Categories
पुरस्कार

परिवर्तनाचा विचार पुढे घेऊन जाणे हेच सामाजिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य – डॉ. बाबा आढाव

ऑगस्ट - २०१८

महाराष्ट्र अंनिसचा पहिला प्राचार्य डॅडी देशमुख स्मृती पुरस्कार सर्पमित्र बाळ काळणे यांना प्रदान

समाजाची वाटचाल तपासण्यासाठी चिंतनशीलता व कलात्मक सर्जनशीलता हे मापदंड असताना आज ती दुर्लक्षित होत असल्याची खंत प्रसिध्द विचारवंत डॉ. बाबा आढाव यांनी अकोला येथे व्यक्त केली. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व डॅडी देशमुख परिवाराच्या वतीने पहिला प्राचार्य डॅडी देशमुख स्मृती विदर्भस्तरीय कार्यकर्ता पुरस्कार वितरण नुकतेच करण्यात आले. या समारंभ प्रसंगी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ, महा. अंनिसचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, माजी आमदार प्रा. तुकाराम बीडकर, उद्योजक प्रशांतदादा देशमुख, श्री. शिवाजी महाविद्यालय, अकोलाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार व उपाध्यक्ष संजय शेंडे मंचावर उपस्थित होते.

डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते प्राचार्य डॅडी देशमुख स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व सर्पमित्र बाळ काळणे यांना सपत्निक देऊन गौरवण्यात आले. शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व 21 हजार रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी साप्ताहिक ‘नारी ललकार’च्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. हर्षवर्धन मानकर व चमूने गायलेल्या स्फूर्तिगीताने झाली. महादेवराव भुईभार यांनी प्रास्ताविकात आयोजनामागील भूमिका, गजेंद्र सुरकार यांनी पाहुण्यांचा परिचय, तर डॅडींच्या स्नुषा सौ. राजश्री देशमुख यांनी प्राचार्य डॅडी देशमुख यांच्या कार्याचा परिचय करून दिला. बबन कानकिरड यांनी बाळ काळणे यांना द्यावयाच्या सन्मानपत्राचे वाचन केले. यावेळी बाळ काळणे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. विठ्ठल वाघ यांनी डॅडींच्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणात अविनाश पाटील यांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व सामाजिक कृतज्ञता निधी सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

डॉ. संजय तिडके, अकोला