Categories
शाखा वार्ता

बेलापूर येथे वार्तापत्र कार्यवाहांचा राज्यस्तरीय प्रेरणा मेळावा उत्साहात संपन्न!

सप्टेंबर - २०१७

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्यावतीने बी.टी.रणदिवे ग्रंथालय बेलापूर, नवी मुंबई येथे रविवारी, दि. 30 जुलै रोजी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या कार्यवाहांचा राज्यस्तरीय प्रेरणा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सुरुवातीस साम टी.व्ही.चे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर ‘अंनिवा’चे संपादक प्रा. प. रा. आर्डे यांनी वार्तापत्राचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सहसंपादक राजीव देशपांडे यांनी मेळाव्याचा उद्देश आणि वार्तापत्राची वाटचाल स्पष्ट केली. त्यानंतर पहिल्या सत्रात प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर पुणे विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रा. अभिषेक भोसले यांनी ‘कार्यकर्त्यांनी प्रभावी वृत्तांकन कसे करावे’ याबाबत मार्गदर्शन केले. सत्राचे आभार प्रदर्शन अनिल चव्हाण यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख मुक्ता दाभोलकर यांनी करून दिली.

दुसर्‍या सत्रामध्ये प्रा. प. रा. आर्डे यांनी वार्तापत्राची ध्येये, उद्दिष्टे स्पष्ट केली. प्रभाकर नानावटी यांनी समग्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या खंडांचा परिचय करून दिला. राहुल थोरात यांनी निर्मिती, वितरण, जाहिरात वर्गणी याबाबतची वार्तापत्राची कार्यपद्धती विषद केली.

तिसर्‍या सत्रामध्ये कार्यवाह व संपादक मंडळ यांचा संवाद मेळावा व शतकवीरांचे अनुभव कथन झाले. या सत्राचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व समारोप मुक्ता दाभोलकर यांनी केला. आभार प्रदर्शन रेखा देशपांडे यांनी केले. मेळाव्यामध्ये वक्त्यांनी आपल्या व्याख्यानातून पुढील मुद्द्यांचा ऊहापोह केला.

सगळी माध्यमे मान टाकत असताना तुम्ही (अं.नि.वा.) कात टाकत आहात. – संजय आवटे

इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. मोदी माध्यमांचे राष्ट्रीयीकरण करत आहेत. माणसांचे आधुनिकीकरण करण्याऐवजी श्रद्धांचे आधुनिकीकरण सुरू आहे. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर अशा महापुरुषांचे अपहरण होत आहे. श्रद्धांचे, विज्ञानाचेही अपहरण करून नवीन मांडणी केली जात आहे. मुख्य प्रवाहातील प्रस्थापित माध्यमांपेक्षा सोशल मीडिया प्रभावी बनत आहे. त्याच्याही अपहरणाचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी आंबेडकर नाकारले आणि विज्ञान नाकारले, तर भूमिका घेता येईल; पण अपहरण होते, तेव्हा व्यूहरचनात्मक काम केले पाहिजे. राष्ट्रवादाचे मिश्रण धर्मांधतेशी केले जात आहे.

पूर्वीची कट्टरता कमी वाटावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अटलबिहारी सौम्य वाटू लागले. मोदी आले, तेव्हा अडवाणी सौम्य, तर योगी आले तेव्हा मोदी सौम्य वाटू लागले. राष्ट्रवाद व धर्म एक होतो, तेव्हा पाकिस्तान निर्माण होते. पंडित नेहरुंनी अलिप्ततावादी चळवळ उभी केली. महाराष्ट्रवाद मानवी मूल्यांशी जोडला. कार्यकर्त्यांनी ध्यानात घ्यावे, आता एखादा बुवा पकडणे एवढेच काम नाही, आता बुवा राज्य चालवत आहेत. योगी मुख्यमंत्री बनले आहेत. राष्ट्रवादाचा अर्थ धर्मांधतेशी जोडूनही बुवाबाजी वाढते आहे. दाभोलकर म्हणत ‘वार्तापत्र’ हे आम्ही तयार केलेले एक माध्यम आहे. अंनिसने सामाजिक, राजकीय भूमिका घेत एक पर्यायी माध्यम-मासिक तयार केले.

