नारळाचे रोप लावले. तीच कृती त्यांनी भावाच्या निधनानंतर केली. आज त्या दोन रोपट्यांचे मोठ्या वृक्षात रूपांतर झाले आहे. नुकतेच त्यांच्या आईचे निधन झाले. यावेळीही कर्मकांडात सहभागी न होता आईच्या स्मरणार्थ त्यांनी हनुमान टाकळी येथील प्राथमिक शाळेस इनव्हर्टर भेट दिला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्रतर्फे व्ही.आर.गायकवाड यांचे विशेष कौतुक. त्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा.

संपादक

अंनिसचे कार्यकर्ते राजाराम मस्के यांचे निधन

अंनिसचे कार्यकर्ते राजाराम मस्के रा. आरवडे, ता. तासगाव यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. मस्के हे अंनिसचे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते होते. पश्चिम महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार भाषणाद्वारे त्यांनी गावागावात पोहोचविला होता. मस्के कुटुंबियांच्या दुःखात मअंनिस सहभागी आहे.