Categories
वैज्ञानिक दृष्टिकोन

देशभर 20 ऑगस्टला साजरा होणार राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस

ऑगस्ट - २०१८

ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ने देशभरात 20 ऑगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यासंदर्भातील ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’चे समन्वयक डॉ. विवेक मॉन्टेरो यांचा लेख देत आहोत.

20 ऑगस्ट 2013 रोजी भारतभरातले लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते बंगळुरूमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस’ येथे एका राष्ट्रीय कार्यशाळेसाठी जमले होते. तेव्हाच धर्मांध दहशतवादी अतिरेक्यांनी पुण्यात केलेल्या डॉ. दाभोलकरांच्या हत्येची बातमी येऊन थडकली. तातडीने सर्व वैज्ञानिक आणि कार्यकर्ते एकत्र जमले आणि त्यांनी पुढील ठराव पास केला –

“आज पुण्यात अतिरेक्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा भ्याड खून केला. त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. धर्मांध दहशतवादी संघटनांकडून डॉ. दाभोलकरांना सतत धमक्या येत होत्या, हे आधीपासून माहीत होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि भोंदू बाबा-बुवा-तांत्रिक करीत असलेल्या फसवणुकीचा पर्दाफाश करण्याचे काम डॉ. दाभोलकर कोणत्याही धमक्यांची पर्वा न करता, धैर्याने करीत राहिले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते. ‘साधना’ या पुरोगामी साप्ताहिकाचे संपादक म्हणून ते काम करीत होते.

नरेंद्र दाभोलकरांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन त्यांचे कार्य आणि ध्येय पुढे नेण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना, धर्माच्या नावाखाली चाललेल्या दिशाभुलीला आणि धर्मांध दहशतवादाला विरोध करण्याची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याची आम्ही प्रतिज्ञा घेत आहोत.

भारतीय राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, समानता आणि लोकशाही या मूल्यांचा आधार घेऊन ती भारतातील प्रत्येक शाळेपर्यंत आणि गावागावांपर्यंत नेण्यासाठी आम्ही काम करू.”

गांधीजींची हत्या करून त्यांचा संदेश आणि मूल्ये जशी थांबवता आली नाहीत, तशीच डॉ. दाभोलकरांची मूल्ये आणि विचार या भ्याड खुनामुळे थांबवता येणार नाहीत. लोकविज्ञान चळवळीमध्ये कार्यरत असलेले आम्ही सर्वजण अधिक जास्त निर्धाराने आणि जोमाने व्यापक स्तरावर लोकांमध्ये विज्ञानाचा आणि वैज्ञानिक विचारपद्धतीचा प्रसार करू आणि धर्मांध दहशतवादाविरुद्धची ही विचारांची लढाई जिंकू.

यापुढे दरवर्षी देशभर 20 ऑगस्टला साजरा होणार राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणजे हा निर्धार प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’च्या 15 व्या काँग्रेसमध्ये देशपातळीवर हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अनेक संस्था-संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचे माजी संचालक प्रा. नरेश दधिच यांनी तयार केलेल्या पुढील निवेदनास प्रा. जयंत नारळीकर, प्रा. स्पेंटा वाडिया आणि इतर अनेक वैज्ञानिकांनी आणि शिक्षणतज्ज्ञांनी पाठिंबा दिलेला आहे.

‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’च्या प्रसाराबाबतचे निवेदन

वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारक वृत्ती वाढवणे व त्यांचा प्रसार व प्रचार करणे, हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 (ह) नुसार भारताचे नागरिक म्हणून आपलं मूलभूत कर्तव्य आहे. केवळ तेवढंच नाही, तर 21 व्या शतकातील जागतिक समाजाचा घटक म्हणूनही ते आपलं मूलभूत आणि सामूहिक कर्तव्य आहे.

या कामाकडे आजवर आपण पुरेसं लक्ष दिलेलं नाही, त्यासाठी आवश्यक तितकी बांधिलकी दाखवलेली नाही, असं आम्हाला वाटतं. त्याऐवजी, विरुध्द दिशेने जाण्याचे, चिंताजनक आणि अस्वस्थ करणारे आक्रमक प्रयत्नच जास्त होत आहेत. म्हणूनच जास्त जोमाने, उत्साहाने, पद्धतशीरपणे आणि सातत्याने सर्व पातळ्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचे कार्य तातडीने हाती घेण्याची आवश्यकता आहे. हे काम पुढे नेण्यात शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका विशेष महत्त्वाची आणि निर्णायक असणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार हे केवळ वैज्ञानिकांचे काम नसून भारतीय लोकशाहीतील सर्व नागरिकांचे आहे.

सध्याच्या काळातल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या खंद्या पुरस्कर्त्यांमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर अग्रेसर होते. आपल्या व्याख्यानांमधून आणि लेखांमधून त्यांनी हा विषय समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत नेला. 20 ऑगस्ट हा त्यांचा हौतात्म्य दिवस देशभरात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून साजरा करणे हे त्यामुळे अगदी योग्य आहे.

येथे सह्या केलेले आम्ही सर्वजण, या मोहिमेला पाठिंबा देत आहोत. बहुश्रुत आणि तर्कनिष्ठ लोकांचा विवेकी आणि मानवतावादी भारत घडविण्यासाठी सर्व जाणत्या आणि जागरूक नागरिकांनी, शैक्षणिक संस्था- संघटनांनी या सामूहिक राष्ट्रीय प्रयत्नात सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत.

