Categories
कथा बालविभाग

देवरसी विठ्ठल बापू

वार्षिकांक - २०१५

‘अंनिस’चे कार्यकर्ते विजय पवार, सुनील पाटील आणि राजाराम म्हस्के यांचा कार्यक्रम आम्ही शाळेत आयोजित केलेला होता. आम्ही नऊ शिक्षक, दोनशे विद्यार्थी, काही पालक कार्यक्रम भान हरवून पाहत होतो. अंधश्रद्धेने माणूस कसा पिडला आहे. तो कसा अंधश्रद्धेच्या जोखडात अडकवला जातो आहे आणि त्यावर भोंदूबाबा कसे स्वत:चे पोट भरत आहेत, हे ‘अंनिस’चे कार्यकर्ते छोट्या नाटकाच्या रूपात दाखवीत होते.

या नाटकात एक साधूबाबा त्रिशूळ आपल्या जिभेत खोचून घेतो. त्रिशूळ आरपार जिभेत शिरते. परंतु रक्ताचा एक थेंबही जिभेतून निघत नाही.

नंतर एक व्यापारी येतो आणि साधूबाबाला सांगतो, ‘बाबा माझे सोने, चांदी पकवून शुद्ध करून देण्याचे गलाई दुकान आहे. पण माझे दुकान चालत नाही. काय झाले आहे, ते सांगा. माझे दुकान व्यवस्थित चालण्यासाठी काहीतरी उपाय करून द्या.’

बाबा ध्यानस्थ बसण्याचे नाटक करतात. म्हणतात, ‘बच्चा तुझे दुकान पूर्वी खूप जोरात चालायचे.’

‘होय बाबा.’

‘आता ते चालत नाही’

‘होय बाबा’

‘तुझ्या दुकानापासून पलिकडच्या गल्लीत आणखी एक दुकान आहे.’

‘माझ्या दुकानापासून जवळच माझ्या गल्लीत दोन दुकाने पलिकडच्या गल्लीत आहेत बाबा.’

‘तेच सांगतोय बच्चा…. त्यातील एक दुकानदार वरकरणी तुझा मित्र आहे; पण आतून म्हणजे मनातून तो तुझा शत्रू आहे. तो तुझ्या उत्कर्षावर जळतो.’

‘होय बाबा, ते सारेच दुकानदार माझ्यावर जळफळतात’

‘मी तेच सांगतोय बच्चा…. ती तेच सांगतोय जरा ऐकून घे.’ बाबा खवळले.

‘चुकी झाली, चुकी झाली बाबा,’ तो दुकादार म्हणाला. पाया पडायचे नाटक करू लागला.

‘त्यातील एका दुकानदाराने तुझ्यावर करणी केलीय’

‘करणी ती कशी काय? काय केलेय त्याने?’

त्याने तुझे दुकान चालू नये म्हणून भानामती केलीय. तुझे सारे गिर्‍हाईक त्याच्या दुकानात जाते.

‘बाबा हे सारे खरे आहे हो…. आता मी काय करू,’ तो दुकानदार रडायचे नाटक करू लागला.

‘रडू नकोस बच्चा रडू नकोस. हा एवढा मोठा जिता जागता बाबा तुझ्या पाठीशी असताना तू काळजी कसली करतोस?…. मी तुझी करणी काढून देईन.’

“गोंदू बाबा की जय…… गोंदू बाबा की जय.’

पण बच्चा थांब. आनंदाने लगेच हुरळून जाऊ नकोस.. करणी काढणे सोपे काम नसते. करणी माझा जीवसुद्धा घेऊ शकते.’

‘मग बाबा मी काय करावे….? तुम्ही सांगाल ते मी करीन.’

‘तू काहीही नाही करायचे बेटा…. तू फक्त मला दहा हजार रुपये द्यायचे; मग बघ मी तुझ्यावर केलेल्या करणीचा बंदोबस्त करतो. तुझे दुकान एकदम फुल्ल गिर्‍हाईकात सुरू होईल. तुझी सारी जीवनाची चिंता मिटेल.’

