Categories
अभिवादन

फिडेल कॅस्ट्रो : योद्धा विचारवंत

वार्षिकांक - २०१६

क्युबन क्रांतीच्या शौर्यशाली इतिहासाचे महानायक फिडेल कॅस्ट्रो वयाच्या नव्वदाव्या वर्षी नुकतेच निधन पावले. लोकसंख्या आणि आकार या बाबती लिंबू-टिंबू असणार्‍या क्युबा सारख्या छोट्याशा देशातील महानायकाच्या निधनाची दखल जगातील सर्वच प्रसारमाध्यमांनी, राजकीय नेत्यांनी घेतली. त्यांना आदरांजली वाहिली. आपापल्या विचारसरणींना अनुसरून, प्रतिकूल मते, मतांतरे व्यक्त केली गेली. मृत्यूसमयी ते क्युबामध्ये कुठल्याही अधिकार पदावर नव्हते. गेली दहा वर्षेआजाराशी झुंज देत ते सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाले होते; परंतु ते इतर सर्वसामान्य राजकीय नेत्यांप्रमाणे विस्मृतीच्या पडद्याआड गेले नाहीत आणि आता मृत्यूनंतरही ते विस्मृतीत जाणार नाहीत. जगभरच्या क्रांतीकारी जनतेच्या मनात त्यांची स्मृती कायम जिवंत राहील. ते कायम या जनतेचे प्रेरणास्थान राहतील. त्यांनी क्युबन क्रांतीच्या लढ्यात गाजवलेले शौर्य हे मानवमुक्तीच्या लढ्यातील शौर्याचे प्रतीक म्हणून अजरामर राहील. मानवजातीच्या इतिहासात जे-जे महापुरुष सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या मुक्तीसाठी, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध त्यांच्या होत असलेल्या शोषणाविरुद्ध उभे ठाकले ते सर्व आजही अजरामर आहेत. मग ते गुलामांच्या विद्रोहाचे नेतृत्व करणारे स्पार्टाकस असोत की, फिडेल कॅस्ट्रो असोत. कारण ते एका राष्ट्राचे, जाती, धर्माचे, वंशाचे नसतात, तर अवघ्या शोषित पीडित जनतेचे नेते असतात आणि म्हणूनच ते अजरामर असतात. फिडेल कॅस्ट्रोही केवळ क्युबन जनतेचे नेते नव्हते, तर अवघ्या कष्टकरी, पीडित, शोषित जनतेचे नेते होते म्हणूनच तर त्यांनी अमेरिकेसारख्या बलाढ्य साम्राज्यवादी शक्तीला आव्हान देत म्हटले होते. “पृथ्वीच्या पाठीवर कुठेही क्रांतिकारी लढाई सुरू असेल, तेथील जनतेच्या लढ्यात क्युबा उघडपणे सहभागी होईल.” लॅटीन अमेरिकेतील इतर देशांमधील जनतेच्या क्रांती लढ्यात क्युबन क्रांतिकारक म्हणनूच सामील होत राहिले, लढत राहिले. प्राणाची बाजी लावत राहिले. मग ते अँगोला असो, बोलेव्हिया असो, होंडुराम असो. बोलेव्हियाच्या क्रांतीलढ्यातच क्युबन क्रांतीचा आणखी एक महानायक जो दंतकथाच बनला आहे, असा ‘चे गव्हेरा’ शहीद झाला. क्युबन क्रांतीने जगभरच्या शोषित जनतेला जे दोन महानायक दिले, त्यातील ‘चे गव्हेरा’ वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी शहीद झाला आणि आता फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाने दुसरा महानायक शरीराने आपल्यातून निघून गेला. आज अवघ्या जगाने त्याच्या कर्तृत्वाला मानवंदना दिली आहे.

फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म 13 ऑगस्ट 1947 रोजी झाला. कॅस्ट्रो यांचे पूर्वज स्थलांतरीत होऊन क्युबामध्ये आले होते. त्यांचे वडील एक यशस्वी ऊस उत्पादक शेतकरी होते. जमीनदारांमध्ये त्यांची गणना होत असे. म्हणून तेव्हा क्युबन क्रांतिकारकांनी जमीनदारांविरुद्ध भूमिका म्हणून जमीनदारांची शेतं जाळण्याचे आंदोलन सुरू केले, तेव्हा फिडेल आणि त्यांचा भाऊ राऊल कॅस्ट्रो जो आज क्युबाचा अध्यक्ष आहे. त्यांनी स्वत:चाच शेतांना आगी लावून या आंदोलनाची सुरुवात केली. या कृतीतून क्रांतिकारक असण्याचा खरा अर्थ त्यांनी दाखवून दिला. फिडेल याचीं आई क्युबन होती, ती स्पॅनीश नव्हती. फिडेल कॅस्ट्रो हुशार विद्यार्थी होते म्हणून त्यांना क्युबाच्या राजधानीत हॅवाना येथे शिक्षणासाठी पाठविण्यात आले. तेथे त्यांनी कायद्याच्या पदवीबरोबरच कायद्याची डॉक्टरेट ही पदवीही मिळविली आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग गोरगरीब जनतेसाठी करण्यास सुरुवात केली. फिडेल विद्यार्थी दशेत असतानाचा क्युबा हा पूर्णपणे अमेरिकेच्या ताब्यात होता. अमेरिकेने आपले बाहुले हुकुमशाही सरकार तेथे उभे केले होते. क्युबाचे मुख्य उत्पन्न साखर. पण साखर कारखान्यावर अमेरिकन कंपन्यांची मालकी होती. ते जवळजवळ सर्व साखर निर्यात करीत असत. एकंदर क्युबावर अमेरिकन साम्राज्यशाहीची आर्थिक गुलामगीरी होती.

