Categories
रक्त-नेत्र-देह-अवयव दान

मरावे परी अवयवरुपी उरावे

“जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?” या कवी भा. रा. तांबे यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज विज्ञानाने अवयव प्रत्यारोपणाच्या माध्यमातून दिले आहे.

26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झालेले राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचे 2014 साली निधन झाले. वैद्यकीय चाचण्यांनंतर डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानासाठी परवानगी दिली. त्यांच्या किडन्या दोन रुग्णांना देण्यात आल्या, त्यांचे यकृत मृत्यूशी संघर्ष करणार्‍या रुग्णाला देण्यात आले आणि दोन्ही डोळे नेत्रपेढीला देण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे इतर रुग्णांना जीवनदान मिळाले.

अवयवदान म्हणजे जिवंतपणी किंवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसर्‍या व्यक्तीला देणे. जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव किंवा मानवी अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे वेगळा करून तो गरजू रुग्णाच्या शरीरात बसवणे, या प्रक्रियेस प्रत्यारोपण असे म्हणतात. ज्यांचे अवयव कायमस्वरुपी निकामी झाले आहेत, अशा रुग्णांसाठी अवयवदान हे फार महत्त्वाचे आहे. भारतात दरवर्षी 5 लाख लोकांना अवयव न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. अवयवदान करणार्‍यांचे प्रमाण नगण्य (प्रती दशलक्ष 0.16) आहे.

सामान्य माणसाला देहदान किंवा नेत्रदान याबाबत थोडीबहुत माहिती आहे; पण याबरोबर हृदय, किडनी, यकृत, हाडे, त्वचासारखे अवयव दान करता येतात याबाबत पाहिजे तेवढी जनजागृती झालेली नाही. बर्‍याच जणांना देहदान आणि अवयवदान यात फरक आहे, याचीही कल्पना नसते.

जिवंतपणी अवयवदान करता येते. यकृताचा व अस्थिमज्जेचा (Bone Morrow) काही भाग, त्वचा, रक्त, मूत्रपिंड हे अवयव काही चाचण्या करून दान करता येतात. आपण मृत्यूनंतर कोणते अवयव दान करू शकतो, हे पाहू. मृत्यूनंतर अवयव दान करण्यापूर्वी मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे तपासले जाते. माणसाला मृत्यू येण्याची दोन कारणे असतात.

1) हृदय बंद पडून : याला सर्वसाधारण मृत्यू म्हणतात. जसे- वृद्धापकाळाने किंवा नैसर्गिक मृत्यू. नैसर्गिक मृत्यूनंतर आपण फक्त नेत्रदान, त्वचादान, हाडे, कार्टिलेज दान करू शकतो.

2) मेंदू बंद पडून : याला मेंदू मृत (Brain Death) असे संबोधले जाते. यामध्ये मेंदूला इजा झाल्याने माणसाचा मृत्यू होतो. अशा मृत्यूमध्ये माणसाचा फक्त मेंदू मृत पावलेला असतो; परंतु इतर सर्व अवयव चालू असतात. उदाहरणार्थ, मेंदू मृत पावलेला असला तरीही हृदय, यकृत, नेत्र, त्वचा, अस्थि, अस्थिमज्जा, रक्तवाहिन्या, मूत्रपिंड, स्वादूपिंड, लहान आतडे, स्वरयंत्र, कार्टिलेज, मज्जातंतू, फुफ्फुस हे सर्व अवयव चालू स्थितीत असतात आणि हे अवयव आपण दान करू शकतो. मेंदू मृत व्यक्ती मृत्युसमयी दवाखान्यामध्ये आय.सी.यू.मध्ये असेल, तरच अवयव दान करता येऊ शकते. कोमामध्ये गेलेली व्यक्ती आणि मेंदूमृत यामध्ये बराचसा फरक आहे. कोमामध्ये गेलेली व्यक्ती जरी कोमामध्ये असली, तरी त्याच्या मेंदूचे कार्य चालू असते आणि त्यामुळे कोमामध्ये गेलेली व्यक्ती शुद्धीवर येण्याची शक्यता असते; परंतु मेंदूमृत झालेली व्यक्ती कधीही परत जिवंत होऊ शकत नाही. अवयव विक्रीचा काळाबाजार रोखण्यासाठी THE TRANSPLANTATION OF HUMAN ORGANS (AMENDMENT) ACT) आणि Transplantation of Human Organs and Tissues Rules, 2014 प्रमाणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. वरील कायद्याप्रमाणे अवयवांची तस्करी अथवा विक्री करणे, हा गुन्हा असून त्यासाठी दहा वर्षे सजा आणि 20 वर्षांपर्यंत दंड होऊ शकतो.