“बाबा मी दहा हजार रुपये द्यायला कबूल आहे. हे घ्या दहा हजार रुपये.’ तो दुकानदार एक नोटा भरलेली पिशवी त्याच्या हवाली करतो.

मग तो गोंदूबाबा नामक भोंदूबाबा हातात एक लिंबू देतो आणि तो मधून कापतो. त्यामध्ये रस भरलेला असतो. तो ते लिंबू एका काचेच्या ग्लासात पिळतो. लिंबाचा पांढरा रस त्यातून बाहेर पडतो.

तो गोंदूबाबा तो ग्लास सर्वांना दाखवितो आणि सांगतो, ‘मुलांनो आणि दुकानदार तुम्ही पाहिलेत मी लिंबू कापले त्यातून पांढरा लिंबाच्या रसासारखाच रस बाहेर पडला…. पहा…’ बाबा रस हलवतात आतील रस हालतो. या दुकानदारावर त्याच्या शत्रूने करणी केलेली आहे. ती करणी म्हणजे दुकानदाराचे सर्व गिर्‍हाईक ती करणी पळवून दुसर्‍या दुकानात नेते. मी माझ्या मंत्र सामर्थ्याने ती करणी या लिंबवात बंद करतो आणि तिचा या लिंबात बळी घेतो. त्या करणीला कायमचे संपवितो. या लिंबाचे मी तुकडे केले तर त्या करणीचे तुकडे होतील. पाहाच माझे मंत्र सामर्थ्य. फक्त रक्त पाहून कुणी घाबरू नका.’

त्या गोंदाबाबाने सर्व विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या पालकांच्या समोर लिंबू कापले आणि काय आश्चर्य त्या लिंबातून टप टप टप रक्त गळू लागले. बाबाने ते लिंबू दुसर्‍या काचेच्या ग्लासात पिळले. त्या ग्लासात लाल भडक रक्त जमा झाले.

नंतर बाबांनी आपला वेष फेकून दिला. ते अंनिसचे कार्यकर्ते सुनील पाटील होते. त्यांनी जिभेत खुपसलेले त्रिशूळ दाखविले. ते जिभेत न शिरता त्याला असलेल्या वाकड्या भागात जीभ बसवली होती. पहिले लिंबू एका चाकूने कापले होते तो साधा चाकू होता. दुसरे लिंबू कापले त्या चाकूला… आम्ल लावलेले होते. त्याच्या संयोगाने लिंबाच्या रसावर प्रक्रिया होऊन लिंबाचा रस रक्तासारखा लाल झालेला होता.

आता सुनील पाटीलने सांगितले, ‘मित्रांनो, यात भानामती जादू नव्हती हे विज्ञानाचे प्रयोग आहेत. या विज्ञान प्रयोगाची माहिती सामान्य लोकांना नसते. भोंदूबाबा त्याचा गैरफायदा घेतात आणि भोळ्या-भाबड्या लोकांना फसवतात तर अशा बुवाबाजीला फसू नका. जगात जादू, चमत्कार, करणी, भूत प्रेत, संमथ वगैरे काहीही नाही. कोणी असे लोकांना लुबाडत असेल तर आमचा पत्ता तुमच्या गुरुजींच्या जवळ आहे. आम्हाला कळवा, आम्ही लोकांची फसवणूक थांबवू.’

‘अंनिस’च्या सर्व मित्रांचा कार्यक्रम मुलांना, शिक्षकांना खूप आवडला. कार्यक्रमानंतर ऑफिसमध्ये पाहुण्यांना चहापान झाला. पाहुणे निघाले. कारण याच गावात दुसर्‍या शाळेत त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता.

मी पाहुण्यांच्या शाळेतच होतो. तेवढ्यात ऑफिसच्या खिडकीबाहेर दोन-तीन मुले आलेली आहेत, असे मला दिसले. मुलांचे काही काम असेल असे वाटून मी बाहेर आलो.

