Categories
परिसंवाद

‘धर्मचिकित्सेसाठी शास्त्रार्थ’ हीच आपली परंपरा; ती संपवण्याचा धर्मांधाचा डाव!

वार्षिकांक - २०१८

आपण सर्व पृथ्वीवर राहणारे मानव

एका कुटुंबाप्रमाणे राहू या,

वसुधैव कुटुंबकम्च्या भावनेने ओथंबून जाऊ या,

सर्व मिळून वाटचाल करू या,

मिळून बोलू या, मिळून मनांना एक बनवू या,

मिळून सर्व निर्णय घेऊ या

मिळून पृथ्वीच्या सुखाला,

सौंदर्याला वाटून घेऊन

त्याचा उपभोग घेऊ या

या मूल्यांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करून, विश्वमानवतावादाचे एक अनन्य पुजारी, जातीयता, विषमता आणि सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा, अंधविश्वास यांच्या विरुद्ध लढणारे महान योद्धा, एक अनन्य क्रांतिकारक डॉ. नरेंद्र दाभोलकरजी यांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे.

साथींनो, आज आपण कसल्याही औपचारिक कार्यक्रमासाठी एकत्र नाही आलेलो आहोत. देशासमोर जी आव्हाने आहेत, ज्यामध्ये आपण प्रत्येक दिवसागणिक हिंसा बघत आहोत. माझ्यावर हल्ला झाला. खूप सार्‍या लोकांकडून सहानुभूती मिळाली. मी ज्यांना ओळखत देखील नव्हतो, अगदी दुरून सुद्धा; आणि हिंदू काय, मुस्लिम काय, शीख काय, जैन काय, ख्रिस्ती काय, सर्वच संघटनांच्या लोकांनी, राजकीय पक्ष, ट्रेड युनियन आणि सर्व लोकांनी आपापल्या पद्धतीने त्याचा प्रतिवाद केला आणि सर्वाधिक धिक्कार त्या बाबीसाठी केला, जेव्हा मी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता जात होतो त्या वेळी, मला ज्या लोकांनी अडविले, याची कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती. आपल्या कोणत्याही संस्कृतीने, आपल्या कोणत्याही मान्यताप्राप्त परंपरेने अशा प्रसंगी सुद्धा कोणी कोणाला गद्दार म्हणून, मारहाण करून, पळवून लावले असेल, याची कोणीही कल्पना सुद्धा करू शकत नाही. परंतु ज्या लोकांनी हे सर्व केले, आपण सर्वांनी त्यांना ओळखायचा प्रयत्न केला पाहिजे. कोण असू शकतात ते, जे रोजच्या रोज ‘मॉब लिंचिंग’ करून आपल्या निरपराध, निर्दोष बंधूंना मारहाण करीत आहेत आणि त्याच पद्धतीने धरून, आपटून, चिरडून मारून टाकीत आहेत. खोटे बोलून उघडे पाडायचा प्रयत्न करणे आणि त्याचबरोबर देशाच्या वातावरणात विष कालवून एक दहशतवाद पसरवणे, ज्या दहशतवादाला तुम्ही समजत होता की, आय. एस. आय. बरोबर जोडलेला आहे किंवा पाकिस्तान, बलुचिस्तान, तालिबान सोबत जोडलेला आहे, त्याचे नवनवीन रूप प्रकट होऊन जेव्हा आपल्या देशातच पाहायला मिळत आहे, त्याने सार्‍या देशासाठी चिंतेचे वातावरण निर्माण केलेले आहे. मी हल्ली जिथे जिथे गेलो, भुवनेश्वरला गेलो, त्यानंतर चेन्नईलाही गेलो, हैदराबादला गेलो, अगदी अलिकडेच गौरी लंकेशच्या पुण्यतिथी निमित्त बेंगलोरमध्ये होतो, जिथे-जिथे मी दौरे करत आहे; मग दिल्ली असो, हरियाणा असो, चंदीगड असो, लुधियाना असो; या सर्व ठिकाणी लोकांच्या हृदयात एक प्रकारची दहशत पाहिली, भीती पाहिली. लोकांनी आपल्या हाताने सत्ता स्थपित करून सुद्धा संपूर्ण भारतात अशा प्रकारे प्रभाव पाडायचे प्रयत्न केले जात आहेत; ज्या योगे जघन्य वांशिकता, धार्मिक विद्वेषाचे विष पसरवीत आहेत. आम्ही हे कसे स्वीकारावे, जे एकमेकांना वेगळे करते, तोडते, एकमेकांत फूट पाडते, त्यावेळी धर्मसुद्धा तिरस्काराचे राजकारण करतो का?

