Categories
कव्हर स्टोरी

महात्मा गांधींना अनावृत्त पत्र…

ऑक्टोबर – २०१६

हे भारताच्या राष्ट्रपित्या,

तुला शतश: वंदन…!

मोहनदास करमचंद गांधी… हे नाव आता केवळ भारत देशाचे प्रतिनिधित्व करत नाही, तर ‘जगभराचे वाटाडे’ आता तुम्हाला त्यांच्या जीवनाचे मार्गदर्शक मानू लागलेत. नेल्सन मंडेलांपासून ते आन सांग क्यू या राष्ट्रीय नेत्यांनी तुम्ही दाखविलेला ‘सत्य व अहिंसा’ हा जीवनमार्ग मनोमन स्वीकारलाय. ‘अहिंसात्मक सत्याग्रह’ हे आता जगभराचे परिवर्तनाचे हत्यार ठरू पाहतेय. महात्मा गांधी… हे नाव भारताचा चेहरा आहेच; पण आता तर जगाचा ‘शांतिदूत’ म्हणूनही हा चेहरा मान्यता पावतोय. हे दृश्य बघून आम्हा भारतीयांना अभिमान वाटतो.

तरीही… हे राष्ट्रपित्या, तुझ्याशी थोडा संवाद करून मन हलकं करण्याचा मी प्रयत्न करतोय. 2 ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय,’ अशा घोषणेने सुरू होतो. छोट्या मुलांची प्रभातफेरी ‘एक रुपया चांदीचा, अवघा भारत गांधींचा,’ या घोषणेने सबंध परिसर दणाणून सोडतो. तो दिवस व सप्ताहही ‘ड्राय डे’च्या नावाने ओळखला जातो. याच दिवशी अनेक लहान-थोर आपल्या डोक्यावर ‘गांधी टोपी’ घालतात. चेहर्‍यावर गोड स्मित आणतात. सत्याग्रहाचा देखावा सादर करतात. अहिंसा व सत्य हाच खरा धर्म, अशी मोठाली भाषणबाजी होते. अशाने हा दिवस ‘गांधीस्तुती’त संपून जातो. तरीही माझे मन थोडे शंकावलेय. खरंच, या लोकांनी ‘गांधी’ मनापासून स्वीकारलाय का? हा प्रश्न मला छळतोय. या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमच्याशी थोडा संवाद साधावा म्हणून या पत्राचे नियोजन…

हे राष्ट्रपित्या, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे ‘मुख्य प्रतीक’ म्हणून तुम्हाला आम्ही ओळखतो. स्वातंत्र्यलढा जो केवळ काही उच्च वर्गापुरता मर्यादित होता, त्या लढ्यात सर्वसामान्य भारतीय माणूस व स्त्रिया यांना ओढण्यात तुमचा वाटा व रणनीती महत्त्वाची होती. म्हणूनच गोरगरीब जनतेला ‘हे स्वातंत्र्य म्हणजे आपले स्वातंत्र्य’ वाटले. या अफाट जनसमुदायाने ‘गांधी’ या विचारांच्या नेतृत्वाखाली आपले तन-मन-धन अर्पण केले. ब्रिटीश सत्तेला ‘गांधी’ हा नंबर एकचा शत्रू वाटला, तो याच कारणाने. भारतीय समाजात स्वातंत्र्याची ओढ तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्यात सिंहाचा वाटा ‘गांधी’ या विचाराचा होता, हे निर्विवाद. सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीचा केंद्रबिंदू ठरवून त्याला पचतील, रूचतील, असे कृती कार्यक्रम देऊन या लढ्याची ताकद टिकवून ठेवली. मीठ उचलण्याचा साधा कार्यक्रम असो अथवा उच्च जातींनी भंगीकाम करण्याचे उपक्रम असोत, सविनय कायदेभंग असो वा सत्याग्रही उपोषण, या प्रत्येक क्रती कार्यक्रमात सर्वसामान्य जनता सहभागी होऊ शकली. आपल्या अर्थात देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढू लागली. मुक्तीची स्वप्ने पाहू लागली. त्यामुळेच ब्रिटीश सत्तेचा पाया उखडला गेला. ‘स्वातंत्र्य’ या मूल्याचे महत्त्व भारतीय समाजमानवर ठसविण्यात व तशी कृती करून घेण्यास ‘गांधी’ हा माणूस व या माणसाने दिलेले विचार कृती कार्यक्रम हे फारच महत्त्वाचे ठरलेत.

