‘जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प परिषद’ पनवेल येथे 10 फेबु्रवारीला छान पार पडली. नोंदणीपासून लक्षवेधी वातावरण, प्रत्येकाने रुक्ष झाडाला बहर आणण्यासाठी नोंदणीनुसार म्हणजे सिंगल असतील तर पानं आणि जोडीने आले असतील तर फुलं लावायची होती. ही छोटी अॅक्टिव्हिटी; पण प्रवेश केल्यावर सगळ्यांनी ‘एन्जॉय’ केली. पहिल्या सत्रात पाहुण्यांच्या हस्ते झाडाला फूल लावून उद्घाटन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक झाल्यावर महेंद्र आणि निशाने आपण ज्या 45 परिषदा घेत संकल्पपत्रं भरून घेतली, त्यातील डेटा आलेख सादर केला. प्रत्यक्षात संकलित झालेला डेटा फक्त 2 हजार तरुणांचा आहे, आणखी साधारण 3 हजार तरुणांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. त्यावरून निरीक्षण नोंदवण्यात आले.
उद्घाटक गीताली वि. म. यांच्या भाषणाने सत्र सुंदर झाले. या सत्राचे अध्यक्ष राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत सर होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. दुसर्या सत्रात ‘जोडीदार निवडीतील अपेक्षांचे वास्तव’ या विषयावर परिसंवाद झाला आणि त्यात मुलांचं प्रतिनिधित्व कोल्हापूरच्या राजवैभवने, मुलीचं प्रतिनिधित्व निशा, पालकांचे प्रतिनिधी म्हणून स्वामी सरांनी भूमिका मांडली. या सत्राचे अध्यक्ष महेंद्रने आपल्या मांडणीतून हे सत्र उंचीवर नेले.तिसर्या सत्रात डॉ. प्रदीप पाटकर यांनी ‘प्रेम आणि लग्न’ या विषयावर मांडणी केली. या सत्रात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा व्यक्त केल्या. चौथ्या सत्रात तीन जोड्यांच्या मुलाखती स्वाती आणि सचिनने घेतल्या. यात परिचयोत्तर लग्न केलेले दीक्षा आनंद, सध्या आपसांत परिचय करून घेत 11 महिने वेळ घेणारे अनिकेत-भाग्यश्री आणि ट्रेनिंगमधून गेल्यावर त्याचा उपयोग करत विवाहबद्ध झालेली सोनाक्षी-मिलिंद या जोडप्यांच्या अनुभवांनी रंगत आणली.
समारोपाच्या सत्रात ‘तरुणाई धडपडणारी, दिल-दोस्ती-दुनियादारी’ हा व्हिडिओ गेले महिनाभर मेहनत घेणार्या आपल्या कार्यकर्त्यांचे काम दाखवणारा होता. या सत्राचे प्रास्तविक कृष्णातने केले आणि नंतर सगळ्या संवादकांचे कौतुक करण्यात आले. उपस्थित तरुणांनी मनोगत व्यक्त केले आणि अध्यक्ष मिलिंद देशमुख, राज्य प्रधान सचिव यांनी समारोप केला.
– आरती नाईक