कोणत्या धर्मात जन्म घ्यावा हे आपल्या हाती नसते. मीसुद्धा आजपासून सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी शिकाकुल या आंध्र प्रदेशातील त्या इलाख्यात, जिथली मातृभाषा तेलुगू आहे तेथे जन्मलो. त्यानंतर चार वर्षांनी माझे वडील वारले. माझे दादाजी अर्थात आजोबांनी माझे पालनपोषण केले. ते छत्तीसगड रियासतीत दिवाण होते; तसेच पूजापाठ हे काम सुद्धा करत असत. अत्यंत सत्शील ब्राह्मण होते आणि त्यांच्या देखरेखीखाली मी पाच-सात वर्षांचा मुलगा त्यांच्याप्रमाणेच पूजापाठ करण्यात तयार झालो. तिथेच मला शिकवण मिळाली. त्यामुळे मी काही चांगल्या गोष्टी करू शकलो; पण काही अशा गोष्टी सुद्धा कराव्या लागल्या की, ज्यांचा विचार करून मला भीती वाटते. कसले-कसले प्रकार मी धर्माच्या नावावर करीत राहिलो. एवढ्या अंधश्रद्धा माझ्यात कशा काय येऊ शकतात? त्यावेळी मी प्रश्नसुद्धा विचारू शकत नव्हतो. माझी कानउघाडणी व्हायची. लहान मुलांप्रमाणे माझ्या मनाला जे प्रश्न पडत होते ते देवघरात एक-एक देवतेचे फोटो, देवांची चित्रे बघून, मी माझ्या मनाला पडलेले प्रश्न विचारत असे. जसे की हे जे देव आहेत, ज्यांना तीन-तीन, चार-चार डोकी आहेत, ते रात्री झोपताना उशी कशी काय ठेवत असतील? आणि असे प्रश्न विचारल्यावर मला रट्टे मिळत असत; उत्तर मिळत नसे. उत्तर देणार्‍याने मला सांगायचे होते की या चार डोक्याचा अर्थ काय आहे. ही चार डोकी वेदांचे प्रतीक आहेत. तीन डोकी म्हणजे ज्ञान, भक्ती आणि उपासना यांचे प्रतीक आहेत. हे सांगणारे कोणी नव्हते. हाच आपला धर्म आहे, एवढेच सांगितले जायचे. मग मी असे प्रश्न करताना खोडकरपणा सुद्धा करायचो आणि सांगायचो की या गोष्टी मानणार नाही, तेव्हा तुला भूत पकडून घेऊन जाईल,’ असे सांगून मला घाबरवले जायचे. आता, मुलांच्या मनात भुताची भीती निर्माण केली जात होती आणि जर मी विचारले की भूत दिसते कसे, तर ‘ते दिसत नसते, ‘इनव्हिजिबल’ असते,’ असे सांगितले जायचे. आता मात्र मी रात्री झोपताना घाबरायचो की, मला भूत घेऊन जाईल व मला कळणार सुद्धा नाही. तेव्हा मला सांगितले जायचे की, ‘हनुमान चालिसा वाचून झोप. मग तुला भुतापासून कसलाही धोका राहणार नाही.’ मग मी हनुमान चालिसा घेऊन जोरजोरात वाचायचो. ‘जय हनुमान माझे रक्षण करा.’ आणि मी हे वाचून पूर्ण करायचो, तेव्हा माझे भाऊ, बहीण, जे थोडे आळशी होते आणि लवकर झोपायचे, ते म्हणायचे, ‘आमच्या वाट्याचा हनुमान चालिसासुद्धा तूच वाचून टाक’ आणि मी वारंवार वाचत होतो. तर लहानपणीच मला कळले की धर्माच्या दुनियेत तुम्हाला स्वतःला काही करावे लागत नाही. वाट्टेल तेवढी बेईमानी करा, आडवी-तिडवी कामे करा; पण एखाद्या पुजार्‍यातला, पंडित पादर्‍याला काही पैसे द्या, जो तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि त्याच्या प्रार्थनेचा लाभ तुमच्या खात्यात येऊन पडेल, ट्रान्सफर होऊन जाईल. वाचनात मला चांगलीच गती होती. प्रथम वर्गात मी उत्तीर्ण झालो होतो.

मला सांगितले जायचे की, तू ब्राह्मण आहेस, उच्च जातीतला आहेस आणि ‘ते’ अस्पृश्य लोक आहेत आणि मी त्यांना अस्पृश्य समजून वरून धान्य फेकून बाहेर यायचो. ही माझ्या जीवनातली कहाणी आहे मित्रांनो, जी मी तुम्हाला सांगत आहे. हे माझ्या आयुष्यात कोणत्या मार्गाने आले? कुठल्या ना कुठल्या मार्गाने आले, जिथे प्रश्न विचारायची मोकळीक नसते आणि ज्याला आपण धर्म म्हणतो, श्रद्धा म्हणतो, त्याला कसल्या ना कसल्या अशा गोष्टींशी जोडतो, जसे परमात्म्याशी जोडतो, माहिती नाही कशा-कशाशी जोडू आणि त्यानंतर सांगणार यावर प्रश्न विचारायचा नाही. मान्य करा हे, डोळे झाकून मान्य करा. अंधश्रद्धेला धर्म संज्ञेस जोडून आणि गळ्यात ठासून उतरवले जाते, एक ‘ब्रेन वॉशिंग,’ एक ‘इनडॉक्ट्रिनेशन,’ हे माझ्या सोबत झाले आहे. मी भक्त भोगी. जर ईश्वराची कृपा, ज्याला मी ईश्वर मानतो तो ईश्वर, त्याची कृपा झाली नसती आणि मी कलकत्त्याला कॉलेज शिक्षणासाठी आलो नसतो आणि तिथे माझा आर्यासमाजी लोकांशी परिचय झाला नसता, मला डी. सी. दयानंद यांचा ‘सत्यार्थप्रकाश’ वाचायला मिळाला नसता, त्यानंतर वेद-उपनिषद वाचायला मिळाले नसते, अन्य सर्व लोकांसोबत बसून अन्य धर्मीय लोकांसोबत मला जे धर्माचे मूलतत्त्व आहे, त्याची माहिती मिळाली नसती, तर मी त्या संकुचित मानसिकतेच्या चिखलात फसलेला एक किडा झालो असतो. मी माझ्या स्वतःच्या जीवनातील कहाणी सांगत आहे. मी जातीयवादी झालो असतो, धर्मवादी झालो असतो, मी उथळ असा हिंसकसुद्धा होऊ शकलो असतो. काहीही होऊ शकलो असतो.

