Categories
कव्हर स्टोरी

महाराष्ट्रातील युवांचा ‘हिंसेला नकार मानवतेचा स्वीकार…’

ऑक्टोबर – २०१६

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनाचे (1 नोव्हेंबर) औचित्य साधून महाराष्ट्र अंनिस दरवर्षी राज्यस्तरीय युवा संकल्प परिषदांचे आयोजन करते. गेली दोन वर्षेअनुक्रमे औरंगाबाद येथे ‘अंधश्रद्धा निर्मूलनासाठी युवा’ व नागपूर येथे ‘नात्यातील सुरेल संवादासाठी जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयांवर राज्यस्तरीय युवा संकल्प परिषदा घेतल्या.

यावर्षी संघटनेच्या वतीने शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर!’ हे राष्ट्रीय प्रबोधन अभियान राबविले गेले. या अभियानांतर्गत ‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार!’ हा विषय घेऊन राज्यभर एकदिवसीय जिल्हास्तरीय युवा संकल्प परिषदा संपन्न झाल्या.

समाजातील विविध क्षेत्रातील विशेषतः युवा वर्गातील वाढता हिंसाचार लक्षात घेता ‘युवा संकल्प परिषदे’च्या माध्यमातून हिंसेचा प्रतिकार संविधान मूल्य आशयातच करण्याचे मूल्य ‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार! परिषदे’तून राज्यभरातील युवांपुढे मांडले गेले. तसेच हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार! विषयावर विविध मान्यवरांकडून अभ्यासपूर्ण मांडणी केली गेली. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक हिंसाचार, जातीय हिंसाचार आणि धार्मिक हिंसाचार या विषयांवर सहभागी युवक – युवतींची गटचर्चा घडवून आणली. तसेच हिंसेवर आधारित व्हिडीओ दाखवून त्यावर चर्चा घडवून आणण्यात आली. तसेच काही ठिकाणी ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम’ हे रिंगणनाट्य दाखवून त्यावर चर्चाही घेण्यात आली.

रायगड (27, 28 जुलै 2016), वर्धा (30 जुलै 2016), भंडारा, मुंबई (5 ऑगस्ट 2016), नांदेड, सांगली (6 ऑगस्ट 2016), सातारा (8 ऑगस्ट 2016), ठाणे, सोलापूर (9 ऑगस्ट 2016), पुणे (11 ऑगस्ट 2016), बीड, कोल्हापूर, गडचिरोली (13 ऑगस्ट 2016), नाशिक, परभणी(16 ऑगस्ट 2016), लातूर (17 ऑगस्ट 2016), औरंगाबाद (19 ऑगस्ट 2016), नंदुरबार, जळगाव (24 ऑगस्ट 2016) या 19 जिल्ह्यांतून 21 युवा संकल्प परिषदा झाल्या.

रायगड

या युवा संकल्प परिषदांची सुरुवात 27 जुलै 2016 रोजी पनवेल येथून झाली. ए. एस. सी. कॉलेज पनवेलचे प्राचार्य डॉ. आंधळे यांनी पनवेल येथील या युवा संकल्प परिषदेचे उद्घाटन केले, तर महाराष्ट्र अंनिस च्या जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या कार्यवाह आरती नाईक यांनी हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार! आणि हिंसा व लैंगिक शिक्षण या विषयांवर उपस्थित 400 युवकांशी संवाद साधला.

दि. 28 जुलै रोजी द. ग. तटकरे महाविद्यालय, तळा जि. रायगड येथे जिल्हास्तरीय युवा संकल्प परिषद संपन्न झाली. या परिषदेत सहा महाविद्यालयांतील 50 युवक युवती व प्राध्यापक सहभागी झाले होते. यावेळी डॉ. हमीद दाभोलकर व आरती नाईक यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित युवांकडून पंतप्रधानांना पत्रेही लिहून घेण्यात आली.

वर्धा

दि.30 जुलै रोजी अनेकांत स्वाध्याय मंदिर, वर्धा येथे महाराष्ट्र अंनिस, राष्ट्र सेवादल, अनेकांत स्वाध्याय मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संकल्प परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन महावीर पटणी यांनी केले, तर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सुनील सुमंत हे होते. या परिषदेचे अध्यक्ष प्रा. अन्वर सिद्धिकी हे होते. यावेळी ‘हिंसा के खिलाफ, मानवता कि ओर’ असे एक चित्र काढून मान्यवरांच्या हस्ते निषेध पोस्टर म्हणून प्रकाशित केले गेले.

