सिल्व्हिया मिलिकॉन. प्रख्यात डच विनोदी अभिनेत्री. 1990 मध्ये हॉलंडमध्ये दूरचित्रवाणीवरील अभिनयामुळे तिला लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. परंतु 1999 मध्ये फॅमिली डॉक्टरने तिच्या स्तनात छोटीशी गाठ असल्याचे निदान केले. कॅन्सरचे निदान करणार्या सर्जनला दाखवून योग्य उपचार घेण्याऐवजी तिने ‘अॅक्युपंक्चर’ उपचार सुरू केले. आपल्याला स्तनाचा कर्करोग झाला आहे, हे तिच्या लक्षात येऊन देखील तिने आधुनिक उपचार न घेता दोन वर्षांमध्ये जवळपास अठ्ठावीस वेगवेगळ्या पर्यायी उपचारांची मदत घेतली. या उपचारामध्ये होमिओपॅथी, पूरक अन्नघटक, क्षार उपचार, मानसिक उपचार अशा विविध उपचारांचा अवलंब होता. आजाराचे निदान करण्यासाठी तिने खात्रीशीर आधुनिक साधनांऐवजी छद्मवैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केला. शेवटी परिणाम व्हायचा तो झालाच. कॅन्सर पसरला आणि अखेरीस 2001 मध्ये तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; पण एव्हाना खूप उशीर झाला होता. चारच दिवसांनी तिचे निधन झाले. मृत्युसमयी तिचे वय 45 वर्षे होते. तिने आधुनिक उपचाराचा अवलंब वेळीच केला असता, तर तिचे असे अकाली निधन टळले असते. तिच्या मृत्यूबाबतचे कारण शोधणार्या विशेष डॉक्टरांनी तिचा मृत्यू; ज्यांना विश्वसनीयता नाही, अशा पर्यायी उपचारांचा अवलंब केल्यामुळे झाला, असा निष्कर्ष काढला.
आधुनिक उपचार पद्धतीचा विकास
युरोपमध्ये गॅलिलिओ-न्यूटन प्रणित वैज्ञानिक क्रांती झाल्यानंतर जीवविज्ञान, रसायन, भौतिकशास्त्र अशा विविध ज्ञानशाखांमध्ये चौफेर संशोधन सुरू झाले. 17 व्या शतकापासून 19 व्या शतकापर्यंत शरीररचना आणि आरोग्यविज्ञानात क्रांतिकारक संशोधन सुरू राहिले. व्हेसॅलिअयसने फाशी दिलेल्या गुन्हेगारांची प्रेते विच्छेदित करून मानवी अस्थिसंस्थेची अमूल्य माहिती मिळविली. विल्यम हार्वेयाने रक्ताभिसरण संस्थेच्या कार्याचे अमूल्य संशोधन करून हृदयविकार संशोधनाचा पाया घातला. जॉन हंटर शस्त्रक्रिया विज्ञानाचा जनक बनला. जोहान्स मिलरच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र प्रगत होऊ लागले. लुई पाश्चरने जंतुविज्ञानाला जन्म दिला, तर जोसेफ लिस्टरने अँटिसेप्टिक क्षेत्र संशोधनाला खुले केले. अशा तर्हेने मानवी शरीराची रचना, शरीरातील विविध रासायनिक द्रव्ये, श्वसनक्रिया, रक्ताचे घटक, शस्त्रक्रियेसाठीची भूलरसायने अशा विविध प्रकारे अमूल्य अशी ज्ञानवृद्धी सुरू राहिली. मन आणि मेंदू यांचाही वैज्ञानिक पद्धतीने शोध सुरू झाला. या ज्ञानवृद्धीतून शरीराच्या आणि मनाच्या कार्याचे अमूल्य ज्ञान प्राप्त होत गेले. तंत्रविज्ञानातून विविध साधने निर्माण झाली, जी विविध मानवी व्यवहारात उपयोगी पडू लागली. या व्यवहारातील एक क्षेत्र म्हणजे आरोग्याचे. ज्ञानाधारित आरोग्य व्यवस्थेत आधुनिक उपचारांचा अंमल सुरू झाला. आज जगभर निर्माण झालेली आधुनिक इस्पितळे, त्यात कार्यरत असणारे शल्यविशारद आणि रोगनिदानतज्ज्ञ डॉक्टर्स, औषध निर्माण केंद्रे आणि शरीराच्या अंतर्भागांना दृष्टिक्षेत्रात आणणारी प्रभावी साधने यांनी मानवी आरोग्याचे रक्षण करण्याचे क्रांतिकारक कार्य सुरू केले आहे.