अमेरिकेच्या पाठिंब्यावर क्युबावर हुकुमशाही शासन लादणारा हुकुमशहा बारिस्टा हा एक जुलमी राज्यकर्ता होता. शेतकरी आणि मध्यमवर्गीय जनता या जुलमाखाली जखडली होती. क्युबामध्ये कम्युनिस्ट पक्ष आणि इतर क्रांतिकारी गट भूमिगत पद्धतीने कार्य करून जनतेला संघटीत करून आंदोलने करीत होते. ती चिरडली जात. लोकशाहीचा देखावा उभा करून लष्करी सत्ता विरोधकांना मतदानापासून वंचित ठेवून निवडून येण्याचे नाटक करीत असे. फिडेल यांनीही निवडणूक लढवली होती; पण निवडणूक म्हणजे एक फार्स असल्याचे त्यांच्या अनुभवाला आले त्यानंतर ते सशस्त्र लढ्याकडे वळले. 26 जुलै 1953 रोजी त्यांनी आपल्या काही सहकार्‍यांना सोबत घेऊन मोकांडा येथील लष्करी ठाण्यावर हल्ला चढवला; परंतु लष्कराची शक्ती क्रांतिकारकांपेक्षा अर्थात जास्त होती. शिवाय हा हल्ला करताना क्रांतिकारकांकडून काही चुकाही झाल्या. त्यामुळे या हल्ल्यात फिडेल आणि त्यांचे धाकटे बंधू रॉल कॅस्ट्रो आणि आणखी सहाजण वाचले या सर्वांना पकडण्यात येऊन त्यांच्यावर खटला भरला गेला. फिडेल स्वत: वकील होते आणि घणाघाती वक्तृत्व ही त्यांची खासीयत होती. त्याच्या जोरावर त्यांनी जनतेच्या बाजूने आपण का लढत आहोत याबद्दल तर्कशुद्ध युक्तिवाद केले. त्यामुळे क्युबातील हा क्रांती लढा जगाच्या पटलावर आला. त्यांच्या या भाषणातील ‘इतिहास मला माफ करेल’ हे वाक्य जगभराच्या क्रांतिकारकांचे पुढे घोषवाक्य बनले. उलट या खटल्यामुळे आपली अधिक नाचक्की होते, हे लक्षात आल्यानंतर क्युबन सरकारने हा खटला गुंडाळून फिडेल यांची सुटका केली. परंतु क्युबामध्ये काम करण्यास बंदी घातली गेली. त्यामुळे ते शेजारच्या मेक्सिकोमध्ये गेले. मेक्सिको मध्ये राऊल कॅस्ट्रो यांनी त्यांची ‘चे गव्हेरा’बरोबर ओळख करून दिली. चे गव्हेरा अर्जेंटिनाचा होता आणि पेशाने डॉक्टर होता आणि कम्युनिस्ट होता. डॉ. अर्नेस्टो गव्हेरा हे त्याचे नाव; पण अर्जेंटिनात उच्चार करताना ‘चे’ हा शब्द वापरण्याची पद्धत आहे. म्हणून अर्नेस्टोचे गव्हेरा पुढे ‘चे’ नावानेच जगप्रसिद्ध झाला. 26 जुलै रोजी फिडेल आणि त्याच्या साथीदारांनी मोकांडा बराकावर हल्ला केल्यामुळे या चळवळीला ‘26 जुलैची चळवळ’ असे नाव प्राप्त झाले. या चळवळीत राऊल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा हे दोघेच कम्युनिस्ट होते. फिडेल सुरुवातीला कम्युनिस्ट नव्हते; पण त्यांचे धाकटे बंधू राऊल कॅस्ट्रो क्युबातील कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते आणि ते समाजवादी युवक परिषदेसाठी रशियाला जाऊन आले होते. त्यामळे 26 जुलैच्या चळवळीला साम्यवादी चळवळीच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम रॉल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा यांनीच पार पाडले आहे. फिडेल आणि चे गव्हेरा यांच्या मैत्रीनेच पुढे क्युबन क्रांतीचा शौर्यशाली दैदिप्यमान इतिहास घडवला आहे. या क्रांतीला जागतिक परिमाण लाभले या