सामान्य माणसांचे सामुदायिक शहाणपणच राष्ट्र चालवत असते. बुद्धिमान विद्वान मासिक वाचत नाहीत म्हणूनच ते टिकून आहे. मोदीसारखा एक माणूस सगळा देश हिलाटाईझ करतो; माध्यमांनी अनेस्थेशिया द्यायचा व व्यवस्थेने ऑपरेशन करायचे असे सुरू आहे. भारत देश महात्मा गांधी अधिक पंडित नेहरू अधिक डॉ. आंबेडकर यांनी मिळून बनला आहे. महात्मा गांधी हिंदुत्ववादी वाटत. ते म्हणत, मला धर्माची स्पेस वापरायची आहे. मी वापरली नाही, तर त्यात धर्मांध शिरतील. गांधींनी धर्माची-परंपरेची स्पेस वापरली.

गांधी व नेहरूंच्यामध्ये साम्य काय होते? एक साधे-दुसरे टिपटॉप, एक धार्मिक दुसरे पाश्चात्य विचारांचे; गांधींना ठाऊक होते, परंपरेचा स्पेस मी वापरणार; पण जनतेला आधुनिकतेकडे नेणारे नेहरु आहेत म्हणून त्यांनी आपला वारसा नेहरुंना निवडले. वंचित घटकांना योग्य वेळी अ‍ॅड्रेस करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी केले. या मार्गाने देश एकसंघ राहिला आणि आधुनिक बनू लागला. आज गांधी विरुद्ध नेहरू अशी अंधश्रद्धा वाढवली जात आहे. पुढच्या पिढीला आजच्या मुख्य प्रश्नांचे आकर्षण राहणार नाही, अशी पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत. विखारी पुस्तके येत आहेत; पण त्यांची चर्चा होऊ नये, हे पाहिले जाते. उदा. बात्रांचे पुस्तक. या सरकारने प्रस्थापित माध्यमे गिळंकृत केल्याने आता माध्यमांच्याकडून काही आशा नाही. हिंदूंचा अजेंडा वापरून त्यांना यश मिळालेले नाही. ‘सबका साथ-सबका विकास’ अशा विचारी पायावरच विखारी शक्तींना निवडणूक जिंकावी लागली, ही मोठी आशा आहे. आज जे सर्वसामान्यांसाठी काम करतात, त्यांची भाषा सामान्यांना समजत नाही आणि सामान्यांच्या विरोधात जे आहेत, ते मात्र सामान्यांत लोकप्रिय आहेत, ही इथली शोकांतिका आहे.

यू.पी.मध्ये एकही भाजपचा आमदार मुस्लिम नाही. भाजपचा एकही खासदार मुस्लिम नाही. ही धर्मांधता भयानक आहे. वार्तापत्राने हे वास्तव मांडत राहावे. ते चुकीचा इतिहास मांडत आहेत. आपण विवेकाचा जागर करत सामाजिक, राजकीय भूमिका घ्यावी. साक्षरतेबरोबर प्रिंट मीडियाचे महत्त्वही वाढत आहे. पुरोगाम्यांनी पूरक वाचनमाला तयार करावी. तरुणांना आवडणारे लिहावे. समकालीन भाषेत बोलावे, समकालीन नायक तयार करावेत. यू-ट्यूब चॅनलवरून महत्त्वाचे मुद्दे व्हायरल करावेत. लिखाण, खप, जाहिराती अशा सर्वच बाबतीत वार्तापत्राला मिळणारा प्रतिसाद इतर मोठ्या अंकांनाही मिळत नाही. तरुणांसाठी, बालकुमारांसाठी पुस्तके तयार करावीत. बुवाबाजीचे स्वरूप व्यापक झाले आहे. त्यामुळे आपण सामाजिक, राजकीय भूमिका घेतली पाहिजे.

दाभोलकरांचा खून झाला. कारण त्यांचे काम सामाजिक-राजकीय होते. हे तुम्ही (अं.नि.वा.ने) पुढे नेले नाही, तर दुसरे कोणी नेणार नाही. तुम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोचलेले आहात. तुमच्यावर दडपण येईल, त्रास होईल व त्यानंतर चळवळ झळाळून निघेल. मुद्दा आहे धारणांचा, धोरणांचा व धुरिणांचा. आपली भूमिका सोडू नका.

