Categories
कथा

नरेंद्र कॉलिंग नरेंद्र

वार्षिकांक - २०१५

“काय काम केलंय रे फरहान अख्तरनं त्यात! कस्ला बधिर दिसतो! एकदम!” संज्या पाण्याचा ग्लास खाली ठेवत म्हणाला. तो फरहान अख्तरचा डायहार्ड फॅन आहे. त्यामुळे ‘भाग मिल्खा भाग’ आला तरी तो त्याचे यच्चयावत चित्रपट प्रेमाने उगाळत बसतो. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’ हा याचा ऑल टाईम फेवरिट.

मला वाटतं, आजच्या पिढीचाच तो प्रॉब्लेम आहे. आम्ही मनानं दुभंगलेलेच आहोत. म्हणजे एक मनोसांस्कृतिक दरार आम्ही सांभाळतो आहोत. आम्ही आमच्याही कळण्याआधीच ग्लोबल झालेलो आहोत आणि आमचे बाप आम्हाला जोडीनं लोकल व्हायचा आग्रहही धरतात. उदाहरणार्थ पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला, पाकिस्तानी गायकांना हिंदुस्थानच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही- असं आमच्या लहानपणी ऐकल्याचं स्मरतं. मधूनच हे लोकलपण इतकं आक्रसतं की मग आम्हाला यूपीचे मध्ये, बिहारी बाबू परके वाटायला पाहिजेत असं सांगायला लागताच, बाप सांगतो त्याच्या बापाच्या काळात लुंगीवाले परके वाटवण्याची मोहीम होती म्हणूनच मराठी मन वाचलं. ते आता परकं ठरवायचं असा सतत शोध घेत राहातं ते त्यामुळेच. पण आम्ही ग्लोबल व्हावं यासाठी आम्हाला आटीखेरीज कुठं जाऊ दिलेलं नसतं बापांनी. मी मराठी म्हणत आम्ही इंग्रजी माध्यमात शिकलो, किमान सेमी इंग्लिशतरी! साधारणपणे बाबरी पाडायच्या अलिकडचा आमचा जन्म. त्यामुळे वैश्विक खेडे होण्याची ही प्रक्रिया आमच्या पिढीनं आमच्या वाढण्याबरोबरच वाढवली. या सगळ्या दुभंगांसकट. ग्लोबलायझेशनचे सरकारी जाहीर होणे आणि बाबरीचा पाडाव. संगणकातून जगभर पोहोचणे आणि जगभर पोहोचण्यासाठी प्रादेशिक अस्मितांचा डेटा मोबाईलसारखाच खिशात सतत वाजत ठेवणे. जगातली यच्चयावत प्रॉडक्टस् भारतात येणे आणि भारतातला माल, परदेशातील देशीपणाचा आधार म्हणून बाहेर जाणे. या मालात गौरींचे मुखवटेही आले. आमच्या पुण्यातल्या मित्रांचे अर्धवट म्हातारे आईबाप त्यांच्या अमेरिकास्थित मुलांवर भारतीय देवतांची कृपा रहावी आणि घराण्याची परंपरा शाबूत रहावी म्हणून हे मुखवटे तिकडे नेतात आणि तिथे या गौरी बसवतात. माहेरवाशिणींना अमेरिकेत पाठवणं हे सध्या गरजेचं आहेच म्हणा! म्हणजे भारतातील स्त्रीभ्रूणहत्यांचा आणि बलात्कारांचा प्रश्न घेतला तर म्हणतोय मी. अर्थात, तिकडे गौरी बसवताना तिथल्या गौरवशाली देशीपणाला नक्की काय वाटतं? कल्पना नाही. उदा. आम्ही कोल्हापूरचे. आमच्याकडं गौरीची रोपं, तेरड्याची म्हणतात पुण्याकडं-घटात ठेवतात गौराया म्हणून – ते आता तिकडल्या कोल्हापूरच्या लोकांना जमणार नाही म्हणताना पुण्याचे मुखवटे कोल्हापूरकरांनी उचलले काय? आणि मग कोकणस्थ तिकडे कोणत्या नदीवरचे खडे आणतात गौराया म्हणून? या अस्मितांचं तिकडं अमेरिकेत काय होत असेल? आणि हे सगळं नकोच असेल, पटत नसेल तिथल्या नातवंडांना तर? किंवा तिथंच शिकायला गेलेल्या सुनांना तर, मग काय करत असतील? नरेंद्र दाभोलकरांना अमेरिकेतल्या भारतीय मुलामुलींनी साद घातली होती की नाही, माहिती नाही. तिथून त्यांनी कधी भावनिक शोषणाचा मुद्दा उठवला असल्याचं ऐकिवात नाही. पण ज्या ग्लोबल टेक्नॉलॉजीच्या आधारे आम्ही आमच्या भूतकाळातून सुटू पाहतो तो असा परतून येतो. आम्ही जिथे असू तिथे ही सांस्कृतिक चिन्हं पाठलाग करत पोहोचतात. हे सगळं च्यायला समजण्यापलिकडं आहे. आम्ही सांभाळलीच पाहिजे आपली समृद्ध अडगळ! इतकी की ती घेऊनच इंडियन डायस्पोरा घडवत राहतो- अगदी भारतांतर्गतसुद्धा. म्हणजे खापपंचायतींमधून इन्फोसिसमध्ये आमची ये जा घडत राहते. आमच्या आई बापांना खरं तर हे समजण्यापलिकडंच आहे तसं. लिबरल होऊ घातलेले हे आईबाप आधीच्या पिढीच्या लिबरलपणापेक्षा वेगळा लिबरलपणा सांभाळतात. परदेशातल्या आपल्या पोरांसाठी देशी पोरी त्यांच्या आईबापांच्या संमतीनं लग्नाला नेण्याचा जमाना…. ‘दिलवाले दुल्हनिया’नं सुरू केलेला म्हणतोय मी- त्या जमान्यातला लिबरलपणा.

हळूहळू ते स्पष्टही व्हायला लागलंय आपल्याला. म्हणजे एकदा आमच्या ट्रेकिंगच्या गु्रपला तळ्याकाठी देऊळ सापडलेलं. आम्ही गेलेलो ते वरती काढायला. चिरे, खांब, नक्षी साफ करत काढलं देऊळ वरती तेव्हा एकदम धन्य वाटलेलं. आपल्या संस्कृतीचे हे प्राचीन अवशेष अभिमानानं पुनर्स्थापित करताना. हल्ली तिथं कोणाची तरी जत्रा भरते. ते तळं बिसलेरीच्या बाटल्यांनी आणि लेजच्या पिशव्यांनी भरून गेलंय. लोकल तळ्यात, ग्लोबल कचरा!

अभय हसला. संजानं त्याला टाळी दिली. पण खरं तर संजा जामीची वाट बघत होता. नरेंद्रनं अस्वस्थपणे घड्याळात बघितलं. अजून फोन आला नव्हता. केशवनं आणखी एक चहा मागवला. अभयनं संजाचे दंड चाचपले. संजानं त्याचे कमावलेले बायसेप्स दाखवले. आम्ही पाचजण-पाचवा अन्या. तो सहसा बोलायचा नाही. आम्ही पांचालीत कायम बसलेलो. रात्रीचा अड्डा टाकून. पांचालीची थाळी पालथी घातली जाईपर्यंत.

नरेंद्रनं परत एकदा घड्याळाकडे बघितलं. अभय म्हणाला,

“कशासाठी सत्रादा घड्याळ बघतोस नरेंद्रा? शिकागोतील श्रोतृवर्ग तुझं ‘माझ्या बंधुभगिनींनो’ ऐकायला ताटकळत थांबलाय असं वाटतंय का तुला?” आणि हसला. नरेंद्र काहीच बोलला नाही. तो तसाही कमी बोलायचा. तो भयंकर गंभीर म्हणजे, त्याच्या खोलीतल्या भिंतीवरल्या तस्विरीतील, भगव्या कपड्यात, भव्य कपाळावर फेटा बांधून आणि कमळासारख्या डोळ्यांनी चिंतन करीत असलेल्या विवेकानंदांच्या धीरगंभीर प्रतिमेसारखा, हाताची घडी छातीवर घालून निश्चय करणारा असा नरेंद्र…. मी. माझ्या बापाची खास विषयांसाठी वापराची भाषा… कारण त्यानं बराच काळ संस्कृतचा अभ्यास केलेला. अभय तसा प्रॅक्टिकल. त्याचं म्हणणं ‘यू मस्ट मे अस्मिता अ कमॅडिटी, कष्ट असतात च्यायला अस्मिता सांभाळायच्या तर! मग किंमतीचा टॅग येतोच की तिथं!’ नरेंद्र त्याविषयीही काही बोलायचा नाही.

केशव म्हणाला, “बाबांनी काही काम सांगितलंय का?” नरेंद्रनं नुसतीच मान हलवली. हो-नाही कळलं नाही. त्यानं परत एकदा फोनकडे बघितलं. अभयनं खुर्ची मागे सरकवली आणि तो उठला. कॉलनीचा गणपती बसायचा होता, तेव्हा जरा ढोल-ताशांची पथकं आणायची होती. अभयला उठायलाच लागणार होतं. त्याची पथकं पुरवण्याची एजन्सी म्हणताना खूपच काम पडलेलं. ‘हाय टेक’ असायला लागतं हल्ली आणि सोपंही झालंय हायटेक असणं. एक कॉम्प्युटर पुरतो. एकदम प्रोफेशनली त्यानं ढोल-ताशे पथकांचा डेटा गोळा केलेला. मांडलेला. त्यांच्या प्रॅक्टिस सेशन्सचे व्हिडीओज टाकलेले; शिवाय ढोलाच्या काही ठेक्यांचे ऑडिओज वेबसाईटवर टाकलेले. फेसबुकवर त्यातल्या काही क्लिप्सना देशोदेशीची लाईक्स आलेली. दिसतातंच पथकं भारी एकदम. ड्रेसेस आणि फेटे घालून उभे राहिले की एकदम सुपर्ब! अभयला युनिफॉर्म्सचं भयंकर आकर्षण शाळा सुटल्यापासून.

नरेंद्रचे बाबा सांगतात, पूर्वी ते धनगरी पथकं मागवायचे गावाकडून खास गणपतीसाठी म्हणून. अभयच्या बाबांनाही आठवतो, लहानपणी शेजार्‍यापाजार्‍यांसह रात्री सतरंजी घेऊन लक्ष्मी रोडला केलेला मुक्काम. गणपतीची मिरवणूक बघण्यासाठी. तेव्हा लाईटिंगचे गणपती नुकतेच सुरू झालेले. त्यामुळे ते बघायला सगळ्यात जास्त गर्दी. त्यावेळेस खांद्यावर कांबळी टाकून भरगच्च मिशांचे धनगर ढोल वाजवताना त्यांनीही बघितलेले. ते तेव्हाच दिसायचे फक्त. नाहीतर मग ग्रामीण मराठी चित्रपटात. नंतर ते कुठे जायचे, राहायचे काही कल्पना नव्हती. अर्थात, त्यांच्या भोवतीच्याही गर्दीला तसा चेहरा होता. शेजारपाजारचे लोक ‘दगडूशेठ’ला विसर्जित करायला ताटकळत बसायचे. दर्शन झालं एकदा की सुटले. मग एकमेकांच्या सोबतीनं घरी जायचे. लाईटिंग आलं तेव्हाही ‘दगडूशेठ’चं लाईटिंग असंच असायचं. झोपलेल्या कच्च्याबच्च्यांना उठवत खांद्यावर बसवून दगडूशेठचा गणपती दाखवला आणि मंडईचा दाखवला की गणेशोत्सव पूर्ण. आजकाल टी.व्ही.नं ती मजा घालवली गड्या! असं ते म्हणायचे. झेंडा नाचवत लहानपणी अभयपण सामील व्हायला लागला. गणेशोत्सवात तेव्हा त्यांना भलताच आनंद झालेला. ऐतिहासिक संस्कृतीचा एक रम्य तुकडा जपल्याचा आनंद. अन्या रमायचा नाही फारसा गर्दीत; शिवाय ही आवाजी शक्ती त्याच्या सहनशक्तीपलिकडची.

