प्रा. डॉ. नितीन शिंदे हे वयाची पन्नाशी पूर्ण केलेले एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व. कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य झाले. खगोलशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्राचे जाणकार म्हणून त्यांची ओळख आहे. ‘सफर विश्वाची’ हे त्यांचे पहिले पुस्तक. त्यांनी विश्वाची, अवकाशाची निर्मिती ते बर्म्युडा ट्रँगल, उडत्या तबकड्या यांची माहिती दिलेली आहे. ‘पत्रिका जुळविताना’ हे पुस्तक त्यांनी नरेंद्र दाभोलकरांच्या पश्चात त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी तळमळीने झटणार्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढाऊ कार्यकर्त्यांना अर्पण केले आहे. ‘पत्रिका जुळविताना’ हे त्यांचे नवीन पुस्तक. या पुस्तकाचे शीर्षक फार प्रेरक आहे, ज्यातून हे पुस्तक नेमके कशावर आहे, हे वाचल्याशिवाय कळणार नाही. पत्रिका जुळविणे प्रकार हा 21 व्या शतकातही सुशिक्षित आणि मध्यमवर्गास विवाह ठरविण्यामध्ये महत्त्वाचा, असे वाटत आले आहे.
लग्न जुळविताना जन्मपत्रिकेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. काही सुशिक्षित माणसेही पत्रिकेच्या जाळ्यात अडकून चांगली स्थळे नाकारतात. लग्न करताना पत्रिका नाही, तर मन आणि विचार जुळणे महत्त्वाचे आहे. या पुस्तकात पत्रिका काढताना लागणार्या ग्रह-तार्यांची माहिती करून दिली आहे. नक्षत्र, राशी यांची ओळख सांगितलेली आहे. कडक मंगळ असल्यामुळे लग्न जुळविताना अडचणी आल्या तर पत्रिकाच बदलणारे आणि मंगळ सॉफ्ट करणारे महाभाग कमी नाहीत. जन्मपत्रिकेबरोबर बायोडेटामध्ये गुण, नाडी आदी संदर्भसुद्धा येतात. आपली जन्मपत्रिका कशी बनते? त्यासाठी ज्योतिषी, पुरोहित यांच्याकडे जाण्याची गरज आहे का? या प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक नक्की देते. आपल्या मुलीचा गण राक्षस कसा? अथवा नाडी मध्य कशी? याची किंचितही कल्पना पालकांना नसते. पण गण आणि नाडीशिवाय 36 गुणांची जुळवाजुळव कशी होणार? पण ही पत्रिका कशी जुळवितात? याची कल्पनाही तमाम आई-वडिलांना नसते. यामागचे गुपित समजून घेण्यासाठी तथाकथित ज्योतिषांकडे जाण्याची गरज नाही. यामागचे गौडबंगाल समजून घेण्यासाठी हे पुस्तक मदत करते.
सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका ऐश्वर्या रॉयला कडक मंगळ होता, ज्याच्याशी तिचे लग्न होईल, त्याच्या जीवाला धोका आहे, असे ज्योतिषाने सांगितले. मग मंगळ सॉफ्ट करण्यासाठी तिचे लग्न पिंपळाच्या झाडाबरोबर लावले आणि नंतर अभिषेकरावांच्याबरोबर झाले. पण पुढे त्या पिंपळाच्या झाडाचे काय झाले? हा प्रश्न नक्कीच पडतो. 36 गुणांचे गौडबंगाल दीपाली आणि सुनील यांचे उदाहरण देऊन या पुस्तकात स्पष्ट केले आहे.
कडक मंगळ कसा ठरवितात? शनीची साडेसाती म्हणजे काय? राक्षण गण कसा काढतात? कालसर्पयोग ही भानगड काय आहे? वैरवर्ग कोणता? हे सर्व समजावून घेण्यासाठी आणि त्यामागील सामाजिक-सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर येते. पत्रिका जुळविणे हा प्रकार स्त्री-पुरुष असमानता यांचे समर्थन करतो. मग आपण ठरवूया, विचार करूया आणि त्यामुळे भारतीय समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सुशिक्षितांसह सर्वांनाच गुणमिलनाचे गौडबंगाल समजावून सांगूया. आपले भविष्य आपल्या हातात आहे, ज्योतिषाच्या नव्हे, शेवटी बहिणाबाईंची ही ओळ आठवते-
नको रे ज्योतिषा।
नको हात माझा पाहू॥
माझे दैव मला कळे।
माझ्या दारी नको येऊ॥
पुस्तकाचे नाव : पत्रिका जुळवताना
लेखक : डॉ.नितीन शिंदे
प्रकाशक : नागनालंदा प्रकाशन, इस्लामपूर.
पृष्ठे : 64
किंमत : रु.50/-
पुस्तकासाठी संपर्क : 9421226926