मी माझ्या जीवनातील कहाणी सांगत आहे आणि जेव्हा माझ्या लक्षात आले की, सृष्टीचा निर्माता एक आहे, सर्वव्यापी आहे, आपल्या सर्वांच्या हृदयात आहे, तेव्हा माझ्या मंदिरात जाण्याचा काही पर्पज राहत नाही. जर माझ्यात आहे, तर मला माझ्या अंतरंगातच डोकावून पाहिले पाहिजे. मी बोलून नव्हे तर सायलेन्समध्येच ‘मेडिटेशन’ केले पाहिजे आणि सत्य, प्रेम, करुणा आणि न्याय यांना धारण केले पाहिजे; तसेच जे असत्य आहे आणि अन्याय्य आहे त्या विरुद्ध लढले पाहिजे. एवढी सरळ आहे ईश्वराची धारणा आणि उपासना. मी मुक्त झालो. आतून मला वाटले की, अरे माझा संपूर्ण वेळ सुद्धा वाचला, बरेच पैसे सुद्धा वाचले. नारळ फोडायला नको, स्वतःचे पैसे आणायला नको, फुलांसाठी पैसे नको आणि नाही कुठे जाणे-येणे. काहीही नाही. आपल्या आतल्या परमात्म्याला, आपल्या सत्यालाच ईश्वर माना. प्रेम आणि करुणेची जी ऊर्जा तुमच्यात आहे, तिला जागे करा, न्यायासाठी संघर्ष करा. ही आपल्या स्वतःच्या ईश्वराची उपासना आहे. हे मला वेदांच्या मंत्रात सापडले नाही, मॅक्सी डायनच्या विचारांतून मिळाले आणि त्यांनी आपले संपूर्ण जीवन यासाठी समर्पित केले होते. त्यांची जीवनकथा मी जेव्हा वाचली तेव्हा माझ्यात आत्मविश्वास आला. मॅक्सी डायन तर खूप नंतर प्रचलित व प्रसिद्ध झाले; परंतु जेव्हा ते लहान होते, चौदा वर्षांचा मुलगा होते, त्यांचे नाव मूलशंकर आणि आपल्या शेजारच्या गुजरातमधील कंकरा या मोर्वीजवळील गावी जन्मले. ते सुद्धा एका दिवाणाच्या घरातच जन्मले. शेतकर्‍यांनी खूप आग्रह करून सांगितले की, ‘तुमचे नाव मूलशंकर आहे आणि आपण शिवभक्त आहात, शिवरात्रीला तुम्हाला व्रत करावे लागेल.’ त्या मुलाने उपाशी राहून, संपूर्ण दिवसभराचे व्रत केले, दिवसभर पूजापाठ केले. शिवमंदिरात पुरोहितासोबत बसून आणि वेळ आली तेव्हा त्याला सांगितले गेले, ‘शिवाच्या भक्तीने तुझ्यावर महादेव, देवाधिदेव रात्री बारा वाजता प्रकट होतील व तुला आशीर्वाद देतील.’ वडील थकून-भागून अकरा वाजता झोपी गेले, बारा वाजता पुजारी पण झोपी गेला. परंतु तो मुलगा-मूलशंकर-जागाच राहिला, भक्तिभावाने. परंतु रात्री बाराच्या सुमारास कोणी देव प्रकट झाले नाहीत. बिळांमधून उंदीर प्रकट झाले आणि ते उंदीर चारी बाजूंना, शिवाची जी पिंड असते-शिवलिंग-त्यावर फिरू लागले, तेव्हा त्या मुलाला धक्काच बसला. चौदा वर्षांचा तो मुलगा म्हणाला, ‘हे काय चालले आहे? ज्याची मी प्रार्थना करतोय आणि जो माझे आणि समस्त सृष्टीचे रक्षण करणारा देव, महादेव, आपल्या स्वतःचे रक्षण करू शकत नाही?’ मग त्याने लगेच आपल्या वडिलांना जागे केले आणि म्हणाला, ‘बाबा, बघा-बघा काय चालले आहे. ते म्हणतात ते शिव आहेत, देव आहेत-महादेव आहेत.’ त्याच्या वडिलांनी त्याला ओरडून विचारले, ‘काय बडबड करतो आहेस? तू थकला आहेस, झोपी जा. देवाला असे बोलायचे नसते.’ मुलाने आपल्या वडिलांना मनातल्या मनात सांगितले, ‘बाबा, तुम्ही दिलेल्या अज्ञान अंध:कारामुळे मी आजपर्यंत झोपलेलो होतो, आता माझी झोप उडाली आहे. आता मी या दगडाच्या जड देवतेची पूजा करणार नाही’ आणि त्याच वेळी रात्री बारा वाजता जाऊन दरवाजा ठोठावून आपल्या आईकडून रोटी खाऊन त्याने ते व्रत तोडले. आणि त्यानंतरच्या दिवसापासून कधीही परत कोणत्याही मंदिरात किंवा मूर्तीसमोर जाऊन पूजा केली नाही. चौदा वर्षांच्या मुलाचा हा संकल्प मी जेव्हा वाचला तेव्हा माझ्या आयुष्याची सतरा वर्षे पूर्ण झाली होती. त्या वेळी मी म्हणालो, ‘कमाल आहे. एका छोट्याशा गोष्टीने या नवतरुणाच्या जीवनात किती मोठे क्रांतिकारक कार्य निर्माण केले आहे, मग मी का नाही करू शकणार?’ तिथून माझा प्रवास सुरू झाला.

आज मी जो काही आहे, तुमच्यासमोर उभा आहे. याच क्रांतीच्या प्रवासात, विचारक्रांतीच्या प्रवासात मी एक यात्री आहे. तर मित्रांनो, आपण सगळे बसून आपल्या हृदयाला धुंडाळून पाहूया, की कुठे ना कुठे, कसल्या ना कसल्या, कुठल्या ना कुठल्या अंधश्रद्धेचा आपल्या आत शिरकाव तर झाला नाही ना? आपण कोणत्याही धर्माला, पंथाला मानणारे असा, तुम्ही मूर्तीची पूजा करत असाल, कबरीची पूजा करत असाल, आखडून बसून पीर आणि पैगंबरकडून मागणी करत असाल, चादर चढवीत असाल, हजारो-लाखो रुपये दान दक्षिणा देत असाल, कुणाला देत आहात हे दान? अशा व्यक्तीला ते देत आहात, जो पाचशे-हजार वर्षांपूर्वी खाली गाडला गेला आहे, ज्याची हाडे सुद्धा नष्ट होऊन गेली असतील, त्याला तुम्ही मागत आहात, ‘दे दे, आम्हाला काही दे.’ अरे कुठून देणार तो बिचारा? आता या प्रकारच्या कबरपूजेला सुद्धा आम्ही आपल्यात सामील करून टाकले आहे. दुनियाभरच्या गोष्टी मी पाहतो तेव्हा मला वाटते, की आपण अत्यंत मिट्ट काळोखात जीवन जगत आहोत. माझ्याकडे एक नियतकालिक आहे जे आर्यसमाजी नियतकालिकांपैकी एक आहे, त्यात आंबेडकरजी यांचे विचार दिलेले आहेत आणि त्याचे जे शीर्षक आहे ते मला फार आवडले आणि मी माझ्या मित्रांना सांगत होतो, अंधश्रद्धा हीच गुलामगिरीचे कारण आहे. जसे – साखळदंडाने बांधलेला गुलाम तुम्ही बघितलेला असेल. मजुरांची मुले दगडाच्या खदाणीतून मी सोडवतो, कारण की ते मुक्त होऊ इच्छित आहेत; परंतु हे जे गुलाम आहेत, जे मजेत राहत आहेत, त्यांच्या आत त्यांना मजा वाटत आहे. ही अंधश्रद्धेची गुलामगिरी त्यापेक्षा अत्यंत धोकादायक आहे. वेठबिगारी किंवा लोखंडी साखळदंडापेक्षा सुद्धा अत्यंत धोकादायक आहे ही गुलामगिरी. कारण मनुष्य याचा आनंद घेऊ लागतो, त्यामध्येच तो आपले फायदे शोधू लागतो. जीवनातल्या सगळ्या अडचणी या सामान्य किंवा निसर्गदत्त, अपरिवर्तनीय घटना किंवा नशीब समजू लागतो. याच गुलामगिरीपासून मुक्त करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखा एक तेजस्वी, एक ओजस्वी, एक क्रांतिकारी युवक उभा राहिला. त्यांनी कुणाचे काय बिघडवले होते? कशासाठी या लोकांनी त्यांना गोळी घातली? त्यांची हत्या केली?

