धर्मग्रंथ हे वैज्ञानिक ग्रंथ नाहीत. त्यात बराचसा कल्पनाविलास आणि मानवकेंद्रीत विचार असतो. वेदाची किंवा बायबलची तुलना न्यूटनच्या ‘प्रिन्सिपिया’ या वैज्ञानिक ग्रंथाशी करता येणार नाही. वास्तव जगाचे आकलन करण्यात धर्म विज्ञानाची बरोबरी करू शकत नाही. विज्ञानाचे हे सामर्थ्य लक्षात आल्याने धार्मिक मंडळी आधुनिक विज्ञानाचे शोध आम्ही आधीच लावले आहेत, अशी चलाख भूमिका घेतात. त्यातून निर्माण होते धार्मिक छद्मविज्ञान. आधुनिक विज्ञानाला ख्रिस्ती धर्माने पूर्वीही मोठा विरोध केला होता. अशा विरोधाला आता भारतात हिंदुत्ववाद्यांनी छद्मविज्ञानाचं स्वरूप दिलं आहे. यातूनच धार्मिक राजकारणी आणि त्यांचे समर्थक धार्मिक ग्रंथांतील कल्पनारम्यतेला विज्ञान म्हणून पुढं आणत आहेत.
विज्ञानाच्या इतिहासात धर्माने विज्ञानाला केलेला विरोध सर्वश्रुत आहे. जिथं विज्ञानाचा उदय झाला, त्या युरोप खंडात विज्ञानाला धर्माने दडपण्याच्या अनेक घटना घडल्या. पण ‘सत्य न मरते दळभारे’ या न्यायाने तेथे धर्म हरला आणि विज्ञान बहरले. जे युरोपात सोळाव्या ते अठराव्या शतकात घडलं त्याची पुनरावृत्ती सध्या भारतात घडताना दिसत आहे. ख्रिश्चन धर्माची जागा आता भगव्या हिंदुत्वाने घेतली आहे. हे हिंदुत्व त्याचं स्वत:चं असं खरं विज्ञान प्रसारित करून आधुनिक विज्ञानाला आव्हान देत आहे. हिंदू छद्मविज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा संघर्ष विज्ञानाला मारक ठरू शकतो, भारताला अनेक शतके मागं नेऊ शकतो. प्रगतीला रोखू शकतो, हे अधिक तपशिलात नीट समजावून घ्यायला हवं.
एका तत्त्वज्ञाचे मानवी ऐतिहासिक संघर्षाबाबतचे उद्गार प्रसिद्ध आहेत. तो म्हणतो, माणूस केवळ तलवारी, भाले, बंदुका अशा शस्त्रांनी लढत आलेला नाही, यापेक्षाही खतरनाक लढाया म्हणजे विचारांच्या लढाया. दोन विचारसरणीतील अटीतटीचा संघर्ष मानवी समाजात घडलाय. विज्ञान आणि धर्म यांच्यातील संघर्ष हा अशा संघर्षातील एक होय. युरोपात सोळाव्या शतकात उदय पावत असताना विज्ञानाला दडपण्याच्या ज्या घटना घडल्या. त्या पुढील दोन शतकांतही चालू होत्या. यातील तीन प्रमुख संघर्षाची दखल घेऊन मग भारतीय उपखंडातील विज्ञानाच्या प्रगतीला विरोध करणार्या भगव्या छद्मविज्ञानाचा समाचार घेऊया. हा इतिहास तपासण्याचं कारण म्हणजे धर्मसत्तेची ज्ञानाला विरोध करण्याची मूळ अंगभूत प्रवृत्ती.
ज्ञानवृक्षाचे फळ मानवानं स्वर्गात असताना खाल्लं म्हणून त्याचं अध:पतन झालं, असं प्रथमपासूनच धर्म घोषित करत आला आहे. विज्ञानाच्या उदयकालात गॅलिलिओला धर्मपीठाने दिलेली शिक्षा विज्ञानाची प्रगती थोपवू शकली नाही. पुढं न्यूटनने वैज्ञानिक विचारसरणीला भक्कम पाया दिला. विज्ञान पुढं जाऊ लागलं. पण पुढंही अनेकदा विज्ञानावर धर्मवाद्यांनी जोरदार आघात केले. त्यातील तीन ऐतिहासिक घटना महत्त्वाच्या आहेत.