बाहेर इयत्ता सातवीतील श्रीरंग गायकवाड, सहावीतील वसंत पवार आणि सहावीतीलच मनोज माने हे विद्यार्थी उभे होते.

मी विचारले, ‘काय रे बाळांनो, काय हवे आहे?’ मनोज धीटपणे म्हणाला, ‘गुरुजी पाहुण्यांना आम्हाला भेटायचे आहे.’

‘का रे…. काही काम आहे का?’

‘गुरूजी आमच्या घराच्या पलिकडे म्हणजे गायकवाड वस्तीवर विठ्ठल बापू गायकवाड आहेत ना? ते बापू लई मोठे देवरसी आहेत. अश्या करण्या काढतात. कुणाला धंद्यात बरकत नाही म्हणून चिकूंबा देतात. दरबार भरतूया त्यांचा. त्यांनी माती खायला दिली ना ती माती साखरेपेेक्षा गोड लागतीया.’ श्रीरंग गायकवाड म्हणाला.

‘गुरुजी येल्लमादेवी अंगात येतीया त्यांच्या,’ मनोजने माहिती पुरवली.

‘प्रत्येक रविवारी आणि शुक्रवारी त्यांच्या वस्तीवर गाड्या लावायला जागा नसतीया,’ वसंत पवार म्हणाला.

मी या तीनही विद्यार्थ्यांना पाहुण्यांना भेटवले. पाहुणे फार गडबडीत होते. कारण दुसर्‍या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक त्यांची वाट पाहत होते. ते म्हणाले, ‘गुरुजी तुम्ही यांची सर्व माहिती घ्या. प्रत्यक्ष जाऊनही पाहा, आपण त्या बापूचे पोल खोलू. आम्ही नंतर भेटू.’

विशेष म्हणजे विठ्ठलबापूंचा मुलगा शांताराम गायकवाड आमच्याच शाळेत होता. तो इयत्ता पाचवीत होता.

मी दुसर्‍या दिवशी शांतारामला ऑफिसमध्ये बोलावून घेतले आणि विचारले, ‘अरे शांताराम, तुझ्या बापूंच्याकडे खूप लोक येतात म्हणे. बापूंना ही करणी…. भूत-बाधा वगैरे याची माहिती आहे का?’

मी हे विचारले तेव्हा मुद्दामच मी श्रीरंग, वसंत, आणि मनोज यांनाही ऑफिसात बोलावले होते.

शांताराम काही क्षण गप्प बसला. तोवर श्रीरंग म्हणाला, “शांतारामच्या बापूंना यल्लमादेवी प्रसन्न आहे. दररोज सूर्य उगवायला ते ओढ्यातील यल्लम्मादेवीचे मंदिर आहे ना तेथे देवीची साग्रसंगीत पूजा करतात. त्यामुळे यल्लाम्मादेवी प्रसन्न आहे त्यांना.’

शांताराम म्हणाला, ‘गुरुजी आमच्या बापूंच्याकडे असा जादूटोणा, चिटकूळ, कर्ण पिशाच्च असले काहीही नाही. आमचे बापू यल्लमादेवीचे मोठे भक्त आहेत. लहानपणापासून पहाटे उठून अंघोळ करून सूर्य उगवायला ते देवीची पूजा करतात. गुरुजी पाऊस असो, थंडी असो नाही तर ऊन असो, आमचे बापू देवीची पूजा चुकवीत नाहीत. त्यामुळं देवीचे वारं त्यांच्या अंगात येतं. मग बापू जे बोलतील ते खरं होतं.’

आम्ही शांतारामला काहीच बोललो नाही. त्याला त्याच्या वर्गात जायला सांगितले. मी, श्रीरंग, वसंत आणि मनोज ऑफिसमध्ये बोलत बसलो.