नरेंद्रचे आजोबा सामाजिक कामातले. त्यांच्या पहिल्या बायकोच्या मृत्यूनंतर त्यांनी पूर्णपणे सामाजिक कामांना वाहून घेतलेलं. घर कायम येणार्‍या जाणार्‍या माणसांनी भरलेलं असायचं. नरेंद्रची आजी त्याच्या आजोबांची दुसरेपणाची बायको. हसतमुख, सतत स्वयंपाक तत्पर. कितीही स्वयंपाक पडो, भांडी पडोत त्या घरी येणार्‍या जाणार्‍यांना जेऊ-खाऊ घालायच्या. नरेंद्रच्या आजोबांवर त्यांची निरपराध श्रद्धा. आणीबाणीत तुरुंगात होते आजोबा तेव्हा त्यांनी ज्या धिरानं सगळं निभावलं होतं ते आजही आठवतं नरेंद्रच्या बाबांना. ते सांगतात ‘त्यावेळेस आम्ही तसे लहानच होतो. शाळेत जाणारे, पाचवीतले.’ नरेंद्रच्या घरी गेल्यावर हातावर काही न काही खाऊ ठेवणारी त्याची आजी आठवते. नंतरचे शिसवी आरामखुर्चीतले आजोबा. घराच्या गॅलरीत बसून बोलणारे. ते का तुरुंगात गेले असावेत? तसे ते काही बाँब वगैरे बनवताना दिसले नव्हते. शाळेच्या इतिहासात वाचायचो आम्ही तेव्हा तुरुंगात जायला असलं काहीतरी करायला लागायचं. पण ते गेले होते खरे. आजी नरेंद्रच्या बाबांना आणि त्यांच्या बहिणींना घेऊन तुरुंगात जायची भेटायला, याच्या बर्‍याच कथा आम्हालाही ऐकवायचे नरेंद्रचे बाबा. ते त्यावेळेस 11 वीत होते. शेवटची 11 वी, एस.एस.सी. त्यानंतर त्यांनीही आजोबांच्या कामात उतरायचं ठरवलं. ते हसून सांगायचे त्या काळातलं. आजही आठवतात त्यांच्या त्याच जुन्या घरात त्याच आरामखुर्चीत बसलेले त्याचे बाबा. ‘माझी जन्मठेप’ वाचायला लावली होती त्यांनी आम्हाला. तरुण पिढीसमोर काही आदर्श हवेत म्हणायचे. आजी रामरक्षा पाठ करून घ्यायची. मी सगळ्यात पहिल्यांदा पाठ केलेली म्हणून त्यांनी रामरक्षेचं छोटंसं पुस्तक बक्षीस दिलेलं. आताही कोणताही शब्द रामरक्षेचा डोक्यात आला की, तिथंपासून सुरूच होते डोक्यात रामरक्षा ती पार शेवट गाठेपर्यंत थांबत नाही. माता रामो मत्पिता रामचंद्र:। स्वामीरामो मत्सखा रामचंद्र:…. ते श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु’ पर्यंत नॉनस्टॉप… त्यांच्या घरात एक रामपंचायतनाचा फोटो होता. पण टी.व्ही.वर रामायण सुरू झालं आणि तो फोटो पुसला गेला डोक्यातून. रामरक्षाही थांबली.

नरेंद्रच्या आई शाळेत शिक्षिका. त्या पांढरे बुधवार करायच्या आणि साधना किंवा नंदा सारख्या डोळे वाढवायच्या किंचित. काजळानं-एवढंच आठवतंय. त्या पौराणिक घरात त्या आनंदानं हिंदी सिनेमातली गाणी गुणगुणायच्या. तेही आठवतंय. म्हणजे ‘अभी ना जाओ छोडकर’ हे मी तिथेच ऐकलेलं पहिल्यांदा. आमच्या घरात रेडिओ नव्हता. आजींच्या कंबरेला बाम लावताना त्या हे गाणं म्हणायच्या आणि नरेंद्रचे बाबा येरवडा तुरुंगातल्या गोेष्टी सांगायचे. तब्बल 9 महिन्यांच्या. बाबांच्या आणीबाणीतल्या गोष्टी म्हणजे एकदम विक्रम वेताळाच्या गोष्टी. तो आणीबाणीचा समंध त्यांनी कधीच खाली ठेवला नाही. राष्ट्रभक्तीचा सज्जड पुरावा होता तो. म्हणायचे आम्हाला बॉबकटवाल्या बायकांची दहशत बसलेली तेव्हापासून. कुंकू न लावणार्‍या, केस कापणार्‍या बाया या इंदिरा गांधींसारख्या दुष्ट असतात त्या आपल्या वडिलांना तुरुंगात टाकू शकतात असं किती दिवस वाटत राहिलेलं पुढे. स्त्री-मुक्तीवाल्या बायांचा म्हणूनही तिरस्कार वाटायचा. केस कापलेल्या, कुंकू न लावणार्‍या म्हणजे पुरुषांना उडवून लावणार्‍या बाया अशी समीकरणं तेव्हापासूनची. आपल्या संस्कृतीत हा किडा नकोच. त्या भीतीत एक गोंधळाचा जर्म होता तो म्हणजे आधी आवडलेली-बांगला देशच्या युद्धाच्या वेळी- रणरागिणी इंदिरा नंतर आपल्यावरच कशी उलटली? याचा. एकूणच स्त्रीजात विश्वासाच्या पात्रतेची नाही, असं त्या सर्व एकसंध मनाच्या पुरुषांना वाटलं असणार. इतक्या सार्‍या कर्तृत्ववान पुरुषांच्या घराण्यात आपण खुजेच असं नरेंद्रला वाटायचं. त्यानं मन लावून अभ्यास केला आणि त्याच्या बहिणीलाच मेडिकलला अ‍ॅडमिशन मिळाली. बायका अशाच. मग त्यानं बीएस्सी करायला घेतलं होतं. पण पौरुष घुसमटत राहिलं हे राहिलंच– विशेषत: मंडल आयोगाविरोधी निदर्शनं टी.व्ही.वर पाहताना.

पुढे बाबांनी बारीच्या विटांचा तुकडा आणला आणि सत्यनारायण घातला तेव्हापासून नरेंद्र अधिकच अबोल झाला. नरेंद्रच्या आईनं कधी नव्हे ते शाळेतल्या गोष्टी त्यादिवशी घरी सांगितल्या. आम्ही गेलेलो बाबांना भेटायला, तेव्हा त्या आल्या होत्या शाळेतून रागावून घरी. “मुली कुंकू लावत नाहीत, बांगड्या घालत नाहीत इतक्यांदा सांगूनसुद्धा, मग आज मी जिरवलीच त्यांची. बांगड्या नाहीत? मग हातात सुतळ्या बांधल्या आणि माझ्या पेपर तपासायच्या लाल पेननं कुंकवं काढली एकेकीच्या कपाळावर.” आता ते आठवलं की वाटतं तिथेही मोठाच मनोभंग होता. याच आईंना ‘दु:ख और सुखके रास्ते बने है सबके वास्ते, जो हमसेभी छुपाओगे तो फिर किसे बताओगे…’ हे आळवून आळवून म्हणताना मी कितीदा ऐकलेलं होतं दाराच्या आडून. नरेंद्रला भयंकर लाज वाटायची आपली आई असली गाणी म्हणत राहते त्याची. मी ते गाणं ऐकतोय, असं दिसलं की आईपाशी जायचा आणि तिरमिरून पदर खेचायचा. टेपरेकॉर्डरचं बटण दाबल्यासारख्या त्या एकदम थांबायच्या. त्यादिवशी त्यांचा चेहरा वेगळाच तापलेला आणि बाबांचा गर्वानं फुललेला चेहरा त्याला आजही आठवत राहतो. हा मनोभंग तेव्हा घडला की तो आधीच होता तिथे? नरेंद्रला आईकडून त्यादिवशी आणखीच एक नवा आदर्श मिळाला. पण पुढे काय? उद्या आपलं घरही कोणी तोडलं तर? आपली सगळी सांस्कृतिक प्रतीकं उद्ध्वस्त केली तर? आई आपल्याही हातात सुतळ्या बांधेल? त्याच्या स्वप्नात तेव्हापासून पडणार्‍या, कोसळणार्‍या इमारती येत राहतात. तो त्यांच्याखाली दडपला जातो. अभयनं कॉम्प्युटरवर देवळं बांधायचा गेम तयार केलाय. भराभर, जास्तीत जास्त देवळं कमीत कमी वेळात बांधू शकणारी बोटं तयार करतोय तो.

आणीबाणीतला तुरुंग आणि बाबरी मशिदीचा विनाश. वीरश्री आणि गर्व. संजा ते सगळे विषय टाळायचा. त्याचे बाबा नरेंद्रच्या बाबांचे मित्र होते. पण आणीबाणीनंतर त्यांच्या मैत्रीत खंड पडला. अन्या संजाच्या घरी गेलेला तेव्हा एकदा कधीतरी संजाचे बाबा म्हणालेले, ‘तुरुंगात गेलो नाही म्हणून गिल्टी वाटलेलं तेव्हा. नरेंद्रचा बाबा एकदमच पक्का होता विचाराला. मी तसा कनफ्युज्ड. शिवाय बापाच्या सरकारी नोकरीवर आमचं घर चाललेलं म्हणताना देशप्रेम त्याच्याशीच जोडलेलं. कोकणातून वर्षाचं धान्य वगैरे भरलं जायची सोय नव्हती. सरकारी घरांतून राहायचो तेव्हा आम्ही. त्यातून आमची आई एकदमच साने गुरुजींची आदर्श आई. तिनं तिच्या सत्यप्रियतेखातर आमचे पोलीस खात्यातले, जंगल खात्यातले, इरिगेशनमधले काका, मामा तोडलेले. त्यांच्या भ्रष्टाचारातल्या पैशाची मदत नको म्हणून. आणीबाणीविषयी तिचं काय मत होतं माहिती नाही ती आम्हा मुलांना घडवण्यात सुखी होती. ‘घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे?’ हे तिचं सर्वात लाडकं गाणं. तिच्या प्रेमाने ओथंबलेल्या हृदयाचा स्पंज माझ्या मनाच्या पाटीवर बाकी कोणत्या गोष्टी टिकू देत नव्हता. त्यामुळे मी तुरुंगात गेलो तर आमच्या आईवर श्यामच्या आईसारखी घराबाहेर निघायची वेळ येईल हे चित्र कायम समोर.” अन्याला वाटायचं आजींशी बोलावं; पण आजींना विचारण्याची सोय नव्हती. कारण त्यांना अल्झायमर्स झालेला. एकूणच प्रेम करायला मुलं जवळ राहिली नाही की बाकी काहीच मेंदूत टिकवण्याजोगं नसतं. आपल्या आयांच्या-असं त्यांचंही झालं असणार. संजाच्या आईला या कशाशीच देणंघेणं नव्हतं. पण आणीबाणीत फारच काहीतरी झालेलं एवढं त्यांना आठवतं. त्या त्यांची करीअर करण्यात अडकलेल्या. डॉक्टर व्हायचं होतं त्यांना. थोडक्यात प्रवेश हुकला. मग त्या बीएस्सी फिजिक्स होऊन बँकेत लागल्या. त्या तशा रसिक. त्यामुळे बाबा आणि संजाबरोबर अनेकदा मैफलींना जायच्या, नाटक सिनेमांनाही. बाबांचा बिझनेस आणि आईची नोकरी यात संजा मोकळेपणानं सुटला. पण आणीबाणीचा एक खोलवरचा ओरखडा त्याच्या बाबांच्या मनावर होता. त्यांची स्वत:ची अशी अभिमानास्पद, सहिष्णू देशाची प्रतिमा त्यांच्याही मनात होतीच. “एवढ्या झाशीची राणी आणि इंदिरा गांधी आपल्या देशात होतात म्हणजे आपल्या देशात बायकांना किती चांगली वागणूक देतो!” हे त्यांचं मनापासूनचं बोलणं. पण मग त्याच देशात इंदिरा गांधीला गोळ्या का घातल्या गेल्या? हा गोंधळाचा जर्म इथे होता. पुढे राजीव गांधीला उडवल्यानंतर तर मग वाचा बंद झाली. म्हणजे आपण नक्की कसे आहोत म्हणायचं? की आपण असं काही नसतं? सगळे आपापले वेगळे वेगळे असतात? आमचा देश आणि तिचं सरकार-असं काहीतरी नव्यानं निर्माण करणारी आणीबाणी हा एक लंब दुभाजकच होता. तो आणीबाणीतला गिल्ट मात्र अगदी युवक वयातला. त्यामुळे संजाच्या बाबाचं मन तो ओरखाडत राहायचा. राष्ट्र हाक मारत असताना आपण केवळ आपल्या पोटापाण्याची चिंता केली काय? आता तर सगळंच अवघड. त्यामुळे पोटापाण्याच्या चिंतेला भक्कम वैधता.