अठराव्या शतकाच्या मध्यास जीवनातील एका व्यावहारिक प्रश्नाची सोडवणूक विज्ञानाने केली. त्यावेळी धर्माला पहिला दणका बसला. ते वर्ष होते 1752. धार्मिक ग्रंथांतून वीज अंगावर पडण्याचा संबंध परमेश्वरी प्रकोपाशी जोडला आहे. ग्रीकांच्या मते झॉइस नावाचा देवाचा राजा वीज फेकून मारतो. नॉर्वेमधील ग्रीकांना वीज हा देवाच्या हातातील हातोडा वाटतो. बायबलमध्येही देव विजेचे अस्त्र सोडत असल्याचे वर्णन आहे.
वीज हे पापी लोकांना शिक्षा करण्याचं हत्यार आहे. हे जर खरं समजलं, तर काही प्रश्न उपस्थित होंतात. 18 व्या शतकात एका 33 वर्षांच्या कालखंडात एकट्या जर्मनीत चारशेहून अधिक चर्चवरच वीज पडली. या विजेपासून देवाने रक्षण करावे म्हणून चर्चमध्ये घंटा वाजविणार्या भक्तावरच वीज कोसळे. अशा 120 जणांचा त्या 33 वर्षांत मृत्यू झाल्याची नोंद आहे. परमेश्वराला शांत करण्यासाठी प्रार्थना करणार्या भक्तांच्या अंगावर वीज पडलीच कशी? याला उत्तर मिळाले बेंजामिन फ्रँकलिनच्या प्रयोगाने.
फ्रँकलिनने पतंगाच्या प्रयोगातून हे सिद्ध केले की, लेडन बरणीत प्रयोगशाळेत जी वीज तयार केली जाते, तशीच वीज आकाशात ढगांच्या घर्षणातून निर्माण होते. या दोन्हीत फरक नाही. या निरीक्षणावरच 1753 साली फ्रँकलिनने विद्युत निवारकाची कल्पना मांडली. जेथे-जेथे असे निवारक लावले गेले तेथे वीज पडण्याचे प्रकार खूप कमी होऊ लागले. मानवी इतिहासात निसर्गाचा शाप उलटविला गेला; पण….
वीज पडणे ही परमेश्वरी योजना असल्यामुळे असे विद्युत निवारक घरावर लावणे म्हणजे पाखंडीपणा होय, असे धर्माचे मत. धर्मगुरूंनी निवारक लावण्याला विरोध केला. पण विद्युत निवारक वापरणे जर धर्माविरुद्ध असेल, तर थंडी-वादळात रेनकोट आणि पावसात छत्र्या का वापरायच्या? याला धार्मिकांजवळ उत्तर नव्हते. पण पुढे धार्मिकांना एक नामी संधी मिळाली. लिस्बन शहरात 1755 साली भूकंप झाला. तेथे विद्युत निवारक लावलेले होते. धर्मगुरूंनी जल्लोष केला. निवारक लावल्यामुळे देवाने भूकंप घडविला, असा प्रचार सुरू झाला. पण 1767 साली आणखी एक घटना घडली. सॅन नाझारो नावाच्या चर्चवर वीज पडली. या पवित्र ठिकाणाबद्दल लोकांना प्रचंड विश्वास. याला काहीही होणार नाही, अशी लोकांची खात्री. हे चर्च बेचिराख झाले. त्यात ठेवलेल्या बंदुकीच्या दारूने पेट घेतला. 20 टक्के गाव बेचिराख झाले. 3000 लोक ठार झाले. या घटनेनंतर लोकांनी योग्य तो बोध घेतला. निसर्गाला समजून घेण्यातच खरा शहाणपणा आहे, हे धर्मग्रस्त समाजाला पटू लागलं आणि विज्ञानाचा विरोध युरोपात मावळू लागला. धर्मातील अंधश्रद्धेची पीछेहाट झाली.
