वैज्ञानिक, अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य आणि विज्ञान चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता
ज्येष्ठ वैज्ञानिक, अभिनेता, दिग्दर्शक, विज्ञान आणि नाट्य चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते डॉ. हेमचंद्र (सर्वांसाठी हेमू, हेमूकाका) अधिकारी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी दीर्घ आजाराने 21 मे 2018 रोजी निधन झाले. त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने विनम्र अभिवादन!
एक अजब रसायन
डॉ. हेमू अधिकारींसारख्या बहुआयामी, मृदुभाषिक व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणे कठीणच. बायोकेमिस्ट्रीतली डॉक्टरेट, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स, हाफकिन इन्स्टिट्यूट आणि तीसहून अधिक वर्षे भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधन वैज्ञानिक म्हणून कार्यरत, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून 20 हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध, लोकविज्ञान चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, वैज्ञानिक दृष्टिकोनासारख्या अमूर्त विषयाच्या विविध पैलूंवर सर्वसामान्य वाचकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी विपुल लेखन, व्याख्यानं, कार्यशाळा; प्रायोगिक रंगभूमीवर पाच दशकांहून अधिक काळ दिग्दर्शक, अभिनेता आणि अभ्यासक; अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट; तसंच दूरदर्शन मालिकांमधून भूमिका, सडक नाटक, विद्रोही साहित्य अशा समाजपरिवर्तनाच्या चळवळींतील सहभाग…. एवढी समृद्ध आणि वैविध्यपूर्ण कारकीर्द!
हेमूंचा जन्म मुंबईतला आणि त्यांचे आयुष्यही मुंबईतच गेले – पूर्णपणे मुंबईकर. दादर टी. टी. (खोदादाद सर्कल) येथील घरात त्यांनी संपूर्ण आयुष्य व्यतीत केले!
त्यांचे प्राथमिक शिक्षण (1 ली ते 4 थी) ‘शिशुविहार’ हिंदू कॉलनीमध्ये, तर माध्यमिक शिक्षण (5 वी ते 11 वी) शिवाजी पार्कच्या ‘बालमोहन’मध्ये झाले. माटुंग्याच्या खालसा कॉलेजमधून 1957 मध्ये त्यांनी केमिस्ट्री (प्रमुख) आणि फिजिक्स (दुय्यम) घेऊन बी. एस्सी. आणि 1960 मध्ये परळच्या सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमधून बायोकेमिस्ट्रीत मुंबई विद्यापीठाची एम. एस्सी. पदवी मिळवली.
एम्. एस्सी. नंतर हेमूंनी 5 वर्षे पुण्यातील हिंदुस्थान अँटिबायोटिक्समध्ये आणि हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई येथे संशोधन वैज्ञानिक म्हणून काम केले. 1965 मध्ये हेमूंनी भाभा अणुसंशोधन केंद्र (बी. ए. आर. सी.) येथे बायोकेमिस्ट्री विभागात संशोधन वैज्ञानिक म्हणून काम सुरू केले, ते 1996 मध्ये निवृत्त होईपर्यंत ते तेथेच कार्यरत होते. येथेच ‘व्हिटॅमिन ए या जीवनसत्वाचे शरीरातील कार्य’ या विषयावरील संशोधनासाठी त्यांनी डॉक्टरेट मिळवली. गॅमा किरणांचा वापर करून तृणधान्ये (गहू, तांदूळ) आणि त्यापासूनचे पदार्थ (रवा, मैदा) टिकवण्याची तंत्रज्ञान-प्रक्रिया विकसित करण्यामध्ये हेमूंचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नल्समधून 20 हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