अरे, तुमचे त्यांच्याशी काही बाबींविषयी मतभेद होते तर तुम्ही त्यांच्या सोबत बसून बोलायचे, पत्र लिहून सवाल-जवाब करायचे, मध्ये कोणी तटस्थ ठेवून सांगायचे, ‘आम्ही दोघे चर्चा करतो तुम्ही निर्णय द्या, कोण बरोबर, कोण चूक याचा.’ ही संवादाची परंपरा या देशात होती. संवाद, शास्त्रार्थ यांची परंपरा आहे या देशात. त्या काळी या प्रकारचा हिंसेचा आणि धर्मांधतेचा ज्वर नव्हता. दूर केरळच्या कालडी येथून प्रवास सुरू करत एक भगवान, ज्यांना आदिशंकर म्हणतात, ते बिहारमधील एका गावात गेले, जिथे तेथील महेशी मंडण मिश्र यांच्याबरोबर ते शास्त्रार्थ करतात. मंडण मिश्र एका विचारसरणीचे, तर शंकराचार्य दुसर्‍या. ते दोघेही न कोणी एक हिंदू म्हणत होता, ना कोणी दुसर्‍याला मुसलमान म्हणत होता. परंतु दोघेही एकत्र बसून शास्त्रार्थ करीत राहिले आणि मध्ये तटस्थ न्यायाधीश किंवा निर्णय देण्यासाठी होत्या मंडण मिश्र यांच्या पत्नी ‘भारती’! विचार करा, किती उदात्त, किती उच्च परंपरा असेल, या देशाच्या शास्त्रार्थाची! महषीर्र् दयानंद यांनी शास्त्रार्थ केले, पाद्य्रांबरोबर केले, मौलवींबरोबर केले, पंडितांबरोबर काशी येथे जाऊन शास्त्रार्थ केले. परंतु असे हिंसेचे वातावरण बहुधा कधीच पाहायला मिळाले नाही, जे आज दिसत आहे. तुमच्या बरोबर असहमती होईल, असहमती होणे ही काही वाईट गोष्ट नाही; उलट मी तर याला चांगलीच गोष्ट मानतो. जर सगळ्यांचे मत एकसारखेच झाले तर सगळे दगडाचेच होऊ शकतात, ज्यांचा काहीच विचार असू शकत नाही. मनुष्य आहे, बुद्धी आहे, विवेक आहे तो वेगवेगळा. मुंडे मुंडे मतिर्भिन्न:। तुंडे तुंडे सरस्वति। वेगवेगळे असणार म्हणजे असणार, असलेही पाहिजेत आणि त्यांच्यात युक्तिवाद झाला पाहिजे, तर्क-वितर्क झाला पाहिजे आणि त्यातूनच धर्म, खरा धर्म निघाला पाहिजे. यासाठी वेदादि धर्मशास्त्राचा अर्क जो आहे, तो तर्काद्वारे सिद्ध होतो, त्यालाच धर्म समजले पाहिजे आणि याव्यतिरिक्त वेदाचा, ज्ञानाचा दुसरा मार्ग नाही. तर्काला आम्ही ऋषी म्हटले! आपल्या एका उपनिषदाचे नाव प्रश्नोपनिषद आहे. सांगायचे तात्पर्य म्हणजे ऋषी दयानंद यांनी जेवढे साहित्य लिहिले, सवाल-जवाब, सवाल-जवाबच्या शैलीत लिहिले, पण आज आम्ही सवाल जवाब यांनाच बंद करू इच्छित आहोत. माझे म्हणणे माना, नाही तर तुम्ही देशद्रोही आहात.

माझ्यावर जेव्हा अटलजी यांच्या श्रद्धांजलीच्या वेळी हल्ला झाला होता, त्यावेळी मी त्यांच्या कार्यालयासमोर पोचत होतो. तेव्हा मला ‘गद्दार’ असे संबोधले गेले, ‘याला अटलजी यांच्या जवळ जाऊ देऊ नका!’ मी खूपच हादरून गेलो. मला गद्दार म्हणतात, कोणत्या बाबतीत मी गद्दार, देशद्रोही आहे? देशद्रोही असेल तर अचानक त्याच दिवशी झालो नाही! 17 ऑगस्टच्या दुपारी एक वाजता? मी देशद्रोही होतो तर सरकारचे काम होते की कायद्याने मला पकडून, अटक करावी; पण ते धोकादायक होते म्हणून मला मारून माझे सारे….. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहिले असेल. मी देशद्रोही का होतो? त्यांच्या विचारांच्या ‘हो’ ला ‘हो’ म्हटले नाही तर मी देशद्रोही झालो. ‘सिडिशन’चा चार्ज लावायचा होता. अहमदाबादच्या उपोषणाला बसलेल्या आमच्या लोकांना भेटून आलो, पंधरा दिवसांहून अधिक काळ उपोषण झाले आहे हार्दिक पटेल यांचे. तेव्हा हार्दिक पटेल मला सांगत होते, हॉस्पिटलमध्ये बिछान्यावर बसून 20 किलो वजन कमी झाले आहे. ते सांगत होते, “स्वामीजी, माझ्यावर दोन-दोन वेळा गुजरातमध्ये ‘सिडिशन’चा चार्ज म्हणजे देशद्रोहाचा खटला चालू आहे! पुण्यापासून दिल्लीपर्यंत आणि माहिती नाही हैदराबादपर्यंत तुम्ही ऐकले असेल देशद्रोहाचे खटले चालू आहेत. 124- कलम लावले गेले आहे.” कुठून आणून तुम्ही हे लावीत आहात? इंग्रजांनी बनवले होते हे कलम आपल्या देशभक्तांना चिरडण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी. आणि हा, आमच्या स्वतंत्र भारतात ‘सिडिशन’चा उपयोग केला जातो आहे, मतभेदाचा आवाज दाबण्यासाठी. विचारांची भिन्नता आणि युक्तिवाद नष्ट करण्यासाठी याचा उपयोग केला जातोय ‘सिडिशन’च्या नावाने. अगदी सरकारच्या कामावर साधी टीका करा, त्यांच्या नीतीवर टीका करा, म्हणतील ‘तुम्ही राष्ट्रद्रोही आहात.’ नीतीवर टीका करणे, सरकारवर टीका करणे राष्ट्रद्रोह झाला? अशा भयाच्या वातावरणात चुपचाप गळा घोटला जात असताना आपण कसे जगू शकतो? नाही जगू शकत! आज आपण इथे दाभोलकरजी यांच्या हौतात्म्यापासून प्रेरणा घेऊन सांगू इच्छितो, अगदी पूर्ण शक्तिनिशी, ‘हे सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनो, तुम्ही आम्हाला कितीही पद्धतीने घाबरवायचा प्रयत्न करा, आम्ही हौतात्म्याचा प्याला प्यायला तयार आहोत. परंतु तुमच्या ‘हो’ ला ‘हो’ करायला तयार नाही. तुमच्या खर्‍या गोष्टींना खरे म्हणू, तुमच्या चुकीच्या गोष्टींना चुकीच्या म्हणू. आमच्या समोर भारताचे संविधान आहे आणि तुम्ही त्याला जखडून ठेवले आहे.’ जातीयतेत आणि अशा प्रकारच्या ढीगभरच्या अंधश्रद्धांमध्ये. आज आम्ही त्याची कुलपे तोडून त्याला मुक्त केले आहे.