धार्मिक अंधविश्वासाला दुसरा दणका दिला भूलतंत्राने. 1840 साली रोग्याला भूल देण्याचे तंत्र शोधले गेले. 1847 मध्ये जेम्स यंग सिंप्सन नावाच्या एका स्कॉटीश डॉक्टराने प्रसूतिगृहामध्ये भूलतंत्र वापरण्यास सुरुवात केली आणि धर्मरक्षकांमध्ये एकच क्रोध कल्लोळ उसळला. चर्चमध्ये प्रार्थनासभांतून लोकांना धर्मगुरू सांगू लागले. ईव्हने ज्ञानवृक्षाचे फळ खाल्ल्यामुळे देवाने तिला शाप दिला, ‘तुझ्या प्रसव वेदना मी सहस्त्रपटीने वाढवीन. अत्यंत क्लेश होऊनच तू मुलाला जन्म देत राहशील.’
या अंधविश्वासाला डॉक्टर सिंप्सनने अंधविश्वासानेच उत्तर दिलं. त्याचा युक्तिवाद असा – ‘बायबलमध्ये लिहिलंय देवाने अॅडमला गाढ झोपेत नेले, त्याची एक बरगडी मोडून त्यापासून ईव्हला जन्माला घातली.’ सिंप्सनच्या मते इथे देवाने अॅडमला गाढ झोपेत नेले म्हणजेच भूलतंत्र वापरले. तेव्हा हेच भूलतंत्र आपण स्त्रियांच्या वेदना कमी करायला वापरायला काय हरकत आहे? पण हे उत्तर म्हणजे अंधश्रद्धेचा नि:पात करण्यासाठी दुसरी अंधश्रद्धा वापरणे होते. याऐवजी खरं उत्तर दिलं त्या काळच्या स्त्रियांनी. त्यांनी प्रसूतीवेळी भूल देण्याचा आग्रह धरून आंदोलने सुरू केली. स्वत: व्हिक्टोरिया राणीनेच तिच्या पुढील बाळंतपणात भूलतंत्राचा स्वीकार केला आणि येथे विज्ञान जिंकले, धर्म हरला.
विज्ञान आणि धर्म यांच्यातील संघर्षाची तिसरी घटना म्हणजे डार्विनचा उत्क्रांतीवाद. तुम्ही देवाची प्रतिकृती आहात, असं धर्म सांगत असेल, तर तुमचे पूर्वज गोरिलासारखे होते, हे कसं पटेल? कनिष्ठ प्राण्यांत हळूहळू बदल होत अधिक उत्क्रांत प्राणी विकसित झाले व माणूस असाच उत्क्रांत झाला, हे स्वीकारणे आपणाला जड जाणारच. ब्रिटीश पार्लमेंटचा एक सभासद बेंजामिन डिझरेली जो पुढं इंग्लंडचा पंतप्रधान झाला. तो म्हणाला, ‘माणूस माकड आहे की देवदूत? माझा कौल निश्चितपणे देवदूताच्या बाजूने राहील आणि कुणाला तसं वाटणार नाही?’
जनमत डार्विनविरोधात झुकणार अशी परिस्थिती निर्माण झाली. अशा वेळी थॉमस हक्सले या वनस्पतीशास्त्रज्ञाने डार्विनचे ज्या प्रकारे समर्थन केले, ते ऐतिहासिक धारिष्ट्य उत्क्रांतीवादाला समर्थन देणारे ठरले. ‘ब्रिटीश असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ या संस्थेची ऑक्सफर्ड येथे 1860 मध्ये भरलेली सभा. या सभेत धर्मोपदेशक सॅम्युअल विल्बरफोर्स आणि थॉमस हक्सले यांच्यात खडाजंगी झाली आणि तेथेच उत्क्रांतीवादाच्या बाजूने लोकमत झुकले. विल्बरफोर्स हा उत्क्रांतीवादाच्या विरोधात बोलला. सभागृहात तुडुंब गर्दी झाली होती. विल्बरफोर्सने आपल्या मधुर वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. हक्सलेकडे बघून तो म्हणाला, ‘तुम्हाला डार्विनचं म्हणणं मान्य आहे. तेव्हा एक बाब वडिलांच्या घराण्याकडून की आईच्या?’ टाळ्यांचा कडकडाट झाला. आता हक्सले बोलायला उठले. त्यांनी आधी उपस्थितांना उत्क्रांतीवाद समजावून सांगितला, मग विल्बरफोर्सच्या युक्तिवादाचे बारा वाजविले आणि शेवटी ते म्हणाले, ‘आपल्याला ज्या विषयात गम्य नाही, ज्याची आपल्याला काडीचीही माहिती नाही त्या विषयात नाक खुपसणार्या एखाद्या वाचाळ माणसापेक्षा (इथं त्यांनी विल्बरफोर्सकडे नजर रोखली) एखादा माकड मी माझा पूर्वज म्हणून पसंत करीन.’ या उपहासात्मक वाक्याने सभेचा नूरच पालटला.
