अमीरखान यांचे चित्रपट बर्याच अंशी परिपूर्ण असतात. विषयाची सर्वांगीण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य असते. तसेच तर्कशुद्धता हाही त्यांच्या चित्रपटकलेचा एक गुण आहे. सर्व पातळीवरील सामाजिक संदर्भ हेही या चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे. असे असूनही या चित्रपटांचे मनोरंजनमूल्यही उच्च दर्जाचे असते. म्हणजे मनोरंजन, प्रबोधन आणि व्यावसायिकता यांचा अपूर्व संगम त्यांच्या चित्रपटात पाहावयास मिळतो. निखळ आनंदाबरोबरच आजच्या समाजव्यवस्थेसंदर्भातील पुरोगामी प्रगतिशील मूल्यांचा आविष्कार, आग्रह त्यांच्या चित्रपटातून पुढे येतो.
समाजातील कुप्रथांवर प्रहार करणारी त्यांची ‘सत्यमेव जयते’ ही मालिकाही गाजली होती. यातून त्यांच्या सामाजिक भानाचे आणि या कुप्रथांविरुद्ध असणार्या त्यांच्या विचारसरणीचे दर्शन घडलेले आहे. त्यांचे चित्रपट म्हणजे या ‘सत्यमेव जयते’चीच कलात्मक मांडणी आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. ‘लगान,’ ‘थ्री एडीएट,’ ‘पी. के.’ हे नमुनादाखल चित्रपट घेतले तरी त्याची सत्यता पटेल. एकंदर अमीर खान यांचे चित्रपट व्यवसाय करतात, मनोरंजन करतात आणि प्रबोधनही करतात आणि श्रेष्ठ दर्जाचा अभिनयही सादर करतात. या सर्व अंगांनी चित्रपट यशस्वी होणे हे अमीर खान यांनाच साध्य झाले आहे. याबाबतीत त्यांचे कौतुक करायला हवे. नुकताच प्रदर्शित झालेला त्यांचा ‘दंगल’ नावाचा चित्रपट त्यांच्या वर उल्लेख केलेल्या नावलौकिकाला साजेसा आहे. शिवाय हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे, ज्यातील पात्रे आजही जिवंत आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या मांडणीला शंभर टक्के सत्यता लाभली आहे.
ही कथा आहे कुस्तीगीर महावीरसिंग फोगट यांची. ते राष्ट्रीय पारितोषिक विजेते कुस्तीगीर आहेत. त्यांना देशासाठी ऑलिंपिकचे सुवर्णपदक मिळविण्याची जबरदस्त इच्छा होती. ते त्यांच्या आयुष्याचे स्वप्न होते. पण घरची गरिबीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना नोकरी करणे भाग पडले. कुस्तीत मान मिळतो, लौकिक मिळतो; पण पैसा मिळत नाही. त्यामुळे कुस्तीच्या खेळात अतिशय गुणवंत असूनही त्यांना कुस्ती सोडून द्यावी लागते. पण त्यांनी उराशी बाळगलेली स्वप्ने त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. आपण जरी देशासाठी सुवर्ण पदक मिळवू शकलो नाही तरी आपला मुलगा हे स्वप्न पुरे करेल, त्याला चांगला कुस्तीगीर बनवू, अशी जिद्द ते मनी बाळगतात. परंतु मुलगा किंवा मुलगी होणं हे अखेर निसर्गाच्या हाती. त्यांना मुलगा होत नाही. एका पाठोपाठ चार मुलीच होतात. महावीरसिंग निराश होतात. त्यांनी जोपासलेले ऑलिंपिक पदकाचे स्वप्न अशा प्रकारे कोमेजून जाते. कारण कुस्ती पुरुष खेळतात, महिला कुठे कुस्ती खेळतात? कथेची आणि महावीरसिंग यांच्या जिद्दीची वाट्टेल त्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशाला गवसणी घालण्याची सुरुवात इथूनच होते आणि आपल्यासमोर एक अप्रतीम ‘दंगल’च सुरू होते.