भारताचे संविधान आमचा धर्म आहे, आमचे धर्मशास्त्र आहे! आणि त्यात आमची ओळख ना हिंदूची, ना मुसलमानाची, ना शीखाची ना ख्रिस्त्यांची. ना या पक्षाची ना त्या पक्षाची; ना या जातीची, ना त्या जातीची. त्याचा पहिला मंत्र, पहिले वाक्य आहे, “आम्ही भारताचे लोक” (थश ींहश शिेश्रिश ेष खपवळर.) ही ओळख घेऊन आपण पुढे चालू या आणि माझी अशी इच्छा आहे की, आजपासून एक असा मंचही बनवूया, ज्याचे नाव ठेवायचे ‘आम्ही भारताचे लोक आणि संविधानाचे रक्षण’ हे आमचे सर्वांत मोठे कार्य. संपूर्ण भारताच्या संदर्भात आणि सार्‍या जगाच्या संदर्भात म्हणायचे असेल तर संपूर्ण मानवमात्रास एक कुटुंब बनवायचे असेल तर ‘वसुधैव कुटुंबकम्’चा मंत्र घेऊन चालू या. जे आमच्यात अडथळे आणू इच्छितात, त्याचा आम्ही स्वीकार करणार नाही. आम्ही मनुष्य-मनुष्य एकसमान आहोत. एक सूर्य आम्हाला प्रकाश देतो, समान देतो, काही फरक नसतो. एकाच हवेत आम्ही श्वास घेतो. इथे हिंदू-मुसलमान असा फरक नाही. पावसाचा एक थेंब जेव्हा पडतो तो सर्वांसाठी समान आहे. झाडाचे एक-एक पान सुद्धा कुठेही भेदभाव करत नाही. झाडाचे एक पान सुद्धा कोणा हिंदूचे-मुसलमानाचे, उच्च जातीचे किंवा छोट्या जातीचे वेगळे नाही. हा आजार तुम्ही निर्माण केलेला आहे, तो निसर्ग किंवा परमात्म्याने निर्माण केलेला नाही. तुम्ही तुमचा आजार तुमच्या घरात ठेवा. आम्ही त्याला नाकारतो. आम्ही त्याचा स्वीकार करू शकत नाही. आम्हाला जातीयवादमुक्त समाज पाहिजे! आम्हाला स्त्री आणि पुरुष भेदभाव अजिबात मान्य नाही. स्त्रीचा दर्जा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबर असेल. इथे महाराष्ट्रात पण काही चालू आहे, आंदोलन शनि शिंगणापूरचे! त्यात सफलता मिळाली आहे, न्यायालयातच; परंतु भिंतीची कुलपे उघडणे अजून बाकी आहे आणि एक ते शबरीमलाचे सुद्धा चालू आहे. त्याचा फैसला आता येणार आहे. तर सांगा, स्त्रियांवर बंदी आणत आहात, तुम्ही आपल्या आईवर पण बंदी आणणार, बहिणीवर पण बंदी आणणार, सर्वांवर बंदी आणणार आणि देवाच्या नावावर करणार? यापेक्षा मोठे पाखंड असू शकत नाही.

एका सतरा वर्षांच्या मुलीला तिच्या नवर्‍याच्या मृत्यूनंतर देवराला नावाच्या गावात, जयपूरपासून पासष्ट किलोमीटर दूर, 1987 मध्ये; बिचार्‍या सतरा वर्षांच्या मुलीला तिच्या पतीच्या चितेवर बसवले, पतीचे शव मांडीवर घेऊन आणि दिराने पाठीमागून आग लावली. ‘सती मैया की जय हो’… आणि ती जळून राख झाली. आणि तिथे चौदा दिवस पूजापाठ झाला. त्याचे नाव ठेवले ‘चुनरीमहोत्सव’! चोवीस तास ‘राऊंड द क्लॉक’ पूजापाठ आणि चढावा (दक्षिणा), जेव्हा चादर उघडून मोजली तर सत्तर लाख रुपये एकत्र केले गेले होते. सतरा लाख रुपये घेऊन त्या छोट्याशा गावात सतीमातेचे मंदिर बनवू इच्छितात आणि त्यातून संदेश काय देतात? जिचा पतिपरमेश्वर निघून जातो, ती छोट्या वयाची मुलगी का असेना, तिने आपल्या पतीसोबत सती गेले पाहिजे. हाच तिचा सगळ्यात मोठा धर्म आहे. त्या वेळी मला कळले की, एक तथाकथित हिंदू धर्माचा स्वतःला पुरीचा शंकराचार्य म्हणवणारा धर्माचार्य या बाबीला उत्तेजन देत आहे. तेव्हा आर्य समाजाच्या श्वेत संन्याशांना एकत्र करून दिल्ली ते देवराला पदयात्रा सुरू केली.