देशाचे चलन म्हणजे ‘रुपया.’ प्रत्येक नोटेवर असणारी ‘गांधीप्रतिज्ञा’ म्हणजे हा देश गांधींचा आहे, हे दर्शविणारी कृती. अर्थात, आता काही संघटना-जाती-राजकीय पक्ष हे आपापल्या नायकांचे (खरे तर हे सर्व भारतीयच) फोटो नोटेवर छापावेत म्हणून मागणी करतात. यातील प्रत्येक नायकाचे काम देशासाठी अतुल्य आहे, हे मान्यच. तरीही सर्वांना ‘कवेत’ होणार चेहरा हा गांधीशिवाय कोण असू शकेल?

दलित म्हणविल्या गेलेल्या जातींनी ‘गांधी’ हे शत्रू ठरवत तुम्हाला त्या बाजूला करू पाहत आहेत. (सन्माननीय अपवाद) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विश्वपातळीवर मान्य झालंय. दलित समाजाला स्वाभिमान देणारे, हे कार्य नतमस्तक व्हावे, असेच आहे. गांधींनी अस्पृश्यांसाठी काही केले नाही. उलट शत्रुवत काम केले, असे काही जहाल ‘दलित’ गट सतत बोलत असतात. मला मात्र प्रामाणिकपणे असे वाटते की, सवर्ण समाजात अस्पृश्यता निर्मूलनासाठी ज्योत पेटविण्यास भारतीय पातळीवर ‘गांधी विचार’ महत्त्वाचा ठरला. सवर्णांच्या मनात असणारी जातिद्वेषाची तेढ कमी करणेस व तशी कृती करण्यात हाच विचार कारणीभूत ठरला. उच्च म्हणविल्या गेलेल्या जाती संडास साफ करण्याचे, जनावर सोलण्याचे काम करून (संख्येने कमी होत्या, हे मान्य) मनात असणारी जातीची अहंकारी वृत्ती कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू लागले, ते या गांधीविचारामुळे. डॉ. आंबेडकरांच्या अजोड कार्याला बाहेरून पूरक असे हे कार्य करून गांधी या माणसाने आपले ‘अस्सल भारतीयत्व’ जागवले.

भारतीय स्त्री.. सर्वांत शोषित गट. कोणत्याही जाती-वर्णाची असो, तिला सतत खाली दाबण्यात इथली पुरुषसत्ताक व्यवस्था कायम दक्ष असते. उंबरठा ओलांडू नये म्हणून सतत तिच्यावर धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय दबाव आणला गेला. यातील राजकीय दबावाला वाट मोकळी करून ही कोंडी फोडण्याचे काम, हे राष्ट्रपित्या, तुझ्या कार्यामुळे झाले. उंबरठा हेच विश्व होते, ती भारतीय स्त्री स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून देऊ लागली व पुढे हीच स्त्री राजकीय पटलावर स्वातंत्र्यानंतर दिसू लागलीय. यात सिंहाचा वाटा गांधी विचारांचा आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे योगदान फार मोठे आहे. सरदार भगतसिंग हे शहीद-ए-आझम. भगतसिंगांची फाशी गांधी रोखू शकत होते; पण त्यांनी जाणीवपूर्वक ते टाळले, असा आरोप सतत केला जातो. हे राष्ट्रपित्या, हे ऐकल्यावर फार वाईट वाटते रे… वैचारिक मतभेद किंवा स्वातंत्र्यांच्या साह्यामध्ये साधनांबाबत मतभेद असले, तरीही ‘गांधी’ हा माणूस माणुसकी जपणारा होता, हे समस्त आरोप करणार्‍यांना कळायला हवे. तत्कालीन ब्रिटीश सत्तेला भगतसिंगांची फाशी रोखावी म्हणून ‘गांधी’ नावाच्या माणसाने दिलेली तीन निवेदने लोकांना समजायला हवीत हो. सुभाषबाबू व वल्लभभाई यांनी याला दुजोरा दिलाय (राज्यशास्त्राचे अध्यापक प्रा. अशोक चौसाळकर यांनी भगतसिंग यांच्या जीवनावरील पुस्तकात याचा उल्लेख केलाय.)