तरीही आणीबाणी हे मोठंच घटीत होतं म्हणायचं. घरांना फरफटत नेऊन, राजकीय विचारांत त्यांच्या इच्छेपलिकडे जाऊन ओढणारं. ते कदाचित अबोध मनातून बाहेर पडलं नव्हतं. मग अमिताभचे सिनेमे कामी आले. भावनिक निचर्‍याला. वेगळ्या आणीबाणीचं समर्थन होतं त्यात छुपं. तसं तर मनातल्या मनात अनेकांनी ते केलंही असणार. कारण आपण अहिंसेविषयी एक घृणा मनात बाळगून असतोच आणि ती कितीदा तरी बायकामुलांवर निघत असते. तिला सामाजिक अवकाशात वैधता मिळाली. असो. अमिताभनं जो एक ग्लॅमरस आभास आणला निपचित भारतीय मनाला ते थोरच. एवढ्या मोठ्या लोकसंख्येशी एकाच वेळेस पौरूषानं रत होणारा त्याचा संतप्त तरुण नायक! त्याने मग आणीबाणीतला दुभंग छिणून टाकला. तो संतप्त पुरुष सामाजिक मनात प्रतिष्ठापित झाला. बायांचं कर्तृत्व डिसप्लेस झालं एकदम.

बाबांसारखाच संजापण सिनेमांचा शौकीन. गाणं वाजवणं, शिकत शिक्षण चाललेलं. आर्किटेक्चरला जाऊन चरितार्थ कमवायचा आणि मग नुसता सिनेमा-संगीत. जामीपण जोडीला असणार आहे. जामीकडे जबरदस्त कल्पनाशक्ती. उर्दू, इंग्लिश, फ्रेंच, जॅझ, पेंटिंग या सगळ्याचं भन्नाट मिश्रण त्याच्या पर्सनॅलिटीत होतं. संजा भयंकर प्रेमात होता त्याच्या.

संजाचाच फोन वाजला. नरेंद्र दचकला. जामी होता फोनवर. तो पोहोचतोय म्हणाला आणि संजा उठला. केशव पण उठला. “आता याच्यापुढं कुठं जाणार तू?” म्हणत.

संजा म्हणाला, “कँपात चाललोय जामीबरोबर कॉन्सर्टला.”

नरेंद्र अजूनही कशाची तरी वाट बघत होता. जामीचं नाव ऐकल्यावर तो संजाकडे वळला. “त्याचे वडील काय करतात?”

संजानं खांदे उडवले.

नरेंद्र म्हणाला, “हा इतके उद्योग कसा काय करतो?”

संजा म्हणाला, “कसे काय म्हणजे? तू पण करून बघ. जमतात ठरवलं की.”

“त्याच्या वडिलांच्या कामांची माहिती काढ.”

संजा वळला. नरेंद्रच्या समोर उभा राहत म्हणाला, “आपण आपल्या वडिलांच्या कामांची माहिती एकमेकांना देतो?

मैत्री करताना काय काय बघतोस?”

नरेंद्रचं बोलणं झालं होतं. त्यामुळे त्याला पुढे काहीच म्हणायचं नव्हतं. एवढ्यात त्याचाही फोन वाजला. तो बाजूला गेला. संजा काहीसा भडकला होता; पण तेवढ्यात जामी आला आणि तो नरेंद्रवरचा राग आमच्यावर काढत काहीच न बोलता गेला. हे असं पूर्वी घडलं नव्हतं. नरेंद्रला काय झालं होतं? पण जामीच्या पाठीमागे बसून संजा गेला तसा नरेंद्रही उठला आणि त्यानं त्याच्या मोटरसायकलला किक मारली.

मानसी आणि ललिता आज जरा उशिरा बाहेर पडल्या. खरं तर उद्या हरतालिका म्हणजे पहाटे लवकर बाहेर पडून पत्री गोळा करायची ठरवलेली. चालायला जाताना रस्त्यावरच्या घरांमधून बाहेर डोकावणारी झाडं सध्या गच्च फुलत होती. श्रावण-भाद्रपदात फुला-पानांचं बहरणं बहारदार. प्राजक्ताचे सडे जागोजागी. जाई-जुईचा दरवळ. सोनचाफ्याची धुंद. उन्हाळ्यातले रंग संपले की, मग हे सुरू होतं. पहाटे लवकर गेलं की, बरीच फुलं हाताशी यायची. जरा उशीर झाला की, हाताशी येणार्‍या फांद्या इतरांनी डल्ला मारून ओक्याबोक्या झालेल्या असायच्या. अलिकडे कोपर्‍यावर बांधकाम सुरू झालेलं. चार बेडरूमचे फ्लॅटस् फक्त. अर्ध्या उभ्या बांधकामाच्या तळाशी लुगड्याची झोळी बांधून त्यात एक लेकरू टाकलेली बाई असायची. बांधकामाच्या शेजारच्या बंगल्यातला पारिजातक फुलं शिंपायचा. ती वेचायला ती यायची. प्रत्येक फूल गोळा करायची. मानसीला जरा रागच यायचा. एकही फूल ठेवत नाही म्हणून. एवढी कशाला लागतात फुलं हिला? बांधकामात कुठं देव ठेवते? कोणता? खरं तर तिचं लेकरू सांभाळायचं तीन दगडांच्या चुलीवर तर तिच्या देवाला बरीच फुलं लागणार हे मानसीला कळायला नको? अमितशी स्काईपवर बोलणं होईल सकाळी, तेव्हा इथल्या फुलांच्या राशी त्याच्या तिथल्या मुलांना दाखवायच्या यानं ती इतकी भारलेली असायची की मोठ्या पिशवीत मिळतील ती सगळी फुलं घेऊन जायची फांद्या वाकवून. कितीवेळा फांद्या तुटायच्या. पारिजातक अमितचा लाडका. तिनं तिच्या फ्लॅटमध्ये कुंडीत लावायचा प्रयत्न केला होता. पण घराचा दरवाजा पूर्वमुखी करताना टेरेस दक्षिणेकडे गेली आणि ऊनही हरवलं. फुलं-झाडं लागेनात. त्यामुळे तिचा पारिजातकावर डोळा. सत्यभामेसारखा. त्या बाईच्या आधी फुलं गोळा करायची धडपड असायची तिची.

त्या त्यांच्या हातापायाचे आणि श्वसनाचे व्यायाम करायला आंबेडकर भवनाच्या पायर्‍यांवर बसायच्या नेहमी. तिथला वॉचमन खुर्चीत पेंगुळलेला असायचा पहाटे साडेपाच वाजता. आज उशीर झाला. चांगलंच फटफटलेलं. त्या दोघी त्यांच्या पायर्‍यांकडे गेल्या तेव्हा वॉचमन तिथे खुर्चीत चक्क जागा बसलेला. पायर्‍यांशी त्याची सायकल बांधलेली.

मानसी म्हणाली, “तुमची सायकल जरा तिकडे घ्या हो. आम्हाला व्यायाम करायचाय.”

“बाई ही जागा व्यायामाची नाही. तुम्ही दुसरीकडे जागा शोधा.”

“पण आम्ही नेहमी इथेच व्यायाम करतो. तुम्ही झोपलेले असता तेव्हा.”

“ओ बाई, मी वॉचमन आहे इथला. झोपलेला कोणाला सांगता?”

“आम्ही रोजच बघतो की, काढा ती सायकल.”

त्यानं बायांकडे बघितलं. वरच्या घरातल्या दिसत होत्या. त्यातून बाया. तोंडाला लागाया नको. शहाणपणानं तो गप्प बसून राह्यला खुर्चीत.

ललितानं सायकल उचलायचा प्रयत्न केला. पण ती कठड्याला साखळीनं बांधलेली होती. तिनं परत एकदा त्याच्याकडे बघितलं. तो नुसता बसून राह्यला.

दोघींना कळेना काय करावं. त्या तिथेच पायर्‍यांवर उभ्या राहून हातांचे व्यायाम करायला लागल्या. वॉचमनला त्या खाली वर होणार्‍या अंगाकडे बघाताना संकोच वाटला. तो उठून भवनात गेला. काचेचं दार लावून घेऊन आत बसला. वॉच तर केलं पाहिजे. बायांना वॉच करतो असं होऊन तर चालणार नाही. त्याच्या छातीत धडधड व्हायला लागली. आता ही बाई म्हणाली तशी तक्रार कोणी केली हा झोपतो म्हणून तर नोकरी जायची. त्याची धडधड अजून वाढली. मग त्यानं बादलीत पाणी घेतलं. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या चौथर्‍याशी गेला. चौथरा घासून घासून धुवायला लागला. वॉच करतो आणि करत नाही, याच्यामधली अवस्था त्याला गाठता आली. ललिता आणि मानसीला आज पायाचे आणि पाठीचे व्यायाम करता येणार नव्हते. कारण ज्या कठड्याला सायकल बांधलेली त्याला धरून त्या स्ट्रेचिंगचे व्यायाम करायच्या. पण उगाच शब्दानं शब्द वाढायला नको. शिवाय आसपास नेहमी फिरायला येणारे नव्हते उशीर झालेला म्हणताना. शिवाय अलिकडे परपुरुषांची भीती वाढलेली, बलात्काराची इतकी सारी प्रकरणं ऐकताना. तरीही आपला शिरस्ता का मोडा? त्यांनी आपली पायर्‍यांवरच्या व्यायामाची परंपरा जितकी राखता येईल तेवढी राखली. प्राणायामासाठी खाली बसल्या. प्राणायामाने फुफ्फुसं स्वच्छ झाली की डोकंही शांत होतं हा त्यांचा नेहमीचा अनुभव. पण तिकडे आंबेडकरांच्या पुतळ्याखालचा चौथरा धुणारा वॉचमन त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांच्या कोपर्‍यात खालीवर हलत होता. एरव्ही तो तिथे खुर्चीवर झोपलेला असायचा, तेव्हा इतका जाणवायचा नाही. खरं तर अजिबातच जाणवायचा नाही. आता तो फारच जाणवतोय. प्राणायामाची लयही चुकतीय. त्या प्रयत्नपूर्वक लक्ष केंद्रित करत होत्या.