अठरा दिवस पायी चालत-चालत आम्ही घोषणा दिल्या…

सतीप्रथा समस्या है, धर्म नहीं, ये हत्या है।

शंकराचार्य होश में आओ, नारी गहना मान गिराओ।

सब धर्मोंका है ऐलान, नर और नारी एकसमान।

संविधानका है ऐलान, नर और नारी एकसमान।

या घोषणा देत आम्ही देवरालापर्यंत पोचलो. पराग आणि सतीमाता यांची मंदिरे बनू शकली नाहीत. जे बनवणारे धर्मरक्षा समितीचे लोक होते, त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. मी आज हे सांगू इच्छितो की, आम्ही जेव्हा या लढ्याचा आरंभ केला तेव्हा सुरुवातीला पाच डिसेंबर रोजी दिल्लीहून निघायचे ठरले होते; परंतु तीन डिसेंबर रोजी माझ्याकडे, माझ्या सात-जंतर मंतर रोड येथील छोट्याशा कार्यालयात धर्मरक्षा समितीचे मोठे नेते राजस्थानातून आले आणि म्हणाले, ‘स्वामीजी, खबरदार! जर तुम्ही आमच्या सतीधर्माचा अपमान कराल तर… आम्ही तुमचे तुकडे-तुकडे करून टाकू. तुम्ही दिल्लीतून निघा, हरियाणा सुद्धा पार करा; परंतु राजस्थानच्या जमिनीवर पहिले पाऊल टाकल्यास आमच्या नंग्या तलवारी तुमचे स्वागत करतील.’ मी म्हणालो, ‘अरे बापरे, एवढा राग? एका एवढ्या घाणेरड्या, वाईट रीतीच्या विरुद्ध आमच्या सोबत येऊन तुम्ही आवाज उठवला पाहिजे आणि तुम्ही म्हणत आहात की तो धर्म आहे. स्वतःला धर्मरक्षा समितीचे नाव देता?’ आणि मी सुद्धा त्यांना उत्तर देताना म्हणालो, ‘माझ्या मित्रांनो, तुम्ही खूपच रागात बोलत आहात. शक्य आहे की तुमच्याकडे नंग्या तलवारी खूप आहेत, शेकडो असतील, त्या काढा तुम्ही; परंतु एका गोष्टीचा पुरावा सुद्धा मी तुम्हाला देईन. ज्या वेळी तुमच्या तलवारी माझ्या मानेवर चालतील, माझे डोके तर खाली पडेल; पण माझे पाऊल मात्र दारुण देवारालाकडे जाताना दिसेल.’ पुढील घटना खूप मोठी आहे, आज वेळ नाही; परंतु मी हे सांगू इच्छितो की त्या वेळी सुद्धा धर्माच्या ठेकेदारांनी माझ्यावर आक्रमणे केली, ज्या वेळी मी अठरा दिवस पायी जात होतो.

मंदिर बनविण्यासाठी तुम्हाला दलितांची गरज पडते, आदिवासींची गरज पडते. दगड, चुना सर्व एकत्र करून जेव्हा नाथद्वाराचे राजस्थानातील मंदिर – उत्तर भारतातील सर्वांत मोठे मंदिर निर्माण झाले आणि मोठमोठे श्रीमंत लोक, तिथे दक्षिणा देण्यासाठी मुंबई आणि गुजरातमधून येऊ लागले, तर दलित मंदिरात प्रवेश करू शकत नाहीत; बनवले त्यांनीच आणि प्रवेश मात्र करू शकत नाही. मंदिर अपवित्र होणार! एवढ्या निर्बल देवतांना का बसवून ठेवले आहे तुम्ही? तर तेच शंकराचार्य बोलत होते सतीप्रथेच्या महान महिम्यावर! अशा प्रकारे त्या वर्षी आम्ही निरंतर आंदोलन केले. त्या वेळी माझ्यावर खूप जीवघेणे हल्ले झाले, केवळ याचसाठी. जो चुकीचा प्रतिबंध होता, तो आम्ही धुडकावून लावला. ते हिंदू धर्माचे ठेकेदार माझ्यावर आक्रमण करून मला सांगत होते की, ‘तुम्ही हिंदू धर्मविरोधी आहात? परंतु तुम्ही कोणत्या धर्माचे वहन करू इच्छिता बंधूंनो? एवढा सडलेला, झिजलेला धर्म घेऊन समाजाला कोणत्या दुनियेत घेऊन जाणार आहात? आणि या प्रकारची बरीचशी अजून कामे केली आहेत मी मित्रांनो आणि साथींनो, तुम्ही ‘यू ट्यूब’ वर पाहत, वाचत असाल. परंतु आम्ही कधीही कोणत्याही सत्यधर्माचा अशा प्रकारे विरोध केला नाही. आमचे म्हणणे आहे की, जो आमचा मानवधर्म आहे, तोच खरा हिंदू धर्म आहे, ज्याला आम्ही मानवधर्म म्हणतो. जर मानवाला मानवतेचा दर्जा देऊ शकत नसेल तर तो धर्म, धर्म म्हणण्याच्या लायकीचा नाही. आणि मी पूर्ण शक्तिनिशी सांगू इच्छितो की, वेदात कुठेही हिंदू शब्द नाही. आणि जर काही आहे, तर तो ‘मनुर्भव’ = ‘मनुष्य बना, मानव बना’ हा आहे. या गोष्टीसाठी आम्हाला चांगले मानव व मानवतेकडे जायचे आहे.

आज जे संकल्प आपल्यासमोर आणले जाणार आहेत, त्या सर्वांचे जतन करून आपल्याला पुढे जायचे आहे. इथे मी येणार होतो, तेव्हा मला सांगितले गेले की ‘अमुक आहे-तमुक आहे, काही लोक विरोध करतील. मग माझ्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी आपला आवाज उठवला आणि आपल्या पत्रकात त्यांनी पुन्हा आठवण करून दिली व सांगितले की कोणे एके काळी शंभर-दीडशे वर्षांपूर्वी, या पुण्याच्या भूमीवर, महषीर्र् दयानंद आले होते, एकवीस दिवसांचा प्रवास करून आणि त्यांची प्रवचने झाली होती. आणि याच संकुचित मानसिकतेच्या जातीयवादी लोकांनी त्यांना विरोध केला होता. स्वतःला ‘जन्माने ब्राह्मण घोषित करणार्‍या लोकांनी,‘गुण-कर्म’ तर काही सांगितले नाहीत, परंतु जन्माने ब्राह्मण असल्याची ठेकेदारी त्यांनी घेतली विरोध करताना. आणि त्यांनी काय केले? एका नकली माणसाला पकडून, त्याला दयानंद बनवून गाढवावर बसवून, गळ्यात चपलांचा हार घालून गाढवावरून त्याची धिंड काढली, याच पुण्याच्या रस्त्यांवर! दयानंद एका बगीचात थांबले होते. त्यांना त्यांच्या भक्तांनी जाऊन सांगितले, ‘तुमचा घोर अपमान होत आहे, दयानंद यांच्या गळ्यात हार घालून गाढवावरून धिंड काढली जात आहे’. दयानंदांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले, ‘जो नकली दयानंद बनायचा प्रयत्न करेल, त्याचे असेच हाल होतील.’ दुसर्‍या दिवशी परत एक नरपुंगव उभा राहिला याच भूमीवर, त्याचे नाव महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि तो म्हणाला, ‘ऋषी दयानंद, तुमच्या केलेल्या या अपमानाचा बदला आम्ही घेऊ आणि आम्ही तुम्हाला गाढवावर नाही, हत्तीवर बसवून दोर आमच्या हातात घेऊन आम्ही पुढे जाऊ. जोतिबा फुलेंना आज मी प्रणाम करतो, सलाम करतो, आपण इथे क्रांतीचे बीज पेरले.

