Categories
संपादकीय

डॉ. कलबुर्गी – अधर्माचा तिसरा बळी

ऑक्टोबर – २०१५

धर्मशुद्धीकरणातून समाजाला खर्‍या धर्माकडे नेणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अधर्म्यानी पहिली गोळी मारली. त्यांचा खून करून या अधमांचे समाधान झाले नाही. त्यांनी मग कॉ. गोविंद पानसरे या शोषित वर्गाचे रक्षणासाठी लढणार्‍या राजकीय विचारवंतांला दुसरी गोळी घातली. दाभोलकरांना मागून काही अंतरावरून गोळ्या घातल्या गेल्या तर पानसरे यांच्यावर थेट समोरून हल्ला झाला. ‘शिवाजी कोण होता?’ हे आम्ही सांगणार त्याचा प्रतिवाद करणारे तुम्ही कोण असेच जणु या तथाकथीत धर्मरक्षकांना समोरून सुचवायचे होते. विचारवंतांचे खून पचनी पडत आहेत. समाजातील बहुसंख्य वचकून दबून आहेत. अशा परिस्थितीत विचाराच्या मारेकर्‍याची हिंमत आणखी वाढली. अधर्मी अधमांची तिसरी गोळी प्रा. कलबुर्गी या साहित्य अकादमी पारितोषिक विजेत्या लेखक विचारवंताला टिपून गेली. हा हल्ला कलबुर्गींच्या घरात घुसून झाला.

प्राध्यापक कलबुर्गी हे कर्नाटकातील हंपी विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. बसवेश्वरांच्या वचन साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. लिंगायत धर्माची परखड चिकित्सा करून त्यात कालोचित सुधारणा व्हाव्या यासाठी ते आग्रही होते. हिंदु धर्मातील मूर्तीपूजेवर ते घणाघाती टीका करीत. स्वत: लिंगायत असलेले कलबुर्गी स्वधर्मातील उणीवा उघड करीत त्यामुळे वीरशैव मठाधिपतीचा रोष त्यांना सहन करावा लागला. त्यांच्या निवासावर धर्मांधांनी हल्लाही केला होता. तेव्हापासून कर्नाटक सरकारने त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरविली होती. पण खुनापूर्वी काही दिवस आधी त्यांनी ही सुरक्षा नाकारली होती. ही संधी साधून धर्मांधांनी त्यांचा डाव साधला. संघटीत धर्मांधाच्या जुलूमशाहीचा अतिरेक दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या खूनमालिकेने आपणासमोर उघड होत आहे. यापूर्वी महाराष्ट्रात समाजसुधारकांना प्रतिगाम्यांच्या रोषाला आणि छळाला सामोरे जावे लागले होते. पण विरोधी विचारवंतांना ठार केले पाहिजे इथपर्यंत मूलतत्ववादी अतिरेक्यांची मजल गेली नव्हती. पण आता, आमच्या विरोधात जो कोणी बोलेल, त्याची गय नाही हा अविचार अक्राळविक्राळ स्वरूप धारण करू लागलाय. केवळ महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे तर जगभर धार्मिक असहिष्णुता थैमान घालू लागली आहे.

समाजधारणेसाठी निर्माण झालेल्या विविध धर्मांनी हिंसेचे रूप धारण केलेय. खरं तर निसर्ग आणि मानवी परंपरा-संस्कृती विविधतेने नटली आहे. संस्कृती म्हणजे साचलेले डबके नव्हे. तो खळाळता प्रवाह आहे. विचारवंत हा प्रवाह निर्मळ आणि स्वच्छ करतात. पण डबक्यातल्या किड्यांना हे नको असते. माझा धर्म श्रेष्ठ तोच जगभर पसरावा, बाकीचे धर्म नष्ट व्हावे अशा गर्जना संघटीत धर्म करू लागलेत. मध्यपूर्वेतील इस्लाम, युरोपमधील कॅथालिक धर्म आणि पूर्वेकडील भारतातील हिंदू धर्म, आमचाच धर्म जगावर राज्य करणार अशा वल्गना करतात. त्यातूनच परधर्मीयांचा द्वेष आणि हिंसक कारवाया वाढत आहेत. भारत हे हिंदुराष्ट्र बनावे यासाठी काही अतिरेकी संघटना गरळ ओकू लागल्यात. विचारस्वातंत्र्य, धर्मचिकित्सा, वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्याद्वारे संस्कृती संवर्धन करणारे सर्व घटक या धर्मराष्ट्रवादी लोकांना नको आहेत. म्हणूनच येथे विचारवंतांची पद्धतशीर हत्या सुरू झाली आहे. भारतात, आणि जगभर सुरू झालेल्या या मानवताविरोधी धार्मिक उन्मादातला कसा आवर घालायचा याचा विचार सुबुद्ध नागरिकांनी संघटीतरित्या करायला हवा.

कलबुर्गीच्या खुनानंतर तपासयंत्रणा सजग होऊन अतिरेक्यांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होण्याची चिन्हे दिसू लागलीत. आशेचा किरण दिसू लागलाय. हिंसावादी अतिरेकी धार्मिक संघटनेच्या साधकांच्या तपासाला गती आली आहे. असाच एक साधक पानसरेंच्या खूनाचा सूत्रधार असल्याचे प्रसिद्धी माध्यमातून समोर येत आहे. विरोधी विचारवंतांना ठार करणे हा कसला धर्म? आता तरी तपासयंत्रणेने तथाकथित धर्मरक्षकांचा खोलात जाऊन तपास करावा. त्यांचे खरे हेतु समाजासमोर मांडावे आणि त्यांचा पुरता नायनाट करावा. असं झालं नाही तर अवघ्या समाजाची सहनशीलता संपून या देशात गांधीयन पद्धतीने मोठा उठाव सुरू होईल याची जाणीव प्रचलित सरकारने ठेवावी.