या वादविवादानंतरही उत्क्रांतीवादावर इंग्लंडमध्ये व पाश्चात्य जगतात मतमतांतरे चालूच राहिली. अमेरिकेत तर काही राज्यात उत्क्रांतीवर कोर्टात खटले उभे राहिले; पण विज्ञान जगतात उत्क्रांतीवाद आज सर्वमान्य आहे आणि त्यावर कोण आक्षेप घेत नाही. जगातील सर्व विश्वविद्यालयांत आणि शिक्षण संस्थांत डार्विनचा उत्क्रांतीवाद अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.
पण विज्ञान आणि धर्म यांच्यातील सनातन लढा अजूनही संपलेला नाही. ‘हे जग देवानं सहा दिवसांत निर्माण केलं. सर्व प्राणी निर्माण केल्यावर शेवटी माणूस निर्माण केला. माणूस इतर प्राण्यांपासून बनला नाही, तर तो देवाची खास निर्मिती आहे.’ या विचारसरणीला नाव आहे निर्मितीवाद. या निर्मितीवादाचे बायबलमध्ये समर्थन आहे. हा निर्मितीवाद शाळांमधून शिकवावा, यासाठी ख्रिस्ती धर्माचे समर्थक अमेरिकेमध्ये प्रयत्न करताना दिसतात.
या पार्श्वभूमीवर भारतात आधुनिक विज्ञानाला आव्हान देणारे तथाकथित धार्मिक वेदांतील भगवं विज्ञान हिंदुत्ववादी पुढं आणत आहेत. डार्विनच्या उत्क्रांतीवादावर दिल्ली दरबारातील मंत्री राजनाथसिंह यांनी केलेली टीका या त्याचाच एक भाग. वेदामध्ये उत्क्रांतीचा उल्लेख नाही म्हणून तो आम्हाला मान्य नाही, असं ते म्हणाले. याचा अर्थ असा की, वेदात जे नाही ते सर्व अमान्य आणि वेदात जे आहे ते खरं विज्ञान. विज्ञानाबाबतची ही भूमिका युरोपमध्ये विज्ञानविकास होताना धार्मिकांची जी भूमिका होती त्याच्याशी जुळणारी आहे. मात्र युरोपमध्ये अशा धर्माने आधुनिक विज्ञानाबाबत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. पोपने काही काळापूर्वी जाहीर केलं की, गॅलिलिओचा आम्ही छळ केला ही आमची चूक झाली. त्याच्या मताप्रमाणे पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे आम्हास मान्य आहे. तसेच डार्विनचा उत्क्रांतीदावाही आम्हास मान्य आहे. ख्रिस्ती धर्ममार्तंडांना शहाणपण आले. त्यांनी बायबलमधील सूर्यकेंद्री सिद्धांत नाकारला; पण भारतातील हिंदुत्ववादी अजूनही वेदाला कवटाळून बसत आहेत. याचा अर्थ काय? अच्युत गोडबोले ‘किमयागार’ या ग्रंथात म्हणतात – ‘नाही रे उजाडत!’ उजाडत तर नाहीच; पण अधिक अंधाराकडे हिंदूंची वाटचाल सुरू झाली आहे की काय? सध्या भारतात विज्ञानाबाबत ज्या घटना घडत आहेत त्यावरून आपला विज्ञानाबाबतचा विचार अंधारयुगाकडे चालू आहे, असं दिसतंय.