मित्रांनो आणि साथींनो, आज आपण हे जे आंदोलन नव्याने सुरू करीत आहोत, त्यात मी ‘समिती’ हा शब्द बदलून त्याला आंदोलन असे म्हणू इच्छितो! हे आंदोलन आहे. वैचारिक आंदोलन आहे. क्रांती आहे ही, वैचारिक क्रांती आहे, जी आग निर्माण करते. हृदयात ठिणगी चेतवते, लवलवणार्‍या ज्वाळा निर्माण करते, मानव बनण्यासाठी ललकारते आणि मानवाला मानव बनवायचे असेल तर ‘थ्री डीज’ची उपासना करा, ‘थ्री डीज’! जर मानव असाल; मेंढी, बकरी नसाल, एखादे जंगली श्वापद नसाल, आपली पारख जर स्वतःच करून घ्यायची असेल तर ‘थ्री डी’ आहे की नाही हे पाहा. पहिला ‘डी’ आहे, ‘डाउट’. प्रश्न विचाराची ताकद आहे की नाही? आपला विवेक आपल्या जवळ बाळगून प्रश्न करा, कोणीही, काहीही बोलतोय, अग्निवेश भाषण देतोय, चुपचाप डोळे बंद करून स्वीकारू नका. म्हणा, ‘अग्निवेश, तुमच्या बोलण्यावर आम्ही हे प्रश्न करीत आहोत. आम्ही जर कोणता वेद वाचला, उपनिषद वाचले, कुराण वाचला, कोणत्याही महापुरुषाला प्रश्न विचारायचा अधिकार असला पाहिजे. तर, ‘डाउट’ हा फस्ट ‘डी’! दुसरा ‘डी’ आहे ‘डिबेट’! त्यावर युक्तिवाद झाला पाहिजे. आपल्या मित्रांमध्ये बसून युक्तिवाद करू; आणि आपल्या बुद्धीने युक्तिवाद करू. त्याच्या मुळाशी, त्याच्या सत्यात, त्याच्या चांगलेपणात जायचा प्रयत्न करू. आणि एवढे प्रयास केल्यानंतर सुद्धा, काही बाबतीत असे वाटले की, ‘नाही, काहीतरी गडबड आहे. काही बाबी चांगल्या आहेत, काही बाबी खर्‍या नाहीत, त्यानंतर तिसरा ‘डी.’ पहिला ‘डी’ आहे ‘डाउट’, दुसरा ‘डी’ आहे टू ‘डिबेट’ आणि तिसरा ‘डी’ आहे टू ‘डिसेंट’! ज्यासाठी जस्टीस चंद्रचूड यांनी, पाचजणांना अटक झाली तेव्हा सुप्रीम कोर्टात सांगितले होते की, डेमॉक्रसीमध्ये ‘डिसेंट’ नावाच्या सेफ्टी व्हॉल्व्हला सोडू नका, नाही तर स्फोट होऊन जाईल. सर्वच्या सर्व लोकांना आपली असहमती, मतभेद व्यक्त करू द्या, हा ‘डिसेंट’ आपल्यासाठी खूप आवश्यक आहे; केवळ डेमॉक्रसीसाठी नाही, आपल्या स्वतःच्या जीवनासाठी सुद्धा आवश्यक आहे. तेव्हाच तुम्हाला मनुष्य म्हटले जाईल, अन्यथा आपण शेळ्या-मेंढ्या बनून राहू. ‘डाउट, डिबेट आणि डिसेंट’ हे आपले भांडवल असले पाहिजे, आपल्या जीवनाचा मंत्र असला पाहिजे!

तर, मी अधिक वेळ न घेता आजच्या आयोजकांचे, संयोजकांचे, सर्व लोकांचे यासाठी अभिनंदन करतो, की तुम्ही लोकांनी एक खूप मोठे आंदोलन उभे केले आहे, जे वैचारिक क्रांतीचे आंदोलन आहे. आपण सर्व एकमेकांशी जोडून घेऊया, साथी बनूया, एकत्र वाटचाल करूया आणि मिळून केवळ सार्‍या देशालाच नाही, तर दुनियेला आवाहन करू की, या, मानवता एक धर्म आहे, मानव परिवार एक परिवार आहे आणि मध्ये ज्या कोणी उभ्या केलेल्या जातीयतेच्या भिंती आहेत, त्या भिंती उखडून टाकूया. एका मुलाने जन्म घेतल्यावर त्याला उच्च म्हणता, आणि एक मुलाने जन्म घेतल्यावर त्याला नीच म्हणता, यापेक्षा कलंकित कुठलेही कल्चर किंवा धर्म असू शकत नाही; आम्ही अजिबात मान्य करणार नाही. कोणत्याही मुलाचा जन्म होताच त्याला उच्च किंवा नीच नाही म्हणू शकत. समान आहेत, दोन्ही मुले आहेत, दोन्ही मनुष्य आहेत आणि दोघांनाही समतेचा अधिकार आहे. एकसारखी शिकवण त्या दोघांना मिळाली पाहिजे, दोघांना एकसारखे प्रेम आणि एकसारखी चिकित्सा मिळाली पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही निश्चित कराल की, खरोखरच योग्य कोण आहे आणि अयोग्य कोण आहे! एकसारखी शिकवण द्या, एकसारखी चिकित्सा द्या, एकसारखे प्रेम द्या, एकसारखे पुढे जाण्याचे प्रोत्साहन द्या, उत्साह द्या. त्यानंतर बघा की तो दलित मुलगा जास्त योग्य आहे की तुमचा तथाकथित उच्च जातीचा अधिक योग्य आहे. गोरा अधिक योग्य आहे की काळा अधिक योग्य आहे. मुलगा जास्त योग्य आहे की मुलगी त्याला आडवा करून पुढे जात आहे. या सर्व गोष्टी, आपल्यात जे टॅलेंट आहे, त्याची गरज आहे, समान अधिकार. आणि सर्वांची समानता हा सर्वांत मोठा मंत्र असला पाहिजे, जो भारताचे संविधान आपल्याला देते; पण एक गोष्ट जी मुळात आपल्याशी ‘शेअर’ करू इच्छितो, ती ही आहे की, या शासकांना पराभूत करायचे आहे, जे घृणा आणि तिरस्कार आणि हिंसेचे राजकारण करीत आहेत, फूट पाडत आहेत, लोकांचे एका बाजूला ध्रुवीकरण करीत आहेत, अगदी दररोज. त्यांच्याशी लढायचे असेल तर मित्रांनो, जे लोक समाजात दडपले गेलेले आहेत, तुडवले गेलेले आहेत, त्या सर्वांनी एका ठिकाणी एका झेंड्याखाली एकत्र आले पाहिजे.