“जय श्रीराम! आज उशीर झाला वाटतं?” अशी हाक ऐकली आणि दोघींनी डोळे उघडले. एकदम हुश्श झालं. आता त्यांना “जय श्रीराम” असंच म्हणायचं? की आपण “जय सीतामाई” म्हणायचं? असं ललिताच्या डोक्यात चमकून गेलं आणि तिला हसू फुटलं. म्हणायला हवं जय सीतामाई! म्हणून बघावंच का त्यांना? तिनं तोंडही उघडलं. तेवढ्यात वॉचमन रिकामी बादली घेऊन पायर्‍यांकडे येताना जाणवला. मग ती गप्प बसली. मानसी उठत म्हणाली, “जय श्रीराम! आज उशीर झाला ना! त्यामुळं फुलं काही मिळाली नाही.” तिच्या डोक्यात अमितच्या अमेरिकेतल्या मुलांसाठीची फुलंच होती. त्यांना भारतातली फुलं, सणवार, संस्कृती कळायलाच हवी! त्या पायर्‍यांवरून उतरल्या. ‘जय श्रीराम’च्या सोबतीनं चालत मग आपल्या रस्त्याला वळल्या. ललितानं मानसीला विचारलं, “हे अधूनमधून दिसतात तसे. पण नाव माहिती नाही ना गं?” मानसी म्हणाली, “मला वाटलं तुला माहिती आहेत हे कोण होते ते. आपल्याला काय म्हणा, ‘जय श्रीराम’ म्हणता येईलच त्यांना…” “त्या हाकेला पन्नासजण ओ देतील बरं” म्हणत ललिता हसली. ललिताच्या डोक्यात आणखी एक नोंद होती. भल्या पहाटे आजचं शेअरमार्केट… तुमचा बिझनेस… बँकेला आम्ही सांगितलं… डॉलर, पौंड… हेही तुकडे सातत्यानं कानावर पडायचे. बँकेत असल्यामुळे तो तिला चटकन् नोंदवता आले काय? त्यांना काय हाक मारायची? जय शेअर मार्केट? ती स्वत:शीच हसली. थड्थडथड आवाज ऐकू आला. त्यांना तोही माहीत होता. लाल टी शर्टस् आणि काळ्या स्वेटर पँटस घातलेले पन्नास एक टेके-टेक्निकल केअरचे कर्मचारी सकाळी त्यांच्या मॅनेजरबरोबर व्यायामाला यायचे. खरं तर त्यांचा सेंटचा वास आसमंतात दूरवर दरवळत असायचा. ललिता आणि मानसीला त्यांची सकाळ त्या वासानं दूषित झाल्यासारखी वाटायची. पण ते सगळे लाल लाल पळत जाताना बघायला छान वाटायचे. सामूहिक संघभावना असायला लागते. ललिताला तिचा बास्केटबॉलचा संघ आठवला. त्यांनी कॉलेज कसलं गाजवलेलं! ‘चक दे इंडिया’ तिनं सोळावेळा पाहिला होता त्यासाठी. हेमंत हसायचा तिला. पण ललिताचं खेळावरचं प्रेम हेमंतवरच्या प्रेमापेक्षा अतूट होतं. संघभावना हवी. जिगर हवी जिंकायची. तिचा चालण्याचा वेग तिच्याही नकळत वाढला. मानसीच्या डोक्यात आजचा दिवस गोळा व्हायला लागला. सासूबाई नारळ खोवायला घेत असतील. उद्याचं सारण करून ठेवायचं आज. मोदकाचे साचे धुऊन घ्यायाला हवेत. अंगारकीखेरीज त्यांना हात लागत नाही. मग अमृताला घरात थांबवायला काय करता येईल? निदान गौरी होईतो तरी तिनं स्वयंपाकघरात डोकवावं. तिच्या पाळीची तारीख काय होती? मानसीनं मनातल्या मनात कपाळाला हात लावला. अमेयशी बोलायचं होतंच. विनयच्या बँकेला सुट्टी नव्हती. खाजगी बँक म्हणताना गणपतीची सुट्टी कुठे मिळणार! पण अमृताच्या परदेशी जायची तजवीज करायची तर नोकरी जरा जोरातच करायला हवी. मानसी तिच्या नित्याच्या घोळात थबकली. ललिता जवळजवळ पळायला लागली होती. मानसीची हाक ऐकू आली म्हणून थांबली.

“किती भराभर चालतेस अगं तू! माहितीय बास्केटबॉलची चँपियन होतीस ते! पण मी आयुष्यात पळालेली नाही.”

“तुला नाही वाटलं कधी खेळावंसं?”

“वाटायचं गं. पण ते स्कर्टस घालून यायला लाज वाटायची. शिवाय मुलं बघायला यायची ना खेळ. मग कसंतरी व्हायचं. विनय सांगतो ना तेव्हा मुलंमुलं काय अर्वाच्य बोलायची आपापसात.”

“त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? आपण खेळावं आपल्याला वाटलं तर.”

“नाही गं! मला नाही आवडायचं. बायकांनी घरातली कामं केली ना सगळी तरी खूप व्यायाम होतो.” ललिता हसली. मानसी मूळपदावर आली म्हणून. ‘घरातली कामं करायची ओढून ओढून आणि मग मर मर मरतो पण कोण्णाला त्याची कदर नाही,’ म्हणत रडायचं. ललिता गप्प बसलेली पाहून मानसीला आतून जरा रागच आला. ललिताचा बांधा आणि उत्साह हा कायमच खंतावण्याचा विषय होता. पण तिला वाटायचं असं सगळं विकतचं आणून साजरं केलं की कमनीय राहायला वेळ मिळणारच! ललिताला तिच्याइतके व्याप नव्हते आणि तिच्याइतक्या भीतीही नव्हत्या. पहाटे एकटीही सहज बाहेर पडायची ती. नोकरीसाठी गावोगावी हिंडायची सवय होती तिला. पण आता हे बलात्कारांचे ऐकतो रोज! अमृताची काळजी वाटते. तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींवर बारीक लक्ष ठेवून असायची ती. पण अलिकडे सगळंच बिघडत चाललेलं. मुलींनी बाहेर पडूच नये खरं तर. चांगला कमावता नवरा असेल तर घरची कामं काय कमी महत्त्वाची असतात? अमृताला मान्य नव्हतं ते. तिला फायनान्स मध्ये करिअर करायचं होतं. सी.ए.च्या टर्म्स भरत होती. मध्यंतरी तिच्या फर्मनं तिला दुबईत असाईनमेंट कराल का म्हणून विचारलं होतं. मानसीनं कसून विरोध केला. आपल्याचकडे इतकं असुरक्षित होत चाललेलं सगळं तर तिकडे किती असेल! ललिता हसली होती मानसीला. म्हणाली होती फारच पेशवाईच्या काळात राहते आहे. बायका तितक्या काही असुरक्षित नाहीत आता. करिअर करणार्‍या तर नाहीतच. जग बघायची संधी मिळतेय तर जाऊ दे. पण मानसी ठाम होती. तशी अमेरिकेत जायची संधी असती तर हरकत नव्हती; पण मिडल-ईस्ट नको असं तिनं ठामपणे ठरवलेलं होतं. “संजूचं काय चाललंय सध्या?” तिनं ललिताला विचारलं. “आर्किटेक्चर चालू आहे आणि गिटार, ड्रम्स क्लासेस चालूच आहेत. त्याला पुढे नाटक, संगीत आणखी काय-काय करायचंय. हल्लीची पोरं कुठे जातील नेम नाही.” म्हणत ललिता हसली. मानसीला नवल वाटलं. एकुलता एक मुलगा आणि त्याच्या आयुष्याविषयी इतकी बेफिकिरी कशी? आपण हातात घेऊन वळण लावायचं असतं मुलांना. त्यांना कुठे काय कळतं त्या वयात!

नरेंद्र बाबांसमोर उभा होता. बाबा तसे मोकळे होते. विशेषत: समजून सांगताना बाबांचे उच्चार स्पष्ट आणि मृदू असायचे. बोलताना त्यांच्या गोर्‍या त्वचेवर किंचितसा लालिमा चढायचा. “नरेंद्र, शेवटी आयुष्य म्हणजे काय? अधर्मानं ग्लानी आलेल्या समाजाला जागृत करण्याचं साधन. तुझ्या आईनं आणि मी आमच्या खाजगी जीवनाला कधीच प्राधान्य दिलं नाही. सतत समष्टीचा विचार करत राह्यलो. समाजाला गरज असते कोणीतरी मार्ग दाखवायची. त्याला वाममार्गाला लावणारे टपून बसलेले असतात आणि शिवाय आपल्याही मनात वाममार्गाने जाण्याच्या प्रवृत्ती असतातच. त्यांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवावं लागतं. कोणी ते करू शकत नसेल तर त्यालाही नियंत्रित करावं लागतं. संस्कृती वाढते, फुलते, बहरते ते या नियंत्रणामुळेच. तुझ्यावर आम्ही करत आलेले संस्कार हे तुला समाजाच्या उपयोगी पडण्यासाठीचेच आहेत. आपल्या घराचं हे संचित आहे. त्यांना नियंत्रित करणे गरजेचे आहे. “बाबांची भाषणं नरेंद्रनं ऐकलेली होती. ते घरात एक आणि बाहेर दुसरं असं वेगळं बोलायचे नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा त्याचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. बाबांच्या काहीशा पारदर्शक होत चाललेल्या त्वचेकडे नरेंद्रने बघितले. बाबा वयस्कर होताहेत! आई तशी गव्हाळ होती. ती म्हातारी होताना दिसत नव्हती. पण बाबा मात्र त्यांच्या ताठ कण्यावर सुरकुतताना जाणवले.

जेवणं झाली. आईनं दुसरे दिवशीच्या पूजेची तयारी केली होती. गेजमाळा राहिल्या होत्या तेवढ्या झाल्या की, सकाळी गुरुजींसाठी फराळ करायचंच शिल्लक राहणार होतं. बाबा उठून गेले. नरेंद्र स्वयंपाकघरातच घोटाळला. आईनं टेबल पुसून घेतलं. वर्तमानपत्र टेबलावर पसरून ती कापूस पिंजून त्याचा सुरेख पेळू बनवत होती. अलगद कापूस ओढत त्याची गेजमाळ तिनं बनवली. हळदी-कुंकवाच्या बोटांनी रंगवली. पूजेच्या डब्यात हलकेच ठेवून दिली. दूर्वा निवडायला घेतल्या. नरेंद्रने दूर्वा हातात घेतल्या. आईचं आणि त्याचं फार बोलणं व्हायचं नाही. लहानपणी तिच्या लांब वेणीची आणि धुवट साडीचा स्पर्श त्याला आठवत राहायचा; पण आता तोही नाही. कशासाठी गेजमाळा? देवांची वस्त्रं असतात ती. त्यानं आपल्याला अन्न-वस्त्र दिलं ते त्याला परत अर्पण करतो कृतज्ञतेपोटी, पूजा करून, गेजमाळांचं वस्त्र वाहून, त्यानंच निर्माण केलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून. आजी सांगायची. पण आई असं काही सांगायची नाही. ती करत होती ती गेजमाळ एवढंच. उद्याला हवी इतकंच. गुरुजींनी सांगितलंय म्हणून इतकंच. तो तिच्या लांब बोटांच्या हातांकडे बघत होता. हिंदी गाणी म्हणणार्‍या आईची फिकट स्मृती होती त्याच्याजवळ. पण ती खूपच फिकट. जवळजवळ न दिसणारी. तिच्या गप्प राहण्यानं तो अस्वस्थ व्हायचा. त्याची बहीण परदेशात गेल्यापासून तर त्याची आणि आईची अस्वस्थता आणखीच वाढलेली. तिथे दीदी एकदमच लोकप्रिय. तरूण मंडळींसाठी युवा शिबिरं घ्यायची. तिचा नवरा संगणकातला. तिला तिथे नोकरीची परवानगी नव्हती. म्हणताना मेडिकल वायाच गेले. पण दीदी वेगळीच. बाबांसारखी. डायनॅमिक. आपण आईसारखे? मुखदुर्बळ, सामान्य, त्यानं तिरपिटून आईकडे बघितलं. अनुवांशिकतेला कोण काय करणार! रक्तातच त्यांच्या सामान्यपण असेल तर! गणपतीचे वर्गणीदार, त्यांच्या याद्या…. तो उठलाच.