छद्मविज्ञानाची लक्षणे
एखादे विधान किंवा माहिती, विज्ञान की छद्मविज्ञान हे ओळखण्याच्या काही कसोट्या कार्ल सेगनसारख्या प्रख्यात वैज्ञानिकांनी आपणास उपलब्ध करून दिल्यात. छद्मविज्ञानातील पुरावे हे पूर्वजांच्या शहाणपणाला आणि पवित्र मानल्या गेलेल्या धर्मग्रंथांना प्रमाण मानतात. अशा विज्ञानाला पूर्वी जे सांगितलंय त्यात भर घातली जात नाही किंवा त्यात बदल केला जात नाही. आधुनिक विज्ञानाला मात्र असा अधिकारवाद मान्य नाही. पुरावा विरोधात जात असेल किंवा एखाद्या विधानाला पुरेसा सबळ पुरावा नसेल, तर असं विधान विज्ञानात स्वीकारलं जात नाही. जेवढा पुरावा तेवढा विश्वास हे विज्ञानाचं सूत्र आहे. छद्मविज्ञानात मांडलेला सिद्धांत किंवा त्याबाबतचे गृहीत यावरून नवीन तपासण्यायोग्य निष्कर्ष काढले जात नाहीत, जे मूळ सिद्धांताला भक्कमपणा देतात. विज्ञानात मात्र मूळ गृहितांचा पडताळा अनेक नव्या निष्कर्षांद्वारे घेतला जातो. जयंत नारळीकरांनी गुरुत्वाकर्षण सिद्धांताचा दाखला देऊन हे स्पष्ट केले आहे. सफरचंद झाडावरून खाली पडले. याचे कारण गुरुत्वाकर्षण. एवढ्यावरच गुरुत्वाकर्षण सिद्धांत म्हणून मान्य झाला नसता. एवढंच स्वीकारणं आणि ते न्यूटननं सांगितलं म्हणून मान्य करणं, हे विज्ञान होणार नाही. पण पुढं न्यूटननं गतीचे तीन नियम व गुरुत्वाकर्षणाचा नियम गणिती भाषेत मांडला. या नियमांच्या आधारे तर्कशुद्ध मांडणी करून केप्लरने ग्रहगोलांच्या गतीबाबत जी निरीक्षणे नोंद दिली होती, ती न्यूटनने सिद्ध केली. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या आधारे नेपच्युन ग्रहाबाबत केलेले भाकीत खरं ठरलं. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाधारे हॅले या शास्त्रज्ञाने एक धुमकेतू पुन्हा कधी दिसेल याबाबत काढलेला निष्कर्ष खरा ठरला. गतीचे नियम आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण यांचा वापर करून अवकाशात फेकलेले उपग्रह पृथ्वीभोवती भ्रमण करीत आहेत. याला म्हणतात विज्ञान. गुरुत्वाकर्षणाबाबत वेदांतील विज्ञानवादी काय म्हणतात? मध्यंतरी असं एक त्यांचं विधान प्रसारमाध्यमांत प्रसारित झालं. न्यूटनच्याही अगोदर ब्रह्मगुप्ताने भारतात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत केव्हाच सांगून टाकलाय. अरे पण त्याचं पुढं काय झालं? त्याचे पडताळे, त्याचे व्यावहारिक उपयोग, त्याद्वारे मिळालेले चंद्र आणि ग्रहगोलाच्या गतीचे स्पष्टीकरण याबाबत ब्रह्मगुप्त किंवा त्याचे भारतीय वारस यांनी काही लिहून ठेवलंय? न्यूटनच्या ‘प्रिन्सीपिया’ या ग्रंथासारखा एखादा ग्रंथ आपणास उपलब्ध आहे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. म्हणून ब्रह्मगुप्ताचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत हे विज्ञान म्हणता येणार नाही.
वेद, पुराणे आणि तत्सम विविध धर्मग्रंथांतील विज्ञानाचे दाखले अधूनमधून प्रसारमाध्यमांतून वाचायला मिळतात. त्याचे काही नमुने पाहू या.
1) आमच्या पूर्वजांना मिसाइल तंत्रज्ञान अवगत होते. रामायणातील युद्धात वापरलेली ब्रह्मास्त्रे म्हणजे अग्निबाणच होत.
2) क्लोनिंगचे तंत्र पूर्वजांना माहीत होते. 100 कौरवांची निर्मिती क्लोनिंगमधूनच झाली.
3) टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे महाभारतातील कुंतीचा पुत्र कर्ण होय.
4) यज्ञात् भवती पर्जन्य: – यज्ञ घातल्याने पाऊस पडतो. केवळ पाऊस पाडण्यासाठी नव्हे, तर कोणत्याही संकटासाठी यज्ञ घालावा. नुकताच दिल्लीमध्ये राष्ट्ररक्षणासाठी मोठा यज्ञ घालण्यात आला.