या आधुनिक उपचार प्रणालीतील परवलीचा शब्द म्हणजे पुराव्यावर आधारित औषध साधने. (Evidence Based Medicine). प्रत्येक गोष्ट चिकित्सक पद्धतीने तपासणे आणि खात्रीशीर ज्ञान विकसित करणे, हे विज्ञानाचे खास वैशिष्ट्य आहे. या कठोर चिकित्सेद्वारे सत्याचा शोध घेऊन तावून-सुलाखून मिळविलेली औषधप्रणाली म्हणजे आधुनिक मेडिसीन व आधुनिक उपचारपद्धती होय. या पद्धतीला प्रस्थापित उपचार किंवा ‘अॅलोपॅथी’ असं म्हणतात. मानवी जीवन अमूल्य आहे. म्हणून त्याच्या आरोग्याची काळजी ही सुद्धा अतिमहत्त्वाची आहे. उपचार यंत्रणा सत्यनिष्ठ आणि विश्वसनीय हवी. पण आरोग्याबाबत मानवी मनाचा अतिसंवेदनशील हळवेपणा हेरून त्याचा फायदा आरोग्यक्षेत्रात वेगवेगळ्या पॅथी निर्माण करणारे घेत आले आहेत आणि आजही त्यांचा समाजमनावर प्रभाव आहे. ज्ञानेश्वर-तुकाराम प्रणित भागवत धर्माची विवेकशीलता याला समांतर अशी आध्यात्मिक बुवाबाजी समाजात प्रभाव गाजविते. एका खर्या अध्यात्माबरोबर शंभर खोटी अध्यात्मं निर्माण होतात. विज्ञानाच्या क्षेत्रात; विशेषत: आरोग्याच्या क्षेत्रात अशी उपचाराची फसवी दुकाने मांडणारे, विविध पॅथीची निर्मिती आणि वापर करीत असतात. आरोग्याच्या क्षेत्रात खरं-खोटं तपासून घेणं आणि ते इतरांना माहीत करून देणं, हे एक अत्यावश्यक कर्तव्य ठरतं. हे केलं तरच सिल्व्हियाप्रमाणे मरणाच्या वाटेने जाणार्यांचे जीव वाचविता येणं शक्य होईल.
स्टीव्ह जॉब्सची चूक
स्टीव्ह जॉब्स. ‘अॅपल’ संगणक प्रणालीचा संस्थापक. प्रचंड बुद्धिमत्तेचा संगणकतज्ज्ञ. 2003 मध्ये त्याला स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान झाले. या आजारावर शस्त्रक्रिया हाच विश्वसनीय उपचार होता. पण स्टीव्हने शस्त्रक्रिया लगेच करून न घेता नऊ महिने अॅक्युपंक्चर, गाजर आणि फळांचा रस, इतर वनौषधी अशा पर्यायी उपचारपद्धतीचा वापर सुरू ठेवला; पण कॅन्सर बरा झाला नाहीच. उलट तो पसरला. नऊ महिन्यांनंतर तो शस्त्रक्रियेला राजी झाला. पण खूपच उशीर झाला होता. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आठ वर्षांनी म्हणजे 2011 मध्ये त्याचं निधन झालं.
अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका प्रसिद्ध कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टर बॅरी कॅसिलेथ याने म्हटलंय, स्टीव्ह जॉब्सचा कॅन्सर हा आधुनिक उपचारांनी बरा झाला असता; पण या वेड्यानं अक्षरश: आत्महत्याच केली. विविध धोकादायक आजारांनी ग्रस्त रुग्ण स्टीव्ह जॉब्सप्रमाणेच पर्यायी उपचारांचा अवलंब मोठ्या प्रमाणात करतात. मग लोक अशा उपचारांना बळी का पडतात?
पर्यायी उपचारांचे मायाजाळ
प्रस्थापित आधुनिक उपचारांऐवजी अॅक्युपंक्चर, चुंबक चिकित्सा, रेकी, होमिओपॅथी इत्यादी उपचार, ज्याला विश्वसनीय पुरावा मिळत नाही किंवा जे वैज्ञानिक कसोट्यांवर टिकत नाहीत, त्यांना पर्यायी उपचार म्हणतात. पर्यायी उपचारांचा वापर लोक का करतात, हे नीट समजून घेऊन त्यांचे प्रबोधन करायला हवे.
अॅलोपॅथीच्या समस्या
अलिकडे जगभर आधुनिक अॅलोपॅथिक उपचारांना पर्याय म्हणून अन्य वैद्यक प्रणालीकडे लोक आकर्षित होताना दिसत आहेत. याचे कारण आधुनिक उपचारातील काही समस्या सुद्धा असू शकतील. आधुनिक औषध सेवेचे स्वरूप आणि डॉक्टरांचे वर्तनही या प्रवृत्तीला अंशत: कारणीभूत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची रुग्णाशी जवळीक निर्माण होत नाही. ते रुग्णाशी कमी बोलतात. तंत्रज्ञानाला महत्त्व देतात आणि त्यांची औषधाची यादी पण लांबलचक असते. ही टीका काही अंशी खरी आहे.