हेमूंच्या घरातील वातावरण पुरोगामी. वडील आणि आई यांच्यावर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव. वडील ‘फ्रेंडस् ऑफ सोविएत युनियन’चे काम करत आणि ‘बालमोहन’मध्ये शिक्षिका असलेली आई टीचर युनियनमध्ये काम करायची. कॉ. डॉ. गंगाधर अधिकारी त्यांचे मोठे काका! त्यांनी 1925 मध्ये जर्मनीत जाऊन 3 वर्षांत प्रबंध पूर्ण करून रसायनशास्त्रातील डॉक्टरेट मिळवली. तेथेच ते जर्मन कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले आणि पुढे भारतात येऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. अत्यंत हुशार असलेले धाकटे काका कॉ. जगन्नाथ अधिकारीदेखील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम करत असत. परंतु हिमोफिलियासारख्या आजारामुळे त्यांचे पस्तिशीतच निधन झाले. टीचर युनियनच्या बैठका हेमूंच्या घरीच होत. त्यात कॉ. पी. एस. रेडकर, कॉ. एन. जी. पाटकर, कॉ. बी. एस. प्रधान, कॉ. चित्रे अशी मंडळी असत. कॉ. बी. टी. रणदिवेंच्या कुटुंबाचे हेमूंच्या आई आणि वडील दोघांकडून जवळचे नाते! अशा पुरोगामी राजकीय वातावरणात वाढलेल्या हेमूंनी मार्क्सवादी तत्त्वज्ञानाची बांधिलकी स्वीकारली आणि त्यातूनच त्यांची जीवनदृष्टी आकारली.
रंगभूमी, चित्रपट, टेलिव्हिजन
हेमू मराठी प्रायोगिक रंगभूमीवर पन्नासहून अधिक वर्षे दिग्दर्शक, अभिनेता आणि अभ्यासक म्हणून कार्यरत होते. सत्तरीच्या दशकांत छबिलदास शाळेच्या सभागृहात सुरू झालेल्या प्रायोगिक रंगभूमीच्या चळवळीत हेमूंचा सक्रिय सहभाग होता. ‘बहुरुपी’ या प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी हेमू एक आणि या संस्थेतर्फे अनेक प्रायोगिक नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आणि काही नाटकांत भूमिकाही केल्या. त्यांच्या प्रायोगिक रंगभूमीवरील गाजलेल्या भूमिका – ‘जुलूस’, ‘पगला घोडा’ (दोन्ही नाटकांचे लेखक बादल सरकार आणि दिग्दर्शक अमोल पालेकर), ‘हाच खेळ उद्या पुन्हा’, ‘अखेरचे पर्व’ इत्यादी. त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर ‘हसवाफसवी’, ‘चूकभूल द्यावी घ्यावी’, ‘अशी पाखरे येती’, ‘रिमोट कंट्रोल’ या नाटकांतून भूमिका आणि ‘इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया’ या मूळ मराठीतील ‘शोभायात्रा’ नाटकाच्या इंग्लिश प्रयोगात बापट (गांधी)ची भूमिका केली होती. प्रायोगिक रंगभूमीबरोबरच अनेक सडक नाटक कार्यशाळांमध्ये त्यांचा सहभाग असे. नाटक ही हेमूंसाठी एक चळवळच होती – समाजपरिवर्तनाच्या व्यापक उद्दिष्टासाठीची – आणि ते त्याचे सक्रिय कार्यकर्ते होते.
हेमूंनी मराठी-हिंदी मिळून 20-25 चित्रपटांतूनही भूमिका केल्या आहेत. त्यापैकी ‘आक्रित’, ‘बनगरवाडी’, ‘ध्यासपर्व’, ‘कथा दोन गणपतरावांची’, ‘रेस्टॉरंट’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हे मराठी; तर ‘कथा’, ‘साज’, ‘वजूद’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘तेरा मेरा साथ रहे’, ‘गोलमाल 3’, ‘सिंघम’ हे हिंदी महत्त्वाचे. टेलिव्हिजनवरील काही मराठी-हिंदी मालिकांतून अनेक छोट्या-मोठ्या भूमिका त्यांनी साकारल्या. ‘झी गौरव’ पुरस्कारांच्या व्यावसायिक नाटक विभागासाठी सतत 4 वर्षे त्यांनी परीक्षकाची जबाबदारीही पार पाडली.