संजा आणि जामी खोलीवर आले. जामीनं त्याचं गिटार काढलं. संजा खुर्चीत बसला. त्यानं बोंगो घेतला. जामी थांबला. त्यानं जिमी हेंड्रिक्स घेतला यूट्यूबवर आणि त्याचं गिटार परजणार तेव्हा एकदम संजानं विचारलं, “अब्बू काय करतात तुझे?” जामी हसला. म्हणाला, “अब्बू लेक्चरर आहेत केमिस्ट्रीचे दिल्लीत. अम्मीपण उर्दू शिकवते कॉलेजमध्ये.” संजा खुला हसला. म्हणाला, “एकटाच तू? इतका मस्त मराठी कसा बोलतोस? बहीणभाऊ?” जामीनं गिटार बाजूला ठेवत त्याच्याकडे बघितलं. संजानं गेल्या दोन वर्षांत विचारले नव्हते, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत. संजानं बोंगोवर हात चालवला. जामीनं गिटारला हात लावला नाही. म्हणाला, “हो. आम्ही इथेच राहत होतो पुण्यात, ‘बाबरी’ झाली तेव्हा. अम्मी अब्बू मराठी बोलते, बिलकुल अच्छी. पुढे नाईन इलेव्हन झालं. ‘बाबरी’ झाली तेव्हाच अम्मी अब्बूंनी ठरवलं एकच मूल. सो आय अ‍ॅम दि ओन्ली चाईल्ड ऑफ माय पेरेन्टस. ते नाईन इलेव्हननंतर दिल्लीला हलले. तिथे राहतो ती लेक्चरर्स कॉलनी आहे. गुजरातच्या दंगली झाल्या तेव्हा आम्ही तो भाग सोडावा असं आमच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं. अम्मीचं म्हणणं, आपले लोक सगळीकडेच असतात. शैतान तो मनमें रहता है तो कहींसेभी आएगा!” संजा जरा वरमला. मनात काहीतरी टपलं होता, ते काय? त्यानं बोंगोवर थाप मारली. जामीनं परत एकदा जिमी हेंड्रिक्स आणला. एकदम बंद केला. त्याच्या खुर्चीवर बसला. म्हणाला, “आजकाल समझता नहीं संजा, क्या एक्सपेक्ट करते है लोग. वैसे तो अब्बू और अम्मी जिस विश्वाससे रहते आए है उसी विश्वासपे चलता रहता हूँ। लेकीन एक बात समझमें नहीं आती गर उन्हे विश्वास था तो क्यूँ चले गये दिल्ली? यहींपे रहते. पता नहीं. शायद करिअर वहींपे बना पाए होंगे. अम्मी उर्दू कहाँ पढती? एनीथिंग एल्स?” संजा उठला. त्यानं जामीच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवला. “छोड दे यार. मी असंच विचारलं होतं. चल.” त्यानं जामीला उठवलं.

संजानं बोंगोवर ठेका धरला. पण ते दिल्लीला का हलले? पुण्यात त्यांना सुरक्षित का नाही वाटलं? पुणं तर प्रागतिक. आपण कुठे काय मनात आणतो? जामीला इतकं सुंदर गिटार वाजवता येत नसतं तर? आपण केली असती का मैत्री त्याच्याशी? संजा आणखीच घुसमटला. ‘खुदाके लिये’ची ट्यून जामीनं वाजवायला घेतली आणि तो आतून हलला. त्याला वाटलं इथून पळून जावं आणि कुठे तरी दूरवर जावं जिथे हे सगळे संदर्भ नसतील. केवळ संगीत असेल आणि गाणी असतील. साथीला कोणीतरी लागेलच ना पण? तो कोण असेल? जामीच. जामी असेल. जामी म्हणाला, “यू नो संजा, धिस इज रिअली रिव्होल्युशनरी. खुदा संगीत है. मै मानता हूँ. संगीतही है खुदा. बाकी कुछ नहीं. कुछभी नहीं. हॅव यू लिसन्ड टू अबेदा? द वे शी कॉल्स आऊट टू गॉड, उस बुलानेमेंही खुदा है और कहीं नहीं है.” त्यानं गाण्याचा आवाज मोठा केला. तो त्याची ट्यून पकडत राहिला. संजा बोंगोवर हलकेच साथ करत होता. जामी गायला लागला. भरदार आवाजानं त्यानं जगाला हाक दिली. गिटारच्या तारा हलकेच छेडत तो गात होता.

जामीचा आवाज सगळ्या बिल्डिंगला हलवत होता. संजाही वाजवण्यात भिंगून गेला होता. एका अनिवार क्षणी ते थांबले. एवढ्यात एकदम बेल कर्कश्शपणे कानात घुसली. संजा उठला. दार उघडलं तर समोर केशव आणि अन्या. संजा चमकलाच. ते दोघे इथे कसे पोहोचले? केशव हसला. म्हणाला, नरेंद्रच्या मोटारसायकलवर आले तिघे. संजाची काळजी वाटली म्हणून. नरेंद्र खाली थांबला होता. संजा तिरपिटला. त्यानं त्यांना घरी जायला सांगितलं. तेवढ्यात शेजारचं दार उघडलं. एक माणूस डोकावला. “काय चाललंय तुमचं? इथे लोकांना झोपायचं असतं आणि तुम्ही रात्री कसला आवाज करता?” केशव म्हणाला, “खरंय! यांनी नकोय दंगा करायला. काय?” त्याचा स्वर नक्की कसा होता कळलं नाही म्हणून त्या माणसानं शेवटचं निकरानं सांगितलं, “हे पाहा तुम्ही आवाज थांबवला नाहीत तर मी पोलिसांत फोन करीन. चारचारदा बेल मारतोय तुम्ही दारही उघडत नाही?” संजा केशवमुळे वैतागला होताच. तो म्हणाला, “गणपतीचे ढोल-ताशे चालतात तुम्हाला रात्ररात्रभर आणि आत्ताच बोंब मारायला काय झालं?” शेजार्‍यानं तातडीनं फोन लावायला सुरुवात केली. संजानं केशवचा खांदा पकडून त्याला जिन्यावरून खाली ढकललं. जामीनं संजाच्या खांद्यावर हात ठेवला. शेजार्‍याची माफी मागितली. संजानं बाल्कनीतून खाली बघितलं. नरेंद्रच्या गाडीवर बसून तिघं निघाले होते. तो गोंधळलाच. आत येऊन पाणी प्यायला. जामी म्हणाला, “तो शेजारचा एकदम औरंगजेब आहे. संगीत बिलकुल जचता नहीं. वैसे तो सूफी संगीत रहमानने इतना पॉप्युलर किया है, रहमान सुनते रहते है लोग आजकल. फिरभी सूफी समझते नहीं. और अभी हम जॅझ बजाते तो क्या करते ये? पता नहीं.” संजानं नुसतीच मान हलवली. जामीला म्हणाला, “बाहेर जाऊयात? तुझा शेजारी वैतागलाय आवाजाला. आता वाजवता तर येणार नाही.” जामीनं गिटार उचलून ठेवलं. म्हणाला, “चल.”

दोघेही बाहेर पडले. पहाटेचे तीन वाजत आले होते. जामीनं मोटरसायकल सिंहगडाकडे वळवली. थंडगार वारं डोकी शांत करत गेलं. संजानं जामीच्या खांद्यावर हात टाकले. पावसाची भुरभुर सुरू झाली होती. पण ती अगदीच जेमतेम. अल्लाद भिजवणारी; तीही खरं तर जामीलाच. तोच चालवत होता म्हणताना. गणपतींचे मंडप जागे होते. गर्दी वाढायला लागली होती. जामीनं अचानक विचारलं, “सातारा चलते है क्या? हमीदसे मिल आते है. सरप्राईज.” संजा चकितच झाला. “हमीदची आठवण अचानक?” नाही अचानक नाही. अब्बूंशी संपर्क आहे त्याचा. मागे दिल्लीला आला होता ना, मुस्लिम बायांच्या पोटगीची केस होती तेव्हा राह्यला होता आमच्याकडे. त्याच्याकडे जाईन असं खूपदा म्हणतो मी, आज जाऊ. विल बी देअर बाय फाईव्ह. तुला इतर काही काम?” “नाही.” संजा विचारातच पडला. त्यानं त्याच्या खांद्यावरचे हात खाली घेतले. मघाशी नरेंद्र कशाला आला होता? ते सातारा रोडला लागत होते तोच संजानं जामीचा खांदा दाबत म्हटलं, “आज नही जाते हमीदके यहाँ। फिर कभी, आई वाट बघेल.” जामीनं मोटरसायकल वळवली.

संजाला घरी टाकून जामी गेला. बाबानंच दार उघडलं. “झाले का गणपती नाचून?” त्यानं संजाकडे बघत प्रश्न केला. संजा उत्तर न देताच खोलीत गेला. त्याच्या बेडवर पडला. मोबाईलचा मेसेज आला. त्यानं प्रतीक्षिप्त क्रियेनं तो उघडला. केशवनं स्टोरी पाठवली होती. बुद्धगयेच्या बाहेर स्फोट झाले. चार मुस्लिम तरूणांना अटक. संजानं रिप्लाय केलं, माझी झोप कशाला उडवतोस? सकाळी वाचीन पेपर. केशवचा लगेचच रिप्लाय तुलाच हौस आहे रात्री-अपरात्री हिंडायची कोणाकोणाबरोबर. म्हणून काळजी. ‘जर्मन बेकरी’ विसरलास काय? संजानं सटक रिप्लाय केला तुम्ही कशाला काळजी करता माझी? फोन बंद केला. त्याला संताप आला. त्याचा ताबा त्यांनी का घ्यावा? पांचालीवर जाणं बंद केलं पाहजे. जरा डोळा लागला तोच घरासमोरच्या मंडळाच्या गणपतीसमोर गाणी लागली. खणखणीत. तो उठलाच. चहा करायला स्वयंपाकघरात गेला. बाबा उठला होताच. आई चालायला गेली होती. संजा चहा पिताना बाबाला म्हणाला, “बाबा, नरेंद्रचं बिनसलंय. आधी बोलत नाहीच. आता भयंकर साईक झालाय. त्याला सारखा संशयच येत राहतो. काल नुसता मी जामीबरोबर गेलो तर तो तिथे आला मला बघायला.”

बाबा किंचित हसला. पण गप्प बसला. संजा अस्वस्थ होत म्हणाला, “काल आम्ही हमीदकडे जाणार होतो रात्री. पण नरेंद्र तिथेही आला असता असं मला वाटलं. जामीला मग फारच वैताग आला असता; शिवाय माझ्याबद्दलही त्याला मग वेगळं वाटलं असतं. हे सगळे धर्म ना बाबा पब्लिक मेमरीतून पुसले गेले पाहिजेत. युसलेस.”