नेत्रदान करताना पारदर्शक नेत्रपटलाचे (बुबुळ) रोपण करता येते. त्यामुळे नेत्रपटल निकामी होऊन अंधत्व आलेल्या रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो. त्वचादान करताना त्वचेचा पातळ पापुद्रा मांड्या व पाठीचा भाग येथून घेतला जातो. गंभीररित्या भाजलेल्या रुग्णांना त्वचादानामुळे जीवनदान मिळू शकते. हाडांच्या पेशी कॅन्सरग्रस्त रुग्णांना प्रत्यारोपित करता येतात. अपघातग्रस्त रुग्णांनाही दान केलेल्या हाडांचा फायदा होऊ शकतो. डायलेसिसवर असलेल्या रुग्णांना किडनीदान वरदान ठरू शकते.

अवयवदान इच्छुक आपल्या विभागातील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी अवयवदान केंद्राशी संपर्क साधू शकतो किंवा खाली दिलेल्या महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरून प्रतिज्ञापत्र (Pledge Form) डाऊनलोड करून प्रिंट घेऊ शकतो, त्यात स्वत:ची माहिती इंग्रजी किंवा मराठीत भरून आपल्या जवळच्या अवयवदान संस्थेकडे किंवा खालील पत्त्यावर पाठवू शकतो.

झोनल ट्रान्सप्लान्ट को ऑर्डिनेशन सेंटर,

एल. टी. एम. जी. इस्पितळ, कॉलेज बिल्डिंग, रूम नं. ए/29, त्वचा बँकेच्या जवळ सायन (पश्चिम), मुंबई. 400022

वेबसाईट : www.ztccmumbai.org

ई-मेल : organtransplant@ztccmumbai.org

फोन नं. 24028197, 9167663468/69

देहदान हे 18 वर्षांवरील कोणीही स्त्री-पुरुष कायद्याने करू शकतात. ज्या व्यक्तीला देहदान करायचे आहे, तिला इच्छापत्र भरून द्यावे लागते व त्यात आपल्या नातेवाईकांची संमती आहे, अशी सही घ्यावी लागते. देहदानाची नोंदणी करण्याच्या अगोदर जरी व्यक्तीचा मृत्यू झाला तरी नातेवाईकांच्या संमतीने देहदान करता येते. मृत्यू होण्याअगोदर जरी एखाद्या व्यक्तीने इच्छा व्यक्ती केली, तरीही योग्य ती कायदेशीर कारवाई करून देहदान करता येते.

ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचे मृत्यूनंतर देहदान केले जाते, त्यावेळेस हे मृत शरीर हे मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांच्या प्रात्यक्षिकासाठी व संशोधनासाठी वापरले जाते, कोणताही विधी करण्यासाठी नातेवाईकांकडे दिले जात नाही, तर ते फक्त संशोधनासाठीच वापरले जाते.

देहदान व अवयवदान संबंधीही सर्वसामान्य लोकांमध्ये बर्‍याच अंधश्रद्धा आहेत. जसे की, मृत्यूनंतर मृत शरीरास अग्नी दिला नाही, तर मोक्ष मिळणार नाही. आत्मा भरकटत राहील. कावळा शिवणार नाही, नेत्रदान केल्यास पुढच्या जन्मी आंधळा जन्मला येतो वगैरे; पण या अंधश्रद्धांना बाजूला सारून हे दान करणे गरजेचे आहे.

23 मार्च हा क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांचा स्मृती दिवस. तो दिवस बलिदान दिवस म्हणून पाळला जातो. ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अवयवदान व देहदान करावे, यासाठी स्वत:ची, कुटुंबीयांची आणि समाजाची मानसिकता तयार करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संपूर्ण राज्यभर “देहदान व अवयवदान अभियान” राबवीत आहे. या अभियानांतर्गत देहदान व अवयवदान अभियान याविषयीच्या तज्ज्ञ मंडळींचे व्याख्यान ठेवणे, मअंनिस कार्यकर्तेआणि इच्छुक दात्यांचे इच्छापत्र भरून घेणे यासारखे कार्यक्रम शाखाशाखांत होत आहेत. या अभियानाला इतर सामाजिक संघटनांचाही पाठिंबा मिळत आहे.

मग, मंडळी वाट कसली पाहताय….? एखाद्याला आयुष्य गिफ्ट करायची संधी सोडू नका… देहदान करा, अवयवदान करा….

लेखक संपर्क : 9823280327