विज्ञान प्रसार
1965 मध्ये केरळमध्ये सुरू झालेल्या ‘केरळ शास्त्र साहित्य परिषदे’च्या पद्धतीचे काम महाराष्ट्रात करण्यासाठी 1980 मध्ये लोकविज्ञान संघटनेची स्थापना झाली. त्यात ढखऋठ, इअठउ आणि अनेक अग्रगण्य संस्थांमधील जागरूक वैज्ञानिक, अर्थतज्ज्ञ, अनेक तंत्रज्ञ, डॉक्टर्स, राजकीय चळवळीतील कार्यकर्ते, विद्यार्थी एकत्र आले होते.
लोकांसाठी विज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या लोकविरोधी वापराच्या विरोधात प्रबोधन, लोककेंद्री वैज्ञानिक पर्यायांची मांडणी आणि प्रसार, वैज्ञानिक-तंत्रज्ञांनी लोकाभिमुख व्हावे, यासाठी प्रयत्न करणे आणि मुख्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न करीत व्यापक समाजपरिवर्तनाच्या चळवळीचा हिस्सा बनणे ही संघटनेची उद्दिष्टे होती. डॉ. हेमू अधिकारी लोकविज्ञान संघटनेत सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होणे, हे स्वाभाविकच होते. वैज्ञानिक दृष्टिकोन यासारखा विषय कार्यकर्त्यांपर्यंत सोपा करून कसा पोचवावा हा प्रश्न होता. साहित्य उपलब्ध होते; परंतु जरा क्लिष्टच होते. त्या सुमारास नेहरू तारांगणात झालेल्या एका कार्यशाळेत डॉ. हेमू अधिकारींनी दैनंदिन जीवनातली उदाहरणे देत वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयाची मांडणी केली होती. ही मांडणी कोणाही कार्यकर्त्याला सहज समजेल अशी तर होतीच व अगदी ग्रामीण भागात सर्वसामान्य स्त्री-पुरुषांपर्यंतही, तरुणांपर्यंत पोचत होती, असे दिसत होते.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा असलेल्या विज्ञानाच्या विचार करण्याच्या पद्धतीचा वापर करूनच माणसाने या पृथ्वीवर अस्तित्वात आल्यापासून आपल्याला पडलेले प्रश्न सोडवले आहेत. त्याच पद्धतीतून मूल्येदेखील त्या-त्या काळात तयार झाली आहेत. म्हणजेच माणूस विज्ञानाची पद्धत हीच विचारपद्धती अगदी सुरुवातीपासून वापरत आला आहे. याउलट धर्मविचार हे बरेच नंतर आले आहेत, हे हेमूंच्या मांडणीतून स्पष्टपणे पुढे येत असे. विज्ञान मूल्ये देऊ शकत नाही, या प्रचलित मांडणीला छेद देणारे लिखाण आणि मांडणीही डॉ. हेमू अधिकारींनी सातत्याने केली. या संदर्भात हेमूंनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून विज्ञान विषयक विपुल लेखन, आकाशवाणीवर भाषणे आणि महाराष्ट्रभर कॉलेजेस, शाळांमधून व्याख्याने दिलीच; तसेच लोकविज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भारत ज्ञानविज्ञान समितीच्या कार्यशाळांतून ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर राज्यभरात व्याख्याने दिली.