आधुनिक उपचारातील काही औषधांच्या बाबतीत शरीरावर दुष्परिणाम संभवतात, असे आढळून आल्यामुळे लोक पर्यायी उपचारांकडे वळतात. पर्यायी उपचार लोकांना सुरक्षित वाटतात. पण सुरक्षितपणाच्या फायद्याबरोबर मोठा धोकाही संभवतो. तो म्हणजे पर्यायी उपचारांची परिणामशून्यता. परिणामकारक; पण प्रसंगी त्रासदायक उपचारांऐवजी सुरक्षित; पण परिणामशून्य उपचारांचा हा मार्ग आरोग्यासाठी हितावह ठरत नाही. म्हणून कोणता उपचार घ्यावयाचा, यासाठी पर्यायी उपचारांच्या मर्यादा नीट समजून घ्यायला हव्यात.
कोणत्याही औषध प्रणालीच्या परिणामकारकतेविषयी कठोर वैज्ञानिक चाचण्या स्वीकारणेच योग्य. केवळ दिलासा; पण उपयोगशून्यता असे औषध टाळणेच बरे. पर्यायी औषध घेऊन रुग्णांना काही वेळा बरे वाटते, याला औषधाऐवजी एक मानसिक परिणाम कारण ठरतो. तो आहे ‘प्लॅसिबो’ परिणाम. हा परिणाम नीट समजून घेतल्यास निरुपयोगी औषध घेऊन देखील रुग्णाला काही काळ बरे का वाटते, याचे कारण आपल्याला कळेल.
‘प्लॅसिबो’ परिणाम
एलिशा पार्किन्स हा अमेरिकन डॉक्टर. त्याने धातूच्या दोन रॉडचा उपयोग रुग्णाच्या वेदना कमी करण्यासाठी होतो, असे संशोधन प्रसिद्ध केले आणि त्याचे पेटंटही मिळविले. या धातूच्या रॉडच्या जोडीला त्याने ‘ट्रॅक्टर्स’ असं नाव दिलं. हे साधन रुग्णाच्या दुखर्या भागावरून हळुवार फिरविले, तर त्याच्या वेदना कमी होतात, असा अनुभव रुग्णांना येत असे. दुखर्या भागात असणारा वेदनेचा विद्युतभार युक्त पदार्थ ट्रॅक्टर्स ओढून घेतो, असे स्पष्टीकरण पार्किन्स देत असे. (जे खरे नाही)
या ट्रॅक्टर्सच्या परिणामकारकतेचा सर्वत्र बोलबाला झाला. वैद्यकीय क्षेत्रातही या साधनाचे कौतुक झाले. एलिसा पार्किन्स आणि त्याचा मुलगा हे ट्रॅक्टर्सच्या प्रसारासाठी इंग्लंडमध्ये आले. उपचारांबरोबरच ते ट्रॅक्टर्सची विक्री करून भरपूर पैसे कमवू लागले. हे धातूचे रॉड विशिष्ट गुणधर्माच्या मिश्रधातूंचे बनविले आहेत, असा प्रचार करून ते ट्रॅक्टर्स मोठ्या किमतीला विकू लागले.
ट्रॅक्टर्स हे साधन केवळ मनाला बरं वाटायला लावते; शारीरिक आजार तसाच राहतो, हे सत्य जॉन हेगार्थ या ब्रिटीश डॉक्टरांनी उघड केले आणि पार्किन्सच्या दाव्याचे खंडन केले. मनाला बरं वाटणं म्हणजे आजार बरा होणं नव्हे. आजार शारीरिक असेल, तर तो तसाच राहतो. मनाला दिलासा मिळाला तरी, म्हणून हे साधन संधिवात किंवा इतर धोकेदायक शारीरिक आजारांवर मात करण्यास निरुपयोगी आहे, असा दावा हेगार्थने केला. त्यासाठी त्याने पुरावाही दिला.
हेगार्थने धातूचे दोन वेगवेगळे जोड प्रयोगात वापरले. त्यातील एक ट्रॅक्टर्स पार्किन्सच्या विशेष मिश्र धातूचा, तर दुसरा तसाच दिसणारा; पण सामान्य पदार्थापासून बनविलेला होता. रुग्णांच्या दोन गटावर या दोन ट्रॅक्टर्सद्वारे स्वतंत्र उपचार करण्यात आले. दोन्ही गटातील लोक आपणास बरे वाटत असल्याचे अनुभव सांगू लागले. हाडांपासूनचे आणि लाकडी नळीचेही खोटे ट्रॅक्टर्स प्रयोगात वापरले. अनुभव तोच आला. म्हणजे पार्किन्सचा ट्रॅक्टर्स विशेष गुणधर्माचा व रुग्णाच्या शरीरातील विद्युतभाराद्वारे आजार बाहेर काढणारा नाही, हे सिद्ध झाले. केवळ दिलासा आणि आपला आजार बाहेर काढला जात आहे, हे अनुकूल कल्पनाचित्र यामुळे रुग्णांना बरं वाटत होतं, हे सिद्ध झालं. या मानसिक पद्धतीलाच पुढे ‘प्लॅसिबो’ असे संबोधण्यात आले.