महावीरसिंग हरियाणातील एका खेड्याचे रहिवासी, जिथं आजही मुलींची किंमत जन्मत:च शून्य. भारतात काही बहुजन, जाती आणि आदिवासी समूह सोडले तर सर्व जातीत, समाजात मुलींबद्दल हीच भावना आहे. हरियाणा, राजस्थान याबाबतीत अधिक बदनाम आहेत. जन्मत:च मुली मारण्याची प्रथा असल्यामुळे आज हरियाणात स्त्री-पुरुष यांच्या प्रमाणात सर्वात वाईट परिस्थिती आहे. या परिस्थितीमुळे मुलांची लग्ने होणे अवघड बनले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ईशान्य भारत, बिहार, बंगाल यांसारख्या राज्यांतून गरीब मुलींना चक्क विकत घेऊन त्यांचे घरातील एका पुरुषाशी लग्न लावण्यात येते. परंतु घरातील सगळेच पुरुष तिचे लैंगिक शोषण करतात. याविरुद्ध आवाज उठवला जातोय. चित्रपटाच्या माध्यमातूनही यावर भाष्य झालेले आहे. तर अशा हरियाणात महावीरसिंग फोगट मुलगा झाला नाही म्हणून मुलींनाच कुस्तीगीर बनवतात आणि त्यांच्या गीता आणि बबिता या दोन मुली आपल्या वडिलांचे देशासाठी सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करतात, अशी ही छोटीशी; पण सत्यकथा. प्रतिकूल परिस्थिताला सामोरे जाताना, विशिष्ट सामाजिक परिस्थितीत निर्माण होणार्या भावभावना-सामाजिक ताणतणाव राष्ट्रीय पातळीवर एकंदरच क्रीडा धोरण, या सर्वांवर एक सतर्क टीका-टिपण्णी ‘दंगल’मध्ये दिसून येते.
पुरुषप्रधान समाजात मुलाला वंशाचा दिवा म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, मुलगा होणे हे पुरुषावरच अवलंबून असते. असे असले तरी आजही त्यासाठी स्त्रीला जबाबदार धरले जाते. अशा पार्श्वभूमीवर महावीरसिंग यांना मुलगा हवा होता तो वंशाचा दिवा म्हणून नव्हे, तर तो देशासाठी सुवर्णपदक मिळवणारा कुस्तीगीर म्हणून. म्हणजे याही बाबतीत महावीरसिंग वेगळे गृहस्थ ठरतात. मुलगा व्हावा म्हणून ते आणि त्यांची पत्नी अनेक व्रतवैकल्यं करतात. पण मुलगा होत नाही. या ठिकाणी या व्रतवैकल्यांची निरर्थकता दाखवून अंधश्रद्धेला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुलगा न झाल्यामुळे निराश असलेल्या महावीरसिंग यांना एक दिवस त्यांच्या मुली गीता आणि बबितामध्ये कुस्तीगीर होण्याची गुणवत्ता असल्याचे लक्षात येते. सर्वसाधारणपणे मुलांनी मुलींना चिडवल्यानंतर मुली शिव्या देतील, फार फार तर पायातील चप्पल काढून मारतील. पण मुलांना सपाटून मार देणार नाहीत. लहानपणापासून मुलींवर ‘तू स्त्री आहेस’ असे झालेले संस्कार, त्यातून आलेल्या ‘अबला’ असल्याची भावनामुलींना तसे करू देत नाही. पण महावीरसिंग यांच्या मुली गीता आणि बबिता यांनी त्यांना चिडवल्यानंतर मुलांना असा काही चोप दिला की, महावीरसिंग यांना मुलींमध्ये कुस्तीगीर होण्याचे गुण दिसून आले. त्यातून त्यांना एक गोष्ट समजली ती म्हणजे मुलगा काय आणि मुलगी काय, सुवर्णपदक तर सुवर्णपदकच आहे. मग ते मुलगा आणू किंवा मुलगी यात फरक काय! या विचाराबरोबरच ते पुन्हा जिद्दीने आपल्या स्वप्नाचा पाठलाग करू लागतात.
महावीरसिंग यांच्या मुलींना कुस्तीगीर बनविण्याच्या अट्टाहासामुळे गीता आणि बबिता या मुलींच्या तारुण्यसुलभ भावनांचा चुराडा होतो. त्यांना इतर मुलींसारखे जगता येत नाही. त्या, इतर मुली जे खातात ते खाता येत नाही, इतकेच काय डोक्यावर केस ठेवता येत नाहीत. ग्रामीण पुरुषप्रधान समाजात त्यांची टिंगल-टवाळी होते. मुली निराश होतात. पण ही त्यांची निराशा जिद्दीत बदलते ती एका घटनेमुळे. गीता आणि बबितासमोर आपले दुःख व्यक्त करताना म्हणतात, ‘असला बाप कोणाला न मिळो.’ त्या वेळी ती लग्न होऊ घातलेली मुलगी त्यांना म्हणते ‘तुमचे वडील खरे चांगले आहेत, ते- तुम्ही जीवनात काहीतरी करून दाखवावे म्हणून कष्ट घेत आहेत. इतर वडील मुलींकडे ढुंकूनही पाहत नाहीत. मुलगी त्यांना ओझ्यासारखी वाटते आणि तेरा-चौदा वर्षांची झाली की लग्न करून मोकळे होतात. तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला असे वडील लाभले.’ इथे समस्त पालकांना मुलींच्या संदर्भात एक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. मुलगा आणि मुलगी समान आहेत, हे तत्त्व व्यवहारात उतरायला हवे, असे या ठिकाणी सुचवलेले आहे, जे अतिशय महत्त्वाचे आहे.