5) दूरदर्शन तंत्र महाभारतकालात वापरले जात होते. संजय धृतराष्ट्राला कौरव-पांडव युद्धाचे वर्णन याच तंत्राद्वारे सांगत होता.
तात्पर्य काय, तर जगात हल्ली विज्ञानाने जे-जे संशोधन आणि तंत्रज्ञान निर्माण केलंय ते सर्व आमच्या पूर्वजांना माहीत होते. त्याचा पुरावा म्हणजे आमचे धर्मग्रंथ.
वरील उदाहरणांतील फक्त एका उदाहरणाची सखोल चिकित्सा करू या.

दूरदर्शन तंत्र महाभारतकालात संजय वापरीत होता, असे तंत्र वैज्ञानिक असेल, तर ते सार्वत्रिक असायला हवं. तसं ते सर्वत्र वापरलं जात होतं, याचे पुरावे असायला हवेत. असे पुरावे मिळत नाहीत. दूरदर्शनची निर्मिती करणार्या विज्ञानाबद्दल एखादा ग्रंथ पुराणकाळात उपलब्ध नाही. महाभारत ग्रंथ उपलब्ध आहे, तर असा ग्रंथ का उपलब्ध नाही? दूरदर्शनमध्ये विद्युत-चुंबकीय लहरींचा उपयोग केला जातो. या लहरींची माहिती देणारे एखादे पुस्तक त्या काळातील उत्खननात मिळायला हवं. त्याबाबतचा भिंतीवर कोरलेला एखादा लेख संस्कृत भाषेतील मिळायला हवा. दूरदर्शन ज्या तंत्रावर व विज्ञानावर आधारित आहे, त्या तंत्राद्वारे रडार, रेडिओ आणि मायक्रोवेव्ह, ओव्हनसारखी साधने निर्माण झालीत. अशा साधनांचा महाभारत ग्रंथात उल्लेख आढळत नाही. पाश्चात्य ग्रीक आणि रोमन संस्कृती या जुन्या-पुराण्या आहेत. या संस्कृतीतील अॅरिस्टॉटलसारख्या विद्वानांनी लिहिलेले विज्ञानावरचे ग्रंथ उपलब्ध होतात. अॅरिस्टॉटलने विश्वाची रचना आणि भौतिक सृष्टीविषयक केलेले लिखाण उपलब्ध होते; मग असं लिखाण तपशिलात आपल्याकडे का मिळू नये?
राजनाथ सिंह म्हणतात, ‘जे वेदात म्हणजे आमच्या विविध ग्रंथात नाही ते आम्हाला मान्य नाही.’ डार्विनचा उत्क्रांतीवाद वेदात आढळत नाही. म्हणून तो नाकारला जावा, असं त्यांचं विधान आहे. मग आइनस्टाइनचा सापेक्षतावाद, मॅक्स फ्लॅकचा पुंजवाद, मायकेल फॅरेडेचे विद्युतशास्त्रातील नियम, नील्स बोहरचा अणुरचनेचा सिद्धांत, बिग बँग थेअरी, अशा आधुनिक विज्ञानातील सिद्धांताचा वेदात उल्लेख आहे की नाही, हे एकदा राजनाथसिंहांनी तपासावे आणि हे सिद्धांत वेदात नसल्यास ते भारतीय विद्यापीठातील शिक्षणक्रमातून गाळून टाकावेत.
कोणीही येरागबाळा उठतो आणि जेव्हा आमच्या पूर्वजांना सर्व काही माहीत होतं, असं बोलतो तेव्हा त्याकडे दुर्लक्षच करायला हवं. विशेषत: राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मंडळींनी विज्ञान संशोधनावर न बोललेलंच बरं. नाहीतर त्याचं हसू होतं; पण पंतप्रधानपदावरच्या व्यक्तीनं विज्ञानावर चुकीचं भाष्य करावं, हा प्रकार अधिक गंभीर आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे राजकीय आणि धार्मिक विचारपीठांवरून या मंडळींनी विज्ञानावर केलेल्या भाष्याची विज्ञानजगतानं गंभीर दखल घेतली, तरी चालेल. फालतू छद्मविज्ञान खोडून काढण्यात सच्च्या वैज्ञानिकांना रस नसतो, हे जरी खरं असलं, तरी विज्ञान व्यवहारावर छद्मविज्ञानाचा विपरीत परिणाम होणार असेल, तर वैज्ञानिक क्षेत्राने त्याकडे तटस्थेने पाहणे हितावह नाही. याचं कारण म्हणजे अलिकडे ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये वाचला गेलेला विमान विद्येवरचा छद्मवैज्ञानिक प्रबंध.
