डॉ. रवींद्र टोणगावकर हे धुळे जिल्ह्यातील प्रख्यात सर्जन. दोंडाईचा या छोट्या गावात आपला दवाखाना काढून त्यांनी ग्रामीण जनतेच्या आरोग्यसेवेत महत्त्वाचे योगदान दिले व अजूनही ते चालू आहे; पण वैद्यकीय व्यवसाय आणि ग्रामीण शल्यचिकित्सेशिवाय टोणगावकरांनी आणखी एका क्षेत्रात खोलवर उडी मारली आहे, ते क्षेत्र आहे अध्यात्माचे. देव, धर्म आणि त्यातून निर्माण झालेल्या अंधश्रद्धा हा त्यांच्या संशोधनाचा छंद आहे. या छंदापायी त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रातील विवेकानंदांपासून ते विज्ञानाच्या प्रांतातील स्टीफन हॉकिंगपर्यंत सखोल चिंतन केले आहे.
या ग्रंथाच्या मनोगतात टोणगावकर सर लिहितात- ‘या सर्व शोधात मला असे कळले की, देव, आत्मा, पुनर्जन्म, चमत्कार, भुते-खेते अशा अनेक भ्रामक कल्पनांनी निर्माण झालेल्या चाली-रीती, कर्मकांडे व अंधश्रद्धा आणि त्यांचा वापर करून सामान्यजनांना फसवणारे बुवा, बाबा, महाराज, तांत्रिक पाद्री, मौलवी आणि धर्माच्या नावाखाली धर्मयुद्धे करून लाखो लोकांचे जीव घेणारे धर्मवेडे या सर्वांचा भांडाफोड तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसांना या सर्व गोष्टीचा इतिहास, त्या निर्माण कशा झाल्या, त्यामागील सत्य काय आहे हे कळेल.’
हे सत्य शोधण्याचे अविरत कार्य गेली 50 वर्षे डॉ. टोणगावकर सर करीत आहेत. त्यांच्या या बौद्धिक साहसातून ‘माझी आध्यात्मिक वाटचाल’ हा ग्रंथ साकार झाला आहे.
डॉ. टोणगावकरांचा हा आध्यात्मिक प्रवास खरं तर अध्यात्माकडून विवेकवादाकडे झाला आहे; पण केवळ बौद्धिक चिंतन असं त्याचं स्वरूप नाही. डॉक्टरांनी आधी अनुभवले आणि मग सांगितले. भगवद्गीतेवर ठाम विश्वास असणार्या डॉक्टरांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती घेतल्यावर गीतेची मर्यादा त्यांना जाणवली. याचं कारण विज्ञानाच्या प्रकाशात त्यांना प्रतीत झालेला ‘आत्मा’ या संकल्पनेचा फोलपणा. आत्मा नसेल तर मग पुनर्जन्म नाही आणि भुते-खेतेही नाहीत. ‘आत्मा’ हेच अंधश्रद्धांचे मूळ आहे हे लक्षात आल्यावर डॉक्टर अंधश्रद्धांचे चिकित्सक बनले आणि त्यांनी महाराष्ट्र अंनिसचा विचार स्वीकारला आणि त्याचा प्रामाणिक प्रसारही केला. आज ते महाराष्ट्र अंनिसच्या उत्तर विभागाचे उपाध्यक्ष आहेत आणि या पदाद्वारे ते महाराष्ट्र अंनिसच्या कार्याला गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
डॉ. टोणगावकर यांचे संशोधन एकांगी नाही. त्यांनी विज्ञानाच्या सत्यनिष्ठेच्या भूमिकेतून आपली मते बनविली आहेत. केवळ तर्क नव्हे, तर गृहितकाला पुरावा द्यायला हवा, ही विज्ञानाची भूमिका असते. याच भूमिकेतून देव, धर्म आणि श्रद्धा-अंधश्रद्धा याविषयीची त्यांची भूमिका साकारली आहे. ‘विपश्यने’चा स्वत: अनुभव घेऊन त्यातील फोलपणा त्यांच्या लक्षात आला.
‘माझी आध्यात्मिक वाटचाल’ हा ग्रंथ तीन भागात विस्तारला आहे. पहिल्या विभागात देव आणि धर्म यांच्या उत्पत्तीचे विवेचन आहे. दुसर्या भागात आत्मा आणि पुनर्जन्म यांचे संशोधन विस्ताराने दिले आहे. तिसरा विभाग संकिर्ण आहे. शेवटी परिशिष्टामध्ये ‘चिंतनपथावरील भौतिकवादी पाऊलखुणा’ हा प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांचा अभ्यासपूर्ण लेख आहे.
डॉ. टोणगावकर अध्यात्माचा आशय फक्त सांगत बसले नाहीत, त्यांनी या ज्ञानाचा आपल्या जीवनात अंगीकार केला आहे. त्यांनी आपल्या आई-वडिलांचे मृत्यूनंतरचे कोणतेही कर्मकांड केले नाही. वडिलांच्या श्राद्धदिनी सेवा ट्रस्ट स्थापन करत अनेक समाजोपयोगी कामे केली. मोफत शस्त्रक्रिया शिबिरे घेतली आणि आईच्या नावे स्थापन केलेल्या शाळेला 50 लाखांची देणगी दिली.
‘आधी केले, मग सांगितले’ अशा या संत डॉक्टरांचे अनुभव या पुस्तकातून मुळातूनच वाचायला हवेत.
पुस्तकाचे नाव : माझी आध्यात्मिक वाटचाल
लेखक : डॉ.रवींद्रनाथ टोणगावकर
प्रकाशक : अरविंद घन:श्याम पाटकर
मनोविकास प्रकाशन, पुणे.
फोन नं.(020) 65262950
किंमत : रु.250/-