कुस्तीच्या खेळाच्या निमित्ताने या चित्रपटाने पुन्हा एकदा एकंदर खेळासंबंधीची राष्ट्रीय पातळीवरची सरकारी अनास्था पुढे आणली आहे. भ्रष्टाचार, वशिलेबाजी या गोष्टी आहेतच, त्यातून आत्मविश्वास नसलेले प्रशिक्षक, केवळ तांत्रिक गोष्टीपलिकडे काही ज्ञान ज्यांच्याकडे नाही, असे प्रशिक्षक गुणवान खेळाडू घडवू शकत नाहीत. त्यामुळे 125 कोटींचा हा देश ऑलिंपिकमध्ये एकही सुवर्णपदक जिंकू शकत नाही. अर्थात, त्याचीही लाज समाजाला, देशाला आणि याला जबाबदार असणार्या खेळाच्या राष्ट्रीय संस्थांना वाटत नाही. शिवाय, हे नुसते आरोप नाहीत तर महावीरसिंग फोेगट यांचे हे अनुभव आहेत. अर्थात, एकलव्याचा अंगठा कापण्याची परंपरा असणार्या द्रोणाचार्यांच्या या देशात यापेक्षा वेगळं काही घडणे शक्य नाही.
जातिसंस्थेवर आधारित संस्कृती ही मुळात क्रीडाविरोधी, स्पर्धेविरोधी आहे. समान संधीचे तत्त्वच तिने पायदळी तुडवलेले आहे. काही जन्मतः गुणवान, तर काही जन्मतः गुणहीन अशी परिस्थिती क्रीडा संस्कृती जोपासत नाही. अमूक लोकांना स्पर्श करायचा नाही, अमूक प्राण्याचे मांस खायचे नाही, अशी जातीय मानसिकता असणारी संस्कृती गुणवान खेळाडू घडवूच शकत नाही. त्यामुळेच राष्ट्रीय अशा खेळांच्या परंपराच अस्तित्वात नाहीत. खेळात, कलेत, साहित्यात सगळीकडे जाती घुसल्या आहेत. खेळ कसे जातीयच बनवले आहेत, यात बुद्धिबळ आणि पैलवानकी या दोन गोष्टीतील जाती पाहा. असाच निकष सगळीकडे लावला तर काय चित्र दिसेल ते पाहा. ते जातीयच आहे.
आता कुठे ऑलिंपिकमध्ये कविता राऊत, ललिता बाबर, दीपा कुमारी, लक्ष्मीकुमारी अशा दलित, आदिवासी कष्टकरी वर्गातल्या आणि त्यातही स्त्रिया येऊ लागल्या आहेत. ते स्वातंत्र्यानंतरच्या परिस्थितीमुळे. रंगभेद आणि वंशभेद मानणार्या अमेरिकेसह युरोपियन देशांमध्ये जसजसे हे भेद कमी होत गेले आहेत, तसतसे रंगाने काळे असणारे खेळाडू या देशांचे भविष्य बनले आहेत. यावर खरेतर खूप लिहिता येईल. तूर्तास एवढेच.
महावीरसिंग फोगट आपल्या मुलींना उपदेश करताना जे म्हणतात, ते या चित्रपटाचे अंतिम सार आहे – ‘मुली तू केवळ ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या विरुद्ध लढत नाहीस तर त्या तमाम विचारांविरुद्ध लढत आहेस जे स्त्रियांना कमी लेखतात. चूल आणि मूल हेच त्यांचं क्षेत्र मानतात’ सर्व मुलींनी हा संदेश मनावर बिंबवला पाहिजे. अखेरीस आज द्रोणाचार्यांच्या विचारांचेच सरकार राज्य करत आहे. तेव्हा एकलव्यांनो, सावधान! अंगठा शाबूत ठेवा.
–सुभाष थोरात
लेखक संपर्क : 9869392157