जे दलित आहेत, जे मुसलमान आहेत; अर्थात त्यांच्यात जे वंचित आहेत, गरीब आहेत आणि अशाच प्रकारे ख्रिस्ती लोकांमध्ये आहेत, शीख लोकांमध्ये आहेत किंवा आपल्या ‘मायनॉरिटी’मध्ये आहेत, आणि आपले आदिवासी आहेत जे सर्वात जास्त पीडित आहेत, मागासांहून मागास आहेत आणि सोबत ओबीसीचे लोक आहेत, आणि अशा प्रकारे राहिलेला जो जागरूक समाज आहे, कुठेही, कोणत्याही जन्म-जातीशी जोडलेला, त्या सर्वांनी आज एका झेंड्याखाली येऊन भक्कमपणे, सामाजिक न्यायास आपला धर्म बनवून, सोशल जस्टीसला आपला रिलिजन बनवून आपण एक नवे आवाहन करायची गरज आहे. आणि वर बसलेल्या पार्टी आणि नेत्यांना सांगावे लागेल. फक्त आम्ही एकत्र येण्याने काम होणार नाही. जेव्हा मत देण्याची वेळ येईल, तेव्हा तुम्हाला स्वतःची काही भूमिका निभावून न्यावी लागेल. आपल्याला वेळ आहे, तेव्हाच एकजूट होऊ या, नाही तर आज जे तुम्ही झोडपले जात आहात, तर यापुढेही मारच खात राहाल आणि कोणी तुमच्यासाठी रडणारा सुद्धा भेटणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. त्यासाठी आमचे ऐक्य, सामाजिक ऐक्य आणि राजकीय ऐक्य ही बाब आहे, जी बाबासाहेबांनी सांगितली आहे.

संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले; परंतु 26 नोव्हेंबर 1949 रोजी केलेले भाषण आठवा. आपल्याला बाबासाहेब सांगतात, “तुम्हा सर्वांना मताधिकार तर मिळेल. 26 जानेवारी 1950 नंतर तुमची ‘पॉलिटिकल इक्वॅलिटी’ जागृत होईल, परंतु सोशल व इकनॉमिक इक्वॅलिटी तोपर्यंत होणार नाही, जोपर्यंत तुम्हाला सामाजिक व आर्थिक समानता मिळत नाही आणि त्या मताच्या शक्तीने तुम्ही समतेला प्राप्त करून घेणार नसाल तर हे संविधान म्हणजे एक कागदांचा गट्ठा बनून राहील. म्हणूनच, भारताच्या संविधानाची शपथ घेणार्‍या माझ्या भारतातील लोकांनो, माझ्या तरुण, युवा मित्रांनो, या, आपण या बाबतीत शपथ घेऊया की आम्ही सर्व मतभेदांना विसरून, जातीयता, धर्मांधता यांच्या भिंतींना तोडून आम्ही एक नव्या प्रकारचे बंड करू; आणि यासाठी बंड करू की कोणी जर आम्हाला विचारले की, तुम्ही बंड का करीत आहात तर आम्ही सर्व एकसाथ म्हणू, एकाच्या शरीरावर सोन्याची तार आहे आणि एकाच्या शरीरावर सुताची तारसुद्धा नाही, ज्याने ‘नांगराचे’ तोंडसुद्धा बघितले नाही, तो हजारो बिघे जमिनीचा मालक आणि ‘नांगरा’ सोबत आपले अस्तित्व नष्ट करणारा, एका बिघ्याचासुद्धा मालक नाही! हा अन्याय आम्हाला मान्य नाही. या अन्यायाला, विषमतेला आमचा विरोध आहे, यासाठी आम्ही बंड करीत आहोत. आर्थिक जगात, भारतात 1 टक्का लोकांच्या हाती 99 टक्के संपत्ती जमा झालेली आहे. हे मी म्हणत नाही. ‘यूएनओ’चा रिपोर्ट, ‘ऑक्सफोर्ड सर्च’चा रिपोर्ट, या दुनियेचे रिपोर्ट दाखवून देत आहेत. हे जग कुठे चालले आहे? 1 टक्का लोक एवढे पैसेवाले, बाकी 99 टक्के लोकांकडे 1 टक्का संपत्ती ही विषमता आहे, ती सर्वांत मोठ्या हिंसेचे कारण बनेल आणि ही जातीयता आणि हे कलह, दंगे तिकडून लक्ष हटविण्यासाठी केले जात आहेत. त्या नावावर जर गरीब एकत्र आले, तर लढून आपला अधिकार मिळवतील. ते एकत्र येऊ नयेत म्हणून त्यांना मंदिर-मशीद, दाढी-शेंडी, हिंदू-मुस्लिम यांच्यात वाटून ठेवा आणि ते दररोज आरामात यांचे मनसोक्त शोषण करत आहेत, भांडवलशाहीचे वर्चस्व आणले जात आहे आणि यांच्याविरुद्ध बंड करण्यासाठी, आपण सारे या कपटास समजून घेऊया की कोणत्या बाबींवरून लक्ष हटविण्यासाठी आम्हा लोकांना अशा प्रकारे विभाजित करून तोडले जात आहे?

तर मी या बाबीवर समाप्त करतो आणि परत एकदा तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, या आपण सर्व मिळून एका नव्या तयारीनिशी सर्व देशात पसरू या! आपल्या पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलच्या भिंतीवर लिहिलेले आहे…

अयम निजा परो वेती गणना लघुचेतसाम् ।

उदारकरितानाम् तु वसुधैव कुटुंबकम् ॥

हे सेंट्रल हॉलमध्ये लिहिलेले आहे; पण तिथे बसलेले जे लोक आहेत, ते सत्तेच्या खुर्चीला विपरीत दिशेला घेऊन जाऊ इच्छित आहेत. सर्व देशासाठी आता धोक्याची घंटा वाजलेली आहे आणि आज आम्ही सर्व लोकांनी हे म्हटले पाहिजे की नाही… हा माझ्या आणि तुझ्या नावावर आम्ही कलह होऊ देणार नाही. आम्ही विशाल हृदयाचे होऊन संपूर्ण मानवतेला आपला एक परिवार घोषित करून आम्ही मिळून पाऊल पुढे टाकू आणि मिळून वाटून खाऊ आणि तुमच्या या प्रकारच्या दुफळीचे शिकार होणार नाही, यासाठी, या, आपण सर्व मिळून बोलू या,

इंकलाब झिंदाबाद!

झिंदाबाद… झिंदाबाद!!!