‘प्लॅसिबो’ या लॅटिन शब्दाचा I will please असा आहे. खोटा दिलासा; परंतु समाधान देणारा असा याचा अर्थ आहे. Deceptive; but still effective म्हणजे प्लॅसिबो. पुराणात अश्वत्थाम्याची कथा आहे. अश्वत्थामा हा द्रोण ऋषीचा मुलगा. त्याला दररोज दूध देणे द्रोणाला परवडणारे नव्हते. ऋषी म्हणजे निष्कांचन जंगलवासी. मग अश्वत्थाम्याच्या आईने पाण्यात पीठ कालवून अश्वत्थाम्याला दिले. दूधही पांढरे, पिठाचे पाणीही पांढरे. अश्वत्थामा पिठाचे पाणी दूध म्हणून आनंदाने पिऊ लागला. फसव; पण खोटं समाधान म्हणजे ‘प्लॅसिबो.’
पुढं हेगार्थने प्लॅसिबो परिणामाच्या व्यापकतेवर संशोधन केले. त्याला असे आढळून आले की, खर्या म्हणजेच परिणामकारी विश्वसनीय औषधाच्या मदतीला प्लॅसिबो उपयोगी पडतो. अॅस्पिरिनच्या गोळीतील औषधी रसायन रोग बरा करण्यासाठी उपयोगी असतंच; पण अॅस्पिरिनमुळे तुला बरं वाटेल, असा दिलासा रुग्णाला डॉक्टरांनी दिला, तर त्याला बरे वाटण्यास पूरक मदत होते. म्हणजे खोट्या उपचारांबरोबर खर्या उपचारांतही ‘प्लॅसिबो’ मदतीला येतो. याशिवाय डॉक्टरांची प्रसिद्धी, औषधाची भारी किंमत आणि त्याचे नाविण्य म्हणजे सगळेच भारी. या गोष्टीचाही परिणाम ‘प्लॅसिबो’ वाढविण्यासाठी मदतीस येतो.
हेगार्थच्या संशोधनातून ‘प्लॅसिबो’चा अधिक अभ्यास करण्यास चालना मिळाली. 19 व्या शतकात या संशोधनाला वेग आला. बीचर नावाच्या मिलिटरी क्षेत्रात सेवा करणार्या डॉक्टरांनी दुसर्या महायुद्धात जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी प्लॅसिबोचा उपयोग केला. सैनिकांना जखमांच्या वेदना सहन होण्यासाठी ‘मॉर्फिन’चे इंजेक्शन द्यावे लागत असे. ‘मॉर्फिन’चा तुटवडा भासू लागला आणि बीचरने ‘मॉर्फिन’ म्हणून साधे सलाईन जखमी सैनिकांना देण्यास सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे सैनिक आपल्या वेदना कमी झाल्याचे सांगू लागले. बीचरच्या या अनुभवातून पुढे जगभर वैद्यकीय क्षेत्रात प्लॅसिबोवर सखोल संशोधन सुरू राहिले.
विसाव्या शतकात प्लॅसिबो परिणामाचे आश्चर्यजनक निष्कर्ष समोर येऊ लागले. दुखरा दात काढल्यावर त्या जागी येणारी सूज आणि वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर्स अतिश्राव्य लहरींचा (Ultrasonic waves) उपयोग करीत. आवाज ऐकू न येणार्या या लहरींनी केलेला मसाज रुग्णाच्या वेदना कमी करण्यास उपयोगी पडे. याबाबतीत एक प्रयोग केला गेला. निम्म्या पेशंटना अतिश्राव्य लहरींचा मसाज दिला गेला, तर राहिलेल्या दुसर्या गटाला मसाजाचे हे यंत्र चालू ठेवल्याचा दिखावा केला गेला. या यंत्राचा आवाज येत नसल्याने दोन्ही गटांना आपण खरोखरचा उपचार घेत आहोत, असे वाटून आराम पडल्याचे दिसून आले. म्हणजे अतिश्राव्य लहरींच्या यंत्रातील प्रत्यक्ष लहरी नव्हे, तर या यंत्राचा उपयोग केल्याचा बहाणा, हे महागडे उपकरण वापरले जातेय, याची कल्पना आणि या उपचारातील नाविण्य यामुळे रुग्णाला बरं वाटलं. प्लॅसिबोचा हा आश्चर्यकारक परिणाम होय.
