भारतीय म्हणून आपण भारतीय विविधतेला मानतो. पण आज याच विविधतेला संपविण्याचा प्रयत्न होत आहे. हे परिवर्तनवादी चळवळीसमोरचे मोठे आव्हान आहे. यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आपली गुणवत्ता वाढवावी, साध्या सोप्या शब्दांत सांगावे, अहिंसेच्या मार्गाने लोकांना प्रबोधित करीत संवाद करावा, असे मार्गदर्शन अंनिसच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र अंनिसच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनात करणार्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे माजी संपादक दिलीप पाडगावकर यांचे पुणे येथे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने अंनिसने आपला ज्येष्ठ मार्गदर्शक आणि हितचिंतक साथी गमावला आहे. पाडगावकरांचा जन्म पुणे येथे 1944 साली झाला. पुण्यातच त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले व फ्रान्समधील सोर्बोन येथे त्यांनी ‘ह्युम्यॅनिटी’ या विषयावर डॉक्टरेट मिळविली. फ्रेंच भाषेवर चांगले प्रभुत्व असल्यामुळे पॅरिसमध्येच ते टाईम्स ऑफ इंडियाचे वार्ताहर म्हणून रुजू झाले. त्यानंतर विविध पदावर काम करीत ते ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे संपादक झाले. त्या पदावर ते सहा वर्षे होते. 1978-1986 दरम्यान ते बँकॉक आणि पॅरिसमध्ये ‘युनेस्को’त होते. उदारमतवादी असलेले पाडगावकर धर्मांधता, दहशतवाद आणि हिंदू राष्ट्रवाद यावर लिहिताना आणि बोलताना कठोर प्रहार करीत, त्यामुळे निर्माण होणार्या धोक्यांची जाणीव आपल्याला सातत्याने करून देत. याची प्रचिती त्यांनी संपादित केलेल्या 1992-93 च्या मुंबई दंगलीवरच्या ‘व्हेन बॉम्बे बर्न्ड’ या संपादित पुस्तकावरून आणि त्यांनी लिहिलेल्या अगणित लेख आणि निबंधातून येते.
त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र अंनिस व अंनिवाचे संपादक मंडळ अभिवादन करीत आहे!