‘हे शांतारामचे वडील विठ्ठलबापू गायकवाड काय उद्योग करतात रे?’ मी मुलांना विचारले. मुले म्हणाली, ‘गुरुजी ते काहीही उद्योग करीत नाहीत. त्यांची बायको म्हणजे शांतारामची आई चार-पाच म्हसरे राखते. एक गायही राखते. पूर्वी विठ्ठलबापूंची दोन बैले होती पण अलिकडे त्यांनी ती विकून टाकली असावीत.’

‘मग हे तुमचे बापू करतात काय?’

‘अहो, त्यांच्यावर यल्लम्मादेवी प्रसन्न आहे. एवढे भक्त त्यांच्येकडे येतात. त्या भक्तांना ते फकस्त आशिर्वाद देतात आणि भक्त त्यांना पैसे देतात.’

‘अरे, पण आशीर्वादावर कोण पैसे देते का….?’

‘गुरुजी येत्या रविवारी तुम्ही बघायलाच या आणि मग आम्हाला सांगा,’ मुले म्हणाली.

रविवारी मी व माझे मुख्याध्यापक विठ्ठलबापूंचा दरबार पाहायला गेलो. माझा विद्यार्थी शांताराम बाहेरच भेटला.

वीस बाय वीस फूट लांबी रूंदीच्या हॉलमध्ये बापूंचा दरबार भरलेला होता. पंधरा वीस स्त्रिया पंधरा-वीस पुरुष ओळीने बसलेले होते. एका मोठ्या पाटावर शुभ्र विजार, चकाकणारा शुभ्र नेहरू शर्ट, वर नवी कोरी टोपी, कपाळावर कुंकुमतिलक असे तरुण दिसणारे पस्तिशीतले विठ्ठलबापू बसले होते. गोरेपान, ओठावर मिशाचा बारीक कट. हातातील आठ बोटांत ग्रहांच्या अंगठ्या आणि ओठावर मधाळ हास्य. ते बसलेले होते, त्याच्या जवळच पाटावर तीन-चार कापडात बांधलेले ग्रंथ रचून ठेवलेले होते. त्यावर फुले घातली होती. जवळ पंचांग होते. त्यांच्या समोर एक चौरंग ठेवलेला होता. चौरंगावर लाल रंगाचे कापड अंथरलेले होते. त्यावर कोपर्‍यात अर्धी वाटी तांदळाचा ढीग होता. अगरबत्तीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. शांतारामने बापूंना सांगितले, ‘हे आमचे गुरूजी व हेड गुरुजी आहेत.’

बापूंनी आम्हाला आदराने नमस्कार घातला बसा म्हणाले.

तेवढ्यात एक भक्त आला. बापूंच्या चौरंगाच्या पलिकडे एक स्टीलचे मारेठे नक्षीदार भांडे ठेवले होते. यल्लम्मा देवीचे फोटो भिंतीवर होते. बरोबर त्याच्या खाली ते भांडे होते. त्यात त्या भक्ताने पाचशे रुपयांची नोट टाकली. बापू प्रसन्न हसले. तो भक्त म्हणाला, ‘बापू माझे काम अद्यापी झालेले नाही. केव्हा होईल?’

बापू प्रसन्नपणे म्हणाले, ‘होईल नक्की होईल. विश्वास ठेवा. श्रद्धा ठेवा. एकदा आईने तुमचे काम होईल असा कौल तुमच्या समोर दिलेला आहे. तुमचे काम होणारच. काही अडचणी असतील. माता सर्वश्रेष्ठ आहे. आपल्यापेक्षा तिला जास्त समजते. तिला आपली काळजी आहे. तुमचे काम शंभर टक्के हुनारच.’

तो भक्त पाया पडला आणि ओळीच्या मागे जाऊन बसला.

दुसरा सुशिक्षित गृहस्थ पुढे सरकला.