अधिक संशोधनांती प्लॅसिबो परिणाम हा केवळ मनावरचा उपयोग नसून तो शारीरिक बदलही घडवून आणण्यास मदत करतो, हे दिसून आले. निद्रानाश, उलट्या, आणि जळजळ आणि डिप्रेशन यासारख्या आजारावर प्लॅसिबोमुळे इलाज होऊ शकतो, हे समजू लागले. म्हणजे मानसिक परिणामातून शारीरिक आजार दुरुस्त करण्यास प्लॅसिबो उपयोगी पडतो, असे संशोधनांती दिसू लागले.
प्लॅसिबोच्या या आश्चर्यजनक परिणामामुळे प्लॅसिबो आरोग्यावर नेमका कसा परिणाम करतो, याचा खोलात अभ्यास सुरू झाला. एका विचारसरणीनुसार त्याचा संबंध अंतर्मनातील प्रतिसादामुळे होतो. रशियन वैज्ञानिक पॅव्हलॉव्ह यांच्या निरीक्षणानुसार कुत्र्याला अन्न दाखविले, तर त्याची भूक जागृत होऊन लाळ येऊ लागते. पण अन्न हातात नसताना अन्न देणारी व्यक्ती विशिष्ट वेळी त्याच्याजवळ आली, तरी त्याची लाळ गळू लागते. याचे कारण अन्नाचा संबंध अन्न देणार्याशी जोडण्याचे कुत्र्याच्या मनाचे ‘कंडिशनिंग’ झाल्यामुळे होय. ‘कंडिशनिंग’चा प्रभाव मोठा असतो. नंतर तर अन्न देणारा दिसत नसला आणि फक्त बेल वाजली, तरी आता अन्न मिळणार, याची जाणीव कुत्र्याला होऊ लागते आणि त्याची लाळ गळू लागते.
लाळ गळणे हा तसा प्लॅसिबो परिणाम नव्हे. पण पुढे रशियन वैज्ञानिकांनी काही प्रयोग केले. त्यांनी गिनी पिगला विशिष्ट खाज सुटणारे रसायनाचे इंजेक्शन टोचले; परिणामी गिनी पिगला त्या ठिकाणी लाली येऊन खाज सुटली. पण इंजेक्शन दिलंय, अशी खोटी-खोटी क्रिया केली म्हणजे फक्त टोचल्याचा देखावा निर्माण केला, तरी गिनी पिगला त्या ठिकाणी लाली येऊन खाज सुटू लागली. इंजेक्शन दिल्याचा आभास निर्माण करून इंजेक्शनचा परिणाम साधला. हा प्लॅसिबो परिणाम होय.
माणसाच्या आरोग्याबाबत या संशोधनातून असा निष्कर्ष काढता येईल की, केवळ डॉक्टर दिसणे किंवा त्यांनी गोळी देणे, याचा पेशंटच्या मनावर सकारात्मक परिणाम होऊन त्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. म्हणून डॉक्टरांनी औषधी गोळींऐवजी फक्त साखरेची गोळी दिली, तरी रुग्णाला बरे वाटू लागते.
प्लॅसिबोबाबत आणखी एक विचार असा की, आपल्या अपेक्षा आपणात बदल होण्यास उपयोगी पडतात. (Expection Theory). एक कल्पना अशी की, एखाद्या विशिष्ट उपचारामुळे आपणास गुण येणार आहे, अशी आशा किंवा अपेक्षा धरली असेल, तर त्याचा उपयोग होऊ शकतो. याबाबतीत आपले बाह्य मत आपल्या मदतीला येते. या विषयावरील संशोधन अजून पूर्णावस्थेला गेलेले नाही. भविष्यात यावर अधिक प्रकाश पडेल.
काही वेळा आपल्या शरीरांतर्गत बिघाड होतात. त्याचा परिणाम म्हणून काही बाह्यलक्षणे दिसू लागतात. आपल्याला वेदना होतात, विशिष्ट ठिकाणी सूज येते, ताप येतो, अंग भरून येते, भूक लागत नाही. ही लक्षणे म्हणजे एक प्रकारची आपल्या शरीराची संरक्षक यंत्रणा जागी होण्याचं लक्षण होय. जखम झालेल्या ठिकाणी सूज येते. कारण तेथे रक्तपुरवठा वाढतो, जो जखम बरी करण्यास मदत करतो. प्लॅसिबो परिणाम हा अशा विशिष्ट अवस्थेत मदतीला येतो. जखम बरी व्हायची, तर तेथे रक्तपुरवठा वाढला पाहिजे, ही अपेक्षा निर्माण होते आणि त्या अपेक्षेतून बाह्य मनाची सूचना जखम बरी होण्यासाठी कार्यरत होते.