“सेक्युलर हिटलर आणि कम्युनिस्ट स्टालिनही संशयी होते संजा. गेल्या शतकात सगळ्यात जास्त माणसं या दोघांनीच मारली. जग गुंतागुंतीचंच आहे. शेवटी तुमच्या कृतीला तुम्ही जबाबदार असता इतकंच खरं. कृती पाहावी आणि मग माणूस तपासावा. तेवढ्या तेवढ्या कृतीपुरता. पुढे तो वेगळाही वागू शकतो.” बाबा बाथरूमध्ये गेला.

नरेंद्र वेगळा वागू शकेल? कृती करणं फक्त व्यक्तीच्या हातात थोडंच असतं! कृती सोडाच, मनाचाही ताबा घेतला जातो. मैत्री करता येत नाही साधी? केवळ मैत्री? दूर गेलं पाहिजे इथून. अगदी दूर आणि प्रत्येक कृतीच्या वेळी वेगळा माणूस समोर येणार काय?

चहा पिताना ललिता म्हणाली, “अरे हेमंत, काल दाभोलकरांची मुलाखत पाह्यलीस का ‘लोकमत’वर?”

“नाही. का गं?”

“काही नाही. आज चालायला जाते तिथे थोडी चर्चा कानावर आली. आमच्या श्रद्धांना त्यांनी का हात घालावा म्हणून. मानसीही चिडली होती.”

हेमंतनं पेपर खाली टाकला. आंघोळीला उठत म्हणाला, “मानसी चिडणारच. पण दाभोलकर श्रद्धेला नाही म्हणतात असं वाटत नाही. मी ऐकलंय त्यांना मागे. ते पटवर्धन— दिव्य खडे विकणारे वगैरे प्रकरण माहीत होतं मला. त्याचा आणि देवावरच्या श्रद्धेचा काही संबंध आहे, असं मलाही वाटत नाही. देवच कृपा करणारा तर त्यानंच निर्माण केलेले खडे अंगावर घालून त्याच्या अवकृपेसाठी त्याच्याचकडे दाद मागायची; तीही पटवर्धनांना पैसे देऊन… हा गोंधळच की!”

“दाभोलकरांनाच नरेंद्र महाराजांच्या धमक्या आल्या होत्या ना रे मागे? मारून टाकण्याच्या?”

“पोलिसांत जायला हवं खरं तर त्यांनी,” म्हणत संजा उठून गेला.

“हे म्हणजे त्या मॅट्रिक्ससारखं झालंय का तुझ्या संजा? त्यातलाच व्हिलन ना तो रेप्लिकेट करत राहतो स्वत:ला? नरेंद्र रेप्लिकेट होत रहाताहेत. कोण कोणते काय म्हणतायेत हे समजेनासं होणार आहे. थोड्याच दिवसांत. नरेंद्र महाराज, नरेंद्र तुझा, नरेंद्र दाभोलकर, नरेंद्र मोदी, आणखी कोणता नरेंद्र आहे? मल्टिपल पर्सनॅलिटी सिंड्रोम झालाय आपल्याला.” असं म्हणत बाबा आंघोळीला गेला. संजा खोलीत गेला. अचानक त्याला काहीतरी वाटलं. त्यानं जामीचा फोन फिरवला. जामी उचलत नव्हता. त्याच्या छातीत धस्स झालं. तो अस्वस्थपणे फोन फिरवत राह्यला. आईनं परत एकदा टी.व्ही.लावला होता. नरेंद्रचे बाबा दिसत होते. आवाज ऐकून संजा बाहेर आला. ते मुलाखतकाराला सांगत होते, “मर्त्य जगातले व्यवहार माणसांना सांभाळावे लागतात, हे खरंच; पण तो वरती बसलेला आहे. त्याच्या न्यायालयात सगळे हिशेब चोख ठेवले जातात. मुलांना सांभाळणे पालकांचे ईश्वरप्रेरित जीवितकार्य आहे. विशेषत: आजच्या अस्थिर आर्थिक वातावरणात प्रत्येकाला उदरनिर्वाह मिळेल याची तजवीज आपण केली नाही तर मग रस्त्यावर येणार्‍या प्रत्येकच मुलाच्या रोषाचे आपण बळी ठरू, हे आपण लक्षात घ्यायला हवे. समता आणि न्यायाचा विचार करताना सरकारने हे लक्षात घेणे गरजेचे आहे; अन्यथा न्यायालये आणि पोलीस यंत्रणेच्यापेक्षाही देवाचा न्याय महत्त्वाचा असतो त्याला आपल्याला सामोरे जावे लागेल. पालक आहोत आपण. मुलांचे वडील, जनतेचे वडील म्हणून आपल्या कर्तव्यांना चुकून कसे चालेल?” कोणते मर्त्य व्यवहार? आणि कोण वरती बसलेला? तसलं काहीतरी इतिहासाच्या पुस्तकात लोकमान्य टिळक म्हणाल्याचं लिहिलेलं असायचं काय? त्याची अस्वस्थता वाढली. जामी घरी पोहोचला का? बघायचंच राहिलं. तो जामीला फोन फिरवत राह्यला. जामी उचलत का नाहीये फोन? झोपला असेल बहुतेक. पहाटे घरी गेल्यावर. जाम येत नसेल त्याला. आईनं त्याला डबे भरायला सांगितलं तिच. पण त्याला काहीच समजत नव्हतं. आई म्हणाली, “झोप जा. भंजाळला आहेत तू. रात्रभर जागा होतास ना? झोप थोडा वेळ. बँकेत जाताना उठवते तुला. कॉलेजला जाणार आहेस का?” मान हलवत तो त्याच्या खोलीत गेला.

तो बेभानपणे दार वाजवत होता. जामी दार उघड. गाढ झोपला असावा जामी. जामीनं दार उघडलं. त्याला पाहून त्याला हुश्श झालं. आपलीच लाजही वाटली. नरेंद्र, केशव, अभय आपले बालमित्र आहेत. आपण उगीच साईक झालो.

तो जामीच्या खुर्चीत धप्प बसला. जामीला सांगावं काय? त्यानं दिल्लीलाच जावं खरं तर.

का? आपण म्हणायचं त्याला पुण्यात राहू नको म्हणून?

का ते माहिती नाही. पण जामीनं इथे राहू नये, असं त्याला अनिवारपणे वाटलं.

तो डोकं हातात धरून बसला.

“क्या हुआ यार?” जामीनं विचारलं.

संजानं मान हलवली. तापातून उठल्यासारखं डोकं हलकं झालं होतं. ताप हे लक्षण, रोग नाही; पण रोगाचं निदान आता तरी स्पष्ट नाही, असं जाणवून त्यानं जामीकडे बघितलं.

जामीनं चहा बनवला. “ऑम्लेट बनाए क्या?” संजानं मान हलवली. जामीनं ब्रेड टोस्टरमध्ये टाकले. टी.व्ही. लावला. ‘बुद्धगये’ची बातमी लागली. संजानं टी.व्ही. बंद केला. जामी हसला.

“क्या हुआ संजा? तो म्यानमारचं प्रोजेक्शन आहे. वि आर ग्लोबल नाऊ, सो रिअ‍ॅक्शन तो कहींभी आएगी ना? कहींपे निगाहें कहींपे निशाना… लीव्ह इट. अम्मीका इसका अ‍ॅनालिसिस एकदम अलग रहता है. अम्मी बोलती है अल्लाह उन्हींको दुख देता है जिनमें वो उठानेकी ताकद होती है. आज वो ताकद किसीमें है नहीं तो क्या करें? वि ऑल आर गेटिंग ब्रिटल. टूटते जा रहे है हम सभी. तो कौन दुख उठाएगा? कोई नहीं. सभी अपने गममें चूर. तो सभी मारते रहेंगे एक दुसरेको.”

जामी त्याचा नेहमीचाच जामी होता. संजाच दुभंगला होता. तो अन्यासारखा बाजूला उभा राहून बघत होता दोघांकडे.

“जामी ये मारना कंपलसरी है क्या? सोचना तो चाहिए ना? इतकी काय परिस्थिती आलेली नाही. एवढे शिकलेले. सायन्स साईडचे आणि तरी इतके इररॅशनल?”

“सायन्स और रॅशनॅलिटीका कुछ संबंध रख्खा नही हमने अ‍ॅटलिस्ट इंडियामें. अम्मी बोलती है की सायन्स ने जो हिसाब सब जगह लाये उसमें हमने क्षमाकी ताकद गँवायी। वो तो सही लेकीन सायन्सने इमपार्शल तो बनाया ना? अब्बू हमेशा बोलते है, इमपार्शालिटी छोडनी नहीं चाहिए। ऑब्झर्वेशन छोडना नहीं चाहिए। आपली निरीक्षणं आपली असतात. त्या त्या वेळची असतात. कशासाठी दुसर्‍यांच्या मतांवर भरोसा ठेवायचा?”

जामीनं नरेंद्रला पाहिलं होतं का मागे येताना?

“तुझ्या नरेंद्रचे बाबा ते मानत नाहीत म्हणून नरेंद्रला प्रॉब्लेम्स आहेत.”

“तुला काय माहिती?”

“टी.व्ही.वर बघतो ना मी त्यांना अधूनमधून. शिवाय हमीदच्या बाबांवर त्यांनी केसेस टाकल्या आहेत. हमीद सांगत होता.”

संजा दचकलाच. आपल्याला नाही एवढी माहिती. याला आहे? आपण त्यांना केवळ नरेंद्रचे बाबा एवढंच बघत आलो. ते बरेच काही आहेत हे माहिती होतं. पण हेही करतात?

पण मग नरेंद्रला काय अडचणी आहेत ते जामीला कसे माहिती? त्यानं जामीकडे बघितलं. त्याला परवडत नसेल अडाणी राहणं असं संजाला वाटलं आणि एकदमच नव्यानं तो स्वत:कडे बघायला लागला. जामी ऑम्लेट करण्यात गर्क होता. त्यानं सगळं बशीत काढलं. ते दोघे टेबलापाशी बसले.

“तुला नरेंद्रच्या प्रॉब्लेम्सबद्दल माहिती कशी?” संजानं विचारलं.

“तूच तर सांगतोस की,” जामी म्हणाला.

संजा गप्प झाला. मी कधी बोलतो? नरेंद्रविषयी आपल्याला माहिती आहे ती कधी सांगतो आपण कोणाला? नरेंद्रचं डिप्रेशन. त्याचा हिस्टेरिया. त्याचा काऊन्सेलर. तो नरेंद्र अगदी वेगळा असतो. त्याच्या आईनं आपल्याला सांगितलं आहे कोणाला सांगू नको म्हणून. आपण ते जामीला सांगितलं?

“पण नरेंद्रला त्याच्या वडिलांचा भयंकर अभिमान आहे. त्यांनी खूपच काय काय केलंय. थोर आहेत ते असं म्हणतो तो.” संजाला आपण एकदमच लल्लूसारखं बोललो, असं वाटलं.

जामी हसला किंचित. “जे फक्त बाप असतात ना संजा, ते थोर राजकारणी बनूच शकत नाहीत. पॅट्रिऑर्की हॅज हॅड इट्स डे बट ही विल नेव्हर अंडरस्टँड इट. एक पॅट्रिऑर्क फक्त सत्ता खेळतो. राजकारणसुद्धा करत नाही. कारण राजकारणाला विचार लागतो तो सगळ्यांना आपलासा वाटेल. दुसर्‍याचा विचार न करता राजकारण करणं इज शीअर मास्टरबेशन. नथिंग ग्रोज. इव्हन नरेंद्र मस्ट बी नोईंग दॅट. द मोस्ट डेंजरस पार्ट इज, दे ऑल एन्ड अप रेप्लिकेटिंग देमसेल्वज. एव्हरीव्हेअर. रिलीजन, कास्ट, कलर, क्लास इव्हन जेंडर… नो बॅरिअर.” जामीला सांगावं की नाही? संजा घुटमळला. मग म्हणाला, “त्यांना सगळ्यांना वाटतंय, आपण दोघं प्रेमात आहोत एकमेकांच्या. अननॅचरल….”