1987 चा भारत जनविज्ञान जथ्था, 1988 मध्ये अणुशक्तीनगर येथे आयोजित ‘बालविज्ञान महोत्सव’ आणि नंतर ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कचे मुंबईतील अधिवेशन अशा कार्यक्रमांतून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तत्संबंधी विषयांवरील मांडणी करण्यापासून ते त्यांच्या आयोजनात डॉ. हेमू अधिकारींचा सक्रिय सहभाग होता. 1989 मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागासाठी कॉमेट मीडिया फाऊंडेशननिर्मित छंदिता मुखर्जी दिग्दर्शित ‘भारत की छाप’ ही दूरदर्शन मालिका सादर करण्यात आली होती. भारतीय उपखंडातील अश्मयुगापासून ते आतापर्यंतच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासाच्या इतिहासाचा मागोवा घेणार्या दूरदर्शन मालिकेत सूत्रधाराची भूमिका डॉ. हेमू अधिकारींनी साकारली होती. अशा प्रकारची मालिका यानंतर झालेली नाही आणि आजच्या ‘राजकीय’ वातावरणात करायची म्हटले तर काय होईल, हे सर्वांनाच माहीत आहे. 1997 – 98 या वर्षभरात हेमूंनी ‘दै. महानगर’मध्ये ‘लोकायत’ या सदरातून वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानाची पद्धत यांची चर्चा विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पैलू घेऊन मांडली. त्यांतील काही लेख गेल्या वर्षी 28 फेब्रुवारी 2017 ला (विज्ञान दिन) ‘सृजन’ने प्रकाशित केलेल्या ‘नाट्य, विज्ञान समाजेन – वृत्त आणि विचार’ या हेमूंच्या ग्रंथात समाविष्ट केलेले आहेत. धर्म हा मानवी संस्कृतीच्या पसार्यातला एक लहानसा भाग आहे आणि विज्ञान म्हणजे विज्ञानाची विचार पद्धती व संस्कृती यांना वेगेवेगळ्या कंपार्टमेंट्समध्ये टाकणे कसे चुकीचे आहे, हे या लेखमालिकेतून त्यांनी मांडले आहे.
हाडाचा कार्यकर्ता आणि लोकवैज्ञानिक
अशी अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण कारकीर्द असलेले डॉ. हेमू अधिकारी स्वतःची ओळख आवर्जून ‘लोकविज्ञान चळवळीचा आणि महाराष्ट्रातील लोकविज्ञान संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता’ अशीच सांगत. गेली दोन-एक वर्षे त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. या अनपेक्षित आजारपणात त्यांचा आशावाद कोठे कमी झाला नाही. त्यामुळेच ‘नाट्य, विज्ञान समाजेन – वृत्त आणि विचार’ हा ग्रंथ पूर्ण होऊन प्रकाशितही झाला. त्यामागे हेमूंच्या कुटुंबियांप्रमाणेच त्यांचे डॉक्टर आणि ‘सृजन’च्या टीमचेही अपार श्रम होते. “मी वैज्ञानिक… संशोधक आहे; राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांशी माझा काय संबंध”, ही बहुसंख्य वैज्ञानिकांची भूमिका असते. डॉ. हेमू अधिकारींना ती भूमिका मान्य नव्हती. उलट एक वैज्ञानिक, संशोधक म्हणून आजच्या या राजकीय व्यवस्थेत, ज्यांची आज विज्ञान-तंत्रज्ञानावर मक्तेदारी आहे, विज्ञान-तंत्रज्ञानाचा जो लोकविरोधी वापर होतो आहे, तो या व्यवस्थेशी निगडित राजकीय निर्णयांचा भाग आहे आणि म्हणूनच त्याबाबतीत वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य, लोककेंद्री भूमिका घेणे व मांडणे ही माझी जबाबदारी आहे, ही हेमूंची भूमिका होती. यामागची कारणं दोनच…. मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या बांधिलकीतून घडलेली त्यांची जीवनदृष्टी आणि समाजपरिवर्तनाच्या चळवळीशी त्यांचं असलेलं अतूट नातं! देशातील आजचे वातावरण पाहता अशा अनेक हेमू अधिकारींची गरज आहे. असे हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आता आपल्यात नाही. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व जावई, मुलगा आणि सून आहेत. लोकवैज्ञानिक डॉ. हेमू अधिकारींना अखेरचा लाल सलाम!