प्लॅसिबोचे मानसशास्त्र काहीही असो; पण आरोग्यक्षेत्रात प्लॅसिबोचा प्रभाव वाढविण्याची काही तंत्रे विकसित झाली आहेत. गोळ्यांपेक्षा इंजेक्शन अधिक प्रभावी ठरते, हा प्लॅसिबो परिणामच होय. टी शर्ट ऐवजी पांढरा कोट घातलेल्या डॉक्टरामुळे गुण वाटतो. नर्सऐवजी डॉक्टरांनी दिलेली गोळी परिणामकारक वाटते. लहान गोळ्यांपेक्षा मोठ्या गोळ्या अधिक पसंतीस उतरतात. गोळ्यांचे पॅकेजिंग म्हणजे वेष्टनाचे स्वरूप अधिक भावते. प्लॅसिबोवर संशोधन होण्याअगोदरपासूनच वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी नकळत याचा उपयोग करीत असत; पण प्लॅसिबोच्या उपयोगाबाबत अधिक सावधानता बाळगली पाहिजे, असा आधुनिक संशोधनाचा निष्कर्ष आहे. केवळ प्लॅसिबोमुळं बरं वाटणं म्हणजे आजारातून पूर्ण मुक्त होणं नव्हे, हे नीट समजून घ्यायला हवं. नाहीतर स्टीव्ह जॉब्सप्रमाणे हकनाक प्राण गमवावा लागतो. प्लॅसिबो वापरताना तारतम्य महत्त्वाचे ठरते. प्लॅसिबोच्या मर्यादा नीट समजून घेतल्या, तर पर्यायी उपचारांऐवजी प्रस्थापित अॅलोपॅथीचेच उपचार का स्वीकारावेत, याचा बोध आपणास येईल.
प्लॅसिबोच्या मर्यादा व सामर्थ्य
प्लॅसिबो म्हणजे अश्वत्थाम्याचे दूध. साखर टाकलेले पिठाचे पाणी. हे फसवं दूध मनाचे समाधान करेल; पण एकूण आरोग्याचा विचार करता ही फसवणूक परिणामकारक असली, तरी धोकादायक आहे. गंभीर शारीरिक आजारांवर इलाज करताना पर्यायी उपचारांतून मिळणारा दिलासा पुरेसा नाही. म्हणून प्लॅसिबो देणारे पर्यायी उपचार करून घेताना तारतम्य बाळगणे महत्त्वाचे आहे.
पण याहून महत्त्वाचा मुद्दा असा की, आधुनिक उपचारांतून सुद्धा प्लॅसिबो मिळतोच. होमिओपॅथीच्या साखरेच्या गोळीत फक्त प्लॅसिबो असतो. पण अॅस्पिरिनच्या गोळीत खरेखुरे औषधी द्रव्य असते, जे आजारावर मात करण्यासाठी उपयोगी ठरते. अॅस्पिरिनची गोळी देणार्या डॉक्टरने पेशंटला सांगितले की, या गोळीने तुला आराम पडेल, तर हा दिलासा प्लॅसिबो परिणाम देतोच; पण अधिक औषधाचा परिणाम देतो. तेव्हा साखर घातलेले खरे दूध आपण मुलाला द्यावयाचे की, साखर घातलेले पिठाचे पाणी द्यावयाचे? पर्यायी उपचार का टाळावेत, याचे कारण वरील विवेचनातून स्पष्ट होईल.
पर्यायी उपचारांच्या बाबत दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. तो म्हणजे सत्याचा आणि आरोग्य क्षेत्रातील नैतिकतेचा.
‘कोक्रेन’ समूह नावाची संघटना जगभराच्या वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांचा समूह आहे. या समूहाद्वारे कोणत्याही पॅथीच्या नवीन औषधाबाबत कठोर नैदानिक चाचण्या केल्या जातात. या चाचण्या म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील अस्सल सत्य (Gold Standard) आहेत. कुठल्याही प्रकारचे पूर्वग्रह टाळून वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून घेतल्या जाणार्या या चाचण्यांद्वारे औषधाचे परिणाम विश्वसनीयरित्या सिद्ध होतात. रेकी, अॅक्युपंक्चर, होमिओपॅथी आणि तत्सम पर्यायी उपचारांबाबत ‘कोक्रेन चाचण्या’ उपलब्ध आहेत. त्यांचा निष्कर्ष आहे की, काही अपवाद वगळता, पर्यायी उपचार म्हणजे केवळ प्लॅसिबो परिणाम होत. हे उपचार फक्त प्लॅसिबोवर आधारित आहेत. मग जर पर्यायी उपचार औषधांच्या परिणामकारकतेविषयी निरुपयोगी असतील, तर केवळ या उपचारांनी मनाला उभारी मिळते म्हणून ते उपयोगात आणावेत काय? असत्याचा आधार घेणे नैतिकदृष्ट्या कितपत बरोबर?