मैत्रीमुळेच. मेक्सिको आणि अमेरिकेतून पैश्यांची जुळवाजुळव करून ग्रान्मा नावाच्या एका जुन्या फाटक्या बोटीतून ब्याऐंशी क्रांतिकारक फिडेल आणि चे च्या नेतृत्वाखाली क्युबावर हल्ला करण्यासाठी निघाले. पण या हल्ल्याची माहिती क्युबन सरकारला आधीच लागल्यामुळे क्युबाच्या किनार्‍यावर पोचल्याबरोबर लढाईला तोंड फुटले. या हल्ल्याने क्रांतिकारक गांगरले. फिडेल, चे आणि रॉल कॅस्ट्रो असे पंधराजण या हल्ल्यातून सहीसलामत निसटले आणि त्यांनी इतिहासात अजरामर झालेल्या ‘सिएरा माएरा’ या जंगलाचा आश्रय घेतला. क्रांतिकारकांची पूर्ण वाताहात झाली होती. एकमेकांना शोधण्यात त्यांचे अनेक दिवस गेले. अखेर भेटले तेव्हा ते सर्व मिळून पंधराजण होते. पण अशा निराशाजनक परिस्थितीतही फिडेल आणि चे गव्हेरा आणि त्यांचे साथीदार खचले नाहीत. जंगलाच्या आश्रयाने त्यांनी प्रतिकार सुरू ठेवला. शेतकर्‍यांना संघटीत करून गनिमी हल्ले सुरू करण्यात आले. शहरातील क्रांतिकारकांनी जंगलाच्या दिशेने धाव घेण्यास सुरुवात केली. रसद मिळू लागली आणि फिडेल आणि चे गव्हेरा यांच्या नेतृत्वाखाली क्युबन सरकारला टक्कर देता येईल, असे सैन्यबळ उभे होऊ लागले. चळवळीला ग्रामीण भागातून आणि शहरी भागातून मोठा पाठिंबा मिळू लागला. 1958 च्या डिसेंबर मध्ये फिडेल आणि चे गव्हेरा यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या दिशेने क्रांतिकारी फौजांचा आणि त्यांचे स्वागत करणार्‍या जनतेचा जोर पाहून हुकूमशहा बाटिस्टा पळून गेला. रणगाड्यावर बसून विजयी मुद्रेने फिडेल कॅस्ट्रोंनी हवानामध्ये प्रवेश केला, त्यावेळी एक दहा वर्षांचा मुलगा आपल्या वडिलांच्या स्वागतासाठी हवानाच्या रस्त्यावर उभा होता. ज्याने आजपर्यंत वडिलांना प्रत्यक्ष पाहिलेच नव्हते. तो फिडेल यांचा मुलगा होता. कळण्याच्या वयानंतर त्याला वडील भेटलेच नव्हते. आज तो अणुशास्त्रज्ञ आहे. 1959 च्या जानेवारीत क्रांतिकारकांचा संपूर्ण विजय झाला. क्रांतिकारी सरकार स्थापन झाले आणि कॅस्ट्रो त्याचे अध्यक्ष बनले. 26 जुलैच्या चळवळीचे कम्युनिस्ट पक्षात विलीनीकरण करण्यात आले आणि सत्ता स्थिर होताच फिडेल यांनी मी कम्युनिस्ट आहे आणि अखेरपर्यंत कम्युनिस्ट राहील, अशी घोषणा केली. सर्व परकीय कारखान्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि अमेरिकेची आर्थिक गुलामी पूर्ण नष्ट करण्यात आली. 1959 ते 2009 पर्यंत म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षेकॅस्ट्रो यांनी क्युबाचे नेतृत्व केले. आधुनिक काळात इतकी दिर्घकाळ सत्ता कोणाकडेच राहू शकली नाही. सर्वसामान्य क्युबन जनतेचा अपरिमित विश्वास मिळवल्याशिवाय हे शक्य नाही. आता कॅस्ट्रो यांचे साम्राज्यवादी, भांडवलवादी विरोधक कॅस्ट्रो यांना हुकूमशहा म्हणतील; पण कुठलाही हुकूमशहा इतका दिर्घकाळ सत्तेवर राहू शकत नाही. जनतेच्या हितसंबंधापेक्षा वेगळे हितसंबंध जेव्हा नसतात, तेव्हाच कुठलाही सत्ताधारी दिर्घकाळ सत्तेवर राहू शकतो.

