Categories
प्रासंगिक

बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा आणि गुजरात सरकार

एप्रिल – २०१६

प्रकाशकाने या प्रतिज्ञांना प्ररिशिष्टात जागा दिली. याला माहीत होते की, या प्रतिज्ञाशिवाय चरित्र अधुरे राहील; त्याला वाटले या कृतीबद्दल आपली वाहवा होईल. पण झाले भलतेच! या प्रतिज्ञा छापल्याने त्याला काय ऐकून घ्यावे लागले कुणास ठाऊक; पण पुस्तके मात्र रद्द करावी लागली.

बाबासाहेबांचे खरे विचार विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ नयेत हीच गुजरात शासनाची इच्छा आहे.

बाबासाहेबांची 125 वी जयंती आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांपर्यंत बाबासाहेबांचे चरित्र पोहोचवण्याचा (?) संकल्प गुजरात शासनाने केला. पूरक वाचनासाठी बाबासाहेबांचे चरित्र छापून घेतले. अत्यंत काळजीपूर्वक तयार केलेले हे चरित्र राज्यभराच्या विद्यार्थ्यांना वाटायचे होते. पुस्तक छापून घेतले, आता वाटपाची वेळ आली, तोपर्यंत एका संघ स्वयंसेवकाच्या लक्षात आले की, यामध्ये जादा माहितीही देण्यात आली आहे, जी मूळच्या लिखाणात नव्हती.

जगभरच्या ज्ञानाचा अभ्यास, देशभर भ्रमंती, जन्मर मिळालेले अनुभव, या सर्वांचा विचार करून बाबासाहेबांनी एक धाडसी पाऊल उचलले. ते म्हणजे धर्मांतरांचे ‘मी हिंदू धर्मात जन्मलो असलो, तरी हिंदूधर्मात मरणार नाही’ अशी घोषणा करून पुढे वीस वर्षांनी बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. धम्माची दीक्षा देताना, त्यांनी अनुयायांना 22 प्रतिज्ञा सांगितल्या. अत्यंत सोप्या भाषेतल्या या प्रतिज्ञाच त्यांचे मूळच्या धर्मातल्या अंधश्रद्धा पासून संरक्षण करतील; जुनाट रूढीपासून सुटका करतील; घाणेरड्या परंपरांमध्ये पुन्हा जाण्यापासून रोखतील या बद्दल बाबासाहेबांना खात्री होती.

‘जुने संस्कार, जुने विचार सुटले नाही तर नव्या परिस्थितीतही फारसा बदल होत नाही. धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर आलेले मंत्री जुने संस्कार न पुसल्याने एका धर्माचे राज्य आणण्याच्या गोष्टी करताहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संविधानाची शपथ घेऊन खुर्चीवर बसलेले प्राचीन भारतात विमान विद्या होती, हत्तीचे डोके माणसाच्या धडावर चिकटवण्याचे प्लॅस्टिक सर्जरीचे ज्ञान होते असे हास्यास्पद दावे करतात. जुने संस्कार त्यांनी जाणीवपूर्वक टिकवून ठेवले आहेत. त्यांच्या ते फायद्याचे आहेत.

पण दलितांची परिस्थिती वेगळी आहे. त्यांना जुने संस्कार हानिकारक आहेत. किंबहुना त्या संस्कारातून बाहेर पडण्यासाठीच बाबासाहेबांनी धर्मांतर केले. त्यामुळे या 22 प्रतिज्ञांचे महत्त्व अधिक आहे. या 22 प्रतिज्ञाच धर्मांतराचा गाभा आहेत.

प्रकाशकाने या प्रतिज्ञांना प्ररिशिष्टात जागा दिली. याला माहीत होते की, या प्रतिज्ञाशिवाय चरित्र अधुरे राहील; त्याला वाटले या कृतीबद्दल आपली वाहवा होईल. पण झाले भलतेच! या प्रतिज्ञा छापल्याने त्याला काय ऐकून घ्यावे लागले कुणास ठाऊक; पण पुस्तके मात्र रद्द करावी लागली.

बाबासाहेबांचे खरे विचार विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ नयेत हीच त्या शासनाची इच्छा आहे. बाबासाहेबांच्या लोकप्रियतेचा फायदा घ्यायचा आणि त्यांच्या नावे आपले घाणेरडे विचार विद्यार्थ्यांमध्ये खपवायचे, हाच त्यांचा उद्देश आहे.

बाबासाहेबांनी धम्म दिक्षा घेताना सांगितलेल्या प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे आहेत.

1) मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही, किंवा त्यांची उपासना करणार नाही.

2) मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही, किंवा त्यांची उपासना करणार नाही.

3) मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही, किंवा त्यांची उपासना

करणार नाही.

4) देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही.

5) बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा व खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो.

6) मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.

7) मी बौद्ध धम्माच्या विरूद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.

8) मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करवून घेणार नाही.

9) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.

10) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.

11) मी तथागत बुद्धाने सांगितल्याप्रमाणे अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.

12) तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.

13) सर्व प्राणीमात्रांवर दया करीन त्यांचे लालन पालन करीन.

14) मी चोरी करणार नाही.

15) मी व्यभिचार करणार नाही.

16) मी खोटे बोलणार नाही.

17) मी दारू पिणार नाही.

18) ज्ञान (प्रज्ञा) शील, करूणा या बौद्ध धम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.

19) मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणार्‍या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्‍या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो.

20) तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.

21) आज माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो.

22) इत:पर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.

निवडणुका जवळ आल्यावर रात्रीत पार्टी बदलणार्‍या राजकारण्यांसारखे धर्मांतर बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हते. गुलामगिरीत ठेवणार्‍या जुनाट अंधश्रद्धा, प्रथा, परंपरा, संस्कार सोडून नवीन घेणे अभिप्रेत होते.’ संस्कार करण्यासाठी देवदेवतांच्या पुराणकथा मुख्य भूमिका बजावत असतात. म्हणून जुन्या देव-देवतांपासून मुक्ती आवश्यक आहे.

ही मुक्ती मिळवल्यावर नवे काय हवे, तेही बाबासाहेबांनी सोप्या शब्दात मांडले आहे. त्या दृष्टीने या 22 प्रतिज्ञांच्याकडे पाहिले पाहिजे.

बाबासाहेबांचे विचार आपल्याला मान्य असोत की नसोत, ते आहे तसे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम शासनाने केले पाहिजे.

ते करत नसतील तर आपण केले पाहिजे. बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा ही अलिकडची घटना आहे. अशाच गोष्टी पूर्वापार झाल्या आहेत. बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने अशा घटना उजेडात आणण्याची 23 वी प्रतिज्ञा आपण घेऊ या!

लेखक संपर्क : 9764147463