आरोग्य क्षेत्रातील प्रश्न बरेच गुंतागुंतीचे आहेत. औषध न घेताही रुग्णाच्या प्रतिकारशक्तीमुळे आजार बरा होऊ शकतो. काळानुसार आजाराची तिव्रता कमी-जास्त होऊ शकते. प्लॅसिबो मदतीला येतो. पण वरील सर्व घटकांना दाद न देणार्या आजारांवर, खात्रीशीर आधुनिक उपचारच घ्यायला हवेत. यासाठी शरीराच्या पूर्वचाचण्या आणि खात्रीशीर म्हणून सिद्ध झालेल्या औषधांचा उपयोग करायला हवा.
वैज्ञानिक क्रांतीनंतर शरीर-मनाचे ज्ञान जसजसे विस्तारत गेले, तसतसे आधुनिक उपचार व्यवहारात रूढ होत गेले. पण विज्ञानपूर्व काळात आरोग्याचे प्रश्न होतेच आणि त्यावरचे उपायही रूढ होते. या उपचार पद्धतीत ज्ञानाऐवजी बर्याचदा श्रद्धेचा आधार घेतलेला असे. धर्म आणि पूर्वापार सांस्कृतिक परंपरा यांचाही पगडा अशा उपचारांवर असे. भारतात आयुर्वेद, तर चीनमध्ये अॅक्युपंक्चर आणि फेंगशुई यांना परंपरेने मान्यता मिळाली आहे. मानवी मनाचा हळवेपणा आणि जगण्याची दुर्दम्य इच्छा हेरून विविध प्रकारच्या उपचार पद्धती जगात सर्वत्र प्रचलित आहेत. त्यातून अशा उपचारकर्त्यांचे हितसंबंध तयार झाले. आर्थिक प्रलोभनातून विविध पॅथीवाले आपापल्या पॅथीचे समर्थन करू लागले. स्वत:चे दोष लपवून आधुनिक उपचारांबद्दल अपप्रचारही होऊ लागला. विविध धार्मिक संप्रदायात जसे हेवेदावे सुरू असतात, तसे आपला उपचार कसा श्रेष्ठ आणि अॅलोपॅथी कशी धोकादायक, असा प्रचार केला जाऊ लागला. संधिवातासारखे काही आजार आधुनिक उपचारांनी पूर्ण बरे होत नाहीत; मात्र ते नियंत्रणात ठेवता येतात. अशा आजाराच्या रुग्णांना पर्यायी उपचारवाले आजार पूर्ण बरा करण्याचे गाजर दाखवितात. अॅलोपॅथीचे डॉक्टर रुग्णांच्या गर्दीमुळे रुग्णाशी भावनात्मक संवाद ठेवत नाहीत, हे हेरून पर्यायी उपचारवाले रुग्णाशी भावनिक संवाद साधतात. त्यांच्या मोहमयी गोड बोलण्याने रुग्णही त्यांच्याकडे आकर्षित होतात. आधुनिक औषधांच्या दुष्परिणामाबाबत पर्यायी पॅथीवाले अपप्रचार करतात. वास्तवात आधुनिक औषधांचे दुष्परिणाम होत असले, तरी ते नियंत्रित करून औषधांचा प्रभाव कायम ठेवून रोग बरा करण्याचे सामर्थ्य आधुनिक उपचारांत असते. पर्यायी उपचारांत दुष्परिणाम होत नसले, तरी गंभीर रोग बरा करणारी परिणामकारकताही नसते.
औषधाच्या परिणामकारकतेचा विचार केला, तर आधुनिक उपचार पर्यायी उपचारांपेक्षा केव्हाही अधिक योग्य. पण व्यक्तीला कोणते उपचार घ्यावयाचे, याचे स्वातंत्र्य असते. त्याला मिळालेल्या माहितीनुसार तो विविध पॅथींचा उपचार घेत राहतो. स्टीव्ह जॉब्ससुद्धा याला अपवाद ठरला नाही; मग सामान्य लोकांची गोष्ट सोडाच. सद्य:स्थितीला जागतिक पातळीवर पर्यायी औषधांची प्रचंड मोठी बाजारपेठ आधुनिक औषधांना आव्हान देत आहे. आरोग्याच्या क्षेत्रात मार्केटिंगची स्पर्धा सुरू आहे. परिणामकारक नसलेली औषधे लोकांच्या माथी मारणे अनैतिक नाही का? लोकांची मागणी आहे म्हणून त्यांचं उत्पादन करणार्यांनी असं उत्पादन करणे चुकीचे नाही का? पर्यायी औषधांनी व्यक्तीच्या शरीरावर अनुकूल परिणाम होत नाही; पण अशा औषधांचा उपयोग करावा, अशी ओढ त्यांच्या मनात निर्माण करणे म्हणजे फसवणूक नाही का?
