Categories
मानसमित्र

मानसिक आरोग्यावर शास्त्रीय उपाययोजनाच महत्त्वाची-अविनाश पाटील

एप्रिल - २०१८

बुलढाणा येथे मानसमित्र कार्यशाळा संपन्न

निरामय मानसिक आरोग्यासाठी जबाबदारी घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या दर्ग्याच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर प्रबोधन, शिक्षण आणि शास्त्रीय उपाययोजना करण्याचा वस्तुपाठ ‘मानसमित्रा’च्या माध्यमातून बुलढाणा जिल्हावासीयांनी येत्या कालावधीत देशासमोर उभा करावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मानसिक आरोग्य प्रकल्प विभागांतर्गत मानसमित्र तयार करण्यासाठी मानसमित्र कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बुलढाण्याच्या वतीने प्रगती सार्वजनिक वाचनालयात करण्यात आले. या मानसमित्र कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिस बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष आंबेकर हे होते. महाराष्ट्र अंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील पुढे म्हणाले की, सैलानीबाबा दर्ग्यावर होत असलेल्या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा बुलढाणा जिल्ह्यासाठी भूषणावह नसून दूषणावह आहेत, हे मोकळ्या मनाने सर्वांनी स्वीकारणे गरजेचे आहे.

मानसिक आरोग्य या विषयावरील समाजाचे आकलन तयार करण्यासाठी या मानसमित्र कार्यशाळेला मानसिक आरोग्य प्रकल्पाचे राज्य कार्यवाह डॉ. प्रदीप जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. मन, मनाचे आजार व मानवी वर्तणूक याबद्दलचे सविस्तर मार्गदर्शन प्रदीप जोशी यांनी केले. मानसमित्र कार्यशाळेचे उद्घाटन बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. पंडित यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मानसिक रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असून बुलढाणा जिल्ह्यात स्वतंत्र मनोविकार रुग्णालय निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

या मानसमित्र कार्यशाळेला डॉ. सौ. लता भोसले-बाहेकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. या कार्यशाळेपूर्वी डॉ. प्रदीप जोशी यांनी स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना राजमुद्रा बँकिंग करिअर सेंटरमध्ये विशेष मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनप्रसंगी अध्यक्षस्थानी शाहिना पठाण या होत्या. मानसमित्र कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने नरेंद्र लांजेवार, दीपक चाटे, प्रदीप हिवाळे, नीलकुमार बंगाळे, पंजाबराव गायकवाड, नीलेश चिंचोले, प्रा. अनिल रिंढे इत्यादींनी विशेष मेहनत घेतली.

नरेंद्र लांजेवार, बुलढाणा