Categories
भांडाफोड

ढोंगी कुंडलिक शास्त्रीचा भंडार्‍यात भांडाफोड

जुलै - २०१६

भंडारा येथे साई प्लाझा राजस्थानी भवन जवळ पंडित कुंडलिक शास्त्री यांनी दि. 16 ते 20 एप्रिलपर्यंत अद्भुत चमत्काराचा दावा करून ज्योतिष पाहण्याचा व रोगमुक्त करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता.

भंडारा शहरात व ग्रामीण भागात-“ज्योतिषी शिर्डी से आपके शहर में पधारे है, आपका चेहरा, हस्तरेखा और फोटो देखकर भविष्य बताते है।” अखिल भारतीय ज्योतिषी पंडित कुंडलिक शास्त्री-अशा प्रकारे पत्रक ज्योतिषाने प्रकाशित केले होते. त्या पत्रकाची प्रत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रथान सचिव मेहमूद अली यांनी जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे यांना दिली. त्यावर सविस्तर चर्चा करून दिनांक 16 एप्रिल 2016 रोजी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या तक्रारीची तात्काळ दखल पोलीस ठाणेदार जयवंत चव्हाण यांनी घेऊन क्राईमबाँमचे पोलिस उपनिरीक्षक संदिपान उबाळे, पोलीस प्रशांत गुरव, विजय तावडे यांना अंनिस कार्यकर्तेविष्णुदास लोणारे, मेहमूद अली, प्रशांत रामटेके, मकबूल बारशी, लीलाधर बन्सोड यांच्यासोबत घटनास्थळी चौकशीकरिता पाठविले. त्यावेळी ज्योतिष आपल्या रूममध्ये दरबार लावून बसला होता.

पोलीस उपनिरीक्षक सांदेवान उबाळे माझे भाऊ आहेत. बीमार राहत असून प्रकृती बरोबर राहत नाही, असे महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे यांनी ज्योतिष पंडित कुंडलिक पंजाबराव झुंगे (वय 50 वर्षे रा. करकी, तो.तळेगाव, ता.जि.यवतमाळ) यांना सांगितले. त्यावेळी उबाळे यांची हस्तरेषा पाहून ज्योतिषांनी सांगितले की, तुमच्या मागे शनी लागला आहे. सन 2012 हे तुमच्यासाठी खूपच त्रासदायक वर्ष होते. तुमच्या तरक्कीत बाधा लागलेली आहे. त्यामुळे प्रकृती बरोबर राहत नाही. त्यांच्यावर मानसिक आघात झाला आहे, ही बाब दूर करण्यासाठी 11 मंगळवार उपवास करावा लागेल व उबाळे यांच्या डोक्यावर पंचमुखी हनुमानाची पितळेची मूर्ती ठेवून ज्योतिषाने मंत्र-तंत्र करून उपचार सुरू केले. म.अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे यांनी ज्योतिषांना विचारले, ‘मला संतान नाही.’ त्यावर ज्योतिषांनी सांगितले की, तुमच्या मागे राहू लागला आहे. राहू शांत करण्यासाठी तुम्हाला शनी शांत करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला संतती होईल. यावर विष्णुदास लोणारे यांनी ज्योतिषांना सांगितले की, ‘नवसे-सायासे कन्या पुत्र होती, मग का लागे पती’, तुम्ही फसवणूक करीत आहात व सांगितलेले सर्व थोतांड आहे. मी अंनिसचा जिल्हा कार्याध्यक्ष असून माझ्यासोबत असलेले पोलिस उपनिरीक्षक उबाळे आहेत. तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये? यावर ज्योतिष कुंडलिक झुंगे यांनी सांगितले की, तुमचे म्हणणे बरोबर आहे, मी हा व्यवसाय वंशपरंपरेनुसार करीत असून, याचा उपयोग पोट भरण्यासाठी करीत आहे.

माझ्याकडे 13 एकर शेती आहे. ज्योतिषाच्या व्यवसायातून महिन्याला 12 ते 15 हजार कमवितो. माझ्याकडे दुधाचा व्यवसाय आहे. मी लोकांना फसवत आहे. यानंतर फसवणार नाही, अशी कबुली दिली. माझा मुलगा परमेश्वर कुंडलिक झुंगे हा माझ्यासोबत असून बारावीत शिकत आहे. त्याच्या भविष्याचा विचार करून मला माफ करा. मला एकदा सोडावे. मी यानंतर असे करणार नाही. कुणाला फसवणार नाही. वरीलप्रमाणे पत्रक छापणार नाही, असे कृत्य केल्याचे आढळून आल्यास माझ्यावर कारवाई करावी, असे हमीपत्र, पोलीस स्टेशन भंडारा येथे लिहून दिले.

विष्णू लोणारे, भंडारा