यल्लम्मादेवीच्या फोटोच्या, ग्रंथाच्या पाया पडला. खिशातील नोट काढून त्या नक्षीदार भांड्यात टाकली. त्याने मागे वळून पाहिले. त्याची पत्नी व मुलगी पुढे आली.

‘बापू हिचे लग्न ठरत नाही. पाहुणे येतात; पण नकारच मिळतो.’

बापूंनी डोळे मिटले. जवळचे पंचांग चाळले. तांदळाच्या ढिगातील चिमूटभर तांदूळ घेतले. चौरंगावर मोजले. डोळे मिटून यल्लमाआईचे स्मरण केले. म्हणाले, ‘थोड्या अडचणी आहेत. रविवार गाठून तुमच्या कुलदेवतेला सव्वाशेर वजनाचे लाडू अर्पण करा व तेवढेच प्रसाद म्हणून मंदिरात वाटा.’ बापूंनी इकडे-तिकडे पाहिले. पलिकडेच एक प्लॅस्टिकचा चौकोनी डबा होता. त्यातून त्यांनी पंचरंगी दोरा काढला. तो त्या गृहस्थाच्या हातावर ठेवला. त्यावर थोडे हळदी-कुंकू टाकले. थोडे तांदूळ टाकले. जवळचा कागदाचा तुकडा दिला. त्यात त्या दोर्‍याची पुडी बांधली आणि सांगितले, ‘घरात देव्हार्‍यात पुडी ठेवा. अगरबत्तीने ओवाळा. आणि ताईच्या गळ्यात बांधा. येत्या काही दिवसांत तिचे लग्न ठरेल.’

कोणा भक्ताच्या मुलीला नांदवत नव्हते, कोणा भक्ताची सून त्रास देत होती. कोणाचे दुकान चांगले चालायला हवे होते, कोणाचा बैल आजारला होता. कोणाचा पती जास्त दारू पित होता. भक्त आपली नाना दु:खे बापूंना सांगत होते. विठ्ठलबापू प्रसन्न, हसून प्रत्येकाच्या समस्येवर तोडगे सांगत होते. पण हळूच चोरट्या नजरेने तो भक्त किती पैसे त्या भांड्यात टाकतोय हे पाहात होते.

त्यांनी मला विचारले, ‘गुरुजी बोला तुम्ही का आलाय?’

मी पन्नास रुपयांची नोट त्या भांड्यात टाकली आणि सांगितले, ‘मला नवे घर बांधायचे आहे.’

बापूंनी डोळे मिटले. उघडले. सांगितले, ‘पुढच्या महिन्याची अमावश्या झाल्यानंतर तुम्ही त्या प्रयत्नाला लागा. तोपर्यंत शांत रहा.’

बापूंचा हा दरबार पूर्ण लबाडीचा आणि खोटेपणाचा कळस असलेला आहे. कोणीही शहाणा माणूस ओळखू शकत होता. दु:खी, कष्टी, अंधश्रद्धाळू समाजाचा बापू गैरफायदा घेत होते. ते दुनियेला अंधश्रद्धेत झुकवित होते. समस्येवर तोडगा घेऊन लोक जात होते. नवे येत होते.

विठ्ठलबापूंचा दरबार हाऊसफुल्ल सुरू होता. माझे विद्यार्थी श्रीरंग, वसंत आणि मनोज दुसर्‍या दिवशी मला भेटले. म्हणाले, ‘गुरुजी विठ्ठलबापू पूर्वी भरपूर दारू प्यायचे. आता त्यांनी ती सोडलीय. या भरपूर दारू पिणार्‍या माणसावर देवी कशी काय प्रसन्न होते..? ‘अंनिस’च्या लोकांनी सांगितले तशी बापूंची ही बुवाबाजी आहे.’

त्या मुलांनीच विठ्ठलबापूंचा मुलगा शांताराम याला परोपरीने सांगून बापू कशी नाटके करताहेत? लोकांना कसे फसवताहेत, हे समजावले. त्यालाही ते पटले. बापूंचा हा उद्योग थांबविला पाहिजे, असे शांताराम यालासुद्धा वाटू लागले.