सत्य काय आणि नैतिक काय या मूल्यांना महत्त्व असेल, तर पर्यायी उपचारांच्या समर्थकांनी आपल्या पॅथीच्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात. जे आजार मनोकायिक आहेत, त्यांच्यासाठीं असा उपचार घेणे एकवेळ क्षम्य होईल; पण हृदयविकार, किडनी आणि यकृताचे गंभीर आजार व कॅन्सरसारख्या धोकादायक आजारांवर पर्यायी उपचार करण्याबाबत संबंधित मंडळींनी विवेक बाळगणे अत्यावश्यक ठरते.(आजार मनोकायिक की शारीरिक, हे आधुनिक उपचारांनीच समजते.)
व्यवहारात आपल्या वस्तूचे मार्केटिंग करताना नैतिक मूल्यांचा विचार होतोच, असं नाही. मराठीत एक म्हण आहे. जो बोलेल त्याच्या एरंड्या विकल्या जातात; पण जे बोलणार नाहीत, त्याचे गहू पण विकले जात नाहीत. पण विकत घेणार्यांना आपण गहू घेतोय की एरंड्या याची चिकित्सा करून योग्य निवडीचे स्वातंत्र्य असते. यासाठी योग्य काय, सत्य काय यासाठी आरोग्य क्षेत्रात व्यापक प्रबोधन हवे; याद्वारे लोकांना आपल्या आरोग्याबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.
निसर्गोपचार या पर्यायी उपचारात, जे-जे नैसर्गिक, त्याची भलावण केली जाते. सात वर्षांच्या र्ही सालिन्सचा हृदयद्रावक मृत्यू निसर्गोपचाराच्या अतिरेकामुळे कसा झाला, हे वाचून तुम्ही अस्वस्थ व्हाल. र्ही सालिन्सचे वडील हे एके काळचे अमेरिकन नैसर्गिक आरोग्य संस्थेचे अध्यक्ष होते. ही संस्था आधुनिक औषधी उपचारांऐवजी उपवास आणि फलाहार यांचे समर्थन करते. र्ही सलिन्स आजारी पडल्यावर तिच्या वडिलांनी तिला 18 दिवस फक्त पाण्यावर ठेवले. पुढचे 17 दिवस तिला फक्त फळांचा रस देण्यात आला. 35 व्या दिवशी तिचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. पर्यायी उपचारांचा असा अतिरेक आपल्या जीवावर बेतत असेल, तर त्याबाबत सत्य जाणणं, हे महत्त्वाचं ठरतं. परंपरा, धार्मिक समर्थन किंवा राष्ट्राची अस्मिता या गोष्टींपेक्षा वैज्ञानिक सत्याला महत्त्व द्यायला हवं.
पर्यायी उपचार कितपत विश्वसनीय आणि परिणामकारक, याबाबत जगभर अमूल्य संशोधन झाले आहे आणि ते सध्याही सुरू आहे. त्याची माहिती इंटरनेट आणि आरोग्यविज्ञानावरील विविध ग्रंथांत उपलब्ध आहे. ही माहिती मिळवून आपल्या आरोग्यासाठी ज्ञानाधारित निर्णय घेणे केव्हाही हितकर ठरेल.
राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकातील मरणासन्न मद्यपि तळीराम याला तपासायला दोन डॉक्टर्स एकाच वेळी येतात. त्यातला एक असतो वैद्य आणि दुसरा असतो डॉक्टर. त्यांचा मजेशीर संवाद या नाटकात आहे.
वैद्य : नाडी हळू चालते.
डॉक्टर : नाही, जलद चालते
वैद्य : अंग गरम आहे.
डॉक्टर : अंग थंड आहे
तळीराम उद्गारतो – मला मारायला एक पुरेसा नाही म्हणून या दोघांना बोलावले आहे का?
या संवादातील अतिशयोक्तीचा भाग सोडला, तर वैद्यकीय व्यवसायातील स्पर्धेचा गडकर्यांनी तीव्र उपहास केलेला दिसतो. निष्कर्ष असा की, कोणता उपचार परिणामकारक, याबाबतच्या निवडीसाठी वैद्यकीय संशोधनाचा परिचय करून घ्यावा आणि ते शक्य नसेल, तर आधुनिक उपचार करणार्या आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला स्वीकारून उपचार घेणं केव्हाही हितकर.