माझ्या लहानपणी वाचायला, ऐकायला मिळालेल्या बहुतेक गोष्टी पौराणिक असायच्या आणि त्या वयात त्या अगदी खर्या वाटायच्या. मारिचानं हरिणाचं रूप घेतलं, हनुमानानं झेप घेऊन समुद्र ओलांडला वगैरे गोष्टी अचंबित करायच्या; पण त्यावर विश्वासही बसायचा.
मोठ्या माणसांच्या गप्पा ऐकताना कुणाला तरी साक्षात्कार झाला. कुणाला प्रत्यक्ष रामानं, कृष्णानं किंवा देवीनं दर्शन दिलं, तेव्हा रोमांच यायचे. प्रत्यक्ष देवाचं दर्शन होणं हाच परमोच्च आनंदाचा, साफल्याचा अनुभव, अशी ठाम कल्पना मनात तयार झाली होती. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर हे सिनेमे पाहिले, तेव्हा त्यातील चमत्कार पाहून देवाच्या अस्तित्त्वाची खात्री पटायची.
आपल्यालाही देवाचं दर्शन व्हावं, अशी तीव्र इच्छेनं मनात मूळ धरलं. घरच्या सत्यनारायणाची कथा मी भक्तिभावानं लक्षपूर्वक ऐकायची. देवाची पूजा करताना देवाचं रूप डोळ्यापुढे आणून अत्यंत मनोभावे करायची, अगदी एकाग्रतेनं.
त्याच सुमारास ‘नामजपाचे महत्त्व’ असं कोणतं तरी पुस्तक वाचण्यात आलं. त्यात असं म्हटलं होतं की, कोणत्याही देवाचा जप तेरा कोटी वेळा पूर्ण केला की, त्या देवाचं दर्शन होतं. असा अनुभव आलेल्यांचे नावासहीत दाखलेही दिले होते. ते वाचून मी फार भारावून गेले. जाता-येता कोणतंही काम करताना मनातल्या मनात जप केला, तरी चालतो, असं त्या पुस्तकात म्हटलं होतं. हा उपाय सोपा वाटला. तेरा कोटी लवकर पूर्ण व्हावेत म्हणून छोटंसं नाम ‘श्रीराम’ एवढंच जपासाठी ठरवलं. जप येता-जाता सुरू असला, तरी त्याची मोजणी मात्र मनात समांतरपणे चालू असे.
आई-वडील काही फार धार्मिक मुळीच नव्हते. पण माझ्या या भक्तीची गंमत अन् कौतुक वाटत असल्याने त्यांनी माझ्या नामजपाला हरकत घेतली नाही.
काही दिवसांनी माझी आजी परगावाहून आली. तिला माझी ही गंमत कळली. त्यावर ती जे म्हणाली ते तिच्या वयाचा अन् त्या काळाचा विचार करता फार महत्त्वाचं होतं. ती म्हणाली, “हे मुलांना निष्क्रिय करणारं आहे. आपलं कर्तव्य करायला फक्त शिकवावं, तेवढं पुरे.” अकाली वैधव्यात अनेक अडचणींना तोंड देणार्या आजीनं हे म्हणावं हे आणखी विशेष. तिच्या या कॉमेंट्समुळे अन् जपातील रटाळपणाही लक्षात आल्यामुळे मी तो नाद सोडून दिला. मोठी झाल्यावर करिअरचे वेध लागले, तसे देवाचे वेड कमी झाले. लग्नानंतर सासर तर पुरोगामी, बुद्धिवादी विचारांचे. त्यामुळे उरला – सुरला धार्मिकपणाही गळून पडला. सामाजिक प्रश्नांची जाण आली. स्वत:च्या अन् कुटुंबाच्या पलिकडे जाऊन पाहण्यातला आनंद जाणवू लागला. वाचनाची आवड कथा-कादंबर्यातून विविध अनुभव सांगणार्या पुस्तकांकडे वळली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची काही पुस्तकं वाचनात आली अन् दृष्टिकोन तयार होत गेला.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर खडबडून जाग आली अन् आम्ही अंनिसच्या संपर्कात आलो. घरच्या जबाबदार्या अन् अडचणींमुळे फारसं काही काम करू शकले नाही. तरी अंनिसच्या कामाची व्याप्ती अन् समाजाला त्याची असलेली गरज किती मोठी आहे, हे लक्षात आलं.
आज गेली काही वर्षे आम्ही अनेक संकटांतून जात आहोत. नातवाचा रेटिनोब्लास्टोमा, माझा कॅन्सर, यजमानांची बायपास सर्जरी अन् मन:स्ताप देणार्या काही समस्या उद्भवल्या, ज्या अद्याप संपल्या नाहीत. पण हे दुष्टचक्र संपावं म्हणून देवाला एखादा नवस बोलावा, असं कधीही आमच्या मनात येत नाही किंवा एखादी पोथी वाचावी, कोणतातरी उपवास धरावा, असंही वाटत नाही. वाचलंच तर संकटं पार केलेल्यांचं चरित्र.
आम्ही देवाचं काही करत नाही त्याचा हा परिणाम, असं अनेकजण म्हणत असणारचं. काही जण तसं आडून-आडून किंवा स्पष्टपणेही सुचवतातही. पण ते करण्याचा समस्या सुटण्याशी काही संबंध नाही, हे आता पक्कं समजलंय.
–सुनीला बुद्धिसागर