भंडारा

दि. 5 ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखनी, पिंपळगाव येथे तीन कनिष्ठ महाविद्यालयांत युवा संकल्प परिषदा घेण्यात आल्या. यांत एकूण 450 युवक, युवती सहभागी झाले होते. यावेळी प्राचार्या गौतम, विष्णुदास लोणारे, प्रा. नरेश आम्बीलकर, प्राचार्य अविनाश पाठक, प्राचार्य प्रधान व अश्विनी भिवगडे यांनी मार्गदर्शन केले.

मुंबई

दि. 5 ऑगस्ट रोजी एस. एन. महाविद्यालय, भाईंदर व अभिनव महाविद्यालय, भाईंदर येथे युवा संकल्प परिषद झाली. यावेळी मुक्ता दाभोलकर यांनी उपस्थित युवांशी संवाद साधला.

सांगली

दि. 6 ऑगस्ट कर्मवीर भाऊराव महाविद्यालय, इस्लामपूर जि. सांगली येथे 700 युवक, युवतींच्या सहभागाने भव्य जिल्हास्तरीय युवा संकल्प परिषद पार पडली. यावेळी प्रा. एकनाथ पाटील यांनी ‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ या विषयावर डॉ. हमीद दाभोलकर आणि कॉ. मेघा पानसरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज्य सरचिटणीस संजय बनसोडे उपस्थित होते. तसेच हिंसा या विषयावरील विविध व्हिडीओ दाखवून युवांशी सविस्तर चर्चाही करण्यात आली.

नांदेड

दि 6 ऑगस्ट रोजी सायन्स कॉलेज, नांदेड येथे नांदेड जिल्हा युवा संकल्प परिषद झाली. यावेळी उपस्थित 100 युवक, युवतींना धर्मराज हल्लाळे, डॉ. दि. भा. जोशी आणि डॉ. डी. यू. गवई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. लक्ष्मण शिंदे, सम्राट हटकर हे उपस्थित होते.

सातारा

दि. 8 ऑगस्ट रोजी कर्मवीर भाऊराव सभागृह, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, सातारा येथे 400 युवक- युवतींच्या उपस्थितीत सातारा जिल्हा युवा संकल्प परिषद संपन्न झाली. यावेळी उपस्थित युवक, युवतींना डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. शैला दाभोलकर, भगवान रणदिवे, प्रशांत पोतदार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित युवक, युवतींपैकी 80 युवांनी विवेकवाहिनीमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केली.

ठाणे

दि. 9 ऑगस्ट रोजी प्रधान कॉलेज, शहापूर येथे ठाणे जिल्हा युवा संकल्प परिषद संपन्न झाली. यावेळी उपस्थित युवांना महाराष्ट्र अंनिसच्या प्रधान सचिव सुशीला मुंडे आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी मार्गदर्शन केले.

सोलापूर

दि. 9 ऑगस्ट रोजी संगमेश्वर कॉलेज, सोलापूर येथे जिल्हा युवा संकल्प परिषद संपन्न झाली यावेळी उपस्थित युवांना मुक्ता दाभोलकर, कुलगुरू मा. मालदार, प्राचार्य व्ही. डी. पुजारी प्रा. विटेकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी 350 युवक, युवती उपस्थित होत्या.

पुणे ः दि. 11 ऑगस्ट रोजी पुणे जिल्हा युवा संकल्प परिषद संपन्न झाली. यावेळी उपस्थित युवांना महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी मार्दर्शन केले.

बीड ः दि 13 ऑगस्ट रोजी योगेश्वरी महाविद्यालय, नागपूरकर सभागृह, अंबाजोगाई, येथे युवा संकल्प परिषद संपन्न झाली. यावेळी उपस्थित युवांना महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे व डॉ. अजय बुरांडे यांनी मार्गदर्शन केले. सदर परिषदेस 150 युवक उपस्थित होते.

गडचिरोली ः दि 13 ऑगस्ट रोजी फुले, आंबेडकर महाविद्यालय, गडचिरोली येथे जिल्हा युवा संकल्प परिषद संपन्न झाली. यावेळी उपस्थित 155 युवांना महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, गजानन राऊत, विठ्ठलराव कोठारे यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. खंगार हे होते.

कोल्हापूर

दि. 13 ऑगस्ट आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवन, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा युवा संकल्प संकल्प परिषद पार पडली. या परिषदेत 500 युवक, युवतींनी सहभाग घेतला. परिषदेचे उद्घाटन विभागीय समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे यांनी केले, तर ज्येष्ठ लेखक सुनीलकुमार लवटे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. हमीद दाभोलकर यांनी युवांशी संवाद साधला. यावेळी हिंसा या विषयावरील विविध व्हिडीओ दाखवून चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम’ हे रिंगणनाट्य दाखवून त्यावर चर्चाही घेण्यात आली.