हा दिवस भारताच्या सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निश्चित साजरा होईल, याची हा लेख लिहित असताना खात्री आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा कार्यक्रम 20 ऑगस्टपूर्वी सुरू होईल आणि त्यानंतरही चालू राहील.

राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस साजरा करण्याच्या दृष्टीने ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ने बरेच साहित्य तयार केलेले आहे. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावरची डॉ. नरेंद्र दाभोलकरांची मराठीतील दोन व्याख्याने इंग्रजी आणि इतर आठ भारतीय भाषांमध्ये भाषांतरित होत आहेत. यात हिंदी, तमिळ, मल्याळम्, तेलुगू, कानडी, असामी, ओरिया आणि बंगाली या भाषांचा समावेश आहे. त्या लेखांच्या पुस्तिका छापून लाखो प्रतींमध्ये त्यांचे वितरण होणार आहे.

या मोहिमेसाठी ईज्ञ थहू अशी घोषणा (विचारा, – ‘का?’) आणि त्यासाठीचा एक सुंदर लोगो तयार केलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनावरील डॉ. दाभोलकरांच्या भाषणाच्या व्हिडीओचे इंग्रजी आणि हिंदीत डबिंग चालू आहे. वैज्ञानिक पद्धत म्हणजे काय, हे विद्यार्थ्यांना समजावे, यासाठीचे प्रयोग असलेली 18 प्रयोगांची पुस्तिका इंग्रजी, मराठी, कानडी व इतर अनेक भाषांमध्ये तयार झालेली आहे. हे सर्व साहित्य ‘फ्रीली डाऊनलोडेबल’ स्वरुपात उपलब्ध असणार आहे.

आज आपल्या देशात लोकशाहीवर होत असलेले हल्ले पाहता, ती मजबूत करण्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचे काम नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल.

विज्ञानविरोधी भूमिका, छद्मविज्ञान आणि लोकशाहीवरील हल्ले यांचा जवळचा संबंध आहे. केवळ आपल्या देशातच नाही, तर टर्की, सौदी अरेबिया आणि अगदी अमेरिकेतसुद्धा, उजव्या विचारसरणीचे राजकारणी नेते उत्क्रांतीसारख्या महत्त्वाच्या वैज्ञानिक सिद्धांतांवर हल्ले चढवत आहेत. पुराणकथांना विज्ञान म्हणून बढावा देण्याचा प्रयत्न त्रिपुरा व गुजरातचे मुख्यमंत्री, मानव संसाधन व विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री आणि खुद्द पंतप्रधानही करत आहेत. भाजप शासनाच्या राज्यांमधील पाठ्यपुस्तकांमध्ये अनेक चित्रविचित्र अवैज्ञानिक गोष्टी अभ्यासक्रमात घुसडल्या जात आहेत.

विज्ञानावरील हे हल्ले म्हणजे भारतीय इतिहास या विषयावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत असलेल्या पद्धतशीर हल्ल्यांचाच एक भाग आहे. इतिहासाचे चुकीचे चित्र उभे करणे, शिक्षणाचे भगवेकरण करणे आणि सरतेशेवटी भारतीय राज्यघटनेतील पायाभूत मूल्यांवर हल्ला चढवणे, असा यामागचा हेतू आहे. मूलतत्त्ववादी विचारसरणी हा द्वेषाच्या, सांप्रदायिक आणि जातीय राजकारणाचा पाया आहे, आपल्या देशासह सर्व जगात.

वैज्ञानिक दृष्टिकोन प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन देतो, आणि अशा रीतीने तो मूलतत्त्ववादाच्या विरोधात असतो. विज्ञान हे प्रश्न विचारण्यावर, शंकेखोरपणावर आधारलेले असल्यामुळे त्याला लोकशाहीची गरज असते. लोकशाहीसाठीही प्रश्न विचारणे आवश्यक असते. ‘विचारा – का?’ ही घोषणा सामान्य लोकांमधील चिकित्सक विचाराला प्रोत्साहन देईल आणि म्हणून लोकशाही बळकट करण्याला मदत करेल. द्वेषाच्या राजकारणाचे पुरस्कर्तेलोक दहशत निर्माण करून लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन मात्र लोकशाहीतील खुल्या वातावरणाला आणि लोकांच्या मुक्त अभिव्यक्तीला मदत करेल.

हा दिवस व्यापक स्तरावर साजरा करण्यामध्ये विद्यार्थी संघटनांची आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. यात आखलेल्या अनेक गोष्टी – सांस्कृतिक कार्यक्रम, नाटुकली, समूहगान, प्रयोग -प्रत्येक शाळेत करण्यासारखे आहेत.

आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांचे काम वैज्ञानिक स्वरुपाचे असते. येत्या काळात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी कर्मचारी यांची वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका असू शकेल. शेतकर्‍यांचे आणि कामगारांचे कामही विज्ञानावर आधारित असते. कामगार संघटना आणि शेतकरी संघटनाही वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या सर्व संघटना, शाळा-महाविद्यालयांबरोबरच, आपापल्या पद्धतीने ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ साजरा करायला लागल्या तर ते महत्त्वाचे योगदान ठरणार आहे.

डॉ. दाभोलकरांची वैज्ञानिक दृष्टिकोनावरील व्याख्याने साधी सोपी आहेत. विद्यार्थी व शिक्षक संघटनांसह सर्व पुरोगामी आणि लोकशाहीवादी संघटनांनी ही व्याख्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेली पाहिजेत. त्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये; तसेच वस्त्यांमध्ये कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत.

डॉ.विवेक मॉन्टेरो

समन्वयक,

ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क

संपर्क ः 9869361602