शांतारामने एक दिवस बापूंना सांगितले, ‘बापू अंनिस या संस्थेचे लोक आमच्या शाळेत आलेले होते. त्यांनी बुवाबाजीवर ढोंगी साधूवर एक नाटक दाखवले. पोलीसही अशा लोकांना पकडतात म्हणून सांगितले. तुमची जर ही ढोंगबाजी असेल तर ती बंद केलेली चांगले, असे मला वाटते. शांताराम शहाण्या मुलासारखा बोलला.

बापू म्हणाले, ‘शांताराम, तुला कोणीतरी माझ्याविषयी वाईट सांगितलेले दिसते. अरे, आपण कुणाला फसवत नाही. मुद्दाम पैसे मागत नाही. लोक त्यांची कामे झाल्यावर स्वेच्छेने पैसे देतात. मग फसवायचा प्रयत्न येतोय कुठे? असले तू काही डोक्यात घेऊ नको. शाळा शिक. अभ्यास कर. मोठा हो. नसत्या फंदात पडू नको.’

हे नंतर शांतारामने आम्हाला शाळेत सांगितले, श्रीरंग, वसंत, मनोज यांना घेऊन मी शांतारामच्या पाठिमागेच लागलो.

एक दिवस शांतारामने वडिलांना विचारले, ‘बाबा तुम्ही देवीच्या कृपेने लोकांचे भाग्यच बदलवून टाकता. मग मी शाळेत कशाला जाऊ? शाळा न शिकताही देवीच्या कृपेने माझे भाग्यच बदला. मला एवढे श्रीमंत करा की, मला काही उद्योगधंदा करायला नको. आपोआप मला चालून पैसे येऊ द्या.’

विठ्ठलबापू क्षणभर अवाक्च झाले. त्याच आठवड्यात ‘अंनिस’चे कार्यकर्ते नकली आजारी माणूस घेऊन विठ्ठलबापूंच्या दरबारात गेले. ‘या आमच्या माणसाला देवीचे तीर्थामृत पाजून रोगमुक्त करा. आम्ही देवीच्या मंदिरासाठी हवी तेवढी देणगी देतो.’ कार्यकर्ते म्हणाले.

बापूंना वाटले, बरे झाले. मोठे पैसेवाले भक्त भेटले. बापूंनी गंडे दोरे दिले. देवीच्या पायाचे तीर्थ मंत्रून एका कुपीतून दिले. ‘सहा महिन्यात याला ठणठणीत करतो…. मला काही नको पण देवीला पाच तोळे सोन्याचे दागिने घाला,’ असा बापूंनी आग्रह धरला.

‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी बापूंना आपले खरे रूप दाखविले. आम्ही पोलिसांची मदत घेऊन आपणास अटक करू शकतो म्हणून सांगितले.

हा माणूस मुळात आजारी नाही. तुम्ही किंवा तुमच्यात संचार करणारी देवी त्यांना ओळखू शकली नाही. हे ढोंग बंद करा. नाही तर पोलीस कस्टडीत चला हा ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांचा रोकडा सवाल ऐकून बापू गर्भगळीत झाले.

त्यांनी ‘मी हे देवी प्रसन्न असलेचे ढोंग केलेले होते,’ हे कबूल केले. ‘मी इथून पुढे लोकांना फसवणार नाही. हा देवरसपणा बंद करतो,’ असे ते म्हणू लागले.

‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी बापूंच्याकडून हे लेखी लिहून घेतले. शांतारामलाही आपले वडील या अंधश्रद्धेच्या जोखडातून सुटले, याचा आनंद झाला. त्यानंतर विठ्ठलबापूंनी आपला देवरसपणा कायमचा सोडला आणि पूर्वीसारखे बैल पाळून शेती करून ते जगू लागले.

लेखक रघुराज मेटकरी

संपर्क – 9850482153