राजीव देशपांडे : प्रस्थापित माध्यमे चळवळीची सत्य माहिती जनतेपर्यंत पोचवत नाहीत, तेव्हा चळवळीच्या मुखपत्राची गरज निर्माण होते. उल्हास ठाकूर व त्यांच्या सहकार्‍यांनी पनवेलमधून अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या मासिकाची सुरुवात केली. त्यावेळी चार पाने सायकोस्टाईल केली जात. दोन-तीन वर्षांनंतर ते ‘कवडसे’ या नावाने पुण्याहून निघू लागले. 1992 साली त्याचे नामकरण ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ झाले. पुढे डॉ. प्रदीप पाटील यांनी ते सांगलीहून प्रसिद्ध करणे सुरू केले. आता त्याचे संपादन प्रा. प. रा. आर्डे करतात. त्यांना मुक्ता दाभोलकर, राजीव देशपांडे, अनिल चव्हाण व प्रभाकर नानावटी मदत करतात.

मुक्ता दाभोलकर : वार्तापत्रातून देवधर्म संकल्पना समजावून देणे, समतेच्या लढ्याशी जोडणे, जगभरच्या वैज्ञानिकांची- शोधांची चळवळींची माहिती देणे, रुढी-परंपरांची विधायक चिकित्सा, स्युडोसायन्सचा भांडाफोड, शोषणमुक्तीच्या आंदोलनाचे तपशील इत्यादी विषय मांडले जातात.

प्रभाकर नानावटी : दाभोलकर म्हणत, उद्या जर चळवळ बंद होण्याची वेळ आली, तर सर्वांत शेवटी वार्तापत्र बंद होईल आणि ती वेळ यायची नसेल, तर अंनिसच्या वार्तापत्र विभागाच्या कार्यवाहांनी कामात सहभाग घेतला पाहिजे.

अनिल चव्हाण : वार्तापत्राच्या कार्यवाहांनी आपल्या शाखेतील वर्गणीदार, जाहिरातदार व लेखकांची नोंद ठेवावी, त्यांच्याशी सतत संपर्कात राहावे. वर्गणीदार वाढवावेत. सहकार्‍यांच्या मदतीने जाहिराती मिळवाव्यात आणि व्यवस्थापकांना रिपोर्टिंग करावे. परिसरातील घटनांचे वार्तांकन करावे.

प्रा. अभिषेक भोसले : लेखकाला वाचकांनी पोच द्यावी, प्रतिक्रिया सांगावी, तेव्हा मासिके टिकतात. संवेदन लिखाण करणारे समांतर माध्यमांमध्ये प्रयोग करत आहेत. माहिती देण्याचे काम मुख्य माध्यम करते, शिक्षण देण्याचे काम समांतर माध्यमे करतात. अभिजन, आपले कार्यकर्ते, सामान्य लोक, शासकीय अधिकारी, आपले लिखाण वाचून माहिती घेत असतात. बातमी देताना वाचकाला काय मिळणार याचा विचार करावा. जगातील चळवळींना जोडून घ्यावे. बातमीमध्ये तारखा, घटना, व्यक्ती सत्य असाव्यात. विचारांची स्पष्टता असावी, समतोल लिहावे, दोन्ही बाजू मांडाव्यात. भाषा सोपी असावी, फोटो द्यावेत, आपले मतही मांडावे. फेसबुक-व्हॉट्स अ‍ॅप यावर थोडक्यात मुद्देसूद लिहावे, ब्लॉग तयार करावा.

प्रा. . रा. आर्डे : अनेक उद्दिष्टांचे मिळून ध्येय बनते. राष्ट्र व जगासंबंधी मानवतावादी प्रेरणा निर्माण करणे, हे आपले ध्येय आहे. सत्यशोधन हे आपले ध्येय आहे. प्रथम आपण स्वत: बदलायचे, मग कुटुंबात बदल घडवायचा, त्यानंतर समाज बदलायचा आहे.

आपण धर्मचिकित्सावरून समाजाला नीतिमान करण्याचा प्रयत्न करतो. सत्यशोधन व नीतिशोधन ही ध्येये साध्य करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, चिंतन करणे, व्याख्यान देणे, हे मार्ग वापरतो. त्याच्या प्रचारासाठी मासिक प्रसिद्ध करतो. आपले संख्यात्मक व गुणात्मक बळ वाढवण्यासाठी हा वार्तापत्र कार्यवाहांचा मेळावा आहे.

‘हम होंगे कामयाब!’ हा विश्वास घेऊन कार्यकर्ते परतले.

अनिल चव्हाण संपर्क : 9764147483