मूळ राजस्थानच्या उदयपूरजवळ डुंगला या खेड्यातील रहिवाशी नंदलाल रावत हे गृहस्थ सुमारे 20 वर्षांपूर्वी उद्योग शोधत कळवण, जि.नाशिक येथे आले. येथेच त्यांनी भाड्याने एक टपरी घेऊन मिठाईचा व्यवसाय सुरू केले. आज स्वत:च्या मालकीच्या गाळ्यात मिठाईचे दुकान कळवणमध्ये प्रसिद्ध आहे.
त्यांची मुलगी अनिता ही आमच्या विद्यालयात इ.10 वीच्या वर्गात शिकत आहे. त्या वर्गावर इंग्रजी विषयाची तासिका घेताना अनिताचे माझ्या शिकविण्याकडे लक्ष नाही. ती सतत उजवा हात डाव्या हाताच्या दंडावर ठेवते, हे माझ्या लक्षात आले. तासिका संपल्यावर मी अनिताची चौकशी केली, तेव्हा तिच्या डाव्या हाताच्या दंडावर एक पंचधातूचे कडे घातलेले आढळले. कुतूहल म्हणून ते कडे कशाबद्दल घातलेले आहे, असे मी अनिताला विचारले. त्यावर तिने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले.
‘कडे काढून टाकले तर काय होईल?’ मी तिला विचारले.
‘मी आजारी पडेन, मी वेडी होईन?’ ती घाबरत म्हणाली.
अनिता लहानपणी वारंवार थंडी-तापाने आजारी पडायची. तिचे डोके दुखायचे, तिच्या मूळगावी डुंगला येथे असताना तेथून जवळच कपासर नावाच्या खेड्यातील मालिक बाबाकडे तिच्या वडिलांनी नेले. बाबांनी तिच्या वडिलांकडून बरेच पैसे घेऊन पंचधातूचे कडे भारून (मंत्र म्हणून) ते अनिताच्या दंडावर घातले. यापुढे अनिताला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे त्या बाबाने सांगितले. त्या गोष्टीला आता सात ते आठ वर्षांचा काळ लोटला.
मी अनिताच्या वडिलांना बोलावून घेतले. ‘हे कडे काढून टाकले तर काय हरकत आहे?’ असे त्यांना विचारले.
वर्गात अनिताचे लक्ष कायम त्या पंचधातूच्या कड्याकडेच लागलेले असायचे, हे कडे काढून टाकले तर कदाचित आपल्या जीवाचे बरेवाईट होईल, असे तिच्या व तिच्या वडिलांच्या मनावर बिंबलेले होते.
‘ते कडे काढून टाका, अनिताच्या प्रकृतीला धोका उद्भवला तर ती जबाबदारी माझ्यावर सोडा’. मी वडिलांना म्हणालो.
तिचे वडील ताबडतोब तयार झाले नाहीत. परंतु शेवटी माझ्या म्हणण्याप्रमाणे अनिताच्या दंडावरील कडे त्यांनी काढून टाकले. त्या गोष्टीला आता सहा महिने झाले.
एके दिवशी अनिताचे वडील नंदलाल रावत पालक या नात्याने मला भेटायला आले. मी त्यांना विचारले, ‘नंदलाल, अनिताचे हातावरील कडे तुम्ही सहा महिन्यांपूर्वी काढून टाकले, तिची प्रकृती बिघडली होती का? दंडावरच्या त्या कड्यामुळे वर्गात ती कायम अवघडल्यासारखी बसायची व ते कडे सांभाळायची. आता ती अभ्यासही मनमोकळेपणाने करीत आहे, तिची प्रकृतीसुद्धा उत्तम आहे. तुमच्या बाबाने मंत्रून दिलेल्या त्या कड्यात काही दैवीशक्ती होती असे आता वाटते का?’
नंदलालला हा प्रश्न विचारताच तो मनापासून हसला.
तो म्हणाला, ‘सर, त्या कड्याला आणि त्या बाबाला आता आम्ही विसरून गेलेलो आहोत. आमच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्या बाबाने आमच्याकडून पैसे उकळले होते. आता मात्र दुसर्या कोणत्याही बाबाच्या नादी लागणार नाही असा मी शब्द देतो, त्या भारलेल्या कड्याचा मनातून कधीच कडेलोट केलेला आहे.’
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात मी यशस्वीपणे पार पाडलेल्या एका छोट्या उपक्रमाची ही छोटी कहाणी….!
–एल. डी. पगार