Categories
कथा बालविभाग

धाडसी शिवराज

वार्षिकांक - २०१५

शिवराज हा इयत्ता 8 वी मध्ये शिकणारा विद्यार्थी. माझी आणि शिवराजची ओळख याच शैक्षणिक वर्षाच्या जून महिन्यापासून झाली.

तो इयत्ता 7 वी पास झाला आणि इयत्ता 8 वीत हायस्कूलमध्ये दाखल झाला. माझा 8 वीला अध्यापनाचा विषय सामान्य विज्ञान. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता असल्याने व मुळातच विज्ञान शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना अधिकाधिक विज्ञाननिष्ठ व धाडसी बनविण्याचा मनोमन संकल्प. यातूनच शिवराज घडत गेला. इयत्ता 8 वीला विज्ञानाचा पहिला पाठ ‘तारे आणि आपली सूर्यमाला’ ः शिकविण्याचे माध्यम हिंदी ः या धड्यात सूर्य आणि ग्रहमाला, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, मंगळ व शनी ग्रह याविषयी असलेले अज्ञान व गैरसमज आणि अंधश्रद्धा या कशा फोल आहेत, याची अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना शिवराज मन लावून एकाग्र चित्ताने ऐकत असे. अशा उदाहरणांमुळे त्याची विचारप्रक्रिया ढवळून निघत असे. त्याचा परिवार तसा कमी शिकलेला, अशिक्षित असल्याने आई-वडील हे अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेले. शिवराज मात्र आता विचार करू लागला. पूर्वी त्याला रात्र झाली की बाहेर अंधाराची भीती वाटायची आणि तो बाहेर जाण्याला घाबरायचा. त्याला अंधारात भुते आहेत, असे वाटायचे. आता मात्र तो अंधाराला अजिबात घाबरत नाही. भुतं खेतं नसतात हे त्याला कळलेय.

अमावस्येला शिवराज सायकलवरून खाली पडला आणि त्याला थोडा मार लागला. तो घरी गेला त्याची आई घाबरली. तिला वाटले अमावास्येचा फटका बसलाय पोराला. तिने लगबगीने घरातून भाकर व अंडे काढले; ते शिवराजवरून उतरले व बाहेर रस्त्यावर टाकले. शिवराजला हे पटत नव्हते. तो आईवर ओरडत होता, असे काही करू नको म्हणत होता; मात्र आईने ऐकले नाही. याचा शिवराजला राग आला. तो रागारागाने बाहेर पडला. आईने टाकलेली अंडी व भाकरी त्याने पायाने तुडवली. या कृतीने शिवराज चांगलाच धीट झाला होता. पुढे तो अनेक कारणांवरून अंधश्रद्धेबाबतीत वाद घालायचा. एकदा तर कहरच झाला. शिवराजची लहान बहीण आजारी पडली. आई तिला कालीकूर्ती परिसरात राहणार्‍या फकिराच्या घरी घेऊन जाण्यासाठी निघाली. त्या ठिकाणी फकिराच्या येथे चौकी लागत असे व अंगारे-धुपारे होत असत. शिवराजला हे पटत नव्हते; त्याला कळत होते की असे अंगारे-धुपारे केल्याने आजार बरे होत नाहीत. त्यासाठी डॉक्टरांचेच उपचार महत्त्वाचे. त्याने आईशी वाद घातला. बहिणीला त्या फकिराकडे नेऊ नको असे विनवू लागला. आई मात्र ऐकत नव्हती. आता शिवराज मात्र पुरता पेटून उठला. आईला माघार घ्यावी लागली. बहिणीचा हात आईच्या हातून सोडवून त्याने वेगळे केले आणि आपण आता डॉक्टरकडे जाऊ, असे फर्मावले. आई मात्र आता तयार झाली. डॉक्टरच्या उपचाराने बहिणीला बरे वाटले.

आईलाही आता शिवराजचे म्हणणे पटले. शिवराज मनोमनी आनंदी होता. जणू काही मोठी लढाई जिंकली, असे त्याला या घटनेमुळे वाटू लागले. बहिणीला फकिराच्या चौकीत नेण्यापासून आईला थांबविणारा शिवराज कटाक्षाने अंधश्रद्धेच्या विरोधात पेटून उठला आहे. अमावस्येच्या दिवशी वडिलांच्या हॉटेलसमोर काळी बाहुली व मिरची घेऊन येणार्‍या व्यक्तींना तो पिटाळून लावतो. शिवाय गंडेदोरे, लिंबू, नारळ, अंडे यांना पायाने धुडकून लावतो. शनी कुणाच्या मागे लागत नाही व मंगळ कुणाला त्रास देत नाही हे तो दुसर्‍यांना सांगतो. अमावस्या व पौर्णिमेला बाहेर पडण्यास आईने मज्जाव केल्यावरही शिवराज मात्र एकटाच न घाबरता बाहेर पडतो. खरंच शिवराजचे हे मोठे धाडसी पाऊल अगदी लहान वयापासून वैज्ञानिक दृष्टी घेऊन पडते आहे.

-मधुकर गायकवाड