2015 मध्ये मुंबईत भरलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमधील घटना. एक आय.ए.एस. ऑफिसर आपला प्रबंध या अधिवेशनात वाचणार होता. वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी त्याने दोन मिनिटे शंख वाजवून मग प्रबंध वाचनाला सुरुवात केली. शंख वाजविण्याचे कारण त्यानं सांगितलं. तो म्हणाला की, शंखाच्या आवाजाने विविध प्रकारच्या मानवी व्याधींवर मात करता येते. शंख वाजवा आणि भारत व्याधीमुक्त करा! कसं वाटलं हे विज्ञान तुम्हाला?
याच अधिवेशनात एका निमंत्रित व्याख्यात्याने भगवान शिव हा जगातील सर्वश्रेष्ठ पर्यावरणवादी होता, असे विधान केले.
कॅप्टन आनंद बोडस या निवृत्त पायलटनी प्राचीन विमानविद्या तंत्रज्ञान या विषयावर या अधिवेशनात त्यांचा प्रबंध सादर केला आणि वैज्ञानिकांत एकच खळबळ माजली. हा प्रबंध प्राचीन संस्कृत संहितेवर आधारित असल्याचा दावा फोल होता. प्राध्यापक एस.एम.देशपांडे यांनी ही संहिता 1904 च्या अगोदर लिहिलेली असण्याची शक्यता नाही, असा निष्कर्ष काढला आणि त्यात वर्णन केलेले विमान उड्डाणाचे विज्ञान उड्डाणासाठी कुचकामी आहे, असा निष्कर्ष काढला.
मुंबई येथेच 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका हॉस्पिटलचे उद्घाटन करताना केलेल्या भाषणात प्लॅस्टिक सर्जरी, क्लोनिंग आणि टेस्ट ट्यूब बेबी तंत्र हे सर्व प्राचीन भारतात वापरात होते. याचा पुरावा म्हणजे गणेशाचे हत्तीचे डोके आणि कुंतीने दिलेला कर्णाला जन्म ही प्लॅस्टिक सर्जरी आणि टेस्टट्यूब बेबीची उदाहरणे होत.
वरील विवेचनातून एकच निष्कर्ष निघतो. तो म्हणजे या लेखाच्या सुरुवातीस स्पष्ट केल्याप्रमाणे युरोपात विज्ञान विकसित होत असताना धर्माने जी विरोधी भूमिका घेतली तशीच भूमिका हिंदुत्ववाद्यांनी आधुनिक विज्ञानाबाबतीत घेतली आहे. फक्त त्यांचा विरोध स्पष्टपणे नसून तो छद्मविज्ञानाच्या स्वरुपात व्यक्त होत आहे. आधुनिक विज्ञानवाद्यांनी टेंबा मिरवू नये. कारण हे सर्व विज्ञान आमच्या धर्मग्रंथात होते, असा हा युक्तिवाद आहे. हिंदुत्व विचारसरणीचा हा खटाटोप कशासाठी चाललाय? याचं कारण आहे हिंदू अस्मिता. संस्कृतीचा अभिमान असावा; पण दुराभिमान नको. सध्या हिंदुत्ववादी विचारसरणीला दुराग्रहाने ग्रासले आहे. या दुराग्रहाचे मूळ आहे भारतीय राजकारणात हिंदू अस्मिता प्रभावशाली करणे. यासाठी विज्ञानाला सुद्धा वेठीस धरण्याची चूक हिंदू राजकीय विचारवंत करीत आहेत. याचा भारताच्या वैज्ञानिक प्रगतीवर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. विज्ञानाच्या जागी छद्मविज्ञानाचे समर्थन म्हणजे असत्याचे समर्थन. असत्याच्या समर्थनातून समाज भ्रमाकडे ओढला जाईल. भ्रमाने पीडित समाज आणि तशा प्रकारची समाजव्यवस्था ही अनर्थकारी ठरू शकेल.