जामी जोरात हसला. ठसका लागेपर्यंत.“म्हणून त्यांना आपल्याला बडावायचं होतं काय काल रात्री? आणि माझ्या जागी तुमचा तो अन्या असता तर?” संजानं पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. मग म्हणाला, “जामी हँस मत यार, आय रिअली लव्ह यू.”

जामी गप्प झाला.

बराच वेळ गेला.

मग तो म्हणाला, “संजा सेक्स इज सेक्स. सो नो गिल्ट. अ‍ॅन्ड इट्स सो नॅचरल-मिलियन्स मस्ट बी फकिंग धिस मूमेंट इन द होल वर्ल्ड. बट आय अ‍ॅम नॉट गे. डू यू अ‍ॅक्सेप्ट?”

संजानं मान हलवली पाय ताणून देत तो पसरला. म्हणाला, “का आहे मी प्रेमात विचार ना.”

जामीनं गिटार काढत त्याच्याकडे बघून भुवया उंचावल्या.

संजा म्हणाला, “मी इतका कंटाळलो आहे गेली काही वर्षं. हेच विषय भोवती. सगळे नुसते तिरस्कार करत राहतात. प्रेम करताच येत नाही. काही ना काही मध्ये मध्ये येत राहतं. कोणते दुसरे विषयच नाहीत बोलायला. जरा मैत्री झाली की, चौकशा सुरू. जरा बाहेरच्या जगात पाऊल टाकलं की, बॅकग्राऊंड चेक सुरू. नवीन कल्पना घेऊन गेलं तरी कुठेच कोणी हलत नाही. कोणालाच चाकोरीबाहेरचं एक्स्प्रेशन नाही. कोणालाच जोडून घेण्याचे नवे नवे मार्ग शोधण्याची आस नाही, उत्सुकता नाही. बाँबस्फोटाच्या बातम्यांपलिकडे कशानंच हलून जात नाही. बाँबस्फोटानंही हलतो म्हणजे कोणी केले असतील, हे सांगण्यासाठी हलतो. फार तर फाशी द्या म्हणून रस्त्यावर आंदोलनं करतो. फाशी दिलं की रस्त्यात जल्लोष करतो. फुगड्या घालतात रे बायासुद्धा! पण नवीन बांधकामं खुणावत नाहीत. नव्या इमारती आव्हानं देत नाहीत. मोडणं उद्ध्वस्त करणं आणि ज्यानं प्रत्येकाच्या मनात नवीन मोडतोडच होईल एवढंच फुटकळ इथं तिथं पेरणं. कंटाळा आलाय जामी. म्हणून तुझी रॅशनॅलिटी आवडते मला. तुझी क्रिएटिव्हिटी. तुझी शांतताही. मी गे आहे की नाही माहिती नाही जामी. पण दोघं मिळून काही नवे सूर रचू इतकंच वाटतंय. सापळ्यातून सुटू जागोजागी लावलेल्या इतकंच.” संजा हमसाहमशी रडायला लागला.

जामीला अब्बू आठवले. “मर्द हो तो व्हायोलंट होने का प्रेशर खाये जा रहा है सब जगह मर्दाेंको। उससे छुटकारा मिलेगा तो सब ठीक होगा।”

नरेंद्रची आई सीरियस असल्याचा निरोप कालच मिळाला होता. सगळे त्याच्या घरी जमले होते. डॉक्टर्सनी सगळा लाईफ सपोर्ट काढून टाकला होता, नरेंद्रच्या बाबांच्या सांगण्यावरून. शरीराचे आता जास्त हाल नकोत. ते म्हणाले होते. नरेंद्रला वाटत होतं की, दुसरीकडे नेऊन पाहावं. जामीनं त्याच्या अब्बूंचा एक मित्र संजाला सांगितला होता. जगप्रसिद्ध ऑन्कालॉजिस्ट. संजानं तो मनातच ठेवला. नरेंद्रला ते सांगण्याचं धाडस नाही झालं. बाबा म्हणाले, शरीर केवळ मर्त्य स्वरूप. आज नाही तर उद्या संपणारच. दीदी आलेली होती अमेरिकेहून. आईच्या सुजलेल्या ब्रेस्ट्स पाहून थक्क झाली होती. कळलं नाही? ऊझिंग होत असणार कितीतरी दिवस. हात हलवणं अशक्य झालं तसं तिनं सांगितलं होतं. पण त्या वाढलेल्या आकाराचं पेन असणार. शिवाय ऊझिंगचा त्रास तर कितीतरी असतो. बाबांना कळलं नाही? आईची छाती सडलेली-कॅन्सरनं बाबांना कळली नव्हती? पण बाबांना ते विचारायची हिंमत झाली नाही. दीदीनं आईला विचारलं तेव्हा ती नुसतीच हसली होती फिकट. आता तर पेन असह्य असणार. सिडेटिव्हजचा उपयोग होईल तेवढाच काय तो रिलीफ. घरात एवढे कर्तेपुरुष होते ते काय करत होते? वेदना दिसली नाही त्यांना आईची? दीदी व्याकूळ होत होती. सिडेटिव्हजच्या अमलातून आई जागी व्हायची तेव्हा ती तोंड फिरवून झोपून जायची. दीदीचाही गोतावळा जमा झाला होता. माणसांनी घर भरून गेलं. पण आईला कोणतीच माणसं दिसत नव्हती. तिच्या पाठीखाली शरीरातल्या मर्त्य द्रावांची थारोळी साचत होती. त्यांचंही भान तिला नव्हतं. नरेंद्र त्याच्या खोलीत बसून होता आणि बाबा गॅलरीत. स्वयंपाकघर दीदीच्या मैत्रिणींनी ताब्यात घेतलं होतं. बाबांच्या मित्रांची मुलं ये जा करत होती. नरेंद्र आईइतकाच एकटा होत चालला होता. दीदीनं त्याला संतापून विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ लागत नव्हता. आईच्या ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं बाबांनी का नाही लक्षात घेतली? आईच्या गप्प असण्याचा अर्थ लावायचा तो प्रयत्न करत होता. हे नक्की काय होतं?

कसला आवाज आला म्हणून तो खाली उतरला. बाबांच्या समोर एक पोरगेलेसा माणूस उभा होता. “वस्तीत प्रतिष्ठापना करायला मूर्ती आणली होती देवीची. देऊळ बांधून होईलच दोन दिवसात. तोवर ती ठेवली होती देवळाबाहेर. तर आता वस्तीतला भगत म्हणतोय तिच्या मनात नाही तिथं राहायचं. ती सोडून गेलीय वस्तीतलं देऊळ. तिकडं औरंगाबादला गेलीय ती त्या जमिनीखालच्या गुहांत. तुमची कुलस्वामिनी तिकडचीच ना? जाऊन शोधून आणायला लागेल असं त्याचं म्हणणं. आता मूर्ती आहे; पण देवी नाही हे काही कळत नाही. पण त्यानं वस्तीतल्या लोकांना तसं सांगितलंय आणि त्यांना ते पटलंय. काय करायचं?”

“जा घेऊन त्या भगताला, औरंगाबाद का कुठे ती गेलीय म्हणतोय तिथं. नंतर त्यालाच पटवायला सांग वस्तीवरच्या माणसांना.”

नरेंद्र ऐकत होता.

“तो म्हणेल तिथे घेऊन जा आणि त्याच्याकडूनच देवी घेऊन या. मग बसवून टाका देवळात. श्रद्धेला प्रश्न करायचे नसतात.”

मान हलवून तो गेला. नरेंद्रकडे बघून बाबा म्हणाले,

“सामान्य माणसाला श्रद्धा लागते. त्यावर चर्चा करू नये. दैवतांचा प्रभाव असतो मानवी मनावर. तू या सगळ्यांचा नीट विचार कर. श्रद्धा मोठी ताकद आहे. तुमच्या भौतिकशास्त्राला ती कळत नाही. तुम्हाला जे डोळ्याला दिसतं आणि कानांना ऐकू येतं एवढंच खरं मानण्याची सवय लागलीय. तीच तुम्ही समाजाला लावू पाहाल तर अनर्थ होईल.”

कसला अनर्थ हे नरेंद्रला कळलं नाही. उलटून प्रश्न विचारायची सवय त्याला लागू दिली गेली नव्हती. “तुझ्या आईच्या भोंगळ वळणावर जाऊ नकोस. मी तिच्याशी लग्न केलं कारण याला माझी सावत्र आई. ती दुसरेपणाची म्हणून माझ्या बाबांनी तडजोड केली. बाबांच्या मागे लग्न लावताना तिनं माझ्यासाठी तिच्या नात्यातली मुलगी बघितली. ती तुझी आई. कोणताही कणखरपणा नसणारी. तूही तसाच. दीदी बरी. ती आमच्या रक्तावर गेली आहे. पण तरीही तसं बिनसलेलंच आहे सगळं.”

बाबांचा चेहरा लालसर झाला.

“तुझ्या आईची स्मृती म्हणून पलिकडच्या वस्तीत आपल्या कुलस्वामिनीचं देऊळ बांधतो आहे.”

पण आई जिवंत आहे अजून असं म्हणायचं का? नरेंद्रनं फक्त त्यांच्याकडे बघितलं.

इतक्यात दीदीचा आवाज आला, “बाबा, नरेंद्र आई कशी करतेय बघा. लवकर या.”

नरेंद्र चटकन आईच्या खोलीत गेला. आई तडफडून उठायचा प्रयत्न करत होती. तिच्या अंगावरचं पांघरूण सरकून तिच्या सुजलेले, रक्ताळलेले स्तन उघडे पडले. नरेंद्रनं नजर वळवली. दीदीनं पांघरूण लपेटायचा प्रयत्न केला. आई परत शांत झाली. निपचित पडली. दिदीनं तिच्या तोंडात पाणी घातलं. तिचे ओठ हलत होते. दीदीनं तिच्या ओठांपाशी कान केला. अस्पष्टपणे काही पुटपुटते ओठ तिनं ओले केले. “के आग बिरहाकी मत लगाना, के जलके मैै राख हो चुकी हूँ…. ये राख माथेपे मैने रख ली के जैसे मंदिरमें लौ दियेकी…” आईला एवढे शब्द आठवत होते? मरताना? दीदी अचंब्यानं बाजूला झाली. आईचे डोळे मिटले होते.

जामीचा फोन आला. संजा तडक त्याच्याकडे गेला.

“संजा फ्यूजन करूयात. घे ड्रम्स वाजवायला. हे बघ

सहनाववस्त. एक बीट. सहनौभुनक्तौ. एक बीट. सहवीर्यं करवावहै. दोन बीट्स. मा विद्विषामहै, तीन बीट्स. देन शिफ्ट यू

ये मसाईले तसव्वुफ, ये तेरा बयान ‘गालिब’

तुझे हम वली समझते, जो न बाद्ख्वार होता

हम मुव्वहिद है, हमारा केश है तर्के रूसुम

मिल्लतें जब मिट गयीं, आजा-ए-ईमां हो गयीं

न था कुछ तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता

डुबोया मुझको होने ने, न होता मैं तो क्या होता

फास्ट…”

बीट्स वाढत गेले. दोघेही नव्या दमाने गात राह्यले. अचानक संजाचा फोन वाजला.

“नरेंद्र दाभोलकरांची कोणी अज्ञात इसमांनी डोक्यात गोळ्या घालून हत्या केली.”

एसेमेस. अन्या. त्याला काहीच समजेना.

संजाचा हबकलेला चेहरा बघून जामी थांबला. त्यानं त्याला खुणेनंच विचारलं.

