सांगली येथील एस.टी.स्टँड परिसरातील रणझुंजार मंडळाशेजारी श्रीकांत मदन नाईक ऊर्फ नाथ महाराज हा बुवाबाजी करीत होता. करणी व भूतबाधा उतरविण्यासाठी अघोरी पूजा करीत असताना सांगली पोलिसांनी त्यास रंगेहाथ पकडले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीकांत मदन नाईक ऊर्फ नाथ महाराज हा गेली अनेक वर्षांपासून स्वत:च्या घरामध्ये बुवाबाजी करीत होता. त्याने इचलकरंजीतील एका पत्रकाराची फसवणूक केली होती. त्या पत्रकाराने सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे लेखी तक्रार केली होती. या नाथ महाराजाची बुवाबाजीची व फसवणुकीची खात्री करण्यासाठी ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या आशा धनाले, त्रिशला शहा व शशिकांत सुतार यांना मागील आठवड्यात त्याच्याकडे पाठविले. त्याने आशा धनाले यांना तुमच्या मेलेल्या सवतीचे भूत तुम्हाला व तुमच्या पतीला लागले आहे. ते काढण्यासाठी अघोरी पूजा करावी लागेल. त्यासाठी एक बोकड, पाच उलट्या पंखाच्या कोंबड्या व 15 लिटर दारूचा कॅन लागेल असे सांगितले. ही जर पूजा घातली नाही तर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती मरण पावेल, अशी भीती घातली. हे सर्व साहित्य आणा किंवा या बदल्यात मला 15 हजार रुपये द्या, अशी मागणी केली आणि अघोरी पूजेसाठी बोलविले.
हा नाथ महाराज लोकांची फसवणूक करतो याची खात्री झाल्यानंतर ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रा.प.रा.आर्डे, चंद्रकांत वंजाळे व राहुल थोरात यांनी सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या बुवाच्या फसवणुकीची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी लगेच कारवाई करण्याचे ठरविले. ‘अंनिस’चे कार्यकर्ते चंद्रकांत वंजाळे यांना आशा धनालेंचे पती बनविले व राहुल थोरात यांना त्यांचा पुतण्या बनविला व साध्या वेशातील एक पोलीस बरोबर दिला. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला. साध्या वेशातील पोलीस व ‘अंनिस’चे कार्यकर्ते महाराजांच्या घरी गेले. त्यावेळी महाराजांनी अघोरी पूजा मांडली होती. काळ्या बाहुल्या, कापडी चेटूक, मुंज्या, लिंबू, तांदूळ इत्यादींने पूजा करण्यास सुरुवात केली. पैशाची मागणी केल्यानंतर 200 रूपये महाराजांची स्वीकारले. पूजेमध्ये मांडलेल्या चेटकांना व मुंज्यांना मी आदेश देणार आहे आणि ते तुम्हाला लागलेले भूत पळवून लावणार आहेत, असे सांगितले. पूजा सुरू असतानाच साध्या वेशातील पोलिसांनी फौजदारांना फोन करून पोलीस फौजफाटा बोलवून घेतला व महाराजांना अघोरी पूजा करताना रंगेहाथ पकडले. राहूल थोरात यांनी महाराजाविरोधात पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली.
या नाथ महाराजावर पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून अटकेची कारवाई केली. या कारवाईत ‘अंनिस’चे कार्यकर्ते स्वाती वंजाळे, सुहास पवार आणि सुहास यरोडकर यांनी सहभाग घेतला.
-शशिकांत सुतार