महाराष्ट्र टाईम्सने फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनानंतर ‘युगान्त’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या अग्रलेखात फिडेल कॅस्ट्रो यांच्या कर्तृत्वाचे आणि त्यांच्या लोकप्रियतेचे नेमक्या शब्दात वर्णन केले आहे. “कॅस्ट्रो ज्या संस्कृतीची गोष्ट करीत होते, ती त्यांनी आपल्या राजवटीत क्युबात प्रत्यक्षात आणून दाखविली. प्रगत मानवी संस्कृती याचा अर्थ जास्तीत जास्त जनसमुदायाचा सर्वांगीण विकास असा लावला, तर कॅस्ट्रोंनी क्युबात डाव्या क्रांतीनंतर काय करून दाखवले ते पाहावे लागेल. आज अमेरिकेत साक्षरतेचे प्रमाण 99 टक्के आहे. क्युबात हेच प्रमाण 99.8 टक्के आहे. क्यूबाची सरासरी आयुर्मर्यादा आहे 80. बालमजूर आहेत शून्य. लशीकरण आहे शंभर टक्के. बालमृत्यू जगात सर्वांत कमी. कुपोषित मुलांची संख्या शून्य टक्के. प्रक्रिया केलेले शुद्ध पेयजल 97 टक्के जनतेला सहजसाध्य. एड्सचे पेशंट्स 0.01 टक्क्यांहून कमी आणि दरहजारी डॉक्टर 3.6. हे डॉक्टरांचे प्रमाण, तर अमेरिका, जपान आणि इस्रायलपेक्षाही कितीतरी अधिक आहे. त्यामुळे जगात कुठेही आपत्ती आली की, प्रथम धावतात, ते क्यूबन डॉक्टर्स. पण हेही अचानक झालेले नाही. 1959 मध्ये क्यूबात क्रांती झाली. कॅस्ट्रो यांच्या फौजांनी हवानाचा ताबा घेतला आणि क्रांती झाल्याची द्वाही फिरवली, तेव्हा निम्मे डॉक्टर देश सोडून (अमेरिकेत) पळून गेले. हे आव्हान कॅस्ट्रो यांनी पेलले. वैद्यकीय शिक्षणावर इतका पराकोटीचा भर दिला की, अवघ्या 15 वर्षांत क्यूबाच्या आरोग्य व्यवस्थेचे सारे चित्रच पालटून गेले. कॅस्ट्रो यांची क्रांती हे काही ‘रेडिमेड आयात पॅकेज’ नव्हते. ती क्यूबाच्या भूमीतून सणसणत वर आलेली अस्सल देशी वाणाची क्रांती होती. कॅस्ट्रोंनी सत्तेवर आल्यानंतर सोविएत युनियनशी जुळवून घेतले. कम्युनिस्ट देशांचा गट जवळ केला आणि अमेरिकेच्या अंगणात लाल झेंडा इतका भक्कम रोवला की, लागोपाठ 11 अध्यक्षांना जंग जंग पछाडूनही या झेंड्याची फडफड थांबवता आली नाही. कॅस्ट्रो यांची क्रांती देशी वाणाची असल्यानेच गेल्या शतकाच्या नव्वदीच्या दशकात गोर्बाचोव्ह यांच्या ‘ग्लासनोस्त’नंतर जगभर कम्युनिस्ट राजवटी पत्त्याच्या बंगल्यांप्रमाणे कोसळून पडत असतानाही क्यूबा ताठ राहिला. इतकेच नाही, तर लॅटिन अमेरिकेतील नव-डाव्या राजवटींना नैतिक आणि प्रत्यक्ष पाठबळही पुरवत राहिला. या सार्‍या क्रांतिगीतांचा मुख्य स्वर ‘फिडेल’ हाच होता!”