नाशिक

दि. 16 ऑगस्ट रोजी समाजकार्य महाविद्यालय, नाशिक येथे ठाणे जिल्हा युवा संकल्प परिषद संपन्न झाली. यावेळी उपस्थित युवांना महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे आणि डॉ शशांक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सदर परिषदेसाठी 100 युवा उपस्थित होते.

परभणी

दि. 16 ऑगस्ट रोजी शारदा विद्यालय, परभणी येथे 100 युवकांच्या सहभागाने परभणी जिल्हा युवा संकल्प परिषद झाली. या परिषदेत डॉ. दि. भा. जोशी, माधव बावगे यांनी मार्गदर्शन केले.

लातूर

दि. 17 ऑगस्ट रोजी राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे डॉ. वर्षा पाटील, प्रा. श्याम आगळे, प्राचार्य सोमनाथ रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा संकल्प परिषद पार पडली. या परिषदेत 50 युवक-युवतींनी सहभाग घेतला.

औरंगाबाद ः दि. 19 ऑगस्ट रोजी विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद येथे 150 युवकांच्या सहभागाने युवा संकल्प परिषद घेण्यात आली. यावेळी सुभाष लोमटे, प्रा. सतीश चौधरी, शहाजी भासले, प्रा. अजित खोजरे, रश्मी बोरेकर यांनी मार्गदर्शन केले.

जळगाव ः दि. 24 ऑगस्ट रोजी टाऊन हॉल, अमळनेर येथे 100 युवकांच्या सहभागाने जळगाव जिल्हा युवा संकल्प परिषद झाली. या परिषदेत गोपाळ नेवे, पोलीस उपनिरीक्षक वाघ, डॉ. अनिल शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

नंदुरबार ः दि. 24 ऑगस्ट रोजी विकास हायस्कूल, शहादा येथे नंदुरबार जिल्हा युवती संकल्प परिषद पार पडली. या परिषदेत 200 युवतींनी सहभाग घेतला. या सर्वांना राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी संबोधित केले. तसेच यावेळी ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर,पानसरे व्हाया तुकाराम’ हे रिंगण नाट्य दाखवून त्यावर चर्चाही घेण्यात आली.

वरील सर्व परिषदांमधून हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार या विषयावर एकूण 4200 युवांशी संवाद साधला गेला. या सर्व युवा संकल्प परिषदांमध्ये उपस्थित युवांनी खालील संकल्पही केला.

हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार! संकल्प

मी असा संकल्प करीत आहे की,

भारतीय संविधानाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कर्तव्य म्हणून वैज्ञानिक दृष्टीकोन मी अंगीकारेन. प्रत्येक बाबीचा चिकित्सक अभ्यास करीन. इतरांचे बोलणे शांतपणे ऐकून घेईन. पूर्ण माहिती घेऊनच स्वतःचे मत तयार करेन. भोंदूबुवा, कालबाह्य परंपरा, शोषण करणार्‍या रूढी आणि धर्मांध शक्ती यांच्यापासून दूर राहीन.

मी भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये अंगी बाणवणे आणि समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करेन. आज मी अंधश्रद्धामुक्त, निर्भय, विवेकी आणि नीतिमान आयुष्य जगण्याचा संकल्प करीत आहे.

तसेच मी आयुष्यात कधीही, कोणत्याही स्वरुपाची हिंसा करणार नाही. हिंसेचे समर्थन करणार नाही. हिंसक कृतीस प्रवृत्त करणार्‍या अफवा पसरवणार नाही. कोणतीही हिंसक कृती किंवा भाषा माणुसकीला छेद देणारी, मानवी समूहांमध्ये भेद निर्माण करणारी आणि देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करणारी बाब असते, हे मला मान्य आहे. त्यामुळे लिंग, वर्ग, जात, धर्म, भाषा व प्रदेश या आधारे होणार्‍या हिंसेचा मी विरोध करेन, किमान सर्व शक्तिनिशी निषेध करेन.

कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक करताना व अन्यायाशी संघर्ष करताना देखील मी अहिंसक आणि संवैधानिक मार्गानेच कृती करेन. कारण प्रश्नांची सोडवणूक करण्याचा तोच एक मानवी आणि शाश्वत मार्ग आहे, यावर माझा विश्वास आहे.

माझे आयुष्य अहिंसेसाठीच समर्पित व कटिबद्ध राहील, असा संकल्प मी घेत आहे.”

-कृष्णात कोरे, सोनालिका नागभिडे