या भारत देशाची एक सर्वांत मोठी समस्या आहे जात-वर्ग समूहाची. प्रत्येक जात-वर्गसमूह स्वत:चे एक नेतृत्वाचे प्रतीक बाळगतो. आपले नेते प्रत्येक सर्वांत उच्च असा असा प्रत्येकाचा दावा असतो. मग तुलना सुरू होते. गांधी मोठे की आंबेडकर, गांधी की सावरकर, गांधी की शिवाजी महाराज, अशी उदाहरणे समोर असतात. आंबेडकर असोत वा शिवाजी महाराज यांचे कार्य उच्च दर्जाचेच आहे. पण समूहाला तुलना करण्याची वाईट खोड जडलीय आणि या खोडीपायी प्रत्येक जातिवर्गाच्या या खेळात ‘गांधी’ हा खेळाडू ठरलेलाच असतो. हे राष्ट्रपित्या, हे तुझ्यावर आणि देशासाठी अतुल्य कार्य करणार्‍या प्रत्येक महामानवावर अन्यायच आहे.

गांधी… हा आज केवळ देशाचेच नव्हे, तर जगाचा शांतिदूत म्हणून पुढे येतोय, हे खरे. पण तरीही ज्या नराधम नथुरामाने त्यांना अमानुषपणे गोळी घातली, त्या नथुरामाच्या कुविचाराच्या आजच्या वारसदारांना गांधी आजही ‘खुपतोय’. नराधमाची जयंती गुपितपणे साजरी करून समाजात गांधीद्वेष पसरविण्यासाठी ही पिल्लावळ कायम कार्यरत असते. पण जगाचा इतिहास स्पष्ट सांगतो की, आधुनिक, मानवतावादी विचारांचीच कायम सरशी झालीय. नथुराम गुप्तपणे जवळ बाळगला जातो, तर गांधी खुलेआम स्वीकारला जातो. नथुराम हा विद्वेषाने भरलेल्या गोळीचे प्रतीक असतो, तर गांधी हा त्या गोळ्या अंगावर झेलूनही समाजमनामध्ये अखंड जिवंत राहतो. नथुराम हा खुनशी प्रतीक असतो, तर गांधी हा राष्ट्रनिर्मितीसाठी समन्वयाचे प्रतीक असतो. नथुराम भेकड, तर गांधी हा निर्भय असतो. नथुराम हा जीव घेणारा खुनी असतो, तर गांधी हा असंख्यांना जीवनमार्ग दाखविणारा प्रतीक असतो.

हे राष्ट्रपित्या, अजूनही बरेच याविषयावर बोलायचंय; पण आवरते घेतो. गांधी हा विचार आता समाजहृदयामध्ये कायमचा विराजमान झालाय. गांधीविचार मार्ग हा एकाचवेळी सोपा व कठीण असतो. सोपा असा की, तो सहजासहजी पचनी पडणारा नाही. तरीही आजच्या विद्वेषपूर्ण भारलेल्या काळात हा विचार भारतीयांना व जगालाही मार्गदर्शक आहे. सत्य व अहिंसा या मूल्यांना विवेकी सत्याग्रहाची जोड देऊन लोकशाही मार्गाने बदल घडवून आणण्यासाठी परिवर्तनवादी लोकांपुढे ‘गांधीविचार’ ही एक सशक्त ताकद आहे.

हे राष्ट्रपित्या, शेवटी एवढेच सांगतो की, तुम्ही दाखविलेला जीवनमार्ग आम्ही मनापासून आचरणात आणण्याचा प्रयत्न करू. भारत बलशाली बनवून येथील प्रत्येक नागरिकांना ‘निर्भय बनो’ हा संदेश देणारे आपले जीवनकार्य हरतर्‍हेने समजावून सांगू. संत गाडगेबाबा उगाच नाही म्हणत, “अरे मरते हेै हम और तुम, गांधीजी को मरणच नहीं”

खरंच, अगदी खरंच, राष्ट्रपित्या, आकाशात चंद्र-सूर्य असेतोवर भारत म्हणजे गांधी हे समीकरण कायम राहील.”

आपल्या विचारांचा अनुयायी

उमेश मुरलीधर सूर्यवंशी

मोबा.9922784065