अग्रलेखातील या उतार्‍यामध्ये कॅस्ट्रो यांच्या कर्तृत्वाचे सर्व सार सामावलेले आहे. त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. खरंतर हा संपूर्ण अग्रलेखच फिडेल यांना योग्य आदरांजली वाहणारा आहे. पण लोकसत्ताच्या कुबेर यांनी मात्र अमेरिकन साम्राज्यशाहीचे दलाल ज्या प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करतील, तशीच प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्या मनातील कम्युनिस्ट द्वेष जगजाहीर केला आहे. खरेतर कॅस्ट्रो भारताचे मित्र होते. प्रत्येक राजकीय अडचणीच्या वेळी जागतिक पातळीवर फिडेल यांनी कायम भारताची पाठराखण केली आहे. निदान त्याची तरी बूज राखली गेली असती, तरे बरे वाटले असते.

फिडेल कॅस्ट्रो यांचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले, तर त्यांना ‘योद्धा विचारवंत’ म्हणणे हे योग्य ठरेल. त्यांनी केवळ शस्त्र लढ्याची गरज असल्याची सैद्धांतिक मांडणी केली नाही, तर बंदूक घेऊन ते स्वत: लढले. चे गव्हेरा आणि फिडेल कॅस्ट्रो यांचे क्रांती लढ्यातील हे वेगळेपण आहे. चे गव्हेरा आणि फिडेल कॅस्ट्रो आणि त्यांच्या साथीदारांची तुलना आपल्याला या बाबतीत भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांशीच करता येईल. बलाढ्य शत्रूंवर तुटून पडताना त्यांनी परिणामांची आणि स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही. फिडेल यांनी क्रांती झाल्यानंतर सर्व भर क्रांतीची मूल्ये समाजात प्रस्थापित कशी होतील. यासाठी विपुल प्रमाणात लिखाण केले. अगणित मोठीमोठी भाषणे केली. त्यांचे एक भाषण सात तास दहा मिनिटांचे आहे. युनोमध्ये त्यांनी केलेले भाषण चार तासांचे आहे. जे रेकॉर्ड आजवर कोणी मोडलेले नाही. अलिप्त राष्ट्रांच्या सहाव्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. तर इंदिरा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अलिप्त राष्ट्रांच्या सातव्या परिषदेला त्यांनी “नवीन जागतिक आर्थिक व्यवस्था का हवी” या शिर्षकाखाली एक अहवाल सादर केला होता, त्या अहवालात ते म्हणतात, “मला याची जाणीव आहे की, आपले जग मला मुख्यत: तिसर्‍या जगाच्या संदर्भात म्हणावयाचे आहे. निरनिराळ्या प्रकारच्या आणि परस्परांपासून अगदी भिन्न असणार्‍या संकल्पना, तत्त्वज्ञान, समजुती आणि विचार असणार्‍या लोकांचे बनलेले आहे. तरीही जे विकसित जगाचा भाग आहेत. त्यांच्यासकट आपणा सर्वांना एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे आपल्यावर असलेली मानव जातीची जबाबदारी. परंतु अविकसित राष्ट्रातल्या आपल्यात खालील आणखी काही गोष्टी समान आहेत. उदाहरणार्थ – आपले समान राष्ट्रीय आर्थिक हितसंबंध, दारिद्य्र आणि मागासलेपण यामुळे साचलेले गुदमरून टाकणारे प्रश्न, आपल्यातील बहुसंख्य राष्ट्रे फेडू शकणार नाहीत, असा त्यांच्यावरील कर्जांचा प्रचंड बोजा, आपल्या डोक्यावर बसलेली अमानुष असमानता आणि त्याच्याच बरोबरीने आपल्या राष्ट्रांची निरनिराळ्या प्रकारांनी चाललेली महाभयंकर पिळवणूक आणि अशा परिस्थितीत मूर्खपणाच्या शस्त्रस्पर्धेवर उधळल्या जाणार्‍या प्रचंड रकमा, आपल्यापैकी प्रत्येक राष्ट्राला मिळालेला त्यांच्या शेकडो वर्षांच्या वासाहतिक आणि निमवासाहतिक लुबाडणुकीचा अगदी आजच्या परिस्थितीपर्यंत आलेला ऐतिहासिक वारसा. आजच्या परिस्थितीत ही पिळवणूक इतिहासात पूर्वी कधीही नव्हती इतक्या शुद्ध स्वरुपात, जास्त निर्दयतेने आणि जास्त क्रौर्याने सुरू आहे. या प्रश्नांना तोंड देताना बर्‍याच सरकारांच्यात आपल्या दौर्बल्याची जी तीव्र आणि कडवट जाणीव होते तिच्यात, तसेच या प्रश्नातून जी राजकीय अस्थिरता निर्माण होते, त्याबद्दल अनेक राजकीय नेत्यांना जी काळजी वाटते, तिच्यात आम्ही सुद्धा सहभागी आहोत.”

फिडेल यांचे निधन ज्या काळात झाले आहे, तो काळ डाव्या चळवळीसाठी कठीण असा काळ आहे. उजव्या विचारसरणीकडे सरकत चाललेल्या या जगात चंगळवाद एक प्रमुख मूल्य बनले आहे. बाजारवाद हे समाजाचे तत्त्वज्ञान बनत आहे. आर्थिक विषमता प्रचंड गतीने वाढत आहे. कष्टकरी जनतेच्या हालअपेष्टांना पारावार राहिलेला नाही. अशा परिस्थितीत डाव्या चळवळीला वैचारीक मार्गदर्शनाबरोबरच नेतृत्व देण्याची मोठी गरज होती. फिडेल कॅस्ट्रो यांच्या केवळ अस्तित्वानेच ही पोकळी भरून निघत होती. आज जागतिक पातळीवर त्यांच्या एवढ्या उंचीचा नेता उरला नाही. माओ यांच्या निधनानंतर फिडेल हेच दिपस्तंभासारखे क्रांतिकारी डाव्या विचारसरणीला, चळवळीला नव्या परिस्थितीत मार्गदर्शक म्हणून काम करीत होते. मार्क्सवादी-लेनिनवादी तत्त्वज्ञानाला प्रत्यक्ष व्यवहारात राबवण्याचे काम स्तालीन, माओ, हो ची मिन्ह आणि फिडेल कॅस्ट्रो यांनीच केले आहे. मार्क्स-एंगल्स-लेनीन, स्तालीन, माओ, हो ची मिन्ह यांच्या रांगेत बसण्याचा मान फिडेल कॅस्ट्रो यांनी आपल्या दैदिप्यमान कर्तृत्वाने सिद्ध केला आहे. इतिहास त्यांना कायम स्मरणात ठेवील. मानवी जीवनातील आजवरच्या अजरामर व्यक्तीत त्यांचे स्थान कायम राहील.

सुभाष थोरात, पुणे

संपर्क : 9869392157