इथे आपल्या शेजारी. ज्या रस्त्यावरून आपण हजारो वेळा गेलो तिथे आपल्या सगळ्यांना माहिती असलेला, साधे खादीचे कपडे घालून पायी हिंडणारा माणूस, सकाळी सर्वांसमोर मारला जातो. निखळ तिरस्कारातून. आपण जामीला काय सांगणार?

आपणच बघत राहतो आपल्याकडे न गुंतता.

समजतो स्वत:ला व्हिडीओ गेम मधले मोकाट बिंदू.

काहीही इच्छाशक्ती नसल्यासारखे बटणं दाबणार्‍यांच्या बोटांवर नाचणारे.

तसं नसतं. आपण माणसं आहोत. विचारशक्ती आहे आणि इच्छाशक्तीही, हे विसरतो.

मग हे घडतं, इररॅशनल, आदिम भयगंडाचे विस्फोट.

हे दुभंगणं जाणतोस?

आपल्याच मनातल्या आदिम अंधारात सरपटत चालण्यात

डोकं कापून थाळीत घालून आरती नंतर फिरवण्यात कसल्या फुशारक्या?

अंधाराला आव्हान देण्याचे प्रयत्न त्यांच्याइतकेच आदिम आणि दमदार आहेत विसरलास?

संजा जामीकडे पाहत राह्यला.

अन्यानं संजाला उचलून नरेंद्रकडे आणलं. किती दिवस तो त्याच्या मागे लागला होता. दीदी गेली परत अमेरिकेत. बाबांना काही दिवस बदल म्हणून तिच्याबरोबर अमेरिकेत घेऊन गेली. नरेंद्र एकटाच घरी. बोलत नाहीये. कॉलेजला येत नाहीये. फोन उचलत नाहीये. हे कळूनही संजा येण्याचं नाव घेत नव्हता. त्याला कशाची तिडिक बसली होती. कळणं तसं अवघड नव्हतं. साधारणपणे माहिती असतात एकमेकांचे स्वभाव, मतं, त्यातून मग ताण येतात. अन्यानं गाडी थांबवली. संजाला ढकलून उतरवलं गाडीवरून. नरेंद्रच्या घराची बेल मारली. बराचवेळ दार उघडलं नाही. कुलूप नव्हतंच. परत एकदा बेल वाजवली. दार उघडलं. तर भगव्या कफनीत आणि फेट्यात नरेंद्र समोर उभा होता. त्याच्या डोळ्यांत ओळख दिसली नाही. अन्या आणि संजा आत गेले. नरेंद्र त्याच्या खोलीत गेला. टेबलाशी बसला. टेबलावर दोन मोबाईल ठेवले होते. त्यांच्याकडे बोट दाखवत तो म्हणाला, “येईलच फोन. तेवढा घेतो.” अन्य आणि संजा हबकले होते. त्यांनी भोवताली पाहिलं. भिंती लेखनानं पूर्ण भरून गेल्या होत्या. पार वरती छतापर्यंत काही लिहिले होते. भिंतींच्या कडेनं अनेक पुस्तकं रचून ठेवली होती. त्यांच्यावर पातळशी चादर घालून ठेवली होती. नरेंद्र शांत बसून होता. त्याच्या हालचाली अत्यंत सावकाश होत होत्या. अजिबात विचलित न होता तो खुर्चीत बसला होता. एकटक फोन्सकडे बघत होता. जणू त्याच्या नजरेनं ते फोन वाजणार आहेत. अन्या आणि संजा समोर उभे होते ते त्याला दिसत होते; पण जाणवत नव्हते. अन्या भिंतीशी गेला.

“सगळ्या प्रकारच्या निरर्थक गोष्टी माझ्या डोक्यात कोंबण्याचा माझ्या वडिलांना काय हक्क आहे? माझ्या शिक्षकाला अथवा माझ्या समाजाला माझ्या डोक्यात हे सगळे विचार कोंबण्याचा काय अधिकार आहे? कदाचित ते विचार चांगले असतील; पण माझ्यापक्षी उपयुक्त नसतील. चुकीच्या मार्गाने शिक्षण देऊन लाखो, निष्पाप बालकांचा कसा घात करण्यात येत आहे… जगातील या भयंकर अनिष्ट गोष्टीचा विचार करून पाहा. आश्चर्यकारक अशा आध्यात्मिक सत्यात ज्यांचे रूपांतर झाले असते, असे कित्येक सुंदर विचार व कल्पना या कुटुंबधर्म, समाजधर्म आणि राष्ट्रधर्म यासारख्या महाभयंकर भावनांनी मुळातच नष्ट करून टाकल्या आहेत. विवेकानंद, माझं जे सगळं नीतिमान वागणं आहे, ते सगळं वागणं हाच देवाचा माझ्या द़ृष्टीनं असलेला अर्थ आहे. म्हणजे माझं नीतिमान वागणं आणि माझी देव व देवत्वाची कल्पना यांच्यामध्ये अभिन्नता आहे. नरेंद्र दाभोलकर, हिंदुस्थानात गुप्त धर्मसंस्था कधीच अस्तित्वात नव्हत्या. म्हणून अशा प्रकारची जर तुमची काही कल्पना असेल तर ती तुम्ही टाकून द्या. अशा तर्‍हेच्या गुप्त संस्था अवनत होऊन नेहमीच अतिनिंद्य गोष्टींना जन्म देतात. या संस्था कोणते भयंकर अनिष्ट घडवून आणतात, हे कळण्याइतका मी या जगाचा भरपूर अनुभव घेतलेला आहे. या गुप्त संस्था मोकाट प्रेमाला उत्तेजन देणार्‍या संस्थांमध्ये आणि भूताप्रेतांशी संबंध असलेल्या संस्थांमध्ये कशा सहजपणे परिवर्तित होतात, हे मला चांगले माहिती आहे. विवेकानंद, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मागे काही मूल्यात्मक आशयही आहेत. वैज्ञानिक विचारपद्धतीमध्येच ते अंतर्भूत आहे. हे मुद्दे असे : एक सम्यकता, दोन स्वायत्तता, तीन शोधकता, चार निर्भयता आणि पाच नम्रता.” नरेंद्र. नरेंद्र. नरेंद्र. नरेंद्र. नरेंद्र. नरेंद्र.

अन्या चकित झाला. हे सगळं नरेंद्रचं लेखन होतं? सगळ्या भिंती वाचायला तर किमान आठवडा लागला असता. सुवाच्य अक्षरात निळ्या रंगानं छताला टेकेपर्यंत लिहिलेली अक्षरं नरेंद्रनं कधी लिहिली? त्याच्या हिस्टेरियाचा भाग होता तो? तो मटकन खाली बसला. संजा गोंधळून भिंतींकडे बघत होता, नरेंद्र मोबाईल्सकडे. अन्याला वाटलं त्या दोन मोबाईल्सच्या टॉवर्सवर दोन नरेंद्र उभे आहेत. हा नरेंद्र शोधतोय. नम्रपणे खाली मान घालून कोणता मेसेज आधी येईल, कोणता फोन आधी वाजेल याची. मोबाईल वाजल्याशिवाय तो हलणार नाहीये. विज्ञानाची ताकद पणाला लावून तो त्या मेसेजेसची वाट बघणार आहे.

संजा खवळला होता. “अन्या, बोलत का नाहीस तू त्याच्याशी? माझं तो ऐकणं अशक्य आहे आणि मलाही त्याच्याशी अजिबात बोलायचं नाहीये. कुठे गेले ते अभय, केशव? कुठे गेले?”

अन्यानं बोलायला हवं हे खरंच. कारण त्याला बरंच काही समजतं. नरेंद्रचा मनोभंग समजून घेतोय तो. संजाला ते दडपण कळणं अवघड आहे. अन्याला माहितीय ते दडपण. कसं? या सगळ्या लेखनाचा निवेदक तोच आहे. अन्या. स्वत:कडेच बाहेरून बघणारा. स्वत:ला स्वीकारायची कमाल धडपड करणारा. ती कमी पडते आहे म्हणून हताश होणारा. चेहर्‍यावरून हात फिरवून तो पुसून टाकतो सगळा ताण. कचरा गोळा करणार्‍या बाईसारखं सगळं जगच कंगाल. युद्धांच्या विध्वंसाच्या कचराकुंड्या झाल्यासारखं हे जग. जागोजागी नुसताच कचरा. त्यात काही मिळतंय का खायला ते शोधणारं जग. आमच्या जन्मापासून शतखंडित होत जाणारं जग बघत वाढलो आम्ही. इतिहासही सरळपणे समोर येत नाही आमच्या. तुकड्या तुकड्यांनी भोवती फिरत राहतो. गणपती वर्षांनुवर्षे बसत राहतात. कॉम्प्युटर आले की त्यातही जाऊन बसतात. तसे इतिहासाचे तुकडे हिम नदीसारख्या वाहणार्‍या काळात इथे-तिथे तरंगत राहतात. दाभोलकरांची हत्या झाली ती गणपतीच्या आधी ना? आत्ता मी सांगतो आहे ते. पण ती हत्या गणपतीच्या आधी झाली खरं तर. रक्षाबंधनाला. नेमका दिवस. त्यानंतर जी सणांची आणि उत्सवांची रीघ लागते, त्यात दु:ख करायला वेळ राहणार नाही अशा दिवशी. ती हत्या झाली आहे आणि तरीही गणपती नव्या दमानं उफाळून येतात. गेल्या वर्षीसारखेच. दरवर्षीसारखेच. जणू काही मध्ये कोणीच काहीच म्हटलं नाही, घडलं नाही असं. गणेशोत्सवात मोठी होर्डिंग्ज लागतात वांझ बायकांना मुलं होण्यासाठी मंत्रोपासना देणार्‍या ताईंची. वास्तुशांतीसाठी लकी ठरणार्‍या स्टोन्सच्या जाहिराती टी.व्ही.वर दिमाखानं झळकतात. नरेंद्र दाभोलकरांची हत्या आम्ही कितीवेळा केलीच होती की, गणपतीच्या आधी आणि गणपतीनंतर अजूनही करतो आहोत. तेव्हा काय फरक पडतो काळाचे इतस्तत: विखुरल्यानं? आपल्या गौरवशाली परंपरा मिरवताना काळाचा नाही पडत फरक. नरेंद्रच्या आईंसारख्याच त्या आधुनिकतापूर्व काळाला आधुनिकोत्तर काळात बसवतात आणि गात राहतात. तेव्हा काय फरक पडतो? गणपती आधी की नंतर? गणपती येत रहातात अशा अनेक दाभोलकरांना पचवून. नरेंद्रची छिन्न-मनस्कता कदाचित त्या मोबाईलनं काळ सुसंगतपणे लावला तर ताळ्यावर येईल. मीही ताळ्यावर येईन कदाचित. उत्सवांची झिंग उतरलेल्या शिथील शहरात आता कोणत्या तत्त्वांचा ताठपणा येणार? मी कसा आणि कुठे बोलणार? या शहरात मी कुठे आहे? मी आहे? मी असायला हवा आहे? कशासाठी? जामीचा गालिब मनात येत राहतो. जगण्याच्या दु:खाला थोडी ग्रेस मिळते.

हमको मालूम है जन्नतकी हकिकत, लेकिन
दिलके खुल रखनेको ‘गालिब’ ये खयाल अच्छा है


बस की दुश्वार ही हर कामका आसां होना
आदमी को भी मयस्सर नहीं इन्सां होना


कैदे हयातो बंदे गम अस्ल में दोनो एक है
मौत से पहले आदमी गम से निजात पाए क्यूँ


गालिबे खस्ता के बगैर कौन से काम बंद है
रोइये जार जार क्या, किजीए हाय हाय क्यूँ.

वंदना भागवत

लेखिका संपर्क : मोबा.9657558550